प्रकृती के सुकुमार कवी – सुमित्रानंदन पंत

सुमित्रानंदन पंत

#दिवाळी_अंक_२०१८

प्रथम रश्मि का आना रंगिणी

तूने कैसे पहचाना?

कहाँ, कहाँ हे बाल विहंगिन्नि

पाया, तूने यह गाना?

सोई थी तू स्वप्न नीड में

पंखों के सुख में चिपकार

झूम रहे थे, घूम द्वार पर

प्रहरी-से जुगनू नाना।

पंतांची ही कविता हिंदी साहित्यात खूप प्रसिद्ध आहे. सुमित्रानंदन पंत एक अद्भूत कवी ज्यांच्या कवितेचे अनेक पलिू आहेत. पंतांच्या कवितेचे अनेक चरण आहेत. ती वेगेवेगळ्या मार्गांनी जातान दिसते. पंतांच्या काव्याचा विकास विभिन्न प्रवृती, भावना विचार आणि अनेक व्यक्तींच्या प्रभावाने झालेला दिसतो. पंतांच्या ह्या कवितांचा प्रवास मुख्य तीन धारांत प्रवाहित होताना दिसतो, सौंदर्य, प्रगतीवाद आणि अध्यात्म.

ह्या लेखात मी फक्त त्यांच्या प्रकृती प्रेम ह्या विषयी लिहिणार आहे.

हिंदी साहित्यांत त्यांना ‘सौंदर्य का कवि’ अथवा ‘प्रकृती के सुकुमार कवि’ म्हणून संबोधलं जातं. निसर्गाचं बहुविध वर्णन जेवढं त्यांच्या कवितेत दिसतं तेवढं हिंदी साहित्यात अन्य कुठल्या कविंच्या कवितेत दिसत नाही.

पंतांना निसर्गाचे उपासक अथवा प्राकृतिक सौंदर्याचं वर्णन करणारा कवि म्हणून ओळखलं जातं. निसर्गाला पंत आपली प्रेरणा शक्ती मानतात. त्यांनी असं लिहिलयं की ‘कविता लिहिण्याची प्रेरणा मला निसर्गाच्या निरिक्षणाने मिळाली आहे.’

पंतांना कविता लिहिण्याची प्रेरणा त्यांच्या जन्मस्थानी मिळाली. पंतांचा जन्म उत्तरप्रदेशातील निसर्गसौंदर्यानी नटलेल्या अल्मोडा गावी 20 मे 1900 ला झाला. जन्माला आल्याबरोबर 6 तासांनी त्यांच्या आईने जगाचा निरोप घेतला. आईची कमतरता कदाचित निसर्गाने भरून काढली.

समुद्रसपाटीपासून सातहजार फुटांवर देवदार, ओक, चीड अशा वृक्षांनी बहरलेले गांव, हिमालयांच्या उत्तुंग शिखरांनी वेढलेले ही गांव, त्यांचं सौंदर्य ह्या बालकाला आपल्याकडे आकर्षित करेल नाही तर काय?

लहानपणापासून निसर्गाचं सौंदर्य त्याची विविध रूपं पंतांना दिसली त्यांनी अनुभवली ती त्यांच्या कवितेमध्ये सहजतेने आली.पंतांनी आपली पहिली कविता वयाच्या सातव्या वर्षी लिहिली. त्यामुळे पंतांचं जीवन दर्शन, त्यांची विचारधारा, त्यांच्या कल्पना ह्या सगळ्यात निसर्गाचं स्थान अविभाज्य आहे. आपल्या गावाचं वर्णन करताना ते लिहितात.

आरोही हिमगिरी चरणों पर

रहा ग्राम वह भरकत भजिकण

श्रद्धानत -आरोहण के प्रति

मुग्ध प्रकृति का आत्म-समर्पण

सांझ-प्रात स्वर्णिय शिखरों से

द्वाभायें बरसाती वैभव

ध्यानमग्न निःस्वर निसर्ग राज

दिव्य रूप का करता अनुभव ।

बर्फ़ानी आच्छादलेले डोंगर, त्याखाली हिरविगार शेतं, डोंगरावरून कोसळणारा झरा, नद्या, पक्ष्यांचे आवाज ह्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितांवर स्पष्टपणे दिसतो. पंतांच्या कवितांचं एक वैशिष्ट अजून दिसतं ते म्हणजे निसर्गातील निर्जिव गोष्टींना त्यांनी सजीव साकार रूपात आपल्या समोर मांडलं आहे.

‘कौन तुम रूपसी कौन

व्योम से उतर रही चुपचाप

छिपि निज माया में छवि आप

सुनहला फैला केश कलाप

मंत्र मधुर म्रुदु मौन।

संध्याकाळचं हे वर्णन त्यांनी आकर्षक युवतीची कल्पना करून केलं आहे. संध्याकाळ ही जणू एका आकर्षक युवतीच्या रूपात पृथ्वीवर अवतरत आहे. पंतांनी एकीकडे संध्याकाळ ही आकर्षक युवतीच्या रूपात मांडली आहे तर काही काही कवितांमध्ये त्यांनी स्त्री सौंदर्याला, निसर्गसौंदर्यापुढे गौण मानलं आहे. एका कवितेत ते लिहितात.

‘छोड द्रुयों की मृदु छाया

तोड प्रकृती से भी माया

बाले तेरे बाल-जाल में

उलझा दूं यें कैसे लोचन?

पंतांनी आपल्या कवितेमधून कुठेही वासना किंवा अश्लिलता यांना महत्त्व दिलं नाही.

त्यांच्या कवितांमध्ये स्त्रीचं स्वच्छ, पवित्र, उज्वल रूप समोर येतं.

‘सरलपन ही था उसका मन

निरालापन था आभूषण

कान से मिले अजान नयन

सहज था सजा सजीला तन।

निसर्गाच्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी, त्याच्या प्रत्येक अंगाचं, त्याच्या क्षणा-क्षणाला बदलणार्‍या रूपाचं वर्णन आपल्याला पंतांच्या कवितांमधून दिसतं. छोट्याश्या फुलांपासून, फुलपाखरं, ढग, चांदण्या, सावली, शंख, शिंपले, समुद्र, हिमालय इत्यादी. निसर्गाचं हुबेहुब वर्नन, चित्रण त्यांच्या अनेक कवितांमध्ये आपल्याला दिसतं. आता हिच कविता बघा. ज्यात त्यांनी पावसाळ्यात निसर्गामध्ये होणार्‍या छोट्या-छोट्या बदलांचे सुरेख वर्णन केले आहे.

‘पावस ऋतु थी, पर्वत प्रदेश

पल पल परिवर्तित प्रकृती वेश ।

मेखलाकार पर्वत अपार

अपने सहस्त्र दृग-सुमन फाड

अवलोक रहा है बार – बार

नीचे जल में निज हाहाकार

जिसके चरणों में पला ताल

दर्पण रस फैला है विशाल।’

डोंगरावर उगवलेली फुलं जणू त्याचे डोळे आहेत आणि पाण्याने भरलेला तलाव आरसा आहे ज्यात तो आपलं रूप बघत आहे.

पंतांनी निसर्गाला निरपेक्ष दृष्टीने बघीतलं आहे. निसर्गाला त्यांनी चैतन्यस्वरूप मानलं आहे. प्रकृतीच्या वेगवेगळ्या रूपाचं वर्णन त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसतं.

कभी उडते पत्तों के साथ

मुझे मिलते मेरे सुकुमार

बढाकर लहरों से निज हाथ

बुलाते फिर मुझको फिर उस पार ।

निसर्ग सौंदर्य हे कविचा आत्मा आहे म्हणूनच पंतांच्या कविता आपल्या हृदयस्थ होउ पाहतात. प्रेम असो, विरह असो, मिलन असो निसर्गाला कधीच विसरत नाहीत.

पंतांना हिंदी साहित्याचे युग प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. त्यांचे मुख्य कवितासंग्रह वीणा, ग्रंथि, पल्लव, गुंजन, युगांत, युगवाणी, ग्राभ्या, स्वर्ण-किरण, स्वर्ण-धूली, मधुजल, युगपथ आणि उत्तर, कला और बुढा चाँद, लोकायतन चिदम्बरा हे आहेत.

‘चिदम्बरा’ साठी पंतांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. जो हिंदी साहित्यात काव्यासाठी मिळालेला प्रथम पुरस्कार आहे. ‘कला और बूढा चाँद’ साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि ‘लोकायतन’ साठी त्यांना सोवियत लँड नेहरू पुरस्कार मिळाला आहे.

अशा या महान कविच्या कवितांचं सगळ्यात मोठं तत्त्व म्हणजे त्यांचं निसर्गप्रेम हे आहे. निसर्गाच्या सान्निध्यात लहानपण गेल्यामुळे त्यांना निसर्गाबद्द्ल एक अज्ञात आकर्षण निर्माण झालं आणि त्या अज्ञात आकर्षणाने एका अव्यक्त सौंदर्यभावनेला जन्म दिला. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गाचं कधी परमात्म रूप दिसतं तर कधी लौकिक रूप, काही कवितांमध्ये पंतांच्या आणि निसर्गाचा संबंध एक चिरतरूण प्रेमिकासारखा वाटतो. निसर्गाला ते कवितेचं क्षणिक तत्त्व न मानता एक स्थायी अंग मानतात. निसर्गाला ते वात्सल्यरूपी आई मानतात.

पंतांच्या ह्या कवितेतून आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते. कविता वाचून एक अविट आनंद मिळतो. अशाच एका कवितेने ह्या लेखाचा शेवट मी करते.

फैली खेतों में दूर तलक मखमल की कोमल हरियाली ।

लिपटी जिससे रवि की किरणे चांदी की सी उजली जाली ।

तिनकों में हरे हरे तनपर हिल हरित रूधीर है रहा झलक ।

श्यामल भूतल पर झुका हुआ नभ का चिर-निर्मल नील फलक ।

रोमांचित सी लगती वसुधा आई जो गेहूं में बाली ।

अरहर सनई की सोने की किंकणियां है शोभाशाली ।

लेखक - अंजली फडणीस