वळवाचा पाऊस

वळवाचा पाऊस

पौर्णिमा असली तरी ती आषाढातील रात्र होती. पावसाने ऊर भरून आलेल्या त्या काळ्याकुट्ट ढगांमागे तो चंद्र कधीचा लपून बसला होता.

त्या दोघांनी आपापली शाल ओढून घेतली अन् हातातल्या कपने चीअर्स करत एक एक सीप घेतला. मस्तपैकी सोफ्याला टेकून समोरच्या खिडकीबाहेर दिसणारा वीज-पावसाचा खेळ पाहण्याच्या बेताने ते बसले होते. खरं तर त्या मुसळधार पावसाने त्यांचा मूव्हीचा प्लॅनच फिस्कटवला. पण जराही हिरमोड न करत उलट घरीच बसून त्या पावसाचीच मजा पाहण्याचा बेत त्याने बनवला. तिनेही कसलेही आढेवेढे न घेता लगेच त्याला संमती दिली. एकामेकांशी अशा प्रकारे निवांत गप्पा मारण्याची याहून दुसरी संधी थोडीच मिळणार होती. त्यात आणखी रंगत यावी म्हणून त्याने मस्त फक्कड चहा व तिने वाफाळलेल्या कॉफीची निवड केली.

त्यावेळी एडिसनची वीज नसली तरी आकाशातल्या वीजांनी मात्र कडकडाट करून दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं होतं. तसं बघायला गेलं तर हल्ली मोबाईल फोनच्या किंवा इतर कोणत्याही टॉर्चमुळे मेणबत्त्यांची आठवणही येत नाही. पण तरी त्याने आधीच दोन मेणबत्त्या लावून ठेवलेल्या होत्या.

मेणबत्तीच्या ज्योतीशी खेळत असताना तिच्या मनात त्या पावसासोबत ताल धरायला विचारही कोसळत होते. “या मेणबत्त्यांच्या उबदार प्रकाशापुढे टॉर्चचा प्रकाश नक्कीच फीका पडला असता. तसही त्या इलेक्ट्रिक प्रकाशाला अस्स रोमॅंटिक वातावरण तयार करणं जमलंच नसतं. मग म्हणूनच त्याने मेणबत्त्या लावल्या आहेत का?” झटकन तिने हात मागे घेतला आणि खिडकीकडे बघत उगीच शाल ओढून घेण्याचा बहाणा केला. ‘रोमॅंटिक’ या नुसत्या शब्दाच्या विचारानेच तिचा चेहरा खुलला आणि त्या अंधारातही ते त्याच्या नजरेतून सुटलं नाही.

“तुला पाऊस आवडतो?” त्याचं हे वाक्य प्रश्न कमी आणि उत्तर जास्त वाटत होतं. तिचा चेहरा निरखत तो पुढे काय बोलावं याचा अंदाज घेत होता. नवख्या संसाराची मांडणी करताना छोट्या मोठ्या संवादातून एकामेकांना ओळखावं लागतं. अशावेळी आवडी-निवडीची बाराखडी ही गिरवावी लागतेच. त्याशिवाय आयुष्याचा निबंध लिहिणार तरी कसा? कदाचित असाच काहीसा विचार करत त्याने तिला बोलतं करायचं ठरवलं.

ती पुन्हा हसली. जणू तिच्या मनाच्या कोपऱ्यातून एखादी आठवण बाहेर डोकावू पाहत होती.

“तसा आवडतो पण आणि नाही पण …”

“मग कधी आवडतो आणि कधी नाही?” त्याचा दुसरा प्रश्नही तयार होता.

“हम्म!…” तिने एक हलकासा श्वास घेतला आणि ती पुढे बोलू लागली. “जेव्हा त्याने नको यावं असं वाटतं आणि तो अचानक येतो… किंवा त्याने खूप बरसावं अस्स वाटूनही तो गधडा पाऊस पाठ फिरवतो. तेव्हा ना तो मुळीच आवडत नाही.” तिच्या चेहऱ्यावरचा तो लटका राग निरखून पाहताना त्याला हसूच आलं आणि त्याने ते लपवलं ही नाही.

“का? तुला खूप आवडतो का पाऊस?” डोळे बारीक करून, मान तिरपी करून त्याच्याकडे बघत तिने जरा घुश्श्यातच विचारलं.

“मला तर पावसाळा हा ऋतूच आवडतो. बहरूपीया आहे तो एक नंबरचा! कधी जुन्या जिगरी दोस्तासारखा वाटतो, कधी आज्जीच्या मायेसारखा, तर कधी जादूगाराच्या जादू सारखा..‌. कधी कधी भासतं की त्याच्या आवाजात मल्हार राग दडलाय तर कधी वाटतं की देव जाणे कोणावरचा राग आपल्यावर ओकतोय? काही वेळा इतका अलगद पडतो की मोरपीसच जणू; तर कधी बेभान उधळलेल्या घोड्यासारखा भासतो तो मला. अजब आहे हा पाऊस!” तिच्या घुश्श्याचा त्याच्या बोलण्यावर काहीही परिणाम दिसत नव्हता . पावसाबद्दल काय बोलू न् काय नको असं झालं होतं त्याला.

असं पावसाबद्दल भरभरून तिने कधी ऐकलं नव्हतंच. त्याच्या डोळ्यांमधली ती चमक आणि चेहऱ्यावरचे सहज भाव ती पहातच राहिली. तितक्यात त्याने तिच्याकडे पाहिलं. उगाच का कोण जाणे पण चोरी पकडल्याची भावना तिच्या मनात आली अन् हनुवटीला आधार देणारा तिचा हात अचानक गडबडला. पुन्हा नीट सावरुन बसत तिने त्याच्याकडे पाहिलं. दोन मिनिटांनी न राहून शेवटी तिने विचारलंच, “काय?” त्याने भुवया उंचावून ‘आता तुझी पाळी’ असा इशारा केला.

“दिलं ना उत्तर मघाशी मी,” ती कशीबशी नजर चुकवत म्हणाली.

“अहं! अर्धच होतं ते उत्तर. अजून कोणता पाऊस आवडतो ते नाही सांगितलंस.”

तिच्याकडे वळून सोफ्याला रेलून बसत त्याने आता एका सिन्सिअर श्रोत्याचा स्टान्स घेतला. तो काही इतक्यात तिची सूटका करणार नव्हता. एवढी छानपैकी जमलेली मैफल सोडून ती जाणार तर कुठे होती! पण तरीही त्याला काय वाटेल माझं उत्तर ऐकून असं उगाच तिला वाटून गेलं. तिला आता बोलावं लागणारच होतं.

पुन्हा एकदा पावसाच्या सरींकडे पाहत तिने कॉफीचा एक घोट घेतला. पाय जवळ ओढून हातावर हनुवटी टेकवून तिने अनुभवलेला तो प्रत्येक पाऊस ती आठवू लागली. तिच्या मनाची पाने शब्दांद्वारे उलगडण्याचा त्याचा प्रयत्न आता फळाला येत होता.

“तुझ्याप्रमाणेच मलाही वेगवेगळा भासतो हा पाऊस. जसा शाळेत जाताना भिजवणारा एक खोडकर! तसा आजही ऑफिसला जायचं म्हटलं‌ की भेटतो तो वाटेत.” बोलता बोलता ती स्वतःशीच हसली. “जेव्हा मला पुस्तकांचा सहवास आवडू लागला, त्यावेळी बेडवर पडून आरामात पुस्तकं वाचायला फार आवडायचं. मग जेव्हा दुपारी सूर्यालाच टक्कर देणाऱ्या ढगांमधून तो पाऊस बरसत यायचा तेव्हा मस्त वाटायचं…. छान उबदार पांघरूण ओढून पावसाच्या त्या बँकग्राऊण्ड म्युझिकवर माझ्या आवडीची बरीच पुस्तकं मी आजपर्यंत वाचली आहेत. “

त्यावेळी बोलताना ती एक क्षण थांबली. तो जरी पुढचं ऐकण्यासाठी अधीर झाला होता, तरी तोही थांबला. काही क्षण निशब्दतेत गेले. जणू ती शांतता सुद्धा तिचं आवडीने ऐकू लागली. तिने हलकेच नजर वळवून त्याच्या नजरेला भिडवली व म्हणाली, “खरं सांगू… जसजशी मी मोठी होत गेले आणि पावसाशी माझं नातं जोडू लागले, तसतसा फक्त पाहिला पाऊसच मनाला भावतोय. त्या नंतर पडणाऱ्या कोणत्याही पावसाचं मला ना औत्सुक्य वाटलं ना कौतुक!” आता तिचं बोलणं एखादया कवितेप्रमाणे लय पकडू लागलं होतं.

“का कोणास ठाऊक पण त्या पहिल्या पावसाशी एक वेगळच नातं आहे असं वाटतं मला. म्हणजे बघ ना, जसं वळवाच्या पावसाआधी सगळं तापून निघालेलं असतं आणि मग हळूहळू त्या काळ्याशार ढगांनी आकाश भरुन येतं. गार वाराही पावसाची चाहूल देऊ लागतो…. ते अगदी तसंच होत असतं जस एखाद्यावेळी आपल्याला कसं गलबलून येतं, खूप रडावं वाटतं. मग हनुवटीही थरथरू लागते आणि कोण्या एका व्यक्तीच्या स्पर्शाने किंवा साध्या आठवणीनेही आपला बांध फुटतो…. अगदी अगदी त्याप्रमाणेच आकाशात वीज कडाडते आणि त्या आम्रसरी धरतीच्या ओढीने बरसू लागतात. कसलाही आडपडदा न ठेवता स्वतःला जणू तिच्या कुशीत मोकळं करतात.” एवढं सगळं एका दमात बोलल्यानंतर तिने पुन्हा एकदा मोठा श्वास घेतला.

पण यावेळी ती खूप सारं काही त्या श्वासात भरून घेतेय असं जाणवत होतं आणि तेवढयात त्याला उमगलं की ती बोलता बोलता त्याच्या एकदम पुढयात येऊन बसली आहे. तिचं ते रुप तो पुर्णपणे डोळ्यात साठवू पाहत होता. तिने अलगद डोळे उघडले व त्याच्याकडे मंद स्मित करत म्हणाली, “तो ओल्या मातीचा वास मला तर वेड लावून जातो. ते पाऊस बरसून गेल्यानंतरच वातावरण म्हणजे तर मन मोकळं रडून झाल्यानंतर जसं होतं ना तसंच प्रसन्न आणि शांत होऊन जातं. अशा पहिल्यांदाच येणाऱ्या पावसापुढे पुढचे सगळे पाऊस मला फिके वाटतात. त्याची सर बाकी कशाला नाही.”

क्षणात एकदम वीज कडाडली आणि वळवाच्या पावसाच्या आठवणीत गारठून गेलेली ती एकदम शहारली. त्याने हलकेच आपली शाल तिच्या खांद्यावर पांघरली. काय करावं हे न कळून ती पुन्हा त्याच्या शेजारी सोफ्याला टेकून बसली. त्याच्यासोबत खिडकीच्या काचांपलिकडे धो-धो पडणाऱ्या पावसाला निरखू लागली.

आषाढातला असला व जरी तो पहिला नसला, तरी तो पाऊस आज तिला वळवाच्या पावसाप्रमाणे हवाहवासा वाटत होता!!

- श्वेता नाचणे