हा प्रवास सुंदर आहे!

Books Makes Life Beautiful

[Image Source: Link]

वेळ कधीची? सांगता येणं अवघड आहे. पण ते हॅरी पॉटरच्या सिनेमात असतं ना तसं ढगाळ काळवंडलेलं वातावरण. खोलीचं दार उघडून मी आत प्रवेश करतो. तशी बाकी खोली रिकामी आहे, मात्र चोहोबाजूंना अगदी आभाळापर्यंत जाणारी पुस्तकांची कपाटं! आणि त्या खोलीच्या दरवाज्यावर माझं नाव! हे स्वप्न आजवर मला कितीदा पडलंय याची गणती नाही. मला वाचायला आवडतं, म्हणून मी सतत वाचतो, मजेत वाचतो, धुंदीत वाचतो. जे जे, जेव्हा जेव्हा, जसं भावलं ते मी तसं वाचत गेलो. मी कोणी पट्टीचा चौफेर वाचन करणारा आहे अथवा मी इतर लोकांपेक्षा फार जास्त वाचलंय असा माझा बिलकुल दावा नाही. कारण मला माहितेय की तसं नाहीये. मला आठवतंय तसं साधारण शाळेत सातवी-आठवीत असताना मला माझ्या वाचनाचा एकप्रकारचा दंभ चढला होता. मात्र पुढे माझं वाचन जसं-जसं अधिक सखोल आणि प्रगल्भ(?)होत गेलं तशी मला लख्खपणे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे वाचनाच्या क्षेत्रात आपण जेवढं जास्त वाचत जाऊ तेवढं आपल्याला समजतं की आपण किती कमी वाचलंय ते!

मला नेहमीच वाचन हे अणुऊर्जेसारखं वाटतं आलं आहे. शेवटी वाचनसुद्धा अणुऊर्जेप्रमाणे एक शृंखला प्रक्रियाच आहे. (या व्यतिरिक्त वाचन आणि अणुऊर्जा यांचा नीट निचरा न झाल्याने म्हणा अथवा ती प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेल्याने होणारे परिणाम धक्कादायक अन् त्रासदायक असतात. पण सध्या ते आपण बाजूला ठेऊ.) आपण एक पुस्तक वाचत असताना आपल्याला इतर शेकडो नवीन संदर्भ सतत सापडत असतात. आणि नवे संदर्भ लागल्यावर पुन्हा त्याच्या मागे मुशाफिरी करत फिरणं अनायासे आलंच! माझं हे म्हणणं एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. भारताचा स्वातंत्र्य संग्राम आणि त्यातही बापूजी व 1945 ते 1948 चा कालखंड हा माझ्या विशेष आवडीचा विषय. साधारण 11वीत असताना वाटलं की भारत समजून घेण्याच्या दृष्टीने भारतीय स्वातंत्र्य लढा समजावून घेणं आवश्यक आहे. आणि मग त्याचा अभ्यास सुरु झाला. आता सुरुवातीला मी आधुनिक भारताच्या इतिहासावरची बिपीन चंद्रा, ग्रोव्हर, शेखर बंडोपाध्याय इ. अभ्यासकांनी लिहिलेली ‘स्टँडर्ड’ पुस्तकं वाचायला सुरुवात केली. स्वातंत्र्यसंग्रामाचा हा सलग, समग्र मात्र थोडक्यातला इतिहास समजून घेताना यातलं गांधीजींचं व्यतिमत्व, त्यांचं सामाजिक आणि राजकीय संघटकाचं कौशल्य विशेष भावलं. मग त्यातून गांधीजी समजून घ्यावेत या इच्छेने गांधींजीवरचं वाचन सुरु झालं. यात सुरुवातीला स्वतः बापूनी लिहिलेलं लिखाण वाचनात आलं. आणि त्यांनतर बापूंवर लिहिलं गेलेलं वाचायला सुरुवात झाली. त्यांच्यावरचं लिखाण वाचताना कुरुंदकर भेटले आणि प्रचंड आवडले. मग तिथून आमची कुरुंदकरी चालू झाली. कुरुंदकरांचे लिखाण वाचताना भारताचे एकूण राजकारण आणि त्यातही विशेषतः फाळणीच्या संदर्भात असणार्या घटनांचे त्यांचे अजब अन्वयार्थ वेड लावून गेले. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांच्यापाशी असताना हमीद दलवाई भेटले. मग हमीदभाईंच्या मागे लागणं सुरु झालं. त्याअनुषंगाने मग आता भारतातील मुस्लिम राजकारण, सांप्रदायिकता आणि सेक्युलर भारताची मांडणी याचा अभ्यास करायला प्रेरणा मिळाली. आणि ही एका बाजूची शृंखला अशीच चालू आहे. दुसरीकडे फाळणीचा अभ्यास करायला घेताना इतिहासाच्या अनेक पुस्तकांत आणि विचारवंतांच्या बोलण्यात डॅनिमिक लॅपीएर आणि लॅरी कॅलिन्स या पत्रकार द्वयींनी लिहिलेल्या, ‘द फ्रीडम ऍट मिडनाईट’ या पुस्तकाचा सतत उल्लेख येई. म्हणून ते वाचण्यात आलं. पुढे यात त्यांनी माऊंटबॅटन यांचे एक सेक्रेटरी असणार्या अॅलन कॅम्पबेल-जॉन्सन यांच्या मेमॉयर्सचा उल्लेख केला होता. तेव्हा मग कॅम्पबेल-जॉन्सन यांचं, ‘मिशन विथ माऊंटबॅटन’ हे पुस्तक वाचण्यात आलं. या दोन्ही पुस्तकांचं ऐतिहासिक मूल्य खूप असलं तरी ही पुस्तकं माऊंटबॅटन यांची बाजू योग्य मानून लिहिली गेली होती. (याशिवाय माउंटबॅटन यांच्या कन्येनं लिहिलेलं ‘द इंडियन समर’ हे एक पुस्तक आहे पण मला ते थोडं बोअर वाटलं) तेव्हा मग याच काळाबाबत भारतीय नेतेमंडळींनी काय लिहिलंय हे पाहायला सुरुवात झाली. यात एकतर गांधीजींचा पत्रव्यवहार व बाबू राजेंद्रप्रसाद किंवा मौलाना आझाद यांसारख्या नेते मंडळींच्या आत्मचरित्रांचा समावेश करावा लागेल. मात्र याच दरम्यान थोर भारतीय पत्रकार दुर्गा दास यांनी लिहिलेलं, ‘इंडिया फ्रॉम कर्झन टू नेहरू अँड आफ्टर’ हे पुस्तक सापडलं. दुर्गा दास हा सरदार व नेहरूंच्या नेहमीच्या बैठकीतील माणूस होता आणि दुसरं म्हणजे एक पत्रकार म्हणून त्यांनी त्याकाळातील सर्व महत्वाच्या घटना प्रत्यक्षात कव्हर केल्या होत्या. म्हणून हे पुस्तक विशेष वाचनीय ठरते. पुन्हा ते पुस्तक वाचताना आणि बरेच नवे संदर्भ सापडले आणि मग पुन्हा त्यांच्या मागे पळणं सुरूच आहे. तर अशी ही पुस्तकांची आणि वाचनाची अजब अथांग दुनिया मला नेहमीच फशी पाडत असते.

पुस्तकांवर आणि वाचनावर लिहिताना एक प्रश्न मला सतत आठवत रहातो. पुस्तकं अथवा वाचन हे साध्य मानायचं की साधन? लहानपणी पुस्तकं वाचताना वाचन हेच जणू साध्य आहे अशा भावनेनं मी वाचायचो. पण जसजसा वाचनातला डोळसपणा वाढत गेला तसा प्रश्न पडायला लागला की मी का वाचतो? माझ्यासाठी वाचन हे ज्ञान मिळवायचा एक स्रोत आहे. म्हणजे मला आवश्यक असणारी एखादी माहिती जर पुस्तकाव्यतिरिक्त दुसरीकडे कुठे उपलब्ध असेल तर मी वाचन बाजूला ठेवायला कचरत नाही. मात्र पुस्तकांच्या सहवासात जो आनंद आणि जिव्हाळा मिळतो तो मला इतर ठिकाणी सापडत नाही हे बाकी खरं! यातूनच दुसरा प्रश्न पडतो तो म्हणजे, समजा भविष्यात आवश्यक सारं जर पुस्तकांव्यतिरिक्त इतर साधनांतून उपलब्ध झालं तर मी वाचेन का? आणि काय वाचेन? बाकी माझ्यासाठी यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आहे पण अद्यप त्यात सुस्पष्टता नाही हेही खरं.

वाचन आणि पुस्तकांच्या या आवडीतूनच मी पुढे वाचनावर लिहिलेल्या कथा, उत्तमोत्तम आणि थोर वाचकांचे लेख, विविध अभ्यासकांनी त्यांना पुस्तकांनी काय दिलं असे विचार मांडणारे लेख आवडीने वाचायला लागलो. यातही थोर संपादक अरुण टिकेकरांनी लिहिलेलं,‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ हे पुस्तक विशेष भावलं. ज्या माणसाला स्वत:चं वाचन अधिक उत्तम आणि प्रगल्भ करायचं असेल अशा प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे असं मला वाटतं. ही पुस्तकं वाचताना जाणवलं की वाचनाची आवड असणं वेगळं आणि उत्तम वाचता येणं वेगळं! माझ्या आसपासच्या अनेक मंडळींना वाचायला आवडतं खरं, पण त्यांचं वाचन तारुण्यसुलभ कादंबर्यांच्या पुढे कधी गेलंच नाही. म्हणजे कादंबरीपेक्षा वैचारिक लिखाण श्रेष्ठ असत असं काहीही भंपक मला म्हणायचं नाहीये. मात्र ललित लेखनात सुद्धा विविध दर्जा असतोच की! उदाहरणार्थ कादंबर्यांचा विचार करताना आपण चेतन भगत आणि मार्कवेझ यांना एकाच पंक्तीत बसवू शकत नाही ना! तेव्हा उत्तम आणि थोर वाचकाचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांना त्यांचे वाचन ‘देश-काल-परिस्थिती’ अनुसार बदलता येते.

Books Makes Life Beautiful
[Image Source: Link]

पुढचा प्रश्न येतो तो वाचनाच्या आवडीचा. तसं खरं पाहता वाचनाचे हे वेड कोणालाही कधीही लागू शकते. मात्र मध्यंतरी हॉर्वर्ड मधल्या न्यूरॉलॉजिस्टनी एक निष्कर्ष मांडला त्यानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून वाचनाची सवय जडते त्यांच्या मेंदूची वाढ अधिक वेगाने आणि सक्षमपणे होते. वाचनाच्या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला अगदी लहानपणाचं जेवढं आठवतंय तेव्हापासून वाचन अथवा त्याच्याशी निगडित गोष्टी मी करत आलोय. अगदी दोन वर्षांचा असल्यापासून मला आमच्या घरात कोणी ना कोणी दररोज किमान पाच गोष्टी वाचून दाखवायचं. यात नवनीत विकासमाला, रामायण-महाभारतातल्या गोष्टी, इसापनीती, जातककथा इत्यादींचा समावेश असे. सहाजिकच वाचायला येऊ लागल्यावर मी हट्टाने का होईना पण घरच्यांकडून ती पुस्तक ओढून घेऊन वाचायला लागलो. दुसरं म्हणजे अगदी 7 वर्षांचा असल्यापासून मला आई-बाबांनी ग्रंथालयाची सवय लावली. आमच्या देवरूखच्या सार्वजनिक वाचनालयात लहान मुलांसाठी उत्तम पुस्तकं उपलब्ध होती, अजूनही आहेत. मी रोज संध्याकाळी तिकडं जाऊन आणि जुनं पुस्तक बदलून नवीन पुस्तक घेऊन यायचो. पुढे शाळेत जाऊ लागल्यावर शाळेचं ग्रंथालय उपलब्ध झालं. इथे मला एक निरीक्षण नोंदवावसं वाटतंय. जुन्या अभ्यासकांची पुस्तकं वाचताना त्यात हटकून त्यांना शिक्षकांनी कशी वाचायची सवय आणि गोडी लावली याचा उल्लेख असायचाच. दुर्दैवाने आज फार दुर्मिळ अपवाद सोडले तर असे पुस्तकांची आवड लावणारे शिक्षक सापडतच नाहीत.(हे असं म्हणायला मी काही कोणी प्रौढ माणूस नाही पण माझा आणि माझ्या विविध शाळेत शिकलेल्या मित्रपरिवाराचा अनुभव हा असाच आहे, म्हणून हे मांडायला धजावतोय) शाळेत हे सारे उपद्व्याप करत असताना एका गोष्ट आज जाणवतेय. ती म्हणजे निदान तेव्हा तरी माझं वाचन बहुतांशाने मराठी पुरतंच सीमित राहिलं. त्यामुळे ज्यांना लहानपणापासून मराठी आणि इंग्रजी वा इतर भाषांतील वाचायला मिळालं त्यांचा मला फार हेवा वाटतो.

लहानपणीच्या वाचनावरून आठवलं. एकदा माझ्या एका वाचनवेड्या मैत्रिणीशी गप्पा मारताना तिने मला एक प्रश्न विचारला होता. आपण लहानपणी वाचलेल्यातलं आपल्याला किती आठवत असतं? तसही आपण त्यावेळी वाचलेलं जवळपास सगळंच पदवीधर होइपर्यंत किंवा बर्याचदा त्याच्या आधीच विसरून जात असतो. मग लहानपणी वाचलेलं सगळं फुकट गेलं असंच म्हणायचं ना? मला हा मुद्दाच मुळी फार मूलभूत वाटतो. कारण यातून वाचायचं कशासाठी हा प्रश्न आपल्याला पडत असतो. एकादृष्टीने तिच्या म्हणण्यात तथ्य आहे. याबाबत माझ्या लहानपणीचं एक उदाहरण देतो. साधारण नववीत असताना मी पहिल्यांदा बट्राण्ड रसेल आणि जे. कृष्णमूर्ती ही नावं ऐकली. माझ्या एका काकाला हे दोघेही आवडायचे. त्याच्याकडे दोघांनी लिहिलेली बहुतेक सगळी पुस्तकं होती. तो अनेकदा त्यांच्यावर बोलायचा. (म्हणजे ‘डोस’ पाजायचा) तेव्हा त्याच्याशी वाद घालता यावा म्हणून मी या दोघांची काही पुस्तकं त्यावेळी वाचायला घेतली. एक म्हणजे ती पुस्तकं इंग्रजीतली, त्यात रसेल आणि कृष्णाजी. मी जिद्दीने ती वाचून संपवली. त्यातलं थोडंफार कळलं. मात्र 3-4 वर्षात त्यातलं काही ठीकपणे आठवेना. तेव्हा त्यावेळी लहान तोंडी घेतलेला तो मोठा घास तत्कालिन करणे व्यर्थच म्हणायचा. पण आज जाणवत की भलेही मला त्यातलं काही कळलं नसेल पण ते वाचनातलं समाधान आजही माझी सोबत करतं. यामध्ये पुढे येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाचन हे केवळ माहितीचे साधन अशा दृष्टीने त्याकडे पहाणे योग्य नाही, तर वाचन हा एक ‘संस्कार’ आहे. माहिती आज आपल्याला आठवेल उद्या आपण ती विसरून जाऊ मात्र मनावरचे संस्कार आणि वाचनाची मूल्य व्यवस्था चिरंतन आहे. तेव्हा मला वाचनाकडे फावल्या वेळेचा उद्योग अथवा छंद म्हणून पाहणारी मंडळी ‘जडवादी’ वाटत रहातात. माझ्यासाठी वाचन ही माझी हॉबी नाहीये तर वाचन ही हॅबीट बनली आहे.

आता हे सगळं लिहायचं प्रयोजन काय? वाचन आणि पुस्तकांवर अधिकारवाणीने मी लिहावं असा माझा काहीही अधिकार नाहीये. वाचणार्या अनेक वाचकांपेक्षा माझं वाचन कमी आहे याचीही मला जाणीव आहे. पण माझं पुस्तकांवर प्रेम आहे आणि प्रेमात सगळं माफ असतं. आमचं हे नवं मासिक सुरु होतंय. त्यामध्ये माझ्यापरीने हा खारीचा वाटा मी उचलतोय. या लिखाणाचा हेतू वाचनावर प्रेम असणार्या सार्यांनी एकत्र येऊन आपलं वाचन सर्वांप्रत पोहचावे हाच आहे. आजवर वाचताना पुस्तकांनी मला जे दर्शन दिलंय ते सर्वांसमोर मांडायच्या उर्मीतून हे लिखाण झालं. तसं वाचनावर, माझ्या आवडीच्या पुस्तकांवर लिहायला बरच काही आहे मात्र या लेखाचे ते प्रयोजन नाही. या लेखनाचा हेतू माझ्या वाचन प्रवासाची सुरुवात कशी झाली हे मांडायचा होता. खरंतर हा प्रवास असाच अनादी चालूच राहणार त्यामुळे या अनंताचे गुण अजून काय गाऊ??

संपर्क – atharvsurendra@gmail.com