साक्षेपी भाषांतरकार उमा कुलकर्णी यांची दीर्घ मुलाखत

उमा कुलकर्णी यांची मुलाखत

प्रश्न : ‘भाषांतर आणि अनुवाद यांतील फरक काय?’ हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. यावर आपले मत काय?

उत्तर : अनुवाद याचा शब्दशः अर्थ ‘नंतर अर्थ सांगणे’ असा म्हणता येईल. उदा. एका जुन्या ग्रंथात मला ‘गुरूने त्या श्लोकाचा अनुवाद नंतर सांगितला.’ असा संदर्भ मिळाला. तो मला पटला. तो अर्थच मला स्वत:ला अपेक्षित आहे. मुख्यतः ललित कलाकृतींच्या बाबतीत. ‘अनुवाद’ असं म्हणताना एखादी ललित कलाकृती जे बोलते ते दुसऱ्या भाषेत वळविणे.‘भाषांतराचा’चा विचार करायचा झाल्यास ‘या भाषेतील मजकूर त्या भाषेत नेणे’ असा ढोबळ अर्थ सांगता येईल. वैचारिक साहित्य, तत्त्वज्ञान या विषयांसंदर्भात भाषांतराला फार महत्त्व आहे. तिथे भाषेच्या बाबतीत काटेकोरपणा अपेक्षित आहे.मी जे काही करते त्याला मी अनुवाद म्हणते. माझा हेतू भाषांतराचा नाही; अनुवादाचा आहे.

प्रश्न : तौलनिक अभ्यासामुळे विविध भाषा जवळ येऊ शकतील काय?

उत्तर : भाषा जवळ येतील की नाही माहित नाही; माणसं नक्की जवळ येतील. एके काळी कन्नडच्या संदर्भात मराठी नाटक किंवा सिनेमांमध्ये विनोद निर्मितीसाठी कन्नड पात्र वापरायची पद्धत होती. कन्नड माणूस विनोदी असू नये हे माझे म्हणणे नाही. विनोद हा वेगळा प्रांत आहे. एकमेकांत परिचय कमी असल्याने संवादातून ज्या भाषेच्या चुका घडायच्या त्यातून विनोदनिर्मिती होत असे. अनुवादामुळे एकमेकांचा परिचय होतो असे लक्षात येते. उदा. इकडची माणसे प्रवासाला कर्नाटकात गेल्यावर वेगवेगळ्या टप्प्यांवरुन फोन करतात. जसे की, आम्ही ‘वंशवृक्ष’मधील कपिला नदी पाहिली किंवा गेलो होतो, एरवी नंजनपूरला Sightseeing म्हणून जाणं वेगळं परंतु ‘एखाद्या आवडत्या कादंबरीतील ते स्थान आहे या दृष्टीने बघणं’ असं एक वेगळं नातं तयार होतं. उदा. बंगालीतून मराठीत आलेलं आपण काही वाचतो तेव्हा कलकत्त्याच्या रस्त्यांवरून फिरताना आपल्याला वाटतं, या रस्त्यांवरून कादंबरीतील पात्रं फिरली असतील, कादंबरीतील वर्णने आठवतात, जवळीक निर्माण होते. थोडक्यात माणसं जवळ येतात! भाषा जवळ येण्यासाठी तुम्ही त्या प्रदेशात फिरायला पाहिजे, त्या पद्धतीच्या माणसाला प्रत्यक्षात भेटायला हवं. फक्त अनुवाद करून चालणार नाही. त्यामुळे अनुवादामुळे भाषा नाही तर माणसे जवळ येतात हे नक्की!

प्रश्न : मराठी वाङ्मयीन संस्कृतीविषयी आपले काय मत आहे?

उत्तर : माझं सगळं वाचन प्रामुख्याने मराठीच आहे. पूर्वीइतके आहे असे सध्या मी claim करणार नाही कारण लेखनकाम, वय, डोळे या सगळ्या आताच्या मर्यादा आहेत. परंतु कानडी साहित्याचा अनुवाद करताना मला जाणवलं, की ही कानडी मंडळी आपल्या मुळाला चिकटलेली आहेत. त्या तुलनेत मराठी लेखन मुळापासून जरा लांब आलेले दिसते. भैरप्पांच्या कादंबर्‍या अनुवादित करताना मला जाणवायचं आपण यांच्यापैकी कुणीतरी आहोत, यांच्याशी माझं काहीतरी नातं आहे. किंबहुना वाचकांचीही हीच प्रतिक्रिया असते. उदा. ‘वंशवृक्ष’मध्ये श्रोत्री नावाचं एक अतिशय कर्मठ पात्र आहे. आणि आपल्याकडे खूप पूर्वी ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीत त्यांनी सासरे दाखवले होते की जे जुन्या पद्धतीचे आहेत आणि ते सुनेशी खलनायक पद्धतीने react होतात, होतात म्हणजे कादंबरीकाराने त्यांना तसं treat केलं आहे.

‘वंशवृक्ष’मध्ये त्याच पद्धतीचं घडतंय, म्हणजे सुनेच्या पुनर्विवाहाला सास-यांचा विरोध आहे. पण इथं भैरप्पा आपल्याला हे दाखवून देतात की विरोध करणार्‍या माणसाचीपण एक बाजू आहे. तर आपल्याला म्हणजे मराठी लोकांना, जुन्या लोकांची काही बाजू असेल हीच गोष्ट डोळ्यासमोर आणली गेली नव्हती. ते हळूहळू काही लेखकांमुळे होतंय. आपल्याकडे सुधारणा होत गेल्याने, मुंबईसारखं महानगर आपल्या जवळ असल्याने, तिथले अनुभव आपण अनुभवले असल्याने महानगरीय संवेदना मराठी लेखक अधिक चांगल्या प्रकारे मांडतो. मात्र कन्नड लोक लिहायला गेले तरी त्यात गावाकडच्याच गोष्टी अधिक असतात किंवा लहान गावातून महानगरात गेल्यावर होणारी त्यांची घुसमट हे चित्रण आता दिसायला लागले आहे.

जसं की, नुकत्याच वाचनात आलेल्या एका कथेत, समोरासमोर भेटल्यावर छान बोलणारी माणसे WhatsApp group वर मात्र एकमेकांची उणीदुणी काढताना दिसतात- ही मानसिकता चितारलेली आहे. अशा पद्धतीच्या कथा आता कन्नडमध्ये यायला लागलेल्या आहेत तरी त्यांचं स्वरूप आपल्याकडच्या महानगरीय संवेदनांपेक्षा वेगळं आहे. कारण मुंबई वेगळी आहे आणि बेंगलोर वेगळं आहे. बेंगलोरमध्ये आत्ता जे प्रॉब्लेम्स आले आहेत ते आय.टी.मुळे आलेले प्रॉब्लेम्स आहेत. मुंबईचे प्रॉब्लेम्स आहेत ते आधीची कारखानदारी, त्यामुळे आलेला बकालपणा, जो बेंगलोरला नाही- मोठ्ठं झालं तरी ते गावच आहे. बेंगलोरच्या आत्ताच्या समस्या या अगदी पंधरा वीस वर्षांतल्या आधुनिकतेमुळे आलेल्या किंवा आय.टी. इंडस्ट्रीमुळे आलेल्या समस्या आहेत. याउलट मुंबईचे गेल्या पन्नास-साठ-सत्तर वर्षांतले प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे उदाहरणादाखल चक्र कादंबरी. तर हा एक कन्नड-मराठीतील वाड्मयीन भेद प्रामुख्याने दिसतो.

प्रश्न : वाचकांची अभिरुची बदलायची असेल तर त्यांच्या वाचनात येणार्‍या गोष्टी बदलल्या पाहिजेत. अनुवादित साहित्याची गोडी लागण्यासाठी लोकांनी किंवा लहान मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत असे तुम्हाला वाटते?

उत्तर : मला वाटतं त्यांना फक्त उपलब्ध करून दिलं तरी पुरेसं आहे. जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मराठी साहित्य वाचत होते आणि त्याकाळी मराठीमध्ये बंगाली कादंब-याचे अनुवादही वाचनात येत होते. तसेच हंस, हंसनवल अशी मासिकं होती. त्यामध्ये इंग्लिश साहित्याची ‘रुपांतरे’ असायची. ती देखील खूप आकर्षक वाटायची. त्याला तुम्ही आत्ताच्या अनुवादाच्या नियमांमध्ये बसवू शकत नाही. परंतु आकर्षक पद्धतीने तिकडची कथानकं मांडलेली होती. तिकडचे English Characters तेव्हा बाई गं!, अगं बाई! असं म्हणायचे. त्या वयात अनुवादाचे नियम लावण्यापेक्षा ते वाचणं महत्त्वाचं वाटायचं.

मला असं वाटतं की, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असल्यास त्यांना पॉप्युलर लिटरेचर वाचायला द्यावं. आपल्याकडे पॉप्युलर लिटरेचरला तुच्छ लेखलं जातं पण वाचनाकडे वळवायचं काम हे पॉप्युलर लिटरेचर करतं. आमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आम्ही चांदोबा, ना. सी. फडके, चंद्रकांत काकोडकर असं वाचत गेलो. नंतर आम्हाला कळलं ‘हे काही खरं नाही.’ ही समज वयानुरूप आपोआप येते. आता तुम्ही मुलांसमोर एकदम कोसला टाकलीत तर मुलं वाचणार नाहीत. तर वाचनाकडे वळविण्यासाठी या पॉप्युलर लिटरेचरची मदत होते. सावधगिरी एवढीच बाळगली जावी की तिथेच ती मुले घोटाळणार नाहीत. पालकांनी नीट विचार करून टेबलावर पडलेली पुस्तके जाणीवपूर्वक मुलांच्या समोर आणावीत. ती पुस्तके मुलं उचलतात. त्या त्या वयाची पुस्तके त्यांना मिळत गेली की हळूहळू वाचनाची गोडी निर्माण होईल. आपोआप दिशा मिळेल. मला त्या वयात एका प्राध्यापकाने ‘सावित्री वाच’ असं सांगितलं. मला त्यावेळेला सावित्री समजली. अगदी सुरुवातीलाच सावित्री समोर आली असती तर आम्ही कदाचित वाचनच सोडलं असतं. हे अनुवादित नाही तर सगळ्याच साहित्याला लागू पडतं. नावाजलेले प्रकाशक ज्याप्रमाणे पॉप्युलर लिटरेचर प्रकाशित करतात; त्याचा दर्जा वगैरे न बघता, वाचनसंस्कृती मुरवायला तोही भाग काही प्रमाणात आपला रोल बजावत असतो.

प्रश्न : मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा शिक्षणाचं माध्यम करणं याविषयी आपलं काय मत आहे?

उत्तर : मातृभाषेतून शिक्षण एका लेव्हलपर्यंत द्यावं. आम्हाला चौथीपर्यंत एकच भाषा होती. पाचवीपासून हिंदी आणि इंग्लिश इंट्रोड्युस झाल्या. मुलाचा ‘विचार करायचा, प्रतिभा व्यक्त होण्याचा’ जो कालखंड आहे त्या कालखंडात मातृभाषेशी तो कम्फर्टेबल असेल. स्वतंत्रपणे विचार करणं, नवं सुचणं ही प्रक्रिया जागृत ठेवण्यासाठी सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत असणे गरजेचे आहे. अगदी मॅट्रीकपर्यंत मातृभाषेतच शिक्षण द्यावं हे मात्र मला खूप धोकादायक वाटतं. कालांतराने दुसर्‍या भाषेविषयी नावड किंवा कॉम्प्लेक्स निर्माण होतो आणि तुम्हाला त्यात कम्फर्टेबल वाटत नाही. मुलांची भाषा शिकण्याची क्षमता जबरदस्त असते. आपण मुलांना कमी लेखतो, बेळगावचा माझा पुतण्या, त्याची आई मराठी व वडील कन्नड भाषिक होते. तो मुलगा जन्मल्यापासून आईसोबत मराठीत आणि वडिलांसोबत कन्नडमध्ये बोलत होता. त्याला माहितही नव्हतं आपण दोन भाषा बोलतोय. जेव्हा लोक ऐकायचे आणि कौतुकाने विधान करायचे, अरे! याला दोन्ही भाषा येतात मग त्याच्या ते कालांतराने लक्षात आलं. इतक्या सहजपणे मुलं भाषा शिकतात. त्यामुळे मला वाटतं सुरुवातीची काही वर्षे मुलांना मातृभाषेत शिक्षण द्यावं. नंतर मात्र लहान वयातच त्यांना दुसर्‍या भाषाही इंट्रोड्युस व्हाव्यात.

उमा कुलकर्णी
उमा कुलकर्णी

प्रश्न : सध्याच्या काळातील अनुवादापुढील प्रमुख आव्हाने कोणती?

उत्तर : आत्ता अनुवादाला जेवढे चांगले दिवस आहेत तेवढे कधीच नव्हते. माझं पहिलं पुस्तक 1982 साली आलं. तेव्हा तुम्ही कुणी जन्मलेलेपण नसाल. त्यावेळेला मला ते script घेऊन फिरावं लागलं होतं आणि लेखक होते शिवराम कारंथ. त्यांना नुकतंच ज्ञानपीठ मिळालेलं. इतकं भक्कम पुस्तक असताना मला प्रकाशक शोधावे लागले होते. त्यावेळचे प्रकाशकांचे आरोप काय होते माहीत आहे का? ‘अनुवादित साहित्य हे शिळं असतं. त्याला शिळा वास येतो.’ पहिलं पुस्तक प्रकाशित होईपर्यंत मला फिरावं लागलं. नंतर मात्र काही अडचण आली नाही. आता वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. अनुवादक व्यवस्थित ‘तयार’ पाहिजे. ज्या भाषेत अनुवादित करणार आहात ती भाषा, तिच्यावरची हुकुमत आणि अनुवादकाची साहित्यविषयक जाण वाढणं आज महत्त्वाचं वाटतं. काही मोठे ग्रुप्स आहेत ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर काम चालतं, त्यांना कुणीतरी येऊन सांगतं, ‘माझं पुस्तक अनुवादित कर’, नंतर मग प्रकाशकही दर्जा नसल्यास ते स्वीकारत नाही, प्रकाशकांनाही मी दोष देणार नाही. अनुवाद चांगला नसेल तर त्यांनी तरी आपले पैसे का खर्च करावे? पुस्तक अनुवादित करण्यासाठी तुमचा महिनोन्महिने वेळ जातो, त्याला मेहनत आवश्यक असते. अनुवादकांना अनुवादाच्या दृष्टीने मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यांची त्या त्या भाषेतील साहित्यिक जाण वाढणं अत्यावश्यक आहे.

प्रश्न : काही संस्कृतीतील शब्दांना किंवा म्हणी, वाक्प्रचार यांना दुसर्‍या संस्कृतीत वा दुसर्‍या भाषेत प्रतिशब्द नसतात अशा वेळेस भाषांतर करताना अडचणी येतात, तेव्हा काय करावं?

उत्तर : अडचणी असतात. मी याआधी म्हटल्याप्रमाणे इंग्लिशमधून भारतीय भाषांमध्ये होणार्‍या अनुवादाच्या वेळेस येणार्‍या अडचणींचे प्रमाण जास्त आहे. जसे की, आपण नेहमी उदाहरण मांडतो की ‘उष्टं खरकटं’ किंवा ‘तुळशीकट्टा’, हे प्रॉब्लेम्स मोठे आहेत. कबूल आहे. देशी भाषांमध्ये हे फार लहान बारकावे असतात, ते नाजूक असतात आणि ते समजून न घेता तुम्ही अनुवाद केलात तर मग तो अनुवाद फसतो. सांस्कृतिक अडचणींबद्दल बोलायचे झाल्यास, मी अनुवादासाठी घेतलेली कलाकृती, अमुक एका लेखकाची म्हणून मला मराठी वाचकांना दाखवायची असेल तर त्यात मी माझी फार ढवळाढवळ कुठल्याही पद्धतीने करू नये. काही वेळेला त्यात धोके उद्भवू शकतात. उदा. मराठीमध्ये फार पुढं पुढं करणार्‍या बाईला ‘ढालगज भवानी’ म्हणायची पद्धत आहे. आता हे मी कुठल्याही कन्नड अनुवादात वापरायला गेले तर माझं चुकीचं ठरेल. याचं कारण असं आहे, मराठीमध्ये हा शब्दप्रयोग यायला इथला इतिहास कारणीभूत आहे. पेशव्यांचा, गज, हत्ती जो होता, त्याला ढाल आणि गज लावलेले असायचे आणि त्या हत्तीचं नाव भवानी होतं. ती सगळ्या सैन्याच्या पुढे असायची. आता हा जो संबंध आहे तो म्हैसूरच्या राजाच्या कुठल्यातरी हत्तीच्या संदर्भात वापरलं तर कसं वाटेल? आणि त्यात मी स्वत: ललित कलाकृतीला तळटीप द्यायच्या विरोधात आहे. पण एवढ्या मोठ्या कादंबरीमध्ये तुम्ही अर्धं वाक्य वाढवलं तर तुम्ही हा इतिहास तिथे सांगू शकता. मराठी वा कन्नडवर तुमची कमांड असेल तर हा इतिहासाचा भाग तुम्ही एक किंवा दोन शब्दांमध्ये तिथे मांडू शकता. एकदा ‘तनामनाच्या भोवर्‍यात’च्या अनुवादावेळी एके ठिकाणी असा उल्लेख होता, की त्यातल्या एका बिचा-या बाईच्या प्रियकराला अर्धांगवायूचा अटॅक आला. तेव्हा ती देवाशी संवाद करताना म्हणते, ‘हे तू काय केलंस? चिमणीवर तू ब्रम्हास्त्र टाकलंस.’ त्याचा अर्थ असा की माझ्यासारख्या दुबळ्या बाईवर तू एवढा मोठा आघात केलास. आता ‘चिमणीवर ब्रह्मास्त्र टाकणे’ हा प्रयोग मराठीत नाही पण मी असं म्हटले तरी मराठी लोकांना किंवा भारतीय लोकांना हे कळू शकते. कारण त्यांना चिमणी माहितेय, ब्रह्मास्त्र माहितेय आणि बाकी सगळ्या तपशीलातून तो शब्दप्रयोग बरोबर मराठीत पोहोचू शकतो. असं असेल तर ललित-कलाकृतींमध्ये तळटीपा न देता मी ते तसंच ठेवेन.

मात्र हाच जर भाषांतर हा प्रकार चालू असेल तर तिथे तुम्हाला तळटीप देऊन सगळे खुलासे करावे लागतात. म्हणजे वैचारिक ग्रंथ असतील तर तिथे वरवरचं नाही तर खोलात जाऊन भाषांतर असतं आणि तिथे बारकाव्यांना फार महत्त्व असतं. मात्र ललितकलाकृतींमध्ये एखादं वाक्य वाढवून माझं काम होत असेल तर मी कशाला तळटीप देऊन वाचकाचा रसभंग करू? मी वाचकाच्या बाजूची अनुवादिका आहे! त्यामुळे वाचकाचा ओघ कशाला तोडायचा?

प्रश्न : भाषेचं व्यवहारातील उपयोजनमूल्य वाढलं तर भाषा टिकेल असं गृहीत धरलं तर ती टिकण्यासाठी त्या भाषेत लेखननिर्मिती अधिक व्हावी की अनुवाद अधिक व्हावेत असं तुम्हाला वाटतं?

उत्तर : पहिल्यापासून असा दृष्टीकोन आहे की, एखाद्या भाषेत जेव्हा अनुवादित साहित्याचं महत्त्व वाढायला लागतं, याचा अर्थ असा आहे की त्या भाषेत original निर्मिती कुठेतरी कुंठीत झालेली आहे. त्या भाषेतील वाचकांना इतकं सबळ त्या भाषेत मिळत नाहीये तेव्हा ते अनुवादित साहित्यातून मिळतं. हे पाण्यासारखं आहे म्हणजे वाचक आपली तहानभूक भागविण्यासाठी वाचतात. त्यांना काय हवं ते वाचतात आणि अनुवादित साहित्यामुळे वाचक समृद्ध होत जातो.

अशा वाचकांसाठी जेव्हा लिहायचं असतं तेव्हा लेखकही समृद्ध होत जातो. किंबहुना व्हावाच लागतो. तो नाही झाला तर तो मरतो किंवा फेकला जातो. असा वाचक माझ्यासमोर आहे म्हटल्यावर त्या लेव्हलचंच लिहावं लागतं आणि तसं नाही लिहिलं तर तो फेकला जातो. त्याला त्याचाच वाचक स्वीकारत नाही. एक काळ असा होता की मराठी कादंबरी जन्मली म्हणजे 1857ला यमुनापर्यटन आली आणि कन्नडमधली पहिली कादंबरी आली 1899 साली. म्हणजे मराठी कादंबरी ही कन्नड कादंबरीची मोठी बहिण आहे पण कन्नडमध्ये यमुनापर्यटनचा अनुवाद दहा वर्षांच्या आत झालेला होता. अशा पद्धतीने मराठी कादंबर्‍यांचे खूप अनुवाद घेऊन कन्नड कादंबरी पुष्ट झाली आणि तिथे आता चांगली कादंबरी यायला लागली.

मराठीची परिस्थिती आत्ता अशी आहे की, सर्वसामान्य वाचकाला भिडेल असं साहित्य कमी निर्माण होत असेल कदाचित. म्हणून अनुवादाला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तरी हरकत नाही. याचं एक चक्र निर्माण होणार. म्हणजे आपल्या आयुष्याच्या दृष्टीने नव्हे तर साहित्याच्या दृष्टीने. पुन्हा मूळ मराठी लेखनाचा आलेख उंचावणार. हे चक्र आहे. कन्नडमध्ये एक मोठी फळी आता एकेक करत नाहीशी होत आहे. आणि त्यांची जागा घ्यायला कन्नडमध्ये दुसरे कुणी आता Immediate नाहीयेत. फार कमी लेखक आहेत. कर्नाड परवा गेले. अनंतमूर्ती गेले, शिवराम कारंथ गेले. आता तिथे फार मोजके लोक नव्या पिढीतील यायला लागले आहेत. तर आता मराठीत बघूयात. मराठीमध्ये अत्यंत शिव्या खाणारा असा जो कालखंड आहे, म्हणजे फडके, खांडेकर यांनी मराठीचं फार नुकसान केलं असं जे म्हंटलं जातं, मला माहित नाही; आता यापुढचा जो ग्राफ वर येईल तो बघूयात. हे होत राहणार. अनुवाद पाण्यासारखा आहे. म्हणजे असही होईल की इथलं साहित्य प्रबळ झाल्यास ते इतर भाषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाईल. म्हणजे थोडक्यात वाचक शहाणा आहे. त्याला हवं ते तो सगळीकडून मिळवतो, वाचतो.

प्रश्न : कानडी साहित्यातील ग्रंथांचा मराठी अनुवाद करताना मराठीत साहित्यातून कानडीत भाषांतरित व्हाव्यात अशा कोणत्या कादंबर्‍या तुम्हाला वाटतात?

उत्तर : मराठीमधल्या खूप कादंबर्‍या कन्नडमध्ये गेलेल्या आहेत. विरुपाक्ष (माझे पती) अनुवाद करतात. कादंबर्‍यापेक्षा ते वैचारिक मजकुराचा अनुवाद जास्त प्रमाणात करतात. त्यांची पंचवीसएक पुस्तके कन्नडमध्ये आहेत. चंद्रकांत पोकळे नावाचे अनुवाद आहेत. त्यांनी मराठीतील जवळजवळ शंभरएक पुस्तके कन्नडमध्ये नेली आहे. माझ्यापेक्षा जास्त त्यांनी काम केले आहे आणि त्यामध्ये स्त्री लेखिकांची सगळी पुस्तके गेलेली आहेत. श्याम मनोहर, सासणे यांच्यासारखे वगैरे जे काही अनवट लेखक आहेत ज्यांना मराठीतही कमी वाचक भेटतात; त्यांचाही अनुवाद कन्नडमध्ये झाला आहे. दलित साहित्यही त्यांनी कन्नडमध्ये नेलं आहे आणि हे आत्ताच नाही तर मराठीतून कन्नडमध्ये जायची त्यांची परंपरा फार जुनी आहे. मी याआधी सांगितलं तसं पहिल्या कादंबरीपासूनचे, यमुनापर्यटनचे अनुवादही तिथे पोहोचले आहेत.

प्रश्न : आजच्या नवप्रसारमाध्यमांच्या युगात (Twitter, Instagram, Facebook, WhatsApp) एखाद्या संहितेच्या भाषांतराची गरज कशी निश्चित करावी?

उत्तर : उदा. सध्या प्रकाशकांची मागणी असते की समकालीन कथा द्या. आता समकालीन कथा टिकणार? नाही टिकणार? ती कालातीत आहे का? हे अजूनही ठरलेले नसते पण त्यांची गरज अशी असते की आत्ता तिथे काय लिहिले जात आहे ते आम्हाला पाहिजे, त्यामुळे ते अनुवादित होतं ते टिकतंच असं नाही. ते दुसर्‍या महिन्याला रद्दीत जातं. मग त्यातीलही जे निवडक आहे किंवा टिकून रहातं त्याचे मग संग्रह होतात.

कादंबरीच्या बाबतीत असे होत नाही, आपण म्हणतो, अगदी आत्ता कन्नडमध्ये प्रकाशित झालेली कादंबरी लगेच अनुवादित करून मराठीत आणल्यावर ती किती टिकेल माहीत नाही परंतु पाचदहा वर्षांपूर्वीची कादंबरी आजही लोकांना अपील होत असेल तर मी म्हणेन की ही अनेक काही वर्षंही अपील होऊ शकते. अशा कादंबर्‍या अनुवादित व्हायला काही हरकत नाही.

आत्ताच्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या कथा ज्या येतात त्या लगेच दुसर्‍या भाषेत जाऊन मला नाही वाटत काही साधेल. त्याने फार तर एवढंच कळेल की आजचा तरुण काय विचार करतोय पण ते टिकणार नाहीच. त्या साहित्याला आयुष्य कमी आहे. एका वेळी कदाचित ते खूप जण वाचतील पण ते टिकाऊपणाच्या निकषाला पात्र होईल की नाही ही मला शंका आहे, पण जर त्यात मानवी भाव-भावनांचं काही चित्रण आलं; ज्या सनातन आहेत, ज्या आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील भावना आहेत. उदा. माणसाचं क्रौर्य आजही दिसतंय, तंत्रज्ञान नवीन आलं तरी, हे चित्रण करण्यात आजचा लेखक जर यशस्वी होत असेल तर ते टिकेल.

नाहीतर बर्‍याच कथा-कविता येतच असतात. आज दुष्काळ पडला आणि त्याचं चित्रण करणारी कथा आली- लोकं वाचतील, ‘अरेरे!’ म्हणतील, संपून जाईल. ते चित्रण करता करता अशा परिस्थितीमध्ये ‘माणूस कसा वागतो’ याचं चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला पाहिजे. उदा. अशाच एका दुष्काळात विश्वमित्र नावाच्या ऋषींनी कुत्र्याचं मांस खाल्लेलं होतं कारण उपास इतका मोठा होता. ही पुराणातील कथा जो दुष्काळाचा भीषणपणा दाखविते असं दाखविणारं आज आलं तर ते टिकणार आहे. पण तुम्ही आत्ताच छोटे छोटे प्रॉब्लेम्स घेऊन लिहिलं तर ते आत्तापुरतं चांगलं आहे कारण आत्ताच्या काळाचं ते चित्रण आहे. हे टिकत नाही. थोडक्यात सांगायचं तर आजचं सामाजिक भान हे जे प्रकरण बोकाळलेलं आहे त्यावरचं साहित्य अल्पजीवी ठरतंय. समाज बदलला की ते जुनं होतंय.

मानवी स्वभावाचे बारकावे कोरून काढून त्याचं चित्रण करणं हे आव्हान आहे. Psychology मधल्या कित्येक गोष्टी आता आपल्याला कळतात, आपण आत्ता फक्त चांगला की वाईट ते म्हणत नाही, मधली ग्रे शेड आता वाचक समजतो, हे सगळं जितक्या बारकाव्यांनी मांडता येईल, ते टिकेल.

प्रश्न : युनेस्कोने नोंदविलेल्या भाषा नष्ट होण्याच्या पार्श्वभूमीवर अनुवाद हा भाषा समृद्ध करण्याचा मार्ग होऊ शकतो का?

उत्तर : भाषा टिकण्यासाठी अनुवाद हा मार्ग नाही होऊ शकत. म्हणजे आता मी जेव्हा अनुवाद करते तेव्हा कन्नड कलाकृती आपलं कन्नडपण विसरते आणि मराठीमध्ये येते. भाषा टिकविण्यासाठी भाषा हेच शेवटी जिवंत माध्यम आहे. ते तुम्ही ‘बोलणे’ यातूनच ते टिकू शकेल. लिहिणं एकवेळ नाही झालं तरी चालेल पण तुम्ही तुमच्या घरात जर बोलत राहिलात तरच ती भाषा टिकते. संवाद होणं महत्त्वाचं. त्यामुळे भाषा टिकवायची असेल तर ते जे विशिष्ट ग्रुप्स असतात, विशिष्ट भाषा बोलणारे, त्यांना तुम्ही डिस्टर्ब करू नका. त्यांना त्यांची भाषा वापरू द्या. त्यांची पुढची पिढी ती भाषा आपसूक वापरेल. उदा. महाराष्ट्रात राहणार्‍यांना मराठी शिकू द्यावी. काही समाज हे सांभाळून असतात. जसं की जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तमिळ माणूस आपल्या कुटुंबात तमिळच बोलणार. अर्थात याचाही अट्टहास धरून चालत नाही. तुम्ही ज्या परिस्थितीत जाऊन पोहोचता,त्यात तुम्हाला जुळवून घ्यावंच लागतं. Survival of the fittest सारखं भाषेचही आहेच.

प्रश्न : पूर्वीचे अनुवाद ‘साहित्यिक गरजेतून केले गेले’ असे गृहीत धरले तर आता मात्र अनुवाद ही बदलत्या काळाची गरज बनली आहे. मात्र सकस अनुवादाला चालना मिळण्यासाठी काय उपक्रम राबविता येतील असं तुम्हाला वाटतं?

उत्तर : या सगळ्यापेक्षा अनुवाद करून पोट भरू शकतं किंवा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकणं महत्त्वाचं. जसं की जाहिरातीचे अनुवाद करून अगदी शब्दागणिक पैसे मिळविता येतात आणि आता फार मोठं क्षेत्र यासाठी आहे. टी. व्ही. सीरिअल्स, सिनेमा या लोकांना एका वेळेला ते सगळं अनेक भाषांमध्ये न्यायचं असतं आणि तिथं पैसा मुबलक आहे. तर अनुवादकाला आधी जगायला पाहिजे त्यासाठी त्याने हे करावं. उदा. पेंटिंगमध्ये आपण जसं म्हणतो, की realistic किंवा figurative पेंटिंग हे लोकांना समजतं आणि कदाचित त्याचे वेगवेगळे उपयोग केले जाऊ शकतात. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग लोकांनाच कळत नाही. मग हे कलाकार काय करतात? कारण त्यांना स्वत:मधला कलाकारपण जिवंत ठेवायचाय. पूर्वीच्या काळी अशी लोकं उपाशी मरायची. त्यामुळे अनुवादकाने हे पथ्यही सांभाळलं पाहिजे. थोडं काम अशा पद्धतीचं करायचं जे पैसा मिळवून देईल आणि नंतर आपल्या मनासारखी एखादी कलाकृती मस्त अनुवादाला घ्यायची. तर त्याचं आयुष्य चांगलं जाईल. नाहीतर मग मनासारखं काही करायला मिळालं नाही, तडजोड करत आयुष्यभर जगावं लागलं ही खंत राहते.

मला अनुवादाची कामं मिळत गेली. सिनेमाचेही अनुवाद केले. लोकं माझ्याकडे राईट्स घेऊन येतात. ‘या सिनेमात काय आहे सगळं आम्हाला लिहून द्या.’ त्याचे आम्ही भरपूर पैसे देतो. छान आहे. सकाळी उठून सिनेमा बघत बसायला कुणाला नाही आवडणार? अशी काम असतात. उदा. एका वेळेला ई टीव्हीला एक सीरिअल तिथे गाजली की त्यांना ती मराठीत करायची असते. अशी कामं असतात. नसता इगो वर न आणता, आपण अनुवादक आहोत आणि आपल्या समोर येईल त्याचा अनुवाद आपल्याला करायचा असं एक स्वत: समजून घेतलं तर तुम्ही full time translator म्हणूनसुद्धा काम करू शकता. क्रिएटिव्ह कामावर पूर्ण विसंबून राहायचं नाही कारण क्रिएटिव्ह कामात पैसा तुम्हाला फारसा मिळत नाही.

प्रश्न : तुमच्या लोकसत्तामधील ‘बहुआयामी प्रतिभावंत’ या कर्नाडांविषयीच्या लेखात तुम्ही उल्लेख केला आहे की, कर्नाडांविषयी जो एक टीकेचा सूर होता- ‘यांनी ना नवं कथानक निर्माण केलं ना नवी पात्रं, रेडीमेड सामान वापरून जुन्या कथानकांना आणि पात्रांना नवे रंग दिले.’ याच प्रकारे अनुवादकालापण अशा टीकांना सामोरं जावं लागतंच. बर्‍याचदा अनुवादकांचे नावही मुखपृष्ठावर छापण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर ‘अनुवाद हे सर्जनकार्य आहे’ असे म्हणता येईल का?

उत्तर : मला वाटतं अनुवादात क्रिएटिव्हीटी आहे. ओरीजनल लेखनातल्या क्रिएटिव्हीटीपेक्षा ही वेगळी आहे. मूळ लेखकाला किंवा समीक्षकाला अनुवाद जमेलच असं नाही. अनुवादक हा वेगळा अनुवादकच असतो. त्याला त्याच प्रकारची प्रतिभा लागते. यात क्रिएटिव्हीटी कुठे असते? तर मी असं मानते, क्रिएटिव्हीटी दोन पातळ्यांवर घडते. एक, त्याला सुचतं त्या पातळीवर आणि एक तो कागदावर लिहून काढतो त्या पातळीवर. हे कवितेच्या, चित्रकलेच्या, शिल्पकलेच्याबाबतीत सारखंच आहे.

उमा कुलकर्णी

दगडात मूर्ती दिसली आणि दगडातून मूर्ती कोरून काढली या दोन क्रिया वेगळ्या आहेत. बर्‍याच वेळेला लेखक किंवा क्रिएटिव्ह माणूससुद्धा असमाधानी असतो. ‘माझ्या डोळ्यासमोर जसं होतं तसं मला हे जमलं नाही’ हे तो म्हणतो. याचाच अर्थ त्याची क्रिएटिव्हीटीदेखील दोन पातळ्यांवर काम करत असते. उलटही होऊ शकतं की ‘मला वाटलेलं त्यापेक्षा हे फारच छान जमलं’ असंही सर्जनशील कलाकार म्हणू शकतो. याचा अर्थ आपण इतकाच घ्यायचा की या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या बाबतीत त्याला जे सुचलं ते त्याचं श्रेय आहे म्हणूनच अनुवादित कलाकृतीवरही आपण मूळ लेखकाचं नाव देतोच.

पण त्याचा दुसरा टप्पा म्हणजे, उदा. कर्नाडांना कन्नडमध्ये सुचलं. त्यांनी स्वत: कन्नडमध्ये नाटक लिहिलं स्वत: कर्नाडच त्या सगळ्यांचा इंग्लिश अनुवाद करायचे. आता इंग्रजीत अनुवाद करताना त्यांच्यातला अनुवादक जागा होता. स्वत: तेच अनुवादक असल्याने ते फ्रीडम वगैरे किती घ्यायचं हे त्यांचं त्यांना माहित होतं. माझ्या दृष्टीनं, अनुवादक म्हणून माझ्यासमोर जी कलाकृती आली, त्याच्या सादरीकरणाच्या बाबतीत मी माझी भाषा, माझं कौशल्य वापरलं.

वाचक म्हणतो, ‘मला हा अनुवाद आवडला; हा नाही आवडला’, त्याला कसा हा फरक कळतो? त्याला तर त्या भाषेतलं काहीच माहित नाही. तरीपण तो जे विधान करतो त्याअर्थी त्याच्यापर्यंत काहीतरी पोहोचलेलं आहे. मला feedback काही जणांकडून असेही येतात की तुमचा अनुवाद वाचताना आम्ही क्रिएटिव्ह काहीतरी वाचतोय असं वाटतं तर हे त्याला ‘वाटणं’ जे आहे तिथे ती क्रिएटिव्हीटी आहे.

कर्नाडांचा विषय निघाला म्हणून मी सांगते. कर्नाडांचं ‘तुघलक’ तेंडुलकरांनी मराठीत अनुवादित केलं. ‘हयवदन’ चि. त्र्यं. खानोलकरांनी अनुवादित केलं, ‘ययाति’ श्री.रं. भिडे नावाच्या गृहस्थांनी केलं. अलीकडच्या काळात जेव्हा परत याचे नवीन अनुवाद आले त्यावेळेला कर्नाडांनी भिडेंचा आणि चि. त्र्यं. खानोलकर यांचा अनुवाद डिस्कार्ड केलेला आहे. ते परत करून घेतले. ययातीचं काम माझ्याकडे आलं. चि. त्र्यं. खानोलकर हा मराठीतला खूप मोठा प्रतिभावान लेखक आहे. पण कर्नाड म्हणाले, ‘याचा आपल्याला दुसरा अनुवाद करायचा आहे.’ यात काहीच क्रिएटिव्हीटीचा भाग नसेल तर हे का व्हावं? किंवा मग कॉम्प्युटर का मदत करत नाही या सगळ्यासाठी? मग आमचं कामच राहणार नाही. पण ते तसं होत नाही. याचा अर्थच असा आहे की तिथे काहीतरी वेगळा Element येतो.

प्रश्न : सध्या पाहिल्यास बर्‍याच प्रमाणात रोचक, थ्रिलर किंवा उपयुक्ततावादी पुस्तकांचा अनुवाद मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. तुलनेने भारतीय आणि जागतिक भाषांमधील अभिजात साहित्याचे अनुवाद कमी प्रमाणात होताना दिसतात. हे मत तुम्हाला पटतं का?

उत्तर : हे नेहमीचंच आहे. हे आत्ताचं आहे असं नाही. पूर्वीसुद्धा पॉप्युलर लिटरेचर सगळे वाचत होते. त्यावेळेलाही गंभीर लिहिणारे असतील तरी सुरुवातीला त्यांच्यापर्यंत लोकं पोहोचतच नाहीत. Informative पुस्तके सध्या जास्त येतात. ललितकलाकृती असून त्या पॉप्युलर आहेत असंही नाहीये. सध्या कुणातरी सक्सेसफुल माणसाचं आत्मचरित्र येतंय. लोकांना त्याची उपयुक्तता वाटायला लागलीये. जे खूप मोठ्या प्रमाणात translations येत आहेत तर त्याच्यामध्ये संख्यात्मकरित्या बघितलं तर या प्रकारची पुस्तकं जास्त वाचली जातात. म्हणजे एखाद्या भाषेतील पॉप्युलर कादंबरी आहे ती या भाषेत येऊन पॉप्युलर झाली अशीही उदाहरणे आहेतच. पॅपिलॉनचंच उदाहरण आहे. आणखीही बरीच उदाहरणे आहेत. विक्री विचारायला गेलात तर उपयुक्ततावादी पुस्तकांची अधिक संख्येने आहे. उदा. श्रीमंत व्हायचे किंवा यशस्वी व्हायचे दहा टप्पे. यात फक्त लेखक तेवढाच श्रीमंत झालेला दिसतो(!) अशी किंवा आरोग्यविषयक पुस्तकं आपल्याकडे लगेच translate होऊन येतात. कॅन्सर किंवा डायबेटीस हे तर सध्या पॉप्युलर आजार झाल्याने यावरचं भाषांतरित झालेलं भरपूर खपतं.

थोडक्यात प्रत्येक काळी गंभीर लेखनाचा वाचकवर्ग कमी असतो हे आपण मान्यच करायला पाहिजे. मी अनुवादाच्या प्रक्रियेतला सहा महिने आनंद घेतलेला आहे तर माझं पुस्तकंही करोडोंमध्ये विकलं जावं ही अपेक्षाच नाही करायची. मला जो आनंद मिळाला तेवढा मात्र खरा हे मान्य करता यायला पाहिजे.

प्रश्न : ‘संवादु अनुवादु’ जर कानडीमध्ये भाषांतरित होऊन जायचं असेल तर कानडी लेखकांपैकी कुणी ते भाषांतरित करावं अशी तुमची इच्छा आहे?

उत्तर : आत्ता ते काम सुरू आहे आणि माझे पती विरुपाक्ष ते करतायेत. आपण इथे बोलत असताना पलीकडच्या खोलीत ते काम सुरू आहे.

प्रश्न : एखाद्या नवख्या अनुवादकाला अनुवादात पारंगत होण्यासाठी काय होमवर्क द्याल?

उत्तर : मी होमवर्क देईन की आधी तुला ज्या भाषेत लिहायचं आहे त्या भाषेवर हुकुमत निर्माण कर. जेणेकरून ती भाषा लवचिकपणे वापरता येईल. ज्या भाषेतून तुम्हाला भाषांतरित करायचं आहे ती यायला पाहिजे. तिथल्या अडचणी सोडवायला तुम्हाला माणसं भेटतात. मी तर त्या लेखकाचीपण मदत घेते. डिक्शनर्‍या चांगल्या असू शकतात. तुम्हाला त्या भाषेतील माणसे भेटू शकतात; ती मदत करू शकतात. हे सगळं झालं तरी मांडायचं तुम्हाला असतं त्यामुळे तुम्हाला ती भाषा लवचिकतेने वापरता येणं हा पहिला निकष आहे. आणखीन तुम्हाला मांडी ठोकून तासन् तास लिहायची चिकाटी पाहिजे.

मुलाखतकार – प्रा. पूजा देवीदास गिरी

असिस्टंट प्रोफेसर, मराठी विभाग

HPT Arts and RYK Science College, Nashik

अक्षर मैफलच्या युट्युब चॅनेलवर या मुलाखतीचा पूर्ण व्हिडीओ उपलब्ध आहे.

अक्षर मैफलचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा