मी पाहिलेला युरोप (लेखांक – २)

European Refugee Crisis

जॉन एलिया हा उर्दूतल्या सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक आहे. “शायर तो दो हैं, मीर तकी और मीर जॉन, बाकी तो जो हैं शाम ओ सहर खैरीयत से हैं” – असं जॉन ने स्वतःबद्दलच लिहून ठेवलंय. तर हा जॉन मूळचा भारतातला. अमरोह्याचा. अमरोहा शहरे तख़्त है, गुजरा जहाँ की सख्त है, जो छोड़े वो कमबख्त है. तर या अशा अमरोह्यातून एलिया फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात गेला आणि कराचीमध्ये वसला. पाकिस्तानात निर्वासित म्हणून गेलेला असला तरी भारताबद्दलचं प्रेम त्याचं शेवटपर्यंत होतं. एवढं की कराचीमध्ये एकदा आपल्या कुठल्या तरी मित्राकडे जो स्वतः पाकिस्तानात भारतातून निर्वासित म्हणून आला होता, सकाळी जेव्हा एलिया गेला तर त्याला तो मित्र बागेत झाडांना पाणी घालताना दिसला. झाडांना पाणी घालताना बघून जॉन एलिया तिथेच जमिनीवर बसून धायमोकलून रडू लागला. लोकांना कळेना याला काय झालं. जॉनचे हे वेडचाळे त्यांच्या मित्रांना नवीन नव्हते पण हे असं सकाळी सकाळी रडारड? मित्राने विचारलं काय झालं बाबा रडायला? तर जॉन म्हणे “आप यहाँ पौधों को पानी दे रहें हैं? आपने अपनी जड़ें यहाँ की मिटटी में उतार ली हैं. आप भूल गए की आप कौन हैं, कहाँ से आये हैं, आपकी मिट्टी कहाँ हैं? आपने यहाँ जड़ें उतार ली हैं”. मित्र निशब्दच झाला.

यूरोपमधल्या निर्वासितांच्या बरोबर आलेल्या अनुभवांच्या अनुषंगाने लेख लिहिण्यासाठी जेव्हा निर्वासित प्रश्नांवर मी माहिती गोळा करू लागलो तेव्हा जॉन एलियाचं “आपने अपनी जड़ें यहाँ की मिटटी में उतार ली हैं” हे वाक्य राहून राहून माझ्या कानात घुमत होतं. सन २०१३ च्या शेवटी मी भारतातून जर्मनीमध्ये राहायला आलो आणि सन २०१५ च्या सुरुवातीला सिरीयन निर्वासितांचा प्रश्न युरोपात ऐरणीवर आला. त्याचे वारे २०१४ च्या मध्यापासूनच वाहू लागले होते. माझ्या होस्टेलवर एक सिरीयन विद्यार्थी राहायला होता. २०१४ मधला जुलै, ऑगस्ट महिना असेल. एक दिवस तो फारच चिंतेत कॉमन रूममध्ये बसलेला दिसला म्हणून त्याला जाऊन विचारलं की काय झालंय, तर त्याने सांगितलं ते धक्का देणारं होतं. त्याचे आई वडील आणि भाऊ सिरीयामध्ये ज्या गावात राहत होते त्या गावावर शेवटी आयसीसच्या लोकांनी कब्जा केला होता. आई वडिलांशी त्याचा गेला आठवडाभर काहीही संपर्क होत नव्हता. आई बाबा कुठे आहेत, जिवंत तरी आहेत का त्याला काहीच खबर मिळत नव्हती. सिरीयामध्ये परत जायचं म्हणलं तर कसं जायचं याचीही काही सोय नव्हती. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला पण अशा परिस्थितीत धीर काय द्यावा हे माझं मला तरी कुठे माहित होतं. आठवड्याभरात तो मुलगा पण होस्टेल मधून गेला बहुदा सिरीयाला. पुढे त्याचं काय झालं काहीही खबर नाही. असे किती मुलं शिकायला युरोपभर असतील, त्यातल्या कित्येकांचे आई बाप, परिवार कुठे कुठे विखुरले असतील, विचार केला तरी अस्वस्थ व्हायला होतं.

त्या मुलाच्या निमित्ताने मला सिरीया प्रश्नाची गंभीरता पहिल्यांदा जाणवली. आणि त्या नंतर पुढचं दीड वर्ष या न त्या कारणाने समोर येतच राहिली. २०१५ च्या सुरुवातीला युरोपने निर्वासितांच्या बद्दलचं आपलं धोरण बदलायला सुरुवात केली. तोपर्यंत ग्रीसच्या तटावर सिरीयन निर्वासितांचे लोंढे यायला सुरुवात झाली होतीच. २०१५ च्या एका वर्षात फक्त जर्मनीने ८ लाखाहून जास्त निर्वासित देशात घेतले. जर्मनी हा निर्णय कसा घेऊ धजली हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. जर्मन चान्सलर अंगेला मार्केलने तेव्हा दिलेली ऐतिहासिक घोषणा Wir schaffen das!! (आपण हे करू शकतो) तेव्हा सगळ्या पेपर्स च्या पहिल्या पानावर झळकली होती. मार्केलना तेव्हा कल्पना नसेल की या घोषणेचं भूत आपल्या मानगुटीवर पुढचे दोन वर्ष बसणार आहे.

पण या घोषणेच्या आधीच निर्वासितांचा प्रश्न जर्मनीसाठी खूप मोठा झाला होता. खरंतर अनके युरोपियन देशांप्रमाणे जर्मनीची ही निर्वासितांसाठी भक्कम अशी नीती वर्षानुवर्ष आहे. ८४ च्या दंग्यांनंतर मोठ्याप्रमाणावर शीख समुदाय याच नीतीचा आधार घेऊन युरोप मध्ये स्थायिक झाला. तीच गोष्ट श्रीलंकन तामिळी लोकांची. पण त्यांची संख्या कधीही सिरीयासारखी नव्हती. सिरीयन गृहयुद्धात संपूर्ण देशच्या देशच बरबाद झाला होता. आणि कधीही न बघितलेल्या संख्येने निर्वासितांचे लोंढे युरोप कडे वळले होते. सरकारची निर्वासितांसाठीची नीती एवढ्या संख्येला सहाय्य करणारी नव्हतीच. त्यामुळे बरेच निर्वासित बेकायदेशीरपणे युरोप मध्ये घुसत होते. पण जागतिक मिडीयाचा दबाव आणि मानवी अधिकारांच्या प्रचार करणाऱ्या संस्थांचे राजकीय डावपेच यामुळे जर्मनीसारखे देश या बेकायदेशीर निर्वासितांना देशाबाहेर काढू शकत नव्हते. ३१ ऑगस्ट २०१५ ला मार्केल यांनी एका निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. तिथे त्यांच्याविरुध्द निर्वासितांनी घोषणा आणि शिव्या दिल्या. या घटनेच्या एकाच आठवड्यानंतर ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या बॉर्डर वर एक ट्रक सापडला ज्यात ७१ निर्वासितांचे शव होते. हे निर्वासित बेकायदेशीरपणे अतिशय हाल सोसत जर्मनीमध्ये घुसायच्या प्रयत्नात असताना फळभाज्या नेणाऱ्या डीप फ्रीज ट्रक मध्ये बसून जर्मन बॉर्डर पार करणार होते. पण या प्रयत्नात थंडीने या ७१ लोकांचा जीव गेला. ह्या घटनेचा गाजावाजा संपूर्ण जगभर झाला आणि शेवटी सरकारला काहीतरी भूमिका घेणे भाग पडले. या घटनेनंतर झालेल्या प्रेसवार्तेत मार्केल म्हणल्या “आम्ही आत्ता पर्यंत बऱ्याच संकटाना तोंड दिलेलं आहे. आम्ही याला ही तोंड द्यायला तयार आहोत. आम्ही हे करू शकतो.” यातलं शेवटचं आम्ही हे करू शकतो (Wir schaffen das! We can do it!) हे वाक्य मिडीयाने डोक्यावर घेतलं. त्यांना यात ओबामाचे Yes we can! दिसले. आणि अशाप्रकारे मार्केल यांची इमेज कुठेतरी पुढचे दोन वर्ष या वाक्यात अडकून बसली. पण यात भाषांतराचा एक घोळ झाला होता. संपूर्ण वाक्य हे काहीसं निराशात्मक असं होतं. आमच्या समोर काही पर्याय नाहीये म्हणून आम्हाला हे करावं लागणार आहे आणि आम्ही हे करू शकतो. त्यातल्या आम्ही हे करू शकतो या वाक्याला मूळ जर्मन मध्ये Yes we can! च्या सकारात्मकतेची किनार नाहीये. पुढचे दीड वर्ष हा सकारात्मकते/नकारात्मकतेचा खेळ सरकार कडून सुरु राहिला. यात स्वतः सरकार तर गोंधळलेलं वाटलंच पण निर्वासितांचेही काही प्रमाणात हाल झाले. याला जोड मिळाली निर्वासितांनी केलेल्या दहशतवादी कृत्यांची आणि त्याला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीची. २०१५च्या नवीन वर्षाच्या संध्याकाळी कोलोन या जर्मन शहरात जवळ जवळ १००० लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी पोलिसांकडे एका रात्रीतून आल्या. सगळ्या तक्रारींचं वर्णन सारखंच होतं. अरब ठेवणीतले चेहरे असलेल्या लोकांनी हे अत्याचार केले. या घटनेनंतर जर्मनीभर निर्वासितांविरुध्द अजूनच वातावरण तयार झालं.

या पार्श्वभूमीवर २०१६ साली जेव्हा मी निर्वासितांना कोडींग शिकवणे सुरु केले तोपर्यंत जर्मनीने निर्वासितांच्या प्रश्नावर वेगळेच वळण घेतले होते. २०१५ मध्ये निर्वासितांना आत घेणारी जर्मनी २०१६ मध्ये त्यांना दूर लोटत होती. २०१६ मध्ये जर्मनीने टर्कीशी करार केला आणि ग्रीस मध्ये उतरणारे निर्वासित टर्कीमध्ये जातील अशी व्यवस्था केली. बेकायदेशीरपणे देशात घुसलेल्या निर्वासितांना त्यांच्या त्यांच्या देशात किंवा ते ज्या देशातून जर्मनीमध्ये घुसले त्या देशांमध्ये पाठवून द्यायला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जर एखाद्या देशात एखाद्या व्यक्तीला त्याच्या ओळखीमुळे (अर्थात धर्म जाती पंथ) जीवाचा धोका असेल तर ज्या देशात तो शरणार्थी गेलाय तो देश त्या व्यक्तीला घेण्यापासून नाही म्हणू शकत नाही. या नियमामुळे सिरीयन ख्रिश्चन सोडले तर बाकी बेकायदेशीर निर्वासित (ज्यात मुस्लीम बहुतांश होते) त्यांच्या त्यांच्या देशात पाठवणं सुरू झालं. त्यांनी परत जावं म्हणून त्यांना १२०० युरो पर्यंत रक्कम पण जर्मन सरकार कडून देण्यात येत होती. ह्या सगळ्याचे एकच कारण. जर्मन सरकारला निर्वासितांचा प्रश्न हा किती खर्चिक होऊ शकतो याची कल्पना आली होती. एका वर्षात जर्मन सरकारने २० बिलियन युरो निर्वासितांच्या प्रश्नावर खर्च केले होते. ही रक्कम कितीही नाही म्हणली तरी मोठी होती. परत ही रक्कम केंद्र सरकार खर्च करत नसून राज्य सरकारांना आपल्या तिजोरीतून भरावी लागत होती त्यामुळे राज्यांचा रोष केंद्राला सहन करावा लागत होता. या पुढे जर्मनीमध्ये फक्त जर्मनीला उपयोगी असणारे निर्वासित जर्मनी ठेवून घेणार होती.

२०१७ पर्यंत या सर्व नाट्यावर जवळ जवळ पडदा पडला. रीफ्युजी क्रायसिस हा कधीतरी बोलण्याचा विषय झाला. याला एक कारण जर्मनीने लौकरात लौकर यात झालेल्या चुका सुधरवण्यावर दिलेला भर. आणि बहुदा दुसरं कारण म्हणजे निर्वासितांनी आपली मूळ लौकरात लौकर युरोपमध्ये रुतवण्यासाठी केलेले खटाटोप. मला मात्र अजूनही निर्वासित प्रश्न म्हणला की होस्टेल मधला सिरीयन मुलगा आठवतो. किंवा ऑफिस मधला पाकिस्तानी अहमदिया. जो गेली ४ वर्ष घरच्यांचे तोंड बघू शकला नाहीये. देशपातळीवर कठीण निर्णय घ्यावेच लागतात हे खरं असलं तरी या सगळ्यातून विस्थापन ही मानवी इतिहासातली सर्वात मोठी शोकांतिका आहे हेच अधोरेखित होतं.

(क्रमशः)

या लेखमालेतील पहिला लेख या लिंकवर वाचता येईल.

मी पाहिलेला युरोप (लेखांक – १)