किंग ऑफ कोकेन : पाब्लो एस्कोबार – नार्कोस

नार्कोस - पाब्लो एस्कोबार

सत्तरीचे दशक जसे जसे संपत चालले होते तसे कोलंबियाच्या गळ्याभोवती तस्करांचा फास आवळत चालला होता. दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया तसा नैसर्गिक साधन संपत्तीने न्हाऊन निघालेला देश. पण ह्या देशाला जणू शाप लागला होता.

त्या काळात दारू, सिगरेट्स, गांजा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मौल्यवान रत्ने, सोने इत्यादी अनेक गोष्टींची तस्करी बिनबोभाट चालली होती. ह्या वस्तूंमध्ये क्वचित कोकेनसारख्या अत्यंत घातक आणि महागड्या अमली पदार्थाचा देखील समावेश होता. तस्करी करून धंदा चालवणारे अनेक लोक खोर्‍याने पैसा ओढत होते. आणि अवैध मार्गाने येणारा पैसा अर्थातच भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी सोबत घेऊन येतो. पैशाच्या हव्यासाने कोलंबियात अनेक जण तस्करीच्या वाटेला लागले होते. टोळ्या बनत होत्या. ह्या टोळ्या पैसे कमवत होत्या, लाच देत होत्या, खून पाडत होत्या. एकमेकांवर कुरघोडी करता करता अनेक गुंड लोक ‘एल पॅट्रॉन’ म्हणून उदयाला येत होते. कोलंबिया गुन्हेगारीत, भ्रष्टाचारात बरबटून गेला होता.

अशा अनेक तस्करांपैकी एक ‘तो’ देखील होता. पण इतर आणि त्याच्यात फरक होता. प्रचंड मोठा फरक होता. ही गोष्ट त्याची आहे. गुन्हेगारीच्या जगातला आजवरचा कदाचित सर्वात मोठा शेहेनशहा, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या नाकी नऊ आणणारा, संपूर्ण जगाला अमली पदार्थांच्या विषारी दरीत ढकलू पाहणारा, ‘द किंग ऑफ कोकेन’ – पाब्लो एमिलियो एस्कोबार गावीरिया!

कोलंबियाच्या मेडिईन शहरालगतच्या रिओनिग्रो नावाच्या खेड्यात पाब्लोचा जन्म झाला. शिक्षणात फारसा रस नसल्याने पाब्लोने कॉलेज अर्धवट सोडून दिलं आणि तो छोट्या मोठ्या स्वरूपाच्या गुन्हेगारीकडे वळला. पाब्लो आणि त्याचा भाऊ गुस्तावो कबरींवरचे दगड चोरत असत आणि त्यावरची नावे खोडून ती विकत असत. नंतर पाब्लो कार चोरायला लागला आणि ज्याची कार चोरली त्यालाच ती काही रक्कम घेऊन परत करायला लागला. वय वाढत गेलं तसा पाब्लो तस्करीच्या वाटेला लागला. अमेरिकन इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गांजा, सिगरेट्स, दारू वगैरे गोष्टींची तस्करी करून तो भरपूर पैसे कमवायला लागला. इतर तस्कर आणि पाब्लोमधला मुख्य फरक असा की पाब्लो पोलिस, कस्टम अधिकारी, सरकारी कर्मचारी वगैरे लोकांना भरपूर, अगदी वाट्टेल तेवढी लाच देत असे. पाब्लोच्या पैशाला चटावलेले अधिकारी पाब्लोचा माल कधीच पकडत नसत. क्वचित एखादा अधिकारी नडलाच तर पाब्लोची एकच रीत होती, प्लॉमो ऑर प्लाता म्हणजे पैसा की गोळी? पाब्लोसारख्या सराईत गुन्हेगाराच्या नादी कोणी लागावे म्हणून साहजिकच प्लॉमोची निवड होई आणि पाब्लोचं काम बिनबोभाट पार पडे!

खरा पाब्लो एस्कोबार
खरा पाब्लो एस्कोबार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले चिलीचे राष्ट्रपती ऑगस्तो पिनोशे कधी हुकूमशहा बनले ते खुद्द निक्सन ह्यांना देखील कळले नव्हते. त्याकाळी चिलीमध्ये कोका उत्पादन भरपूर प्रमाणात वाढले होते. त्याला आळा घालण्यासाठी पिनोशेने सरळ अवैध कोका उत्पादन करणार्‍या लोकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. शेकडो कोका उत्पादक आणि कामगार मारले गेले. पण एकजण त्यातून सुटून वाचून कोलंबियात पळून आला. मातीओ मरेनॉ! मरेनॉ उत्तम दर्जाचे कोकेन बनवण्यात निष्णात होता. कोलंबियात मेडिईनमध्ये आल्यानंतर त्याने पहिला पाब्लोला गाठला. एक किलो गांजाची तस्करी करून जितका पैसा कमावता येतो त्यापेक्षा दसपट जास्त पैसा केवळ काही ग्रॅम कोकेन विकल्याने उभा होऊ शकतो ही गोष्ट त्याने पाब्लोला समजावून सांगितली! मी कोकेन बनवतो तू ते कोलंबियामध्ये वितरित कर असा प्रस्ताव मरेनॉने पाब्लोला दिला. पाब्लोकडे जास्त पैसे कमावण्याची दूरदृष्टी होती. कोकेन कोलंबियासारख्या देशात विकण्यापेक्षा अमेरिकेच्या यामीसारख्या अतिश्रीमंत प्रांतात विकून कित्येक पट अधिक नफा मिळवता येईल हे पाब्लोला तत्क्षणी समजलं होतं!

कोकेन! जगातल्या अत्यंत घातक आणि महागड्या अमली पदार्थांपैकी सर्वात वरचा क्रमांक कोकेनचा. कोका नामक वनस्पतीच्या पानांपासून बनलेलं कोकेन मनुष्याच्या मेंदूवर आणि शरीरावर असे काही परिणाम करते की बस्स, सांगता सोय नाही. कोकेन ग्रहण करताच मनुष्याला अपिरिमित आनंदाची अनुभूती येते, उत्साह, धाडस क्षणात वाढते. हा परिणाम साधारण काही मिनिटे राहतो आणि मग त्या माणसाला पुन्हा कोकेन ग्रहण करण्याची तलब लागते! एकदा दोनदा कोकेन ग्रहण केल्यानंतर त्याच्या व्यसनातून मनुष्य बाहेर निघणे अतिशय अवघड आहे. मग हे महागडे द्रव्य मिळवण्यासाठी मनुष्य वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होतो.

आणि इथून पाब्लो एस्कोबारची, जगातल्या सर्वात मोठ्या ड्रग माफियाची गोष्ट सुरू होते….‘Narcos’!

सुरुवातीला पाब्लो पेरूमधून बटाटे आयात करण्याच्या नावाखाली कोका वनस्पतींची पेस्ट गाड्यांच्या, ट्रकच्या टायरमध्ये लपवून आणे. मग तीच्यापासून शुद्ध कोकेन निर्मिती करण्यासाठी त्याने स्वतःच्या घरातच प्रयोगशाळा निर्माण केली. तयार झालेलं 50 किलो कोकेन अमेरिकेत मायामीला पाठवण्याची व्यवस्था देखील केली. त्याकाळी अमेरिकन ड्रग्स इन्फोरसमेंटचं लक्ष फक्त आणि फक्त गांजवर असे. कोकेन त्यांच्या गावीसुद्धा नव्हतं. त्यामुळे पाब्लो बिंबोभाट कोकेनची तस्करी करायला लागला. हळू हळू पैशात लोळणार्‍या मायामीचे कोकेनशिवाय पान हलेना. कोकेन मुद्दालाच्या दसपट नफा मिळवून देत असल्याने पाब्लो झपाट्याने वाढत गेला. कोलंबियातुन अमेरिकेत निर्यात होणार्‍या जवळपास प्रत्येक वास्तूतुन कोकेन पाठवले जाऊ लागले. मासे, बूट, कपडे, मांस, औषधे…इतकेच काय तर जिवंत माणसांमधून देखील!

मग पाब्लोने कोलंबियाच्या जंगलांमधून स्वतःच्या अनेक प्रयोगशाळा उभ्या केल्या. रोज शेकडो किलो कोकेनवर तिथे प्रक्रिया केली जाई.

काहीच वर्षात पाब्लो इतका गडगंज श्रीमंत झाला की सांगता सोय नाही. पाब्लोचा धंदा पूर्ण भरात असताना त्याची संपत्ती 30 बिलिअन डॉलर्स, म्हणजे आजचे जवळपास 60-70 बिलिअन डॉलर्स इतकी होती. म्हणजे बिल गेट्सच्या जवळपास! तेंव्हा हा पैसा रोख रकमेच्या स्वरूपात असे. इतका पैसे ठेवायचा कुठे हा प्रश्न असल्याने पाब्लोने अर्थात तो गुंतवायला सुरुवात केली. अमेरिका आणि कोलंबिया मिळून पाब्लोचे तब्बल 800 बंगले होते. ठिकठिकाणी त्याने पैसा पुरून ठेवला होता. त्याच्या मेडिईनमधल्या मुख्य महालात तर त्याने प्राणीसंग्रहालयच सुरू केले होते. आफ्रिकेतून निरनिराळे महागडे प्राणी आणि पक्षी त्याने तिथे आणून ठेवले होते.

पाब्लोकडे इतका पैसा होता की त्याला दरमहा अडीच-तीन लाख रुपयांचे फक्त रबर बँड लागत असत. नोटांच्या गड्ड्या बांधायला. त्याचे सरासरी 2 बिलिअन डॉलर्स केवळ पावसाने, उंदरांनी कुरतडल्याने किंवा दुर्लक्ष झाल्याने गहाळ होत असत. एकदा पोलीस पाठलागावर असताना पाब्लो त्याच्या फारश्या वापरात नसलेल्या एका बंगल्यात लपला होता. पाब्लोच्या मुलीला थंडी वाजत होती. घरात जळण काहीच नव्हते. तेंव्हा पाब्लो मुलीला मांडीवर घेऊन शेकोटी करून बसला. जळण म्हणून त्याने काय वापरले असेल तर डॉलर्स! त्या रात्री पाब्लोने 2 मिलियन डॉलर्स आगीत फुंकून टाकले! का? तर मुलीला ऊब मिळावी म्हणून.

त्याचे एवढे श्रीमंत असण्याचे कारण म्हणजे पूर्ण भरात असताना जगातले 80% कोकेन पाब्लोच्या टोळीकडून पुरवले जात होते.

कोलंबियामध्ये पाब्लो एकटाच ड्रग लॉर्ड नव्हता. असे अनेक होते. मात्र पाब्लो त्या सर्वांपेक्षा सगळ्यात जास्त शक्तिशाली, श्रीमंत आणि हुशार होता. कोलंबियामधले हे ड्रग डीलर्स कायद्याला किंवा पोलिसांना अजिबात भीक घालत नसत. कारण लाच खाऊ घालून, भीती दाखवून त्यांनी कोलंबियाची संपूर्ण न्याय आणि कायदेव्यवस्था पोखरून काढली होती. हे लोक जेलमध्ये गेले तरी ऐशोआराम मिळेल अशी व्यवस्था आधीच केलेली असे. ह्या माफियाना एकाच गोष्टीची भीती होती. आणि ती भीती त्यांना एकमेकांशी मैत्री ठेवण्यात भाग पाडत असे. ती म्हणजे हस्तांतरण कायदा!

कोलंबियाचे असले तरी ह्या ड्रग माफियांची मुख्य कर्मभूमी अमेरिका होती. हे लोक अमेरिकेचे जास्त गुन्हेगार होते. अमेरिकन सरकार हरतर्‍हेने गुन्हेगारांच्या हस्तांतरणाविषयी कोलंबियाच्या सरकारकडे आग्रही होती. इकडे कोलंबियन सरकारवर ड्रग माफियांचा हा कायदा पास न होण्यासाठी दबाव होता. माफियांना माहित होतं की एकदा हा कायदा पास झाला की आयुष्यभर अमेरिकन जेलात सडत राहावे लागणार. त्यापेक्षा मेलेलं बरं आणि मरण्यापेक्षा मारलेलं बरं. म्हणून हे माफिया हस्तांतरण कायद्याविषयी सकारात्मक असणार्‍या प्रत्येक सरकारी माणसाचा खून पाडायला देखील मागेपुढे पाहत नसत!

खुद्द पाब्लोच्या गँगने शेकडो पोलीस, शे-दोनशे न्यायाधीश आणि वकील, कित्येक सरकारी अधिकारी आणि अनेक राजकारणी लोकांचे खून पाडले होते.

1989च्या निवडणुकीत कोलंबियाच्या राष्ट्रपतीपदाचे प्रमुख उमेदवार मानले जात असणार्‍या लुई कारलॉस गालानची अशीच हत्या करण्यात आली. ह्या हत्येमागचं कारण म्हणजे गलान ड्रग माफियाच्या हस्तांतरणाविषयी आक्रमक होते आणि हत्येचं पाप केलं पाब्लो एस्कॉबारने! ह्या हत्येनंतर मात्र पाब्लोवर फास अवळायला सुरुवात झाली होती.

हा फास इतका आवळला की पाब्लो आत्मसमर्पण करायला तयार झाला. पण त्याच्या अटींवर. ह्या अटी इतक्या गमतीशीर आहेत की आज आपण ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि ह्या अटी कोलंबिया सरकारने मान्य केल्या ह्यात पाब्लोची दहशत समजून येते!

अटी अशा की कोलंबिया सरकारने हस्तांतरण कायदा पास होऊ द्यायचा नाही. पाब्लो पाच वर्षे कोलंबियाच्या जेलमध्ये काढेल. जेल पाब्लोचे स्वतःचे असेल. जेलचे गार्डस आणि अधिकारी पाब्लोने स्वतः नेमलेले असतील. कोणीही पोलीस किंवा सरकारी अधिकारी त्या जेलच्या 5 किमी परिघात प्रवेश करणार नाही. कोणत्याही प्रकारचे विमान वा हेलिकॉप्टर जेलवरून उडत जाणार नाही!

आणि मग पाब्लोने बाहेरून जेलसारखा दिसणारा एक भव्य दिव्य महाल उभा केला आणि तो तिथे राहू लागला. जेवणासाठी जगभरातले प्रसिद्ध स्वैपाकी हजर करण्यात आले. उंची दारू आणि महागड्या पाहुण्या हजर झाल्या. जुगाराची व्यवस्था झाली.

पाब्लोचा तुरुंग दौरा एक क्रूर विनोद बनून राहिला.

पाब्लोचं पुढे काय झालं हे मात्र समजण्यासाठी मात्र नार्कोस बघितलं पाहिजे!

पाब्लोसारख्या माणसाची गोष्ट हुबेहूब उभी करण्यात ख्रिस ब्रँकतो आणि मंडळींना बर्‍यापैकी यश मिळाले आहे. सिरीज कुठेही थांबत किंवा रेंगाळत नाही.

सिरीजची सर्वात उजवी बाजू म्हणजे कास्टिंग! पाब्लोची भूमिका करणारा वॅगनर मौरा खरे म्हणजे ब्राझीलचा. मातृभाषा पोर्तुगीझ. स्पॅनिश भाषेचा एकही शब्द येत नसताना त्याने पाब्लो इतका सहज आणि हुबेहूब साकारला आहे की एस्कोबार म्हणताच खर्‍या पाब्लो एस्कोबार ऐवजी वॅगनरचा चेहरा डोळ्यांपुढे येतो. तितक्याच ताकदीचा पेद्रो पास्कल! गेम ऑफ थ्रोन्समध्ये रेड वायपरच्या भूमिकेत दिसलेला पेद्रो ह्यात हाविएर पेनया नामक कोलंबियन पोलिसाच्या भूमिकेत आहे.

सिरीज पाहताना जितका वॅगनर भावतो, तितकाच किंवा किंचित जास्तच आपल्याला पेद्रो भावून जातो.

सिरीजमधले लोकेशन्स, संवाद आणि एकंदरीत चित्रीकरण लाजवाब आहेत. कथेची लय कुठेच सुटलेली नाही. एक डॉन म्हणून जगाला माहीत असणारा पाब्लो एक मुलगा, भाऊ, मित्र, नवरा आणि बाप म्हणून नेमका कसा होता हे जेंव्हा उलगडत जाते तेंव्हा ह्या क्रूर माणसाविषयी देखील प्रसंगी कौतुक आणि कणव येऊ लागते. अर्थात ह्यात पाब्लोचे ग्लोरिफिकेशन कुठेही नाही.

नेटफ्लिक्स वर ही सिरीज दोन भागात उपलब्ध आहे. अर्थात 18 वर्षे वयोगटावरील लोकांच्यासाठी आहे. क्राईम थ्रिलर असल्याने पारिवारिक निश्चितच नाही.

तेच तेच सिनेमे आणि मालिका पाहून कंटाळा आला असेल. सुट्टी सार्थकी लावायची असेल किंवा तहान भूक विसरून तोंडात बोट घालण्याइतपत आश्चर्यचकित व्हायचे असेल तर नार्कोस नक्की पहा!

एल झार डे ला कोकाईना पाब्लो एस्कोबारला वाट पाहायला लावू नका!

© सुरज उदगीरकर