दारा शुकोह (एका सवाई अकबराची गुमनाम कहाणी)

Dara Shukoh

दारा शुकोह म्हणजेच बादशाह शाहजहाँचा (तोच तो, ताजमहाल व लाल किल्ला बांधणारा) यौवराज्याभिषिक्त ज्येष्ठ सुपुत्र. आज भारतात कपटी धर्मांध अफझल खानाची कबर आहे. तिथे उरुसही भरतो. सहिष्णू मानला गेलेल्या अकबराचे गोडवे पाठ्यपुस्तकापासून चित्रपटांपर्यंत सर्वत्र गायले जातात. दहशतवादी याकूब मेननच्या प्रेतयात्रेला हजारोंचा जमाव हजेरी लावतो. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या व सहिष्णुतेच्या वेडापायी मरण कवटाळणाऱ्या या मुघल राजपुत्राच्या नावे कुठे छोटीशी पणतीही लावली जात नाही.

इतर मुघल राजपुत्रांसाखेच दारालाही शस्त्रास्त्रे, घोडेस्वारी, युद्ध इत्यादीचे प्रशिक्षण दिले गेले. पण दाराचा पिंडच वेगळा. शाही प्रशिक्षण घेऊनही दारा रमला सूफ़ी संतांच्या शेर रुबायांमध्ये. रुमी, खुसरो इ. सूफ़ी संतकवींची वचनं आत्मसात केल्यावर त्याचा तत्त्वज्ञानातला रस वाढत गेला. त्याच्या ग्रंथालयात हळुहळू प्लेटो, ऍरिस्टॉटलसुद्धा शिरले. जगभरचे धर्मविचार तौलनिकदृष्ट्या अभ्यासणारा अकबरानंतर हाच मुघल! अकबराच्या ‘सुलह-ए-कुल’ (सर्व धर्मांचे स्तुत्य पैलू घेऊन स्थापन केलेला नवा संप्रदाय) नीतीच्या एक पाऊल पुढे जात हा अवलिया प्रवृत्तीचा राजकुमार अंतिम सत्याच्या व सद्गुरुच्या शोधात गावोगावी भटकला. कित्येक सूफ़ी संत, अद्वैती साधू, विचारवंतांच्या सान्निध्यात तो धर्मविचार शिकत गेला.

Dara Shukoh
[Image Source: Link]

क़ादरी संप्रदायाचे महान सूफ़ी संत ‘मियाँ मीर’ यांना त्याने गुरू मानलं. (हे तेच मियाँ मीर ज्यांनी अमृतसरच्या जगप्रसिद्ध सुवर्णमंदिराची कोनशिला ठेवली. तेच मियाँ मीर ज्यांनी 5 वे शीख गुरु अर्जुनदेव यांना जिवंत जाळल्याबद्दल बादशाह जहांगीरला धारेवर धरायची हिंमत दाखवली. असो!) मियाँ मीरच्या निधनानंतर 6 वर्ष पुन्हा सद्गुरुच्या शोधात घालवल्यावर त्याला भेटले मियाँ मीरचेच दुसरे शिष्य ‘शेख बाबा मीर मेंडक.’ वेदान्त, सूफ़ी तत्त्वज्ञान यावर रात्र रात्र चर्चा केल्यावर जे ज्ञान दाराने मिळवलं ते ‘साक़ीनत-उल-औलिया’ या ग्रंथात त्याने संकलित केलं.

बाबा लाल बैरागींच्याच सल्ल्यावरून दारा संत मुल्ला शाह यांना भेटला. दाराला समोर पाहिल्या पाहिल्या मुल्ला शाह यांनी दाराला विचारले, कोण आहेस तू? दारा उत्तरला, ‘माझ्यात आणि तुमच्यात काही भेदच नाही तर मी कोण हे सांगू तरी कसं!’ मुल्ला शाह यांनी पुन्हा विचारले, नाव काय तुझं? दारा उत्तरला, नाव तर फक्त या शरीराला आहे, मला नाही. मुल्ला शाहसोबत झालेल्या संवादात सूफी तत्त्वज्ञान म्हणजे समुद्राइतक्या महान असलेल्या अद्वैत व इस्लामी विचारांचा सुरेख संगम असल्याची दाराला जाणीव झाली. म्हणूनच त्याने सूफी तत्त्वज्ञानावर दाराने ‘मज्मुआ-अल्-बहरीन’ (समुद्रसंगम) ही प्रसिद्ध रचना केली. दारा लिहितो:

हमने किसी ज़र्रे को सूरज से अलग नहीं माना,

पानी की हर बूँद अपने आप में सागर है।

उस सत्य को किसी भी नाम से पुकारो,

हर नाम खुदा के नामों में से ही एक है ॥

चुकूनच राजघराण्यात जन्मलेल्या या ऋषीला भक्त आणि ईश्वर यांची एकरूपता उमगत गेली. तो लिहितो:

तू काबा में है और तू सोमनाथ के मंदिर में है।

तू चैत्यालय में है और तू सराय में है ।

तू ही एक समय पर प्रकाश भी है

और पतिंगा भी है ।

तू ही हाला और तू ही प्याला ।

तू ही कवि और मूर्ख,

मित्र और अजनबी भी है ।

तू ही गुलाब और उस से प्रेम करने वाली बुलबुल भी है ।

दारा फक्त एवढ्यावर थांबला नाही. तो भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतक्या प्रेमात पडला की वाराणसीत कित्येक वर्षे राहून त्याने उपनिषदांची फारसी भाषान्तरे (सीर इ अकबर = महान रहस्य), महाभारत, गीता, वेद यांची फारसी भाषान्तरे केली. हीच भाषान्तरे पुढे फारसीतून लॅटिन व फ्रेंचमध्ये पोचली. अशा प्रकारे अख्ख्या जगात हिंदवी तत्त्वचिंतनाची कीर्ती पसरवली ती या मुस्लिम नाव धारण करणाऱ्या भारतीयाने! स्वतःला भारतीय म्हणवणाऱ्या प्रत्येकाला याबद्दल दाराचा आदर व अभिमान असला पाहिजे.

दाराचे हे सर्व विचार व वर्तन कट्टर इस्लामला इतके निषिद्ध आहेत की याबद्दल शरियात मध्ये देहदंडाची शिक्षा सांगितलेली आहे. साहजिकच समस्त मौलवी गट दाराचा कट्टर विरोधक बनला. फक्त तत्कालीनच नव्हे तर आधुनिक कट्टर मुस्लिम धर्मांधांच्या मनात दाराबद्दल कडवा द्वेष असतो. म्हणूनच की काय, बऱ्याचदा याचं नाव ‘दारा शुकोह’ ऐवजी ‘दारा शिकोह’ असं लिहितात. हे दोन्ही शब्द उर्दूमध्ये एकाच प्रकारे लिहिले जातात. पण अर्थात फरक आहे. शुकोह = शानोशौकत, शिकोह = ज़ुल्म, आतंक. (हे अज्ञानामुळे होतं की मनातून दाराचा कट्टर तिरस्कार करणाऱ्या उर्दू भाषिक लेखकांनी सहेतुक केलं आहे हे कळणं कठीण). पाकिस्तानचा वैचारिक राष्ट्रपिता अल्लामा ईक्बालसुद्धा दाराचा इतका उघड व निलाजरा तिरस्कार करतो की तो लिहीतो:

कभी ऐ नौजवाँ मुस्लिम तबद्दूर भी किया तू ने, वो क्या गर्दूँ था तू जिसका एक टूटा हुआ तारा

तुझे उस क़ौम ने पाला है आग़ोशे-मोहब्बत में, कुचल डाला था जिलने पाँव में ताजे-सरे-दारा!

(अरे मुस्लिम नवयुवका, तुला त्या महान मुस्लिम परंपरेचा अभिमान असला पाहिजे जिने दाराच्या शिरावरचा मुकुट पायदळी तुडवला.)

धर्मांधांचा असा रोष पत्करलेल्या या शाहजाद्यावर बादशाह शाहजहांचा मात्र फार जीव होता. तो दाराला आपला उत्तराधिकारी मानायचा. त्यामुळेच दिल्लीहून फार लांब असलेल्या मोहिमांवर त्याला सोडत नसे. बादशहाच्या शेजारीच दाराचे सिंहासन बसवले जाई. दरबारी राजकारण आणि युद्धभूमी मात्र त्याचा प्रांत नव्हता. इतर तीन शाहजाद्यांच्या तुलनेत दारा रणांगणावर कमजोर होता.

एकदा कंदाहारवर इराणी आक्रमण झाले असता दाराला आक्रमणाचा बीमोड करायला रवाना केले गेले. सैनिकी मोहिमेचा अनुभव नसतानाच, त्याच्या फौजेत सैनिकांसोबतच बरेच पीर, फकीर, संन्यासी सुद्धा होते ज्यांच्या सल्ल्याशिवाय तो लष्करी निर्णय घेत नसे. कंदाहार किल्ल्यावर आक्रमण करण्यापूर्वीसुद्धा त्याने एका मांत्रिक फकिराचा सल्ला मागितला. मांत्रिकाने त्याला भीती घातली की किल्ल्याला 3-4 सैतानांचा वेढा आहे. मला सैतानांचा बंदोबस्त करता येईल. पण तोपर्यंत माझा पाहुणचार करावा लागेल आणि हल्ला लांबवावा लागेल. हल्ल्याची तारीख लांबत राहिली. तथाकथित सैतान ताब्यात आले नाहीत. शेवटी कंटाळून दाराने किल्ल्यावर हल्ला केला. पण तोपर्यंत इराणी फौजांना तयारीला वेळ मिळाला होता. मुघलांचा या लढाईत दारुण पराभव झाला.

दिल्लीत परतल्यावर मात्र दाराचे जंगी स्वागत झाले. त्याला ‘सुलतान बुलंद इक्बाल’ अशी पदवी बहाल केली गेली – जणू युद्ध जिंकून आलेला एखादा विक्रमी वीर. काही वर्षांपूर्वी जेव्हा औरंगजेब कंदाहार मोहीम हरला होता तेव्हा बादशहाने त्याची सिंध-मुलतानच्या (शांत, निवांत मुलूख) सुभेदारीवरून उचलबांगडी करून दख्खनला (डोकेदुखी देणारा मुलूख) रवानगी केली होती. दाराला मिळणाऱ्या पक्षपाती वागणुकीमुळे इतर तीन राजपुत्र तर नाराज झालेच. पण त्याचबरोबर अशा अव्यवहारी नेत्याच्या नेतृत्वाखाली लढाया होऊ लागल्या तर साम्राज्यात जागोजागी होणाऱ्या उठावांमध्ये मुघलांचा पराभव होऊन साम्राज्य बुडेल असा विचार करून कित्येक रजपूत योद्धेही त्याच्या विरोधात गेले. म्हणजेच आता बादशहा शाहजहान आणि प्रजा सोडल्यास राजपूतांपासून औरंगज़ेबापर्यंत, मुराद बख़्शपासून मौलवींपर्यंत सर्वांचाच दाराला विरोध होता.

आता आलं वर्ष 1657. बादशहा शाहजहाँ आजारी पडला. उपचारासाठी तो आग्र्याच्या किल्ल्यावर रवाना झाला. पण जाण्यापूर्वी दाराने बादशहा असल्याप्रमाणे त्याच्याशी वागावं असा हुकूम त्याने काढला. इथेच नगारे वाजले मुघल तख्तासाठीच्या सत्ता संघर्षाचे. मुराद बख़्श, शुजा व औरंगज़ेब या तिन्ही राजपुत्रांनी दिल्लीकडे कूच केले. पुढे दोन वर्ष चाललेल्या लढायांमध्ये औरंगज़ेबाने बादशहा शाहजहान राहत असलेल्या आग्रा किल्ल्यावर ताबा मिळवला. शाहजहान नजरकैद झाला. थोड्याच दिवसांत झालेल्या सामूगढच्या निर्णायक लढाईत दारा पराभूत होऊन परागंदा झाला. मिर्झा राजा जयसिंगसकट (तोच तो, पुरंदर वेढणारा) अनेक राजपूत योद्धे या लढायांमध्ये औरंगज़ेबाच्या बाजूने होते. हा पराभव फक्त दाराचाच नव्हता, तर सहिष्णुता, नीती, कला, विज्ञान या सगळ्याचाच तो पराभव होता.

औरंगज़ेबाने ताजपोशी -(राज्याभिषेक) करत स्वतःला बादशहा घोषित केले. परागंदा दारा शाही फौजांना चकवत चकवत जीव वाचवत अफगाणिस्तानात पोचला. जीवन मलिक नामक जमीनदाराने त्याला आसरा दिला. काही वर्षांपूर्वी दाराने त्याचे प्राण वाचवले होते. त्यामुळे तो दाराच्या उपकाराखाली होता. पण दाराच्या डोक्यावर औरंगज़ेबाने ठेवलेले ईनाम बघून त्याची मती फिरली. त्याने फितुरी करत दारा व त्याचा मुलगा सिपहर शुकोह यांना औरंगज़ेबाच्या हवाली केले.

कैदी झालेल्या दाराची दिल्लीत जीर्ण शीर्ण कपड्यात हत्तीवरून धिंड काढली गेली. आपल्या लाडक्या राजपुत्राची ही अवस्था पाहून कुणी ऊर बडवून धाय मोकलून रडले, कुणी मदतीसाठी आवाज देत होते, कुणी धिंड काढणाऱ्या सैनिकांवर दगड, अंडी, टोमॅटो फेकले. जणू त्यांच्या घरचाच कुणी सदस्य अपमान पावत होता. धिंडीत एका फकीराने दाराकडे याचना केली असता त्याही स्थितीत त्या महात्म्याने आपली चादर फकिराला दान दिली. जनतेने दाराचा जयघोषच केला.

औरंगज़ेबाला दाराच्या प्रचंड लोकप्रियतेचा अंदाज आला आणि तो अस्वस्थ झाला. हा शत्रू संपवल्याशिवाय सिंहासन स्थिर नाही हे त्याने ओळखले. पण स्वत:वर हत्येचा आळ येऊ नये म्हणून त्याने उलेमा समितीवर निर्णय सोपवला. अर्थातच उलेमा काय निर्णय देणार हे तो जाणून होता. समितीने निवाडा दिला की शाहजादा दारा शुकोहवर काफिर असल्याचा आरोप आहे. त्याने कुंभमेळा यात्रेला कर सवलत दिली. कित्येक मंदिरे सरकारी खर्चाने दुरुस्त केली. ‘जन्नत वो है जहाँ मौलवियों का शोर ना हो’ अशा विधानांनी त्याने धर्माचा अपमान केला आहे. आपल्या अंगठीवरही त्याने प्रभु अशी गैरइस्लामी अक्षरे कोरलेली आहेत. असा माणूस जर तख्तावर विराजमान झाला तर साम्राज्य आणि इस्लाम या दोन्हीला खतरा आहे. या गुन्ह्यासाठी त्याला ‘सज़ा ए मौत’ फर्मावण्यात येत आहे. या सर्व घटनांपासून अनभिज्ञ दारा आपल्या मुलासोबत कैदेत स्वत:च्या रोट्यासुद्धा स्वत:च भाजून खात असे (विषप्रयोगापासून वाचण्यासाठी). औरंगज़ेब देहदंड फर्मावेल याचा त्याला अंदाज होताच. म्हणूनच त्याने औरंगज़ेबाला पत्राद्वारे विनवणी केली:

मेरे प्यारे भाई और पातशाह औरंगज़ेब, मुझे तख़्त या ताज की कोई चाहत नहीं.

मैं चाहता हूँ कि ये तख़्त तुम्हारे और तुम्हारे आनेवाले नस्लों के लिये बरक़तवाला हो.

लेकिन इसलिये मुझे मारना ज़रूरी नहीं। रहने के लिये जगह औंर मेरे कनीज़ों में से एक दियी जाय तो मैं सुकूँ से घर के एक कोने में बैठ के तुम्हारे और मुग़लिया सल्तनत के सलामती के लिये दुआ करूँगा..

औरंगज़ेबाने अर्थातच त्याला केराची टोपली दाखवली. निवाडा झाला होता. एक दिवस हत्यारबंद हशमांनी कैदेत त्या बापलेकांस घेरा घातला व पकडून वेगळे केले गेले. दोघांचीही मुंडकी धडावेगळी केली गेली.

Dara Shukoh

दाराचे शिर औरंगज़ेबाला पेश केले गेले. सायंकाळची वेळ होती. मुंडक्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. औरंगज़ेबाने मुंडक्याला दाराचा मुकुट चढवला. तो दाराच असल्याची खात्री पटली. मग औरंगज़ेबाने त्वेषाने दातओठ खात मुंडक्यावर खंजीराचे 3 वार केले आणि हुकूम सोडला,

इसकी लाश कुत्तों को खिलायी जाय…. इस काफ़र को दफ़न की ज़मीं भी नसीब ना हो! बदबख़्त…

बदबख़्त (बदनसीब) फक्त दाराच नव्हता, तर समस्त भारतवर्ष त्या दिवशी दुर्दैवी ठरले. या देशात चिरकाल नांदणारी शांती व सांप्रदायिक सौहार्द आणण्याची एकमेव आशा आता विझली होती. दाराच्या प्रेताची (धडाची) पुन्हा धिंड जेणेकरून दारा जिवंत असण्याची शंकाही कुणाच्या मनात राहू नये. प्रेत कोल्ह्याकुत्र्यांना खायला घातले.

दारा संपला.

दारा संपला. नव्हे, नव्हे! त्याचं फक्त शरीर संपलं. जोपर्यंत इस्लामी दहशतवादाचा भस्मासुर थडग्यात गाडला जाणार नाही तोपर्यंत दारा कधीच संपणार नाही. तो पुन्हा पुन्हा जन्मेल – कधी धर्मांध जिहादी पाकिस्तानी सरकारविरुद्ध बंड करणाऱ्या तारीक़ फ़तेहच्या रूपाने, कधी मानवतावादी विचार मांडल्याबद्दल जिवाला मुकणाऱ्या माशाल खानच्या रूपाने, कधी प्रगतिशील, आधुनिक पण अप्रिय विचार परखडपणे मांडणाऱ्या हमीद दलवाईंच्या तर कधी मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसाठी मंत्रिपद त्यागणाऱ्या व उलेमांना भिडणाऱ्या मोहंमद आरिफ़ खानच्या रूपाने,कधी इस्लाममधील हिंसकता उघड करत जीव धोक्यात घालणाऱ्या तस्लिमा नसरीनच्या रूपाने, तर कधी कालबाह्य खिलाफत बुडवून राष्ट्रच्या राष्ट्र आधुनिक युगात आणून प्रगतिपथावर नेणाऱ्या केमाल अतातुर्कच्या रूपाने…आज भारतीय प्रजासत्ताकाची आणि समस्त मनुष्यजातीची जबाबदारी ही आहे की पुन्हा अशा कोणत्याही दाराची गर्दन धडावेगळी केली जाणार नाही आणि शांतिप्रिय आवाज दडपले जाणार नाहीत.

संपर्क – tanmay.kelkar858@gmail.com

या लेखाचे लेखक तन्मय केळकर यांचे ‘मैत्री संस्कृतशी’ हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून विकत घेऊ शकता!!