राजकारण आणि संज्ञानात्मक विसंगती

Political Cognitive Dissonance

[Image Source: Link]

परवाच एका मित्राचा फोन आला होता (ही अशी सुरुवात वाचली कि हमखास समजायचं काल्पनिक वगैरे आहे. आपले सिनेमावाले म्हणतात तसं कथानकाची गरज हो) बराच द्विधा मनस्थितीत होता. म्हणलं, ‘काय झालं रे?’ तर म्हणे, हे ‘योगी आदित्यनाथला मुख्यमंत्री करून मोदींनी आमची फार गोची करून ठेवली आहे.’ मी म्हणलं तू तिथे अमेरिकेत बसला आहेस, योगी उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे, तू जन्मात कधी उत्तर प्रदेशात पाय ठेवला नाहीस, उलट राज ठाकरेच्या भैया विरोधी आंदोलनाला तुझा दणदणीत सपोर्ट वगैरे होता. तुझी कसली गोची झालीये च्यायला? तर म्हणे “अरे ते सगळं जाऊ दे, पण मोदींनी योगीला मुख्यमंत्री करायला नको होतं, आम्ही कुठे तोंड दाखवायला उरलो नाही इथे.” हे ऐकून मी इथूनच सरळ कॅलीफोर्नियाला दंडवत घातला. कॉलेज मध्ये असताना ‘प्यासा’ बार वरून रात्री 3 वाजता घरी जायला याला लाज वाटत नव्हती पण योगीला मुख्यमंत्री करून मोदींनी याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही म्हणजे कमालच झाली. मी म्हणलं काय, “ते नीट सांग बघू.” तर म्हणे “अरे आता तूच मला सांग, या मोदींच्या विकासाच्या घोषणांचं आम्ही तोंड फाटेस्तोवर कौतुक करायचं, सोशल मिडियावर सुरेश प्रभू, गडकरी आणि पियुष गोयलच्या कामांचे ढीगभर रिपोर्ट शेयर करायचे, आणि भाजप एका फटक्यात योगी आदित्यनाथ सारख्या वादग्रस्त व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवून आमच्या सगळ्या विश्वासावर पाणी फेरणार. ह्याला काय अर्थ आहे का? योगी आणि विकास यामधली भाजप नेमकी कोणती हेच कळेनासं झालंय बघ.” मला त्याची एकदम दयाच आली. 2014 ची निवडणूक बिचाऱ्याने अगदी घरचं कार्य असल्यागत (अमेरिकेहून का होईना) मनावर घेतली होती. आणि आज बिचाऱ्यावर ही गत? हे काही बरं नाही. मी त्याला म्हणलं, तू काळजी करू नकोस. cognitive dissonance चा तू काही पहिला बळी नाहीस. हे ऐकून मात्र गडी चिडलाच. ते cognitive वगैरे तुझ्या तीर्थरूपांना असेल, उगाच काहीपण बोलायचं काम नाही. आणि मोदींनी निर्णय घेतलाय म्हणजे बरोबरच असेल. योगीसुद्धा करेल चांगलं काम. एवढं बोलून त्याने फोन आपटला.

पण cognitive dissonance बद्दल माहित नसणारा तो एकटाच नाहीये. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल काहीही माहित नसतं आणि आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानेच हे कधी ना कधी अनुभवलेलं असतं. पण मग नेमकं काय आहे cognitive dissonance?

cognitive dissonance किंवा मराठीत संज्ञानात्मक विसंगती (अबब, हा तर अजूनच कठीण शब्द झाला) म्हणजे एखाद्या व्यक्तीचे त्याला जवळच्या वाटणाऱ्या विचारसरणी बद्दल असणारे परस्पर विरोधी विचार किंवा एखाद्या विचारावर पूर्ण विश्वास ठेवल्यानंतर त्याबद्दल विरोधाभासी माहिती मिळणे आणि द्विधा मनस्थितीत फसणे. हे खरंतर आपल्या कोणालाच नवीन नसावं. तुम्ही थोडे जरी विचार करणारे असाल तर तुम्हाला या मनास्थितीने कधी ना कधीतरी पछाडलेले असणार. म्हणजे समझा तुम्ही धर्माने ख्रिस्ती असाल, तुमचा विश्वास असेल कि देवाने पृथ्वी सात दिवसात बनवली आणि मग हळू हळू तुमच्या ज्ञानाची कक्षा रुंदावताना तुम्ही उत्क्रांती बद्दल वाचू लागता, त्याचे वैज्ञानिक पुरावे बघू लागता आणि तुमचं तुम्हालाच कळेनासं होतं नेमका कशावर विश्वास ठेवावा? देवाच्या पवित्र पुस्तकावर का वैज्ञानिकांनी सिध्द केलेल्या प्रमेयांवर. हा गोंधळ, ही द्विधा मनस्थिती म्हणजेच संज्ञानात्मक विसंगती.

cognitive dissonance ही मुळात मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ही संकल्पना पहिल्यांदा ‘लियोन फेस्टींगर’ नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1957 मध्ये मांडली. फेस्टींगरचं म्हणणं होतं कि प्रत्येक मनुष्य स्वतःच्या आंतरिक सुसंगततेसाठी भांडत असतो. या सुसंगततेला विरोध करणारा एखादा विचार समोर आला कि ती व्यक्ती हरप्रयासाने त्या विचाराला खोडून काढण्याचा प्रयत्न करते. त्या विसंगतीने माणसाला मानसिकरित्या अस्वस्थ व्हायला होतं आणि ती अस्वस्थता घालवायला तो आपल्या मूळ विचाराचा हरसंभव प्रयत्नाने समर्थन करायचा प्रयत्न करतो किंवा अशा नवीन माहितीसाठी आपल्या बुध्दीची कवाडं सरळ बंद करून घेतो. असं केल्याने अजाणतेपणी मनातली अस्वस्थता दूर केली जाते. संज्ञानात्मक विसंगतीला मराठीत ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या एकाच म्हणीने नीट मांडता येऊ शकतं.

Political Cognitive Dissonance
[Image Source: Link]

संज्ञानात्मक विसंगती ही तशी मानसशास्त्रातली नवीन संकल्पना आहे आणि मुख्यतः याचा उपयोग आस्तिक आणि नास्तिकतेच्या विश्लेषणासाठी केला गेलेला आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये या संकल्पनेचं राजकीय विचारधारांवर विश्लेषण सुरु झालेलं आहे. याच्यामागे तीन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे जागतिकीकरणामुळे राजकीय विचारधारांची कधी नव्हे ते होणारी सर्वपक्षीय चिकित्सा. जागतिकीकरणानंतर सर्व विचारधारांचं आणि त्यांच्या समीक्षेचं मुक्त आवागमन सुरु झालेलं आहे. साम्यवादाची चिकित्सा तुम्ही फक्त केरळ किंवा बंगाल कडे बघून न करता रशिया, क्युबा इतकंच काय चीनकडे बघून सुद्धा करू शकता. त्यामुळे होतं काय की आपल्या परिप्रेक्ष्यात चांगला वाटणारा विचार जागतिक परिप्रेक्ष्यात पराभूत होताना बघून किंवा चुकीच्या वळणाला वळलेला बघून मनात भयंकर गोंधळ उडू शकतो आणि त्या विचाराचं समर्थन करताना नाकीनऊ येऊ शकतात. क्रांती जग बदलू शकते असं म्हणता म्हणता जेव्हा क्रांतीचे भयंकर पडसाद, त्यातली हिंसा डोळ्यांसमोर दिसू लागते तेव्हा आपल्यालाच कळेनास होतं क्रांती चूक का क्रांतीची अंमलबजावणी चूक, का ही सगळी माहिती कारण नसताना मिळवणारे आपण चूक. मग यावर दोन गोष्टी होतात. एकतर त्या नवीन मिळणाऱ्या माहिती कडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्या विचाराचे लंगडे समर्थन. संज्ञानात्मक विसंगतीला हाताळण्याचे हे दोन्हीही प्रकार माझ्या मते चुकीचे आहेत.

दुसरं कारण आहे ते आंतरजाल (मराठीत इंटरनेट!) आणि सोशल मिडियाने जनसामान्यांना उपलब्ध करून दिलेला ज्ञानाचा खजिना. कालपरवा पर्यंत पेपर, टीव्ही किंवा कट्ट्यावरून अगदी निवडक माहिती मिळवणारे आपण एकदम जेव्हा फेसबुक, ट्विटर द्वारे जगभरातल्या सामान्य माणसाचे विचार, त्याचे अनुभव वाचू लागतो तेव्हा आपल्याला अनाकलनीय धक्का बसतो. नोटबंदीचे दिलखुलास समर्थन करणारे आपण जेव्हा हळू हळू लोकांचे बँकेच्या रांगांमधले अनुभव फेसबुक वर वाचू लागतो तर आपल्याला कळत नाही की यावर नेमकं व्यक्त कसं व्हावं. मग त्या माणसाला सरळ काँग्रेसी, मोदीद्वेष्टा वगैरे म्हणून हिणवलं जातं (त्यातले कित्येक असतातही पण ते अलहिदा. इथे मी फक्त ज्येनुईन अनुभवांबद्दल बोलतोय), तुम्हाला इकॉनॉमीतलं काय कळतं असा पवित्रा घेतला जातो. देशासाठी एवढं पण सहन करू शकत नाही का? अशी विचारणा केली जाते. किंवा मला तर रांगेत एक सेकंद उभं नाही रहावं लागलं तू उगाच प्रसिद्धीपोटी खोटं बोलतो आहेस असा आरोप केला जातो. आपलं मन हे मानायला तयारच नसतं की समोरच्याला बहुतेक खरंच या निर्णयाचा त्रास होत असेल, आपल्याला आवडलेल्या निर्णयाचे काही साईड इफेक्ट असू शकतात आणि त्या साईड इफेक्टचा लोकांना त्रास होऊ शकतो. हे मान्य केलं तर आपल्या विचारांमध्ये जी सुसंगती आहे ती भंग होईल आणि काहीतरी भयंकर अघटीत घडेल असं आपल्या मनाने आपल्याला नकळत पटवून दिलेलं असतं. यावर कळून सवरून नियंत्रण ठेवणे, आणि संज्ञानात्मक विसंगतीला आपल्या मनात नांदू देणे हे खरे प्रगल्भपणाचे लक्षण आहे. ते भल्या भल्यांना जमत नाही ही गोष्ट सोडा.

cognitive dissonance चं राजकीय परिप्रेक्ष्यात उतरण्याचे तिसरे मोठे कारण म्हणजे, कित्येक विचारवंतांच्या मते आपण आज पोस्ट आयडीयॉलॉजिकल काळाकडे मार्गक्रमण करतोय. म्हणजेच आजची पिढी फक्त एका विचारधारेला धरून राहत नाही, राहू शकत नाही. ती एखाद्या व्यक्तीला देव मानेल, एखाद्या पक्षाच्या मागे उभी राहील, पण एखाद्या विचारसरणीला पूर्णपणे आपलं म्हणणार नाही. यामुळे बहुतेक व्यक्तींमध्ये विचारधारेची सरमिसळ दिसून येते. माझी सामाजिक धोरणं डावी, आर्थिक धोरणं उजवी, राजकीय धोरणं राष्ट्रवादी अशी एकाच वेळी असू शकतात. आणि यामुळे एखाद्या राजकीय विचारधारेला समर्थन देताना मला त्यांची काही मतं पूर्णपणे तर काही बिलकुलच पटत नाहीत. पण असं एखादं न पटणारं मत समोर आल्यावर मनाने धरलेल्या सुसंगतीची पार वाट लागते.

मानसशास्त्रज्ञांच्या cognitive dissonance लोकं चार प्रकारे कमी करायचा प्रयत्न करतात.

1. आपली संज्ञानात्मकता बदलून टाकायची. नोटाबंदी मुळे लोकांना त्रास झाला ना, मग आजपासून मोदीसरकार वाईट. अश्याप्रकारची लोक फक्त पांढऱ्या किंवा काळ्या रंगातच जगाकडे बघतात. त्यातून त्यांना जास्त विचार करायचे कष्ट पडत नाहीत. पण ह्या सरळसोट विचाराने ना त्या व्यक्तीच भलं होतं ना जगाला काही फरक पडतो.

2. संज्ञानात्मकतेचं यथाशक्ती समर्थन करणे. राहुल गांधीने कितीही अकलेचे तारे तोडू देत, राहुल गांधी हाच कसा देशाचा तारणहार आहे हे लेखांवर लेख लिहून पटवून देणारे महाभाग याच प्रकारात मोडतात. त्यांना काहीही करून आपल्या मनात विसंगतीला थाराच द्यायचा नसतो.

3. आपल्याचकडून नवीन अट, नवीन संज्ञान जोडायचे. योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिमांविरोधात काहीही विधान केले असेल पण त्यांच्या मठाचं काम बघणारा मुस्लीमचं आहे वगैरे गोष्टी सांगणारे लोक या प्रकारात फिट बसतात. ते नवीन संज्ञांना जुन्या विसंगतीला हात ही लावत नाही हे त्यांच्या गावीही नसतं.

4. येणाऱ्या विरोधी माहितीकडे संपूर्ण डोळेझाक करणे. अश्या लोकांच्या तोंडून केरळमधल्या मार्क्सवाद्यांच्या हिंसाचारावर एक चकार शब्द निघत नाही. काश्मीर मधले दगडफेक करणारे तरुण यांच्यासाठी अस्तित्वातच नसतात. मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी जग तिच्याकडे बघतच असतं.

एकदा का संज्ञानात्मक विसंगती आपल्या मनावर नियंत्रण ठेवते हे मान्य केलं कि तिला अस्तित्वात ठेवून पुढे जाता येतं. बरोबर ते मान्य करून चूक ते सोडून देणं कठीण असलं तरी प्रयत्नाने जमतं फक्त हे सतत करण्याची प्रक्रिया आहे हे समजायला हवं. cognitive dissonance चे अस्तित्व एकदा मान्य केले कि ज्ञानाची अगणित दारे आपल्यासमोर खुली होतात. फक्त ती उघडण्याची धमक आणि इच्छा आपल्या मनात हवी एवढंच.

संपर्क – pole.indraneel@gmail.com