आणि ग्रंथोपजीविये…

Ra Chi Dhere's reading and Book Collection

अण्णा इथे आले (पुण्यात), त्यावेळी मावळातल्या एका छोट्या खेड्यातून आले. त्यांच्या मामांकडे पोथी सांगितली जात असे. त्यांच्या घरी जी भिक्षुकी होती त्यामध्ये नुसतंच जाऊन चार मंत्र म्हणून आले असं नव्हतं. ते चांगलं पोथी वाचन करत असत. अण्णा अगदी लहान असल्यापासून म्हणजे वयाच्या 8 व्या वर्षांपासून पोथी वाचायचे. आमच्या आत्याच्या सांगण्याप्रमाणे, आजूबाजूच्या आया-बाया म्हणायचे की, इतका लहान असून चांगलं वाचतो. हा आमचा ज्ञानेश्वर आहे. वाच बाळा तू वाच. तर त्यामुळे त्या पोथ्यांशी त्यांचं जवळचं नातं जुळलं ते तिथपासूनच होतं. त्यातली रंगीत चित्र, त्यांच्यातलं श्रीधर महिपतींचे ते ग्रंथ (ते नेहमी पूढे असं म्हणायचे की, यांनी मला पोसलं.) त्यामुळे ते वाचायची गोडी लागली. मग घरामध्ये असलेल्या पोथ्या माहीत होत्या. पुण्याला आले त्यावेळी वय काय 12-13 वर्षांच्या आसपास असलेलं वय. इथे तर उभं राहायचे आणि जगायचे सर्वच प्रश्न समोर होते. त्यामुळे त्यांचा झगडा एका बाजूला तीव्र चालू असताना सुद्धा पुस्तकांचं वेड काही सुटलं नाही. पुण्यामध्ये आल्यावर त्यांच्यासाठी खूपच मोठं जग खुलं झालं. म्हणजे खेड्यात असताना ज्या काही चार पोथ्या होत्या, त्याच्या पलीकडचं पुस्तकांचं जग नव्हतं माहिती. पण पुण्यात आल्यानंतर त्यांना जे काही दिसलं ते फार मोठं होतं. मराठी शाळेतले शिक्षक चांगले मिळाले. त्यामुळे कवितांची गोडी लागली. वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचण्याची गोडी लागली. आणि मुख्यतः अभ्यास. खेड्यातल्या वातावरणामध्ये ज्या प्रकारचे ग्रंथ वाचनात आले होते त्यांना नव्या दृष्टीकोणाने पाहणे आणि वाचणे. हे सुद्धा वयाच्या 16-17 व्या वर्षी सुरू झालं.

त्यावेळी ‘शंकराजी नारायण पारितोषिक’ भोरच्या पंतसचिवांनी सुरू केलं होतं. नाथ संप्रदायाच्या निबंधासाठी. अण्णांनी ठरवलं की ह्या निबंधासाठी या विषयाचा अभ्यास करायचा. ते तडक कुठे गेले तर, आबासाहेब मुजुमदारांकडे. त्यांच्या घरी पुस्तकांचा फार मोठा संग्रह होता. ते सरदार होते. संगीतज्ञ होते. अतिशय अभिरुची संपन्न होते आणि उत्तम वाचक देखील होते आणि व्यक्तिगत पुस्तक संग्रह खूप मोठा देखील होता. मग तरुण अण्णा त्यांच्यापुढे जाऊन उभे राहिले आणि म्हणाले की मी अमुक अमुक रात्र शाळेत शिकणारा मुलगा आहे आणि मला या विषयासाठी निबंध लिहायचा आहे. मुळात एवढ्या लहान मुलाने या प्रकारच्या निबंधासाठी पुस्तकं वाचायला मागावीत, आणि मी इथे बसून वाचेन, खराब करणार नाही, तुम्ही सांगाल त्या वेळेला येईन वगैरे वगैरे कबूल केल्यावर ते हसले. म्हणाले, जा तिथं पलीकडे आहेत पुस्तकं. तुला काय हवीत ती बघून घे. ते बघून त्यांनी एक यादी केली. पुस्तकं काढली. ते घेऊन त्यांच्याकडे पुन्हा आले. म्हणाले मी इथे बसण्यासाठी कधी येत जाऊ वगैरे. मुजुमदार म्हणाले की जा घरी घेऊन जा. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुझ्यासारखा मुलगा हे मागतोय त्याअर्थी तू ते परत आणून देशील. पण म्हणजे त्या अभ्यासासाठी वापरण्याचे ग्रंथ, त्याच्या विषयीची चौकस बुद्धी त्यांच्यापाशी होती. तो अभ्यास त्यांनी केला आणि पहिलं पारितोषिक मिळालं. मुख्य म्हणजे यातून त्यांना त्यांची वाट सापडली. ते त्या परितोषिकाच्या रकमेपेक्षाही मोठं होतं. मग त्यानंतर त्यांनी घरामध्ये पुस्तके जमवायला सुरुवात केली. पानशेतचा पूर आला, सगळं वाहून गेलं. त्या वेळी आमच्या कडे सुमारे चार-पाच हजार पुस्तके होती. त्याकाळात आम्ही एका जिन्याखालच्या ओल आलेल्या नदीकाठच्या घरात राहत होतो. दरवर्षी तिथे पुराचं पाणी येत असे. दरवर्षीचा अण्णांचा कार्यक्रम ठरलेला असे, पाणी येतंय असं दिसलं की त्यांच्या 3-4 मित्रांना जमवायचं आणि ती सर्व पुस्तकं वरच्या मजल्यावरच्या कुठल्यातरी सज्जन शेजार्‍याकडे ठवायची. असं हे दरवेळी चालायचं.

Ra Chi Dhere
रामचंद्र चिंतामण ढेरे

पानशेत मध्ये तर सगळा पुस्तक संग्रह गेला. मी त्यांना नेहमी चिडवायचे, मी त्यांची पहिली मुलगी, साडेतीन वर्षांची होते पूर आला तेव्हा. आम्हाला माहिती नव्हतं की धरण फुटलंय. वाटलं नेहमीसारखं पाणी आलंय नदीला. आणि ते इतक्या वेगानं वाढलं की मला उचलायचे विसरून गेले अण्णा. पुस्तकं वाचवणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. ते भराभर पुस्तकं गोळा करत होते आणि एकडे माझ्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलं. एवढीशी मी, पण दगडांवर उभं राहून मी ती गम्मत बघत होते. त्याच्या भीषणतेची मलाही कुठे कल्पना असणार. पण अण्णांच्या एक मित्रानं ते पाहिलं, मला खांद्यावर बसवलं (कारण पाणी प्रचंड वाढलं होतं) आणि त्यांच्या एका नातेवाईकाकडे मला घेऊन गेले. दुसर्‍या दिवशी मला अण्णांकडे पोहोचवण्यात आलं. त्यामुळे मी नेहमी म्हणत असे, की पहिल्या अपत्यापेक्षा सुद्धा तुम्हाला पुस्तकं जास्त प्रिय होती. पण दुर्दैवाने त्या पुरात तो मजला अगदी डोळ्यादेखत कोसळला. कच्चे वाडे होते ते सर्व. जुनी मातीची घरं. त्यामुळे ते सर्वच पुरात वाहून गेलं.

त्यानंतर आम्ही ज्या घरामध्ये भाड्याने पुन्हा राहायला गेलो ते पुन्हा नदीकाठचंच घर होतं. तिथे अगदी गुडघा गुढघा चिखल काढून साफ करून, राहण्यायोग्य तयारी करावी लागली होती. पण अण्णांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की, वरच्या मजल्यावरती ‘दत्तो वामन पोतदारांचा’ संग्रह होता. पोतदार राहतच होते तिथे. अख्खा तिसरा मजला त्यांचा. आणि चौथ्या मजल्यावर माळा होता ज्याच्यामध्ये पोतदारांच्या पुस्तकांसोबत अण्णांची सुद्धा पुस्तकं आली. एवढं अद्भुत होतं ते जग! दत्तो वामन पोतदारांचं सुद्धा या निमित्ताने सांगावसं वाटतं, मला आठवतंय त्या प्रमाणे, आम्ही मुलं मुलंच खेळायला जात असू तेव्हा. त्यांच्या टेबलावर बडीशेपेच्या गोळ्यांची बरणी ठेवलेली असायची. दादा ब्रम्हचारी आणि एकदम कडक ब्रह्मचारी. त्यामुळे बाकी त्यांच्याशी कुणी काही सलगी करायला जायचं नाही. पण आम्ही पोरं खेळत चुकून गेलो की मूठभर गोळ्या काढून हातावर द्यायचे नि पुस्तकांच्या ढिगार्‍यात अखंड असायचे. अण्णांना त्यांची एक दिक्षाच मिळाली असं म्हणायला लागेल. तसे ढिगारे, तशी पुस्तके हे अण्णांचंही स्वतःचं अखंड आनंदनिधान होतं. मला आठवतंय मी 25 वर्षांची होईपर्यंत त्या घरात राहिले. ते घर सोडलं त्यावेळेला मूळ भिंतींचे रंग काय होते हे मी पहिल्यांदा पाहिलं. घरात जवळ जवळ फर्निचर काहीच नव्हतं. एक लोखंडी खुर्ची आणि एक लोखंडी पलंग. माझे भाऊ बहीण झाल्यानंतर तो पलंग मागून आणला होता. तो अण्णांच्या एका मित्राने दिला होता. अण्णांना त्यांनी सांगितलं होतं की, याचे पैसे तुम्ही सवडीने द्या. ते चाळीस रुपये आम्ही हळू हळू दिले. त्या पलंगाच्या खालीही पूर्ण पुस्तकंच होती. पहिलं गोदरेजचं कपाट घेतलं ते देखील पोथ्या ठेवण्यासाठीच. त्याच्यात कपडे कधीच नव्हते.

मला कुणी विचारलं की, “कोण कोण राहतात गं तुमच्या घरी?” तर मला असं म्हणावंसं वाटे की, “आमच्या घरी पुस्तकं राहतात आणि आम्ही त्यांची व्यवस्था बघतोय.” त्याचा आम्हाला अभिमान सुद्धा वाटत असे की, हे आपल्या घराचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आपलं घर म्हणजे पुस्तकांचं घर आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे आनंद होत असे.

आमच्याकडे मिरजेच्या पटवर्धन यायच्या. मंगलाराजे पटवर्धन. त्यांना वाचनाची खूप आवड होती, अभ्यास करणार्‍या होत्या. त्या दारापासूनच हात जोडत जोडत अण्णांकडे येत असत. तो संपूर्ण वाडाच कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांचा. पण त्या पुस्तकांनी आम्हाला जी श्रीमंती दिली होती, त्याची जाणीव सतत होत असे.

अण्णांचा संग्रह वाढतच राहिला, ते घर अपुरं पडायला लागलं. मग अलका टॉकीज जवळ निघोजकर मंगल कार्यालय होतं, त्याच्या जवळ एक जुना वाडा होता. त्या वाड्यात वरच्या मजल्यावर एक खोली अण्णांना भाड्याने मिळाली. तिथे मग बाकीची पुस्तकं हलवण्यात आली. मग त्या सर्व पुस्तकांमध्ये अण्णा बसायचे. अतिशय दाटीवाटीने पुस्तके ठेवलेली असायची. त्याचे ढिगारे असायचे. ते अधून मधून कोसळायचे. मग ते पुन्हा उभे करण्यात वेळ जायचा. तो वाडा जुना होता. गॅलरी खचलेली होती. पण एवढी परिस्थितीतीच नव्हती त्यामुळे अण्णांनी ते तसंच ठेवलं होतं. एक दिवस कळलं की तिथे उंदीर लागले, तेव्हा पुस्तकं पोत्यात भरून नदीत लोटावी लागली.

आज सध्या आम्ही जिथे राहतोय ती जागा काही घेण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही नव्हतो. पण पुरानंतर त्या वाड्यातली जी दोन घरं होती त्यातल्या एकाने, ज्यांना अण्णांच्या अभ्यासाचं, पुस्तकप्रेमाचं कौतुक होतं, त्यांनी या भागामध्ये 3-4 प्लॉट घेऊन ठेवले होते. त्यांची 2 मुलं होती, मुलगी होती, ते स्वतः होते. एक दिवशी ते म्हणाले, “हा प्लॉट मी तुझ्या नावाने ठेवलाय. पैसे नाहीयेत, नसू दे, असतील तेवढे आणून दे, बाकीचे हळू हळू आणून दे. माझं काही म्हणणं नाही.” तर असं हळू हळू करत हा प्लॉट नावावर झाला होता. त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी शासनातर्फे पूरग्रस्तांसाठीची मदत मिळवून दिली. पूरग्रस्त म्हणून अण्णांनी काही अर्ज-बिर्ज केला नव्हता. पण मग त्यातून आलेल्या पैशातून ह्या प्लॉटचे पैसे एकदम देता आले. त्यामुळे जेव्हा त्या वाड्यावर उंदीर लागले आणि तेव्हा अण्णा कमालीचे अस्वस्थ झाले. मी त्यांना म्हटलं की ही जागा आपण देऊन टाकूया बिल्डर ला आणि त्याच्या बदल्यात आपण आपल्याला राहायला 3 खोल्या आणि वर पुस्तकांना 3 खोल्या असं त्याच्याकडून घेऊयात, असं आम्ही ठरवलं. तो बिल्डर सुद्धा तेव्हा तयार झाला. पण आमच्या हक्काचा जो एक FSI होता त्यानुसार तो तीन मजले बांधणार होता. पुढच्या बाजूला त्याने बांधलेही तसे. पण त्याला हा प्लॉटच हवा होता. त्याने त्याच्या मालकीचा भाग आधी पूर्ण केला आणि आमच्याकडचे काम अर्धे ठेवले होते. त्याच सुमारास मी विद्यापीठाच्या exchange मध्ये तीन महिन्यांसाठी अमेरिकेत होते. काम पूर्ण होत असताना त्या बिल्डरने अण्णांना बोलावून सांगितलं की, तुम्हाला जर काही स्वतंत्र हवं असेल तर तुम्हाला सव्वा लाख रुपये जास्तीचा खर्च येईल. (त्या काळातील सव्वा लाख) तुम्ही तेवढे पैसे द्या मगच तुम्हाला याचा ताबा मिळेल. झालं असं होतं की, तिकडे पुस्तकांना उंदीर लागल्यामुळे नुकसान झालं होतं बरंच, त्यामुळे अण्णांनी, इथल्या त्यातल्या त्यात बर्‍या खोलीत ती सर्व पुस्तकं हलवली होती. तरी हा बिल्डर काम पूर्ण करायला तयार नाही, ताबाही द्यायला तयार नाही. मी देखील इथे नव्हते. अण्णांनी मित्रा मंडळींच्या मदतीने 25 हजार गोळा केले आणि त्याला म्हणाले की एवढे ठेवून घे. (मी तेव्हा भारतात नव्हते.) तो म्हणाला सर्व पैसे आताच पाहिजे. नाहीतर मग FSI लिहून द्या, तुम्ही मोकळे मी मोकळा. मला ज्यांनी अमेरिकेत पाठवले होते ते प्राध्यापक अण्णांकडे आले, ते म्हणाले, “ढेरे, तुमचे चाहते सुधाकर भावे पुण्याचे पोलीस कमिशनर आहेत. (त्यांची पत्नी त्यावेळी आकाशवाणीवर प्रोड्युसर होती आणि दोघेही अण्णांना मानणारे होते.) आपण जाऊयात त्यांच्याकडे.” अण्णा गेले त्यांच्याकडे. सर्व हकीकत ऐकल्यावर कमिशनर म्हणाले, “तुमची पुस्तकं आता आहेत ना. तुम्हाला वाचवलं पुस्तकांनी. आपण त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो. एरवी दिवाणी गुन्ह्यात खूप वर्ष गेली असती.” त्यांनी माणसं पाठवली आणि दुसर्‍या दिवशी बिल्डरने किल्ली ताब्यात दिली. उरलेलं काम आमचं आम्ही पूर्ण करून घेतलं. पुस्तकांसाठी स्वतंत्र घर मिळालं.

पुस्तकं मिळविण्यासाठी अण्णांनी काय केलं नसेल! पुण्यातले सर्व जुने पुस्तक विक्रेत्यांशी अण्णांचे फार जवळचे संबंध होते. त्यातले काही जण वाटेल त्या किंमती लावणारे होते, एक-दोघेच असे होते. पण बाकीचे लोक आमच्या अगदी घरच्यासारखे झाले होते. जुनी, दुर्मिळ पुस्तकं घेणं हा अण्णांच्या अगदी व्यसनासारखा भाग झाला होता. अण्णांना भेटायचं असेल तर, रोज सकाळी सव्वा सात वाजता ते आप्पा बळवंत चौकातल्या गाजर्‍यांच्या दुकानात असणार, हे लोकांना माहीत असे. त्याच्या नंतर ते येणार सरस्वती मंदिरच्या ओट्यावर, आठवल्यांच्याकडे. नंतर ते ‘इंटरनॅशनल’मध्ये भेटणार. दर शनिवारी सकाळी साडे आठ वाजता ते ‘भांडारकर इन्स्टिट्यूट’ मध्ये असणार हे लोकांना माहिती असायचं. अगदी अलिखित असल्यासारखं. मग ह्या सर्व गाठीभेटीनंतर ते त्यांच्या लेखनासाठी जात. ते लेखन पुष्कळदा पाताळेश्वराच्या देवळात बसून शांततेत करत. आकाशवाणीवरची भाषणं तिथल्या तिथे लिहून देत. सांगायचा मुद्दा हा की, ह्या सर्व पुस्तकांच्या दुकनदारांना माहिती असायचं की अण्णांना कोणती पुस्तकं हवी असतात. त्याप्रमाणे, पुस्तकं राखून ठेवली जात असत. अशा प्रकारे ही माणसं काम करायची.

अण्णांच्या पुस्तकवेडाच्या इतरही अनेक गोष्टी होत्या. काका वाडके नावाचे एक चांगले वाचक अण्णांच्या ह्या पुस्तक संग्रहाच्या निमित्ताने चांगले मित्र झाले होते. ते यायचे नेहमी. अण्णांनी त्यांचं नवीनच पुस्तकांचं जग निर्माण केलं होतं. माणसाने चांगलं वाचलं पाहिजे. चांगल्या पुस्तकांच्या शोधात असलं पाहिजे. आपली अभिरुची वाढत असली पाहिजे, असा अण्णांचा नेहमी आग्रह असे. या सर्वांसाठी अण्णा प्रयत्न करत असत. पूर्वी सोमवारचा पुस्तकांचा बाजार लक्ष्मी रोडला लागत असे. अण्णा दर सोमवारी न चुकता तिथे असायचे. आणखी जिथून मिळेल तिथून ते पुस्तकं गोळा करायचे. एकदा तर कुठल्या तरी लग्नाला आम्हाला जायचं होतं. कसेबसे आहेराचे पैसे बाजूला ठेवून आईने आमच्याकडे दिलेले. आम्ही निघालो. आमच्या घराच्या समोर एक बोळ वजा रस्ता होता. तिथून एक भांडे-डबे वाली मोठ्ठच्या मोठं गाठोडं घेऊन येत होती. त्यांनी त्याच्यातून बाहेर येणारी पानं पाहिली. अण्णांना काय एकदम साक्षात्कार झाला कोण जाणे! म्हणाले, “अरे हे काहीतरी घबाड आहे.” तिला त्यांनी थांबवलं. खिशात होते नव्हते ते सर्व पैसे त्यांनी तिला दिले आणि तिला नको असलेले ते कागद, सगळी रद्दी घरी घेऊन आले. मला म्हणाले, “या गाठोड्यात काय सापडलंय बघ.” ती दुर्मिळ कागदपत्रे होती. म्हणाले, त्या आहेर पेक्षा हे जास्त महत्वाचं आहे.

पूर्वी डेक्कन च्या चौकात एक रद्दीचं दुकान होतं. तात्या ढमढेरे नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडून त्यांना पुस्तक मिळत. ते नेहमी म्हणायचे की इतर लोकांपेक्षा तात्यांना पुस्तकाची चांगली जाण आहे. मग त्यांचे संवाद सुद्धा खूप छान होत असत. पारखी शास्त्री होते, असे बरेच जण होते, त्यांच्याकडून अण्णांना चांगली दुर्मिळ पुस्तकं मिळालीत. कुणी दुर्मिळ पुस्तक संग्रहक गेला की मग ते सारखे हळहळायचे, “बघा, आता 15 दिवसांपूर्वी गेले आणि पुस्तक रस्त्यावर आले.” पुस्तकं काट्यावर घालणे हेच त्यांना मुळात मान्य नव्हतं. यातून असंही होत असे की या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा अनेक लोकांशी संपर्क यायचा. त्यांना नेहमी वाटायचं की या पुस्तकांमुळे आपला भांडरकरांशी संपर्क आहे, आपला मंडलिकांशी संबंध आहे, असं वाटून तो एक धागाच आधीच्या ज्ञानवंतांशी जुळलेला वाटायचा. त्या बद्दल ते खूप प्रेमाने बोलत. त्या पुस्तकांवर मायेने हात फिरवत. एखादं पुस्तक मिळालं की दोन दिवस ते पुस्तक मिळाल्याच्या आनंदात जायचे. त्याला आता कसं बघायचं, त्याला वेखंड घालून ठेवलं पाहिजे, हे पुस्तक आता जीर्ण होत चाललंय, कव्हर बदलायचं आहे. अण्णा उत्तम बाईंडिंग करायचे. त्यांच्या नातवंडांच्या पुस्तकांना छान कव्हर घालून द्यायचे. अण्णांना पुस्तक कुणी उलटं ठेवलेलं अजिबात चालायचं नाही. बाईंडिंग खराब होतं म्हणायचे. पुस्तकांवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. जाड खुणा करायच्या नाहीत. पेन मध्ये घालून ठेवायचं नाही. त्याच्यासाठी मला ते पातळ कागदाचा बुकमार्क करून देत असत. सुरेख हस्ताक्षरात कव्हरवर नाव असे. पुस्तकांचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशन असं सर्व त्यावर अण्णांनी लिहलेलं असे.

पोतदार गेल्यानंतर सर्व संग्रह एस.पी कॉलेज मध्ये आला. त्यानंतर काही वर्षांनी य.दि. फडके घरी आले होते. सोबत यशवंत सुमंत वगैरे मंडळी होती. ते म्हणाले, “अहो पोतदारांच्या संग्रहाची अवस्था वाईट आहे हो.” अण्णा म्हणाले, मला येता येईल का? पाहुयात आपण! मीपण सोबत गेले होते. तर एका खोलीत पुस्तकांचा ढिगारा पडलेला होता. अण्णा खूप कळवळले ते पाहून. फडके म्हणाले हे सर्व नीट लावायला हवं. अण्णा पण म्हणाले की या सर्व पुस्तकांची सुची करण्याची जबाबदारी मी घेतो. पण पुढे शिक्षण प्रसारक मंडळींकडून काही उत्तर आलं नाही. दादा (पोतदार) हे अण्णांना वडीलांसारखे होते. दादा गेल्यानंतर अण्णांना लहान मुलासारखं रडताना मी पाहिलंय.

Ra Chi Dhere's reading and Book Collection

अण्णांना पुस्तकांची हेळसांड अजिबात खपायची नाही. मी तर कायम त्यांची बोलणी खात असे. मी कित्येकदा अण्णांना म्हणत असे, अण्णा वापरल्यावर होणारच ना खराब. मुळात तुम्ही जुनी पुस्तकं आणता. जरा हाताळली तर ती खराब होणारच. त्यावर ते म्हणाले, हो पण शक्य तितकं नीट हाताळणं हे तर तुझ्या हातात आहे की नाही. ते ही तू नीट करत नाहीस. माणसासारखी काळजी घ्यावी लागते किंवा त्यापेक्षा जास्त. कारण त्यांना बोलत येत नाही.

जुनी पुस्तकं मिळाली की अनेक नवनवीन गोष्टी त्यात सापडायच्या. उदा. कुणीतरी मोठ्या व्यक्तींनी कुणालातरी ते भेट दिलेलं असे. कुणाच्या सह्या असायच्या त्यात. ह्याचंसुद्धा अण्णांना खूप अप्रूप वाटायचं. मला म्हणायचे बघ, हे डी.डी. कोसंबीनी अमक्याला दिलेलं पुस्तक आहे अरुणा. असं पुस्तक आपल्या घरात आलंय. एखाद्या देव्हार्‍यात नवीन टाक मिळावा हे तसं असे. त्यांच्या स्वतःच्या खुणा ह्या पेन्सिलीने असायच्या. अगदी छोटासा एखादा ठिपका असायचा. ते पुस्तकांना जास्त खराब करायचे नाही. लहान लहान कागदाच्या पट्ट्या त्यांनी खूप ठिकाणी घातलेल्या असायच्या. संदर्भासाठी त्यांना ते सोपं जात असे. सगळा संग्रह ते सतत चाळत असत. सुरुवातीला जुन्या पुस्तकांमुळे त्यांना ऍलर्जी चा खूप त्रास झाला. पण ते काही त्या पुस्तकांतून हलायला तयार नसायचे. झोपणं तिथेच, दिवसभर तिथेच. फक्त जेवणाला खाली येत.

मला या निमित्ताने बाबासाहेब पुरंदरेंची एक आठवण येथे सांगावीशी वाटते. दुर्मिळ पुस्तकांचं साहित्य परिषदेने प्रदर्शन भरवलं होतं आणि त्याचं उदघाटन बाबासाहेबांच्या हस्ते झालं. त्यात ते म्हणाले की, “मी या पुस्तकांच्या जवळ जातो, त्यांना हात लावतो. ही पुस्तकं एवढ्या वर्षांनी बाहेर आलेली असतात. आणि ती पुस्तकं म्हणतात, लेकरा आठवण नाही रे आमची, किती दिवसांनी आमच्या जवळ आलास.” ही माणसं जगलेत त्या पुस्तकांच्या बरोबर!

अण्णांनी नोकरी अशी पुढच्या काळात कधी केली नाही. आमची आत्या शिक्षिका होती. ती आमच्याच सोबत राहत असे. पण आमचा सगळाच अव्यवहार होता. अण्णा तोंडाने कधी कुटुंबाने माझ्यासाठी खूप केलं, असं म्हणायचे नाही. मला आठवतंय आई-आत्याने कधीही म्हटलं नाही त्यांना, की हे का केलं? हे पैसे इकडे का खर्च केले? किंवा येणार्‍या पैशापेक्षा जास्त पैसा पुस्तकांवर खर्च होतंय याबद्दल त्यांना कधी कुणी बोललं नाही. दागदागिन्यांची काही कुणाला हौस नव्हतीच पण माझ्या आईच्या अंगावरच्या एकमेव सोन्याचा दागिना (मंगळसूत्र) विकून एकदा एक पोथी घ्यावी लागली होती. ती पोथी त्यावेळी 600 रुपयांची होती. त्यावेळी आई म्हटलेली, “जाऊदे ना साध्या मण्यांच्या माळेने काय बिघडतंय! फक्त वाट्या असल्या तरी चालतील. हे काढून टाका.” अण्णांइतकेच त्या दोघींचे सुद्धा श्रेय खूप मोठे आहे.

आणखी एक म्हणजे, प्रवासामध्ये असताना आमचं ठरलेलं असे की कुठल्याही राज्यात गेलो की त्या त्या शहरातल्या सरकारी प्रेस मध्ये आम्ही जायचो. कारण शासकीय पुस्तके अशी बाहेर येत नाही. किंवा विद्यापीठाच्या प्रसारंगात जाऊन (प्रसारंग- विद्यापीठाच्या प्रेसला दक्षिणेत प्रसारंग असं म्हणतात) पुस्तके घ्यावी लागत. असं पुस्तकांच्या शोधात अण्णा वेड्यासारखे हिंडत. अण्णांना पुस्तकांनी खूप काही दिलं. ते नेहमी म्हणायचे की, मला पुस्तकं मिळाली ना, तर मला आणखी काही नको. माणसाला आणखी काय हवं असतं. सुरुवातीला मात्र त्यांना चहा लागायचा त्याच्याबरोबर. ते म्हणायचे की, चहा आणि पुस्तकं यावर आयुष्य काढता येईल. बाकी काही नसलं तरी चालेल.

तुळजापूरला एक विलक्षण अनुभव आम्हाला आला होता. बार्शीला मिलिंद जोशींचं घर आहे. त्यांचे वडील अण्णांचे चांगले ओळखीचे. मी त्यांना विचारलं की आम्हाला तुळजापूरला जायचं आहे आणि पुस्तक देवीच्या चरणी ठेवून यायचं आहे. आम्हाला साधं वरणभाताचं जेवण कुठे मिळेल? (अण्णांना पंजाबी जेवण काही चालत नसे) तर थोड्यावेळाने त्यांचा फोन आला की माझ्याच घरी जा. बार्शीला पोहोचताच आम्ही गेलो तिथे तर सनई चौघडा वाजत होता. आम्हाला वाटलं की काही तरी उत्सव असेल देवळात. तर गेल्यावर समजलं की अण्णांच्या स्वागतासाठी सनई, चौघडा वाजतो आहे. त्यांनी तिथे सत्कार केला. त्या मंदिरापासून मिलिंद जोशींच्या घरापर्यंत पायघड्या घातल्या होत्या लोकांनी. माणसं दोन्ही बाजूला पुष्प वृष्टी करत होती. अण्णा भारावून गेले त्या सर्वांनी. लोकांचं प्रेम होतं त्यांच्या लेखनावर पण ते कधीही लोकांच्यात गेले नाही. सत्कार समारंभ स्वीकारले नाही. अण्णा हळहळत म्हणायचे की माणसं 100-100 वर्षांचं आयुष्य खर्ची करून पुस्तकं लिहितात, काम करतात आणि आपल्याला नीट सांभाळता देखील येत नाहीत.

अण्णांचं वाचन अजिबात एकेरी नव्हतं. एका बाजूला बादल सरकारची नाटकं आमच्याकडे असतील. मकरंद साठेचं रंगभूमीच्या तीस रात्री इथपासून ते पार जुन्या पांडुरंग महात्म्य, महार महात्म्य, जाती पुराणं असं सर्व असे. या सर्वांचा ते वेळोवेळी उपयोग करत. भारतीय रंगभूमीच्या शोधात सारखं पुस्तक लिहलं. ‘महानिर्वाण’वरचा लेख लिहिला. त्यामुळे ते कामातून सतत दिसत राहायचं. चौफेर वाचन, क्रांतिकारकांची पुस्तकं, स्थापत्य शास्त्र, लोकसाहित्य, 19 व्या शतकातली सर्व पुस्तकं, समाजविज्ञान, धर्म इतिहास, दैवतं इतक्या प्रकारची पुस्तकं त्यांच्याकडे असत. आणि कशाचा वापर कधी होईल काही सांगता यायचं नाही. एखादं चार आण्याचं जेजुरीच्या खंडोबाच्या गाण्याचं पुस्तक मिळालं तर, एरव्ही ते काहीतरी रंगीबेरंगी पुस्तक म्हणून आपण दुर्लक्ष करू, पण ते त्या पुस्तकातल्या एखाद्या शब्दावरून कुठेही पोहोचत असत. रात्री सुद्धा त्यांचे असेच विचार चालू असायचे. प्रवासात असताना जर एखादं चांगलं पुस्तक त्यांना मिळालं तर त्यांना झोप लागत नसे. आपण झोपलो तरी अण्णा ते पुस्तक चाळत बसायचे. त्यात काही चांगलं असेल तर ते आम्हाला सांगायचे. रात्री दोन-दोन वाजता सुद्धा अण्णांनी आम्हाला उठवलंय. चांगलं पुस्तक मिळाल्यानंतरची अस्वस्थता आणि आनंद त्यांच्या चेहर्‍यावर मी पाहिलाय.

लेखिका – अरुणा ढेरे