सरकारवादाची सिनिकल बखर – येस मिनिस्टर

येस मिनिस्टर : सरकारवादाची सिनिकल बखर
“Satire is the revenge of intelligent on the privileged – it is there to prick pomposity and check power”

जॉर्ज ऑरवल म्हणायचा की राजकीय व्यवस्थेवर केलेला प्रत्येक विनोद ही स्वतःतच एक छोटीशी क्रांती असते. जगभरात राजकीय सत्तेची आणि राजकीय अस्मितांची किमान विनोद सहन करण्याची आणि आपल्याच व्यंगांवर हसण्याची क्षमता त्या-त्या समाजाची पोलिटीकल म्याचुरीटी दाखवत असते. 1975 च्या आणीबाणी विरुद्ध भाषणं देताना पु.ल. देशपांडे अनेकदा म्हणायचे की जिथे राज्यकर्ते हसत नाहीत आणि लोकांना खळखळून हसू देत नाहीत अशी व्यवस्था म्हणजे हुकुमशाही. विनोद हे , मग तो तिखट असो व बावळट असो, बंडखोराचं राजकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं हुकमी अस्त्र असतं. विनोदानं मानसं जोडली जातात, आपला विचार इतरांप्रत पोहचवायला सोपं जातं आणि परिणामी व्यवस्थेच सुजलेलं-कुजलेलं रूप लोकांसमोर उभं ठाकतं, जेणेकरून “Something is rotten in the state of *****’ याची जाणीव तरी जनतेला होत असते. अतिशयोक्तीपूर्ण असलं तरी युरोपातील राजसत्ताना न भिणारा हिटलर डेव्हिड लोऊ सारख्या व्यंगचित्रकाराला भ्यायचा ही जनसामान्यातील भावना, व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी प्रहसन (Satire) हे केवढं प्रभावी मध्यम आहे याची झलक आपल्याला देतं.विशेषतः इंग्लिश समाजात उपहास आणि प्रहसनाचं झाड सर्वांगाने बहरत होतं. 1970च्या दशकापर्यंत विनोदी अंकुशाच काम मुख्यत: कार्टून्स, कादंबरी, निबंध अथवा स्फूट अशा छापील स्वरूपातच राहिलं आणि या सार्‍या सांस्कृतिक-राजकीय संचीतावर उभारेलेला टेलीव्हिजन काळातील सिरीयालींचा मानबिंदू म्हणजे ऐंशीच्या दशकात प्रकाशित झालेली आणि आजही तेवढाच धुमाकूळ घालणारी ‘येस मिनिस्टर’ आणि ‘येस प्राईम मिनिस्टर’ ही टीव्ही मालिका. ब्रिटीश राजकीय नेते, उमराव वर्ग आणि मुठभर अति-प्रभावी श्रीमंत लोकं आणि त्यांच्या आपापसातील कुरघोड्या व संगनमतावर टिकलेली ब्रिटीश राजकीय व्यवस्था यावर बारकाईने केलेली टिप्पणी म्हणजे येस मिनिस्टर ही मालिका आहे. ‘येस मिनिस्टर’ चा अर्ध्या तासाचे सात भाग असणारा पहिला सिझन 1980 मध्ये प्रसारित झाला आणि पुढे त्याच नावाचे अजून दोन सिझन 1984 पर्यंत चालले. पुढे 1986 ते 1988 च्या दरम्यान ‘येस प्राईम मिनिस्टर’ या नावाने येस मिनिस्टरचाच सिक़्वेल (ज्यात आधीच्या मालिकेतील सर्व पात्रांची पंतप्रधान व त्यास समांतर पदांवर बढती झाली आहे) बीबीसी वर प्रसारित झाला. पहिल्या भागाची लोकप्रियता प्रचंड असल्याने या मालिकेत 1980 ते 1988 मध्ये प्रसारित झालेल्या सर्वच भागांना ‘येस मिनिस्टर’ हेच नावं द्यायची प्रथा पडली. सबब या लेखात येस मिनिस्टर हे नाव वापरले असताना त्यात येस प्राईम मिनिस्टरचा भाग सुद्धा गृहीत धरला आहे.

थोडक्यात जर या मालिकेचं बेसिक कथानक सांगायचं झालं तर ते असं: जिम हॅकेर , सर हम्फ्री अ‍ॅप्प्लेबे आणि बरर्नाड वूली या तीन पात्रांच्या अवतीभोवती ही मालिका फिरते. जिम हॅकेर हा एक दुसर्‍या फळीतला ब्रिटीश खासदार. ‘Administrative Affairs’ या म्हणावं तर दुय्यम पण ठरवलं तर मध्यवर्ती अशा खात्याचा मंत्री बनतो. सर हम्फ्री अ‍ॅप्प्लेबेय हा एक बुद्धिमान, चतुर आणि महत्वाकांशी वरिष्ठ नोकरशाह त्या खात्याच्या Parmanant Secretary असतो. राजकीय व्यवस्थेमध्ये ‘मंत्री’ हे अपरिहार्यतेतून जन्माला आलेली क्षणभंगूर अडगळ आहेत तथापि सदर व्यवस्था वर्षानुवर्ष मॅच्युअर झालेल्या नोकरशाहीच्या स्टील फ्रेम मुळेच टिकली आहे आणि टिकून राहिलं या खास सिव्हील सर्व्हंट वृत्तीचा परमोच्च रूप म्हणजे सर हम्फ्री अ‍ॅप्प्लेबे. आणि बर्नर्ड वूली हा एक तरुण(?) जिम हॅकेरचा पार्लमेंटरी प्राईव्हेट सेक्रेटरी. पहिल्यांदाच मंत्र झालेला जिम इलेक्शनमध्ये त्याच्या पक्षाने लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या उमेदीने मंत्रालायच्या कामाला लागतो, आणि नोकरशाहीच्या अडेलतत्टू वृत्तीचा जिमला तो विरोधी पक्षात असल्यापासून राग असल्याने, शक्य त्या-त्या ठिकाणी नोकरशाहीच्या (म्हणजे पर्यायानं सर हम्फ्रीच्या)नाकावर टिच्चून आपल्या पक्षाची उदारमतवादाकडे झुकणारी राजकीय- आर्थिक-सामाजिक धोरणं राबण्याचा त्याचा अजेंडा असतो. आता समाजवाद, कमांड इकोनोमी, आणि पर्यायाने रेड टेप च्या सुवर्णकाळात या घटना घडत असल्याने, उदारमतवादी व्यवस्थेत आपली सद्दी कमीकमी होईल या भीतीपोटी सर हम्फ्री आणि एकूणच नोकरशाही मंत्र्याच्या प्रत्येक कार्यक्रमात सतत खोडा घालायचं काम करत रहाते. हम्फ्री आणि जिमच्यामधील या अंतर्गत चढाया ही आधी येस मिनिस्टर आणि नंतर जिम पंतप्रधान व हम्फ्री कॅबिनेट सेक्रेटरी झाल्यावर येस प्रेम मिनिस्टर या दोन्ही मालिकेतील पुन्हापुन्हा येणारी थीम आहे. मात्र र्वसाधारण समजानुसार लोकनियुक्त प्रतिनिधी वि. नोकरशाही अशी या मालिकेची भारतातली ओळख बर्‍याच अंशी अपूर्ण आहे हे जाणवल्याखेरीज रहात नाही. कदाचित आपण आजही नोकरशाहीमध्ये आवळलेल्या समाजात रहात असल्यामुळे सदर मालिकेचं त्यासंबंधीचं अंग आपल्याकडे अधिक समजलं गेलं असावं. असं असलं तरी मूलगामी बदलाच्या कार्यक्रमाच्या जोरावर सत्तास्थानी गेलेले पक्ष आणि नेते, एकदा सरकार बनल्यावर पुन्हा मागचीच री का ओढतात या कोड्याचं (?) सिनिकल का असेना पण एक उत्तर या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला मिळत. सरकारवादाची सिनिकल बखर असणारी ही मालिका अभिजात ठरण्याला त्याचं प्रचंड बारकाईने आणि नाजूक कौशल्याने केलेलं लिखाण, त्यातल्या पात्रांची स्पेस आणि मुख्यत: जिम-हम्फ्री-बर्नार्ड यांच्या वठवलेल्या भूमिका कारणीभूत आहेत. मालिकेच्या लिखाणाविषयी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संदर्भम या लेखात सतत येत रहातीलच मात्र यातील तीन मुख्य पात्रांवर भाष्य केल्याखेरीज मालिकेचं रसग्रहण अपूर्ण ठरेल.

ऐंशीच्या दशकातील असूनही अमुक एक हीरो दुसरा व्हिलन अशी आजही रोजच्या धाटणीची पात्ररचना येस मिनिस्टरमध्ये नाही. प्रत्येक पत्राची मांडणी करत असताना त्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पदर यामध्ये उलगडून दाखवले आहेत. या मालिकेतील तुमचे आवडते पात्र कोणते? हा खेळ वादविवादासाठी अतिशय उत्तम ठरतो असा माझा अनुभव आहे. आणि आता बरेच वेळा ही सिरीयल पहिली असल्याने निदान मी या खेळाच्या ‘वर गेलो’ असल्याची माझी भावना आहे. आवडीनिवडीचा (गमतीचा) जर भाग सोडला तर सर हम्फ्री अ‍ॅप्प्लेबेयच्या जवळ जाणारं पात्र इतरत्रही क्वचितच सापडेल. येस मिनिस्टरच्या यशामध्ये आणि आता त्याच्या लेगसीमध्ये सर हम्फ्रीने सर्वात मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. जगभरातल्या समीक्षकांनी आणि राजकीय तज्ञांनी हम्फ्री अ‍ॅप्प्लेबेय म्हणजे माकीयाव्हेलीयन मुल्यांचं अप्रतिम कारीकेचार असल्याचं आता मान्य केलं आहे. सर हम्फ्रीच्या माध्यमातून ब्रिटीश राजकीय व्यवस्थेतील सर्वोत्तम तसंचं सर्वात वाईट, टिकलेलं आणि कुजलेलं असं एक अजब मिश्रण आपल्यासमोर उभं ठाकत. क:पदार्थ या भावनेनेच तो सगळ्या मंत्र्यांना वागवत असतो. खष If the right people don’t have power, then the wrong people shall get it या मूल्यावर विश्वास ठेवणारा हम्फ्री एकीकडे सगळी सूत्र आपल्या ताब्यात ठेवतो आणि असं असूनही सर्वंकष सत्तास्थान न होता अर्धवट राजकारण्यांच्या डेमोक्रसी मध्ये मेरीटोक्रसी टिकून राहावी या उद्दात ध्येयासाठी झटत असतो. जग्भारावर वर्चस्व गाजवणार्‍या ब्रिटीश साम्राज्याचं मूळ असणारी नोकरशाहीची ‘स्टील-फ्रेम’ हाच आपला भूत-वर्तमान आणि भविष्य आहे, सबब त्याच्यामध्ये लोकशाहीच्या नावे कोणीही उठून लुडबुड करू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा हम्फ्री म्हणजे चुकीच्या काळात जन्माला आलेला बरोबर शिलेदार आहे असं मला वाटतं. म्हणजे ही मालिका बघावी आणि नंतर माकीयाव्हेलीचं ‘द प्रिन्स’ वाचावं (किंवा त्यावरची इतर पुस्तकांतील टिप्पण) म्हणजे आपण याची देही ते राजकारण पाहतोय असा भास झाल्याखेरीज रहात नाही. आपला मुद्दा पटवण्यासाठी सर हम्फ्री कोणत्याही पातळीचे युक्तिवाद करतात आणि दुख: याचं वाटतं की त्याचं म्हणणं चुकीचं आहे तरी त्यातला शहाणपणाचा मुद्दा इतरांना (आणि बरेचदा आपल्यालाही ) पटतो. बाकीच्या दोन पात्रांच्या तुलनेत सर हम्फ्रीला संवादही अधिक आहेत आणि सर नायजेल हाव्हथोर्न या अभिनेत्याने ते पात्र अक्षरशः अजरामर केलं आहे. ऑक्स-ब्रिज मध्ये शिकलेला त्यामुळे इतर कुठेही शिकलेल्या मंत्री व इतरांची सतत मापं काढणारा हम्फ्री, त्याचं ऐकत राहावं असं काव्यात्मक इंग्लिश बोलणं, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी वाटेल त्या मार्गाने त्याची चालणारी खटपट, मध्येच केव्हातरी (फार अपवादाने) जिम कडून चीत झाल्यावर हम्फ्रीचे बदलणारे हावभाव यामुळे नकारात्माकतेचं सावट असूनही ते पात्र विलोभनीय वाटतं.

जिम हॅकेर हे आधी मंत्री व पुढे पंतप्रधान झालेलं पात्र. जिमची भूमिका पौल एडींगटन या अभिनेत्याने साकारली आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स चा पदवीधर असल्याने ऑक्स-ब्रिजमधल्या सहकार्‍यांच्या टिंगलीचा विषय असणारा, चाळीशीतला, प्रसिद्धीची आवड असलेला आणि त्यामुळेच नेहमी कोणत्यातरी विचित्र कात्रीत सापडणारा काहीसा वेंधळा पण बराचसा निरागस जिम बहुतांश दर्शकांचा लाडका होता आणि आजही आहे. जिमचं पात्र हे सर्वसामान्य राजकारण्याच व्यंगचित्र असलं तरी ते अवास्तव बावळट किंवा रासवट वाटत नाही हे या लिखाणाचं मोठं यश आहे. ज्याप्रमाणे मेरीटोक्रसीचा अध्वर्यू सर हम्फ्री आहे तसच जग इकडच तिकडे झालं तरी चालेल पण आपण पुन्हा निवडून येणं ही आपली क्रमांक एकची जबाबदारी आहे या वृत्तीचा अध्वर्यू म्हणजे जिम हाकेर. असे परस्पर विरोधी अजेंडे असल्याने जिम आणि सर हम्फ्री यांच्यात कुरघोडी न होतात तरच नवल. आणि जिम सारख्या नवख्याला सर हम्फ्रीसारखा मुरलेला नोकरशाह चुना लावणार यातही फारस आशाचार्य नाही. पण तरीही सबंध मालिकेत किमान सात-आठ प्रसंगी जिम वरचढ ठरतो तेव्हा आपल्याला (उगीचच) बरं वाटतं. 1980च्या दशकात प्रसारण चालू अस्त्नाना जेव्हाकाधी जिम जिंकायचा तेव्हा बीबीसीच्या स्टुडियोत अभिनंदनपर पत्रांचा ढीग साठायचा. पुढे अनेक वर्षांनी बीबीसीने जेव्हा येस मिनिस्टर वर एक डॉक्युमेंटरी केली तेव्हा खास इंग्लिश विनोदात त्यांनी जिमला खालील प्रमाणे मानवंदना दिली होती:

As it so happens, Jim Hacker is the only politician the British people truly liked!

आणि सर हम्फ्री आणि जिमच्या या मांजर-उंदीराच्या खेळात खरी फरपट व्हायची ती बर्नार्ड वूलीची. बर्नार्डची भूमिका डेरेक फोल्ड्स या अभिनेत्याने साकारली होती. उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात नवखा असलेला, नोकरशाह असूनही मंत्र्याचा खाजगी सेक्रेटरी असणारा,म्हणून ‘मी नक्की कोण?’ या सततच्या आयडेन्टीटी क्रायसिसमध्ये असणारा, जिम व हम्फ्री कडून सतत आपल्या गोटात ओढला जाणारा मात्र व्यक्तिमत्वाने ब्रिटिश राजकारणातला नवीन ‘सदाचारी बंडू’ असणारा बर्नार्ड कधीकधी जनहितार्थ आणि बरेचदा स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी आपल्या दोन्ही बॉसना थार्मामिटर लावायचं काम उत्तम बजावायचा. खरतरं सुरुवातीच्या काही भागांत बर्नार्डला फारशी वाक्य नाहीतच पण तरीही तो जवळपास प्रत्येक सीनमध्ये आहे. यामुळेच अभिनयाच्या दृष्टीने बर्नार्डच्या पात्राचं वर्णन ‘अवघड’ असं केलं जातं. असे प्रसंगामागून प्रसंग सांगता येतील ज्यामध्ये बडबडायचं काम मुख्यत: हम्फ्री आणि जिम करता आहेत आणि एकही वाक्य न उच्च्चारता पण आपण त्या घटनाक्रमाचा भाग आहोत हे दाखवायचं काम बर्नार्डचं आहे, आणि यातूनच केवळ सहज हावभावांच्या जीवर ऑफ फोकस मधील उत्तम अभिनयाचा नमुना आपल्यासमोर आला. बर्नार्डच दुसरं अधिक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लांबलचक सीनच्या शेवटाकडे त्याला एखादंच वाक्य असायचं, मात्र त्या वाक्यात त्या प्रसंगातला सर्वात हसवणारा विनोद असायचा आणि डेरेक फोल्ड्सने अप्रतिम टायमिंगच्या जोरावर असे अनेक सिन्स अजरामर केले. म्हणजे बर्नार्डच्या वन लाईनरची कमाल येस मिनिस्टर मधल्या कोणती वृत्तपत्र कोण वाचत? या आयकोनिक प्रसंगातून आपल्याला दिसते. अशाच कुठल्याशा प्रस्तावित धोरणाविषयी प्रेस सरकारवर टीका करत असते, त्यामुळे सर हम्फ्री जीमला सावधतेचा इशारा देत असतात. त्यावर जिमचं हे उत्तर आजदेखील इंग्लंडमध्ये प्रमाण म्हणून बरेच लोकं वापरतात.

Jim Hacker-Don’t tell me about the press. I know exactly who reads the papers. The Daily Mirror is read by people who think they run the country; The Guardian is read by people who think they ought to run the country; The Times is read by the people who actually do run the country; the Daily Mail is read by the wives of the people who run the country; the Financial Times is read by people who own the country; the Morning Star is read by people who think the country ought to be run by another country, and the Daily Telegraph is read by people who think it is.

Sir Humphrey: Prime Minister, what about the people who read The Sun?

Bernard: Sun readers don’t care who runs the country, as long as she’s got big tits.

या लेखाच्या निमित्त मला ही मालिका का आवडते या मुलभूत प्रश्नावर विचार करायला लागला. म्हणजे तीस वर्षानंतरही ही मालिका कालसुसंगत रहाते हा निर्विवाद मुद्दा सोडला तरी अनेक कारणं शिल्लक रहातात. आपण जर ही मालिका आगोदर पहिली नसेल तर शीत-युद्ध, थॅचरीझम च्या काळातील एक राजकीय टीव्ही मालिका आजही एवढी सुसंगत कशी रहाते असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. शिवाय अत्यंत कमी खर्चात बनवलेली, एखादाच आणि तोही स्थिर कॅमेरा अंगलमध्ये चित्रित केलेली, नव्वद टक्के भाग एका खोलीत घडणारा असं असूनही निव्वळ अप्रतिम कथानक-संवाद आणि अभिनयाच्या जोरावर काय पातळीची कला निर्मिती होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे येस मिनिस्टर ही मालिका.

या मालिकेचे लेखक सर अ‍ॅन्थनी जे आणि जोनाथन लायन यांनी सांगितल्याप्रमाणे यात अ‍ॅक्शन नाही, उत्कंठावर्धक घटनांची मालिका नाही, सेक्स नाही वा कमरेखालचा विनोद नाही तर तीन पन्नाशीची माणसं देशाचं आर्थिक धोरण, परराष्ट्र संबंध, बँकिंग धोरणं अशा अनेक रुक्ष विषयांवर अथक चर्चा करतात आणि आजही लोकं खळखळून हसत त्या चर्चेचा आनंद घेतात यातच या निर्मितीचं सार्थक आहे. 1980च्या दशकातलं ब्रिटीश राजकारण कसं चालता आणि विशेषतः त्याचे सूत्रधार याविषयी सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नव्हती. अशा काळात येस मिनिस्टर ही मालिका लोकांसाठी ब्रिटीश राजकीय प्रक्रियेचं गाईडबुक म्हणून समोर आली. म्हणजे अगदी छोट्या कामचुकार वृत्तीपासून ते थेट प्रश्न टाळण्याच्या राजकीय कौशल्यापर्यंतचा सगळं पाट या मालिकेच्या माध्यमातून तेव्हाही आणि आजही आपल्यासमोर उभं रहातो. म्हणजे कागदपत्र गहाळ होण ही बाब जगभरातल्या कोणत्याही सरकारी यंत्रणेसाठी किमान पात्रता राखण्याची बाब आहे आणि आपल्या सगळ्यांवरच सरकारी यंत्रणेची ही कृपा केव्हाना केव्हा तरी ओढवली आहेच. आणि मग साहेब आज नको, उद्या या! शोध चालू आहे अशी ठरलेली उत्तर सगळ्यांना मिळतात. सरकारी यंत्रणेच्या या वृत्तीवर येस मिनिस्टर मधल्या एका प्रसंगातून मार्मिक टिप्पणी केली आहे. तिथेही अशीच कोणतीतरी महत्त्वाची फाईल हरवली आहे आणि त्यासंबंधी जिम हाकेर आणि बर्नार्ड चर्चा करतायत:

Bernard: I shall write him an official reply saying thank you and something like “The matter is under consideration’ or even “the matter is under active consideration!’

Jim: What’s the difference?

Bernard: Well; “under consideration’ means we have lost the file, and “under active consideration’ means we are trying to find it.

आणि उपहास हे मूल्य या मालिकेत ओतप्रेत भरलेलं आहे. सरकारी यंत्रणेच्या अकार्यक्षमतेची जिथे-जिथे शक्य असेल अशा जागी जोरदार टिंगल उडवली आहे. शीतयुद्धाचा तो काळ, त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सगळ्या देशांचं बारीक लक्ष असायचं. मालिकेच्या एका भागात एका आफ्रिकन देशाच्या अध्यक्षाची इग्लंडला भेट असल्याचा एक प्रसंग आहे. या दौर्‍याच्या इंग्लंडमधल्या नियोजनाची जबाबदारी ‘Administrative Affairs’चा मंत्री म्हणून जिम आणि सर हम्फ्री वर असते. मात्र या पूर्व-नियोजित दौर्‍याच्या आठवडाभर आधी त्या आफ्रिकन देशात सैन्य अधिकारी लोकशाही उलथवून सर्वंकषवादी सत्ता स्थापन करतात. बीबीसीच्या वर्ल्ड न्यूजमधून ही बातमी जिम आणि हम्फ्रीला समजते आणि त्याची सत्यता तपासण्यासाठी ते लगेच ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयात फोन करतो आणि तिथल्या अधिकार्‍यांना याबाबत विचारतो, तेव्हा परराष्ट्र मंत्री जिमला सांगतो की त्याचा टीव्ही गेले दोन दिवस बंद असल्याने त्याला या घटनेची माहितीच नाही. वसाहतींचे स्वातंत्र्य, सुवेझ प्रकरण आणि एकूणच अंतरराष्ट्रीय पटलावर इग्लंडची होणारी पिछेहाट व त्याविषयक मार्मिक, विनोदी आणि तिरकस भाष्ये हे या मालिकेचं ठळक वैशिष्ट्य राहिलं आहे. आजच्या घडीला ब्रेक्झिट ही एकूणच ब्रिटीश समाजातील एक ठसठसती जखम आहे. अजूनही त्याबाबतीत नक्की काय चाललं आहे याची कोणालाच धड माहिती नाही. आणि मागच्या 2-3 वर्षांत युरोपीय युनिअनची कल्पनाच धोक्यात आल्याची चर्चा सर्व स्तरांवर होऊ लागली आहे. अशातच येस मिनिस्टर मालिकेतील ब्रिटनची इयुमधील भूमिका काय आणि इयुचं प्रयोजन काय यावर आपल्या तीन मुख्य पत्रांतील चर्चा आणि म्हणावं तर सिनिकल टिप्पणी प्रचंड लोकप्रिय झाली.

आणि मी सुरुवातीच्या भागात म्हटल्या प्रमाणेविनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसांना सत्ताधारी वर्गावर (मग त्यात सरकार, विरोधक, नोकरशाह, अमीर-उमराव, अगदी गावजिल्हा पातळीवरचे दादा-मामा असे सगळे आलेच) अंकुश राखता येतो याचं एक उदाहरण येस मिनिस्टर या मालिकेच्या निर्मिती प्रक्रियेमध्येच येतं. ऐंशीच्या दशकात ब्रिटनमध्ये (आणि जगभरात) माहिती-प्रसारण तंत्रज्ञानामध्ये बीबीसीची मोनोपोली होती आणि बीबीसीवर ब्रिटीश सरकार आणि व्हाईट हॉल (म्हणजे ब्रिटीश नोकरशाहीचं सर्वोच्च कार्यालय) अंकुश होता. अशा वातावरणात बीबीसी वरून सत्ताधारी वर्गाच्या हितसंबंधावर असं उपसाहात्मक भाष्य करणार्‍या या मालिकेवर कोणत्याही क्षणी बंदी येऊ शकेल ही धास्ती लेखकांना व निर्मात्यांना होती. आणि यातून मार्ग काढायचा म्हणून मग मालिकेचं शुटींग चालू असताना तिथे लाइव्ह ऑडीअन्स आणायची कल्पना पुढे आली. मालिकेतल्या विनोदांना, पात्रांना तिथे उपस्थित लोकांच्या हास्य-कल्लोळातून उदंड प्रतिसाद मिळू लागला आणि यामुळे बर्‍याच उच्चभ्रू लोकांचा विरोध असूनही या मालिकेचं चित्रीकरण विनासायास पुढे सरकत गेलं, लोकं त्यात गुंतू लागली आणि 20व्या शतकातील एका प्रगल्भ राजकीय फार्स पूर्ण झाला.

येस मिनिस्टरचं यश नेमकं कशात आहे यावर आज 30 वर्षांनंतर देखील विचार होतो आहे यातच या मालिकेचा प्रभाव स्पष्ट होतो. नाही म्हणायला ही मालिका मी पहिल्यांदा सेकंड इयरला असताना बघितली होती आणि त्यानंतर देखीलमध्ये मध्ये त्यातल्या काही भागांची पारायणे चालूच होती. मात्र जेव्हा मी शिकायला इग्लंडला गेलो तेव्हा या मालिकेच्या आवाक्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. राजकीय संस्कृती (Political culture या अर्थाने) वर यामध्ये केलेली भाष्य आजही तितकीच ताजीतवानी वाटतात. युट्युब वर या मालिकेतल्या दोन-चार मिनिटांच्या चित्रफिती आहेत, त्यात 30 वर्षापूर्वी सर हम्फ्री आणि पंतप्रधान जिम ब्रेक्झिटवर काय बोलले होते, शिक्षण धोरणावर त्यांची काय मत होती अशा बर्‍याच गोष्टी आहेत. त्यातल्याच एका व्हिडियोवर कोण्यातरी जुन्या चाहत्याने केलेली पुढील टिप्पणी सदर मालिकेच्या अभिजाततेचं कारण शोधण्यादृष्टीने फार मार्मिक आहे : When it first aired in 1980s, I watched it as a sitcom, but now I realise, it is a documentary! (ऐंशीच्या दशकात जेव्हा ही मालिका टीव्हीवर प्रसारित व्हायची तेव्हा ही एक काल्पनिक कथा असल्याच्या भावनेन मी बघायचो, मात्र आता लक्षात येतंय की ही एक राजकीय डॉक्युमेंटरी आहे!) आजही इंग्लंड मधल्या विद्यापीठांत ब्रिटीश राजकारणाशी निगडीत बर्‍याच लेक्स्चर्सची सुरुवार येस मिनिस्टर मधल्या विविध क्लिप्स दाखवूनच केली जाते याचा अनुभव मी घेतला आहे. तिकडे माझं राजकीय ओपिनियन पोल्स आणि सर्वेक्षणाशी निगडीत एक मोड्यूल होतं. आमचा शिक्षक फार सोज्वळ असल्याने, ओपिनियन पोल्स आणि सर्वेक्षणासारखं ‘परिमाणात्मक संशोधन’ (Quantitative Research), हे काही भरतवाक्य नाही हे आम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करत असताना त्याने तासाची सुरुवात सर हम्फ्रीच्या सदाबहार तिरकस शहाणपणाने केली. बहुतांश ओपिनियन पोल्समध्ये ते सर्वेक्षण घेणार्‍या व्यक्तीला अपेक्षित उत्तरं मिळण्याच्या दृष्टीनेच त्यातील प्रश्नाची मांडणी केलेली असते याचं प्रात्यक्षिक सर हम्फ्री; बेर्नाडला देतो. सुदैवाने या प्रसंगाची दोन मिनिटांची क्लिप युट्युबवर आहे.

आता नेटफ्लीक्सच्या काळात कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना टीव्ही मालिका बघायला फारसं निमित्त लागत नसेल पण चार वर्षांपूर्वी इंग्लिश मलिका बघण्यात वेळ घालवायचा असेल तर घरच्याना काहितरी सटिक कारण द्यावं लागत असे. म्हणजे इंग्लिश सुधारण्यासाठी ‘फ्रेंडस’ बघतो या मुद्द्यानेच माझ्या बहुतांश मित्रांची इंग्लिश मालिकांची सफर चालू झाली. मात्र जर खरचंच इंग्रजी भाषा, त्याची संस्कृती, त्यातील बारकावे समजून घ्यायचे असतील तर येस मिनिस्टरला पर्याय नाही. ‘फ्रेंड्स’प्रमाणेच भाषिक विनोदचे सगळे प्रकार आपल्याला मालिकेत सापडतात. म्हणजे सर हम्फ्रीचा विनोद हा खास उच्चवर्णीय आणि प्रौढीयुक्त, ज्यात अधूनमधून शेक्सपिअर-बर्नाड-शॉ अशी सगळी परंपरा डोकावत असते. जिमचा विनोद त्याच्या धांदरट वृत्तीतून आणि बदलणार्‍या जनमानसातील त्याची उठबस यामधून जन्माला येतो. तर बर्नार्डचा विनोद हा मुख्यतः बुजरा पण संधी मिळताच बहरणारा (तत्कालीन वर्कींग क्लास चं प्रतिनिधित्व करणारा?). त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून केवळ भाषिक सांगाडा न उभारता- इंग्लिश भाषेचं संचित मर्यादित स्वरूपात होईना आपल्यासमोर उभं रहातं. या दृष्टीने एस मिनिस्टरची स्पेस ही कादंबरीची स्पेस आहे. गेल्या तीस वर्षांतील येस मिनिस्टर, वेस्ट विंग, ब्रेकिंग बॅड अथवा क्राऊनसारख्या मालिका पाहताना मला वाटतं की हा दृक-श्राव्य माध्यमानुसार बदलणारा माझ्या जनरेशनचा कादंबरीचा फॉर्म आहे. त्यामुळे निव्वळ विरंगुळ्याचे साधन या दृष्टीने न पहाता, कादंबरी आणि साहित्य समीक्षणाला लावल्या जाणाऱ्या सर्व कसोट्यांच्या पायावर आपण नव्या मालिकांची समीक्षा केली पाहिजे.

© अथर्व देसाई

atharvpeace@gmail.com