‘व्हाय सेक्स इज फन?’ची प्रस्तावना – प्रदिप रावत

डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी जेरेड डायमंड यांच्या ‘व्हाय सेक्स इज फन?’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर केलेले आहे. लवकरच ते पुस्तक बाजारात उपलब्ध होईल. त्या पुस्तकाला माजी खासदार आणि सध्याचे राष्ट्रीय शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष ‘प्रदिप दादा रावत’ यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

मराठीमध्ये विज्ञानलेखन कमी आणि लेखकही तुलनेने कमी. मराठीमधले बव्हंश विज्ञानविषयक लेखन माहितीपर असते. बर्‍याच प्रमाणात तंत्रज्ञान-माहितीकडे त्याचा कल असतो. भौतिकी, अंतरिक्ष विज्ञानाचा त्यात भरणा अधिक असतो. जीव-विज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि त्यामागचा उत्क्रांती-विज्ञानासारखा विषय फार क्षीण प्रमाणात लिहिला-वाचला जातो.

21 व्या शतकामध्ये जीव-विज्ञान आणि उत्क्रांतीविषयक होणारे संशोधन फार झपाट्याने वाढले आणि बदलले आहे. त्याचे अगदी त्रोटकदेखील दर्शन मराठी वैज्ञानिक लिखाणात सापडत नाही.

डॉ. शंतनू अभ्यंकरांनी या उणिवेला छेद देत अतिशय मोलाच्या प्रश्नांची चिकित्सा करणारे लिखाण केले आहे. सदर पुस्तक ‘व्हाय सेक्स इज फन (Why Sex is fun?)’ या जेरेड डायमंडकृत पुस्तकाचा सारानुवाद आहे. तत्पूर्वी त्यांनी रिचर्ड डोकिन्सकृत ‘मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या सुंदर, रसाळ विज्ञान लेखनाचाही अनुवाद केला आहे. त्यांच्या या स्पृहणीय लेखनामुळे मराठी साहित्यामध्ये अतिशय मोलाची भर पडणार आहेच; पण त्याचबरोबरीने अत्यंत महत्त्वाचे असूनही दुर्लक्षित राहण्याची त्रुटी दूर होणार आहे. त्यांच्या या स्वरूपाच्या लेखनाने अनेक नवोदित लेखक, वाचक दृष्टिआड राहणार्‍या विज्ञान जगाला सामोरे जातील! त्यात रस घेऊन आणखी भर घालू लागतील. अशी आशा वाटण्याजोगे हे अमोल योगदान आहे. त्याचे मराठी सारस्वताने मोठ्या उत्साहाने स्वागत केले पाहिजे.

सदर पुस्तक वरपांगी लाजरे-बुजरेपणा ते सवंगपणा अशा बुरख्यांनी वेढलेल्या विषयासाठी वाहिलेले आहे. मनुष्यप्राणी धरून सर्व प्राणिमात्रांमधील कामजीवनाचा उत्क्रांतीच्या संदर्भात अन्वय कसा लावायचा? हा मोठा गुंतागुंतीचा, वैविध्याने भारलेला आणि अनेक बाबतींत क्लिष्ट व मती गुंग करणारा असा प्रश्न विषय आहे. खुद्द डायमंड यांच्या लेखनाचा सूर कायम राखत, मराठी वळणाची भाषा या विषयाला एकाच वेळी रंजक आणि उद्बोधक बनवते, ही अभ्यंकरांची दाद देण्याजोगी कमाई आहे. विज्ञानलेखन सवंग न होता, तपशील न चुकता, ललितपणे करता येते, याचे हे पुस्तक उत्तम नमुना ठरावे.

सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी लिंगभेदावर आधारित प्रजोत्पादन उत्क्रांत झाले. बहुसंख्य प्रजाती या पद्धतीने प्रजनन करताना आढळतात. अलैंगिक प्रजननाद्वारे १०० टक्के जनुके पुढच्या पिढीला मिळतात. लैंगिक बीज नर-मादीच्या वीर्य व अंडे यांत विभागून प्रत्येकी ५० टक्के वारसा संक्रमित होतो. या पद्धतीचे प्रजनन खर्चीक असूनसुद्धा उत्क्रांतीदृष्ट्या खूपच किफायतशीर ठरले आहे. यदृच्छेने, पत्त्यांप्रमाणे पिसलेल्या जनुकांच्या नवरचनेद्वारे उत्क्रांतीची प्रक्रिया जलद होते. सातत्याने बदलणार्‍या पर्यावरणात तगून राहण्यासाठी अशी नावीन्यपूर्ण व उपयुक्त जनुके उपयोगी ठरतात. तसेच, जनुक पुनर्रचनेद्वारे हानीकारक जनुकांचा निचरादेखील शक्य होतो.

एकदा का लिंगभेदावर आधारित प्रजोत्पादन उत्क्रांत झाले, तर अपरिहार्यपणे लैंगिक निवड कार्यरत होते. नर-मादीच्या समागमातून अवघ्या प्रजेत जनुकीय पुनर्रचना घडते. दुसरे वैशिष्ट्यं असे की, नराचे वीर्य संख्येने अधिक पण आकाराने लहान असते. याउलट मादीची अंडी संख्येने कमी पण आकाराने मोठी असतात. बीजामध्ये आढळणारे वैधर्म्य (asymmetry) लैंगिक निवडीचा मार्ग प्रशस्त करते. उत्क्रांतीच्या दृष्टीने नर व मादी यांचे भिन्नत्व म्हणजे फलनप्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या गुंतवणुकीतील तफावत! महागडे अंडे व स्वस्त वीर्य, गर्भधारणेतील गुंतवणूक, पालकत्वातील वाटा या सगळ्यांचा अंतर्भाव ‘गुंतवणुकीत’ होतो. ९० टक्के सस्तन प्रजातींत केवळ मादीला पालकत्वाची जबाबदारी घ्यावी लागते. या विषम गुंतवणुकीमुळे नर व मादी यांना उपलब्ध असलेल्या समागमाच्या संधींमध्येही व्यस्त प्रमाण निर्माण होते. त्यामुळे अपत्यनिर्मितीच्या तुलनात्मक क्षमतेत खूप फरक पडतो.

जोडीदाराची निवड करताना दोघांच्या हितसंबंधांमध्ये परस्परविरोधी भूमिका तयार होते. लैंगिक निवड नरामध्ये अधिकाधिक माद्यांशी रत होण्याचा स्वभाव घडवणार्‍या जनुकांचे प्राबल्य वाढवेल. मादीचा दृष्टिकोन त्याउलट राहील. फलन, गर्भधारणा व संगोपन (बहुसंख्य प्रजातींत) यांतील ऊर्जा व कालाची गुंतवणूक तिच्या एकटीचीच असल्यामुळे जोडीदाराची पारख करणे तिला गरजेचे ठरते. संधीसाधू नर आणि सावध व धोरणी मादी ही लैंगिक निवडीची फलनिष्पती आहेच. नराचे आयुष्य म्हणजे मादीच्या प्राप्तीसाठी अन्य नरांशी सातत्याने करावी लागणारी स्पर्धा व हानीकारक संघर्ष होय. आकर्षक किंवा बलवान नरांना सर्वाधिक संभोगसंधी प्राप्त होते. तसेच, माद्या अशा नरांना अधिक पसंत करतात. दुबळ्या नरांना संभोगसंधी मिळणे अशक्यप्राय असते. पण जवळपास सर्व माद्यांना जोडीदार मिळतो. त्यामुळे संभोगसंधीतील माद्यांचा वाटा अधिक असतो. नर व मादी यांच्यातील अपत्यनिर्मितीच्या संभाव्य क्षमतेतील तफावतीचा प्रभाव नरांची स्पर्धा व मादीचा निवड-अधिकार यांना उत्क्रांत करतो. लैंगिक उत्क्रांतीचे हे सर्वसाधारण रूप आहे. याला काही अपवाद आहेत. विशेषत: काही पक्षी प्रजातींत लैंगिक एकनिष्ठा बाळगणारी जोडपी असतात. परंतु सस्तन प्रजातींत अशा एकनिष्ठ चालीचे प्रमाण केवळ २ टक्के आहे.

नर आणि मादी यांच्या गुणधर्मांतदेखील भिन्नत्व आढळते. उदा. रंगीबेरंगी शेपटी अथवा तुरा, लक्षवेधी नाच, अंग-प्रत्यांगांचे प्रदर्शन, गायनकला, निरनिराळ्या आकाराची शिंगांप्रमाणे आयुधे, धिप्पाड शरीरयष्टी, आकर्षक घरटी बांधण्याची कला इत्यादी. याला लैंगिक स्वरूपभेद (sexual Dimorphism) म्हणतात. खरे म्हणजे, जीवनकालाच्या तीव्र स्पर्धेत ही लोढणी महागडी व हानीकारक ठरतात. तरीही ती का उत्क्रांत झाली असतील?

नैसर्गिक निवडीला यशस्वी प्रजोत्पादनात स्वारस्य आहे, तगून राहण्यात नाही. नाकापेक्षा मोती जड अशा स्वरूपाची आयुधे किंवा आभूषणे आयुष्याची दोरी कमी करण्याची शक्यता असते; पण त्याचबरोबर प्रजोत्पादनाची संधी कित्येक पटींनी वाढते. नर-मादीतील लैंगिक स्वरूपभेदाकडे सर्वप्रथम डार्विनने लक्ष वेधले. लैंगिक निवडीचा सिद्धांत नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतात चपखल बसतो. लैंगिक निवड म्हणजे जोडीदार प्राप्त करण्याची संधी वृद्धिंगत करणारी निवड. नराच्या घटणार्‍या आयुष्यमानापेक्षा जर प्रजननसंधीची संभाव्यता अधिक असेल, तर लैंगिकदृष्ट्या निवडलेले गुणधर्म उत्क्रांत होतात.

लैंगिक निवडीचे दोन प्रकार आहेत. मादीच्या प्राप्तीसाठी नरांमध्ये होणारी स्पर्धा आणि जीवघेणा संघर्ष हा एक प्रकार आहे. नराची निवड करताना मादीमध्ये आढळणारा चोखंदळपणा हा दुसरा प्रकार. विविध प्रकारची शिंगसदृश आयुधे व धिप्पाड शरीरे नरांमधील मादीप्राप्तीच्या संघर्षांमुळे उत्क्रांत होतात. पण चित्ताकर्षक रंग, गायन, नृत्य, प्रदर्शन, घरटी इत्यादी गुणधर्म हे दुसर्‍या प्रकारच्या लैंगिक निवडीची उदाहरणे आहेत. मादीच्या नजरेत सर्व नर सारखे नसतात. याला आपण मादीने केलेली जोडीदाराची निवड म्हणू या. या दुसर्‍या प्रकारातदेखील सौम्य प्रमाणात नरांमधील स्पर्धा आढळते. उच्च स्वर, भडक रंग, अत्तरासारखे सुगंध, शृंगारिक हावभाव व नृत्य यांत पारंगत नरच मादीला आकृष्ट करतात. फरक एवढाच की ‘यशस्वी’ कोण याची निवड मादी करते. लैंगिक निवडीचे कार्य संभोगसंधीपुरते मर्यादित नाही. पितृत्वाची चोरी होऊ नये, यासाठी नर फलनयुक्त मादीचे अन्य नरांपासून रक्षण करतो. नाना प्रकारच्या युक्त्या-प्रयुक्त्या उत्क्रांत झाल्या आहेत.

मानवामध्ये अन्य वानरवंशियांप्रमाणे (हयात व मयत) लैंगिक स्वरूपभेद आढळतो. आपल्या प्रजातीच्या उत्क्रांतीकालात लैंगिक निवडीच्या कमी-अधिक प्रभावामुळे हा भेद निर्माण झाला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये प्रजननाशी निगडित अवयवांमध्ये भेद असतो. तसेच, सरासरी शरीरयष्टीतदेखील लक्षणीय फरक आहे. अगदी चिंपांझी किंवा गोरीलाएवढा नसला तरी! पुरुषांना दाढी-मिश्या असणे, आवाजात खर्ज्याप्रमाणे घोगरेपणा, आक्रमकता, पिळदार स्नायू इ. पुरुषी लक्षणांतून वेगळेपण स्पष्ट होतो. शरीराची रचना, क्रिया व वर्तन यांवर लैंगिक निवडीचा प्रभाव असतो, हे असंख्य प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पुरुषांचे बहुगामित्व व स्त्रियांचा चोखंदळपणा यांतून प्रकट होणारे लैंगिक वर्तन याची साक्ष देते. आपल्या आद्य पूर्वजांच्या जीवनशैलीमुळे स्वरूपभेद निर्माण झाला का? पुरुष शिकार करायचे; तर स्त्रिया बालसंगोपन व नजीकच्या परिसरातून कंदमुळे आणि फळे गोळा करत. अशी काटेकोर श्रमविभागणी अन्य वानरवंशियांत आढळत नाही. तरीही त्यांच्यातील स्वरूपभेद मानवापेक्षा खूपच अधिक आहे. त्यामुळे या भेदाचे मूळ संस्कृतीत नसून प्रकृतीत आहे, असे लैंगिक निवडीचे स्पष्टीकरण देता येते. ज्या प्रजातीत बहुगामित्व आहे व मादीच्या प्राप्तीसाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतो, त्या प्रजातीत स्वरूपभेद तीव्र असतो. उदा. गोरीला. त्याउलट आद्य मानवामध्ये बहुगामित्व व स्पर्धा सौम्य असणार. त्यामुळे स्वरूपभेद तुलनेने कमी आहे.

सस्तनांमध्ये अतिशय दुर्मीळ अशा एकनिष्ठ जोडप्याचा प्रादुर्भाव मानवांत आढळतो. कुटुंबसंस्थेतील स्त्री-पुरुषांची गुंतवणूक कमी-अधिक असते, ही वस्तुस्थिती आहे. दीर्घ सहचर्य आणि ‘एकनिष्ठ राहाणे’ या कल्पनेचा मानवी समाजावर प्रभाव आहे. ‘सहचर्य’ मानवेनासे, पेलवेनासे झाले की विभक्त होणे, हेदेखील ‘नैसर्गिक’च आहे. घटस्फोट झालेल्यांनी पुनर्विवाह करणे; म्हणजेच पुन्हा एकनिष्ठ साथीदार शोधणे, हा जीवनक्रम चालूच राहातो.

परंतु, अन्य प्रजातींप्रमाणे आपणसुद्धा उत्क्रांत झालो, ही जाणीव केवळ धार्मिक नव्हे; तर आधुनिक जीवनशैली अनुसरणारेदेखील नाकारतात. सरीसृपांपासून सस्तन किंवा जलचरांपासून भूचर उत्क्रांत झाले, हे वैज्ञानिक सत्य सहजगत्या स्वीकारले जाते. पण मनुष्यप्राण्याच्या पूर्वजपरंपरेचा सज्जड पुरावा असे लोक ग्राह्य धरत नाहीत. मानव हा ‘स्वयंभू’ असून, जीवसृष्टीचा घटक नाही; अशी श्रद्धा बाळगणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. धर्मग्रंथांतील उत्पत्तिकथांना प्रमाण मानणारे आहेत. तसेच, तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा, ‘माती ते मेंदू’ हा प्रवास नाकारतात. ‘स्व’ची जाणीव हेच सत्य मानणारा एक विचारप्रवाह आहे. शरीर उत्क्रांत झाले, हे मान्य; पण चेतना ही विश्वचैतन्याचा/वैश्विक जाणिवेचा अंश आहे, असे मानणारा एक पंथ आहे. माणूस हा पशू आहे, हे मान्य केले; तर त्याच्या पशुवृत्तीला प्रतिष्ठा प्राप्त होईल, अशी भीती नीतिमूल्यांच्या पुरस्कर्त्यांना वाटते. वस्तुत: माणूस हा प्रकृती व संस्कृती यांच्या संकरांतून घडला आहे. थोडक्यात काय, तर ‘प्रज्ञावान’ मानव हा निसर्गाच्या हेतुशून्य व आंधळ्या भौतिक प्रक्रियेचे अपत्य आहे, हे वैज्ञानिक स्पष्टीकरण पचवणे अवघड जाते.

जीवाश्म व डी.एन.ए.च्या आधारे आता मानवाचे जीवनवृक्षावरील स्थान निश्चित करणे शक्य झाले आहे. आपण वानरवंशी आहोत व चिंपांझी आमचे चुलत भावंड आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या समान पूर्वजापासून आमच्या वंशावळी उत्क्रांत झाल्या आहेत. विज्ञानाने सिद्ध केलेले हे वास्तव आमच्या मानवतेला हीन ठरवत नाही. किंबहुना, हयात व मयत सर्व जीवसृष्टीशी आमचे नाते आहे, ही जाणीव आम्हाला गौरवाची व सुखद आहे.

‘प्रतिसृष्टीचा निर्माता’ हे बिरुद मानवजातीचे वैशिष्ट्य आहे. विज्ञानयुगाच्या उदयापूर्वी, म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी रानटी पूर्वजांच्या भटक्या टोळ्यांनी अग्नीला वश केले. शस्त्र व शास्त्राचा वापर करून प्राण्यांना पाळीव केले व रानटी गवतांना लागवड योग्य केले. उपयुक्त यंत्रे विकसित केली. बुद्धिकौशल्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर वारंवार मात केली. या कर्तेपणाच्या जाणिवेमुळे ‘निर्मात्या’शिवाय ‘निर्मिती’ घडली आहे, हा उत्क्रांती सिद्धांत त्याला विश्वसनीय वाटत नाही. विज्ञान केवळ तंत्रज्ञानाच्या रूपाने आमच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. त्याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन आमचा स्थायिभाव बनवणे गरजेचे आहे. मानवाच्या सार्वकालिक संचिताला विज्ञानाची चाळणी लावणे आवश्यक आहे. विशेषतः भौतिक व जैविक सृष्टीबद्दल केलेल्या दाव्यांबद्दल! सत्य-असत्याची ती एकमेव कसोटी आहे.

नीतिमत्ता ही सर्वथा निसर्गदत्त व निसर्गप्रणित नसते. उत्क्रांतिक्रमांत वर्तनाचे इतके प्रकार आणि नमुने आढळतात की त्याच्या आधाराने एका सूत्रात गोवणारी अशी सूत्रप्रणाली बांधणे कठीणच आहे. माणसा-माणसांमध्ये हे भेद पूर्णतः निसर्गप्रणित नसतात. निसर्गप्रणित जे जे, ते ते पशुतुल्य म्हणून हीन मानणे, ही एक प्रकारची भ्रांती आहे आणि निसर्गातील कोणते ना कोणते वर्तन आपल्या वागण्याचा आधार म्हणून तर्क करणे ही दुसर्‍या प्रकारची भ्रांतीच आहे.

लिंगामध्ये आढळणार्‍या नैसर्गिक भेदांवर सामाजिक भेदभावाचे समर्थन होऊ शकत नाही. पुरुष, स्त्री, उभयलिंगी यांना मिळणारी सामाजिक वागणूक भेदभावाची असण्याला कोणताही वैज्ञानिक पाया नाही. ही माणसांनी ठरवायची वागणुकीची सूत्रे आहेत. बदलत्या काळाबरोबर; विशेषकरून तंत्रज्ञानाबरोबर भेदभावी कल्पना गैरलागू ठरत आल्या आहेत. ‘योनिशुचिता’, ‘भ्रष्टता’, ‘पाळी’च्या काळातील अशुद्धता, ‘कौमार्य परीक्षा’ अशा अनेक रूढी या लयासच गेल्या पाहिजेत. स्त्री-भ्रूण हत्या, मुलींना कनिष्ठ व हीन लेखणे या प्रथा निसर्गाने नव्हे; तर माणसाने स्वतः बनवल्या. हेच जन्माधिष्ठित श्रेष्ठ-कनिष्ठता मानणारी जातिव्यवस्था, श्रेष्ठ-कनिष्ठता ही पूर्वजन्मातील पाप-पुण्यांनी ठरते, यांसारख्या कल्पनांनाही लागू आहे. निसर्गाने यातील काहीच ठरवलेले नाही, ही माणसाच्या समजुतीची आणि त्यात उपजलेल्या विचार-विकारांची फळे आहेत.

भारतासारख्या फार प्राचीन इतिहास असणार्‍या देशात या कल्पनांचे मोठे क्रूर थैमान चालते. निसर्गाचे जीव-विज्ञान व उत्क्रांती सूत्र जर ध्यानात आले, तर या टाकून देण्याजोगत्या कल्पनांचा आपण सहजपणाने त्याग करायला प्रवृत्त होऊ. उत्क्रांतिविज्ञान सामाजातील मानवनिर्मित भेदांचे समर्थन तर करीत नाहीच; उलटपक्षी त्याचे खंडन करणारी, सर्वात ‘मूले कुठारः’ अशी चिरफाड करणारी ही विचारपद्धती आहे. हिटलरप्रणित वंशवादी विचाराला मुळापासून छेद दिला तो ‘माणसाचे मूळ पूर्वज कोण?’ हे दर्शवणार्‍या उत्क्रांतिसिद्धांताने! म्हणूनच समाजातील माणसा-माणसांमधले व्यवहार अधिक सुसंगत, सुजाण करणारी दृष्टी विज्ञानामुळे लाभते. विज्ञान माणसाची नीतिमूल्ये नाहीशी करीत नाही; उलट ती अधिक संयमी आणि तर्काने पारखलेली बनवते. नीतिमूल्ये विरुद्ध विज्ञान असा ‘विचार-भ्रम’ या पुस्तकाने खंडित व्हायला हातभार लागेल, ही सदिच्छा.