समष्टीचा बंडखोर कवी – नामदेव ढसाळ

नामदेव ढसाळ आणि दिलीप चित्र

लेखक - साजन चंद्रकला उचाडे

मुंबईत एक कवी संमेलन भरलं होतं. भल्या भल्या मान्यवर कविंची पंगताच बसलेली. अध्यक्ष होते अनंत काणेकर. त्यात एका माणसाची चिट्ठी आली. एका टक्सी ड्रायव्हरला म्हणे या सर्वांत कविता म्हणायची आहे, सर्वांच्या भुवया उंचावल्या. तिथं कोणी संधी देईना. तो टक्सी ड्रायव्हर तरीही शांतपणे स्टेजवर चढला आणि त्यानं कविता वाचायला सुरुवात केली. प्रेक्षकवर्ग स्तंभित… काहीतरी प्रचंड आदळतय, पण त्याच्या झपाट्याने दिपून जावं तसं त्याच्या कवितेतलं सामर्थ्य होतं, वेगळेपण सगळ्या कवितांहून वेगळ असणं हे सर्वांनाच जाणवलं. प्रेक्षकांनी दुसरी कविता वाचायचा आग्रह धरला पण, या पठ्ठ्यानं वन्समोअरची संधी घेतली नाही. ‘माणसं न वाचताच’ हे लोक कविता करत आहेत, असं उपस्थित कवींना सुनावून आला… तो विजेच्या वेगान आला तसाच लुप्तही झाला!

या कवितेची भाषा मराठीला नवीन होती. त्याच्या कवितेचा आशय यापूर्वी कधी मराठी कवींच्या स्वप्नातही आला नव्हता. विजेसारखे तळपते शब्द आणि आजवरच्या अन्यायामुळे दबलेल्या रागाचा स्फोट आणि तरीही सगळ्यांना व्यापून असणारी काव्यमयता यामुळे ही कविता मराठीच्या दरबारात एक नवीन रत्न घेऊन आली हे नक्की. कवितेचा अलवार मुखडा… तिचं साजर-गोजर रूप त्यानं एका फटक्यात पुसून टाकल. तीक्ष्ण क्रूर न उमजणारे तरीही वार करून जाणारे शब्द…

आत्म्यानं गुंडाळलेली वस्त्रे फाडायला लावून कवितेला माणसाशी जोडणार हे नाव, मुंबईच्या फरास रोडवर वेदनेनं, पिळवणुकीनं भरलेल्या गोलपिठा मध्यमवर्गाची चामडी नेसून पोह्यातले शेंगदाणे शोधणार्‍या समोर नेणारे नाव, ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव’ असा सवाल करुन लोकशाहीचे सुक्त गाणाऱ्यांना घाम फोडणारे नाव आणि झालेच तर ‘लोकशाही मेली डेंगन्यापरी’ असे सांगत समाजवादाचा डांगोरा पिटणारे आणि याच वादासाठी लेखणी, वाणी आणि उर्जा खर्च करणारेही हेच नाव. ‘द पोएट ऑफ अंडरवर्ल्ड’ म्हणून नावाजलेलं नाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बोट धरून व्यवस्थेचा डोंगर हलवायला निघालेल्या आणि सूर्याच्या रथाचे सात घोडे मारायला निघालेल्या मराठी साहित्यातील महाविद्रोहाचे, महाप्रलयाचे आणि झालेच तर वर्ग व्यवस्थेला दात लावायला निघालेल्या एका पंथर चे नाव नामदेव साळूबाई ढसाळ!

मला आयुष्यात जवळ वाटणार्‍या व्यक्तींपैकी नामदेव ढसाळ हे एक नाव. ते मला इतक जवळच वाटत की त्याचा उल्लेख ‘अरे-तुरे’च येतो. यात कोणताही अनादर नाही. हा अरे-तुरे आपलेपणातूनच येतो. नामदेवबद्दलच्या तपशिलात मला पडायचं नाही. ती माहिती इतरत्र मिळेल. एखादी व्यक्ती आपली वाटण्याची कारण इतरत्र मिळत नाहीत, ती अनुभवावीच लागतात. मला नामदेवच आयुष्य अथ पासून इतीपर्यंत माहित नाही. जे मला भावलं, आवडल तेवढच मला त्याच्याबद्दल माहित आहे. मी आपल्यापरीनं नामदेवला त्याच्या कवितांमधून समजून घेण्याचा प्रयत्न करत आलो आहे. त्याच्या साहित्यिक तपशिलात जाऊन विचार करण्याचा माझा इरादाही आहे. परंतु तेवढी बौद्धिक क्षमता माझ्यात आहे असं मला वाटत नाही. म्हणून पुढे जे काही लिहील आहे ते केवळ कवी नामदेव म्हणूनच…

साजूक तूपात घोळल्या गेलेल्या, क्षणोक्षणी नाकातून सानुनासिक उच्चरात बाहेर पडलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन विद्रोहाच्या खर्‍या रंगाला, ढंगाला त्यातल्या हंटरबाजाला मान्यता मिळवून देण्याच श्रेय बिनदिक्कतपणे नामदेवकडेच जातं. त्याच्या गोलपीठा या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी सारस्वतानां उपेक्षितांच्या जगाचं, जाणिवांचं, तीव्र संतापाच आणि त्यामधून आलेल्या अभिव्यक्तिचं जालिम दर्शन घडवलं. गोलपीठातलं मरणासक्त जिण त्यानं विषासारख भिनवून, पचवून टाकलं अन ते त्याच्या कवितेतनं वस्तीला आलं. त्याचा गोलपीठा आला आणि मराठी साहित्य चक्कर येइल इतकं गोल-गोल फिरलं. विद्रोही साहित्यात आजही गोलपीठा मैलाचा दगड मानला जातो.

प्रस्थापित विरोधी लढयानं नामदेव जन्मला असं मला मुळीच म्हणावयाचं नाही, पण हा काळ त्याच्या कवितेच्या उभारणीला पूरक ठरला. ‘गोलपिठा’, ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’ इथपासून त्याची कविता अशा बदलत्या खुणांनी व्यापलेली आहे. आणि ती अधिकाधिक प्रगल्भ होत ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘प्रियदर्शिनी’, ‘तुही इयत्ता कंची’, ‘गांडू बगीचा’, ‘हाडकी हडावळा’, ‘खेळ’, ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ इथपर्यंत प्रवास करते. आरंभीच्या काळात अधिक आक्रमक वाटते आणि नंतरच्या काळात अधिकाधिक समजूतदार होत प्रगल्भतेच्या अंगानं वाटचाल करताना दिसते. नामदेवची लेखणी गोफणगुंड्यातून सणसणत सुटणाऱ्या गोट्यासोट्यांसारखी आहे. चळवळीत वाढलेली, अत्तदीपभवाच्या दिशेने नेणारी, कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारी आहे.

साठोत्तरी कालखंडात मराठी साहित्याची व्याख्या विद्रोही मंडळींनी बदलली. गोलपिठामधून किंवा एकूण समग्र साहित्यातून पिडीत, शोषित, दूर्लक्षित अवहेलित समाजाची जी व्यथा नामदेवने मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही तयार होणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा…

जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही.

जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात.

जिथे दिवस रात्री सुरू होतो.

ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर-

मनगटावरच्या चमेली गजऱ्यात कवळया कलेजीची शिकार उरकून

शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक

पदोपदी दिसतात.

जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.

जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.

येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो

म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे

इथे माण्सालाच माणूस खात असतो आणि वाल्याच्या पाठीवरले वळ

लपविले जातात रे

अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो,

जिवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांंनी

खुशाल जगावे….

मी तसा जगणार नाही

या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत, ज्वलंत झाल्या.

मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो,

तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो

बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात

आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे.

ती बेधडकपणे सांगते की-

तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी

त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे. ‘गोलपिठा’, ‘पाणी’ ही अप्रतिम कविता :

हे छळकर्‍यांनो

पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात

पाणीटंचाई आली तर तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता

मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी

काय बदलावं

दलितत्वाच्या जाणिवेतून वर्ण आणि वर्गाची जाणीव होते. वर्ण हे धर्मसत्तेचं आणि वर्ग हे अर्थसत्तेचं वर्तुळ आहे. दलितांना बंदिस्त करणारी ही दोन वास्तवं आहेत. लोकशाहीनं दिलेल्या अभिवचनातून या दोन्ही बंदिवासातून दलित मुक्त होतील असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळून कित्येक र्वष लोटली तरी तसं काही घडलं नाही. नामदेवची ‘माण्साने’ ही कविता म्हणजे, विद्रोहाचा कळस…

शेटसावकारांची आय झवून टाकावी

नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा

जेवणातून विष घालावे मूठ मारावी

रांडवाडे वाढवावेत:

भाडखाव व्हावे

पण ती पुढे म्हणते –

नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये

तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये

नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये

आभाळाला आजोबा अन जमिनीला

आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे

चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे

इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ‘आय झवण्याची’ भाषा करणारा नामदेव मला इथे आभाळासारखा वाटतो. इथे तो एका जाती पुरता मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरता मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरता, एका भाषेपुरता मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरता मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो नामदेव त्यांचा होऊन जातो.

त्याच्या शिव्या खटकत नाहीत. लहानपणापासून ते तारुण्याच्या उंबरठ्यावर पाउल पडेस्तोवर बेदर्दी हंगाम सोसलेल्यांना, हमनदस्ती पाटाळात, चान्या चिन्यूल्या, डिलबोळ, पावशेर डालडा झोकणाऱ्याच्या जगातल्या तरुणाला त्या भावल्या नाही तर नवलच. पिढ्यानपिढ्या क्षयरोगानं मरणारा बाप, राजेश खन्नाच्या पोस्टरकडे पाहत नाकाला झोंबणाऱ्या स्वस्त अत्तराच्या दर्पात आयुष्याला रंगीत बनवण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना त्यांची गुलामगिरी जाणवून देउन एका महाप्रतिभावंतांची नवी क्रांतिकारी ओळख दिली तर त्यात चुकले कुठे? नामदेवाच्या साहित्यातून ह्या साऱ्या घटना आणि त्याअनुषंगाने भळभळणाऱ्या जखमा इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते आणि ती सच्ची असते म्हणून काळजाला भिडते.

‘गोलपिठा’ किंवा ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’ किंवा ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी’, या कवितासंग्रहातील कवितेत, किंबहुना सगळ्याच कवितेत त्याचा सर्वहारा वर्गात सर्व जातीजमाती, कष्टकरी, शेतकरी या सगळ्यांना सामावून घेण्याचाच प्रयत्न आहे. त्याच्या एका लेखसंग्रहाचं नावही- ‘सर्व काही समष्टीसाठी’ असं आहे. त्यामुळे नेहमीच्या आपल्या पठडीतल्या अर्थानं नामदेव विशिष्ट जातीतल्या लोकांच्या शोषणाविषयी बोलतो असं म्हणता येत नाही. नामदेवला ‘दलित कवी’ म्हणणं ही आपल्याच समजुतीतली उणीव दाखवण्यासारखं आहे. त्याचं गद्यपद्य, वर्तमानपत्रांतील सदरलेखन आणि मुलाखती या सगळ्यांमधून त्याचा जातिअंतांचा लढा सर्वहारा वर्गाच्या लढयाशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहे. म्हनुणच ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ हा संग्रह सतिश काळसेकराना भेट देताना नामदेवनं त्यावर, ‘कॉम्रेड सतीश, जातिअंतानंतरच वर्गयुद्ध जिंकू आपण – मान्य आहे ना तुला हे?’ लिहिलं होतं.

नामदेवला केवळ विद्रोही कवी म्हटले तर चूकच ठरेल. त्याच्या एकूण कवितेत परिवर्तनवादी संवेदनशीलता तर दिसतेच त्यासोबतच तिला चिंतनशीलता आणि दार्शनिक अधिष्ठानही आहे. तरी देखील ती गुढ, अनाकलनीय होत नाही. उलट ती स्पष्ट निर्भीड होत जाते. याच कारण म्हणजे नामदेवच्या कवितेने मानवी मूल्यांशी जोडलेली नाती कधीच तोडली नाही. म्हणूनच दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी नामदेवाच्या कवितेची तुलना तुकारामाच्या कवित्वाशी केली आहे.

कवितेच्या नाजूक प्रांतात कुणीतरी हिस्त्रपणे शिरून सगळ मुळासकट उपटून टाकायला ठामपणे उभ राहिलंय, ही कल्पनाच त्याकाळी स्तिमित करणारी होती. नामदेवच्या कवितेन रसिकांना कोड्यात पाडल, वाचकांना संभ्रमित केल, मराठी शिकविणार्‍या प्राध्यापकांना जीभ अडखळायला लावली आणि रसिकांसाठी नवे शब्दभांडार उघडले. अर्थात प्रस्थापित पालखीच्या भोयांना याचा त्रासही झाला. रसाळ नामदेवांचा काळ जाऊन आता ढसाळ नामदेवांचा काल सुरु झाला, असे ग. दि. माडगुळकरांसारखा कवी म्हणाला. याला पु. ल. देशपांडेनी परस्पर उत्तर दिले होते. त्यावेळीच रक्तात माखलेल्या अगणित सूर्यांना हाकरीत नामदेव ढसाळाची कविता जेव्हा पुढे जाते, तेव्हा तिच्या बंदोखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. तडजोडीचे पूल तिने केव्हाच उडवले आहेत आणि प्रस्थापित व्यवस्थेचा सर्वनाश करायचा विडा तिने उचला आहे, असे विजय तेंडूलकर म्हणाले होते.

मध्यप्रदेश हिंदी साहित्य परिषदेच्या वतीनं मार्च 1981 च्या अखेरच्या आठवडयात ग्वाल्हेर इथं मराठीतील दलित कवितेवर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राबाहेरच हिंदी भाषेतलं ते पहिलंच आयोजन होतं. या आयोजनात हिंदी-मराठीतले अनेक नामवंत लेखक-कवी होते. मराठी लेखकांपैकी दया पवार, चंद्रशेखर जहागीरदार, म.म. देशपांडे, चंद्रकांत पाटील होते. हिंदीतून त्रिलोचनजी, ज्ञानरंजन, भागवत रावत, प्रभात त्रिपाठी, प्रयाग शुक्ल इत्यादी अनेक आघाडीचे कवी-लेखक होते. हिंदीतल्या अनेक मान्यवरांनी अतिशय आस्थेनं मराठीतली दलित कविता समजावून घेतली. सगळ्या कवितांत नामदेवच्या कवितांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या आणखी कविता वाचण्याचा आग्रह झाला. चर्चाही फार सखोल, व्यासंगपूर्ण झाल्या. त्यातही नामदेवलाच मध्यवर्ती स्थान मिळाले. त्रिलोचनजीसारखा जेष्ठ आणि श्रेष्ठ कवी दलित कवितेचा कट्टर समर्थक बनला. हिदी साहित्य जगात खूप वादळी चर्चा झाली. यातूनच पुढे हिंदीवरून नामदेवच्या कवितांची मल्यालम, तमिळ, कन्नड, बंगाली, पंजाबी इत्यादी भाषांत भाषांतरं झाली आणि नामदेवची कविता मराठीच्या मर्यादा ओलांडून समकालीन भारतीय कवितेच्या व्यापक पटावर गेली.

सुदीप बनर्जी त्या वेळी मध्यप्रदेश सरकारच्या साक्षात्कार नियतकालिकाचे संपादकही होते. साक्षात्कार नियतकालिकाच्या पुढच्याच अंकात नामदेवाच्या कवितांची हिदी भाषांतरे छापली गेली. ती खूप वादळी ठरली. यातल्या ‘भूख’ या कवितेत आणि दुसर्‍या ‘पाणी’ या कवितेत अस्सल शिव्या आणि तथाकथित अशिष्ट भाषा होती. त्यामुळे काही ‘संस्कृती संरक्षक’ भयंकर चिडले. ‘साक्षात्कार’ हे एका परीनं शासनाचंच नियतकालिक होत. त्यामुळे नामदेवच्या कवितांच्या विरोधात काही ‘संस्कृती संरक्षक’ आमदारांनी विधानसभेत चर्चा उपस्थित केली. त्यावेळचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी त्यावर समर्पक उत्तर देऊन विरोधकांना गप्प केल. याचीही बरीच चर्चा झाली. आणि नामदेवच्या कवितांना हिंदी साहित्यात पुन्हा एकदा महत्त्वाचं स्थान मिळाल. नामदेवाच्या कावितंत असं काय होत ज्यामुळे त्याना एवढं महत्त्व प्राप्त झालं?

नामदेवची कविता वाचताना पहिल्याच वाचनात वाचकांना दोन गोष्टी झपाटून टाकतात: एक म्हणजे त्याची भयंकर प्रपातासारखी शक्तिशाली, आगळीवेगळी भाषा, आणि दुसरं, त्याचं अफाट आणि सर्वसामान्य वाचकांना अपरिचित असलेलं अनुभवविश्व. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदेवच्या कवितेची भाषा नेणीवेतून आली आहे. सगळ्याच अस्सल कवितांची भाषा नेणीवेतूनच येते. अनुभवाचं आंतरीकीकरण झाल्यावर शब्दांची अपरिचित संघटन होतात आणि अबोध मनातून भाषा उसळून येते. बा. सी. मर्ढेकरांनंतर मराठी कवितेला, कवितेच्या आशय, संरचना, रूप, भाषेला, अभिरुचीला नवीन वळण देणारे तीनच कवी होऊन गेले. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर आणि नामदेव ढसाळ. तिघांचीही कविता अगदी वेगवेगळी स्वयंभू आहे. तिघांच्याही कवितेचा जन्म नेणीवेतून झाला आहे.

नामदेवची स्वतःची साहित्यविषयक भूमिकाही सडेतोड होती. कवितेला ते वर्गीय लढाईत वापरायचे हत्यार समजायचा. माझी कविता प्रचारकी आहे, असे म्हणणार्‍यांना मी भीक घालणार नाही. मी कविता लिहितो म्हणजे राजकीय कृती करतो. विद्रोह करतो. कवितेचे शब्द हे बंदुकीच्या गोळीप्रमाणे असतात. जत्रेतल्या पिस्तुलाप्रमाणे हे हत्यार वापरायचे नसते, शत्रुवर नेम धरून आणि मित्राच्या बाजूने हे पिस्तूल वापरायचे असते, असे तो लिहायचा, बोलायचा आणि वागायचाही. वेदना आणि प्रतिभा यांच्या अनोख्या संगमातून नामदेवची कविता जन्माला आली होती. हा संगम त्याने बिसलरीच्या बाटलीत भरला नाही, तर त्याचा प्रलय करून टाकला. वाचनाचा आणि अद्ययावत ज्ञानाचा प्रचंड व्यासंग असलेल्या नामदेवने आपले साहित्य हाडकी हाडळीपासून टीव्हीच्या अँटेनापर्यंत आणि माहिती साठवून ठेवणार्‍या डबड्याच्या स्क्रीनवरही नेले. सर्वार्थाने तो आधुनिक बनला. नामदेवने साहित्य आणि समाजाच्या काळजावर अशा काही तप्त मुद्रा कोरून ठेवल्या आहेत, की त्या शांत व्हायलाच बराच काळ खर्च होऊन जाईल.

निर्वाणा अगोदरची पीडा सहजपणे झेलून मरणाला धीरोदात्तपणे सामोर जाणारा नामदेव आणि त्याच्याप्रमाणेच मर्ढेकरोत्तर मराठी कवितेला वळण देणारे दि.पु. चित्रे , अरुण कोलटकर या तिन्ही कवींना कर्करोगालाच बळी पडावं लागणं हा विचित्र योगायोगच आहे. त्यांच्यासारखे कवी मरणानंतर अधिकच विद्रोही होत जातात हे मात्र खरं!

(समाप्त)