मेंगाई सोबतची रात्र..

Torna Fort

वर्ष 2007 असेल, सह्याद्रीचा वारं नुकतंच कानात शिरलं होतं. लोहगड, राजगड, तुंग, तिकोना सर झाले होते. पावसाळा सुरू झाला होता. जुलैचा महिना होता, नगरच्या महावीर कलादालनात पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. ट्रेकिंग ग्रुप सोबतचे ट्रेकिंग, ब्लॉग्ज, इंटरनेट हे सगळंच (आर्थिकदृष्ट्या) आवाक्याबाहेर असल्यामुळे पुस्तके हेच संदर्भ ग्रंथ मानून डोंगरयात्रांचे बेत जमत होते. या पुस्तक प्रदर्शनात प्र.के. घाणेकरांचे ‘भटकंती किल्ल्यांची’ हे पुस्तक दिसले, खिशात पैसे नसायचे ते दिवस होते. जितके होते त्यात जमवून पुस्तक खरेदी केले. घरी आल्या आल्या तोरणा किल्ल्याचे पान काढून वाचायला बसलो. किल्ल्यावर जाऊन आले की पुन्हा त्या जागांची वर्णने वाचायला आवडतात. आपण फिरलेल्या जागा, क्षण, आठवणी भूतकाळातून पुन्हा वर्तमानात येतात. या पुस्तकात घाणेकरांनी तोरण्यावर आलेल्या काही paranoid (अमानवीय, अनैसर्गिक, मानवी आकलनापलीकडल्या) घटनांचे पुसटसे वर्णन केलेले आहे. ते वर्णन करताना त्यांनी आप्पांचेही दाखले दिले आहेत. ते वाचून क्षणभर मी चपापलो, 15 दिवसांपूर्वी (18 जून 2008) तोरण्यावरची ती धुवांधार पावसाने वेढलेली रात्र डोळ्यासमोर उभी राहिली. आणि आज इतक्या वर्षांनंतर, आत्ताही लिहिताना ते सगळं आठवतंय जसच्या तसं!!!

18 जून 2008 –

15 ऑगस्ट 2007 ला तोरणा पहिल्यांदा चढून झाला होता. तेव्हा अगदीच नवखे असल्यामुळे रस्ता चुकल्याने आणि वेळ कमी असल्याने किल्ला बघणं असं झालं नव्हतं. त्यामुळे किल्ला बघण्यासाठी म्हणून जून महिना निवडण्यात आला. ट्रेकिंगसाठी लोकं (समविचारी) मिळत नाहीत हा निरंतर प्रश्न आहे, तेव्हाही होता. त्यामुळे अक्षरशः फूस लावून निखिलेश (कनिष्ठ बंधू), चैतन्य कुलकर्णी, वैभव लाहोटी या तिघांना भुलवण्यात आले आणि तोरण्यावर नेण्याचा घाट घालण्यात आला. या तिघांपैकी कोणीही या आधी, कधीही कुठल्याही डोंगरी किल्ल्यांवर कधीही गेलेले नव्हते. राजगड, रायगड हे किल्ले फक्त त्यांना इतिहासात ऐकून माहिती होते, नगर भागाकडे डोंगराळ भाग कमी असल्यानं हे चढाचढीचे प्रकार तिकडे फारसे प्रचलित नाहीत. मी एकदाच तोरण्यावर जाऊन आल्यामुळे या सर्वाचा प्रमुख आणि जाणकार (??), अनुभवी वगैरे वगैरे सगळं मीच होतो.

17 जूनला सकाळी निघून किल्ल्यावर मुक्काम करणे. 18 ला संध्याकाळी पुण्यात परतणे हा प्राथमिक बेत ठरला होता, वरकरणी सहज सोपा असलेला हा बेत पुढे कसा फसत गेला आणि काय परिस्थीति झाली हे कळेलच, मात्र 18 जूनला निखिलेशचा वाढदिवस असल्यामुळे तो गडावर रात्री 12 वाजता साजरा करण्याचे ठरले होते. त्यानुसार 17 तारखेला सकाळी आम्ही मोटरसायकल काढून प्रस्थान केले, वेल्ह्यात पोहचायला 2 तास लागले. पावसाने पुण्यापासून टिपरी धरली होती. तशाच पावसात ओलेत्यानी आम्ही दुपारी 12 वाजता वेल्हे मुक्कामी डेरेदाखल झालो. वेल्ह्यात पोहचेपर्यंत पाऊस रंगात आला होता. वाटेतल्या गुंजवणी, कानंदी या नद्या तट्ट फुगल्या होत्या. जूनचा महिना होता. मान्सूनची पहिलीच सलामी होती. त्यामुळे खेळ रंगणार होता. तोरण्याचा माथा नेहमीप्रमाणे गडद धुक्यात हरवला होता. कदमांच्या तोरणा विहारात थेट जेवणच करून घेतलं. सोबत रात्रीसाठी पिठल भाकरी बांधून घेतली. कोसळत्या धारेतच आम्हीही तोरण्याच्या धारेला लागलो. तोरण्याच्या खांद्यावरून उतरणारे सगळे ओहोळ पार करत चढणीला लागलो. तेव्हा सुमारे 2 वाजले होते आणि 4 वाजेपर्यंत माथ्यावर पोहचू असा प्राथमिक अंदाज होता. मात्र हा अंदाज साफ चुकला. इतका चुकला की दोनाचे चार झाले तरी आम्ही तोरण्याचा माथा सोडाच, आम्ही पहिल्या टेकाडावर सुद्धा पोहचू शकलो नाही. सवंगड्यांची चालण्याची अफाट गती आणि तीव्र इच्छाशक्ती यामुळेच केवळ हे शक्य झाले होते. शब्दश: सांगायचं तर 10 मिनिटे चाललो कि 15 मिनिटे थांबणं असा जो कार्यक्रम होता त्या वेगाने आम्ही चालत (सरपटत?) गडाच्या दरवाजात पोहचायला संध्याकाळचे 7 वाजले. तोरणा किल्ला चढायला अदमासे फार तर फार अडीच तास पुरेसा होतो असं असताना आम्ही मात्र तब्बल पाच-साडेपाच तास चढत होतो. इथेच माती खायला सुरवात झाली होती.

अंधार पडायच्या आत गडावर मुक्कामी पोहोचण्याचे फायदे अनेक असतात. अनुभवी ट्रेकर्सना ते नक्कीच माहिती असतील. गडावर पोहचतांनाच अंधार झाल्यामुळे आपसूकच हालचालींवर मऱ्यादा आल्या. जागा अनोळखी त्यात संध्याकाळची कातर वेळ, पावसाची रिप रिप, गच्च भिजून गोळा झालेले कपडे याचं अजब रसायन होऊन अनामिक भीतीमिश्रित असुरक्षिततेची भावना मनात पसरली होती. सोबतीला थकवा होताच. सोबत केवळ 2 टॉर्च असल्यामुळे निखिलेश आणि चैतन्य हे दरवाजापाशीच थांबले व मी आणि वैभव मंदिर शोधण्यासाठी त्या अंधारात चाचपडू लागलो.

पायथ्यापासून विलोभनीय दिसणारं धुकं संध्याकाळच्या वेळेला जरा वेगळंच वाटतं होता. गडावर सगळीकडे धुक्यामुळे पांढरट प्रकाश पडला होता, आमच्यापैकी आधी गडावर आलेला मी एकटाच होतो. ‘मेंगाई’चे मंदिर गडातून आत गेल्यावर समोरच्या बाजूस उंचावर आहे इतकेच आठवत होते. एक क्षणभर पाऊस थांबला आणि जोरदार वारा सुटला, त्यामुळे धुके विखुरले आणि क्षणभर समोर मंदिर दिसले, हे मंदिर दिसले म्हणून मी आणि वैभवने अत्यानंदाने एकेमकांकडे पाहिले तर तोपर्यंत मंदिर धुक्यात पूर्ण गायब झाले होते. क्षणभर कळेना कि खरंच मंदिर दिसले होते की झालेला भास होता, हा भास-अभासाचा खेळ नुकताच सुरु झाला होता, पुढच्या घटनांची हि केवळ नांदी होती. या मंदिराचा माग काढत शेवटी मंदिर सापडले. मंदिरात गेलो. सामान ठेवून पुन्हा आम्ही चैतन्य आणि निखिलेशपाशी आलो तर इथे एक वेगळंच किस्सा झाला होता. त्यांना त्या धुक्यात कोणीतरी दोन लोकं लाकडाच्या मोळ्या डोक्यावर घेऊन आमच्याच मागे जाताना दिसले होते. प्रत्यक्षात गडावर कोणीही नव्हते ना आमच्या मागे कोणी आले होते. तेव्हा गडावर एक साबळे नावाचा वॉचमन असायचा पण तो कधीच मुक्कामाला गडावर थांबत नसे. (?) मुळात नवरात्रीचा काळ सोडला तर गावातले रहिवासीसुद्धा गडावर कोणी मुक्कामाला थांबत नाहीत अशी माहिती खुद्द साबळे यांनीच दिली होती, अर्थात् त्याची कारणं गुलदस्त्यात होती, काही अफवा होत्या, काही अनुभव, काही भास, काही तरी होत हे नक्की!!!

किल्ल्यावर भास-आभासांचे खेळ सुरु झाले होते. सुरुवातीला आम्हाला हा एक केवळ चेष्टेचा भाग वाटला, कदाचित चेष्टाच असावी. सगळीकडे प्रश्नचिन्ह होतं त्यामुळे पूर्ण दुर्लक्ष्य करत आम्ही चौघे मंदिर प्रवेश कर्ते झालो. तोपर्यंत बाहेर पूर्ण अंधार पडला होता. अंधाराचा रंग पांढरा असतो याचा साक्षात्कार मला त्या दिवशी तोरण्यावर झाला. या पांढऱ्या अंधारात देवळा भोवतालची झाडं फारच भयाण आणि अक्राळविक्राळ दिसत होती. मंदिरासमोर काही वीरगळ, सतिगळा पडल्या होत्या. अंगात थंडी पूर्ण मुरली होती. मनात भीती मुरायला लागली होती. सकाळचे जेवण केव्हाच जिरले होते. मंदिरात आल्यानंतर या खेळाचा पुढचा अंक सुरु झाला.

Torna Fort

तोरण्यावर जे गेले आहेत त्यांना मेंगाई मंदिराची कल्पना असेल. मंदिर जुनाट (2008 मध्ये) आहे, वर गळके पत्रे आणि त्यांना तोलून धरणारे चार खांब अशी मंदिराची रचना आहे. दार बसके असून दारांच्या बरोबर समोर मेंगाईचा गाभारा आहे. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन खिडक्या आहेत, खिडक्या आणि दारं अत्यंत कमकुवत आणि वाऱ्याच्या झोताबरोबर उघडझाप होणाऱ्या अशा आहेत. मंदिराच्या चहुबाजूंनी कंपाऊंडसारखी भिंत आहे. एकदा मंदिरात गेल्यावर सामानाची आवराआवर करून दरवाजासमोरची उजव्या हाताच्या कोपऱ्याची जागा पकडली. जमिनीला पूर्ण ओल आली होती. त्यामुळे प्लास्टिक टाकून अंथरूण पांघरूण टाकले. (तेव्हा कॅरिमटची सुद्धा ऐपत नव्हती, माहितीही नव्हती तंबू, outing , night out वगैरे फार पुढच्या गोष्टी होत्या त्यामुळे गोष्टींची जमवाजमव ही ऐपत आणि गरज बघून केली जात होती.) कपडे कच्च ओले होते, त्यामुळे ते बदलण्यासाठी म्हणून एक एक जण मंदिरातल्या गाभाऱ्यामागे आडोश्याला जाऊन कपडे बदलत होता. पहिल्यांदा जो गेला त्या मंदिराच्या मागे पडलेली, लाल कुंकवाने माखलेली हिरवी साडी हातात घेऊन आला. इतक्या लवकर देवी दर्शन देईल असे वाटले नव्हते. ते बघूनच आमच्यातला एक जण फेफरला. पावसाळी तिन्हीसांजेला अशा अटींग्या रानात गुडूप काळोखात, चिटपाखरू नसलेल्या त्या अर्ध्या पडीक मंदिरात असे काही झालं तर घाबरणे स्वाभाविक आहे. नंतर जो भिडू कपडे बदलायला गेला तो जाताना आमच्याकडे असलेल्या दोन्ही टॉर्च स्वतःसोबत घेऊन गेला. स्वतःचेच कपडे बदलताना त्याला टॉर्चच्या उजेडात काय बघायचे होते (?) तोच जाणे? आमच्या खोडसाळपणावर त्याचा पूर्ण विश्वासच होता हे नक्की!! त्याच्या कपडे बदलण्याची वाट बघत आम्ही तिघे इकडे गडद अंधारात शांत बसून होतो. पत्र्यावर पाऊस इतका भयानक आवाज करत होता की छप्पर उडते कि काय असे वाटत होते, वारा पत्र्यामधून शिरून सुईई सुई.. आवाज काढत होता. तेव्हाच एक केविलवाणी जोरदार किंकाळी मंदिरात घुमली…

तो आवाज ऐकून क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. बाकीच्याचं तसंच झालं असावं कारण त्यांचे चेहरे शेजारी असून दिसत नव्हतेच. आमची अक्षरशः पाचावर धारण बसली कारण एक तर दिसत काहीच नव्हतं, एकमेकांची तोंडही नाही, हातात टॉर्चही नाही, त्यामुळे आम्ही 20-25 सेकंद गाठळून गेलो. आता उजेड पडल्यावर काय दिसणार याची कल्पना शक्ती बेफाम धावू लागली, तेवढ्यात टॉर्चचा उजेड पडला आणि कपडे बदलून गडी हसत पण थरथरत (कदाचित कुडकुडत) समोर आला. त्याचा हसणं त्या क्षणी भेसूर वाटलं. झालं असं होता की अंधारात कोरडे कपडे जिथे ठेवले होते तिथे अंदाजाने त्यांनी हात नेताना अंदाज चुकला आणि चुकून तिथे आडोशाल्या बसलेल्या कुत्र्याच्या बुळबुळीत तोंडात त्याचा हात गेला त्यामुळे कपडे बदलू गडी आणि ते कुत्रं एकसाथ भंजाळले आणि हा प्रकार घडला होता.

ही सगळी मालिका घडत असताना अंधार आणि पाऊस अजूनच वाढला होता, आम्ही जमिनीवर प्लास्टिक आणि गोधड्या टाकून स्थिरावलो होतो. सोबतच्या शाली गुंडाळून घेतल्यामुळे अंगात मस्त ऊब शिरली होती, सोबत आणलेल्या झुणका भाकरीचे आता भिजून कालवण झालं होता. शहरातली स्वयंघोषित खवय्येगिरी बाजूला सारत उदरभरण केले. दिवसभराच्या चढाचढीचे कष्ट जेवण झाल्या झाल्या नाही म्हणलं तरी अंगावर आलेच. तरी रात्री 12 वाजता निखिलेशचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून जागेच राहिलो.

एकदाचे 12 वाजले निखिलेशला शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवस उरकून आम्ही पांघरूण घेऊन त्या अंधारात गुडूप झालो. रात्रीचा अंधार आणि गुडूपपणा त्या पावसाच्या शांततेत गंभीर जाणवत होता. सगळीच जण चिडीचूप होऊन एकमेकांना बिलगून मुकी झाली होती. पांघरुणाच्या आतमध्ये आम्ही सगळेच जागे होते. कसलीतरी अनामिक चाहूल लागली होती, त्याचा अंदाज घेत प्रत्येक जण गार पडला होता. रात्रीचा खेळ सुरू झाला होता.

तोंडावरून पांघरूण घेऊन पडलेला मी झोपेच्या सीमेवर रेंगाळत असतानाच पायापासून ते थेट डोक्यापर्यंत काहीतरी हळुवार सरकत गेल्याची जाणीव मला झाली आणि क्षणभर खाडकन भानावर आलो. पांघरुणाच्या आतूनच मी कानोसा घेतला (त्या भयाण अंधारात अर्थातच पांघरूण बाजूला करण्याची हिंमत त्यावेळी, त्याक्षणी तरी माझ्यात नव्हती) आजूबाजूला काहीही हालचाल नव्हती. झालेल्या गोष्टीला भास मानत पांघरुणाच्या आतमध्ये मी मात्र आता टक्क जागा झालो होतो. 10-15 मिनिटांनंतर हळूच पेंग आली तेवढ्यात पुन्हा तोच स्पर्श, तीच हालचाल, छातीवर, चेहऱ्यावर, कपाळावर! ही हालचाल रेंगाळली आणि नाहीशी झाली. मी पांघरलेली शाल आणि ही अंगावर चाललेली हालचाल यात अवघ्या काही मिलिमीटरचेच अंतर होते पण नक्की काय होत होतं हे कळत नव्हतं, इथेपर्यंत माझा विवेकवाद (logical reasoning and rational thinking) जागा होता. त्यामुळे मंदिरात एखादा उंदीर, साप किंवा खेकडा असणार आणि तोच उकडून तिकडे करत असणार या भावनेने मी पडून राहिलो. आता पुन्हा अंगावरून काही गेलं की त्याला पकडू म्हणून स्वतःच्याच शरीराचा सापळा करून सावजाची वाट बघू लागलो. थोड्या वेळाने तीच शिरशिरी शरीरातून गेली आणि त्या स्पर्शाची जाणीव झाली. या वेळेस मी सावध होतो, सज्ज होतो, दबा धरून होतो. जेव्हा ही हालचाल चेहऱ्याजवळ जाणवू लागली तेव्हा ताडकन पांघरून फेकून देत उठलो आणि ते जे काय होतं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच पदरी निराशा पडली. आता मी हट्टाला पेटलो होतो. हे जे काय चालू आहे, त्याचं काही झालं तरी छडा लावूया या हेतूने निखिलेश आणि चैतन्य या दोघांना उठवले. या वेळेपर्यंत रात्रीचा एक – सव्वा वाजला होता. इतक्यात रात्री आम्ही सगळे मंदिर पिंजून काढले. साप, उंदीर काय पण उंदराच्या लेंड्यासुध्दा सापडल्या नाहीत. त्यामुळे पऱ्यायाने माझ्या संशयाची सुई निखिलेश आणि चैतन्य यांच्याकडेच फिरली होती. तेच जाणूनबुजून माझी थट्टा मस्करी करत असावेत असा माझा अंदाज होता. पण त्या अंधारात त्यांची दयनीय अवस्था आणि केविलवाणे चेहरे बघून मला ते असं काही करतील यावर विश्वास बसेना. ते दोघं स्वतःच्याच नशिबाला कोसत कुठून दुर्बुद्धी झाली आणि याच्या सोबत आलो असे (मनात) म्हणत, रात्र कधी एकदाची संपते याची वाट बघत होते.

त्यांना मी माझ्यासोबत काय घडत आहे याची कल्पना दिली तेव्हा त्यांनी सुरुवातीला माझ्या सर्व शक्यता साफ फेटाळून लावल्या आणि मला गुपचुप झोपण्याचा सल्ला दिला. आता मात्र माझी पुन्हा आडवा पडण्याची हिम्मत नव्हती पण सगळे आडवे झाल्यावर एकट्याची उभा राहण्याची प्राज्ञाही नव्हती. आता जे काय होईल ते पांघरुणाच्या आतच असा विचार करून अक्षरशः जीव मुठीत धरून पुन्हा पांघरुणात शिरलो. नशीबाने या वेळेस झोप मी म्हणाली पण … शेजारचा गडी रोहित … रोहित… किंचाळत उठून बसला. रोहित… अरे अंगावरुन काहीतरी फिरलं रे!! कोणीतरी हात फिरवत आहे असा वाटलं!!

बस्स … जे मला जाणवत होतं तेच.. तस्सचं.. सेम टू सेम..!

तोच, तसाच स्पर्श, रेंगाळलेली बोटांसारखी हालचाल त्यालाही जाणवली होती. त्याच्या चेहऱ्यावर तरळलेली भयावहता मला त्या अंधारातही जाणवली. स्वतःचा धीर पूर्ण सुटलेला असताना मी त्याला धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आता हळूहळू माझी आतल्या आत टरकायला सुरुवात झाली होती. रात्र संपण्याची वाट बघत आम्ही दोघं पाय पोटाशी घेऊन पडून होतो. पुढच्या वेळेस अंगावरून हात कधी फिरतो याची आम्ही वाट बघत होतो, मात्र आश्चर्य असे पुन्हा काही तो अनुभव आला नाही, आम्हाला झालेलं काही तरी वेगळं होतं, भास होता अशी स्वतःची समजूत घालत झोपी जात होतो तेव्हाच आणि अगदी त्याच क्षणी आमचा तिसरा सवंगडी दचकून उठला. त्या थंड हवेत हा गडी घामाने डबडबला होता. त्याचाही तोच अनुभव!!! ही भीती कमी होत नव्हती तेवढ्यात मंदीराचे मोडकळीला आलेले दार कोणीतरी थडाथड वाजवू लागले!! तिघांपैकी कोणाचीही हिंम्मत नव्हती की जाऊन दार उघडावे. रात्री अपरात्री एखादा ग्रुप मुक्कामाला आला असेल आणि गडावर मुक्कामाची तेवढी एकच जागा होती. त्यामुळे दार उघडणे क्रमप्राप्त होते. पण उघडणार कोण याचा निर्णय होईना. दार पुन्हा जोरदार वाजले. आता मात्र गत्यंतर नसल्याने आम्ही तिघेही उठून दारापर्यंत गेलो. हळूच कडी काढली.. कडी काढताक्षणीच दाराबाहेर उभा असलेला सोसाट्याचा वारा धुक्याला सोबत घेऊन सरळ आत मंदीरात घुसला. दार वाजवण्याचे कारण तर कळले होते. मंदिराबाहेरचा परिसर कसा असेल या उत्सुकतेपोटी आम्ही तिघांनीही मंदीराच्या दारातून बाहेर नजर टाकली तर अदमासे पन्नास एक फूटावर कोणीतरी कंदील घेऊन उभा असल्याचे दिसले. निसर्गसुलभ भावनेने आम्हाला आधी आनंद झाला. म्हटलं, चला कोणीतरी आपल्याशिवाय गडावर आहे. पण…. याचा व्यत्यास जास्त महत्वाचा होता आणि तो लक्षात यायला काही क्षण जावे लागले आणि ते लक्षात आल्यानंतर मात्र भीतीची एक थंड लहर डोक्यात गेली. कपाळावर जमा झालेले घामाचे थेंब पुसले आणि दार कसेबसे लावून पुन्हा पांघरूणात धूम ठोकली. गडावर आम्ही आज आलो होतो, पण तो/ती/ते मात्र रोज इथेच असतात किंवा असतील. तेवढ्यात मंदिराची एक खिडकी वाऱ्याने उघडली आणि झालेल्या आवाजाने आपसूक नजर तिकडे गेली तेव्हा खिडकीत कोणीतरी होतं हे जाणवलं… आता मात्र विषय The End होता.

चार वाजले होते. तासा दीड तासाचा प्रश्न होता. उरलेला वेळ कसाबसा ढकलला. मध्येच कधीतरी डोळा लागला. सव्वा सहाच्या सुमारास जाग आली तेव्हा उठलो, पाऊस थांबला होता. वातावरणात सुखद गारवा होता. एकटाच बाहेर पडलो, रात्रीच्या खाणाखुणा कुठेच नव्हत्या. कोकण दरवाज्यापर्यंत एकटाच फेरफटका मारुन आलो, माघारी येईपर्यंत तिघेही सवंगडी जागे झाले होते. आश्चर्य म्हणजे सगळे सामान आवरुन तयारही झाले होते. तिघांमधल्या एकाला मात्र रात्री घडलेल्या रामायणाची सुतराम कल्पना नव्हती. कोणीही काहीही न बोलता परतीचा मार्ग निवडला होता. पावसाला सुरवात झाली होती आणि आश्चर्य म्हणजे केवळ सव्वा तासात आम्ही पायथ्याला पोहोचलो होतो.

Contact – rohit.harip88@gmail.com