भाजप २.०

Karnataka assembly elections 2018

‘अध्यक्ष महोदय, पार्टी तोडकर, सत्ता के लिये नया गठबंधन करके अगर सत्ता हात में आती है, तो मी उस सत्ता को चिमटे से भी छुना पसंद नहीं करुंगा.’ वाजपेयींचे हे 1996 मध्ये संसदेतले उद्गार आहेत. भाजपच्या सर्वोच्च नेत्याचे हे विचार आहेत. या विचारांवर नजर टाकल्यास आणि आजच्या भाजपच्या कार्यपद्धतीची तुलना केल्यास आपल्याला फरक दिसून येतात. तो फरक नैतिकतेच्या पातळीवर तर दिसून येतोच, पण त्यापेक्षा निवडणुका लढवण्याच्या ‘चाल-चलन’मध्ये झालेला मोठा फरकही दिसतो. पहिल्या पिढीतील भाजपा नेत्यांचं लक्ष प्रामुख्याने हिंदी भाषिकांवर होतं. त्यांनी पक्ष वाढीसाठी अनेक प्रयोग सुद्धा केले. पण ते प्रयत्न आक्रमक नव्हते. त्यात फोडाफोडीचं राजकारण नव्हतं. एक गुजरातचा अपवाद सोडला तर अन्य गैर हिंदी राज्यात भाजपाच्या संघटनेची ताकद मर्यादित होती. महाराष्ट्रातसुद्धा वसंतराव भागवतांचा ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) प्रयोग सोडला तर, भाजपाने संघटनात्मक पातळीवर फार यश मिळवलेले नव्हते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून वाजपेयी पंतप्रधान झाले होते. त्यांच्यासोबत कट्टर हिंदुत्वाचा चेहेरा असलेले अडवाणीसुद्धा सरकारमध्ये होते. भाजपाची संघटनेची ताकद नुकतीच वाढू लागली होती. पण सर्व महत्वाचे नेते सरकारमध्ये सामील झाल्यामुळे पक्ष, संघटनावाढीकरिता त्या ताकदीचा नेता अध्यक्ष होऊ शकला नाही. आणि मग बंगारू लक्ष्मण यांच्यासारख्या नेत्याकडे पक्षाध्यक्ष पद देण्यात आले. ही भाजपची मोठी चूक ठरली होती. काही जणांनी सरकारी सत्ता, पदाचा मोह आवरत पक्ष संघटनेसाठी कदाचित काम केलं असत तर 2004 चे निकाल काही वेगळे लागू शकले असते.

भाजप 1.0 आणि भाजपा 2.0 यांच्यात मुख्य फरक आहे तो हा. नरेंद्र मोदी यांनी सरकारी यंत्रणेवर ताबा मिळवला आहे. त्यावर ताबा मिळवताच पक्ष संघटना सुद्धा स्वतःच्या हातात घेतली आहे. गुजरातच्या राजकारणातले विश्वासू सहकारी, 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 80 पैकी 71 लोकसभा खासदार निवडून आणण्याची किमया करून दाखवणारे आणि पक्ष यंत्रणेसाठी अथक परिश्रम करणारे अमित शहा यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली. यामुळे अनेक जुने नवे नाराज झाले. पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. कारण मोदींना जनतेतून पाठींबा मिळत होता व अमित शहांनी 2014 मध्ये स्वःच कर्तृत्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे शहा यांच्या निवडीला फार विरोध झाला नाही. अशा पद्धतीने एकीकडे सरकारी यंत्रणा दुसरीकडे पक्ष संघटना यांच्या जोरावर भाजपाने पुढच्या अनेक निवडणुका बहुमताने जिंकल्या.

भाजपाच्या ‘चाल, चेहरा और चलन’ बदलाचा प्रारंभ तसा 2014 पूर्वीच सुरु होतो. संघ कधी नव्हे ते इतका कार्याला लागला होता. तसे आदेशच नागपूरहून स्वयंसेवकांना गेले होते. याआधीसुद्धा संघाने भाजपसाठी निवडणुकीत काम केले आहे. पण 2014 मधला स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय व अभूतपूर्व होता. तसे मोदी आणि हिंदुत्व परिवाराचे गुजरातच्या राजकारणात संबंध कधीच चांगले नव्हते. प्रवीण तोगडियांशी त्यांचे वैर सर्वांना माहीत आहेच. या सर्व पार्श्वभूमीवर संघ मोदींना मान्यता देईल की नाही यावर प्रश्नचिन्हच होते. पण मोदींनी संघाला पटवून दिले की जर ते नाहीत तर दुसरे कुणीच नाही. याची सुरुवात 2012 पासूनच मोदींनी केली होती. सुशासन, जनाधार असलेला नेता आणि स्वप्न विकणारा राजकारणी अशी स्वतःची प्रतिमा मोदी राष्ट्रीय पातळीवर तयार करत होते. याचाच फायदा त्यांना झाला. स्वयंसेवक हेसुद्धा सामान्य नागरिकच असतात, त्यामुळे त्यांच्या मनात मोदींबद्दल आत्मीयता तयार होत गेली व संघाच्या शाखांमधून मोदींना मान्यता मिळत गेली.

दुसरी बाब लक्षात घ्यायला हवी की मोदी राजकारणी नंतर झाले होते. त्याआधी ते संघाचे प्रचारक होते. संघाशी त्यांची नाळ घट्ट जुळली होती आणि मोहन भागवत यांचे वडील हे मोदींचे संघातले गुरु अशा सर्व बाबी मोदींसाठी अनुकूल ठरल्या. यात मोदींना संघाच्या नेत्यांना हे पटवून देण्यात यश आले की संघाने जोरदार प्रयत्न केले तर भाजपचे सरकार केंद्रात येईल. मोहन भागवत व मोदींच्या मैत्रीमुळे सुद्धा संघ कधी नव्हे इतका 2014 मध्ये कार्यान्वित झाले. त्याचा निश्चितच फायदा भाजपाला झाला आहे. अनेक लोकसभा मतदार संघांमध्ये भाजपला अतिरिक्त 5-6 टक्के मतांची गरज होती. ती मतांची गरज पूर्ण करण्यासाठी भाजपने अनेक पद्धती अवलंबल्या. त्यातली महत्वाची म्हणजे दुसर्‍या पक्षाच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाले तर भिवंडीच्या कपिल पाटील आणि सांगलीच्या संजय काका पाटील या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन उमेदवारीसुद्धा देण्यात आली. हीच रणनीती भाजपने विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी कायम ठेवली. आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा, महाराष्ट्रात लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बबनराव पाचपुते इ., उत्तरप्रदेशात रिटा बहुगुणा जोशी इ. ना भाजपा प्रवेश देण्यात आला होता. हे सर्व मुळातून काँग्रेसी विचारसरणीचे लोक होते. त्यांना जवळ करून भाजपने अतिरिक्त 3 ते 4 टक्के मतांची आघाडी घेतली आणि याचा त्यांना फायदाच झाला.

या सर्व प्रक्रियेमध्ये तिकीटवाटपात भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज झाले. पण त्यांची नाराजी बंडखोरीत परावर्तित होऊ दिली गेली नाही. त्यांची समजूत काढण्यात आली. यासोबतच भाजपने पूर्वाश्रमीच्या आपल्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. कल्याण सिंग, केशूभाई पटेल, येडियुरप्पा इ. ना प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या जातीय समीकरणात भाजपाला त्या त्या राज्यात फायदाच झाला. आता तर शंकर सिंग वाघेला यांनीसुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी भाजपाला राज्यसभा निवडणुकीत मदत केली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपच्या नेतृत्वाला कुठल्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत त्यासाठी पक्षांतर घडवून आणावे लागले तरी चालेल. अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे हे नवीन लोक भाजपाची विचारसरणी हळूहळू अंगिकारतात.

जातीय समीकरणांवरसुद्धा भाजपने विशेष भर दिला आहे. उत्तरप्रदेशमध्ये गैरयादव ओबीसी लोकांना एकत्र करण्यात व भाजपचे बनवण्यात यश आले. तसेच दलितांमधील गैर जाट व दलितांची एक गठ्ठा मते आपल्याकडे घेण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपने केला. या सर्व रणनीतीमध्ये चेहर्‍याला ’चाल, चेहरा और चलन’ महत्व देण्यात आले. यामध्ये ओबीसीला आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. मोदी स्वतः ओबीसी गटातून येतात. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या आधी केशव प्रसाद मौर्य यांना प्रदेशाध्यक्षपदी बसवण्यात आले. तुमच्या समाजातील एक नेता म्हणून त्यांचा चेहरा दाखवला गेला व ओबीसी वर्गाला भाजपमध्ये स्थान आहे हा संदेश पोहचवण्यात भाजप यशस्वी झाला.

समकालीन भाजप नेत्यांनी निवडणुकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन सोडून त्यात व्यासायिकता आणण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये प्रशांत किशोर यांना सोबत घेण्यात आले तर आसाम आणि ईशान्य भागातील निवडणुकांसाठी रजत सेठी यांना कामाला लावण्यात आले. या रणनीतीकारांची मदत घेत असतानाच अमित शहासुद्धा अगदी लहान लहान गोष्टींच्या नियोजनात स्वतः लक्ष घालत होते. भाजप नेतृत्वाला एका गोष्टीची जाणीव झाली होती की निवडणुका जिंकायच्या असतील तर जास्तीत जास्त मतदारांना घराबाहेर काढायला लागेल. काँग्रेसच्या कारभारामुळे मध्यमवर्गीय त्रासले होते. त्यांच्या मतदानाचा टक्का वाढल्याने भाजपला फायदा झाला आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास पुणे लोकसभा मतदार संघात 1999 ला 7,32,654, 2004 ला 7,68,827, 2009 ला 7,34,370 इतके मतदान झाले. प्रत्येक वेळी 30-32 हजारांचा फरक मतदानात झाला आहे. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हे मतदान वाढून 9,93,274 झाले आहे. म्हणून मतदानाच्या टक्क्यात वाढ ही जवळपास 2,60,00एवढी आहे. या वाढीमधला 70 टक्के मतदार हा भाजपचा होता. आपल्या मतदाराला बूथपर्यंत आणणे हे महत्वाचे असते तेच भाजपने 2014 मध्ये केले.यासाठी मतदार संघातील प्रत्येक बूथ वर एक बूथ प्रमुख नेमण्यात आला. त्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. मतदानाचा टक्का वाढवणे ही बूथ प्रमुखाची जबाबदारी होती. ती त्यांनी संघ स्वयंसेवकांच्या मदतीने पार पाडली. त्यामुळे पुण्यासारख्या अनेक मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली. काही ठिकाणी ही टक्केवारी 2009 च्या तुलनेत दुप्पट होती. लखनऊ लोकसभेसाठी 2009 मध्ये 5,84,051 इतके मतदान झाले होते ते वाढून 2014 मध्ये 10,33,833 इतके झाले. भाजपाला खात्री होती की वाढीव मतदान भाजपाला मिळणार आहे त्यामुळे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक मतदार-संघात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न झाला.

Narendra Modi and Amit Shah

हीच पद्धत उत्तरप्रदेश विधानसभेच्या वेळीसुद्धा कायम ठेवण्यात आली. उत्तरप्रदेशात एकूण 1.4 लाख इतके बूथ आहेत. प्रत्येक बूथ प्रमुखाशी अमित शहांनी पूर्ण निवडणूक काळात 4 वेळा संवाद साधला. यामधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला व निर्णय प्रक्रियेत आपल्याला सामावून घेतल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली. भाजपने लोकसभेनंतर प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करून ती जिंकण्याचा प्रयत्न केला. जिथे ते जिंकणे शक्य झाले नाही, तिथे अन्य मार्ग अवलंबण्यात आले. कधी राज्यपालपदाचा वापर करण्यात आला तर कधी विरोधी पक्षाची माणसेच फोडण्यात आली. गोव्यात काँग्रेसचे जास्त आमदार असतानासुद्धा तिथे भाजपने आपला मुख्यमंत्री बसवला, तेच मणिपूरमध्येही झाले. इतकी वर्षे पीडीपीला भाजपने विरोध केला पण शेवटी विधानसभा निकालानंतर त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. बिहारमध्ये संधी मिळताच नितीश कुमारांना आपल्या बाजूला करून भाजप बिहार सरकारमध्ये सामील झाले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते – मिळेल त्या मार्गाने सरकार स्थापन करा.

‘पंचायत ते संसद तक’ हा विचार घेऊन भाजप चाल करत आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा हा तसा चेष्टेचा विषय झाला होता. पण त्या रणनीतीमुळे काही ठिकाणी चमत्कारिक विजय मिळाले. मिस्ड कॉल देऊन सभासद व्हा, हादेखील वादग्रस्त उपक्रम ठरला. पण यामुळे एक झाले की भाजपकडे करोडो लोकांचे मोबाईल नंबर व माहिती जमा झाली. जिचा वापर ते निवडणुकीच्या काळात करू शकतात. हे सर्व करत असताना भाजप आपल्या पारंपरिक मतदारांना मात्र दुर्लक्षित नाहीये. तीन तलाक, अवैध कत्तलखाने, गंगेची सफाई हे भाजपच्या जिव्हाळ्याचे विषय. राम मंदिर सोडलं तर बाकी विषय भाजपने हाती घेतले त्यामुळे एकीकडे विकासकामे चालू ठेवायची तर दुसरीकडे आपल्या पारंपरिक मतदारांनासुद्धा खुश ठेवायचं अशी ही रणनीती आहे.

यासोबतच भाजपने राज्यांना तीन गटांत विभागले आहे. जी जुनी भाजपची राज्ये आहेत तिथे परत सत्ता मिळवणे, जिथे निवडून यायची संधी नाही पण विरोधी फुटू शकतात तिथे विरोधक फोडणे उदा. गोवा, मणिपूर, जिथे सत्ता शक्यच नाही तिथे प्रबळ विरोधक म्हणून समोर येणे उदा.पश्चिम बंगाल. आजच्यासारखे पक्षवाढीसाठीचे प्रयोग वाजपेयींच्या काळातसुद्धा झाले पण त्यांचे प्रयोग आक्रमक नव्हते आणि ते हिंदी भाषिक प्रदेशासाठी मर्यादित होते. पण अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढीसाठीचे केले जाणारे प्रयत्न अभूतपूर्व आहेत. अमित शहांनी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीची तयारी 2015 पासून सुरु केली होती, यावरून तयारीचा आवाका आपल्याला कळू शकेल.

भाजपा 1.0 आणि 2.0 मध्ये फरक आहे. तो रणनीतीचा फरक आहे, तो त्यांच्या मित्रपक्षांना वागवण्यातला, विरोधकांना देण्यात येणार्‍या वागणुकीतला फरक आहे. निवडणूक लढण्याच्या पद्धतीत फरक आहे. हा फरक कदाचित पूर्ण बहुमतामुळे आला असेल. पण हा फरक, मोदी शहांच्या ‘शत प्रतिशत’ या विचारामुळे सुद्धा आला आहे. सत्ता महत्वाची कारण सत्तेशिवाय पक्ष फार काळ तग धरू शकत नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे जिथे मिळेल तिथे भाजपला सत्तेत आणायचे असे प्रयत्न मोदी-शहा यांचे आहेत. हे सर्व भाजपाला कुठे घेऊन जाईल, हे माहिती नाही.

पण आजचा भाजप असा आहे. ज्याला विरोधी पक्षच नकोय, त्यामुळेच ‘चिमटे से भी छुना पसंद नहीं करुंगा’ हा विचार आता मागे पडला आहे. याला काही लोक लोकशाहीचा खून म्हणतील, काही जण काँग्रेसने सुद्धा हेच केलंय असं म्हणतील. जनतेने काय ते ठरावायाचे आहे. मोदींची लोकप्रियता नोटाबंदीसारख्या कटू निर्णयानंतरही फार कमी झालेली नाही. लोक मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देतात. ते मत पेटीतूनही दिसले आहे, कारण एक सत्य मान्य केले पाहिजे की, मोदी-शहा जोडीला ‘भारतीय मन’ कळलेले आहे.

(पूर्वप्रकाशित – अक्षर मैफल दिवाळी अंक २०१७)

लेखक – अभिषेक नामपल्लीवार

संपर्क – 8055243728