ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम – पहिल्या क्रुसेड युद्धाची गोष्ट! (१०९८)

Siege of Jerusalem

[Image Source: Link]

ही घटना आहे १०९८ सालची. म्हणजेच, जेरूसलेमच्या वर्चस्वावरून पेटलेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांमधल्या पहिल्या क्रुसेडच्या वेळेची. पहिलं क्रुसेड हे सरळसरळ आणि उघडपणे ख्रिश्चन धर्मीयांनी पेटवलेलं युद्ध होतं. मध्यपूर्वेतील जेरूसलेम शहर, जे ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिनही धर्मांसाठी पवित्र मानलं गेलं आहे, ते त्या काळात इस्लामच्या अधिपत्याखाली होतं. तिथल्या ख्रिश्चन धर्मीयांच्या अतोनात छळाच्या कहाण्या रचून, त्या शहराच्या ‘मुक्त’तेसाठी पश्चिम राज्यांमधून ख्रिश्चन धर्मगुरू पोप अर्बनच्या आज्ञेने (‘चिथावणीने’ हा शब्द अधिक योग्य राहील) फ्रँकीश ख्रिस्त्यांची प्रचंड मोठी सेना जेरुसलेमच्या दिशेने निघाली.

या निघालेल्या धर्मसैन्याचं विशेषत्व असं, की त्याचं नेतृत्व कोणा एकाकडे नव्हतं. जरी ते नेतृत्व वेगवेगळ्या घराण्यांच्या प्रमुखांकडे विखुरलेलं होतं, तरी ५ जणं हे त्यातले सगळ्यात प्रमुख होते- रेमंड, बोहेमाँड, त्याचा पुतण्या टँक्रेड, गॉडफ्रे आणि त्याचा भाऊ बाल्डविन. क्रुसेड हे त्या सैन्यासाठी धर्मकार्य होतं. तो पापं धुवून काढण्याचा एक मार्ग होता. तोपर्यंत लढली जाणारी युद्धं, आणि होणारा हिंसाचार हा ख्रिश्चनांसाठी ‘अपरिहार्य पाप’ होतं. त्यातून लागणाऱ्या पापाच्या क्षालनासाठी ख्रिश्चन सैनिक आणि सेनाधिकारी जमेल तेवढं धर्मकार्य करायचे; म्हणजे, उपवास, दानकर्म, ‘कन्फेशन्स’, इ. परंतु, क्रुसेडच्या काही काळाआधीपासून ‘युद्ध म्हणजे पाप’ ही संकल्पना इतिहासजमा होऊ लागली. आणि क्रुसेडच्या काळात तर पोप अर्बनने देशोदेशी फिरून ‘हे युद्ध म्हणजेच पुण्य’ असा संदेश पसरवला. त्यामुळे युरोपातून अनेक ख्रिश्चन सैनिक आणि घराणी ‘जिंकलो तर पृथ्वी, मेलो तर स्वर्ग’ ही भावना मनी बाळगून क्रुसेडसाठी बाहेर पडली! अनोळखी प्रदेशात इस्लामची शहरं ताब्यात घेत, मार्गात हालअपेष्टा सहन करत ग्रीक राजा अॅलेक्सियस कॉम्नेनसच्या (जो तेव्हा कॉन्स्टन्टिनोपोलवर राज्य करत होता) मदतीने ते सैन्य उत्तर सिरियातील अँटीऑख या शहरापाशी आले. अँटीऑख हे जेरूसलेम आणि पश्चिम राज्ये यांना जोडणारं एक मोठं ठाणं होतं. हे शहर इ.स.पूर्व ३०० मध्ये अॅलेक्झांडर द ग्रेटचा सेनाधिकारी अँटीऑखस ने वसवलेलं होतं. ग्रेको-लॅटिन सैन्याला खरंतर त्या शहराला वळसा घालून जाता आलं असतं, पण, त्या शहराचं अधिपत्य म्हणजे जेरूसलेमवरच्या हल्ल्यासाठी एक बालेकिल्ला होतं हे क्रुसेडर्स जाणून होते. शिवाय ख्रिश्चन सैन्याकरता त्याला धार्मिक महत्त्वही होतं; असं म्हणतात की, सेंट पीटरने येशू ख्रिस्तासाठी बांधलेलं पहिलं चर्च, हे अँटीऑखच्याच भूमीवर बांधलं होतं. त्यामुळे हे शहर जिंकायचंच असं ठरवलं गेलं. (यात रेमंड-बोहेमाँडसारख्यांचा, क्रुसेडच्या नावाखाली मध्यपूर्वेत स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्याचाही अंतःस्थ हेतू होता.) अँटीऑख शहर दुर्गम होतं. ओरोंटेस नदी आणि सिल्पीयस-स्टाऊरिन या दोन पर्वतांच्या मध्ये आणि साठ फूट उंचीच्या तटबंदीच्या विळख्यात हे शहर विसावलेलं होतं. प्रचंड आणि अखंड प्रयत्नांती, रेमंड आणि बोहेमाँडच्या चलाखीने, याघी सियान नावाच्या अँटीऑखच्या मुस्लिम शहराधिपतीला हरवून ते शहर हस्तगत करण्यात क्रुसेड सेनेला यश आलं; आणि त्या सैन्याने निःश्वास सोडला! मजबूत तटबंदीच्या रक्षाकवचात ख्रिश्चन सैनिक आले खरे, पण त्यांची खरी परिक्षा पुढेच होती…

The City of Antioch
अँटीऑख शहर आराखडा

केरबोघा ऑफ मोसूल नावाचा एक नावाजलेला आणि धडाडीचा सुन्नी इस्लामी राज्याचा सेनानी होता. याघी सियानने अँटीऑख हल्ल्याखाली असतांना विविध मुस्लिम राजसत्तांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्याच्या उत्तरादाखल बगदादच्या सुलतानाने या केरबोघा नावाच्या धुरंधराला अँटीऑखच्या मुक्ततेसाठी धाडलं. झालेल्या लढाईच्या नुकसानातून आणि थकव्यातून ख्रिश्चन सैन्य पूर्ण सावरलंही नव्हतं, इतक्यात या इस्लामी प्रतिआक्रमणाची बातमी रेमंड-बोहेमाँड आदि अधिकाऱ्यांच्या कानावर आली. आणि अँटीऑखमधील क्रुसेड सेनेत धडकी भरली. केरबोघाचा लौकिक ते जाणून असावेत. तेव्हा अशी परिस्थिती होती, की मुळात संख्येने कमी असणाऱ्या लॅटिन सैन्याची अँटीऑख जिंकतांनाच वाताहत झाली होती, संख्या अजून कमी झाली होती; शिवाय, शहर जिंकल्यावर तटबंदी तर मिळाली, पण रसद तुटली होती. तर दुसरीकडे इस्लामी सैन्य ताजं, तगडं आणि संख्याबलपूर्ण होतं. केरबोघाच्या धडाडीमुळे तोच अब्बासिद खिलाफतीचा पुढचा अधिपती होणार असं सगळ्या सुन्नी इस्लामी जगाचा अंदाज होता, त्यामुळे त्याच्या या मोहीमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते सैन्य बघता बघता अँटीऑखच्या उत्तरेला पोहोचलं. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेला वसवून केरबोघाने सेंट पॉल गेट अडवून ठेवायला तुकड्या पाठवल्या. शहराच्या पूर्व तटबंदीला लागून, माऊंट सिल्पीयसच्या टेकड्यांवर असलेलं सिटाडेल (धर्मस्थळ) हे अजूनही इस्लामी सैन्याच्या ताब्यात होतं. त्या सैन्याशी केरबोघाने संपर्क साधला. केरबोघाची पहिली खेळी ‘थेट धडक’च होती. त्या सिटाडेलमधल्या मुस्लिमांच्या मदतीने त्याने आपल्या तुकड्यांवर तुकड्या शहराच्या पूर्व तटबंदीवर आदळायला सुरुवात केली. ती आघाडी फुटू नये म्हणून लॅटिन सैन्याला अक्षरशः जिवाच्या कराराने लढा द्यावा लागला. ते सैन्य हतबल आणि निराशाधिन झालं होतं. अनेक सैनिक पळूनही गेले. अँटीऑखला तर अशी अफवा पसरली की बोहेमाँडसारखे सेनानीपण पळून जायच्या बेतात आहेत! लोक पळून जाऊ नयेत म्हणून या अधिकाऱ्यांना शहराचे दरवाजे जबरदस्ती बंद करून ठेवावे लागले. शहराच्या वेशीपाशी पेटलेली लढाई आणि आतमध्ये भुकेने तळमळणारी माणसं, यात ख्रिश्चन भरडून निघत होते. अगदी प्रत्येकाचा धीर खचला होता. शहर तर जाईलच, पण आपण जिवानिशी वाचू की नाही, याचीही शाश्वती कोणाला नव्हती. येशूच्या सैन्यासाठी काळसर्प जबडा वासून उभा होता…

अँटीऑखमधल्या क्रुसेड सैन्यासाठी परिस्थिती बिकट झाली असली; अनेक जण पळून जात असले, तरीही अनेक जणं आपल्या जागी ठाम राहून लढा देत राहिले. आणि साधारण १४ जून रोजी केरबोघाचं सैन्य माघारी फिरलं. असं म्हणतात, की त्याच्या आदल्या रात्री एक आकाशात तारा पडतांना ख्रिश्चन सैन्याला दिसला, आणि त्या शुभसंकेतामुळे ते जिंकले. प्रत्यक्षात, एकाच ठिकाणी पूर्ण ताकद वापरण्यापेक्षा वेगळी खेळी खेळायचं केरबोघाने ठरवलं असावं; आणि त्यामुळे सैन्याला माघारी फिरण्याची आज्ञा दिली. आता इस्लामी सैन्याने अँटीऑखला वेढा टाकायला सुरुवात केली. आता केरबोघाने ब्रिज गेट आणि सेंट पॉल गेटपण अडवले. आतमधल्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी तुटला! खायला अन्न नव्हतं. भुकेच्या तीव्रतेने अनेकांनी अक्षरशः पायताणातली कातडी खायला सुरुवात केली होती! या परिस्थितीत कणखर सेनानींनीही आशा सोडली. इतक्यात त्याच रात्री फ्रँकीश जनसमुदायातल्या एका ‘व्हिजनरी’ने काही लोकांच्या मदतीने बॅसिलीका ऑफ सेंट पीटरच्या आवारातली जमीन खणून त्यातून ‘होली लान्स’ (पवित्र भाला) शोधून काढला. त्या माणसाचं नाव पीटर बार्थोलोम्यु. त्याचं असं म्हणणं होतं, की तो भाला येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी वापरला होता, आणि तो इथे पुरलेला आहे याची त्याला दृष्टी झाली होती! या शोधामुळे सबंध सैन्यात चैतन्य सळसळलं! तो भाला सापडणं म्हणजे देवाचाच आशिर्वाद आहे, असा समज प्रत्येकाने करून घेतला! असं म्हणतात की, या घटनेमुळे क्रुसेडर्स लगेच शस्त्र हाती घेऊन केरबोघावर तुटून पडले..साफ खोटंय! त्या घटनेने प्रत्येकाला दुर्दम्य धीर मिळाला असला, तरी ती घटना आणि प्रत्यक्ष हल्ला यात २ आठवड्यांचं अंतर होतं! मधल्या काळात उपासमार असह्य होऊन क्रुसेड सेनानींनी तहाची बोलणी करायला माणसांना केरबोघाच्या तळात पाठवलं, पण त्यांना एकच उत्तर मिळालं, ‎”you will have to fight your way out.”

The Siege of Antioch

[Image Source: Link]

या उत्तरामुळे आपलं भविष्य ख्रिश्चन जनामनांत चमकलं. भुकेने आधीच अनेकांचा जीव घेतला होता आणि बाहेर इस्लामी सैन्य वाटच बघत होतं. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच उपाय आला, ‘मारिता मारिता मरेतो झुंजण्याचा’! भुकेने तडफडत मरण्यापेक्षा रणात अभिमानाने मरू, असं जो तो बोलू लागला. ख्रिश्चन सेनानी युद्धाच्या तयारीला लागले, आणि सामान्य सैनिक शेवटच्या धार्मिक कार्यांना! शेवटी २८ जून रोजी क्रुसेडचे सैनिक मरणाच्या तयारीने शहराबाहेर पडायला तयार झाले. केरबोघाच्या सैन्यात संख्या प्रचंड असली, तरी दोन त्रुटी होत्या. एक म्हणजे वेढा घालणाच्या नादात त्याचं सैन्य विखुरलेलं होतं, आणि दुसरं म्हणजे, त्यातलं बहुतांश सैन्य हे केरबोघाच्या धाकाने युद्धात उतरलं होतं. ख्रिश्चन सैन्याचा एकध्येयी आवेश त्यांच्याकडे नव्हता.

२८ जूनच्या पहाटे बोहेमाँडच्या नेतृत्वाखाली क्रुसेडचं सैन्य ब्रिज गेटमधून बाहेर पडू लागलं. दरवाजा उघडताच सैन्यातल्या धनुर्धाऱ्यांनी बाणांच्या फैरी झाडल्या; आणि इस्लामी सैन्यला मागे रेटलं. मिळालेल्या पोकळीत शिरून ख्रिश्चन सैन्याने अर्धचंद्राकृती रचना केली आणि त्वेषाने लढू लागले. युद्ध पेटलंय हे उत्तरेकडे असलेल्या केरबोघाला, सिटाडेलवर फडकलेल्या काळ्या झेंड्यावरून कळालं…आणि इथेच तो धुरंधर सेनानी चुकला!

युद्धाला तोंड लागल्याचं कळताच केरबोघाने आपली मुख्य फौज धाडायला हवी होती, पण तो शांत राहीला! पूर्ण ख्रिश्चन सैन्य अजून बाहेरच्या बाजूला आल्यावर एकदम झडप घालून अँटीऑखचा एकदाचा निकाल लावू, या विचाराने तो शांत राहीला. (या घटनेबाबत अशी अफवा आहे, की केरबोघा त्यावेळी बुद्धीबळाच्या एका डावात खूप रंगला होता, म्हणून त्याने काहीच हालचाल केली नाही!) पण त्याची ही चाल यशस्वी ठरण्यासाठी लागणारा धीर त्याच्यात राहीला नाही. ख्रिश्चन सैनिक आवेशाने टिकून राहिले, आणि ज्याक्षणी केरबोघाची मुख्य कुमक लढाईपाशी पोहोचत होती, त्याचक्षणी तिकडच्या मुस्लिम सैन्याने कच खाल्ली! ते पळू लागले आणि त्यामुळे नव्या कुमकेतही गोंधळ उडाला. या क्षणी केरबोघा आपल्या माणसांना टिकवू शकला नाही. एकामागून एक अब्बासिद सैनिक क्रुसेडर्सच्या आवेशाने भयभीत होऊन माघारी वळू लागले. आणि अक्षरशः सैन्याचा एकच भाग संपला असतांनाही, जीवावर उदार झालेल्या फ्रँकीश सैन्यापुढे केरबोघाला लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली! सगळंच संपलंय हे बघून त्या सिटाडेलमध्ये टिकलेल्या याघी सियानच्या माणसांनीपण शस्त्र टाकली..

आणि अँटीऑख ख्रिश्चनच राहीलं!

लेखक – शुभंकर अत्रे

संपर्क – atreshubhamkar@gmail.com

संदर्भ – The Crusades : Thomas Asbridge