पश्चिमेचे महाभारत – वायकिंग्ज!

vikings

जगाच्या इतिहासात मध्ययुगीन कालखंड हा अनेक अर्थांनी उलथापालथीचा काळ ठरलेला आहे. या काळात जगात अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मुख्यत्वेकरून धार्मिक स्थित्यंतरे घडून आली. जमीन आणि पाणी यांच्या शोधार्थ सुरू झालेला माणसाचा प्रवास मध्ययुगीन काळात आपल्या परमोच्च क्रूरतेच्या बिंदुला पोहोचला. माणसाची शोधक वृत्ती आणि त्याचा हव्यास यांचा योग्य मेळ न घातला गेल्याने जगाने अनेक क्लॅश ऑफ सीव्हिलायझेशन्स बघितले. अशाच एका संघर्षाची कहाणी सांगणारी आणि गेम ऑफ थ्रोन्सनंतर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे वायकिंग्ज. परंतु या दोन्हीतला मुख्य फरक म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स ही नवलकथा आहे तर वायकिंग्ज हे युरोपच्या मध्ययुगीन इतिहासात इ.स. 750 ते इ.स.1100 दरम्यान घडून गेलेलं वास्तव.

मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागातच ही केवळ राजकीय संघर्षकथा नाही, हे ठळकपणे जाणवते. आणि म्हणूनच वायकिंग्ज बद्दल लिहायचं ठरलं तेव्हा कोणताही एक विशिष्ट धागा न पकडता मालिकेच्या सर्वच बिंदूंना हात घालायचा हे निश्चित झालं.

अक्षरश: अख्ख्या जगाच्या, त्यातल्या त्यात टीव्हीवरील मालिकांच्या इतिहासातला अभूतपूर्व म्हणावा असा, वायकिंग्ज हा प्रकार आहे. हिस्टरी चॅनेलवर सुरू असलेली निर्देशक मायकल हर्स्ट यांची ही मालिका. वास्तव आणि अद्भुततेच, कमालीच लोकविलक्षण मिश्रण करून हर्स्ट यांनी वायकिंग्जची संपूर्ण दुनिया उभी केली आहे. सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी, त्यात वेगवेगळी राज्ये, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे इतिहास, एकाच घरातील भावंडांचा संघर्ष – तरीही सत्तेवर खरा हक्क आपलाच आहे, असे सांगत संघर्षाकडे होणारी सगळ्यांची वाटचाल म्हणंजे वायकिंग्ज. नॉर्डिक, स्कॅाटीश, डॅनिश, इंग्लिश त्यात फ्रेंच पण मिसळतात, त्यांच्यातले वेगवेगळे भाऊ-बहिण, अर्ल, ड्युक, राजे, त्यांचा सत्तेवरचा अधिकार याचा अत्यंत निर्दय, कोरा करकरीत अहवाल म्हणजे ही मालिका. याची प्रचीती येते मालिकेच्या पहिल्याच भागातल्या संवादातून. We fight. That is how we win, and that is how we die. याचा अर्थ आम्ही लढतो. असेच आम्ही जिंकतो आणि असेच आम्ही मरतो, वायकिंग्जच्या जीवनशैलीचे वर्णन करणारे हे हे शब्द आहेत रॅग्नारचे.

त्याचवेळी मालिका अनेक चमत्कृतींनी भरलेली आहे. रॅग्नारच्या दोन बायका, त्यांची मुले, त्यांच्यातला क्रूर सत्तासंघर्ष. रॅग्नारची मुले असल्याने राज्यकारभारात त्यांना लाभलेली बलस्थाने, रॅग्नारच्या सर्वाधिक जवळचा असणे, नव्या आयुष्यासाठी नव्या जमिनीच्या शोधात वायकिंग्जचा सुरू झालेला शोध आणि त्यातून उद्भवलेला ख्रिस्ती धर्माशी संघर्ष, त्यात युध्द कौशल्यामुळे सरस ठरेलेल वायकिंग्ज, वायकिंग्जना नंतर कुटनीतीने आणि कट-कारस्थाने करून हतबल करणारे तत्कालीन इंग्रज राजे अशा प्रकारे सत्तेवर आपला हक्क का आहे, हे सांगण्याचं काहीतरी कारण प्रत्येकाकडे आहे. याचं चित्रण करतांना मालिकेत राग्नार म्हणतो, I never asked Power. Power is only given to those who are prepared to lower themselves to pick it up. याचा अर्थ, मी सत्तेची मागणी कधीच केली नाही. सत्तेसाठी जे झुकायला तयार असतात त्यांनाच सत्ता दिली जाते.

मुळात सगळीच मालिका अंगावर येणारी आणि ठसा उमटवणारी आहे. त्यातले काही क्षण तर कमालीचे अद्भुत, चित्तथरारक, अत्यंत अनपेक्षित असल्याने जास्त ठसतात. पहिल्याच भागाच्या सुरुवातीला राग्नार लोथब्रोक या तरुण नॉर्डिक लढवय्या योद्ध्याच्या लुटीच्या प्रसंगांपासून त्याचा सामान्य शेतकरी ते त्याच्या टोळीचा सरदार होणे, लढाईच्या अगदी मोक्याच्या क्षणी राग्नर लोथब्रोकला ओडिन (नॉर्डिक देव) आणि त्याचे व्हॅल्कीरीज (पूर्वज) यांचा दृष्टांत, आपला प्रतिभाशाली कारागीर मित्र फ्लोकीसोबत मिळून वाइकिंग्सने यापूर्वी कधीही न केलेलं स्कँडिनेव्हियाहून युरोपच्या मुख्य भूमीकडे जाण्यासाठी सक्षम जहाज तयार करून लुट करण्याचे धाडस, त्याला झालेला विरोध, दरम्यान, राग्नरने अथेल्स्तान या सॅक्सन पुजार्‍याला बंदी म्हणून आपल्या राज्यात आणणे, हाच पुजारी नंतर त्याचा जवळचा सल्लागार बनने, राग्नारचे दुसरे लग्न, भागाच्या शेवटाकडे सत्तेच्या इर्श्येमुळे राग्नार आणि त्याचा भाऊ रोलो यांच्यात झालेली आगळीक, राग्नार आणि वेसेक्सचा राजा इकबर्ट दोन राजांच्या बैठकीत भविष्यातील तडजोड, लगर्था आणि राग्नार पुन्हा एकत्र येणे; अथेलस्तानचा आपली श्रद्धा परिभाषित करण्यासाठीचा संघर्ष हे सार अगदी कालसापेक्ष आहे, असच वाटत राहत. तिसर्‍या भागात अथेलस्तान किंग इकबर्टचा विश्वासू बनणे, राग्नरचा राजा इकबर्टविरुद्धच्या लढाईत आश्चर्यकारक पराभव, त्यातून उठून राग्नारचा पॅरिसवर हल्ला, त्यानंतरचे त्याचे मरण्याचे नाटक करून आणि धर्म स्वीकारण्याच थाप मारून सम्राटाची मुलगी राजकुमारी गिसाला ओलिस पकडून पहारेकर्‍याना वेशी उघडण्यास भाग पाडणे, याच राजकुमारीशी रोलोच्या भावाने लग्न करून फ्रँकिश सरदार बनने, पॅरिसच्या बाहेरच्या वायकिंग छावणीवर हल्ला करणे आणि रॅग्नारचा पॅरीसवरील हल्ला परतून लावणे, नॉर्थंब्रियात राजा आयलेकडून रॅग्नारला सापांच्या खड्ड्यात पाडून मारणे, रॅग्नारच्या आयव्हार-द बोनलेस या मुलाचे कट्टेगटला परतणे आणि लॅगर्थाला ठार करण्याची शपथ घेणे, रॅग्नारचे मुलगे – बियॉन, उब्बे, सिगुर्ड, ह्विटसेर्क आणि आयव्हार यांची आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी इंग्लंडवर स्वारी; नॉर्थंब्रियाचा राजा आयलेचा युद्धात मृत्यू होणे; फ्लोकीची स्व-ची ओळखसाठीची धडपड. पाचव्या भागात आयव्हार ग्रेट आर्मीचा नेता बनणे, आयव्हार, ह्विटर्स्क, लेगेरथा, बियॉन आणि उब्बे यांच्यातील संघर्ष, इकडे वेसेक्समध्ये किंग एथेलवल्फचा मृत्यू आणि पत्नी ज्युडिथ तिचा थोरला मुलाला राज्यारोहण करण्यास नकार देऊन त्याऐवजी त्याचा लहान भाऊ अल्फ्रेड याला राजा करणे; किंग होरिक आणि आयव्हार यांचा मोठा पराभव होणे आणि रॅग्नारच्या कुटुंबात पुन्हा नवीन युद्धाची नांदी हे ‘विंटर इज कमिंग’ सत्तासंघर्षाची आठवण करून देतात. हे शब्द ऐकले की माझ्या डोळ्यासमोर देशातलं सध्याच्या घडीला असलेल आर्थिक, राजकीय, सामाजिक वातावरण उभं राहत. वेळेत पावलें उचलली नाही तर अख्ख्या देशासाठी विंटर इज कमिंग सारखी स्थिती आहे!

निर्देशाकाने इतिहासातल्या अनेक घटनांचं विलक्षण मिश्रण करून आपल्यासमोर हे अद्भुत सादर केल आहे. विशेषतः पाश्चिमात्य इतिहास आणि त्यातल्या त्यात युरोपच्या इतिहासातले अनेक संदर्भ तिथं दिसून येतात. उदा. अनेक प्रसंगांमध्ये सर्वच भागांतली युरोपियन विरुद्ध नॉर्डिक ही मुख्य लढाई ही युरोपच्या इतिहासातल्या उहरीश्रशी Charles the Simple of West Francia (इ.स. 893-923), वायकिंग्ज सरदार रोलो (इ.स. 911-927) यांच्या काळावर प्रकाश टाकतात. तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी केल्या जाणार्‍या कुटील कारस्थानांची झलकही बघायला मिळते. अत्यंत कार्यक्षम असलेल्या, स्वतंत्र बुद्धीच्या महिला, सिंहासनावर अधिकार सांगत असताना वेळोवेळी ब्रिटीश इतिहासातली व्हिक्टोरिया राणी तरी किंवा सोळाव्या शतकातल्या पहिल्या एलीझाबेथची सतत आठवण करून देतात.

आधीच्या मालिकेतल्या एका भागात मैत्री आणि सन्मान साजरा करण्यासाठी एकत्र बोलावलेल जेवण; पण त्यात रॅग्नार आणि त्याच्या पांगळ्या मुलाला बंदी करणे आणि नंतर नाट्यमयरित्या रॅग्नारची हत्या होणे, हा प्रसंगही इतिहासातल्या काही भागांची आठवण करून देतो. कारण खरचच अशा कत्तली घडलेल्या आहेत. सगळी मालिका अजब, अशक्य, आणि अत्यंत (!) अनपेक्षित वाटणार्‍या प्रसंगांनी भरलेली आहे.

अनेक अर्थांनी मी वायकिंग्जला पश्चिमेतील महाभारत असं नाव देतोय. तितका प्रचंड व्याप, कथानकाची तितकी प्रचंड व्याप्ती, प्रचंड संख्येने असणारी पात्र, त्यांची एकमेकांसोबतची नाती; प्रत्येक पत्र कमालीच ठळकपणे ‘वशषळपश’ केलेलं. महाभारताबाबत बोलताना, वाचताना, अभ्यास करतांना मला वाटत राहत की महाभारतातली नाती ज्याला सांगता येतील त्याला स्कॉलरशिप दिली गेली पाहिजे. पण वायकिंग्जला पाश्चिमात्य महाभारत म्हणताना मात्र माझ्या मनात येत की वायकिंग्जमध्ये श्रीकृष्ण नाही! आहे तो कोरा करकरीत, अत्यंत निर्दयी असा सत्ता संघर्ष; जिथे बापाला बाप म्हणत नाही; आईला आई म्हणत नाही; भाऊ असो, बहिण असो, सत्तेपुढे सगळे दुय्यम आहेत. एकमेकांविरुद्ध डावपेच टाकताना कुणाला कशाचीच फिकीर नाही.

सत्ता संघर्षाच वैशिष्ट्यच हे आहे की तो हिंसेने भरलेला असतो. मालिकेतही अक्षरश अंगावर येणारा हिंसाचार आहे. हिंसाचार आणि सेक्स-वासना बरोबरीन पुढे सरकतात, हे मानवी जिवनाच वास्तवही आहे. राजकारण ही सुद्धा वासनेन भरलेली प्रक्रिया आहे.

मालिकेत दाखविण्यात आलेली नग्नता एका बाजूला भयानक बिनधास्त आहे. पण त्या नग्नतेत आपण वाहवत गेलो नाही तर लक्षात येईल की त्यामागे निर्दयता मांडली गेली आहे, स्त्रीचं शोषण मांडलेल आहे, सत्तेसाठी तिचा वापर करायला मागंपुढं न पाहणारेही आहेत आणि सत्तेसाठीच सेक्सचा वापर करणार्‍या स्त्रियाही आहेत. अशाप्रकारे Sex, violence, Politics, Religion, Philosophy असा विलक्षण मेळ वायकिंग्जमध्ये दिसून येतो.

वायकिंग्ज पाहताना मला हिटलर, त्याचे ‘माईन काम्फ’ हे आत्मचरित्र आणि विशेषकरून जॉर्ज ऑरवेल व त्याची Animal farm ही कादंबरी आठवत राहते. कारण हिटलरच्या आत्मचरित्रात आणि जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीत त्याकाळचे संदर्भ ठासून भरलेले आहेत. मुख्यत: साम्यवादी-सर्वंकषवादी सत्ता आणि तिच्या शीर्षस्थानी स्टॅलिन. त्याचा फॅसिस्ट सत्तांशी संघर्ष. दोघ एकमेकांचे शत्रू असताना अचानक एके दिवशी त्यांनीच मैत्रीचा करार केला. त्यातली राजकारणातली धूर्तता, अनपेक्षितपणा आणि निर्दयता ऑरवेलने Animal farm मध्ये मांडली. पुढे साम्यवादी राज्यव्यवस्था कोलमडण्याच्या काही काळासाठी मला वाटल की जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीचा relevance कमी झालाय कां ? म्हणून नंतर ती पुन्हा एकदा वाचताना लक्षात आल की जॉर्ज ऑरवेलची कादंबरी काळाच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाते. कारण मग ती नुसतीच साम्यवाद विरुद्ध फॅसिझम अशी न राहता सत्ता संघर्ष, त्यातली तत्वशुन्यता, वाट्टेल त्या तडजोडी या सगळ्यांच ते रूपक ते मांडल आहे. ते वायकिंग्ज आहे.

मालिकेतली अनेक पात्र कितीही नाही म्हटल तरी आपल्या कळत-नकळत, ज्याला त्याला आपापल्या अभ्यासानुसार, जगाच्या आणि पर्यायाने भारताच्या इतिहासातल्या अनेक पात्रांची, घटनांची आठवण करून देत राहतात. उदा. आता येणार्‍या सहाव्या भागामध्ये सगळ उलगडत जाईल ते रॅग्नारच्या मुलांचा अखेरचा संघर्ष, त्यांच्या पक्षांत वाटले गेलेले स्कँडीनेव्हीयन राजे, सरदार. त्यांच्याविरुद्ध लढताना जे पराभूत झाले; ते गुलाम म्हणून जेत्यानाच सामील होतात. हे सगळ बघताना, वाचताना गेल्या शतकानुशतकांचा भारताचा इतिहास माझ्या नजरेसमोरून जात असतो. या देशावर आक्रमणे होत राहिली. त्या त्या भागात कत्तली होत राहिल्या. तिथले भारतीय लोक आणि त्यांची संस्कृती तर मेलीच, पण उरलेले नंतरच्या आक्रमकांना सामील झाले. नंतरची भारतावरची आक्रमणे तिथूनच झाली. स्कँडीनेव्हीयन, इंग्लिश, फ्रेंच आणि नॉर्डिक असलेल्या रॅग्नारच्या कुटुंबातील संघर्ष पाहताना मला सत्तेसाठी आपल्या नातलगांना, भावंडाना आणि गरज पडल्यास आई-बापाची हत्या करणारे गझनीचा मोहम्मद, महम्मद घुरी, बाबर, अहमदशहा अब्दाली, औरंगजेब… आणि समुद्रमार्गे आलेली कंपनी हे सगळेच आठवत राहते. त्याच यादीत अलीकडचा पाकिस्तान आहे. परवापरवापर्यंत मुळच्या इतिहासातल्या अफगाणिस्तानप्रमाणेच – जो भारतीय संस्कृतीचा हिस्सा होता, पण अफगाणिस्तानात आक्रमकांचे हल्ले झाले, कत्तली झाल्या आणि भारतावरच्या पुढच्या आक्रमणाचं ङर्रीपलहळपस झरव अफगाणिस्तान बनलं. ते स्थान आता पाकिस्तानकडे आलं आहे. एकेकाळी पाकिस्तान भारताचाच भाग होता. पण धर्माच्या मुद्द्यावर वेगळ राष्ट्र मागून फुटला आणि आता भारताशी वैर ठेवून आहे. भारतावर होणारी पुढची आक्रमण आता तिथूनच sponsor केली जातायत. वायकिंग्ज पाहताना हे सहजच जाणवत.

अंतिमत: पुन्हा सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेली निवडणूक ही लोकशाही मार्गान चालू असलेली वायकिंग्जच आहे. मालिका पाहताना व्यक्तिश: मला कॅटेगटच्या सिंहासनावर बियॉन बसलेला आणि फ्लोकी कॅटेगटमध्ये परतून त्याचा सेनापती-सरदार झालेला असा शेवट अपेक्षित आहे. तरीही मालिकेचा सहावा भाग कसा संपतो याची जेवढी उत्सुकता आहे, तशी तेवढी उत्सुकता, महाराष्ट्रात चालू असलेल्या रणधुमाळीचा शेवट काय होतो याची आहे.

© साजन चंद्रकला उचाडे