उदारमतवादाचा हलका डोस – फ्रेंड्स

FRIENDS

दोन मुलं आणि दोन मुली एका कॉफी हाउसमध्ये बसलेले असतात. आणि काही संध्याकाळच्या शिळोप्याच्या गप्पा मारत असतात. आपण त्यातल्या कोणालाही ओळखत नसतो पण, त्यांच्या गप्पा ऐकून आपल्याला असं वाटतं की, “अरे अशा गप्पा तर आम्हीपण रोज संध्याकाळी मित्रांबरोबर बसल्यावर मारतो.” आणि एखादी कादंबरी असावी जी पहिल्या वाक्याला आपल्याला गोष्टीमध्ये गुंतवून टाकते. ते पाहिलं वाक्य असं असतं की आपला गोष्टीशी काहीही संबंध नाही, असं वाटतंच नाही. आपलं आणि त्या गोष्टीचं पूर्वीपासून नातं आहे असं ते वाक्य असतं. ते आपल्याला गोष्टीमध्ये सामावून घेतं. जुन्या इंग्लिश साहित्याचं हे वैशिष्ट्य होतं की, मोठ्या गोष्टीची सुरवातच अशा वाक्याने करायची की पहिल्या वाक्यापासून आपण गोष्टीच्या प्रवाहाच्याबरोबर चालू शकतो. चार्ल्स डिकन्सच्या ‘टेल ऑफ टू सिटीज’ या कादंबरीची सुरवात अशीच अफलातून आहे. फाउंटनहेड या आयन रँडच्या जगप्रसिद्ध कादंबरीची सुरवातही अशीच आहे, तीच गोष्ट दस्तयोवक्सीच्या क्राइम अँड पनिशमेंटची आहे, जेन ऑस्टिनच्या प्राईड अँड प्रेजूडाइसची आहे. आणि जगभरातून 52 दशलक्ष लोकांनी पाहिलेल्या ‘फ्रेंड्स’ या मालिकेची सुरवात सुद्धा अशीच आहे.

मोनिकाच्या तोंडातलं पाहिलं वाक्य आहे की, there is nothing to tell. Just two people going out for a dinner and not having sex.. इतक्या दोन सामान्य वाक्यांनी या असामान्य मालिकेची सुरवात होते. वेगवेगळ्या क्षेत्रातली 3 मुलं आणि 3 मुली या मित्रांची ही गोष्ट आहे; अमेरिकेतल्या मॅनहॅटन या शहरात घडणारी. पण मैत्री, प्रेम, जिव्हाळा, मित्रामित्रांत असणारा बालिशपणा, अवखळपणा, खोडकरपणा, रुसवे-फुगवे हे सगळं यात आहे. ही सामान्य माणसाची गोष्ट असल्यामुळे यात मानवी स्वभावाचे सगळे गुण चित्रात झालेले आहेत. यात मानवी नात्याचे सगळे प्रकार आलेले आहेत. आपल्याकडे वर्षानुवर्षे मालिका चालतात, तेचतेच कौटुंबिक संघर्ष, कटकारस्थानं, सासवा-सुनांचे मतभेद, भांडणं या सगळ्यातून जेव्हा ‘फ्रेंड्स’सारखा पर्याय आपल्याला सापडतो, तेव्हा एक वेगळं विश्व सापडल्याचा आनंद होतो. मोनिका, रेचल, फिबी, रॉस, जोई आणि चँडलर असे सहा जणं मिळून आपलं आयुष्य समृद्ध करतात. त्यांच्याबरोबर आपण पण आपल्या आयुष्यात हरवलेला आनंद पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करतो.

आधुनिक जगाच्या पाठीवर लोक एकत्र येऊन राष्ट्र निर्माण करण्याची पहिली घटना म्हणजे अमेरिका. जगात ती गोष्टी जितकी मोलाची होती, तितकीच मोलाची दुसरी गोष्ट अमेरिकन लोकांनी साधली, ती म्हणजे कोणत्याही संकोच, संकुचितता, अवघडलेपणा यांना न जुमानता, ‘सुखाचा शोध’ हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी त्यांनी देशाच्या निर्मितीच्या पंचपंच उषःकाली भूमिका घेतली. सुख आणि समाधान हे जीवनाचं एक धेय्य म्हणून भारतीय संस्कृतीने मानलं, परंतु, मधल्या दीर्घ गुलामगिरीच्या काळात आपलं जे अनेक क्षेत्रांत पतन झालं त्यात आपण सुखाचा, समाधानाचा शोध घेण्याचं विसरून गेलो. फ्रेंड्सचा ओपनिंग सीन आपल्याला सांगतो की, मोनिका कोणातरी मुलाबरोबर डेटवर जाणार आहे, म्हणजे एखाद्या संध्याकाळी जेवायला जाणार आहे, पण सेक्स करणार नाही. त्याच्यावर चँडलर म्हणतो की, ‘माझ्या बहुतेक डेट्स या अशाच असतात.’ ज्या भारतीय मुलाला सेक्स हा शब्द चारचौघात इतका मोकळेपणाने ऐकण्यची सवय नसते, अशा लोकांना हा सांस्कृतिक धक्का असतो, की सिरीयलच्या ओपनिंग सीनलाच सेक्सचा इतका मोकळेपणाने केलेला उल्लेख आणि ‘जेवणा’इतकंच त्याचं इतरांना असलेलं सरावलेपण, त्याने आपण गोष्टीमध्ये सहजपणे गुंतुन जातो.

1994 ते 2004 असे दहा वर्ष ही मालिका सुरू होती. पण महिन्यातून केवळ 2 एपिसोड या दराने एका सिझनमध्ये केवळ 24 एपिसोड या मालिकेचे आहेत. पण अमेरिकी आयुष्यातला मोकळेपणा आणि त्याचं चित्रण आपल्यासारख्या कर्मठ, संकुचित मनाला हसण्याचे दोन क्षण देतात. ही सहा पात्र वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत. चँडलर नेमका काय करतो, हे नंतर त्याच्याशी प्रत्यक्ष लग्न केलेल्या मोनिकाला शेवटपर्यंत कळत नाही. रॉस डायनासोर्सचा अभ्यास करतो, इतकंच आपल्याल माहिती असतं. जोई हा अभिनेता असतो. रेचल सुरवातीचा काही काळ त्यांच्या रोजच्या ‘सेन्ट्रल पार्क’मध्ये वेट्रेस म्हणून काम करते, नंतर एका फॅशन कंपनीमध्ये नोकरीला लागते. फिबीसुद्धा चँडलरप्रमाणे नेमकं काय करते हे माहिती नाही, ती काही काळ ‘मसूस’ असते, गिटार वाजवत असते, मोनिकाबरोबर तिचा केटरिंगचा धंदा सांभाळते. मोनिकाला शेफ व्हायचं असतं. मालिकेमध्ये शेवटीशेवटी ती एका चांगल्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून रुजू होते. यातले तिघे जण व्यवस्थित शिकून नोकरीला लागलेले असतात. दिवसभर काम करून संध्याकाळी गप्पा मारायला भेटत असतात. फिबी, रेचल आणि जोई हे कायम स्ट्रगलर. पण त्यांच्यात कधी पैशावरून, हिशोबावरून भांडणं होत नाहीत. सगळ्यांचे स्वभाव मुलखावेगळे असतात, पण त्यामुळे त्यांच्यात कधी वितुष्ट आलं आहे, असं होत नाही.

opening frame

पहिला एपिसोड, मालिका सुरू झाल्याच्या दुसर्‍या मिनिटाला टिपिकल ‘रॉस’टाईप चेहेरा घेऊन रॉस सेन्ट्रल पार्कमध्ये येतो आणि आपल्याला सांगतो, “आज माझ्या बायकोने तिचं सामान हालवलं आणि ती मला सोडून कायमची निघून गेली.” ती निघून का गेली असेल, याचा आपण विचार सुरू करतो तोपर्यंत जोई विचारतो, “तुला हे कधीही कसं कळलं नसेल की, ती लेस्बियन होती?” कल्पना करू शकता, 1994 सालच्या अमेरिकेत शहरातल्या रहदारीच्या ठिकाणी असलेल्या कॉफी हाउसमध्ये एक मित्र येऊन सांगू शकतो की आज बायको मला सोडून निघून गेली आणि त्याचं कारण दुसरा मित्र सांगू शकतो की ती ‘लेस्बियन’ होती. हा प्रसंग प्रथम टीव्हीवर दिसला असेल त्याच्या आपण आज 26 वर्ष पुढे आलो आहोत. अजूनही रूढार्थाने सामान्यापेक्षा वेगळ्या लैंगिक जाणीवेबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो का? आतापर्यंत अज्ञात असलेलं एक विश्व आपल्यासमोर एकदम उघडतं. आणि आपल्या नकळत आपण त्या विश्वात विहार करायला लागतो. या प्रकारचे उघड उल्लेख बघणार्‍या आपल्यासारख्या भारतीय प्रेक्षकांच्या मनातही अवघडलेपणा निर्माण करत नाहीत, इतक्या सहजतेने यांचे उल्लेख होतात.

कारण अमेरिकन समाजाची मूळची प्रेरणा स्वातंत्र्याची आहे. नाहीतर जे लोक युरोपातून जाऊन अमेरिकेत राहिले त्यांनी आपल्याच राज्याकडून स्वातंत्र्य मागण्याचं कारण काय होतं? लोकं मुळात व्यक्तीस्वातंत्र्याला इतर कशाहीपेक्षा जास्त किंमत देणारी आहेत. त्यामुळे जगात इतर कुठेही झाली नाही, अशी लैंगिक क्रांती अमेरिकेत होऊ शकली. स्वतंत्र, लिबरल भावनांचा अविष्कार म्हणजे अमेरिका आणि या सगळ्याचे संदर्भ आपल्याला ‘फ्रेंड्स’मध्ये दिसतात. रोज वेगळ्या मुलाबरोबर डेटवर जाऊ शकण्याची मानसिक तयारी असणार्‍या मोनिका, फिबी, रेचल याही फ्रेंड्समध्ये आहेत. रोज वेगळ्या मुलीबरोबर डेटवर जाण्याची इच्छा असणारा जोईही ‘फ्रेंड्स’मध्ये आहे. आणि आयुष्यात एका मुलीवर सर्वस्व अर्पण करून 7 वर्ष प्रेम केलेला रॉसही फ्रेंड्समध्ये आहे. ज्याचं पाहिलं इंप्रेशन ‘गे’ असं होतं असा चँडलरही ‘फ्रेंड्स’मध्येच आहे.

आपल्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेल्या रिचर्डबरोबर मोनिका सहजपणे राहू शकते, लग्न करायचं स्वप्न पाहू शकते, आणि तिला मुलं हवी आहेत, पण त्याला रिचर्ड तयार नाही, या कारणासाठी ती रिचर्डला सोडूही शकते. मोनिकाच्या आयुष्यात ज्यावेळी रिचर्ड प्रकरण सुरू असतं, तेव्हा मोनिका ही आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून उभी राहू शकलेली नाही. लहानमोठी कामं ती करत असेल, पण ज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र म्हणतात, अशी मोनिका नाही. तरीसुद्धा माझ्या पार्टनरला मुलं नको आहेत, आणि मला हवी आहेत या कारणासाठी मोनिका त्याची साथ सोडते. आपल्या भावाला मदत म्हणून त्याची मुलं आपल्या पोटात वाढवणारी फिबी इथे आहे. आपल्या भावाला त्याच्या बायकोपासून मुलं होऊ शकत नाहीत, पण मुलं असण्याने कुटुंबाला अर्थ मिळणार आहे, याची जाणीव तिला असल्यामुळे 9 महिने भावाची मुलं ती आपल्या पोटात वाढवते. त्यांच्या जन्मानंतर ती मुलं भावाला देते. रॉस आणि रेचल यांची गोष्ट तर दहा सिझनमध्ये हळूहळू उलगडत जाते, पण जेव्हा प्रत्यक्ष रेचलला मुलगी होते, तेव्हा तिचं कोणाशीही लग्न झालं नसतं. तरीही ती स्वतःच्या बळावर ती मुलगी वाढवण्याचं बोलून दाखवते. शेवटपर्यंत ती कोणाशीही लग्न करत नाही.

डेटिंग आणि नवीन पर्याय शोधणे हा अमेरिकन जीवनाचा भाग असल्याचं आपल्या लक्षात येईल. आपण कोणा व्यक्तीबरोबर जास्त आनंदानी वेळ घालवू शकतो, कोणाबरोबर जेवायला जाऊ शकतो, कोण आपल्याला जास्त सुटेबल आहे याचा शोध सतत घेत राहण्याची वृत्ती ही अमेरिकन जीवनाचं वैशिष्ट्य आहे. जोई रोज वेगळ्या मुलीबरोबर रात्र काढतो, याचं आपल्या भारतीय मनाला खूप अप्रूप वाटतं. पण जोई करतो ते अयोग्य आहे असं मात्र आपल्याला वाटत नाही. कारण आपल्याला हे माहिती असतं की, जोई मुळात स्वभावाने नीच नाही. मनाने निर्मळ आहे. त्याचा बालिशपणा, निरागसपणा यामुळे जोईबद्दल एक आपुलकी आपल्या मनात नकळत निर्माण होते. रेचल गर्भवती असते तेव्हा ती जोईबरोबर रहात असते. तिथे जोईच्या अशा कलंदर वृत्तीचा तिला त्रास होत नाही. उलट तिला प्रेग्नंट असण्याचा कंटाळा आला आहे हे लक्षात येऊन जोई तिला डेटवर घेऊन जातो. तिची एक संध्याकाळ तो आपल्या उपस्थितीने आनंदी करून टाकतो. नकळत तिच्या प्रेमात पडतो. पण या सहा जणांमध्ये जोई सर्वात बाईलवेडा म्हणता येईल, पण आपल्याकडे बाईलवेडा हे ‘व्हॅल्यु जजमेंट’ ठरतं, तिकडे ती माणसाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे हे मान्य करण्याची वृत्ती आहे. ‘बाईलवेडा’ हे कोणाबद्दल योग्य अयोग्य, नैतिक, अनैतिक असं विधान करणारं वर्णन नाही. रेचलवर ज्याने आयुष्यभर प्रेम केलं असा रॉस चुकतो. त्याचं रेचलबरोबर भांडण होतं. आणि अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये तो चूक करून बसतो. त्यांच्यात वितुष्ट येतं. पण तरी ते मालिकाभर एकत्र राहू शकतात. कालांतराने एका आपत्याचे आई-वडील म्हणूनही राहू शकतात.

फ्रेंड्सची मी आता अनेकदा पारायणं केली आहेत. पण दरवेळी बघताना मला आपला भारत आठवतो. आपल्याकडे लग्न हा संस्कार मानल्यामुळे आणि लग्न केलं म्हणजे आयुष्यभराचं नातं तयार झाल्यामुळे पुढे आयुष्यभर कितीही कष्ट पडले तरी, ते निभावण्याची एक जबाबदारी भारतीय समाजाने लोकांवर टाकली आहे. एखाद्या माणसाचा घटस्फोट होणं हे आपल्याकडे अत्यंत दुर्दैवी मानतात. पण ‘फ्रेंड्स’मध्ये तीन वेळेला घटस्फोट घेणारा रॉस उजळ माथ्याने नवीन डेटवर जाण्यासाठी मुलगी शोधू शकतो, तिच्याबरोबर डेटवर जाऊ शकतो. त्याच्या घटस्फोटाची सगळे टिंगल करतात, त्यात खेळकरपणे तोही सहभागी होतो. शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यात त्यांनी भारतीय समाजाचं वर्णन केलं आहे, ते म्हणतात “अमेरिकन लोकं चंद्रापर्यंत पोहोचली, पण दिवसाचा ठराविक वेळ ते स्वतःसाठी देतात. सतत गंभीर, इस्त्री केलेला चेहेरा घेऊन ते वावरत नाहीत. आपल्याकडे माणसं धड विनोदीही नाहीत आणि धड गंभीरही नाहीत. म्हणजे आपलं गांभीर्य हाच विनोद आहे. वगैरे.” पण एखाद्याचा घटस्फोट हा आपल्याकडे इतक्या विनोदाचा विषय होऊ शकतो का? यात कोणीही कोणाला दुखावत नाही. ज्याचं दुःख आहे, त्यात सगळे एकत्र येऊन ते दुःख कमी करण्याचा प्रयत्नही करतात.

कुटुंब व्यवस्थेलाही अमेरिकेत किंमत आहे, हे आपल्याला मोनिका आणि चँडलर यांच्या नात्यावरून आपल्या लक्षात येतं. पूर्वी आपत्य व्हावं म्हणून आणि आपत्याच्या आग्रहासाठी रिचर्डशी संबंध संपवणार्‍या मोनिकाला स्वतःचं आपत्य होऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर ते एका बाळाला दत्तक घ्यायचा विचार करतात. इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ‘फ्रेंड्स’ या मालिकेमध्ये मुख्य पात्र असणार्‍या तिन्हीही मुलींनी अपारंपरिक पद्धतीने मुलं जन्माला घातली आहेत. फिबी मुलांना जन्म देते पण ते स्वतःसाठी नाही. रेचल मुलीला जन्म देते तेव्हा तिचं लग्न झालेलं नसतं, आणि मोनिका जन्म देऊ शकत नाही म्हणून ती जुळी मुलं दत्तक घेते.

आम्हाला इकडे स्त्री-पुरुष संबंध निरोगी असावेत यावर नैतिक धडे शिकवावे लागतात, पण तिथे ज्या मोकळेपणाने जोई रेचलचा ब्राचा हूक काढू शकतो, मोनिकाच्या ब्रेस्ट्सकडे पाहू शकतो आणि या कशाचंही रेचल, मोनिकाला अतिक्रमण वाटत नाही. आणि हे एकतर्फी नाहीच. मोनिका पुरुषाच्या अवयवाबद्दल उघडपणे बोलू शकते. हे फक्त लैंगिक बाबींपुरतं मर्यादित आहे, असं चुकूनही समजू नका. समजातील मोकळेपणाचं ते एक सर्वोच्च निदर्शक आहे. समाज जर उघडपणे आणि मोकळेपणाने लैंगिक बाबींवर बोलू शकत असेल, तर तो कोणत्याही गोष्टींवर बोलू शकतो. फिबी मोनिकाला सोडून वेगळ्या ठिकाणी राहिला जाते. मोनिका त्या संध्याकाळी एकटी असते. निराश असते. तेव्हा ‘आमच्याकडची बियर संपली तुझ्याकडची घेऊन जातो’ म्हणून बियर न्यायला येणारा चँडलर उदास मोनिकाला पाहतो. तिची समजूत काढतो. त्यावळी मोनिका अंघोळकरून बाहेर पडत असते. केवळ टॉवेल परिधान करून असणारी मोनिका चँडलरला मिठी मारते, तिची निराशा त्याने थोडी कमी होते, चँडलर तिला समजावतो. पण एक मुलगा एका मुलीला तिच्या अंगावर केवळ टॉवेल असताना निर्मळपणे मिठी मारू शकतो. यात तिला कोणत्याही प्रकारचं अवघडलेपण येत नाही. हा समाज किती मनमोकळा असेल विचार करा. भारतामध्ये एकमेकांवर प्रेम करणारे आणि एकमेकांशी लग्न करू इच्छिणारे मुलगा मुलगी चारचौघात एकमेकांशी मोकळेपणाने बोलूही शकत नाहीत, आणि फ्रेंड्समधून दिसणार्‍या अमेरिकेत मात्र एक मित्र आपल्या थोड्याशा उदास मैत्रिणीला जाऊन मिठी मारू शकतो, तिचं चित्त प्रसन्न करू शकतो. स्त्री पुरुष संबंध मनमोकळे असावेत, याने माणसाचं आयुष्य अजून आनंदी होणार आहे, सुंदर होणार आहे, हे सुद्धा आपण विसरलो आहोत. आपण त्यात खूप कृत्रिमता आणली आहे, आणि गरज नसताना त्या संबंधांचं गणित गुंतागुंतीचं केलं आहे.

बालपण अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये गेल्यामुळे सगळ्या लहान मुलांच्या आयुष्यात असते तशी पहिली सायकल फिबीला मिळाली नाही. ही गोष्ट जेव्हा ती सांगते तेव्हा सगळे हलून जातात. आणि लहानपणी सगळ्यांना अशी पहिली सायकल मिळाली पाहिजे, असे सगळेच म्हणतात. पण रॉसला ते सहन होत नाही, तो तिच्यासाठी तिच्या लहानपणीच्या स्वप्नात जशी सायकल असते, तशी घेऊन येतो. तिला गिफ्ट देतो. केवळ मित्र-मैत्रीण असलेले जॉई आणि फिबी. पण फिबी जेव्हा म्हणते की मी अजून ‘परफेक्ट कीस’ केलेलं नाही, तेव्हा अत्यंत निर्मळपणे जोई उठतो, तिला कीस करतो. आणि असे कितीतरी प्रसंग आहेत, जे पाहताना आपल्याला असं वाटतं की, ‘अरे असं आपण का राहू शकत नाही. मोकळेपणाने, समवयस्क मित्र-मैत्रिणींबरोबर आपण एकत्र का राहू शकत नाही.’ आपण आपली मानसिकता अधिक मोकळी, स्वतंत्र करण्याच्या ऐवजी अधिक संकुचित, अधिक बंद केली का?

10 सिझनच्या 232 भागांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत, जे पाहून आपण हरखून जातो. आपण त्या विश्वात हरवून जातो. अनेक प्रसंग असेही आहेत, ज्याच्यावर स्वतंत्र लेख लिहिता येईल. आणि केवळ फ्रेंड्स या मालिकेवर एक पुस्तक लिहिता येईल. पण ही मालिका जगात इतक्या लोकांनी इतक्या वेळा पाहिलेली आहे, की त्याच्यावर आपण पुन्हा नवीन काही लिहावं असं फार कमी शिल्लक असेल. अजूनही नेटफ्लिक्ससारख्या माध्यमाला माहिती आहे की, फ्रेंड्स पाहणारी लोकं आहेत. त्यामुळे 2004 साली संपलेली मालिका अजूनही पाहिली जाते, ती आपण आपल्याकडे घ्यावी. पण माझ्यादृष्टीने फ्रेंड्स हे एक विश्व आहे. आपण आपल्या आयुष्यातल्या काही समस्या, दुःख यांच्यामुळे हतबल झालेलो असलो, की फ्रेंड्सचा एखादा एपिसोड काढावा, बघावा. आणि प्रसन्न मनानं आपल्या विश्वात परत यावं.

जेव्हा भानावर येतो तेव्हा लक्षात येतं की, यातून बाहेर पडून आपण पुन्हा आपल्या विश्वात जाणार आहोत, जिथे रोज एकदी स्त्री जाळून मारली जाते, रोज एखादा हुंडाबळी जातो, रोज सासरी होणार्‍या छळाला कंटाळून एकदी नवविवाहित स्त्री आत्महत्या करते, रोज एखाद्या मुलीवर बलात्कार होतो. तिकडे बलात्कार होत नसतील असं माझं म्हणणं नाही. पण तो समाज अधिक उदार मनस्क आहे मान्य केलंच पाहिजे. आणि माझं ठाम म्हणणं आहे, की आपली संस्कृती न सोडता, त्यातलं जे चांगलं आहे ते अर्थात घेऊनच पण स्त्री-पुरुष संबंध अजून सोपे, मोकळे आनंदी थोडक्यात म्हणजे फ्रेंड्स मध्ये आहेत तसे करता येणार नाहीत का? फ्रेंड्स ही माझ्यासाठी तरी केवळ एक टीव्हीवरची मालिका नव्हती, तर तिकडे हे चांगलं आहे आणि आपल्याकडे ते नाही, हे सांगणारी गोष्ट होती. पूर्ण मालिकेची कित्येक वेळा पारायणं करून झाली. अनेक प्रसंग, संवाद पाठ झाले. तरी मूड फ्रेश करण्यासाठी पुलंप्रमाणेच फ्रेंड्सचा एक पर्याय मला मिळाला आहे. आणि माझं वैयक्तिक आयुष्य अधिक आनंदी करण्यासाठीचे अनेक धडेही मला त्यात मिळाले आहेत.

© अक्षर मैफल