मेरी जां, मुझे जां ना कहो….

अनुभव ते लस्ट स्टोरीज

लेखिका - शिवकन्या शशी

बासू भट्टाचार्य यांचा १९७१ साली रिलीज झालेला ‘अनुभव’ चित्रपट आणि याचवर्षी म्हणजे २०१८ ला अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बनर्जी, आणि करण जोहर यांनी मिळून काढलेल्या चार लघुपटांचा मिळून एक चित्रपट, ‘लस्ट स्टोरीज’ एकापाठोपाठ पाहण्याचा योग आला. आणि त्यात मांडलेल्या विषयावर विचारांची, प्रश्नांची मालिकाच डोक्यात सुरु झाली.

चित्रपट तत्कालीन समाजमनाचा आरसा असतो हे विधान या दोन्ही चित्रपटांनी सिद्ध करून दाखवले आहे. दोन्हीमध्ये विषय जरी प्रेम, कुटुंब आणि सेक्स आहे, तरी यात बाईकडे होणारे दुर्लक्ष, तिला सगळीकडे गृहीत धरणे, मूल झाले की सगळे ‘ठिकठाक’ होईल अशी खोटी समजूत, तिला मिळणारी दुय्यम वागणूक, यांचा समावेश होतो. पण या सगळ्यात ठळक धागा आहे तो म्हणजे तिचे लैंगिक सुख, समाधान, आनंद यांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. तिची होणारी प्रचंड घुसमट. बरे, तिने त्याचा उच्चार तरी करावा का? ते योग्य आहे का? केल्यास काय होईल? अनेक प्रश्न.

कृष्णधवल रंगात रेखीव तनुजा आणि रुबाबदार संजीवकुमार पावसाळ्यातल्या एका रात्री आपल्याच घराच्या बाल्कनीत ‘मेरी जां, मुझे जां न कहो…’ म्हणत प्रणय रंगवतात. नुसतेच गाणं पाहणाऱ्याला वाटून जाते, काय सौख्य आहे! पण पूर्ण चित्रपट पाहिल्यास एकेक धागा उलगडत जातो. अमर (संजीवकुमार) आणि मिता (तनुजा) यांच्या विवाहाला सहावर्षे उलटून गेली आहेत. अमर संपादक म्हणून रात्रंदिवस स्वत:ला झोकून देऊन काम करतो आहे. साहजिकच त्याचे बायकोकडे फारसे लक्ष नाही, म्हणजे तिचे असणे प्रचंड गृहीत आहे. मिता या रुक्ष, एकाकीपणाला कंटाळून जाते. मग ती घरातील सर्व नोकरचाकरांची छुट्टी करून, स्वतः घराचा ताबा घेते. नवऱ्याचे प्रेम, लक्ष परत मिळवण्यात तिला थोडे यशही मिळते. पण खरी कथा सुरु होते, ती तिच्या पूर्वायुष्यातील शशीभूषण हा प्रियकर परत तिच्याच नवऱ्याच्या ऑफिसमध्ये कामाला लागतो, आणि मिताला भेटतो तेव्हा. मिता त्याला निघून जा असे सांगतेही, पण घटना अशा घडत जातात की अमरला त्यांच्या पूर्वीच्या संबंधांचा पत्ता लागतो. मग त्याचा टिपिकल भारतीय नवऱ्याचा आक्रस्ताळेपणा चालू होतो. तिथे एकदाच पण फार शांत आणि गंभीरपणे मिता त्याला जे सांगते, तो हा ‘अनुभव’.

बाईला मुलगी असताना पासून ‘हे असं करायचं नाही, ते तसं करायचं नाही’, हेच इतके सांगितले जाते की काय करायचे याविषयी मात्र कुणी काहीच बोलत नाही. सांगत नाही. एखादा पुरुष तिच्या आयुष्यात प्रेम घेऊन आला, तर त्याला कसे वागवायचे, काय बोलायचे, या विषयी कुणी सांगत नाही. ‘तसे करू नये,’ एवढेच बोलले जाते. पुढे नवरा जसा वागवेल तसे वागवून घ्यावे, त्याने दुर्लक्षून मारले तरी ब्र न काढता तसेच राहावे, हेच ठसवले जाते. यात बाईला काय वाटते, तिच्याशी घडीभर बसून खरोखर बोलावे, तिचे सुख कशात आहे हे जाणून घ्यावे, असे कुठल्याच पुरुषाला कधी वाटत नाही, कारण त्याला तसे सांगितले जात नाही, सुचवले जात नाही. १९७१ मधल्या एकूण अभिव्यक्तीच्या मर्यादा लक्षात घेऊन, थेट सेक्सचा उल्लेख न करताही ‘अनुभव’ त्याबद्दल भरपूर सुचवून जातो. कारण सेक्सलाईफ मधील कोरडेपणा, किवा एकतर्फी ओरबाडणे, बलात्कार बाईचे जगणे नरक बनवते. मग त्यातील तिचा आनंद, आणि सुख इत्यादीविषयी बोलणे तर दूरच.

‘अनुभव’ आजही क्लासिक चित्रपटात गणला जातो कारण त्याने केलेली या अवघड विषयाची अत्यंत तरल हाताळणी. भक्कम पटकथा, वास्तवाचे भान राखणाऱ्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा, उत्तम अभिनय, श्रवणीय गाणी हे तर आहेच, पण विशेष लक्षात राहतात ते यातील सागर सरहदी आणि कपिल कुमार यांनी लिहिलेले ताकदीचे संवाद. असे संवाद की ज्याच्या उदरात २०१८ मधील ‘लस्ट स्टोरीज’ सारखा उघडावागडा, आजच्या काळाची भाषा बोलणाऱ्या चित्रपटाची थीम दडून बसावी!

अनुभव (१९७१) - संजीव कपूर आणि तनुजा
अनुभव (१९७१) - संजीव कुमार आणि तनुजा

‘लस्ट स्टोरीज’ मध्ये चार वेगवेगळ्या कथांत मिळून एकच थीम आहे ती म्हणजे, बाईचे लैंगिक सुख या गोष्टीवर विचार करायची गरजच नाही आणि तिला बेडवर गृहीत धरणे. या चारपैकी तीन कथानकात तिन्ही बायका वेगवेगळ्या पद्धतीने ही गोष्ट पुरुषप्रधान व्यवस्थेपुढे मांडत जातात. त्यातली एक काहीच करू शकत नाही, कारण ती घरकाम करणारी मोलकरीण आहे. म्हणजे इथे परत जिच्या हाती पैसा आहे, जी समाजाच्या वरच्या पायरीवर आहे, ती काहीतरी बोलू, करू शकते. जी कष्टकरी आहे, तिचे इथेही केवळ शोषणच आहे. ती काही म्हणू वा बोलू शकत नाही, कारण तिला रोजची चूल पेटवायची आहे. म्हणजे पैसा आणि लैंगिक शोषण यातील संबंध केवळ वेश्याव्यवसायापुरता नसून, तो रोजच्या जगण्यातील चार भिंतींच्या आतही आणखी क्रूरपणे चालतो, अबोलपणे सहन केला जातो. त्याला ना दाद ना फिर्याद.

अनुराग कश्यप दिग्दर्शित पहिल्या लघुपटात कालिंदी नावाची विवाहित प्रोफेसर आपल्या वर्गातील तिच्यापेक्षा वयाने लहान विद्यार्थी, तेजस बरोबर, एकदाच शरीरसंग करते. त्याला ते विसरून जायला सांगते. तो बिचारा शिक्षक- विद्यार्थी नात्यातील, विद्यार्थी या कमी वजनाच्या तागडीत असल्याने हो म्हणतो, आणि आपल्या समवयीन मैत्रिणीशी लव्हशीप चालू ठेवतो. पण ते काही कालिंदीला सहन होत नाही. ती त्याला दहादा त्याबद्दल विचारते, तर तो ते उडवून देतो. इथे कालिंदीला कळून चुकते, की आपण त्याच्यात गुंतलो आहोत. आणि मी जशी हरेक गोष्ट त्याला सांगते, तशी त्यानेही त्याची हरेक गोष्ट मला सांगितली पाहिजे. एकदा बेड शेअर केल्यानंतर इतका प्रामाणिकपणा असायला काय हरकत असावी, असे तिचे म्हणणे. शेवटी ती त्याच्या घरात घुसून त्याला सांगते, की मी तुझ्यात गुंतले आहे. तुझे काय चाललेय ते मला सांग. त्यावर तेजस सांगतो, “मॅडम तुम्ही विसरून जा म्हणालात म्हणून मी विसरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माझ्याविषयी इतकं वाटतं, हे मला माहित नव्हतं. तुम्हाला एवढंच वाटतं, तर मी सगळं सोडायला तयार आहे.” त्यावर कालिंदी त्याला आठवण करून देते, ‘खुळा की काय तू, माझे लग्न झालेय!’ आणि सिनेमा संपतो. बघणाऱ्याला क्षणभर यात संगती लागत नाही. कालिंदीला नेमकं काय पाहिजे? तिला सेक्स पाहिजे, पण गुंतणे नकोय. पण नंतर तीच गुंतून जाते. बरं, समोरचा माणूस स्वतः गुंतून जायला तयार आहे, तर ही म्हणते आपण विवाहित आहोत.

तिला नेमके काय पाहिजे? तिला शोध घ्यायचाय. केवळ सेक्समधून नाते निर्माण होऊ शकते का, झालेच तर त्यात प्रामाणिकपणा असतो का, असला तर तो किती टिकाऊ आहे, यात बाईने हा प्रयोग करून बघण्यालाही ती महत्व देते. यात कालिंदीची जी स्वगते घेतली आहेत, ती बाईचे प्रामाणिक बोल सुनावते. ऐकताना, अरे बाई असा पण विचार करू शकते? असा विचार करायला भाग पडते.

दुसऱ्या लघुपटात घरकाम करणारी तरुण मोलकरीण आणि एकटा राहणारा तरुण अविवाहित मालक यांच्यात शरीरसंबंध आहेत. यातला पहिला समागमाचा सीन पुढील सगळ्या फ्रेम्समध्ये आपल्या मनात डोकावत राहतो. तो बेडसीन आहे म्हणून नव्हे, तर बाईचे शरीर निव्वळ वस्तूसारखे वापरणे अंगावर येते. त्याच्या लग्नासाठी मुलगी दाखवायला पाहुणे आल्यानंतर तर त्या तरुणाच्या एकूण वागणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडतो, तो बघतो, तेव्हा संताप येतो, घृणा वाटू लागते. पण कौतुक मोलकरणीचे. ती एक शब्द न बोलता, दाखवायला आलेल्या पाहुण्यांचे सगळे करते, स्वत:चे इतकेही अस्तित्व जाणवू देत नाही. शेवटी घरी जाताना त्याचे लग्न ठरल्याची मिठाई दिली जाते, ती ती शांतपणे घेऊन जाते. तिचे शब्दानेही व्यक्त न होणे, आहे त्याचा स्वीकार करणे यात अगतिकता आहे, पण शरणागती नाही. तिचा एकंदर वावर पाहता, तू जसे माझे शरीर उपभोगले, तसे मी ही तुझे उपभोगले, हा भाव जाणवल्याशिवाय रहात नाही. ही नवी जाणिव बाईच्या सेक्सविषयक पारंपारिक विचारांना तडा देते. ती त्याचे पैसे घेत होती का, हे दाखवले नाही. असेल तर ती स्वत:चे शरीर वापरत होती, नसेल तर तो तिचे शरीर वापरत होता. पण तिच्यात पश्चात्ताप नाही. तुला लस्ट आहे, तशी मलाही आहे, हे सूत्र दबक्या पावलांनी येते, प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

तिसऱ्या कथेत बायकोला बायको म्हणून न पाहता, केवळ आपल्या मुलांची आई म्हणून पाहणाऱ्या, तिच्या एकूण करियरला, कामाला य:कश्चित मानणाऱ्या नवऱ्याला वैतागलेल्या बायकोची कहाणी आहे. यात तिचे जुन्या कॉलेजच्या मित्राशी मैत्र जुळते, ते तीन वर्ष दोघांनीही तिच्या नवऱ्यापासून लपवून ठेवलेय. पण एके दिवशी, नवऱ्याला कुणकुण लागताच ती जो पवित्रा घेते, तो विचार करायला लावतो. ती सरळ नवऱ्याला मित्राच्या घरी बोलावते, त्याला हे रिलेशन का तयार झाले, ते सांगते. ‘जिथे बायको म्हणून माझा विचार होत नाही, माझ्या गरजा पूर्ण होत नाही, त्या घरात मी राहू शकत नाही,’ हे ती स्पष्ट सांगते. नवरा मग नेहमीप्रमाणे मुलींचा तरी विचार करून घरी चल अशी गळ घालतो, त्याला ती बधत नाही. ‘जशी अनेक घटस्फोटीत आयांची मुलं वाढतात, तशी माझीही वाढतील,’ हे ती सांगते. तेव्हा, नवऱ्याला थांबून विचार करावासा वाटतो. बाईची आई झाली की ती बरोबर दावणीला बांधली जाते, हा परंपरागत, जाचक (अ)विचार भराभरा गळून पडतो. तिलाही तुझा स्पर्श हवाय, तुझ्याबरोबरचा संग हवाय, हे ती भक्कमपणे सांगून जाते.

शेवटची कथा करण जोहरने त्याच्या स्टाईने मस्त रंगवली आहे. नवीन लग्न झालेल्या तरुणीबरोबर तिचा नवरा रोजरात्री बेडवर त्याला जे करायचंय ते करून बाजूला होतो. तिचा ऑर्गझम, तिचे समाधान, तिचा त्यातला आनंद याच्याशी त्याचे शून्य देणेघेणे. तिच्याशी दिवसा चांगले वागले म्हणजे प्रेम, आणि रात्री आपला कार्यभाग उरकणे म्हणजे सेक्स ही त्याची समज. पण ती यात खुश नसते. ती ज्या शाळेत काम करते, तिथल्या लायब्ररेरीयनला रिमोटच्या व्हायब्रेशनवर मैथुन करून परमोच्च क्षणाचा आनंद घेताना पाहते. एकदा ती तो स्वत:वर प्रयोग करायचा ठरवते. पण ते करताना घरात प्रसंग असा निर्माण होतो, की व्हायब्रेशनमुळे मिळणारा सगळा आनंद, परमोच्च क्षणाचा अनुभव इत्यादी घरातल्या सगळ्यांसमोर घडते, ती त्याला रोखू शकत नाही. ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. सासू तिला अपवित्र मानते, आणि ‘अशा’ बाईच्यापोटी माझ्या मुलाचे पोर वाढलेले मला नको, असा पवित्रा घेऊन सुनेला तिच्या माहेरी नेऊन सोडते. महिन्याभराने नवरा तिला भेटायला जातो, ‘झालेल्या चुकीबद्दल माफी माग आणि परत चल’ असे म्हणतो. त्यावर ती त्याला ठणकावून सांगते, ‘ती चूक’ नाही. ती तिची गरज आहे. तो ते शेवटी समजून घेतो. तिला आईस्क्रीम खायला घालतो, या सूचक सीनवर चार लघुपटांचा हा चित्रपट संपतो.

‘अनुभव’ने जे सौम्यपणे मांडले ते ‘लस्ट स्टोरीज’ने बोल्डपणे सांगितले. ‘अनुभव’ने मूल जन्माला घालून घरगृहस्थी चालू करण्याचा, एकारलेपणातून बाहेर येण्याचा तत्कालीन मार्ग सुचवला. ‘लस्ट’ने मात्र मुले आणि सेक्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, बाईला उत्तम सेक्स हवा असतो, तो तिचा माणूस म्हणून अधिकार आहे, हे जास्त ठाशीवपणे मांडले. तिच्यावर आईपणाचे ओझे लादले जाते, लैंगिक क्रिया, समागम हा निखळ आनंदासाठी असू शकतो, हेच तिच्यापासून दूर ठेवले गेले. पण जेव्हा ती याची मागणी करू लागते, तेव्हा मात्र ते खटकू लागते. पुरुषाला ते सगळे लागते, बाईला मिळाले तर बरे, नाही मिळाले तरी चालते. तिने आपले शरीर त्याच्याखाली पसरले की झाले. बरे, तिने कामक्रीडेत काही पुढाकार घेतला तर तिथे परत संशय. काही सहभाग नाही घेतला, तर थंड, बोअर म्हणून तुच्छतेचे कटाक्ष. मुले पाहिजे असतील तर, सेक्स ‘सक्सेसफुल’ करून घेणे बाईची जबाबदारी! हे आणखी हास्यास्पद.

‘अनुभव’ चा कृष्णधवल चित्रपट ‘लस्ट’ला येईपर्यंत सर्वार्थाने रंगीत झाला. प्रगत झाला. पण बाईच्या बेडवरील अस्तित्वामागचे विचार कितपत प्रगत झाले? तिच्या आनंदाला, सुखाला सामावून घेणारे झाले का? तशी लिबर्टी किती बायका घेत असतील? किती जणींना मिळत असेल? किती जणी या टप्प्यापर्यंत विचार करू शकत असतील? तिने याचा उच्चार जरी केला तरी तिला कोणकोणत्या घुसमटीतून जावे लागत असेल, याची कल्पना येते.

तिचा आनंद हा त्याचा आनंद आहेच, मग यावर मोकळेपणाने बोलणे, चर्चा करणे का होत नसावे? झालीच तरी ती काही विशिष्ट वर्तुळापुरती मर्यादित का रहात असावी? तिने अशा प्रकारचा आनंद शोधणे म्हणजे कुटुंब आणि समाजाला ‘धोका’ आहे, असे का होत असावे? बाईच्या शारीरगरजांचा स्वतंत्र अभ्यास, त्यांचे नाकारलेपण, स्वीकारलेपण, त्याचा होणारा सर्वंकष परिणाम हे विचार करण्याजोगे मुद्दे या दोन चित्रपटामुळे पुढे आले. ‘बाईने आपली लस्ट लपवणे मस्ट आहे’ ही मानसिकता आणखी किती जीवांना त्यांच्या जन्मदत्त आनंदाला पारखी करणार? ‘तरुण आहे रात्र अजुनी’ यातले काव्य बाजूला सारून सत्याला सामोरे जाण्याचा मोकळेपणा आमच्यातल्या फर्स्ट सेक्समध्ये कधी येणार?