‘नितीन आगे’च्या आई वडीलांशी केलेला संवाद

नितीन आगे याची आई आणि लहान भाऊ

संवाद - तुषार सोनावणे आणि विष्णू फुलेवार

प्रत्येक संवेदनशील मनाला हादरा पोहचवणारी घटना अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील खर्डा गावात घडली. एप्रिल 2014 मध्ये भरदिवसा 17 वर्षाच्या नितीन आगे या तरुणाची प्रेमप्रकरणाच्या रागातून गावातील सवर्ण समाजातील काही लोकांनी हत्या केली. नितीनचा मृतदेह झाडाला लटकवून त्याने आत्महत्या करण्याचा बनाव रचण्यात आला. या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राला आपली मान शरमेने खाली घालावी लागली. तत्कालिन सत्तापक्षातील तसेच विरोधी पक्षातील आणि अनेक चळवळीच्या नेत्यांनी आगे कुटुंबीयांना भेटी दिल्या आणि न्याय मिळवून देण्याच्या बतावण्या केल्या. परंतु त्या सगळ्या हवेतच विरल्या. न्यायालयीन कारवाया चालू झाल्या, यावेळी राजू आगे एकटेच न्यायालयाच्या खेपा घालत होते. आणि दोन महिण्यांपूर्वीच या प्रकरणाच्या 13 आरोपींची जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्या अभावी सुटका केली. पोलिस यंत्रणा किंवा सरकारी वकिल आगे कुटुंबीयांची बाजू भक्कम पणे मांडण्यात कमी पडले का? आरोपींची निर्दोष सुटका होत असेल तर नितीन आगेची हत्या कोणी केली, हा सवाल उपस्थित होतो. तरी या राज्यसरकारने निकालाविरोधात औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले आहे.

जिल्हा न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा महाराष्ट्राचे समाजकारण ढवळून निघाले. ‘अक्षर मैफल’ टीमने या प्रकरणाची सखोल माहिती मिळवण्यासाठी आगे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न – आपण मूळचे याच गावातील आहात का ?

उत्तर – नाही, आमचे मूळ गांव धनगरवाडा (बीड) आहे. खर्ड्यात येऊन आम्हाला साधारण पंधरा वर्षे झाली. यापूर्वी जवळच्याच वाडीत राहत होतो. रोजंदारीसाठी या गावात आलो.

प्रश्न – आपण काय काम करता ?

उत्तर – मी (राजू आगे) समोरच्या खडी मशीनवर कामाला आहे. नितीनची आई शेतमजूरी करते.

प्रश्न – गावातील लोकांशी आणि आपल्या आजूबाजूच्यांशी आपला संपर्क कसा आहे?

उत्तर – आम्ही बाहेरच्या गावची हातावर पोट भरणारी लोकं आहोत . गावाच्या वेशीवर सरकारी जागेवर पत्र्याच्या घरात राहतो. गावातील लोकांशी संपर्क कामापुरताच येतो. आजूबाजूला दलित समाजबांधवांची काही घरे आहेत. त्यांच्याशी तसा बरा संपर्क असतो.

प्रश्न – आपल्याला परिवारविषयी

उत्तर – तीन मुली आणि दोन मुलं (नितीन धरून). थोरल्या दोघा मुलींची लग्न झाली आहेत. नितीन तिसरा होता. एक मुलगी नितीन पेक्षाही लहान आहे. नितीनच्या हत्येनंतर दोन वर्षांनी आम्हाला मुलगा झाला त्याचेही नाव नितीन ठेवले आहे.

प्रश्न – नितीनचे कोणत्या इयत्तेत शिकत होता?

उत्तर – नितीन समोरच्या रयत शिक्षण संस्थेतच्या शाळेत 12वीला होता. अभ्यास सांभाळून गॅरेज मध्येही काम करित होता. त्यामुळे चार-दोन पैसे मिळत होते.

प्रश्न – नितीनचे शाळेतील विद्यार्थ्यांशी कसे संबध होते.

उत्तर – (रेखा आगे) नितीनचे शाळेत अनेक मित्र होते. तो मिळून मिसळूनच राहत असे. परंतु नक्की शाळेत काय परिस्थिती होती हे आपल्याला कसं कळणार , परंतु तशी तक्रार कधीही नितीनने केली नव्हती. हो, पण त्याची हत्या होण्याच्या आदल्या दिवशी वर्गातील एक मुलगी त्याला फोन नंबर मागत असल्याचे त्याने मला सांगितले होते. मी शाळेत जाऊन शिक्षकांना भेटणारच होते, परंतु…!(पुढे नितीनच्या आईकडे शब्द नव्हते)

प्रश्न – नितीनची हत्या झाली त्यादिवशी नक्की काय काय घडले?

उत्तर – (राजू आगे) नेहमी प्रमाणे नितीन शाळेत गेला होता, त्यावेळी त्याला शाळेत काही जणांनी मारहाण केली. शिक्षकांनी हटकले असता. त्याला शाळेतून बाहेर काढून मारहाण केली. वीटभट्टीकडे मारत नेले. गावातून नेत असतांनाही त्याला सर्वांसमोर मारहाण चालूच होती. वीभट्टीवर त्याच्या वडिलांच्या वयाइतक्या लोकांनीही त्याला मारले. भर उन्हात वीटभट्टीवर गरम सळ्यांचे नको त्या अंगाला चटके दिले. हातपाय मोडले. तिथे त्याचे अतोनात हाल केले त्यातच त्याचा जीव गेला आणि वरच्या जंगलात एका लिंबाच्या झाडाला त्याला आत्महत्या केल्यासारखे लटकवले.

(रेखा आगे)- मी शिक्षकांना भेटायला शाळेत गेले होते, तिथे नितीन नव्हता. विचारपूस केल्यावर कळले की त्याला गावात मारत नेले. माझा जीव तेव्हाच घाबरायाला लागला. मी नितीनची शोधा-शोध सुरू केली. नंतर काहींनी सागितले की त्याला वीटभट्टीकडे नेले आहे. तिथेही जाऊन पाहिले, तिथे तेव्हा तो नव्हता. नंतर जंगलात खूप वेळ शोधाशोध केली तेव्हा त्याचा मृतदेहच आम्हाला मिळाला.

(राजू आगे)- त्यावेळी त्याचा कपड्यावर रक्ताचे डाग होते. अंगावर चटके दिल्यासारखे व्रण होते. मुकामार लागल्यासारखे शरीर काळे पडले होते. शाळेपासून ते वीटभट्टीपर्यंत सलग 3 -4 तास त्याला हातोडे, सळई, लाकडी फळ्यांनी मारहाण केली. मी हे देखील एकले आहे की, दरम्यान त्याने पाणी मागितले तर त्याच्या तोंडावर लघवी करण्यात आली.

प्रश्न – नितीनचे गावातील सवर्ण मुली सोबत प्रेमप्रकरण होते असे म्हटले जाते. हे खरे आहे आहे का?

उत्तर – (राजू आगे) हे साफ खोटं आहे. तसं असतं तर त्याने नक्कीच आम्हाला सांगितले असतं. परंतु त्या मुलीच्याच मामा आणि नातेवाइकांनी माझ्या मुलाला मारलं आहे.

प्रश्न – शाळेतील शिक्षकांनी नितीनला वाचवायचा प्रयत्न केला नाही का?

उत्तर – (रेखा आगे) शाळेच्या शिक्षकांसमोर मारहाण झाली होती. पण मारणारे गावातील मोठे लोक होते. त्याच्या धाकात गांव चालतं. त्यामुळे शिक्षकांचीही त्यांना अडवण्याची हिम्मत झाली नाही. त्यांनी (म्हणजे शिक्षकांनी) उलट, ‘काय करायचे ते बाहेर जाऊन करा, शाळेत तमाशा नको’ असे सांगितलं.

प्रश्न – गावातील साधारण सामाजिक स्थिती कशी आहे?

उत्तर – गावांत बहुसंख्य मराठा समाजाची लोकं आहेत. वंजारी देखील आहेत. ती मुलगी बहुसंख्य समाजातीलच होती.

प्रश्न – नंतर न्यायालयीन लढाई कशी सुरू झाली ?

उत्तर – वर्तमानपत्रात आणि टी.व्ही. वर बातम्या येण्याआधी आम्हाला जगणंच नकोसं झालं होतं. कोणासाठी जगावं आणि का जगावं असं वाटत होतं. नंतर बातम्यामध्ये ही घटना आल्याने अनेक लोक येऊन भेट देऊ लागल. न्याय मिळविण्यासाठी लढा म्हणून सांगत होते. आमच्यासारखे गोरगरीब कधी कोर्टाच्या पायर्‍या चढत नाहीत आणि न्याय मिळवायला पण पैसा हवा. तो आमच्या कडे नाही. परंतु बातम्या अन् संघटनांच्या दबावामुळे सरकारकडून सरकारी वकील मिळाला आणि कोर्टात खटला चालू झाला.

प्रश्न – मग आता लागलेल्या निकाला नुसार सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. हे कसे घडले असे तुम्हाला वाटते?

उत्तर -(राजू आगे) कोर्टात साक्षी फिरवण्यात आल्या. शाळेतील शिक्षक-कर्मचारी, गावांतील लोक, माझा खडी मशिनचा मालक इत्यादी सगळ्यांच्या साक्षी पैसा ओतून फिरवण्यात आल्या. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गांव कित्येक लोकांनी माझ्या नितीनला मारतांना पाहिलं परंतु कुणीही आमच्या बाजूने साक्ष दिली नाही.

नितीन आगे याची आई, लहान भाऊ आणि अक्षर मैफलचे प्रतिनिधी
नितीन आगे याची आई, लहान भाऊ आणि अक्षर मैफलचे प्रतिनिधी

प्रश्न – सरकारी वकील आपली बाजू मांडण्यास कमी पडले का?

उत्तर – (राजू आगे) आपल्या खटल्या साठी रामदास गवळी यांना सरकारने वकिल म्हणून नेमले होते. त्यांच्याविषयी आमची स्पष्ट नाराजी आहे. गवळींनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले नाहीत. ते आम्हाला कोणतीच गोष्ट नीट सांगत नसत. आम्हाला न्याय मिळावा असे बहुतेक गवळींच्या मनातंच नसावे. आरोपींनी माझे वकिल सुद्धा मॅनेज केले असावेत असा माझी शंका आहे. याउलट पोलिसांनी खर्‍या आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केले होते. परंतु आपली बाजू गवळींनी कोर्टात मांडली नीट मांडली नाही. मी प्रत्येक तारखेला जातीने हजर राहत असे, निकाल दिला त्या आधी मंगळवारी देखील त्यांनी कोर्टात काय होतंय याविषयी सांगितलं नाही आणि गुरूवारी निकाल लागला. ह्या गवळींनी निकाल लागला हे देखील आम्हाला कळवले नाही. मला बातम्यांमधून कळालं. मी स्वत:च संध्याकाळी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सर्व आरोपी निर्दोष सुटले म्हणून सांगितले.

प्रश्न – पत्रकार, चळवळी-संघटनांकडून काय अपेक्षा आहे?

उत्तर – (राजू आगे) खरं तर हे प्रकरण पत्रकार आणि सामाजिक संघटनांमुळे राज्य आणि काही अंशी देशाच्या पातळीवर उचलले गेले, नाहीतर माझ्यासारख्या गरीबाची न्यायालयात न्याय मागण्याची ऐपतच नाही. तरी यातही काही लोक आमच्या प्रकरणाचं भांडवल करतात, त्यांना आमच्या भावनेशी जास्त घेणंदेणं नसतं. ते त्यांच्या हिताच्या उद्देशाने येतात. तरी भरपूर पत्रकार आणि संघटना खरोखर माझ्या मागे ढाल बनून उभ्या आहेत. त्यांचा मला आधार वाटतो. त्यामुळेच न्यायासाठी लढतोय, नाहीतर मी आणि माझ्या बायकोने कधीच आत्महत्या केली असती. येथून पुढेही नितीनला न्याय मिळे पर्यंत त्यांनी मला साथ द्यावी. अनेकांनी आर्थिक मदतही केली आहे. त्यांचा मी ऋणी आहे.

प्रश्न – गावातील सामाजिक वातावरण पाहता सरकारकडे आपल्या सुरक्षेची मागणी करू इच्छिता का?

उत्तर – (रेखा आगे) याविषयी आम्ही काय बोलावं, नितीन आगेचा खून दिवसा ढवळ्या होऊ शकतो तर आमचा का नाही? आमचं कुटुंब कायमच भीतीत असतं. घरातलं कुणी बाहेर गेल्यास परत येत नाही तोपर्यंत काळजी वाटतेच ना. आम्हाला रात्रीही शांत झोप कधीच लागत नाही. कायमच जीव मुठीत घेऊन जगतोय. आम्हाला मरणाची आता भिती नाही. परंतु आम्ही गेलो तर नितीनला न्याय कोण मिळवून देणार? त्याच्या जिवाला कशी शांती मिळणार? आणि समजा आम्ही या जगात नसल्यावर न्याय मिळाला तर त्याचा उपयोग काय? आपल्याच राज्यातील सोनाई, खैरलांजी हत्याकांड आपल्या समोर आहेतच. तर सरकारने शक्य झाले तर आमच्या सुरक्षेसाठी जरूर प्रयत्न करावेत. अशी अपेक्षा आहे.

प्रश्न – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली, त्याविषयी काय सांगाल?

उत्तर – (राजू आगे) मुख्यमंत्र्यांनी नितीन बद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला औरंगाबाद खंडपिठात अपील करण्याविषयी ते बोलले. या प्रकरणावर जातीने लक्ष देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादांमुळे नितीनला न्याय मिळेल अशी आशा आहे. यापुढे महाराष्ट्रात नितीन आगे होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

आपण सगळे माझ्या सोबत असलात तरीसुद्धा मला सांगावेसे वाटते की नितीनला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. नाहीतर, नितीनला न्याय मिळत नाहीये हे पुन्हा ध्यानात आल्यास मी आणि माझा परिवार कोर्टासमोर किंवा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आत्मदहन करू, कारण त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही..

नक्कीच, न्यायाच्या बाजूने उभे राहणे हे पत्रकार, सामाजिक संघटना आणि सरकारचे काम आहेच . नितीनला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सारेच प्रयत्नशील राहू.