मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)

Europe after Refugee Crisis

मी युरोपमध्ये आलो तेव्हापासून ठरवलं होतं की युरोपवरच्या माझ्या अनुभवांवर शक्यतो लिहिणार नाही. युरोपवरती अगणित प्रवासवर्णनं लिहून झाली आहेत हे पहिलं कारण, आणि युरोपमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मी दोन वर्षात भारतात परत जाणार हे मनात ठरवलेलं हे दुसरं. पण त्या दोनाची चार वर्ष झाली. भारतातून युरोप मध्ये आलो होतो तेव्हा बर्‍याच प्रचलित प्रतिमा डोक्यात ठेवून आलो होतो. त्यातल्या काही खर्‍या ठरल्या, काहींना पार तडा गेला, तर काहींनी अगदी सुखद म्हणावा असा धक्कादेखील दिला. भारतात आणि अगदी पुण्यात राहत असून जेवढ्या मोठ्या कलाकारांना, लोकांना कधी भेटलो नव्हतो त्यांना युरोपात येऊन भेटलो हा अजून एक विरोधाभास. हे अनेक चांगले वाईट अनुभव गाठीशी आल्यानंतर हे अनुभव लिहून काढावे असं मनापासून वाटलं आणि म्हणून हा लेखन प्रपंच.

युरोप हा खंड बर्‍याच अर्थानं एकसंध आहे आणि बर्‍याच अर्थानं वेगळादेखील. इथंं देशांमध्ये आपआपसात हेवेदावे आहेत, तशीच मैत्रीदेखील आहे. बरेच लोक युरोपची भारताशी चुकीची तुलना करायचा प्रयत्न करतात. पण भारताच्या राज्यांमध्ये असलेली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सुसूत्रता युरोपच्या वाट्याला न आल्यामुळे युरोपियन लोकांमध्ये आम्ही युरोपियन असल्याची भावना तेवढ्या प्रकर्षानं नाहीये. अगदी जर्मनी, जिथे मी राहतो, तिथे देखील राज्यांराज्यांमध्ये स्वतःच वेगळेपण जाणवतं. बव्हेरियन स्वतःला बाकीच्या जर्मनीपेक्षा वेगळे समजतात (आपले पुणेकर म्हणजे जर्मनीचे बव्हेरियन, तीच ऐट, तोच तुसडेपणा, आणि अगदी त्याच ‘इथे फुकटात अपमान करून मिळतो’ हे पदोपदी जाणवून देणार्‍या पाट्या), तर हेसेन स्वतःला अगदी मॉडर्न. हे कळायला जरा वेळ जावा लागतो. आपल्याकडे नाही का पुणे-मुंबई अगदी भाऊ- बहीण वाटत असले तरी त्यांच्यातलं शीतयुद्ध तिथंं राहू लागल्यानंतर जाणवतं? अगदी तसंच.

पण जर्मनीमध्ये राहायला लागल्यानंतर जर्मनांबद्दल माझे गैरसमज नंतर दूर झाले. आधी पाळी होती आपल्याच शेजार्‍यांची म्हणजेच पाकिस्तानी, बांगलादेशी, नेपाळी, श्रीलंकन इत्यादींची. तुम्ही एकदा का देशाबाहेर राहायला लागलात की एकदमच तुम्ही लोकलपासून ग्लोबल होता. भारतात जरी तुम्ही अगदी सदाशिव पेठी का कोथरूडवाले (अन्य महाराष्ट्राने आपापल्या शहराच्या दोन भागांचं नाव या जागी घालावीत, माझा जन्म पुण्याचा असल्याने पुण्याबाहेर महाराष्ट्र आहे यावर माझा विश्वास थोडा कमी आहे) यावरून कितीही भांडत असलात तरी देशाबाहेर गेलात की, नमस्ते म्हणणारा प्रत्येकजण अगदी आपल्या गावचा वाटू लागतो. परत यातही भारतातून युरोपला येणार्‍यांचे तीन गट असतात – एक प्रवासासाठी/किंवा व्यवसायानिमित्त येणारे. हे लोक पंधरा ते वीस दिवसांसाठी युरोपला आलेले असतात. यांना स्वित्झर्लंडचा बर्फ, फ्रान्सचा आयफेल टॉवर, पिसा, रोम, इटली वगैरे अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. युरोपातल्या अंडरकरंटपासून म्हणून ते पूर्णपणे दूर असतात. दुसरा गट असतो तो नोकरीनिमित्त (आजच्या भाषेत ऑनसाईट) युरोपला येणार्‍यांचा. यांचे त्यांच्या कंपनी आणि तिथल्या भारतीय लोकांमध्ये असे ग्रूप्स तयार झालेले असतात की त्यांच्याबाहेर जाऊन भारतीय उपखंडातल्या लोकांशी ओळखी किंवा मैत्री होणे तुलनेनं कमी होतं. झाली तरी अगदी कामापुरती. मग हे युरोपमध्ये येऊन क्रिकेटच्या tournament खेळतात, आणि भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. भारताबाहेर असले तरी यांचं भारतीयपण घट्टपणे टिकून असतं. माझ्या ओळखीतले १०-१५ वर्षं जर्मनीत राहणारे लोक आहेत ज्यांना जर्मनमध्ये २ पूर्ण वाक्य बोलायला पण जड जातं. तिसरा गट असतो तो इथे शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना ‘ऑन साईट’ वाल्यांसारखं किंवा प्रवाशांसारखं कुठलंच मदतीचं कवच नसतं आणि त्यामुळे आशियाई लोकांबद्दल त्यांच्या मनात आपसूक एक आपुलकीची भावना तयार होते. माझ्या मनात झाली होती, माझ्या मित्रांच्या मनातदेखील झाली होती.

मी इथे शिकत असताना माझ्या University मध्ये भारतीय, श्रीलंकन, पाकिस्तानी, बांगलादेशी, नेपाळी, ऊज्बेक, अफगाण, इराणी असे आजूबाजूचे सर्व शेजारी होते. त्यातल्या बर्‍याच लोकांशी मैत्री झाली, काहींशी जोरदार वादावादी झाली, काहींशी खूप जवळचे संबंध निर्माण झाले, तर काहींशी सुरुवातीपासूनच दूरावा राहिला. भारतात असताना आपल्याला पाकिस्तान्यांबद्दल एक वेगळाच आकस असतो. मलाही होता. इथे आल्यानंतर मात्र तो कमी होऊ लागला. एक गोष्ट लक्षात आली पाकिस्तानीदेखील शेवटी बाकी कुठल्या देशाच्या नागरीकासारखेच आहेत. त्यांच्यात काही पुरोगामी आहेत, काही नास्तिक आहेत (फक्त ते तसं स्पष्टपणे लोकांमध्ये म्हणू शकत नाहीत. माझा एक जवळचा पाकिस्तानी मित्र खासगीत नास्तिक आणि समाजात रोजे वगैरे पाळणारा होता), काही अति देशभक्त, तर काही अगदीच mad आहेत. पाकिस्तानी मित्रांनी माझं आयुष्य फार समृद्ध केलं हे मात्र मान्य करावंच लागेल. माझ्या एका पाकिस्तानी मित्रामुळे मी अमृता प्रीतम आणि शिव कुमार बटालवीच्या प्रेमात कसा पडलो याची गोष्ट पुन्हा केव्हातरी सांगेन. पण साहित्यातला माझा दृष्टीकोन जागतिक होण्यामागे पाकिस्तानी मित्रांचा मोठा हात आहे. भारत-पाकिस्तान हा मुद्दा आला की मात्र कितीही जवळचा मित्र असो आमची कडाक्याची भांडणं व्हायची. अगदी अजूनही होतात. भारत पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान होणार्‍या शाब्दिक मारामार्‍या पण नेहमीच्याच. मग १०-15 दिवस दोन्हीकडून अबोला असतो. काही दिवसांनंतर परत गाडी रुळावर. हे सगळं असलं तरी धार्मिक कट्टरवाद तुम्हाला कुठेतरी त्यांच्यापासून थोडंस वेगळं पाडतो. अगदी नास्तिक मित्रांशी सुद्धा बोलताना ‘धर्मावर टीका सोडून बाकी काहीही बोल’ असे प्रेमळ सल्ले मला मिळालेले आहेत. माझ्या मनात बरेचदा प्रश्न यायचा, एवढा शिकला सवरलेला असला तरी हा माणूस धर्मावर थोडीही टीका सहन करू शकत नाही? याचा अर्थ कसा लावायचा हे मला बरेचदा कळायचं नाही. तो लावायला आधी त्या धर्माचा अर्थ लावावा लागणार हे मला नंतर कळलं.

भारतीयांना ओळख देणारे इथे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे योग, दुसरं म्हणजे भारतीय जेवण, आणि तिसरं म्हणजे भारतीय सिनेमे आणि सिरियल्स. योगाचे तुम्हाला कोपर्‍या कोपर्‍यावर वर्ग दिसतात. ‘हटयोग ते हॉटयोग’, म्हणजे न जाणे काय काय! त्यामुळे नवीन भेटणार्‍या माणसाला ‘नमस्ते’ आणि ‘ओम’ हे दोन भारतीय शब्द नक्कीच माहित असतात. ‘ओम’ आणि त्याशिवाय ‘चाय’ हा शब्द राहिला. इतक्यात इथं भारतीय चहाचं वेड आलेलं आहे. फक्त हे त्याला ‘चाय टी’ म्हणतात. हे म्हणजे ‘पाणी वॉटर’ म्हणण्यासारखं आहे. मला एकदा भयानक सर्दी झालेली असताना ऑफिस मध्ये एक कलीग म्हणे तू ‘चाय टी’ का नाही घेत, लगेच बरी होईल तुझी सर्दी. त्या ‘चाय टी’ या शब्दावर हसून हसूनच माझी सर्दी बरी झाली.

भारतीय चित्रपट आणि सिरियल्स हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो एवढे अनुभव आणि किस्से माझ्याकडे आहेत. मी जर्मनीमध्ये असतो. जर्मनांना भारतीय सिनेमाचं म्हणावं तेवढं वेड नाहीये. भारतीय सिनेमा म्हणजे त्यांच्या लेखी फक्त नाच गाणं. पण तरीही मी भेटलेल्या प्रत्येक जर्मन माणसाला शाहरुख खान माहीत होता. हे लोक शाहरुखचा उच्चार फारच वेगळा करतात, त्यामुळे सुरुवातीला मला कळायचंच नाही कोणाबद्दल बोलणं सुरु आहे. मला शाहरुख खान कोण आहे? हे विचारलं की, सुरुवातीला नाव न कळल्यामुळे, माहीत नाही म्हणून टाकायचो. मग लोक माझ्याकडे परग्रहावरून आलेल्या एलियनसारखे बघायचे. भारतीय आहे आणि शाहरुख माहित नाही म्हणजे काय! सिनेमाचं खरं प्रेम सुरू होतं ते पूर्वी युरोपकडे जायला लागलो तेव्हा. एकदा मी आणि माझे मित्र ट्रेननं कुठंतरी चाललो होतो. बाजूला एक ६०-६५ वर्षांचा म्हातारा बसला होता. चेहर्‍याच्या ठेवणीवरून बोलण्याच्या ढबीवरून माणूस क्रोएशिया, बोस्निया, पोलंड किंवा तत्सम कुठल्यातरी पूर्वी देशातला आहे हे समजलं. त्यानेच बोलायला सुरुवात केली आणि त्याला जसं कळलं की आम्ही भारताचे आहोत तशी साहेबांची कळी खुलली. आधी राज कपूर माहीत आहे का, वगैरेने सुरुवात झाली आणि साहेबांची गाडी नर्गिसवर आल्यावर जे सुसाट धावू लागली ती थांबायचं नावच घेईना. पण आक्रीत तर पुढेच होतं. महाराज आम्हाला म्हणे, ‘तुम्हाला एक सिक्रेट सांगू का?’ आम्ही म्हणलं सांगा, म्हणे ‘नर्गिस मेलीच नाहीये अजून! राज कपूरच्या प्रेमापोटी वेडी होऊन तिने कंटाळून मुंबई सोडली आणि नाव बदलून ती पूर्वीच्या सोव्हियत युनियनमध्ये राहायला लागली आहे.’ आम्हाला वाटलं हा आमची गंमत करतोय पण थोड्याच वेळात लक्षात आलं की स्वारी अगदी १०१% सिरीयस होती. आम्ही लगेचच तिथून काढता पाय घेतला, हे सांगायला नकोच. पण असं हे भारतीय सिनेमाचं प्रेम.

एकदा मी आणि माझा एक मित्र युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत बसलो होतो. बाजूला एक फ्रेंच मुलगा काहीतरी वाचत होता. माझा मित्र युट्यूबवर अमीर खानचं गाणं ऐकत होता, हे त्या मुलाने बघितलं आणि अगदी उत्साहाने त्यानी भारतीय सिनेमावर आमच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. हा मुलगा अतिशय मोठा शाहरुख फॅन. याला डिवचायचं म्हणून माझा मित्र म्हणाला “शाहरुख वगैरेला भारतात कोणी भाव देत नाही. तुला खरा भारतीय सिनेमा बघायचा असेल तर तू आमिरचे सिनेमे बघ.” पुढचे 15 मिनिट तो फ्रेंच मुलगा आम्हाला डोळ्यात पाणी आणून शाहरुख हा अमीरपेक्षा कसा जास्त मोठा अभिनेता आहे हे पटवून देत होता. अजून 5 मिनिटं आम्ही त्याला छळलं असतं तर तो खरंच रडायला लागला असता. मी तिथेच शाहरुखला मनोमन हात जोडले. एक फ्रेंच मुलगा तुझ्यासाठी जर्मनीमध्ये दोन भारतीयांशी भांडतो आहे म्हणजे तुझ्यात काहीतरी असणार गड्या!

भारतीय सिनेमाच्या प्रेक्षकांकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यांच्या सिनेमाच्या निवडीत एक आर्थिक दरी जाणवते. शाहरुख आणि सलमानचे प्रेक्षक शक्यतो वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेले असतात. मला आधी वाटायचं की ही आर्थिक दरी फक्त भारतीय प्रेक्षकांपुरती सीमित आहे. पण युरोपला आल्यानंतर हा माझा भ्रम पूर्णपणे तुटला. पूर्व युरोप एका अर्थाने बाकीच्या युरोपच्या तुलनेने गरीब आहे. आणि याच पूर्व युरोपहून येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये आजही मिथुन चक्रवर्तीची काहीच्या काही क्रेझ आहे. मी स्टुडंट होस्टेलला नुकताच शिफ्ट झालो होतो. इथे हॉस्टेल्समध्ये तुम्हाला स्वतःच्या खोल्या असतात आणि स्वयंपाकघर आणि बाथरूम्स कॉमन असतात. दुसर्‍या का तिसर्‍या दिवशी मी किचनमध्ये जेवण बनवायला जात होतो तेवढ्यात कॉरिडोरमधून जाताना एका खोलीतून मला मिथुनचे ‘जिम्मी जिम्मी’ ऐकू आले. 5 मिनिटांनी त्या खोलीतली मुलगी पण किचनमध्ये आली. ती युक्रेनची होती. नंतर थोडी भीड चेपल्यावर मी तिला एकदा सहज ‘जिम्मी जिम्मी’ वरून छेडलं तर तिने मला पूर्ण गाणं म्हणून दाखवलं. मी अवाक्!

असाच अवाक होण्याचा प्रसंग एकदा आला इस्तंबूलमध्ये. इस्तंबूलमध्ये मी मित्रांबरोबर कुठल्यातरी रस्त्यावरच्या गाडीवर टर्किश कबाब की काहीतरी खात उभा होतो. गाडीवाला १४-१५ वर्षांचा पोरगा असेल. खाऊन झाल्यावर पैसे द्यायच्या वेळेस झाली पंचाईत. आम्हाला टर्किशचा शब्दही येत नव्हता आणि गाडीवाल्या मुलाला इंग्रजीचा गंधही नव्हता. ३-४ मिनिट असेच प्रयत्न केल्यानंतर तो एकदम म्हणाला हिंदी जानते हो? आम्ही सगळे आउट! टर्कीमध्ये टर्किश मुलगा आम्हाला हिंदीत विचारतोय ‘हिंदी जानते हो?’, मी हो म्हणल्यावर तो फटाफट सुरु झाला इसका ३ रुपिया हुआ, इसका ६, और इसका ८. आपका १७ रुपिया हो गया. टर्कीची करन्सी लिरा आहे तरी तो आम्हाला रुपया कळेल म्हणून रुपया म्हणत होता. त्याला पैसे देता देता मी विचारलं, ‘हिंदी कहा से सिखा?’ तो माझ्याकडे हसत हसत बघत म्हणाला ‘बॉलीवूड!’ त्यादिवशी मला लक्षात आलं सिनेमा आणि साहित्य हे भाषेचा प्रसार प्रचार करण्याचे जेवढे ताकदवान उपाय आहेत तेवढी कुठलीही राजकीय सामाजिक चळवळ कधीही होऊ शकणार नाही.

भारतीय सिरियल्स हा अजूनच वेगळा किस्सा. युरोपमध्ये जरी भारतीय टीव्ही सिरियल्स कोणी बघत नसलं तरी युरोपमध्ये आल्यावर त्या सिरियल्स जगाच्या कोपर्‍यात कुठे कुठे बघतात हे मला कळलं. मी युनिवर्सिटीमध्ये असताना एका प्रोफेसरच्या हाताखाली एक प्रोजेक्ट करत होतो. त्याच प्रोफेसरच्या हाताखाली एक उझबेकिस्तानचा मुलगा PhD करत होता. बरेचदा लॅबमध्ये आम्ही दोघंच असायचो. एकदा असंच दोघंच बसलेलो असताना त्याने मला अचानक विचारलं, ‘तुमच्याकडे टीव्हीवर एक मालिका येते बघ.’ मी मनात म्हणलं याला काय भारतीय मालिका माहित असणारेत. ‘त्यात ती लहान मुलगी आहे बघ एक, तिचं लग्न होतं लहानपणीच?’ माझ्या तोंडून आपसूकच बाहेर पडलं, ‘बालिका वधू?’ तर तो उसळलाच, ‘हो, हो, तीच!! तू बघतोस का ती? माझी बायको वेडी आहे त्या सिरीयल पायी.’ आणि त्यानंतर पाच मिनिट बालिका वधूचे पुराण. मी मनात डोक्यावर हात मारून घेतला. एकता कपूरने भारतीय बायकाच नाही तर उझबेकिस्तानच्या बायकांना पण नादाला लावलंय हे बघून मी त्या दिवशी भरून पावलो.

मी युरोपमध्ये गेल्याच्या दीड वर्षात तिथे रीफ्युजी क्रायसिस (इस्लामिक देशांतून युरोपात येणारे मुस्लीम निर्वासित) सुरु झाला आणि तो सगळा काळ मला अगदी जवळून बघायला मिळाला. एकट्या जर्मनीने जवळ जवळ ८ लाख रीफ्युजी देशात घेतले आणि जर्मनीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. एकतर जर्मनी आणि एकूणच युरोपात जन्मदर खाली खाली घसरतोय. युरोपियन लोकांचे सरासर वयोमान वाढत चालले आहे आणि त्यामुळे त्यांना काम करणार्‍या हातांची कमतरता जाणवत आहे. हे हात भरून काढायला युरोपने मग बाकीच्या देशांमधून कामगार आयात करायला सुरुवात केली. पूर्व युरोप आणि टर्कीसारख्या देशातून जिथे कामगार निर्वासित म्हणून आले तसेच ९० च्या दशकात बाल्कन युद्धानंतर बोस्निया सारख्या देशातून बर्‍याच मोठ्या प्रमाणावर निर्वासित म्हणून आले आणि मग इथलेच झाले. असं असतानाही यातले अधिकांश लोक युरोपियन होते आणि त्यांना युरोपच्या खुल्या संस्कृतीची काही न काही प्रमाणात जाण होती. बोस्निया आणि टर्कीहून आलेल्या मुस्लिमांना म्हणूनच युरोपने पूर्णपणे नाही तरी मोठ्या प्रमाणात सामावून घेतले. २०१४ नंतर सिरीया आणि इराकमधून आलेले निर्वासित मात्र याला संपूर्ण अपवाद होते. एकतर संस्कृती ही संपूर्ण वेगळी. त्यात टर्कीसारखी धर्मनिरपेक्षतेची शिकवण नाही. इस्लामचा जबरदस्त पगडा. या सगळ्यात आयुष्याची उमेदीची वर्ष घालवल्यानंतर नवीन देशात, नवीन संस्कृतीत जम बसवणं, जेव्हा तुमचा सगळा संसार उध्वस्त झालेला आहे तेव्हा, हे खचितच सोपं काम नाहीये. जर्मनीसारख्या देशांनी मोठे मोठे रीफ्युजी कॅम्पस् उभे केले होते. त्यात येणार्‍या निर्वासितांना भाषा शिकवण्यापासून ते संस्कृतीची ओळख, हवामानाची ओळख, पुनर्वसन असे बरेच काम सुरु होते. युरोपने त्यांच्या पुनर्वसनासाठी बरेच प्रयत्न केले पण ते पूर्णपणे सफल झाले असं अजूनही म्हणता येत नाही. मी साधारण एक वर्ष निर्वासितांना कॉम्पुटर प्रोग्रामिंगचे शिक्षण देणाच्या कार्यक्रमात मदत करत होतो. त्या काळात मला त्यांचे काही प्रश्न जवळून बघायला मिळाले.

रीफ्युजींचे पुनर्वसन पूर्णपणे सफल न होण्यामागे महत्त्वाचे कारण कुठेतरी त्यांची मानसिकता आहे हे मला त्यांच्या बरोबर काम करताना जाणवलं. त्यांना युरोपचा विकास हवाय पण त्यासाठी स्वतःच्या धार्मिक मूल्यांशी, संस्कृतीशी काडीची तडजोड न करता. आणि इथेच प्रॉब्लेम होतो. मग हे निर्वासित स्वतःच्याच कोशात राहतात. आपल्या कॉलोनी विकसित करतात. युरोपच्या प्रत्येक शहरामध्ये एक दोन असे भाग असतात जिथे फक्त आणि फक्त टर्किश लोकच राहतात, किंवा फक्त निर्वासितच राहतात. हे जेव्हा यांच्या नवीन पिढ्यांनाही त्या त्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप होऊ देत नाहीत तेव्हा त्या देशाच्या नागरिकांचा मग संताप होतो. इथेच राहायचं, इथेच करियर करायचं आणि इथल्या संस्कृतीशी पूर्णपणे फटकून वागायचं, हे काही केल्या त्यांना पटत नाही. निर्वासितांमध्ये आणि युरोपियन नागरिकांमध्ये जो मूलभूत संघर्ष आहे, तो हा आहे. यातून मग पुढे मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार करणे, गुंडगिरी करणे, यातही निर्वासितांचा हात दिसून येतो. २०१५ च्या नवीन वर्षाच्या संध्याकाळी हेच दिसून आलं. ‘कोल्न’ या जर्मनीच्या शहरात एका रात्रीत ३० पेक्षा जास्त बलात्कार आणि १००० पेक्षा जास्त लैंगिक छेडछाडीच्या केसेस झाल्या. यातल्या ९५% केसेस अरब मुस्लीम आणि निर्वासितांविरुध्द होत्या. तुमचं सगळं आयुष्य जेव्हा तुम्हाला काहीही मिळवायला हिंसेचा वापर करायचं शिकवतं, तेव्हा ती सवय जायला वेळ लागतो. यातून मग संकुचित मुलतत्त्ववादाचा देशांतर्गत उदय होतो. युरोपमध्ये तो गेले काही वर्ष होतो आहेच पण आता त्याचे प्रमाण फार वाढले आहे. अजून एक मुद्दा म्हणजे भाषा. युरोपियनांचं आपआपल्या भाषेवर निस्सीम प्रेम आहे. बाहेरून लोकांचे जत्थ्यांवर जत्थे येऊ लागले की मग भाषेशी तडजोड सुरू होते. मी हानोवरला गेलेलो असताना तिथल्या रेल्वेस्टेशनवर सगळीकडे जर्मन बरोबरच इंग्रजी आणि अरेबिक भाषेत बोर्ड होते. मलाच तिथे अरेबिक भाषेत बोर्ड बघून चीड आली तर जर्मनांची तळपायाची आग मस्तकात जात असेल हे साहजिक आहे.

यातून मग विविध मुस्लीम देशातून स्वकष्टाने युरोपमध्ये आलेले आणि आपल्या नाकासमोर चालून आपल्या मुलांच्या भविष्याची स्वप्न बघणार्‍या कामगार मुस्लीम वर्गाला या निर्वासितांबद्दल भयंकर चीड निर्माण होते. मी बर्‍याच टॅक्सी चालवणार्‍या, हॉटेलमध्ये काम करणार्‍या इराण, अफगाणिस्तान, आफ्रिकेतून आलेल्या मुस्लिमांशी जेव्हा बोलतो तेव्हा ही चीड त्यांच्या शब्दात स्पष्ट जाणवते. एक इराणी टॅक्सीवाला मला एकदा चिडून म्हणला, “मी स्वतः मुस्लीम आहे, पण हे सारे मुस्लीम साले एकजात मूर्ख आहेत. हे आमच्या पूर्ण धर्माला आमच्यासकट बुडवणार आहेत.” यात अर्थात शिया, सुन्नी, अहमदिया हे वादाचे अंतरंग आहेत पण मूळ कारण आहे ते या अशा घाणेरड्या आणि दहशतवादी कामांमुळे सर्वसामान्य मुस्लिमांचं उध्वस्त होणारं सामाजिक अस्तित्व. हे सगळे प्रश्न जेवढे कठीण आहेत त्यांची उत्तरं त्याहूनही कठीण.

युरोप हे सर्वसामान्यपणे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, त्याच्या समृद्धतेसाठी, त्याच्या भाषा वैविध्यासाठी, त्याच्या कला आणि संस्कृतीसाठी ओळखलं जातं. पण त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रॉब्लेम्स, तिथली गरिबी, म्हातार्‍यांचं एकटेपण, समाजाची विसकटलेली घडी, ड्रग्सचे प्रॉब्लेम्स, नवीन संस्कृतींची सरमिसळ यावर साधारणपणे हवा तेवढा प्रकाश टाकला जात नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या युरोप वास्तवात मला यातल्या काही प्रश्नांना सरळ भिडता आलं, तर काही प्रश्नांची उकल करण्यात अयशस्वी झालो. पण जेवढं मला समजून घेता आलं त्यावरून हे नक्कीच जाणवलं की युरोप हे जेवढं बर्फानं आच्छादित नंदनवन आहे तेवढाच प्रश्नांनी भरलेला महासागरदेखील.

pole.indraneel@gmail.com