मी पाहिलेला युरोप – युरोपियन भाषिक राजकारण (लेखांक ३)

युरोपियन भाषिक राजकारण

जर्मनीत येण्याचा वर्षभरापूर्वी पर्यंत जर्मन भाषेची माझा संबंध फक्त Tarantino च्या Inglorious Basterds या सिनेमा पुरता होता. तोपर्यंत जर्मन ही मला काहीशी कर्कश भाषा वाटायची. नंतर माझ्या लक्षात आलं की जगभरात जर्मन भाषेबद्दल थोड्याफार फरकाने हाच समज आहे. मग जेव्हा जर्मन भाषा मी स्वतः बोलू लागलो तेव्हा हळूहळू हा समज माझ्या मनातून दूर झाला. पण आजही एखाद्या नवख्या माणसाला जर्मन भाषा चिडकी, कर्कश वाटू शकते किंवा तशी वाटतेच. या निमित्ताने माझ्या मनात प्रश्न आला की एखाद्या भाषेचा ध्वनी हा एखाद्या भावनेशी निगडीत असतो का? उदाहरणार्थ फ्रेंच ही जगभरात सगळ्यात रोमँटिक भाषा समजली जाते. म्हणजे ज्यांना फ्रेंच की भाषा येत नसते त्यांनासुद्धा फ्रेंच ऐकताना फार रोमँटिक वाटते. पण जो माणूस अस्खलित फ्रेंच बोलतो त्यालासुद्धा फ्रेंच रोमँटिक वाटत असेल का? Matrix सिनेमात एक संवाद आहे की फ्रेंच भाषेत दिलेली शिवी सुध्दा ऐकताना कर्णमधुर वाटते, जसं काही तुम्ही तुमचा पार्श्वभाग सिल्कच्या तलम कपड्याने पुसत आहात. एखाद्या भाषेच्या ध्वनीशी एखादी भावना निगडीत असणे (म्हणजेच फ्रेंच रोमँटिक वाटणे) यात त्या समाजाचा स्टिरिओ टिपिकल स्वभावाचा सुद्धा काही हात असू शकतो का हा सुद्धा माझ्या मनात येणारा नेहमीचा प्रश्न आहे. म्हणजे फ्रेंच लोक ही जगभरात अघळपघळ रोमँटिक समजली जातात, जर्मन्स जगभरात काहीशी अबोल काहीशी तुसडी समजली जातात. जर्मन्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यांना त्यांची भाषा कर्कश वाटत नाही उलट जगाला ती तशी वाटते याचा त्यांना राग देखील असतो. (जाता जाता अगदी भारतीय उपखंडात सुद्धा उर्दू ही भाषा अतिशय रोमांटिक समजली जाते.) भाषेच्या ध्वनीत आणि इमोशन्स मध्ये काही संबंध आहे का हा खरं तर विचार करण्यासारखा मुद्दा आहे, पण त्याहून विचार करण्यासारखा मुद्दा आहे तो यामुळे भाषेबद्दल होणार्‍या समजुतीबद्दल. ह्या समजुतीतून येणारे भाषिक राजकारण हे त्यामुळेच चित्तवेधक ठरते.

मी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयात शोध आणि काम करत असताना तंत्रज्ञानाच्या पातळीवर भाषेशी माझा बरेचदा संबंध येतो. त्या संबंधांतून गेल्या वर्षभरात युरोपियन भाषा आणि भाषेच्या राजकारणावर माझे बरेच वाचन वाढले. युरोपात राहत असताना वेगवेगळ्या भाषा कानावरती पडणे हे नेहमीचेच. पण जेव्हा मी भाषेचा कामानिमित्ताने व्यवस्थित अभ्यास करू लागलो तेव्हा यातल्या बर्‍याच बारकाव्यांशी माझा संबंध आला, आणि हे बारकावे फारच इंटरेस्टींग होते. ह्या बारकाव्यांकडे वळताना आपल्याला युरोपियन भाषांच्या इतिहासावर एक धावती नजर टाकणे आवश्यक आहे.

युरोपियन भाषांचा इतिहास :

भाषांच्या बाबतीत वरवर बघता युरोप हा काहीसा भारतासारखा वाटतो. पण खोलवर बघता तो खरंच तसा आहे का? संपूर्ण युरोप खंडात पन्नासच्यावर भाषा बोलल्या जातात. युरोपियन युनियनच्या अधिकृत अशा व्यवहाराच्या 24 भाषा आहेत, अर्थात युरोपियन युनियन मध्ये 24 वेगवेगळ्या भाषांमध्ये अधिकृत व्यवहार होतो. हे खरंतर काहीसं भारताशी साम्य असणारं चित्र आहे असं वरवर बघता आपल्याला वाटेल. पण नीट अभ्यास केल्यास लक्षात येतं की ही परिस्थिती भारतापेक्षा फार वेगळी आहे. भाषा तज्ञांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली थेयरी म्हणजे इंडो-युरोपियन भाषासमूह. युरोपात बोलल्या जाणार्‍या 99% टक्के भाषा इंडो-युरोपियन भाषासमूहात येतात. पण इंडो-युरोपीय भाषासमूह हा आज पासून सहा हजार वर्ष जुना भाषासमूह आहे. त्यामुळे युरोपियन भाषांना अभ्यास करताना छोट्या भाषा समूहांमध्ये विभागली जाते.

हे भाषासमूह साधारणपणे चार ते पाच भाषासमूह आहेत ते म्हणजे :

1. जर्मेनिक भाषा समूह

2. रोमन्स भाषासमूह

3. केलटिक भाषासमूह

4. स्लाविक

5. उरालिक भाषासमूह इत्यादी.

जर्मेनिक भाषासमूह परत तीन लहान समूहांमध्ये विभाजित होतो – वेस्ट जर्मेनिक, नॉर्थ जर्मेनिक, इस्ट जर्मेनिक. यातल्या ‘इस्ट जर्मेनिक’ समूहातल्या सगळ्या भाषा आज लोप पावल्या आहेत. वेस्ट जर्मेनिक भाषा म्हणजे जर्मन, डच, स्कॉट, आणि इंटरेस्टिंगली इंग्लिश. ज्यांना भाषांचा हा इतिहास माहिती नसतो त्यांना इंग्रजी ही फ्रेंच, लॅटिन इत्यादीच्या जवळ जाणारी भाषा वाटते. पण तसे वास्तवात नाही. इंग्रजी ही तुलनेने जर्मन भाषेच्या जवळची भाषा आहे, या भाषेतले शब्द, त्यांचा उगम बराचसा जर्मनच्या जवळ जातो. सामाजिक राजकीय परीप्येक्षात पण इंग्रजी आणि रोमन्स भाषा उदाहरणार्थ फ्रेंच, इत्यादी मधून विस्तव सुद्धा जात नाही. पण त्याविषयी पुढे बोलूया.

नॉर्थ जर्मेनिक भाषासमूहात सगळ्या नॉर्डिक देशांच्या भाषांचा समावेश होतो – यात आईसलान्डिक, नॉर्वेनियन, स्वीडिश, आणि डॅनिश भाषा येतात. पण इथे नॉर्डिक देशांची एक भाषा राहून गेलीये. ती म्हणजे फिनिश. त्याचे कारण म्हणजे फिनलंडची अधिकृत भाषा फिनिश ही जर्मेनिक भाषासमूहातली भाषा नाही, तर उरालिक भाषा समूहातली भाषा आहे. त्यामुळे नॉर्डिक देशातली लोक एकमेकांच्या भाषा बोलू शकत नसले तरी बर्‍यापैकी समजू शकतात, फक्त फिनलंड सोडून. फिनिश लोक यातली कुठलीच नॉर्डिक भाषा समजू शकत नाहीत. या देशाची भाषा आपल्या शेजार्‍यांशी संपूर्ण वेगळी असून हजारभर किलोमीटर दूर असणार्‍या हंगेरीच्या जवळ जाते. आहे न गंमत?

यानंतर नंबर येतो रोमन भाषा समूहाचा. याचे नाव जरी रोमन्स असले तरी त्याचा प्रेमाशी काही संबंध नाहीये. रोमन्स हा शब्द इटलीच्या रोम वरून आलेला आहे. या समूहात इटालियन, फ्रेंच, स्पानिश, पोर्तुगीज या भाषा येतात. आणि या भाषा समूहाचे राजकारण आणि इतिहास हा सगळ्यात लक्षवेधक आहे.

भाषिक राजकारण :

फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांचे वैर कित्येक शतकांमागे जाते. किमान हजार वर्षात झालेल्या अगणित युद्धांमध्ये इंग्रजीने फ्रेंच भाषेतून किमान 1000 च्या वर शब्द घेतलेले आहेत. आणि हे जवळ जवळ प्रत्येक फ्रेंच माणूस जमेल तेव्हा बोलून दाखवत असतो. पण हे फक्त तिथपर्यंतच सीमित नाहीये. रोमान्स भाषा समूहातला प्रत्येक देश स्वतःला इंग्रजीपासून जमेल तितके दूर ठेवायचा प्रयत्न करतो. यातल्या प्रत्येक देशाला स्वतःच्या भाषेबद्दल अतिशय अभिमान आहे. इतका की कधी कधी तो अभिमान नागरिकांच्या अधिकारांचे हनन करण्यापर्यंत जातो. हे काही प्रमाणात इंग्रजीच्याच भाषा समूहातल्या जर्मन भाषिक देशांमध्ये पण दिसून येते. तुम्हाला जर डच किंवा नॉर्डिक भाषा येत नसतील तरी हॉलंड, किंवा नॉर्डिक देशांमध्ये तुमचा निभाव लागू शकतो. मी हॉलंडच्या लहानश्या गावांमध्ये गेलो आहे ज्यांची लोकसंख्या 100-200 होती आणि तिथेही मला उत्तम इंग्रजी बोलणारे लोक भेटले. पण जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्पेन, फ्रांस या देशांमध्ये मोठ्या शहरांच्या 10 किलोमीटर परिघाबाहेर जाताच तुम्हाला स्थानिक भाषा न येण्याचा त्रास होऊ लागतो.

जर्मन भाषिक देशांमध्ये तर आपापसात पण हेवेदावे असतात. जर्मन मध्ये होखडौईच अर्थात साहित्यिक जर्मन हा प्रकार असतो. तुम्ही बव्हेरिया प्रांतात गेलात की तिथली भाषा ही तुम्हाला बाकीच्या जर्मन प्रांतांपेक्षा फारच वेगळी भासते आणि एखादा थेट बव्हेरियन मनुष्य, बाकीच्या जर्मन्सना एखादा पुणेकर जसा भाषेवरून टोमणे मारेल त्याच्या वरताण टोमणे मारतो.

पण भाषिक राजकारणात स्पेनचा हात कोणीही धरू शकत नाही इतका त्यांचा भाषिक इतिहास वाद विवादांनी भरलेला आहे. स्पेनच्या भाषिक वादावर खरंतर एक वेगळा लेख होईल इतका नमुनेदार नमुनेदार इतिहास स्पॅनिश भाषेच्या राजकारणाचा आहे.

सन 1100 पर्यंत स्पेन मध्ये अरेबिक भाषेचे वर्चस्व होते, त्याचे कारण स्पेनवर असणारी इस्लामिक राजवट. 1100 नंतर मात्र 150 वर्षात हे चित्र पूर्ण पालटले आणि कास्टालीयन जिला आज आपण स्पानिश भाषा म्हणून ओळखतो तिचे राजकीय अस्तित्व फार मोठ्या प्रमाणात वाढले. अरेबिक असे पर्यंत, स्पेन मध्ये कास्टालीयन, कातालीयन, बास्क, आणि लीयोनीज या भाषा बोलणारे समूह साधारण समप्रमाणात होते. पण जसा कास्टालीयन भाषेला राजाश्रय मिळाला तसं बाकीच्या भाषांवर होणारा अत्याचार हळू हळू वाढू लागला. कास्टालीयन स्पेनची अधिकृत भाषा झाली. इथपर्यंत पण सगळं ठीक होतं. पण त्यानंतर जाणूनबुजून बाकीच्या भाषांचे अस्तित्व पुसण्यात येऊ लागले. सगळ्यात आधी कास्टालीयनला अधिकृतपणे स्पानिश भाषा म्हणण्यात येऊ लागले. मग सगळी अधिकृत नावं कास्टालीयन म्हणजेच स्पानिश भाषेतच असतील असे आदेश निघाले. मुलांची नावं फक्त स्पॅनिश मध्येत ठेवता येतील असे अध्यादेश पारित झाले. सन 1900 च्या आसपास या राजकारणाने चरम सीमा गाठली. यातून काटालोनिया भाषिक समूहाला एकटं पडत असल्याची भावना होऊ लागली आणि त्यांनी वेगळ्या देशाची मागणी करायला सुरुवात केली. हा वेगळ्या देशाचा लढा गेली कित्येक दशकं सुरु आहे. ब्रेग्झिट नंतर या लढ्याने अजून जोर पकडला आणि शेवटी स्पेनला मागच्या वर्षी याविषयावर जन्मात घेण्यास भाग पाडलं. त्याचा उपयोग झाला नसला तरी काटालोनियाचा विषय जगासमोर मोठ्या प्रमाणात आला. ही भाषेची जबरदस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की Atlµtico Madrid सारख्या नामवंत फुटबाल क्लबला त्यांचे मूळ नाव बदलून अधिकृत स्पॅनिश नाव धारण करावे लागले. हे अर्थातच अमानवीय आणि क्रूर पाऊल होते आणि आजही युरोप सहित जगभरात स्पेनच्या भाषाविषयक धोरणावर टीका होते.

स्पॅनिश भाषा समूहाबद्दल अजून एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. कनारी द्वीप हे आफ्रीकाखंडाजवळ असलेली द्वीप शृंखला आहे. या द्वीपसमूहाची खासियत अशी हे इथे बोलल्या जाणार्‍या भाषेत शब्द नाहीयेत. ही भाषा वेगवेगळ्या शिट्ट्यांचा वापर करून बोलली जाते. साम्राज्यवादी काळात स्पेन ने इथे जेंव्हा स्वतःची वसाहत वसवायला सुरुवात केली तेव्हा प्रश्न होता की स्थानिक लोकांशी संवाद कसा करायचा. तर स्पॅनिश वसाहतवाद्यांनी ही शिट्ट्यांची भाषा शिकून घ्यायला सुरुवात केली. आणि हळू हळू स्पॅनिश भाषा शिट्ट्यांचा वापर करून बोलायला आणि स्थानिक लोकांना शिकवायला सुरुवात केली. आणि यातून स्पॅनिशच्या एका नव्या रूपाचा उदय झाला. आज कनारी द्वीप समूहावर शिट्ट्यांचा वापर करून स्पॅनिश भाषा बोलली जाते.

एकूणच युरोपियन लोकांना त्यांची भाषा ही अतिशय प्रिय आणि अभिमानाची गोष्ट वाटते. आज जवळपास प्रत्येक युरोपियन भाषा ज्ञान भाषा आहे, मनोरंजनाची भाषा आहे, आणि व्यवहाराची सुध्दा भाषा आहे. हे सगळं बघत, अनुभवत असताना मनात प्रश्न येतो की भारतातल्या कित्येक राज्यांपेक्षा छोटे असलेले हे देश, स्वतःच्या भाषेला जतन करण्यासाठीच नव्हे तर पुढे नेण्यासाठी इतकी मेहनत घेत असताना आपण यातून काही बोध घेऊ शकतो का?

युरोप मधले दिवस या माझ्या सदरातला हा शेवटचा लेख. हे सदर लिहिताना मला युरोपियन संस्कृतीची, तिथल्या लोकांची नव्याने ओळख झाली. कित्येक प्रसंग जे घडून गेल्यावर तसेच सोडून दिले होते, त्यांच्या बद्दल हे सदर लिहिताना परत एकदा विचार केला गेला आणि त्यांचे वेगळेपण लक्षात आले. युरोपात राहत असताना आपल्याकडे अनुभवांची एवढी शिदोरी साठली आहे याची कल्पना देखील नव्हती. लिहायला सुरुवात केल्यावर ते अनुभव घडाघडा बाहेर पडायला लागले. युरोपियन संस्कृती, तिथे लोक आपल्यापेक्षा जितके वेगळे आहेत तितकेच मानवी पातळीवर आपल्यासारखे आहेत ह्याची देखील प्रकर्षाने जाणीव झाली. युरोप बद्दल साधारण भारतीय माणसाच्या मनात ज्या कल्पना असतात त्यांना छेद देऊन ही लेखमाला खर्‍या युरोपचे एक टक्का जरी चित्रण करू शकली असेल आणि वाचकांना नवीन वैचारिक खाद्य पुरवू शकली असेल, तरी मी ते या सदराचे यश मानीन.