नौशाद फोर्ब्स – एक कॉर्पोरेट किमयागार

आपलं आयुष्य हे इतक्या विलक्षण वर्तुळांमध्ये फिरत असतं की जणू काही जादूच वाटावी. डॉक्टर नौशाद फोर्ब्स आणि माझी भेट काहीशी अशीच झाली. 2008 साली अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी जेव्हा पुण्यात आलो, तेव्हा पुण्यातल्या काही भागांबद्दल आणि जागांबद्दल फार कुतूहल होतं. असाच एक भाग म्हणजे कोरेगाव पार्क. कधी एखाद्या मित्राला घेऊन, किंवा कधी एखाद्या ज्युनिअरला शोर्मा खाऊ घालता घालताच उपदेशाचे चार डोस पाजायला मी हमखास कोरेगाव पार्कला घेऊन जायचो. केपीच्या सगळ्या गल्ल्यांमधून दुचाकी फिरवत, विस्फारलेल्या डोळ्यांनी तिथले आलिशान बंगले बघायला फार आवडायचं मला. या सर्व बंगल्यांमध्ये, फक्त ‘फोर्ब्स’ अशी पाटी असलेला बंगला मला फारच आवडायचा. फोर्ब्स मार्शल या नामांकित कंपनीचे मालक, नौशाद फोर्ब्स यांचा तो बंगला. खरं सांगायचं तर भिंतीपलीकडे काहीच नाही दिसायचं. केवळ पांढरी भिंत, पांढरं गेट आणि ती पाटी. पण आतील काही जरी दिसत नसलं तरी देखील त्या फाटकाला देखील एक वेगळी ‘ग्रेस’ होती.

अशा बंगल्यात कधी शिरायला तरी मिळेल का आपल्याला? सहजच मनात विचार येऊन जायचा.

अभियांत्रिकीची चार वर्षे बघता बघता संपली. मला चेन्नईला कॅम्पस प्लेसमेंट मिळाली. परंतु माझ्या प्रेयसी दाक्षायणीला पुण्यात सोडून चेन्नईला जाण्यात मला अजिबातच रस नव्हता. मी पुण्यात एका स्टार्टअपमध्ये काम करू लागलो. दाक्षायणी देखील आकांक्षा फाउंडेशन नावाच्या संस्थेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. इंजिनियरिंग पूर्ण होताच मी वकिलीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. फक्त परिक्षेपुरतं जायचं. आठ नऊ महिने असं सर्वकाही सुरळीतपणे सुरु होतं. मग अचानकपणे असं वाटू लागलं की जर तीन चार वर्षांनी तशीही वकिलीचा करायची आहे तर आतापासूनच एखाद्या वकिलांच्या हाताखाली अनुभव घेऊयात.

तडकाफडकी मी नोकरी सोडली. आपटे म्हणून आमचे एक स्नेही, जे वकील देखील आहेत, त्यांच्या हाताखाली मी रुजू झालो. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मी देखील आकांक्षात अर्धवेळ रुजू झालो – गणित शिकविण्यासाठी. जोडीने दोन मुलींच्या घरी जाऊन शिकवण्या घेऊ लागलो.

हे सोंग देखील तीन महिन्यांच्या वर टिकलं नाही. एक-दोन वेळा आपटे सरांसोबत कोर्टात गेलो आणि तिथला थंड आणि गलथान कारभार बघून वकिली सारखं काम आपण केलं, तर काही दिवसांतच आपण फ्रस्ट्रेट होणार हे लक्षात आलं. आकांक्षा आणि शिकवण्या करताना फारच दमछाक व्हायची आणि पदरी तशी मामुली रक्कमच पडायची. असं स्वतःलाच थकविण्यापेक्षा एखाद्या कंपनीमध्ये अभियांत्रिकीशी संबंधित नोकरी केली तर फार फिरफिर न होता चांगला पगार देखील मिळेल, आयुष्याला थोडं स्थैर्य मिळेल असं वाटू लागलं. मी नोकरीच्या शोधात लागलो, परंतु मंदी होती. काही केल्या नोकरी मिळेना. एक महिना असाच शोधाशोधीत गेला.

हे सर्व चालू असताना दाक्षायणी आकांक्षात काम करत होतीच. ती ज्या सेंटर वर मुलांना शिकवायची, तिथे इक्वेडोर मधून हुलीओ नावाचा एक स्वयंसेवक आला होता. दाक्षायणीमुळे माझी देखील हुलीओशी ओळख झाली. रोज काम संपलं, की आम्ही त्याला पुणे दाखवायचो. खायच्या जागा, बाग-बगीचे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम इत्यादी.

बोलण्याच्या ओघात नवीनच माहिती कळली – हुलिओची आई आणि नौशाद फोर्ब्स स्टॅनफर्ड विद्यापिठातील वर्गमित्र आणि हुलीओ नौशादच्याच घरी राहात होता. इक्वाडोरला परत जायच्या आधी हुलिओची आणि आमची एक शेवटची भेट झाली.

“तुम्ही इतका वेळ काढून मला सगळीकडे फिरवलं आणि तुमच्या संस्कृतीशी मला परिचित केलं. मी काय करू शकतो तुमच्यासाठी?” कॉफी पिता पिता हुलीओनं विचारलं.

“मला माझ्या वेबसाईटसाठी नौशाद फोर्ब्स यांची मुलाखत घ्यायला फार आवडेल.” मी उत्तर दिलं.

“परवा सकाळी नौशादने मला 15 मिनिटे वेळ दिला आहे. मी तेव्हा त्यांना हे सांगतो,” हुलीओ म्हणाला.

हुलीओच्या बोलण्यावरून नौशाद फारच व्यस्त दिनचर्या जगत असावेत असा अंदाज आला. एकाच घरात राहून देखील त्यांची आठवडा-आठवडा गाठ पडायची नाही. पडली तरी तीन ते चार मिनिटांकरिता. हा असला महान माणूस आपल्यासारख्या रिकामटेकड्याला काय भेटणार! अजून एक महिना सरला. नोकरी काही हाती नव्हती. काही ठिकाणी इंटरव्हिव्हस होणार होते. मी हुलीओशी झालेलं संभाषण पार विसरलो होतो.

अचानक एके दिवशी सकाळी मला फोन आला – थेट नौशादच्या स्वीय सचिवांचा.

“उद्या नौशाद तुम्हाला भेटू शकेल. यायला जमेल का?” क्षणाचाही विलंब न करता मी ‘हो’ म्हणालो. हुलीओने टाकलेला शब्द खरंच कामात आला होता. नौशादने भेटायला फक्त दहा मिनिटे दिली होती. दहा मिनिटात काय बोलणार? मलाच प्रश्न पडला. निदान आपल्याला नौशाद काय चीज आहे हे बघायला तरी मिळेल, असा विचार करून मी तयारीला लागलो. तयारीची सुरवात बूट पॉलिश करण्यापासून झाली आणि सांगता ‘फॉर्मल’ शर्ट आणि पॅन्ट घेऊन!

दुसर्‍या दिवशी मी आणि दाक्षायणी आम्ही पावणे दहा वाजता फोर्ब्स मार्शलच्या कासारवाडीच्या ऑफिसला पोहोचलो. नौशादच्या स्वीय सहाय्यकाने आम्हाला अगत्याने त्याच्या केबिनमध्ये नेऊन बसवले. नौशाद कुठल्यातरी मीटिंगमध्ये असावा.

बरोबर दहाच्या ठोक्याला पन्नाशीतील एक अत्यंत तेजस्वी माणूस केबिनमध्ये आला. आम्हाला दोघांना काही कळायच्या आत आमच्याशी हस्तांदोलन करून तो त्याच्या खुर्चीत जाऊन बसला. त्याच्या वेग आणि ओघ बघूनच आम्ही सुन्न झालो.

“तुम्ही चहा, कॉफी काय घेणार?”, नौशादच्या बोलण्यात कुठल्याही प्रकारची औपचारिकता नव्हती.

नौशादचा फॉरेनर सारखा गोरा वर्ण, निळे डोळे, अत्यंत सफाईदार पण प्रेम आणि आपुलकीने भरलेली भाषा हे सर्व बघून आम्ही गारच झालो. पुढचे दहा मिनिटं आम्ही नौशादशी बोलत होतो. मी विचारलेल्या प्रश्नांना तो अत्यंत सध्या आणि प्रेमळ भाषेत उत्तरे देत होता.

आमची दहा मिनिटे बघता बघता उडाली. मी आणि दाक्षायणी दोघेही जायला निघालो. नौशादच्या डोक्यात मात्र काहीतरी सुरू होतं.

“जरा थांबा. मी तुमच्यासाठी काही करू शकतो का? तू सध्या काय करतोस?” नौशादनं मला विचारले.

“सध्या तरी मी नोकरी शोधतो आहे. मी उत्तरलो.”

“मग तू इथेच काम का नाही करत?” नौशादनं सरळ अशी ऑफर देणं फारच विलक्षण होतं.

त्यानंतर एका आठवड्यातच मी फोर्ब्स मार्शलमध्ये रुजू झालो. माझ्या एकंदरीत साडे तीन वर्षांच्या कालावधीत अनेक वेळा नौशादला जवळून पाहण्याचा, त्याच्यासोबत काम करण्याचा योग आला. नौशादचा मला सर्वांत आवडलेला गुण म्हणजे त्याच्या मनाचा मोठेपणा. मनाचा ‘उदात्त’पणा म्हणजे काय हे मी नौशादला पाहून शिकलो.

दर महिन्यातून एकदा नौशाद कडे M. D. P. म्हणजेच मॅनेजर डेव्हलपमेंट प्रोग्राम व्हायचा. नौशाद अर्थशास्त्र, राजकारण किंवा सामाजिक पुस्तकातून काही उतारे निवडून 20 लोकांच्या ग्रुपला पाठवायचा. आणि मग महिन्याच्या शेवटी त्या विषयावर नौशादकडे गप्पा, विचारमंथन व्हायचं. इतर कंपन्यांमध्ये अशा सेशन्सला फार वरच्या पदावरची लोक असतात. फोर्ब्स मार्शलमध्ये हे दरवाजे सर्वांना खुले होते. नौशादने आपणहून माझं नाव या ग्रुपमध्ये टाकलं होतं. पहिलं सत्र नेमकं माझ्या वाढदिवशी 27 जूनला आलं. मी नौशादच्या घरी जात असतानाच जोरात पाऊस सुरू झाला. त्यावेळी चारचाकी गाडी नसल्यामुळे मी दुचाकीवर होतो. आडोसा घेत घेत स्वतःला फार ओलं न होऊ देता मी वेळेत नौशादकडे पोचलो. काही मिनिटांतच नौशाद देखील पोहोचला. नौशादचं चालणं, बोलणं म्हणजे विजेच्या गतीनं. येताच आम्हाला ‘हाय’ म्हणून लगबगीने तो घरात गेला. दुसर्‍याच क्षणी लोकरीचं अत्यंत सुंदर जॅकेट हातात घेऊन नौशाद बाहेर आला.

“यु आर वेट अँड इट्स व्हेरी कोल्ड आऊट हियर” असे म्हणत त्याने ते अत्यंत महागडं जॅकेट माझ्या हाती सुपूर्द केलं. घरात जाताना नौशादनं माझ्याकडे फार तर एक नजर टाकली असेल; त्या तेवढ्या नजरेत मी भिजलो आहे आणि रात्री मला थंडी वाजणार हे ओळखून त्यानं स्वतःचं जॅकेट माझ्या हाती सुपूर्केद केलं. मी पुरता भारावलो. इतरांवर दबाव आणणारी आणि इतरांना तुच्छ भासवणारी श्रीमंती कुठे आणि नौशादची समोरच्या माणसाला आपलंसं करणारी श्रीमंती कुठे!

नौशाद अनेक मोठ्या कंपन्यांच्या संचालकपदी होता व आहे. कंपन्यांबरोबरच विद्यापीठं व अन्य संस्थांनाही तो मार्गदर्शन करत असतो. त्याची दिनचर्या इतकी व्यस्त असते की सर्व हिशोब मिनिटांत चालतो. तरीही अनेकवेळा आमच्याहून आधी ईमेल्स वर नौशादचे उत्तर यायचे. नौशादला माझ्याकडून किंवा इतर कोणाकडूनही काही माहिती हवी असली किंवा बोलायचं असलं की तो स्वतः आमच्याकडे यायचा. अनेक कंपन्यांमध्ये इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीला तुम्ही थेट भेटू नाही शकत. अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्या व्यक्तीला तुमच्याकडून काही हवे असले की त्यांच्या सहाय्यकांचा फोन येतो आणि मग तुम्ही पळत त्यांच्या केबिनकडे जायचं. नौशाद मात्र या सर्वांपासून फार वेगळा. कधीही भेटणार, हसून गप्पा मारणार. त्याला काम असल्यास तुमच्या डेस्कवर येऊन बोलणार.

नौशाद कितीही वरच्या किंवा खालच्या पदावरच्या व्यक्तीला आणि तिच्या विचारांना तितकेच लक्ष आणि महत्त्व देतो. अनेक वेळा मिटींग्समध्ये असा अनुभव आला की माझे विचार इतर कोणालाच पटले नाही परंतु नौशादला त्यात पुसटशी शक्यता दिसली आणि त्याने लगेच त्या दिशेने काम करायला परवानगी दिली आणि इतरांना देखील ‘याला पूर्ण साहाय्य करा’ असे सांगितले. नौशादची नजर देखील विलक्षण तयार. पाणी कुठे झिरपते आहे हे नौशादला एका क्षणात कळायचे. एकदा आम्हा 10 नवीन रुजू झालेल्या अभियंत्यांचे प्रेझेन्टेशन होते. नौशाद, कंपनीतील इतर काही संचालक आणि आम्हा दहा अभियंत्यांचे बॉस अशा सर्वांसमोर हे प्रेझेन्टेशन होते. एक अभियंता त्याचे मुद्दे मांडत होता आणि मागे मोठ्या स्क्रीनवर त्याची एक भलीमोठी किचकट स्लाईड झळकत होती. त्या स्लाईड मध्ये इतकी आकडेमोड आणि आकडे होते की अनेकांनी ती वाचली देखील नाही. ती स्लाईड केवळ दहा क्षण झळकली असेल. त्या अभियंत्याचे प्रेझेन्टेशन झाल्यावर सर्वांनी भारावून टाळ्या वाजवल्या आणि त्याचे अभिनंदन केले – इतका सखोल अभ्यास केल्या बद्दल. नौशादने त्या अभियंत्याला परत ती स्लाईड उघडायला सांगितली. क्षणात त्या अभियंत्यांचा चेहरा घामाघूम झाला. एका विशिष्ट आकड्याचा उल्लेख करून नौशाद ने ‘हा आकडा तू कसा मोजला?’ असा प्रश्न त्या अभियंत्याला विचारला. तो पॅरामीटर मोजायचे यंत्रच कंपनीत नव्हते. त्या अभियंत्याने ती अक्खी आकडेमोड दुसरीकडून उचलून स्लाईडमध्ये टाकली होती हे नंतर निष्पन्न झाले.

आपल्याकडून सुटून जातात अशा अनेक गोष्टी नौशाद एका क्षणात पकडायचा. नौशाद नेहमी असे प्रश्न विचारायचा की समोरच्या माणसाने खरंच काम केलं आहे की नाही हे एका क्षणात उलगडायचं. नौशादकडे वेळ कमी असल्यामुळे एका क्षणात सर्वकाही उलगडण्याची त्याने जणू काही हातोटीच विकसित केली होती.

नौशादची स्मरणशक्ती देखील अचाट. अनेक वेळा लोकं त्याला खुश करण्यासाठी काहीतरी बोलून जायचे आणि स्वतःच विसरून जायचे. नौशाद मग त्यांना पुढच्या मिटींग्समध्ये बरोबर पकडायचा. वीस, तीस वर्षांपूर्वी घडलेल्या मिटींग्स मध्ये चर्चिल्या गेलेले मुद्दे त्याच्या डोक्यात ताजे असायचे.

माझ्या आणि दाक्षायणीच्या लग्नाचे मी जेव्हा नौशादला निमंत्रण दिले, तेव्हा ‘मी नक्की येणार’ असे तो क्षणात म्हणाला. आमच्या लग्नाच्या दिवशी एका मीटिंग साठी नौशाद पुण्याबाहेर होता आणि तिथेच राहणार होता. हे मला माहित असल्यामुळे मी नौशाद येणार नाही असेच गृहीत धरून चाललो होतो. परंतु, नौशादने दिलेला शब्द पाळला. नौशादच्या तेजोमय अस्थित्वाने आमच्या लग्नाला एक वेगळीच शोभा आली.

अनेकवेळा उद्योजकांमध्ये आणि त्यांच्या वागण्यात एक प्रकारची घाई, किंवा ताण किंवा एक प्रकारचा बनेलपणा दिसतो. समोरच्या व्यक्तीला तोलायची आणि जोखायची वृत्ती दिसते. नौशादच्या नजरेत आणि बोलण्यात प्रेम आणि आपलेपणा जाणवतो. नौशादचे बोलके डोळे नितळ आणि स्वच्छ असतात. नौशादकडे आलेल्या गरजूला रिकाम्या हाताने जाताना मी तरी पाहिले नाही आहे. नौशाद ज्याप्रकारे माणसांवर विश्वास ठेवतो आणि त्यांना त्यांच्या कामात यशस्वी होण्यास साहाय्य करतो, ते फार विलक्षण आहे. आज माझ्या स्वतःच्या व्यवसायात आणि आमच्या बैठक फाउंडेशनच्या कामात नौशादकडून शिकायला आणि बघायला मिळालेल्या या सर्व गोष्टींचा कल्पनेतून अधिक फायदा होतो.

आज कार्पोरेट जग जीवघेण्या स्पर्धेने आणि प्रचंड ताणाने वेढलेले आहे. कंपन्याच त्यांच्या कर्मचार्‍यांना काहीही करून ‘आउटपुट’ दाखवा असे म्हणत चुकीच्या मार्गाला लागण्यास प्रेरित करीत आहेत. या सर्व वातावरणात नौशाद फोर्ब्स हे नाव उत्तुंग दीप स्तंभासारखे आहे. नौशादचे विचार आणि त्याच्या कृती बघून आजचे उद्योजक आणि लीडर्स आकाशाला गवसणी घालू शकतील.