बुंदेले हरबोलों के मूँह… – सुभद्रा कुमारी चौहान

सुभद्रा कुमारी चौहान

#दिवाळी_अंक_२०१८

सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी अलाहाबादच्या निहालपुर येथे रामनाथ सिंह यांच्या घरी झाला. लहानपणापासूनच त्यांना कवितेची आवड होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचे लग्न ठाकुर लक्ष्मण सिंह यांच्यासोबत झाले. गांधीजींकडून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या पतिसह स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला.

त्यांची सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेली कविता ‘खूब लडी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी’ या शिवाय त्यांनी ‘मुकुल’, ‘त्रिधारा’ आणि ‘प्रसिद्ध पंक्तियाँ’ या काव्यसंग्रहांमधून अनेक कविता लिहील्या आहेत. त्यांनी आजपर्यंत 3 कथासंग्रह ‘बिखरे मोती’, ‘उन्मादिनी’ आणि ‘सीधे साधे चित्र’ लिहीले आहेत. त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेतून प्रेरणा घेत भारतीय तटरक्षक सेनेने 28 एप्रिल 2006 रोजी नवनियुक्त तटरक्षक जहाजाला ‘सुभद्रा कुमारी चौहान’ असे नाव दिले. तसेच भारतीय टपाल विभागाने 6 ऑगस्ट 1967 रोजी त्यांच्या नावाचे तिकीट देखील जारी केले होते.

‘खूब लडी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी’ या ओळी ऐकल्या की आपल्या डोळ्यांसमोर शूरवीर झाशीच्या राणीची प्रतिमा उभी राहते. वीर रसाने ओतप्रोत असलेली ही कविता आबालवृद्धांमध्ये देशप्रेमाचा आणि वीर रसाचा संचार करते, मात्र देशाच्या कानाकोपर्‍यात झाशीच्या राणीचे शौर्य या अतिशय सुंदर अशा कवितेच्या माध्यातून पोहोचविण्याचे श्रेय जाते ते म्हणजे ‘सुभद्रा कुमरी चौहान’ यांना. या कवितेशी लहानपणीच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. या कवितेवर नृत्य करताना ही कविता पाठ झाली, झाशीची राणी बनून ही कविता अक्षरश: जगले आणि आता ही कविता आयुष्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग झाली.

सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भृकुटी तानी थी,

बूढे भारत में भी आई, फिरसे नयी जवानी थी ।

गुमी हुई आझादी की कीमत सबने पहचानी थी,

दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी ।

चमक उठी सन संतावन में वह तलवार पुरानी थी,

बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,

खूब लडी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी ॥

उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथील निहालपुर येथे 1904 मध्ये जन्मलेल्या ‘सुभद्रा कुमारी चौहान’ या त्यांच्या खूब लडी या कवितेमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यांच आयुष्य केवळ 44 वर्षांचं, मात्र या अल्पकाळात देखील हिंदी साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी अमिट असा एक ठसा उमटवला आहे. जगभरात राणी लक्ष्मीबाईचा इतिहास पोहोचविण्यामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे. आजही शाळेतील अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य आणि कविता पाठांतरांच्या स्पर्धांमध्ये आवर्जून ही कविता समाविष्ट करण्यात येते. आणि माझ्या सारख्या अनेकांच्या आयुष्याच्या आठवणी या कवितेशी जोडल्या जातात.

तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी

या शब्दांमधून त्यांनी झाशीच्या राणीसाठी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना आपल्या मनाला भिडतात हे नक्की. मात्र त्यांची ओळख केवळ या एका कवितेपुरतीच नाही. त्या जरी या कवितेच्या माध्यमातून जगभरात पोहोचल्या तरी देखील त्यांचे साहित्य वैविध्याने भरलेले, नटलेले आहे.

हिंदी पद्य साहित्याचा इतिहास खूप मोठा आहे. अनेक भागांमध्ये, युगांमध्ये विभागलेला. त्यातील आधुनिक काळातल्या प्रमुख कवि आणि कवयित्रींमध्ये त्यांचं नाव खूप सन्मानानी घेतले जाते. त्यांच्या लग्नानंतर त्या मध्यप्रदेशच्या जबलपुर येथे स्थायिक झाल्या. पती ठाकुर लक्ष्मण सिंह यांच्यासोबत स्वातंत्र्य आंदोलनात त्या सक्रीय झाल्या आणि आपल्या लेखणीने जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम जागे करण्याचा विडा त्यांनी उचलला. आज प्रत्येक जबलपूरकराला त्यांचा आभिमान आहे.

राष्ट्रवाद आणि सुभद्रा एक वेगळंच समीकरण शाळेत असताना त्यांना देशभक्तीपर कवितांच्या स्पर्धा विशेष आवडीच्या असायच्या. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या महान कवि कवयित्रींच्या कविता वाचनाची, पाठ करण्याची संधी मिळायची. सुभद्रा कुमारी चौहान यांचे स्थान आवडीच्या कवि-कवयित्रींमध्ये सगळ्यात वरचे आहे. आणि त्यामागचे कारण त्यांच्या कवितांमधील राष्ट्रवाद.

राष्ट्रवाद एक मोठी संकल्पना आहे. मात्र आपल्या काव्याच्या माध्यमातून ती सोप्या पद्धतीने देशाच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुभद्रा कुमारी चौहान यांनी केले आहे.

ज्यावेळी देशातील नागरिक पारतंत्र्याच्या बेडीत अडकले होते, तेव्हा त्यांच्या मनात आशेची एक किरण जागवण्यात त्याकाळातील कवि आणि कवयित्रींचे मोठे योगदान आहे. रामधारी सिंह दिनकर, मैथिली शरण गुप्त, गोपाल प्रसाद व्यास यांच्याच प्रमाणे सुभद्रा कुमारी चौहान यांनी देखील आपल्या लेखणीतून त्याकाळी लोकांना खर्‍या अर्थाने जीवंत केले.

1930 मध्ये आलेल्या त्यांच्या ‘मुकुल’ या पहिल्या काव्यसंग्रहातूनच त्यांच्यात असलेल्या प्रतिभेची जाणीव झाली. तसेच त्यांच्या काही ठराविक प्रसिद्ध कविता ‘त्रिधारा’ या नावाने प्रसिद्ध झाल्या. मात्र त्यांना खरी ओळख खूब लडी मर्दानी या कवितेमुळे मिळाली.

भारतात कवि भूषणापासून रामधारी सिंह दिनकर यांच्यापर्यंत अनेक असे कवि होऊन गेले ज्यांच्या काव्यांमधून खर्‍या देशप्रेमाचा संचार झाला. सुभद्रा कुमारी चौहान हे यामधील एक मोठे नाव आहे. त्यांच्या अनेक रचना प्रसिद्ध झाल्या त्यापैकीच एक म्हणजे वीरो का कैसा हो बसंत,

आ रही हिमालय से पुकार,

है उदधि गरजता बार बार

प्राची पश्चिम भू नभ अपार,

सब पूछ रहे हैं दिग-दिगन्त-

वीरों का कैसा हो बसन्त॥

कह दे अतीत अब मौन त्याग,

लंके तुझमें क्यों लगी आग

ऐ कुरुक्षेत्र अब जाग जाग,

बतला अपने अनुभव अनन्त-

वीरों का कैसा हो बसन्त॥

हल्दीघाटी के शिला खण्ड,

ऐ दुर्ग सिंहगढ़ के प्रचण्ड

राणा ताना का कर घमण्ड,

दो जगा आज स्मृतियाँ ज्वलन्त-

वीरों का कैसा हो बसन्त॥

त्यांच्या या ओळींमधून प्रखर राष्ट्रप्रेम, आणि संवेदनशीलता दिसून आली आहे. सामान्य माणसांसाठी असलेला वसंत ऋतु देशासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या वीरांसाठी किती वेगळा असतो, त्यांच्या साठी वसंत ऋतु म्हणजे काय हे सांगत सामान्य माणसाच्या मनात देशासाठी असलेलं अतुल्य प्रेम आणि सोबतच या देशाच्या वीरांसाठी मनात संवेदना त्यांनी या कवितेच्या माध्यमातून जाग्या केल्या आहेत.

जालियाँवाला बाग म्हटलं की आजही आपल्या डोळ्यात पाणी येते, जालियाँवालाबाग इथं झालेल्या हत्याकांडात असंख्य जीव गेले. या घटनेत शहीद झालेल्या सर्व नागरिकांना समर्पित त्यांची कविता जालियाँवाला बाग में बसंत देखील खूप प्रसिद्ध झाली.

कुछ कलियाँ अधखिली यहाँ इसलिए चढ़ाना,

कर के उनकी याद अश्रु के ओस बहाना।

तड़प तड़प कर वृद्ध मरे हैं गोली खा कर,

शुष्क पुष्प कुछ वहाँ गिरा देना तुम जा कर।

यह सब करना, किन्तु यहाँ मत शोर मचाना,

यह है शोक-स्थान बहुत धीरे से आना।

या ओळींमधून मार्मिकता, जालीयाँवाला बाग येथे घडलेल्या भयानक घटनेचे वास्तव आणि त्यानंतर सामान्यांच्या मनात उठलेला कल्लोळ सगळंच दिसून आले आहे. त्यांची खडी बोली हिंदी वाचकांच्या मनात घर करणारी आहे. सोपी आणि आपलीशी वाटणारी आहे. त्यांच्या साध्या सोप्या ओळींमधून दिलेला संदेश मना मनात पोहोचतो.

1922 मध्ये जबलपुर येथे झालेला ‘झंडा सत्याग्रह’ देशातील पहिला सत्याग्रह होता, आणि त्यात सुभद्रा कुमारी चौहान या देशातील पहिल्या महिला सत्याग्रही होत्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मधील एका पत्रकाराने त्यांना लोकल सरोजिनी असे नाव दिले होते.

भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी या स्वातंत्र्याचे स्वागत देखील मुक्त कंठाने आणि भावनिक शब्दांनी केले.

स्वतंत्र भारत या रचनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वागत केले,

आ, स्वतंत्र प्यारे स्वदेश आ, स्वागत करती हूँ तेरा।

तुझे देखकर आज हो रहा, दूना प्रमुदित मन मेरा॥

आ, उस बालक के समान, जो है गुरुता का अधिकारी।

आ, उस युवक-वीर सा जिसको, विपदाएं ही हैं प्यारी॥

आ, उस सेवक के समान तू, विनय-शील अनुगामी सा।

अथवा आ तू युद्ध-क्षेत्र में.

कीर्ति-ध्वजा का स्वामी सा॥

आशा की सूखी लतिकाएं, तुझको पा, फिर लहराईं।

अत्याचारी की कृतियों को निर्भयता से दरसाईं॥

ज्या कविमनाने स्वातंत्र्यासाठीचा लढा स्वत:च्या डोळ्यांसमोर बघितला आहे. ज्या कवयित्रीने या लढ्यात प्रत्यक्ष भाग घेत तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून नवऊर्जा निर्माण करत भाग घेतला, त्या कवयित्रीसाठी या स्वातंत्र्याचे स्वागत करण्याचा क्षण किती महत्वाचा, मोलाचा आणि मनाच्या जवळचा असेल ते या शब्दांमधून व्यक्त होत आहे. मात्र केवळ राष्ट्रवाद आणि सभद्राकुमारी चौहान हे एकच समीकरण हिंदी पद्य साहित्यात नाही, तर त्यांची अनेक समीकरणं या साहित्यात दिसून येतात.

बालमनाचा कानोसा घेणारी सुभद्रा मी लहान असताना शाळेत मला त्यांची एक कविता होती, त्याचा उल्लेख मी पुढे केलाच आहे. या कवितेमुळे एका वेगळ्या ‘सुभद्राचं’ मला दर्शन झालं, आणि ही सुभद्रा देखील मनात घरुन बसली.

आज पर्यंत सुभद्रा कुमारी चौहान म्हटले की डोळ्यांपुढे प्रखर राष्ट्रवादाची प्रणेती, झाशीची राणी लेखणीने साकारणारी आणि वीर रसाने ओतप्रोत असलेली कवयित्री सुभद्रा कुमारी चौहानच डोळ्यांसमोर येते. मात्र हिंदी पद्य साहित्यात एका वेगळ्या सुभद्राचे दर्शन देखील आपल्याला होते.

अनेकांसाठी त्यांच्या लहानपणापासूनच आवडणार्‍या कवितांमध्ये ‘यह कदंब का पेड अगर माँ होता यमुना तीरे’ ही कविता वरच्या स्थानावर असणार, माझ्या देखील आहे. या कवितेतून आपल्याला बाल मनाचा कानोसा घेणार्‍या सुभद्राचे दर्शन होतात.

यह कदंब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे।

मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे-धीरे॥

ले देतीं यदि मुझे बांसुरी तुम दो पैसे वाली।

किसी तरह नीची हो जाती यह कदंब की डाली॥

तुम घबरा कर आँख खोलतीं, पर माँ खुश हो जाती।

जब अपने मुन्ना राजा को गोदी में ही पातीं॥

इसी तरह कुछ खेला करते हम-तुम धीरे-धीरे।

यह कदंब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे॥

काय अपेक्षा असेल त्या लहानग्याची ? यमुनातीरी एक कदंबाचं झाड आणि त्याची आई एवढेच हवेय त्याला. बालपण, लहानपणीच्या छोट्या छोट्या मात्र खूप मोठ्या वाटणार्‍या इच्छा, आकांक्षा हे सर्व अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने सांगणारी ही कविता. लहानपणीच्या आयुष्यात हेच महत्वाचे असते, निसर्ग, आपले आईवडील आणि आपलं छोटंसं आयुष्य. असं म्हणतात की कवि खूप शब्दरंजन करुन लिहीतात, असलेल्या क्षणाविषयी खूप नटवून सजवून सांगतात मात्र सुभद्रा कुमारी चौहान यांच्या काव्याची खासियत म्हणजे त्यांच्या या कवितेतला साधेपणा. हा झगमगाट कदाचित मोठ्या लोकांना आवडत असेल मात्र बालमनात तर साधे, छोटे आणि सुटसुटीत आयुष्य असते, आपण सगळे जगलो तसेच ते आयुष्य सुभद्राजींच्या काव्यातून आपण पुन्हा एकदा जगू शकतो.

सुभद्रा कुमारी चौहान यांच्या काव्यशैलीतील वैविध्यं आपल्याला इथे दिसून येते. ओजपूर्ण शैली असलेली त्यांची ‘खूब लडी मर्दानी’ आणि निरागसतेने आणि वात्सल्याने नटलेली त्यांची ‘यह कदंब का पेड’ ही कविता त्यांच्या वैविध्यपूर्ण लेखनाची ओळख करुन देते.

बालपण जगत असताना आपल्याला कळत नाही की आपण नेमके काय जगतो आहोत, मात्र मोठे झाल्यानंतर सुभद्रा कुमारी चौहान यांच्या बालपणविषयीच्या कविता वाचल्यावर मात्र नक्की कळते की आपण नेमके काय जगलो.

बार-बार आती है मुझको मधुर याद बचपन तेरी।

गया ले गया तू जीवन की सबसे मस्त खुशी मेरी॥

चिंता-रहित खेलना-खाना वह फिरना निर्भय स्वच्छंद।

कैसे भूला जा सकता है बचपन का अतुलित आनंद?

ऊँच-नीच का ज्ञान नहीं था छुआछूत किसने जानी?

बनी हुई थी वहाँ झोंपड़ी और चीथड़ों में रानी॥

त्यांच्या या शब्दांमधून आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. खरेच आपण देखील असेल निष्फिकीर आणि निरागस आयुष्य जगलो नाही का? लेखन ही एक कला आहे, त्यातून वैविध्यपूर्ण लेखन त्याहून मोठी कला आहे. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या लेखनातून ही कला स्पष्टपणे दिसून येते.

हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवि गजानन माधव ‘मुक्तिबोध’ यांनी सुभद्राकुमारी चौहान यांच्या लेखनशैलीला ‘बेजोड’ म्हटले आहे. म्हणजे ज्यासारखे दुसरे काहीच नाही.

प्रेमकविता करणारी विरहातीत सुभद्रा :

प्रत्येक कविमनात प्रेम कवितांसाठी, विरह गीतांसाठी एक कप्पा ठरलेलाच असतो. अनेकांचा हा कप्पा सगळ्यांसमोर उघडला जातो, तर अनेकांच्या मनात असलेला हा कप्पा केवळ एकांतातच उघडता येतो. सुभद्रा कुमारी चौहानसारखी एक ओजपूर्ण कवयित्री प्रेम कविता देखील लिहीते यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र त्यांच्या अनेक प्रेम आणि विरहावर आधारित कविता आहेत ज्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रतीक्षा ही अशीच एक कविता..

बिछा प्रतीक्षा-पथ पर चिंतित,

नयनों के मदु मुक्ता-जाल।

उनमें जाने कितनी ही, अभिलाषाओं के पल्लव पाल॥

बिता दिए मैंने कितने ही, व्याकुल दिन, अकुलाई रात।

नीरस नैन हुए कब करके, उमड़े आँसू की बरसात॥

मैं सुदूर पथ के कलरव में,सुन लेने को प्रिय की बात।

फिरती विकल बावली-सी सहती अपवादों के आघात॥

‘वीरों का कैसा हो वसंत’ लिहिणार्‍या सुभद्रा कुमारी चौहान यांच्याच लेखणीतून हे शब्द बाहेर पडले आहेत. एका विरहिता नायिकेच्या भावना या शब्दांमधून व्यक्त झाल्या आहेत. त्यांच्या साहित्य वैविध्याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून दिसून येते.

कथाकार : सुभद्राकुमारी चौहान

आता पर्यंत आपण सुभद्रा कुमारी चौहान यांच्या वेगवेगळ्या शैलीतील भावातील कविता बघितल्या, मात्र त्यांनी गद्य साहित्य देखील तितक्याच प्रामाणिकपणे लिहिले आणि त्यांच्या गद्य साहित्याला देखील वाचकांचा तितकाच प्रतिसाद मिळाला. त्यांचा ‘बिखरे मोती’ नावाचा कथासंग्रह आहे. त्यांनी याबद्दल म्हटले आहे हे सर्व मोती एकाच शिंपल्यातून आलेले नाही, वैविध्याने नटलेले मोती आहेत. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे. या कथा माझ्या जीवनातील नसल्या तरी त्या माझ्या आहेत, तुमच्या नसल्या तरी तुमच्या आहेत, आणि कुणा ठराविक व्यक्तीच्या नसल्यात तरी सगळ्यांच्या आहेत.

त्यांची सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेली आणि माझी देखील आवडती कथा म्हणजे हींगवाला..

हींगवाला

त्यांची हींगवाला ही कथा खूप प्रसिद्ध झाली. ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या मनात घर करते. दूर देशातील हिंगं विकणारा एक खान आणि सावित्री यांच्यातील आई मुलाचं, म्हटलं तर मानलेलं म्हटलं तर अलिखित असं नातं. आणि एक तिर्‍हाईत माणूस असला तरी माणुसकीच्या नात्याने, मानलेल्या भावनांच्या नात्याने त्याने सावित्रीची केलेली मोठी मदत हे सगळं खूप सुंदर पद्धतीने प्रस्तुत करण्यात आलं आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रभक्तीच्या कविता लिहीताना सुभद्रा कुमारी चौहान यांच्या डोळ्यातल्या स्वातंत्र्याच्या धगधगत्या ज्वाला कविता वाचताना आपल्यालाही जाणवतात, तसेच त्यांचे भावनाशील मन या कथेतून आपणही वाचू शकतो.

सुभद्रा कुमारी चौहान यांच्या साहित्यात वैविध्य मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यांचे संवेदनशील मन. ओजस्वी कविता असू देत किंवा वात्सल्य रसाने भरलेली कविता, विरह कविता असू देत नाही तर समाजातील रूढी सांगणारी कविता, प्रत्येक साहित्यकृती वेगळी आहे, खास आहे.

1948 मध्ये सुभद्रा कुमारी चौहान यांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. जबलपुर – नागपुर रस्त्यावरील सिवनी जवळ कोंबडीच्या पिल्लांना वाचवत असताना त्यांचे वाहन झाडावर आदळले आणि भारतीय हिंदी साहित्याचा एक मोती निखळला, अगदी त्यांच्या साहित्यकृती बिखरे मोती प्रमाणेच.

हिंदी साहित्याच्या आणखी एक महान लेखिका आणि सुभद्रा कुमाची चौहान यांची बालमैत्रिण महादेवी वर्मा यांच्या हस्ते जबलपुर येथील त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्यावेळी त्या म्हणाल्या नद्यांची समाधी होऊ शकत नाही, दिव्याच्या वातीला सोन्यात मढवून ठेवलं तर कसं चालेल, हिंदी साहित्याचा एक तारा गेला, मात्र सुभद्राचा संदेश जगभरात पोहोचला पाहिजे, तिच्या कवितांच्या आणि साहित्याच्या रूपात ती अजरामर झाली आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांच्यावर त्यांच्याच रचनेतील ओळी किती चपखल बसतात,

मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी,

हमको जीवित करने आई वह स्वतंत्रता नारी थी ।

दिखा गयी पथ सिखा गयी हमको जो सीख सिखानी थी ॥

लेखक - निहारिका पोळ