या ‘पृथ्वीच्या’ पोटात दडलंय काय?

Prithvi shaw

पृथ्वी पंकज शॉ. या नावाची एव्हाना तुम्हाला सवय झाली असेल. काहींना आत्ताच या नावात सचिन रमेश तेंडुलकर असा प्रतिध्वनी ऐकू येत असेल. तर त्यात बरंचसं तथ्य देखील आहे.

पृथ्वी शॉ हे नाव सर्वप्रथम चर्चेत आलं ते नोव्हेंबर २०१३ मध्ये. ‘हारिस-शिइल्ड’ या अधिकृत शालेय क्रिकेट स्पर्धेत रिझवी स्प्रिंग फिल्डकडून खेळताना या पठ्याने एका डावात ५४६ धावा केल्या त्याही ३३० चेंडूमध्ये. त्यात ८५ चौकार आणि ५ षटकार होते. (त्याचा हा विक्रम प्रणव धनावडेने ४ जानेवारी २०१६ ला मोडला) झालं हा खेळाडू पाहता पाहता देशभरात पोहचला.

त्याला आणखी एक कारण होतं, नुकताच सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला होता, त्याला अजून आठवडा देखील पूर्ण झाला नव्हता. लोकांत सचिन फिवर अजून होता, त्याचं वेळी ही बातमी एका वेगळ्या योगायोगाकडे तर अंगुलीनिर्देश करत नाही ना? असा प्रश्न त्या बातमीमागे होता. सचिनने ८८ साली याच स्पर्धेत ३२६ धावा करून आणि विनोद कांबळी सोबतची विक्रमी ६६४ धावांची भागीदारी करून क्रिकेट प्रेमींच लक्ष वेधून घेतलं होतं.

९ नोव्हेंबर १९९९ ला विरार येथे पृथ्वीचा जन्म झाला. तो चार वर्षाचा असताना त्याची आई या जगातून गेली. शालेय क्रिकेटमध्ये चुणूक दाखवल्यानंतर तो ठाण्याला स्थायिक झाला. तिथे MIG म्हणजे ‘मिडल इन्कम ग्रुप’ क्रिकेट क्लबकडून खेळू लागला. आता त्याची शाळा होती ‘रिझवी स्प्रिंग फिल्ड’. इथून त्याने ‘हारिस-शिइल्ड’ मध्ये शाळेला २ वेळा जिंकून दिल. २०१२ आणि २०१३. २०१२ च्या स्पर्धेत त्यानं उपांत्य सामन्यात १५५ आणि अंतिम सामन्यात १७४ अशा दमदार खेळी केल्या. या दरम्यान त्याला cheadle-hulme school मँचेस्टरकडून बोलावणं आलं. तिकडे तो जवळपास दोन महिने होता, त्यात त्यानं १४४६ धावा केल्या, त्याची सरासरी होती तब्बल ८४. तिथे त्यानं ६८ बळीही त्यानं घेतले. ज्यांना आपण SG म्हणून ओळखतो, त्या ‘संसपैरेल्स ग्रीनलँड’ची शिष्यवृत्ती ही पृथ्वीला मिळाली. या शिष्यवृत्ती अंतर्गत तो इंग्लंडमध्ये जाऊन फलंदाजीचे धडेही गिरवून आला. या आधी ती सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही मिळाली आहे.

मध्यंतरी चर्चेतून गायब असणारा पृथ्वी पुन्हा चर्चेत आला तो त्याच्या रणजी आणि दुलीप चषकाच्या पदार्पणातील सामन्यात केलेल्या शतकांनी. या दोन्ही स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यांत शतक ठोकुन त्यानं सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. या दोन्ही स्पर्धेत सर्वांत कमी वयात शतक करण्यात त्याचा सचिननंतर दुसरा क्रमांक लागतो. आत्ता पर्यंत खेळलेल्या १३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यानं ६०.७८ च्या सरासरीनं १३९८ धावा केल्या आहेत. ज्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. १६ वर्षाखालील मुंबई संघाचं नेतृत्व करणाऱ्या पृथ्वीकडे १९ वर्षाखालील भारतीय संघाचं नेतृत्व आलं. या वर्षाच्या सुरवातीला (जानेवारी-फेब्रुवारी २०१८) त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं हा विश्वचषकसुद्धा जिंकला. यात सहा सामन्यात त्यानं २६१ धावा केल्या. या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय कर्णधारानं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत, त्यानं २४६ धावांचा उन्मुक्त चंद याचा विक्रम मोडीत काढला. असा एकामागून एक विक्रम मोडीत काढणारा हा खेळाडू, आयपीएलच्या नजरेत येणार नाही असं कसं होईल. या वर्षी त्यानं आयपीएल मध्ये 9 डावात 245 धावा अक्षरशः कुटल्या. कारण या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १५० पेक्षा अधिक होता.

आता सर्वांना प्रतीक्षा होती ती पृथ्वीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची. आज नाही तर उद्या ते होणार होतंच पण इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची सलामीची जी दैना झाली, तेंव्हा सर्वांना आठवला तो पृथ्वी शॉ. त्याला संघात बोलावणं आलं पण तो सामना मात्र खेळू शकला नव्हता.

आज वेस्ट इंडिज बरोबर कसोटी मालिका सुरू होत आहे. बरेच जण या मालिकेला इंग्लंड (नुकताच पार पडलेला) आणि ऑस्ट्रेलिया या अवघड पेपरांच्या मधला बोनस पेपर म्हणत आहेत. तर कुणी याला गुणतालिकेतील आपला अव्वल नंबर टिकावा म्हणून आखलेली मालिका म्हणत आहेत. तर ज्यांना नेहमी माश्याचा डोळाच दिसतो असे लोक, तरुण खेळाडूंना शिकण्याची संधी म्हणून याकडे बघत आहेत. तर ही मालिका आणि आजचा सामना जास्त महत्वाचा आहे कारण आज पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत आहे. यात देखील योगायोगांचा भरणा आहेच. जसा सचिन शेवटचा सामना याच वेस्ट इंडिज संघाबरोबर खेळला होता, पृथ्वी तिथूनच सुरवात करतो आहे. जाता जाता अजून एक, जेंव्हा विराट कोहली संघात आला तेंव्हा सचिन आपल्या शेवटच्या दिवसांत होता पण आज जेंव्हा पृथ्वी संघात आला आहे तेंव्हा विराट त्याच्या ‘विराट’ फॉर्ममध्ये आहे. इथून पुढे या दोघांना बराच काळ एकत्र खेळता येईल. तर सध्या भारतीय क्रिकेट प्रेमींना सोफ्याला अगदी पाठ टेकून निवांत क्रिकेट पाहण्याचे दिवस आले आहेत हे आधीच सांगून ठेवतो. (२००३-२००७ या काळात असा निवांत बसायला वेळ नसायचा, सारखे देवाचे धावे..)