हरपले श्रेय ‘अंगारवाटा – शोध शरद जोशींचा’

Sharad Joshi

लेखक - अथर्व देसाई

१.

“ तो दिवस खरोखरी भाग्याचा ज्यावेळी भारतातील ५२ कोटी शेतकरी म्हणेल, यावर्षी आम्ही फक्त आमच्या गरजेपुरतं पिकवणार- विकणार! तसं जर झालं तर इंडियाचं भारतावरचं राज्य एका दिवसात खालसा होईल!! पण असा दिवस उगवायला फार वेळ आहे…”

शरद जोशींच्याच शब्दांत सांगायचं तर मनुष्य आणि प्रकृती एकत्र आल्यानंतर निर्माण झालेला पहिला व्यवसाय शेती हा आहे. शेती संस्कृती सुमारे दहा हजार वर्षापेक्षा अधिक जुनी आहे आणि आजही राजकारण, अर्थकारण, समाजकारण, कला-साहित्य, धर्मसंस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रांचा एकसमयावच्छेद शेतीइतका इतर कोणत्याही व्यवसायात नाही. देशातील ६०% जनता आजही शेतीवर आपली उपजिविका भागवते. असं असुनही भीषण दारिद्र्य आणि अस्मानी-सुलतानी संकटांच्या घेऱ्यात पडलेला शेतकऱ्याइतका दुसरा कोणताही उत्पादक नाही.

गेल्या दहा-पंधरा वर्षातल्या सुमारे लाख-सव्वालाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं भीषण वास्तव आपल्यासमोर आहे. मानवाच्या तीन पैकी दोन मूलभूत गरजा शेतीवर अवलंबून असल्या तरी आपल्या नागर समाजाला शेतकऱ्याविषयी केवढी आस्था आहे हे आपण दर शेती आंदोलनाच्या काळात अनुभवतोच. आणि असं असुनही मुख्यतः शेतीवर उपजिविका असणाऱ्या शेतकर्यांची स्थिती ही आई खायला देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशा स्वरूपाची आहे.

पर्यावरणाच्या ऱ्हासाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यालाच बसतो आणि या अस्मानी संकटापासून दाद मागायला सरकारकडे जावं तर या संधीचा फायदा घेत अन्नधान्याची साठवण, काळेबाजार करणार्यांना पाठीशी घालणारं देखील सरकारच असतं. उत्पादन कमी आलं तर लेव्ही आणि जास्त आलं तर लिलाव या चक्रात शेतकरी वर्षानुवर्षे अडकला होता, आणि मायबाप सरकारच्या नावानं उठसूट गळे पाजारणाऱ्या आमच्या समाजवादी मानसिकतेतून सतत सरकारकडे मागण्या वगेरे चालू असणाच्या काळात शरद जोशींच्या रूपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मूलभूत विचार करून त्यावर तेवढेच मूलभूत उत्तर शोधून काढणाऱ्या आणि विचाराने अत्यंत आधुनिक अशी या देशातील बहुधा एकमेव अर्थवादी चळवळ उभी करणाऱ्या झंझावाताचा उदय झाला आणि तिथपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चेहरा-मोहरा कायमसाठी बदलून गेला. आपल्याकडच्या विचारवंत म्हणवणाऱ्या बहुतेक मंडळींनी ९० च्या दशकात उभ्या राहिलेल्या ‘शेतकरी संघटना’ या वणव्याची आणि तो पेटवण्याचं काम करणाऱ्या नेत्याची पुरेशी दखल अनेक कारणांनी घेतली नव्हती. मात्र भानु काळे यांनी लिहिलेल्या “अंगारवाटा…शोध शरद जोशींचा” या चरित्रामुळे आधुनिक भारताच्या जडण-घडणीतलं एक पर्व आपल्यासमोर उपलब्ध झालं आहे.

२.

“देश नासला नासला

उठे तोच कुटी

पिके होताची होताची

होते लुटालुटी

– समर्थ रामदास”

८० च्या दशकात चाकणच्या कांदा बाजारात कांद्याला रास्त भाव मिळावा या मागणीच्या निमित्ताने एका आंदोलनाची ठिणगी पेटली. बघता बघता ८५ पर्यंत कोकण वगळता शेती अर्थव्यवस्थेवर आधारलेला संपूर्ण महाराष्ट्र ‘शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’ अशी मागणी करणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा वणवा पसरला. ब्रिटिश कालखंडानंतर प्रथमच ग्रामिण भागातील जनता इतक्या संघटित स्वरूपात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ताठ मानेनं ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ या घोषणेसह रस्त्यावर उतरली. अक्षरशः कवडीमोलावर विकल्या जाणाऱ्या आयुष्यावर अंतिम तोडगा काढायच्या भावनेनं झपाटलेलं हे आंदोलन आचारविचारांनी पूर्णतः वेगळं होतं. दारिद्र्य आणि शेतीमालाचा भाव यांचा थेट संबंध आहे आणि शेतकऱ्यांच्या मानेवरचं सरकारी (व सांस्कृतिक) जोखड जोवर उचललं जात नाही तोवर हे असचं चालू राहणार हा सिद्धांत शरद जोशींनी मांडला. उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव या एककलमी मुद्द्यावर जात-पात, विचारधारा, राजकारण या पलिकडं जाऊन ‘शेतकरी तितुका एक’ होऊन शेतकरी संघटना उभी राहिली.

१९८० आणि ९० चे दशक हे भारतातील शेती आंदोलनाचं दशक म्हणून ओळखलं जातं. शरद जोशी निर्विवादपणे या काळाचे महानायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू झालेलं हे आंदोलन पंजाबपर्यंत पोहोचलं होतं. १९७८ चं चाकणचं कांदा आंदोलन ८० चं नाशिकपासून उभं राहिलेलं उसाचं आंदोलन, ८१ पासून निपाणी भागातील तंबाकू शेतकर्यांचं आंदोलन आणि याच दरम्यान विदर्भात पेटलेलं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, अशा सर्व आंदोलनांचे सूत्रधार शरद जोशी होते. भानू काळे लिखित या चरित्रात या चारही आंदोलनांचं विस्तृत चित्रण आपल्याला वाचायला मिळतं. या पुस्तकाचा रिव्ह्यु लिहिणाऱ्या अनेकांनी म्हटल्याप्रमाणे शरद जोशींचे आयुष्य हे एखाद्या कादंबरीच्या नायकाला शोभेल असच दिव्य आहे. महाराष्ट्रातील एका ब्राह्मण पोस्टमास्तराच्या घरात जन्माला आलेला मुलगा, साठच्या दशकात यु.पी.एस.सी.च्या परिक्षेत देशात दुसरा येतो, वडिलांच्या इच्छेसाठी पोस्टल सर्व्हिस स्वीकारतो, भारतातील नोकरीचा राजीनामा देऊन स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल पोस्टल युनियन या संस्थेत पदाधिकारी म्हणून रूजु होतो, आठ वर्षाची सेवा आणि अनुभव यानंतर त्याही नोकरीचा राजीनाम देऊन आंबेठाणला येतो आणि कोरडवाहू शेती करू लागतो. शेतकऱ्यांचं दारिद्र्यचं मूळ शोधून त्यावरचा उपाय शोधून काढतो, त्यावर आधारित संघर्ष उभारतो. हे सारचं अद्भुत आहे.

‘अंगारवाटा-शोध शरद जोशींचा’ या पुस्तकात जोशींचे संपूर्ण जीवन आपल्याला वाचायला मिळते. शरद जोशी हयात असतानाच या चरित्राचे लेखन झाले असल्याने हे पुस्तक एक प्रकारे शरद जोशींचे अधिकृत चरित्र आहे. (मात्र शरद जोशी हा काही एका पुस्तकाचा विषय नाही याची जाणिव हे पुस्तक वाचल्यावर झाल्याशिवाय रहात नाही.) हे चरित्र अधिकृत असले तरी कमिशन्ड खचितच नाही. या चरित्राचे काम हाती घेण्यामागचे प्रयोजन चरित्राच्या प्रास्तविकात भानु काळे यांनी मांडले आहे. १२ डिसेंबर २०१५ रोजी शरद जोशी गेले आणि तसही शेतकरी संघटना व शरद जोशींचे नेतृत्व यांची ताकद ९०-९१ पासूनच मोठ्या प्रमाणात घटायल सुरुवात झाली होती. असं असलं तरी महाराष्ट्राच्या शेतकरी जीवनावर या दोघांचाही प्रभाव अनन्यसाधारण होता आणि या परिणामाची योग्य ती दखल मराठी व अमराठी विचारवंत वर्तुळात घेतली गेली नव्हती; आजही घेतली जात नाही. क्रांतिसिंह नाना पाटलांनंतर शरद जोशींशिवाय एवढे प्रचंड आंदोलन ग्रामिण भागात (देशभर) उभे केले असल्याचे उदाहरण नाही. असं असतानाही अनभिज्ञतेचा व अनुल्लेखाने मारण्याचा प्रकार शरद जोशी आणि शेतकरी संघटनेच्या बाबतीत का झाला याचं चिंतन होणं आवश्यक आहे. जोशी आणि शेतकरी संघटनेच्या विचारांची दखल योग्यवेळी इतिहासाला घ्यावी लागेलच मात्र हे सर्व होण्यासाठी गरजेची असणारी एक मध्यवर्ती गरज म्हणून या चरित्राचे मूल्य अनन्यसाधारण आहे. शरद जोशींच्या आयुष्याचं शरद जोशी व्हर्जन या नात्याने तरी हे चरित्र महत्त्वाचं आहे. हीच या चरित्राची सर्वात महत्त्वाची बाजू आहे आणि हिच याची मर्यादापण.

३.

रचनेच्या दृष्टीने प्रस्तुत चरित्राचे मी तीन भाग करतो. पहिला भाग हा, जोशींच्या जन्मापासून ते स्वित्झर्लंडहून आंबेठाणला येइपर्यंतचा. दुसरा भाग अंगारमळा ते १९८८-८९ चा काळ. तीसरा भाग म्हणजे ९० पासून पुढे… यापैकी पहिला भाग हा माझ्या दृष्टीने अनुशंगीक स्वरूपाचा आहे. मात्र एका नेत्याची आणि विचारवंताची जडणघडण कशी होते याचे तपशील या काळात विपुल प्रमाणात सापडतात. ‘मातीत पाय रोवताना’ या चौथ्या प्रकरणापासून ते ‘राष्ट्रीय मंचावर जाताना’ या तेराव्या प्रकरणापर्यंतचा या चरित्राचा टप्पा माझ्या मते पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ९०-९१ चे वर्ष शरद जोशी आणि शेतकरी संघटनेच्या दृष्टीने वॉटरशेड वर्ष ठरतं, असं माझं मत आहे. सरकारी बंधनं कमी झाली, आता भारत सरकारने खा-ऊ-जा आर्थिक धोरणात पदार्पण केलं, जोशी मांडत असलेली आर्थिक दिशा वास्तवात येत आहे. अशा वेळी आंदोलक संघटनेचं राजकीय चळवळीत रूपांतर करण्याच्या संक्रमणाचा हा काळ आहे. या सर्वात निर्णायक कालखंडात शरद जोशींचे बहुतेक सर्व अंदाज चुकत गेले आणि परिणाम म्हणून ‘पुढचे संभाव्य पंतप्रधान’ अशी ख्याती निर्माण झालेल्या शरद जोशींना 2002 मध्ये आयुष्यात पहिलं आणि शेवटचं राज्यसभेवर खासदार म्हणून जावं लागलं. असा सगळा भाग चरित्र्याच्या तिसऱ्या टप्प्यात येतो.

आपल्याकडच्या बहुतेक चरित्रकारांना चरित्रनायक कसा बालपणापासूनच मोठा होता असं चित्र दाखवायला आवडतं, भानु काळे मात्र याला सन्माननिय अपवाद आहेत. कळत्या वयापासूनच आपण वेगळे आहोत याची जबरदस्त जाणीव शरद जोशींना होती हे स्वतः जोशींचे लिखाण वाचल्यावर समजतं. मात्र केवळ वेगळा असून चालत नाही तर ते वेगळेपण व्यवस्थित हाताळावं लागतं आणि आपल्या क्षमता सतत आजमावाव्या लागतात. जोशींमध्ये तरूण वयापासूनच अशी समजंस बंडखोरी आपल्याला दिसते.

७८ चं चाकण कांदा आंदोलन ते ८९ चा दिल्ली बोट क्लबवरचा पाचलाखांचा किसान जवान मेळावा ही दहा वर्ष निःसंशयपणे जोशींच्या आयुष्याचा परमोच्च बिंदू होती. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे १९७८ नंतरच्या अचघ्या चार-साडेचार वर्षांत शेतकरी संघटनेचा वणवा राज्यभर पसरला होता. हा सारा प्रपंच सुरु होताना हातात पैसा नाही, (कमावलेला जवळपास सगळा पैसा कोरडवाहू शेतीत करपला होता) पाठीशी कसलंही संस्थात्मक पाठबळ नाही आणि त्यात जातीने ‘बामन’ ! मात्र शुद्ध आर्थिक तत्त्वज्ञान आणि ‘ टेकुनी ती जनता शिर्षावरी जग उलथुनी या देऊ कसे!’ हा दुर्दम्य आशावाद या आधारांवर शेतकरी तितुका एक उभा ठाकला. आजही आर्थिक मुद्द्यांवर शेतकऱ्यांना एकत्र आणणे केवढ अवघड आहे.

आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, लोकांना आपल्या गरिबीची मूळं समाजावीत यासाठी जोशींनी वापरलेल्या क्लृप्त्या अजब होत्या. गावात शेतकरी भेटण्याची जागा म्हणून कित्येकदा लावणीचा फड आणि तमाशाच्या आधी शरद जोशींची भाषणं होत आणि मग बाकीचे कार्यक्रम किंवा आठवडी बाजाराच्या दिवशी चौकात उभं राहून भाषणं देणारे शरद जोशी. चाकणचे साने गुरुजी, मामा शिंदे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण चाकण गावठाण त्यांच्या सोबत फिरणारे जोशी असा सगळा त्यांच्या जडण घडणीचा काळ या चरित्रात विस्ताराने आणि रंजकपणे आलेला आहे.

शरद जोशी हे केवळ प्रचलित राजकारण्यांपेक्षा वेगळे होतेच मात्र प्रस्थापित समाजसेवकांपेक्षाही शरद जोशी फार वेगळे होते. आपल्याला भारत देशातील सर्वात मोठ्या उत्पादक वर्गाच्या समस्यांचा अभ्यास करून तोडगा काढायचा आहे असं ठरवल्यापासून शरद जोशींनी ग्रामसेवेपासून ते सामुदायिक शेती असे सर्व साचेबद्ध उपाय वापरून पाहिले मात्र अशा स्वरूपाच्या उपाययोजना फारतर पडलेल्या भगदाडाला ठिगळं लावू शकतात. संपूर्ण व्यवस्थाच जिथे ओरबाडायला बसली आहे अशा ठिकाणी या ठिगळांचा काही उपयोग नसतो याची जाणीव जोशींना या प्रयोगांच्या सुरुवातीच्या काळातच झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न अशा कोणत्याही एका अभिनिवेषाने सुटण्याची शक्यता नाही. जोवर शेतकऱ्यांच्या शोषणावर उभी राहिलेली ही व्यवस्था बदलली जात नाही, तोवर शेतकरी हा असाच उपेक्षीत राहणार हे जोशींनी ताडलं. शेतकऱ्यासाठी आहेत असं सांगितलं जाणाऱ्या कर्जमाफ्या, अनुदानं म्हणजे बुडलेल्या बँकेतले पोस्टडेटेड चेक आहेत, तथापि शेती मालाला रास्त भाव मिळाल्याखेरीज या दुष्टचक्राला अंत नाही अशी मांडणी जोशींच्या मनात तयार व्हायला लागली. भटक्या मानवी जीवनाला स्थैर्य देणारा मुख्य शोध शेतीचा होता. मानवी संस्कृतीची मुळं शेतीपर्यंत जाऊन पोहोचतात आणि उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा हा एकमेव व्यवसाय आहे आणि शरद जोशींनी असं मांडलं की आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार तुटण्याची आहे. जोशींचं हे सारं आयडिएशन चालु असतानाच्या शंभर सव्वाशे वर्षापूर्वी जर्मनीमधल्या कार्ल मार्क्सने देखील अतिरिक्त मुल्यांचा surplus value) सिद्धांत मांडून भांडवलशाहीची प्रेरणा ही कामगार वर्गाचं श्रम लुटण्याची आहे. परिणामी भांडवलशाहीच्या अंतर्गत विसंगतीमुळे ती लवकरच कोसळून पडेल हा सिद्धांत मांडला. मार्क्स बरोबर होता हे समजायला तो मेल्यानंतरची 30 वर्ष लागली, आणि जोशींना जाऊन तर आताशी 4 वर्ष होत आहेत.

४.

शेतकरी संघटना आणि शरद जोशी यांच्या कार्याचं व मांडणीचं महत्त्व या विचारांच्या अर्थवादी पायामध्ये आहे. तत्त्वज्ञान आणि विचारधारा सोडल्यास स्वतः जोशी हे पॉलिटिकली इनकरेक्ट आणि इनकन्व्हिनियंट व्यक्तिमत्त्व. हा बाबा काही खादीचा झब्बा-जॅकेट-टोपी घालणारा नाही, स्वतः विचाराने नास्तिक व अज्ञेयवादी, शेतकऱ्यांची बाजू घेतो म्हणून साम्यवादी व समाजवादींचा वैरी, शिवाय मुक्त अर्थव्यवस्थेेचा खंबाठोक समर्थक, उभी हयात काँग्रेसविरोधी राजकारण-समाजकारणात गेली पण भाजप वगैरे यांच्यासाठी जातीयवादी गिधाडं. मात्र इतके सगळे पायात पाय असताना देखील जात-पात, धर्म, संस्कृती याने विखुरलेल्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा नेता हा माणूस बनतो हे आश्चर्य आहे आणि भविष्यासाठीची आशाही. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव या एककलमी कार्यक्रमसह शेतकरी संघटना उभी राहिली. प्रस्तुत चरित्राच्या ‘शेतकरी संघटना, तत्त्वज्ञान आणि उभारणी’ या प्रकरणामध्ये या सगळ्याचा गोषवारा आपल्याला वाचायला मिळतो.

मराठी भाषा आणि शेतकऱ्याला शरद जोशींनी दिलेल्या शब्दांची आणि संकल्पनांची यादी फार मोठी होईल असं संघटनेचे कार्यकर्ते सांगतात आणि त्याची एक झलक या पुस्तकातून वाचायला मिळते. गेल्या तीस पस्तीस वर्षातील अशी एकही निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा नसेल ज्यात कोणितरी भारत-इंडिया ही तुलना केली नाही. भारत-इंडिया ही संकल्पना पहिल्यांदा शरद जोशींनी मांडली. जोशींच्या मनात या मांडणीने कसा आकार घेतला याचा आलेख प्रस्तुत चरित्रातुन वाचायला मिळेल. मात्र शरद जोशींनी भारत-इंडिया ही केवळ विभाजनरेषा न मांडता संघर्षरेषा म्हणून मांडली होती, ही बाब चरित्रात अधोरेखीत करण्यात आलेली नाही. इंडिया हा भारतावरील अन्यायाचा पापी आहे, लुटारू आहे अशा स्वरूपाचं बोलणं जोशींनी अनेकदा जाहीर सभांतून देखील केलं होतं. चरित्रकाराने सुरुवातीलाच नोंदवलेली आपल्याकडील विचारवंतांनी जोशी व संघटनेची योग्य ती दखल घेतली नाही. या तक्रारीचं मुख्य कारण जोशींच्या या मांडणीत येतं. आपल्यकडचा व्यवस्थांवर आणि धोरणांवर प्रभाव पाडणारा वर्ग हा इंडियाचा भाग आहे. ज्ञान व प्रसाराची सर्व प्रमुख साधनं इंडियाच्या ताब्यात आहेत अस असताना आपल्या मांडणीमुळे जर इंडियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणार असेल तर इंडियाने पोसलेल्या विचारवंत मंडळींकडून तुमची अवहेलना होणं स्वाभाविक होतं (पण योग्य नव्हतं)

विकास आणि प्रगतीची शरद जोशींनी केलेली ‘स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत जाणे’ ही व्याख्या अफाट आहे. व्यक्तीस्वातंत्र्य हे शरद जोशींसाठी अव्वल मूल्य होतं. स्वतः शरद जोशी टोकाचे व्यक्तीवादी. व्यक्तीनिष्ठ, स्वातंत्र्यवादी माणूस संघटना व समूहाच्या गणितात किती बसू शकेल याला काही स्वाभाविक मर्यादा आहेत, शिवाय जोशींमध्ये असली तरी अमर्याद स्वातंत्र्य पेलण्याची क्षमता सर्व जनतेमधे नव्हती. पण तरीही कदाचित गरजेपोटी असेल पण जनतेनं, शेतकऱ्यानं शरद जोशींना आपला नेता – देव मानलं होतं. ही गरज संपल्यावर जोशींची गांधींसारखी शोकांतिका होणं उघड होतं. जोशींच्या आयुष्यातलं नाट्य असं की ही शोकांतिकेची प्रक्रिया अधिक गतीमान होण्यासाठी ते स्वतःच हातभार लावणार होते.

विरोधाच्या व्याख्या सोप्या करत नेता येणं यामध्येही कोणत्याही आंदोलनाचं यश सामावलेलं असतं. शेतकरी संघटनेच्या पहिल्या टप्प्यात हे पथ्य जोशींमधल्या नेत्यानं पाळलं होतं आणि याच टप्प्यात संघटना तिच्या कारकिर्दिच्या परमोच्च बिंदूला पोचली होती. चरित्रात विस्तारानं आलं नसलं तरी शरद जोशींच्या भाषणांचे संग्रह वाचताना स्तिमित व्हायला होतं. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान यासारख्या अवघड व नाजुक विषय ज्या सफाईने आणि अत्यंत सोप्या शब्दांत जोशी मांडायचे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या व्यासपिठावरून जगभरात घडणाऱ्या सर्व तत्त्वचर्चा शेतकर्यांपर्यंत पोचायच्या. आपल्याकडे ढीगभराने असणाऱ्या राजकारणी वेशातला विचारवंत म्हणजे जोशी नव्हे हा राजकारण्याच्या वेशातील तत्त्वज्ञ आहे. १९०० सालापासून ऐंशी वर्षाच्या भारताच्या राजकीय पटलावर शरद जोशींचं येणं हा वॉटरमार्क आहे. लाख-दोन लाखांच्या सभा घेणारा हा नेता सर्वत्र जीन्स-टी-शर्ट/शर्टवर वावरायचा. वागण्याबोलण्यात कुठेही गुर्मी, आक्रस्ताळेपणा नाही पण मी जे बोलतोय तेच सत्य आहे हा माज असायचा. जोशींची मांडणी ही एखाद्या अव्वल विचारवंताची मांडणी होती. म्हणूनच कदचीत १९८० च्या सुमारार शरद जोशींचं वर्णन ‘जीन्स पँटमधला गांधी’ असं केलं जायचं.

शेतकरी महिला आघाडीची उभारणी हा तर एक चमत्कारच मानावा लागेल. प्रस्तुत चरित्रातील ‘किसानांच्या बाया आम्ही’ या प्रकरणात या सगळ्याची अप्रतिम प्रेरणादायी मांडणी चरित्रकाराने केली आहे आणि ती मुळातूनच वाचली पाहिजे. चांदवडचं महिला अधिवेशन ही आता आपल्या इतिहासातली एक निर्णायक अजरामर घटना आहेच. या अधिवेशनाला उपस्थित महिलांच्या संख्याचे आकडेवारी ही अडीच ते चार लाख असल्याचं विविध नोंदी सांगतात. उपस्थित सर्व महिलांनी साने गुरुजींचं ‘किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया’ व नारायण सूर्वेंचं ‘डोंगरी शेत माझं गं, मी बेनु किती’ ही गाणी एकत्र म्हंटली होती. हा कवी म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता हे उद्गार पुढे नारायण सुर्वे यांनी या क्षणाबद्दल काढले आहेत.

मात्र ‘विरोध’ या निव्वळ एका गोष्टीवर लोकं लढत राहू शकत नाहीत. लोकांची त्याग करण्याची क्षमता मर्यादित असते. आंदोलन छेडण्यासाठी, ते वाढवण्यासाठी आणि त्यातून गुणात्मक यश मिळवण्यामध्ये शरद जोशी माहीर होते, मात्र आंदोलनाचं चळवळीमध्ये रुपांतर आणि पुढे चळवळीचे राजकीय पर्यायामधलं रुपांतर इथे त्यांची सगळी गणितं बिनसत गेली.

५. “तुम्ही काळजी घ्या. तुम्ही दरवेळेला व्यवस्थेशी सौदा करता. आता सौदा तुमच्याप्रमाणे होतोय. पण तुम्ही त्याला तयार आहात हे व्यवस्थेला कळलं की एक ना एक दिवस व्यवस्था तिच्या फायद्याचा सौदा तुमच्याकडून करून घेईल. मग तुम्हाला मागे सारायला जागा उरणार नाही.” – चंद्रशेखर – शरद जोशींना शरद जोशींच्या आयुष्याचा आणि या चरित्राचा ग्राफ एकसारखाच आणि समांतर जातो आहे. १९७८ ते ९० या संघटनेच्या आंदोलनाच्या काळात जोशी देशातला सुपरस्टार होते, सातवे आसमांपर होते. या सगळ्या काळाचं विस्तृत चित्रण चरित्रात आलेलं आहे. मात्र ९० पश्चातचे जोशी जेमतेम २-३ प्रकरणात निपटले आहेत. प्रस्तुत चरित्राची बलस्थानं याच त्याच्या मर्यादादेखील आहेत.

भारतीय राजकारणाची शरद जोशींना जाण कितपत होती याचं काही विवेचन चरित्रातून आलेलं नाही. मात्र जोशींच्या सहकार्यांनी जे लिहून ठेवलं आहे त्यानुसार आणि स्वतः जोशींची राजकीय कारकीर्द पाहता भारतीय लोकशाहीच्या जोशींच्या आकलनावर युरोपीय लोकशाहीतील त्यांच्या अनुभवाचा पगडा होता असं जाणवतं. आणि शेतकरी संघटनेच्या सुरवातीपासूनच शरद जोशींपेक्षा आपल्या राजकीय वास्तवाची जाणीव जास्त असणारी माणसं कार्यरत होती. मात्र जोशींनी या मंडळींनी वेळोवेळी दिलेले सल्ले आणि मार्ग धुडकावून आपल्याला हवे ते संघटनेच्या गळी उतरवले होते आणि असा सगळा थोडासा कडवट भाग चरित्रातून अधोरेखित केला गेला नाहीये.

संघटनेच्या कामाला सुरवात झाली तेव्हापासून राजकारणापासून दूर राहण्याचा जोशींचा निर्धार होता. मी तुमच्याकडे मत मागायला आलो तर मला जोड्याने मारा हे शरद जोशी अनेकदा म्हणाले होते. संघटना वाढीच्या काळात एक कलमी कार्यक्रमाअंतर्गत शेतकर्यांना एकत्र आणण्यासाठी राजकारणापासून चार हात दूर राहण्याचा पर्याय गरजेचा असेलही. मात्र तरीही यात बाळबोधपणा होतं असं आज म्हणावं लागतं. १९८४ ते ८७-८८ या काळात संघटनेच्या पाठीशी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागांतील बहुतेक शेतकरी उभा होता. आणि आता भविष्य राखण्यासाठी संघटनेनं निवडणुकीच्या आखाड्यात उतरणं गरजेचं होतं. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून भाजपने जोशींना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन झाली होती. मात्र राजकारणातलं यश शरद जोशींच्या प्राक्तनात लिहिलं नव्हतं.

नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडे भारताच्या राजकीय पटलावर गोंधळ व जोशींच्या मनातला राजकारणाप्रतीचा गोंधळ समांतर जात होते. आघाड्यांच्या राजकारणाच्या काळात भारत प्रवेश करत होता. यातून प्रत्येकालाच प्रत्येकाची मदत गरजेची वाटत होती. ४० वर्षाच्या काँग्रेसच्या सत्तेविरुद्ध आता तरुण दमाचे राजकारणी आवाज उठवू पहात होते आणि त्यांना शरद जोशी हवेसे वाटत होते. या दृष्टीने ८९-92 ही चार वर्षे संघटना व जोशी यांच्या दृष्टीने निर्णायक होती व या काळाबद्दल चरित्रात फारच जुजबी माहिती सापडते. चरित्रातलं राजकारणाविषयीच लेखन एकसुरी आणि फारच नाकासमोर जाणारं आहे. या काळाविषयी अधिकच्या संशोधनासाठी प्रचंड वाव आहे.

कोणत्याही पुस्तकाची काही बलस्थानं असतात, काही नाजूक स्थानं असतातच. पुस्तकाचे सगळे गुणदोष लक्षात घेऊनही saदर चरित्र हे मराठीतील चरित्र लिखाणाचा एक दीपस्तंभ ठरेल. माझ्यासाठी या पुस्तकाचे सगळ्यात मोठे महत्त्व म्हणजे यातून देशाच्या भवितव्यासाठी आणि लोकशाहीसाठी उदंड आशावाद जागृत होतो. पैसे, सडलेल्या वैचारिक आणि सामाजिक यंत्रणा व त्यावर पुन्हा ठोकशाहीच्या काळात एक माणूस निव्वळ विचारांच्या आधारे प्रचलित सर्व प्रकारचं भंगार बाजूला सारून एक चळवळ उभी करतो आणि त्याला ‘न भूतो न भविष्यती’ पाठिंबा मिळतो ही उद्यासाठीची आशा आहे.

आधुनिक भारताच्या इतिहासात इतर कोणालाही क्वचितच मिळाला असेल असा मास बेस त्यांना मिळाला. साहेबाच्या एका शब्दावर आयुष्याचं रान करायला न कचरणारे लाख कार्यकर्ते त्यांना लाभले. आणि म्हणूनच की काय शरद जोशींचं निवडणुकांमधलं अपयश क्लेशदायक वाटतं. मगर आणि हत्तीची गोष्ट शरद जोशींना ठाऊक होती. मगरीने पाणी आणि हत्तीने जमीन सोडली की दोघांची उडणारी दाणादाण त्यांना नवीन नव्हती. आणि तरीही शरद जोशी राजकारणात जसं वागले ते का वागले याच राहून राहून आश्चर्यही वाटतं आणि दुःखही वाटतं. या साऱ्या घटनांचा आलेख प्रस्तुत चरित्रात मांडला आहे.

राजकारण आणि समाजकारणात काळ आणि वेळ यांना अत्यंत महत्त्व आहे. आपल्या काळाला अनुरूप पऱ्याय उभे करण्याची क्षमता असणारे नेते हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे असतात. बहुतांशांना ते जमत नाहीच. ज्या एखाद्याला ते जमतं तो महात्मा होतो. असं असलं तरी मानवतेच्या सर्वच द्रष्ट्यांना हा मान मिळतोच असं नाही. किंबहुना बहुतांशानं तो असा मिळताच नाही. राजकीय पातळीवर, व्यवहारात आलेली सर्व अपयश पचवूनही आपण कोण आहोत आणि इथे कशासाठी आहोत याची जबरदस्त जाण शरद जोशींना असणार हे त्यांचं चरित्र वाचल्यावर (विशेषतः ‘योद्धा शेतकरी’ वाचताना) समजतच. आज आपलं म्हणणं व्यवस्थेला समाजात नाहीये तर काय, पण मी मांडतोय ते सत्य आहे आणि आज ना उद्या तुम्हाला ते स्वीकारावं लागेलच हा शरद जोशींमधला आत्मविश्वास त्यांच्या प्रतिभेइतकाच फिदा करणारा आहे. शरद जोशींच्या या एका वाक्यात त्यांच्या शोकांतिकेतील सुखांताचा मार्ग सापडतो,

To keep the flag flying until what is politically impossible becomes economically inevitable