गांधीवाद

Mohandas Karamchand Gandhi

लेखक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

मराठी विश्वकोश, खंड ४.

गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र विचारपद्धती आहे. ही विचारपद्धती अध्यात्मवादावर आधारलेली आहे. किंबहुना तो विशिष्ट प्रकारचा अध्यात्मवाद आहे. गांधीवाद म्हणून काही नाही, ती एक जीवनपद्धती आहे, असे अनेक गांधीवाद म्हणत असले किंवा गांधींनीही तसे म्हटले असले, तरी गांधींनी विपुल लेखनामध्ये प्रतिपादिलेली ती एक स्वतंत्र विचारसरणी आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तिचा प्रभावही आधुनिक जगाच्या सामाजिक व राजकीय विचारसरणींवर पडल्याशिवाय राहिलेला नाही.

गांधी स्वतः मनाने पक्के हिंदू होते, तरी तत्त्वतः धर्मदृष्ट्या जगातील प्रसिद्ध धर्मांमध्ये मूलभूत ऐक्य आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि जगातील सर्व धर्मांना व्यापणारे रहस्य आपणाला प्राप्त झाले आहे, अशी त्यांची भावना होती.

सर्वच धर्मग्रंथांचे प्रामाण्य एका अर्थी त्यांनी मानले आहे; परंतु शब्दशः प्रामाण्य त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते, सर्वच धर्मग्रंथ मानवप्रणीत– ऋषी, प्रेषित, संत इत्यादिकांनी निर्मिलेले– असल्यामुळे मानवाच्या स्वाभाविक मर्यादा व दोष धर्मग्रंथांमध्येही शिरलेले असतात. म्हणून गांधींनी ग्रंथांचे काही तात्त्विक निष्कर्ष काढले आहेत. ते काढीत असताना हिंदू धर्मातील विचारांची तात्त्विक पार्श्वभूमी त्यांनी स्पष्टपणे गृहीत धरली आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच नैतिक नियम त्यांच्या विचारसरणीचा पाया आहेत. उपनिषदे व गीता यांमधील ईश्वरविषयक सिद्धांत या मूलभूत नैतिक नियमांचा आधार त्यांनी मानला आहे.

गांधीवाद हा धार्मिक मानवतावाद आहे. नीतिशास्त्र, समाजरचना व राजनीती यांस आधारभूत अशी नैतिक दृष्टी या मानवतावादामध्ये स्वीकारलेली दिसते. ईश्वरनिष्ठा ही मूलभूत आहे. ईश्वर म्हणजेच सत्य व सत्य म्हणजेच ईश्वर, असे गूढवादी समीकरण गांधींनी मांडले आहे. ईश्वर हेच सत्य, हा उपनिषदांचा व अद्वैत वेदान्ताचा सिद्धांत आहे. सृष्टीचे वैज्ञानिक पद्धतीने शोधलेले सत्य, असा त्या सत्याचा अर्थ नाही; उच्च नैतिक नियम असा या सत्याचा अर्थ दिसतो. म्हणून ‘सत्याचा प्रयोग’ या शब्दावलीने सूचित केलेली वैज्ञानिक पद्धती ही आलंकारिक अर्थानेच घ्यावयाची आहे.

या संदर्भात मुद्दा उपस्थित होतो, की सत्यसंशोधनास अंत नसतो. कारण माणसास सत्य पूर्णपणे सापडत नसते; सर्वज्ञ कोणी नसतो. म्हणून लोकशाहीत विचारस्वातंत्र्य व प्रचारस्वातंत्र्य हा मूलभूत मानवी हक्क मानला आहे. परंतु विचारांच्या प्रचारस्वातंत्र्याचा हा मूलभूत हक्क सत्यसंशोधनार्थ आवश्यक आहे, हा सिद्धांत गांधीजींनी कोठेही प्रतिपादिलेला आढळत नाही. याचे कारण असे दिसते, की गांधी बुद्धिवादापेक्षा आतल्या आवाजालाच प्राधान्य देत होते.

गांधी म्हणतात, की ईश्वर हा स्वतःसिद्ध, स्वयंप्रकाश व इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळे, बुद्धिवादाच्या कसोट्या त्याला लागू पडत नाहीत. तो अनुभवसिद्ध आहे. हा अनुभव तपश्चर्येने व वैराग्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, त्यांना म्हणजे तुलसीदास, चैतन्य, रामदास, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांना येतो. ईश्वर हा सर्वांचा अंतरात्मा आहे. जीवात्मा त्याचा अंश आहे. अहंकाराचा त्याग केला, स्वतःला शून्य केले की तोच राहतो. ईश्वर हाच सत्य असल्यामुळे अन्य जग मिथ्या आहे. सर्व प्राण्यांमध्ये एकच प्राण किंवा जीव आहे व तोच ईश्वर होय. विश्व ही त्याची लीला आहे. तो प्रकाश म्हणजे चैतन्य आहे व तोच अनंतानंद आहे.

ईश्वर सत्य आहे म्हणजे काय, तर तो विश्वाच्या उत्पत्तिस्थितिसंहारांची नियामक शक्ती आहे; ही नियामक शक्ती ही नैतिक शक्ती आहे. आई, बाप, कन्या, पुत्र, बंधू, मित्र यांच्यातील प्रेम एकमेकांचे संरक्षण करते. कुटुंब, राष्ट्र, मानवजात, जीवसृष्टी व वस्तुमात्र यांना एकत्र करणारी शक्ती म्हणजे प्रेम होय. परमेश्वर प्रेमरूप आहे. आस्तिक व नास्तिक हे सर्व सत्याचे उपासक बनतात, तेव्हा ते ईश्वर उपासकच बनतात. जो नास्तिक ईश्वर नाही, असे म्हणतो, परंतु सत्याचे परिपालन करतो, त्याला सत्याचे आकर्षण असते; म्हणून तोसुद्धा एका अर्थी ईश्वराचे अस्तित्व मान्यच करतो. शत्रूवरही प्रेम केले, तर तो मित्र बनल्याशिवाय राहत नाही. कारण शत्रूच्या हृदयात परमेश्वराचा प्रकाश म्हणजे प्रेम आहेच. शत्रू जर मित्र बनला नाही, तर आपल्या तपश्चर्येत काही तरी उणीव आहे असे मानावे. ईश्वराने जगात पापाला अवसर दिला आहे; त्यातून भक्तीने उत्तीर्ण होता येते. भक्ती व प्रार्थना खरी असली पाहिजे. भक्ती ही नैतिक शक्तीची भक्ती असते. प्रार्थना उत्कट असल्यास व चित्त शुद्ध असल्यास परमेश्वराचा म्हणजे अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो व तो सत्याचा मार्ग दाखवितो. गांधींनी याच दृष्टीने आत्मचरित्राला सत्याचे प्रयोग असे नाव दिले आहे. ईश्वररूप सत्य गवसण्याकरिता फार मोठे प्रयत्‍न करावे लागतात; त्याकरिता इंद्रियसंयम करावा लागतो; अहिंसेची दीक्षा घ्यावी लागते. कारण अहिंसा हे सत्याचे साधन आहे. संपूर्ण अहिंसा ही सत्याच्याच कलदार नाण्याची दुसरी बाजू आहे. अहिंसा म्हणजे प्रेम होय.

अहिंसा हा आपल्या मानववंशाचा जीवनधर्म आहे. मानवसमाजाचे अस्तित्व अहिंसेवर आधारलेले आहे. शरीर आणि हिंसा यांचा नित्य संबंध आहे; हा एक बंध आहे; या बंधातून मुक्त होण्याचा मार्ग अहिंसा हा होय. शरीर असेपर्यंत कमीत कमी हिंसा म्हणजे अहिंसा असा अर्थ करावा लागतो. शरीरावर जितकी आसक्ती तितकी हिंसा अधिक. म्हणून शरीरावरची आसक्ती कमी केली पाहिजे. शरीरावरील आसक्ती कमी केल्याने म्हणजे तपश्चर्येने, संयमाने आत्मशक्ती वाढते, प्रकट होते. सर्वच प्राणिवर्ग अहिंस्य आहे. परंतु मानववंश श्रेष्ठ असल्यामुळे इतर प्राण्यांना वाचविण्याकरिता मानवाची हत्या होता कामा नये. मुंग्या, माकडे, कुत्री इ. इतर प्राण्यांना अन्न देणे, हे युक्त नाही असे एके ठिकाणी गांधी म्हणतात. परंतु याच्या उलटही त्यांची अनेक विधाने सापडतात. मांसाहार वर्ज्य करावा, हे हिंदुधर्मातील अहिंसेचे उत्कृष्ट प्रत्यंतर आहे, असे ते म्हणतात. गायीचा जीव वाचविण्याकरिता प्राणार्पण करणे, याचीही ते प्रशंसा करतात. गाय दयेचे काव्य आहे; तिची मी पूजा करतो; हिंदुधर्मातील गोपूजा, वृक्षपूजा हे अहिंसेचेच प्रत्यंतर आहे; असे गांधी म्हणतात.

अहिंसेचा व सत्याचा हा सिद्धांत गांधींनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या निष्ठेने आणला. त्याला ते सत्याग्रह असे म्हणतात. शुद्ध साध्याकरिता शुद्ध साधनेच उपयोगी पडतात; शुद्ध साध्याकरिता अशुद्ध साधने वापरल्यास साध्यही अशुद्ध बनते; साध्य दूर जाते; सत्याग्रहच शुद्ध साधन होय. सत्याग्रह म्हणजे सत्याकरिता अहिंसेच्या मार्गाने असत्याचा प्रतिकार करणे. ज्या व्यक्तींच्या ठिकाणी नैतिक दृष्ट्या अयोग्य व गर्ह्य परिस्थितींचा प्रतिकार करण्याची शक्ती असते, म्हणजे आत्मशक्ती प्रकट झालेली असते, तेच सत्याग्रहाचे अधिकारी होत. त्यांची शरीरक्लेश सहन करण्याची शक्ती हा आत्मशक्तीचा एक भाग आहे. कित्येक वेळा शरीरक्लेश सहन करून प्रतिकार करणारा प्रतिपक्षावर जबरदस्तीही करू शकतो. त्याचा आग्रह अविवेकीही असू शकतो. त्याची सत्याची कल्पना चुकीचीही असू शकते. त्यात असत्यही भरलेले असण्याची शक्यता असते. म्हणून खऱ्या सत्याग्रहीला नैतिक दृष्ट्या अयोग्य काय व योग्य काय हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पतकरावी लागते आणि आपल्या प्रतिकाराच्या उद्देशात असत्य दिसल्यास माघार घेण्याची तयारीही असावी लागते. माघार घेण्याकरितासुद्धा धैर्य लागते. निःशस्त्र प्रतिकारसुद्धा हिंसात्मक म्हणजे जबरदस्ती करणारा असतो. त्यात अत्याचारही असतो. सत्य हे तत्त्वतः शत्रूलाही मान्य असावे लागते. कारण विवेकबुद्धीची देणगी मानवाला प्राप्त झालेली आहे.

मनुष्य ही ईश्वराने घडविलेली स्वतःची प्रतिमा आहे, हे ख्रिस्ती तत्त्व गांधींनी मान्य केले आहे. जीवात्मा हा परमेश्वराचा अंश आहे, याची जाणीव अस्पष्टपणे माणसाला असतेच, असा हिंदुधर्माचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत व ख्रिस्ती सिद्धांत यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंगती आहे. मानवाची सेवा हीच ईश्वराची पूजा होय, असा निष्कर्ष गांधींनी ख्रिस्ती धर्माच्या चिंतनातून काढला आहे.

युद्ध वा मानवी हिंसेचे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रकार अहिंसेच्या तत्त्वाप्रमाणे बंद व्हावयास पाहिजेत, हे जरी खरे असले, तरी आजची जागतिक राजकीय परिस्थिती व सत्तेचे राजकारण लक्षात घेता, संरक्षण संस्था वा सैनिकशक्तीची संस्था ही आज तरी अपरिहार्य आहे, असे गांधींनी मान्य केले आहे. परंतु मानव हा बुद्धियुक्त प्राणी असल्यामुळे मानवामानवांमधील हिंसा बंद करणे हे मानवी कर्तव्य आहे, असे ते मानतात. अहिंसा हा ढोंगी दुर्बलाचा सिद्धांत नाही. ढोंगी, भित्रा मनुष्य व शस्त्राने प्रतिकार करणारा शूर मनुष्य यांच्यात सशस्त्र शूर, गांधींनी पसंत केला आहे. सबलाची अहिंसा हीच खरी अहिंसा होय, असे त्यांनी वारंवार प्रतिपादिले आहे.

गांधींचा ब्रह्मचर्याचा सिद्धांत, हा अहिंसेचाच उपसिद्धांत आहे. इंद्रियांवर, संभोगावर विजय मिळविल्याशिवाय निःस्वार्थता प्राप्त होत नाही. निःस्वार्थता असेल, तरच अहिंसा साधते. स्त्री-पुरुषांचे मैथुन हे तत्त्वतः वर्ज्यच असले पाहिजे. प्रजोत्पादनाकरिता मैथुन आवश्यक आहे; परंतु तेही टाळणे शक्य असल्यास ते टाळावे. पुष्कळ वेळा पुरुषाने केलेला संभोग ही स्त्रीवर केलेली जबरदस्ती असते, अशी गांधींची समजूत आहे. याविरुद्धही गांधींजी एके ठिकाणी लिहितात, की स्त्री-पुरुषांचे लैंगिक आकर्षण हे महनीय आहे. संतती सृष्टीमध्ये सतत आवश्यक आहे; कारण परमेश्वराच्या लीलेचा तो भाग आहे. सृष्टी ही परमेश्वराची लीला आहे; परंतु स्त्री-पुरुष संभोग ह्या अपवित्र क्रिया आहेत, अशाच प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांची अशी समजूत दिसते, की स्त्री-पुरुष संभोगात मानवी सामर्थ्याचा अपव्यय होतो; मग तो संभोग विवाहित स्त्री-पुरुषांचा असो अथवा अविवाहितांचा असो. वैवाहिक संभोग ही पापावर घातलेली मर्यादा आहे. तेही पापच आहे. कारण त्याच्या योगाने मनुष्याचा शक्तिपात होतो. हा योगशास्त्रातील ब्रह्मचर्यविषयक सिद्धांत आहे; परंतु तो जीवविज्ञानाच्या दृष्टीने चुकीचा सिद्धांत आहे. कारण संभोगात होणारा वीर्यपात हा मर्यादित प्रमाणात होत असला, तर त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक सामर्थ्य घटत नाही, उलट वाढते. गांधींचा याबद्दलचा दृष्टिकोन मानवी जीवविज्ञानदृष्ट्या नीट तपासला गेला नाही. एवढे मात्र खरे, की वैवाहिक संबंधातून कुटुंबसंस्था निर्माण होते, त्यामुळे आप्तसंबंध तयार होतो व मर्यादित प्रेम उत्कट होते. सर्व मानवच आप्त आहेत, असा गांधींचा दृष्टिकोन आहे. नैसर्गिक आप्तसंबंधाने मर्यादित न होणारे प्रेम हे संन्यासाशिवाय कोणालाच शक्य नाही, म्हणून गांधी-सिद्धांत हा संन्याससिद्धांताचाच एक उपसिद्धांत आहे, असे मानावे लागते. ब्रह्मचर्य हे ईश्वरप्राप्त्यर्थ आवश्यक आहे; हाही गांधींचा विचार ह्या संन्यासमार्गाचाच भाग आहे.

सत्य व अहिंसा या दोन नैतिक तत्त्वांवर आधारलेला रस्किनच्या पुस्तकावरून सुचलेला गांधींचा सर्वोदयवाद हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक तत्त्वज्ञान आहे. समाजाचा आध्यात्मिक विकासवाद गांधींनी मांडला आहे. म्हणजे व्यक्तीप्रमाणे समाजाचीही समाजिक व राजकीय प्रगती होत असते, असे सर्वोदयवादात गृहीत धरले आहे.

आर्थिक समता मानवी ऐक्याच्या तत्त्वावर विकसित करणे, ही ऐतिहासिक प्रगतीची गरज आहे. सत्याग्रह हे त्याचे साधन आहे. दलित व पीडित वर्गाला समतेचा न्याय पहिल्यांदा मिळाला पाहिजे, याकरिता दलित व पीडित यांची सेवा केली पाहिजे व अन्यायाचा सत्याग्रहाच्या द्वारे प्रतिकार हा सतत चालला पाहिजे. विकास व क्रांतीचे प्रयत्‍न निसर्गाप्रमाणे समाजातही चालणार. भूकंप, वादळी उलथापालथ ही निसर्गात चालते, तशी समाजातही चालणारच. प्रगतीला तिची कित्येक वेळा आवश्यकता असते. परंतु शांततापूर्ण मार्गाने सामाजिक विकास घडवून आणणे यावरच गांधींचा मुख्यतः भर आहे.

गांधी हे मूळचे वर्णाश्रमसंस्थेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी जातिभेदाचेही समर्थन संयमाच्या तत्त्वानुसार केले आहे. स्वजातीमध्येच लग्‍न करणे व स्वजातीचेच अन्नग्रहण करणे, यांत लैंगिक व रसनेचा संयम हे तत्त्व आहे, असे त्यांनी प्रतिपादिले आहे. परंतु १९३६-३७ च्या सुमारास गांधींनी वर्णाश्रमाचे आपले भाष्य बंद केले; साम्यवाद व समाजवाद यांचा नवीन पिढीमध्ये प्रसार होत आहे, हे पाहून त्यांनी अध्यात्मवादावर आधारलेल्या आर्थिक व सामाजिक समतावादाचा पुरस्कार सुरू केला. सामाजिक उच्चनीचभाव व हिंदूंची अस्पृश्यतेची संस्था हे सर्वोदयवादाशी विरुद्ध आहेत, म्हणून उच्चनीचभाव व अस्पृश्यता नष्ट करणे, ही गोष्ट सामाजिक प्रगतीची गरज आहे; असा विचार गांधींनी मांडला आहे.