तिहेरी तलाक़ : एक आढावा

Triple Talaq

[Image Source: Link]

ज्या गोष्टी मुळात वादग्रस्त असतात, त्या केवळ बोलल्यामुळे वाद निर्माण होतात किंवा वादग्रस्त ठरतात ही भूमिका चुकीची आहे, असं मला वाटतं. ट्रिपल तलाक़ अथवा मुस्लिम धर्मातील घटस्फोटाची कहाणीही तशीच. दर काही वर्षांनी निवडणुका तोंडावर आल्यावर किंवा इतर कोणताही सामाजिक, राजकीय स्वार्थ साधायचा असेल तर हा तिहेरी तलाक़चा मुद्दा चर्चेत येतो. देशासमोरचा हा एकमेव प्रश्न आहे अशा दृष्टीने चर्चा सर्व माध्यमांतून होत असते, ही एक पद्धतच पडून गेल्यासारखे चित्र आहे.

इस्लामपूर्व अरबस्तानामध्ये तलाक़ची पद्धत अतिशय सोपी होती आणि तलाक़ वारंवार घडून येत असत, असे संदर्भ सापडतात. इस्लामपूर्व अरबांच्या अनेक पद्धती इस्लाममध्ये जशाच्या तशा आलेल्या आहेत. त्यामध्ये तलाक़चा सुद्धा समावेश करता येईल. परंतु समतोल बुद्धी आणि न्याय्य दृष्टीकोन ठेऊन अभ्यास करायचा असेल तर हे आताच सांगणे गरजेचे आहे की, प्रेषित महंमद पैगंबर यांनी तलाक़ विषयी नापसंती व्यक्त केली आहे. प्रेषित असे म्हणतात कि, परवानगी दिलेल्या अनेक गोष्टींपैकी तलाक़ ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. महंमद पैगंबरांच्या सुधारणांमुळे पूर्वीच्या कायद्याला बदललेल्या परिस्थिती नवीन आयाम मिळाले. पतीला असलेला तलाक़चा अधिकार त्यांनी निर्बंधित केला. त्यांनी वाजवी कारणांवरून घटस्फोट मिळवण्याचा अधिकार महिलांना दिला. जीवन साध्य करण्याच्या हेतूने नि:पक्ष लवादाच्या किंवा न्यायाधीशाच्या मध्यस्थीशिवाय शक्य असेल तेथवर मनुष्याने या हक्काचा वापर करू नये असे प्रतिपादन केले आहे. तलाक़मुळे वैवाहिक आनंद हिरावला जातो, मुलांचे योग्य संगोपन करण्यात अडचणी येत असतात.

जेव्हा वैवाहिक जीवन तुटते तेव्हा गैरसमजातून, तिरस्कारातून, छळातून किंवा अविश्वासातून कुटुंब देखील तुटत असते. स्त्रियांना अन्यायामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे आपल्या हक्कांची जाणीव नसते त्याच वेळी पुरुष असमंजसपणा करतात. काहीवेळा तलाक़ ही अपरिहार्य बाब असली तरी घटस्फोटाचा हुकूमनामा बजावल्यानंतर कुटुंबातील स्त्रियांच्या सदस्यांच्या दर्ज्यामध्ये अनिश्चितता निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते का? हा प्रश्न उरतोच. बहुतेक वेळा ती घेतली जात नाही. पूर्वीच्या कायद्याप्रमाणे तलाक़ अधिकार हा एकतर्फी आणि केवळ पतीकडे सोपवला होता. परंतु अलीकडे सामाजिक न्यायाच्या आधुनिक कल्पनांनुसार नवीन कायदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये काही वर्गीकरण करता येण्याजोगे आहे. मुस्लीम कायद्याप्रमाणे विवाह हा एक साधा करार असल्यामुळे सदर करार संपुष्टात येणं याला व्यापक अर्थानं घटस्फोट असा शब्द वापरला आहे. हिंदू विवाह कायदा अथवा आंग्ल विवाह कायदा व अन्य कायद्यान्वये घटस्फोट न्यायालयामार्फत दिला जातो पण मुस्लीम कायद्याची तत्वं मात्र या बाबतीत निराळी आहेत. या कायद्यामुळे विवाह अनेक कारणांमुळे संपुष्टात येऊ शकतो. एक : दोघांपैकी एकाचे निधन, दोन : पती अथवा पत्नीची कृती, तीन : कायद्यान्वये तलाक़. एक एक करून आपण वरील कारणांचा विचार करू.

पहिले : निधन – ज्यावेळी दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो त्यावेळी विवाह बंधन संपुष्टात येतं. जर पत्नीचं निधन झालं तर पती लगेच दुसरे लग्न करू शकतो. उलट पतीचे निधन झाले तर पत्नीला लगेच दुसरा विवाह करता येत नाही. लग्नाचा उपभोग घेतला गेला असो व नसो स्त्रीला चार महिने दहा दिवस ‘इद्दा’ पाळावा लागतो. पती व पत्नीची कृती याबद्दल आपण नंतर विचार करू. शेवटचं कारण आहे कायद्यान्वये तलाक़, त्याबद्दल आधी विचार करू.

मुस्लीम कायद्यातील तलाक़ हा पुरुषाचा अनिर्बंध अधिकार आहे, किंवा असतो. तलाक़चा शब्दशः अर्थ, लग्न बंधनातून मोकळे करणे, लग्न बंधन सोडून देणे, साखळीतून मुक्त होणे इ. तलाक़ देण्याचा असा अधिकार केवळ पुरुषालाच आहे, एक दोन प्रकार किंवा अपवाद वगळता तो स्त्रीला देण्यात आलेला नाही. पण त्यासाठी तिला न्यायालयाकडे जावे लागते. मात्र पुरुषाला तशी आवश्यकता नाही, तशी कोणतीही अट नाही. कोणत्याही कारणासाठी आणि पत्नीच्या पश्चात तो पत्नीला तलाक़ देऊ शकतो. सुन्नी कायद्याप्रमाणे तलाक़ देण्यासाठी साक्षीदारांची सुद्धा आवश्यकता नसते. पण शिया कायद्याप्रमाणे मात्र तलाक़ दोन साक्षीदारांच्या समोर द्यावा लागतो. तलाक़ दिल्याची नोटीस सुद्धा देण्याचे बंधन शिया किंवा सुन्नी कायद्यात पतीवर टाकण्यात आलेले नाही.

सुन्नी कायद्याप्रमाणे तलाक़ लेखी किंवा तोंडी चालतो. त्यासाठी विशिष्ट पद्धत ठरवलेली नाही. मात्र तलाक़चे उच्चारलेले शब्द किंवा लिहिलेली अक्षरं सुस्पष्ट असावीत, असा आग्रह आहे. त्या उच्चारण्यातून किंवा लिहिण्यातून पतीची तलाक़ देण्याची मनीषा स्पष्ट झाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र शिया कायद्यानुसार तलाक़ हा केवळ तोंडानेच उच्चारला गेला पाहिजे. तो लेखी नसावा असा आग्रह आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये (उदा. पती कोणत्याही करणाने उच्चार करू शकत नसेल तरच) लेखी तलाक़ कायदेशीर मानला गेला आहे. पती जर मुका असेल तर खुणांनी सुद्धा तलाक़ देणे कायदेशीर आहे. तलाक़ ह्या अरबी शब्दाच्या उच्चाराचा आग्रह केला आहे. पण जर नवऱ्याला अरबी येत नसेल तरच पत्नीला समजेल अशा भाषेत त्याचा उच्चार केलेला चालू शकतो. सुन्नी इस्लामच्या कायद्याचा अन्वयार्थ लावणारा एक महत्वाचा कायदेपंडित ‘इमाम हनाफी’ त्याने केलेल्या अन्वयार्थाप्रमाणे तलाक़ जबरदस्तीने अथवा खेळीमेळीच्या वातावरणात किंवा गंमत म्हणून, टिंगल म्हणून अथवा चुकून जरी उच्चारला गेला तरी तो ग्राह्य मानला जातो. मात्र तलाक़ देताना पती जागरूक असावा. ‘मलिकी’ आणि ‘शफीकी’ या दोन परंपरानुसार धाक व जबरदस्तीने दिलेला तलाक़ ग्राह्य मानला जात नाही. भारतात ऐच्छिक मद्यपान केल्यानंतर दिला गेलेला तलाक़सुद्धा वैध मानतात. शिया कायद्यानुसार ऐच्छिक किंवा जबरदस्तीने केलेल्या मद्यपानाच्या नशेत दिलेला तलाक़ कायदेशीर मानला जात नाही. मात्र शिया कायद्याच्या चार आणि सुन्नी कायद्याच्या चार अशा सर्व परंपरांची एका मुद्द्यावर एकवाक्यता आहे, ती म्हणजे संभ्रमावस्थेत अथवा मूर्च्छावस्थेत अथवा निद्रावस्थेत किंवा आश्चर्याच्या वा अचंबित मनस्थितीत दिला गेलेला तलाक़ ग्राह्य मानला जात नाही.

तलाक़चे तीन प्रकार आहेत, त्याचा आता थोडा आढावा घेऊ. महंमद पैगंबर ‘लग्न हा जरी करार आहे’ असे मानत असले तरी विवाह संस्था कायम राहिली पाहिजे असं मानत असत. लग्नबंध शक्यतो तोडले जाऊ नये याच मताचे ते होते. पण अगदीच अपरिहार्य परिस्थितीत जर लग्नाचा हेतू, म्हणजे उभायातांना आपले वैवाहिक जीवन सुखी रहावे व दोघांनी आयुष्य सुखाने उपभोगावे, हे जर साध्य होत नसेल, नवरा बायको सतत भांडत असतील तर ते लग्न खडकावर आपटलेल्या जहाजाप्रमाणे आहे. तेव्हा सुखी नसलेल्या नवरा बायकोने जबरदस्तीने लग्नाच्या बंधनात अडकून न पडता वेगवेगळ्या सुखाच्या शोधात जाऊ शकले पाहिजेत, यासाठी तलाक़ची सोय केलेली आहे. यासाठीच पैगंबरांनी तलाक़ या संस्थेला मान्यता दिलेली आहे. पण ज्या तलाक़मध्ये तलाक़ मागे घेण्याची मुभा आहे, म्हणजे जो तलाक़ रिव्होकेबल आहे, असा तलाक़ त्यांना मान्य होता. आणि म्हणूनच फक्त विशिष्ट परिस्थितीतच तलाक़ दिला गेला जावा, या मताचे ते होते. यालाच ‘तलाक़ असनत’ असे म्हणतात. यामध्ये दोन प्रकारचे तलाक़ देता येतात, एक – ‘तलाक़ अहसन’ आणि दोन ‘तलाक़ हसन.’

वर उल्लेख केलेले दोन प्रकार नेमके काय आहेत त्याचा आता उहापोह करायचा आहे. पहिला प्रकार ‘तलाक़ अहसन.’ या प्रकारात पत्नी जेव्हा मासिक पाळीतून मुक्त असते, ज्याला तुहर किंवा प्युरीटीचा काळ म्हणतात अशा वेळी नवऱ्याने मी तुला तलाक़ देतो किंवा तुला तलाक़ देतो आहे, अशी घोषणा करायची असते आणि त्यानंतर इद्दा असेपर्यंत म्हणजे तीन मासिक पाळ्या होईपर्यंत पत्नीशी संभोग करायचा नसतो. या काळात पती आपली तलाक़ची घोषणा दोन प्रकारांनी मागे घेऊ शकतो. एक – मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो असे त्याने म्हणायचे असते, दोन – प्रत्यक्ष संभोग करून. जर त्याने तलाक़ची घोषणा वरील दोन प्रकारे मागे घेतली नाही तर तिसऱ्या तुहर काळी तलाक़ कायम होतो आणि त्याला तलाक़ची घोषणा मागे घेता येत नाही. आता आपण पाहिला तो प्रकार होता तलाक़ अहसन, आता आपण तलाक़ हसन म्हणजे काय ते बघू. या प्रकारच्या तलाक़मध्ये प्रत्येक तुहरच्या काळात म्हणजे तीन मासिक पाळ्यांच्या काळात तुला तलाक़ देतो आहे किंवा दिला आहे अशी घोषणा करायची असते. पहिली घोषणा केल्यानंतर दुसरा तुहरचा काळ येईपर्यंत घोषणा मागे घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. जर घोषणा मागे घेतली नाही तर दुसऱ्या तुहरच्या काळात दुसरी घोषणा करायची. त्यानंतर जेव्हा तिसरा तुहरचा काळ येतो त्यामध्ये पूर्वी केलेली तलाक़ची घोषणा मागे घेता येते. पण जर घोषणा मागे घेतली नाही तर तुहरच्या तिसऱ्या काळात तिसरी घोषणा करायची, या तिसऱ्या घोषणेनंतर तलाक़ पक्का होतो. कारण त्यानंतर घोषणा मागे घेण्याची मुभा नाही. अशा तर्हेने तीन घोषणा दिलेल्या पत्नीला ट्रिपली डायव्होर्स्ड वाईफ असं म्हणतात. अशा पत्नीला त्याच नवऱ्याशी कायदेशीर प्रतिबंध असताना पुन्हा लग्न करता येत नाही. कायदेशीर प्रतिबंध म्हणजे तलाक़ मिळाल्यानंतर तिला इद्दा पाळावा लागतो. त्यानंतर तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न करायचं, त्या लग्नाचा दोघांनी उपभोग घ्यायचा म्हणजे किमान एकदा संभोग झाला पाहिजे, त्यानंतर दुसऱ्या नवऱ्याने घटस्फोट द्यायचा, पत्नीने दुसऱ्या तलाक़चा इद्दा पाळायचा त्यानंतरच तिचे पहिल्या नवऱ्याशी लग्न होऊ शकते.

Triple Talaq
[Image Source: Link]

तलाक़ उल बिदात – यात सुद्धा दोन प्रकार आहेत. तीन घोषणायुक्त तलाक़, म्हणजे मागे न घेता येणारी एकच घोषणा. ‘तलाक़ अस् सनत’ मध्ये जी पद्धत दिलेली आहे ती काहीशी क्लिष्ट आणि दीर्घ असल्यामुळे त्यात सुधारणा करून नंतरच्या कायदेपंडितांनी ही तलाक़ची नवी पद्धत शोधून काढली. यामध्ये कुराणात सांगितलेली पथ्यं पाळली जात नाहीत. घोषणा करताना स्त्री तुहरमध्ये आहे कि नाही याचा विचार केला जात नाही. म्हणूनच त्याला जुने कायदेतज्ज्ञ ‘फारफ’ म्हणतात. या पद्धतीला शास्त्राचा व कुराणाचा आधार नाही, असेही म्हणतात. पहिल्या प्रकारात तलाक़च्या तीन घोषणा एका वाक्यात अथवा ‘तीन वाक्यात’ दिल्या जातात. आणि इद्दाचा काळ संपेपर्यंत संभोग घेण्यापासून स्वतःला दूर ठेवायचे बंधन आहे. मी तुला तीन घोषणायुक्त तलाक़ देतो किंवा ‘तलाक़ तलाक़ तलाक़’ याप्रमाणे घोषणा केल्यानंतर तो घोषणा मागे घेता न येणारा (इरीव्होकेबल) तलाक़ दिसतो. दुसऱ्या प्रकारात मागे न घेतलेली घोषणा एकच असते, ‘सिंगल रीव्होकेबल’ घोषणा. आणि घोषणा करताच तलाक़ अंमलात येतो. भारतात याच प्रकारचा तलाक़ बव्हंशी प्रचलित आहे. हा तलाक़ वैध आहे, तरी हे एक प्रकारचे पाप आहे असे मानले जाते, ‘द सीनफुल लॉ’ असेही याला म्हणता येईल.

‘तलाक़ ए-तफ्विज’ किंवा ‘डेलिगेटेड तलाक़’ मुस्लिम कायद्यानुसार तलाक़ देणे हा पुरुषाचा अधिकार आहे. पण काही वेळा आपला तलाक़चा हक्क तो दुसऱ्या व्यक्तीस बजावण्यास सांगू शकतो. आपल्या पत्नीलासुद्धा तो हा
अधिकार बहाल करू शकतो. आणि जेव्हा ती व्यक्ती किंवा पत्नी दिलेल्या अधिकारानुसार तलाक़ देते त्यावेळी अशा तलाक़ला ‘तलाक़ ए-तफ्विज’ किंवा ‘डेलिगेटेड तलाक़’ असे म्हणतात. म्हणूनच हा प्रकार स्त्रीने दिलेल्या तलाक़मध्ये मोडतो. पण प्रत्यक्षात पती पत्नीच्या तोंडून तलाक़ वदवून घेतो तेव्हा ती पत्नी स्वतःलाच तलाक़ देत असते. स्त्री आपल्या पतीला कधीच तलाक़ देऊ शकत नाही. लग्न हा एक प्रकारचा करार असल्यामुळे नवरा आणि त्याची होणारी पत्नी यांच्यामध्ये लग्न पूर्व करार म्हणजे ‘अँटी नॅप्चुअल अॅग्रीमेंट’ होतो, आणि त्यानुसार काही अटी पतीवर लादल्या जातात. त्या अटी नवरा मान्य करतो. उदा. नवऱ्याने पत्नीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करू नये. किंवा पत्नी सांगेल त्या घरी तिची राहण्याची सोय करावी, किंवा दरमहा ठराविक रक्कम तिच्या खर्चासाठी द्यावी वगैरे! मात्र या अटी अवैध किंव अनैतिक स्वरूपाच्या नसाव्यात. जर त्या प्रस्थापित कायद्याच्या विरुद्ध असतील अथवा सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असतील तर अशा अटी ग्राह्य धरल्या जात नाहीत. उदा. पत्नीने आपल्या नवऱ्याला सोडून कायमचे आपल्या आई वडिलांच्या घरी निघून जावे किंवा एखाद्याचा खून करावा किंवा विष द्यावे किंवा दुसरं लग्न करूच नये किंवा बायकोने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क सोडून द्यावा जेणेकरून उभयतांच्या हक्काला बाधा येतील, अशा अटी या करारात असू नयेत.

अशा तर्हेच्या अटी असणाऱ्या करारात पुढे असे म्हटलेले असते कि, जर नवऱ्याने आपल्या एखाद्या अटीचा भंग केला तर नवऱ्याचा तलाक़ देण्याचा अधिकार पत्नीने बजावावा. जेव्हा स्त्री हा अधिकार बजावते तेव्हा त्या तलाक़ला ‘तलाक़ ए-तफ्विज’ किंवा ‘डेलिगेटेड तलाक़’ असे म्हणतात.

उभयतांच्या संमतीने तलाक – या प्रकारात दोन तलाक येतात.

1) खुल किंवा खुल्ला – ‘खुल किंवा खुल्ला’ – ज्यावेळी पत्नीला काही कारणास्तव द्वेष, तिटकारा किंवा तिरस्कार वाटतो आणि लग्नसंबंध तोडावेसे वाटतात तेव्हा ती नवऱ्यासमोर असा प्रस्ताव मांडते. आणि नवऱ्याने विवाहबंधनातून मुक्त केल्याच्या मोबदल्यात ती स्वतःची काही मालमत्ता बक्षीस म्हणून देणार असते. नुकसान भरपाईवरचा तिचा अधिकार संपतो याला खुल किंवा खुल्ला म्हणतात. नवऱ्यास तिला विवाहबंधनातून मुक्त करता येते.

2) मुबारा किंवा मुबारात – ‘मुबारा किंवा मुबारात’ – मुबारा अथवा मुबारात मध्ये दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घ्यायचा असतो. इथे नुकसान भरपाईची गरज नसते. तीन मासिक पाळ्यांनंतर म्हणजेच इद्दानंतर नवरा नुकसान भरपाईतून मुक्त होतो कारण तिला मोकळीक मिळते.

(क्रमश:)

संपर्क – sganpatye@gmail.com