एक निरिक्षण, थोडं परिक्षण – सेक्रेड गेम्स

एक निरिक्षण, थोडं परिक्षण - सेक्रेड गेम्स

भारतात भारतीयांनी चित्रित केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या काही निवडक चित्रकृतीमध्ये सॅक्रीड गेम्स हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नुकतेच या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वाचे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन झाले. छशींषश्रळु भारतात प्रसिद्ध होणे आणि भारतीय कलाकार जगभरात प्रसिद्ध होणे या दोन्हीसाठी सॅक्रीड गेम्स हुकमी एक्का ठरले. या पार्श्वभूमीवर या वेब सिरीजबद्दल लिहिणे महत्त्वाचे ठरते. याचे आणखी एक कमालीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या आणि दुसर्‍या पर्वाच्या प्रतिसादात असलेला लक्षणीय फरक. हा फरक netflix च्या अनेक वेब सीरीजनी अनुभवलेला होता मात्र सॅक्रीड गेम्स त्यापैकी एक निघेल असे पहिल्या पर्वानंतर वाटणे अशक्य होते. या लेखात असे नेमके का झाले याचाही मागोवा घ्यायचा मी प्रयत्न केला आहे.

कथावस्तू :

कुठल्याही चांगल्या चित्रकृतीच्या मागे चांगली कथावस्तू असते यात शंका नाही. गायतोंडे हा परिस्थितीने घडलेला गुंड, त्याच्या दरार्‍यात असलेले त्याचे गुंड आणि सामान्य जनता, त्याचे राजकारण्यांशी असलेले संबंध, राजकारण्यांचे आध्यात्मिक गुरूंशी असलेले संबंध, या सगळ्यांनी चित्रपट आदि व्यवसायांचा केलेला खेळखंडोबा आणि त्याचा ज्या शहरावर प्रेम केले त्याच शहरावर असलेला (आध्यात्मिक) राग ही अगदी परिपूर्ण म्हणावी अशी चौकट या कथेच्या भोवती आहे. गायतोंडेकडे म्हणजे सिरीजमधल्या खलनायकाकडे जाणारे रस्ते कधी राजकारण कधी धर्म कधी अर्थकारण तर कधी अध्यात्म अशाच वळणांनी जातात. गायतोंडे हा खलनायक आहे खरा पण तो एकल नाही. तो सगळ्या शक्यतांनी घडलेला परिपूर्ण खलनायक आहे. सरताज सिंग त्याला भेटतो तो ऐतिहासिक दुव्यांमधून. मात्र स्वतःच्या आयुष्यात अपयशी ठरलेला सरताज सिंग, वरिष्ठांच्या हसण्याचा विषय असलेला सरताज सिंग, नेमका तोच या शहराला का वाचवेल आणि मुंबईच्या कुशीत वाढलेला गायतोंडे मुंबई संपवण्याच्या कटात का सामील होईल या प्रश्नांचा अथपासून इति पर्यंतचा प्रवास म्हणजे सॅक्रीड गेम्स आहे. मुख्यतः सरताज सिंग आणि गायतोंडे यांच्यावर बेतलेली ही कथा राजकारण, पुराणे आणि त्यांच्या परस्परांशी असलेल्या आदिम संबंधावर भाष्य करते.

पर्व 1 :

विक्रम चंद्रा यांच्या 2006 सालच्या ‘सॅक्रीड गेम्स’ याच नावाच्या कादंबरीवर बेतलेल्या या वेब सीरीजच्या पहिल्या सिजनला गायतोंडेची 25 दिवसांची मुदत आणि त्या मुदतीत सरताज सिंग आदींचे त्याला अटक करण्यापासून ते शहराला काय धोका आहे हे शोधून काढण्यापर्यंतचे प्रयत्न संपूर्ण पर्वभर दिसतात. गायतोंडेला मुंबई संपवायची होती तर त्याने फोन का केला? आणि सरताज सिंगला बोलावून त्याने आत्महत्या का केली, या प्रश्नांपासून पहिल्या पर्वाची सुरवात होते.

अत्यंत बारकाईने गोवलेल्या या कथेत आपल्याला आता मृत असलेल्या गायतोंडेचा भूतकाळ दिसतो. तो कुठल्या एका कारणामुळे हिंसक झाला, कुठल्या धर्मसंकटात अडकल्यामुळे त्याला देव-धर्माची चीड यायला लागली हे हळूहळू स्पष्ट होऊ लागते. त्याच्या प्रवासात त्याला साथ देणारे बंटी इत्यादी कुठल्याही ठराविक धर्म-जातीचे नाहीत. ते मुंबई या एका धर्माने बांधलेले लोक आहेत. यातच त्यांच्या संबंधांची नवी गुंफण यशस्वी ठरते. गायतोंडेला इतर कुठल्याही नवगुंडासारखे मुंबईवर राज्य करायचे आहे. त्याचा प्रतिस्पर्धी सुलेमान ईसाकडे जे जे आहे ते, किंबहुना त्याहून अधिक बरेच काही त्याला मिळवायचे आहे; राजकारणी कलाकारांना खिशात ठेवायचे आहे आणि मुंबईवर राज्य करायचे आहे. या इच्छा खरेच पूर्ण होताना आपल्याला दिसतात. मग ते गायतोंडेचे कुकूशी लग्न असो अथवा त्याला अय्याशीच्या सर्वत्र उपलब्ध असलेल्या संधी असोत. इथपर्यंत ही कुठल्याही गुंडाची पहिली पायरी असलेली कथा वाटते. आणि बरेचदा गायतोंडेचे यश हे एका गुंडाचे कमी आणि एका सामान्य माणसाचे अन्यायाला भेदून मिळवलेले यश अधिक वाटते. त्याने स्वतःला देव म्हणणे अगदीच दुरापास्त नाही हे पटायला लागते.

इथे वर्तमानात सरताज सिंगला गायतोंडेने सूचित केलेल्या मोठ्या विघ्नाचा शोध लावणे, त्याच्या वडिलांच्या गायतोंडेशी असलेल्या संबंधांचा शोध लावणे आणि हे सगळे करताना नोकरी आणि कुटुंब यांची वाताहात लागू न देणे असे वाढत जाणार्‍या मारुतीच्या शेपटीसारखे व्याप निर्माण झालेले असतात. त्यात त्याचा विश्वासू सहकारी माजिदचा मृत्यू, काटेकरचा मृत्यू बघावा लागतो. पोलीस खात्यातून निलंबनानंतर तो ठअथमध्ये सामील होतो मात्र तिथेही त्याची वरिष्ठ अंजली माथुर हिची एका अज्ञात व्यक्तीकडून हत्या होते. त्याचे तुटत आलेले लग्न, वरिष्ठांची दिवसेंदिवस वाढत चाललेली नाराजी आणि कसलाच धड शोध लावता न आल्याने सतत येणारी पराभूततेची भावना यात तो अडकत राहतो. त्याचे वरिष्ठ पारुलकर यांच्या बाजूने खोटी साक्ष देण्याचा आणि एक दबाव त्याच्यावर असतोच. एकुणात गायतोंडेच्या जवळपास पोहचण्याचे सगळेच प्रयत्न त्याच्या नुकसानात भर घालतात. त्याने गायतोंडेचा उजवा हात बंटीला अडकवण्यासाठी पाठवलेली नयनिकाही मृत्युमुखी पडते. या सततच्या अडचणींमुळे गायतोंडे अधिक भीतीदायक, तो करत असलेले काम, त्याची माणसे अधिकाधिक गूढ, अजिंक्य अतर्क्य वाटायला लागतात आणि प्रेक्षकांच्या औत्सुक्यात भर पडते.

पहिल्या पर्वाला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत तर अनेक संभाव्य उत्तरांचे सुतोवाच केले गेले आहे. सरताज सिंगला मुंबईचा रक्षणकर्ता म्हणून निवडण्यामागे फक्त योगायोग नाही किंवा गायतोंडेने कल्पिलेली गोष्ट नाही तर खरेच गायतोंडेच्या तुरुंगातील दिवसात दिलबाग सिंगने म्हणजे सरताजच्या वडिलांनी त्याला माणुसकीने वागवले; गायतोंडे आणि दिलबाग सिंग एकाच आध्यात्मिक गुरूच्या सान्निध्यात होते हे उघड होते. स्वतःवरचे हल्ले, त्याचा आणि गायतोंडेचा संबंध, अचानक आलेली मोठी जबाबदारी इत्यादींचा विचार करणारा सरताज सिंग पर्वाच्या शेवटी लक्षात राहतो. भागांना दिलेली पौराणिक नावे आणि सतत उल्लेख होणारे पुराणातले संदर्भ (अतापी-वातापि, अश्वत्थामा इ.) यामुळे चित्रित केलेले राजकारण, सामाजिक परिस्थिती ही केवळ आत्ताची (इथे 80च्या दशकातील) न राहता ती एक आदिम परिस्थिती आहे असे जाणवते. समाजातील धर्म-समजुती, भेदभाव, सत्तेची गणिते ही अचानक निर्माण होत नसून ती समाजाच्या घडणीतच जन्माला आलेली असतात हे या पर्वामधे सतत जाणवत राहते. इतिहासाचा थोडा अवशेष जरी आता शिल्लक असला तरी तो वर्तमान आणि भविष्याला जबरदस्त हादरा देऊ शकतो हे गायतोंडेच्या ऐतिहासिक अन्यायाविषयीच्या सततच्या जाणीवेतून कळत राहते.

पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन, चित्रण, लेखन, संकलन अशा सगळ्याच तांत्रिक अंगांबाबत कौतुक झाले. एरवी पळापळीचे प्रसंग, मारामारीचे प्रसंग उथळ वाटत असले तरी या सिरीजमध्ये ते वाटत नाहीत. आरती बजाज यांचे अर्थपूर्ण (दृश्याच्या अर्थाला हानी न पोहचवता उलट त्यात अर्थाची भर घालणारे) संकलन, विक्रमादित्य मोटवानेंनी वर्तमान आणि अनुराग कश्यप यांनी भूतकाळाची वाहिलेली धुरा आणि वरुण ग्रोवर यांच्या लेखन चमूने कादंबरीत चित्रीकरणास अनुकूल बदल करत कथानकाची केलेली रसपूर्ण मांडणी या तीन मजबूत खांबांनी या पर्वाला तोलून धरले. तसेच चौथा अभिनयाचा खांबही कुठेही कमअस्सल नव्हता. नवाजुद्दिन सिद्दिकी गुंड म्हणून उत्तम वावरतोच पण या दरम्यान साध्या सोप्या भावना साध्या सोप्या पद्धतीने व्यक्त करण्याची, कुठेही व्यक्तिगत प्रसिद्धीमध्ये येऊ न देता भूमिकेला न्याय देण्याची सैफ अली खानची हातोटी दिसून येते. जितेंद्र जोशी, राधिका आपटे यांनी पर्वाला चार चांद लावले. त्यांच्या कथेतील मृत्युनंतर त्यांचे fan clubs तयार झाले इतकी त्यांची प्रसिद्धी पराकोटीला गेली होती. कथानकाची प्रामाणिक मांडणी ही या पर्वाची खरी ताकद ठरली.

पर्व 2 :

वर उल्लेखल्याप्रमाणे पर्व एक ते पर्व दोन हा उतरणीचा प्रवास अनुभवलेली ही तशी दुर्दैवी वेब सीरीज आहे. आणि हेही तितकेच खरे की हे पर्व येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना, 15 ऑगस्टचे दिवस आणि रात्र लोकांनी याच पर्वाला बहाल केलेला असतानाच त्याच लोकांकडून या पर्वावर अपेक्षाभंगाचा आरोप केला गेला. अपेक्षाभंग झाला जरी असला तरी पर्वाअखेरीस दिग्दर्शक-लेखकाला या पर्वामधून काय म्हणायचे होते ते पाहणे आवश्यक आहे. दुसर्‍या पर्वाची सुरवात भारतीय सुरक्षा अधिकार्‍यांसोबत मुंबईच्या किनार्‍याला सोडून जाणार्‍या गायतोंडेपासून होते. नशिबाने दगा दिल्याने केन्याला जाणारा गायतोंडे म्हणजेच आत्ता मृत असलेल्या गायतोंडेचा उर्वरित भूतकाळ आणि वर्तमानात तपासातील जवळजवळ सगळे दुवे हरवून बसलेला, तरीही तुटका हात घेऊन तपास चालू ठेवणारा सरताज सिंग कथानकाला पुढे नेतात.

गायतोंडे भारत सोडून चालला आहे आणि सुरक्षायंत्रणेच्या हातचे बाहुले बनण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नाही. तो तसे बनतो आणि कुसुम देवी यादव त्याच्याकरवी केन्याच्या ड्रग माफियाची हत्या करवते. यातून आता ड्रग युद्धाची नशा, तेथील वारेमाप पैसा अनुभवलेला गायतोंडे तरीदेखील मुंबईला येण्याचे स्वप्न उराशी बाळगून राहतो. त्यात त्याचा संबंध गुरुजींशी येतो. मागच्या पर्वाला हलकीशी झलक दाखवलेले गुरुजी यावेळी अचानक सर्वशक्तीशाली, सर्वव्यापी, सर्वज्ञ बनून येतात. रिमोटची कळ कोणाच्या हातात होती हे पहिल्या भागातच कळते. आता इथे बिपीन भोसले हे भारतीय सत्ताधीश, पारुलकर हा त्यांचा पोलिसांमधला हस्तक, दुबईस्थित ड्रग माफिया सलीम काका, सुलेमान इसा इत्यादी आणि गुरुजी आणि गायतोंडे हे सगळेच एकाच थाळीतून जेवत असल्यासारखे एकमेकांशी जोडले जातात. दिलबाग सिंगची गुरुजींशी असलेली ओळख सिद्ध होते. रजनीशप्रचुर आश्रमातली क्रोएशियामधली परिस्थिती दिसू लागते. इथे आहार-निद्रा-भय-मैथुन ते थेट अपेयपान (त्यांच्या विशिष्ट चहासदृश द्रव्यातील ड्रग्स), स्वैर लैंगिक व्यवहार आणि चिंतन अशा सगळ्याचाच चिवडा होऊन मार्ग मात्र आध्यात्मिक असल्याचा सगळ्या उमेदवारांचा समाज अधोरेखित होतो. यात बात्या अबल्मान ही पॅलेस्तिनी आईने टाकलेली स्वतःला कःपदार्थ समजणारी गुरुजींची निकटवर्तीय म्हणून येते. इथल्या संपर्क इत्यादी सोयींचा पुढे ड्रग्स व्यापारासाठी उपयोग केला जातो. इथेच दिलबाग सिंग आणि गायतोंडे भेटतात.

परिस्थितीने तिथे पोहचवलेला गायतोंडे गुरुजींच्या विश्वनाशक तत्त्वज्ञानावर भाळतो. ‘अहं ब्रह्मास्मि’ हा मंत्र असल्यासारखा त्याचा उद्घोष करतो. आणि कल्पांत झालाच तर आपण समाजाच्या सगळ्यात उत्तम स्तरात राहू यात इतरांसारखा आनंद मानू लागतो. इथे सरताज वर्तमानात गायतोंडेच्या धमकीचा मागोवा घेत ड्रग वर्तुळ आणि मग थेट मंत्री बिपीन भोसलेपर्यंत पोचतो. त्याला शांत ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत गेल्याने त्याला raw agency मधूनही निलंबित करण्यात येते मात्र प्रश्नांची योग्य उत्तरे मिळवण्याची शक्यता त्याच्याच ठिकाणी असल्याने निलंबित होऊनही तो तपास चालू ठेवतो. त्याच्या बायकोचे लग्नबाह्य संबंध, अज्ञात मारेकर्‍याशी त्याच्या झालेल्या चकमकी इत्यादी त्याला आणखी पराभूत करत राहतात. अशात त्याला आपले दहशतवादी शाहीद खानशी असलेले संबंध कळतात, फाळणीच्या वेळी त्याच्या कुटुंबाने झेललेले दुःख कळते आणि विलक्षण विमनस्कतेत तो जातो.

पर्वाच्या शेवटी ती धमकी म्हणजे एक अणुबॉम्ब हल्ला होता, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली आहे आणि शहर रिकामे करण्यावाचून आता काही पर्याय नाही या निष्कर्षाला सगळे येऊन पोहचतात. आपल्याच शिरावर शहर वाचवण्याची जबाबदारी घेतलेला सरताज सिंग एव्हाना फक्त पत्नीला ‘शहर सोडून जा’ असे सांगतो. गायतोंडे आणि सरताज हे दोघेही कुटुंबाच्या आणि काही ठिकाणी देशाच्या राजकीय-सामाजिक इतिहासाने घडवलेले आहेत, हे अधिकाधिक स्पष्ट होत जाते. पहिल्या पर्वामधे जगज्जेता असलेला गायतोंडे दुसर्‍या पर्वामधे अतिशय दयनीय वाटतो. त्याच्या एकेकाळच्या प्रेयसीला त्याला शिवी घालावीशी वाटते इतका तो दिशाहीन शक्तिहीन होतो. मुंबईच्या नाशाची तयारी असलेला तो मुंबईला वाचवण्यासाठी धडपडू लागतो. पहिल्या आणि दुसर्‍या पर्वामधे जर काही समान धागा असेल तर तो सरताज आणि गायतोंडेच्या काळ्या-पांढर्‍या अशा सहज वर्गवारी करता येईल अशा बिलकुल न केलेल्या चित्रणात. दुसर्‍या पर्वाला पहिल्या पर्वाचे काही चेहरे नाहीसे होतात तर काही आणि विस्तृत चित्रवेळ घेऊन पडद्यावर येतात. काही नवीन चेहरे, उदाहरणार्थ शाहीद खान हा मूलतत्त्ववादी दहशतवादी किंवा बात्या अबल्मान ही विस्थापित तरुणी, कथेला आंतरराष्ट्रीय प्रश्नांची किनार देतात.

आधीच्या पर्वामधील राजकारण्यांची लालसा, हिंसेच्या एका व्यापक विचाराने जोडले गेलेले आणि एकाच माणसाला केंद्रस्थानी मानणारे लोक, झुंडबळीसारखे कठोर सामाजिक प्रश्न आणि या धार्मिक द्वंद्वात सतत अडकणारा सरताज सिंग दिसतो. तो इतका थकतो की शेवटी तो स्वतः गुरुजींच्या मार्गावर जायचा निर्णय घेतो. आता गायतोंडे नाही, माजिद, काटेकर, अंजली माथुर नाही. सरताज गुरुजींच्या मार्गावर चालू लागला. त्याचा ज्यांच्यावर विश्वास होता, ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते वरिष्ठ, मंत्री सगळेच फसवे निघाले. त्याचा स्वतःच्या इतिहासावरचा विश्वास उडाला आणि अशात शांत चित्ताने अणुबॉम्ब वाहून नेणारा दहशतवादी शाहीद खान मुंबईला न्याहाळतो आहे. प्रेक्षकांच्या मागणीवरून घडल्यासारखा सरताज अशा वेळी मागे फिरतो आणि बचाव कार्यात पोलिसांना मदत करायला जातो. त्यानंतर गुरुजींच्या सापडलेल्या कालग्रंथातील त्याला आणि एव्हाना प्रेक्षकांनासुद्धा योग्य वाटत वाटत असलेला त्याच्या वडलांच्या नावाशेजारचा गुप्त आकृतिबंध घालून अणुबॉम्ब निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर अणुबॉम्ब निष्क्रिय होतो की नाही ते अलाहिदा, मात्र गायतोंडेच्या पहिल्या फोनने सुरु झालेल्या या गोष्टीचे वर्तुळ पूर्ण होते.

पर्व 2 मधे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याची अहमहमिका, घाई आणि त्यामुळेच की काय कुठल्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याची चूक घडली आहे. जर माल्कोम हा निर्घृण खुनी राधिका आपटेला मारतो तर तो सरताजला देखील का मारत नाही? सरताज निलंबित होऊनही काम कसे करत राहतो? गायतोंडे अचानक हतबल का बनतो? सरताज सगळे सोडून जात असताना अचानक त्याला पुन्हा शहर वाचवण्याची इच्छा का होते? किंवा विस्थापितांच्या दुःखात फक्त पॅलेस्टिनी कुटुंबातील एकच मुलगी का दाखवली जाते? याची उत्तरे मिळत नाहीत. किंवा जरी मिळाली तरी ती अपुरी, ठिगळ लावल्यासारखी मिळतात. गुरुजी म्हणजे पंकज त्रिपाठी यांना वारेमाप चित्रवेळ बहाल करण्यात आल्यामुळे त्यांनी अभिनय जरी चांगला केला असला तरी त्यांच्या व्यक्तिरेखेतील गूढत्व, जरब, एकूणच भूमिकेची शक्ती तिसर्‍या-चौथ्या भागानंतर क्षीण होत जाते.

या पर्वाला विशेषतः हिंदू पुराणातील कथांचा संदर्भ न वापरता गील्गामेशसारख्या आंतरराष्ट्रीय पुराणांचे संदर्भ पेरण्यात आले. यातून पर्वाची दृष्टी व्यापक करण्याचा अथवा आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळण्याचा उद्देश असावा. मात्र त्यांना कथेत भक्कम आधार न सापडल्याने ते संदर्भ काळजाला भिडतील असे वापरले जात नाहीत. पुराणातल्या संदर्भांची जीवनात असलेली खोली आणि व्याप्ती पहिल्या पर्वामधे जितक्या सखोलपणे समोर आली होती तितकी ती दुसर्‍या पर्वाला येत नाही. राजकीय विधानांची बरसात केल्यानेसुद्धा बरेच ठिकाणी कथा मागे पडून राजकीय विधाने पुढे येतात.

मुख्य लेखक वरूण ग्रोवर असले तरी आधीच्या आणि आत्ताच्या लेखनात कमालीचा बदल जाणवतो. तीच गोष्ट संकलनाची. इथे संकलनात काढून टाकता आल्या असत्या अशा अनेक बाबी तशाच ठेवल्याने गोष्ट रंजक न होता कंटाळवाणी होते. आधीचे लेखन अधिक मातीतले होते त्यामुळे त्यात एक प्रकारची लयबद्धता आणि सहजता होती; आत्ता अनेक प्रत्यक्ष अनुभवात नसलेले संदर्भ समाविष्ट करण्याच्या अट्टाहासापोटी बरेच प्रसंग वरवरचे, मुळातून कमजोर असलेले वाटतात. विक्रमादित्य मोटवाने या खेपेस कार्यकारी निर्माता होते तर दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि नीरज घायवान होते. इथेदेखील दिग्दर्शन विभागात विक्रमादित्य मोटवानेंची अनुपस्थिती जाणवते. खूप प्रयोग केल्याने कथा बिघडून गेली असे काहीसे इथे झले आहे. सैफ अली खान आणि नवाजुद्दिन सिद्दीकीचा उत्तम अभिनय आहेच पण कुसुम देवी झालेल्या अमृता सुभाष यांनी नव्या प्रयोगशील अभिनयाचा मार्ग चोखाळला आहे. पंकज त्रिपाठी, गिरीश कुलकर्णी, कल्की कोच्लीन, रणवीर शौरी हे विशेष छाप पाडत नाहीत कारण ते सरधोपट मार्गाने अर्थात त्या मार्गालाही विशेष संयततेचा स्पर्श न करता चालतात. काटेकरची पत्नी झालेली नेहा शितोळे अभिनयात जरी उजवी असली तरी कथानक पुढे नेण्यात या पर्वाला तिचा फार काही हातभार लागलेला नाही. नीरज कबी मात्र पारुलकरच्या भूमिकेत इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी दिसतात.

पहिल्या पर्वाची तात्त्विक बैठक अधिक भक्कम आहे. कथेचे बीज आणि संकल्पना घट्ट विणलेल्या आहेत. दुसर्‍या पर्वामधे मूळ संकल्पना नेमकी संहाराची आहे, लोकांच्या भाबड्या भोळसट धर्मांधतेची आहे, गुरुजी आदींच्या हिंसकतेची आहे की आणि कसली आहे हे ओळखणे अवघड जाते. मात्र संकल्पना शोधण्यासाठी केलेली धडपड सतत समोर येत राहते. अतिमहत्त्वाकांक्षी झाल्याने हा प्रयोग फसला असावा असे म्हणायला हरकत नाही.

अणुबॉम्ब पोलिसांच्या गाडीतून आणला जातो हीदेखील अतिशयोक्ती वाटते. धर्मांतील द्वेष नष्ट करण्याची गरज जरी सगळ्यांना जाणवत असली तरी कथानकाचा भाग म्हणून तो विचार आला नाही तर त्याचा पायाच ढासळतो. असे जरी असले तरी पर्व 2 च्या अखेरीस सरताज सिंगची धडपड दिसल्याने आणि अणुबॉम्बचे काय झाले हे न कळल्याने ही पुढील पर्वाची नांदी आहे हे सुज्ञांना सांगायला नको. आणि पर्व 2 ही चित्रणात फसलेली असलेली , लेखनात भरकटलेली असली तरी कथेची पुढची पायरी आहे त्यामुळे सॅक्रीड गेम्स पुढच्या पर्वातून जोरदार पुनरागमन करेल अशी आशा ठेवायला हरकत नाही.

© मृणाल जोशी

jmrunal21@gmail.com