Maratha School of Thought ची गरज..

King Shivaji

[Image Source: Link]

भारतातील मराठ्यांचे राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य आले. यानंतर इंग्रजी राजसत्तेने इथल्या इतिहासाचा अभ्यास करून इतिहासावर भाष्यं केली. तत्कालीन काळात ग्रांट डफ वगैरेंचा इतिहास पाहता असे लक्षात येईल की, वरकरणी हा मराठ्यांचा इतिहास वाटत असला तरी तो मराठ्यांचा इतिहास इंग्रजी लोकांसाठी लिहिलेला आहे. याविषयी विस्तृतपणे इतिहासाचार्य राजवाड्यांनी लिहिले आहे. ‘मराठी लोकांत आपले पूर्वज दरवडेखोर, लुटारू, मागास होते वगैरे अशी भावना निर्माण करण्यात ब्रिटिश लोकांना फार मोठे यश मिळाले. तस्मात इथले समाजसुधारक इंग्रजांचे राज्य म्हणजे आपल्यावर देवाने केलेली कृपा या भावनेतून विचार करू लागले.’

या काळानंतर मात्र इतिहासाकडे बघायची आपली दृष्टी बदलत गेली. इतिहासाचार्यांनी साधारण 1890 च्या काळाचं वर्णन करताना म्हटलयं की, ‘गुरुंचा आदर नाही, राजकारण्यांचा कित्ता नाही, धर्माचें बंधन नाही’ हे शब्द होते पारतंत्र्यातल्या भारताबद्दलचे. यावेळी मराठीची अवस्था इतकी बिकट होती की, सुशिक्षित लोकं एकमेकांशी इंग्रजीतून बोलत, पत्र इंग्रजीतून लिहीत, नोकरीत खालच्या दर्जाच्या सेवकाशी बोलताना इंग्रजी मिश्रीत मराठी बोलत, पुस्तके इंग्रजीतून लिहीत, भाषणं इंग्रजीतून देत. ब्रिटिशांनी या देशात येऊन इथल्याच लोकांना त्यांचे पूर्वज कसे वाईट होते हे सांगितलं, स्वकीयांची अवस्था ही अशी होती.

याबद्दल साने गुरुजींनी लिहिलंय की, ‘याच पुणे शहरात इंग्रजांचे वकील हातरुमाल बांधून पेशव्या समोर सविनय जाऊन उभे राहत. याच पुण्यातील प्रतापी विरांनी अटकेपर्यंत अंमल बसविला. याच पुण्यातून हिंदुस्तानची सूत्रे खेळवली जात. परंतु काळाचा महिमा अतर्क्य! सातहजार मैलावरचे गोरे लोक आम्हांस गुलाम करुन राहिले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या शाळा-कॉलेजांतून त्यांनी लिहिलेली पुस्तके आम्ही पढत आहोत! आमचे लोक त्या रणरंगधीर पूर्वजांची पूज्य दिव्य स्मृतिही विसरुन गेले व त्यांस लुटारु, दरवडेखोर, खुनी, लबाड असली पाश्च्यात्यांनी दिलेली शेलकी विशेषणे खरी मानू लागले! हरहर! काय आमची दुर्दशा!’ या अशा अवस्थेतून पुढे मराठी इतिहास घडतं गेला आहे. इतिहास हा तीन प्रमुख गोष्टींनी सिद्ध होतो. श्री. कीर्तने, साने यांनी सप्रमाण इतिहास साधनं छापायला सुरुवात केली. या काव्येतिहासकारांनी फार सुंदर वाक्य 1878 मध्ये लिहीलंय, ‘आमची अशी शिफारस आहे की, प्रत्येक महाराष्ट्रीय जन म्हणविणार्याने… किंबहुना प्रत्येक हिंदू म्हणविणार्यानेही ह्या इतिहासाची प्रत आपले संग्रही ठेवावी. निदान एकबार ती कोठे मिळवून वाचण्याची तरी तसदी घ्यावी. असे केल्याने आमचे लोक म्हणजे गचाळ, वेडे, पौरुषहीन, अकल्पक असे जे आम्हापैकी पुष्कळांचे ग्रह झाले आहेत, ते जाऊन आपल्या लोकांच्या पराक्रमाविषयीं, बुद्दीविषयी, चातुर्याविषयी वगैरे तथ्य कळून योग्य अभिमान जागृत होईल.’ इतिहासाचार्यांनी पुढे त्याचा पाया घालून, इतिहास हा स्थळ, काळ, व्यक्ती ह्या तीन अंगांतूनच सप्रमाण लिहावा लागतो हे मांडले. तो सिद्ध झाला की त्यातून त्याचा अर्थ किंवा बोध घेऊन, राष्ट्रवादाच्या दृष्टीकोनातून तो समजावा लागतो, इतिहासाचे काम हे इतके मोठे आहे. आपल्या पूर्वजांनी राष्ट्रनिर्मिती केली, ती करताना केलेल्या चांगल्या गोष्टी, चांगले गुण यांचे स्मरण करतानाच, त्यांच्या हातून झालेल्या चुकांचे विवेचन होणे स्वाभाविक असते. ह्या गोष्टी समजण्यातूनच समाज पुढे जातो असतो. देश एकत्र येतो, पर्यायाने राष्ट्र एका चांगल्या टप्प्यावर जाऊ लागते.थोडक्यात मराठा इतिहास लिखाणाच्या वेळची ही सामाजिक पार्श्वभूमी आहे.

Historian Vishwanath Kashinath Rajwade
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
[Image Source: Link]
Datto Vaman Potdar
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
[Image Source: Link]

19 व्या शतकात इतिहासाचार्यांनी ‘New History Thought’ चा पाया भारतात मांडला. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाची व्याप्ती फार फार मोठी झाली. हा पाया म्हणजे इंग्रजी इतिहासकार हे ‘हिस्टरी इज पास्ट पॉलिटिक्स’ असे समजत, परंतु राजवाडेंसारख्या गुरुवर्यांनी याला फाटा देत इतिहासाला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशी अनेक अंगं असतात हे दाखवून दिले. इतिहासाला अनेक कंगोरे आले, पण जसे या पूर्वी पाहिल्या प्रमाणे मराठा इतिहास हा देशाला बांधील आहे, कारण मराठ्यांच्या कुळांचा इतिहास म्हणजेच देशाचा इतिहास, म्हणून मराठी इतिहासकारांनी राष्ट्रवाद प्रकर्षाने मांडला तो याच कारणासाठी. इतिहासाचार्यांनी इतिहास मंडळ स्थापन करताना मुद्दाम ‘भारत’ हे नाव निवडले, यांतच सारं आलं. याचं एक सहज उदाहरण द्यायचं म्हणजे स्वदेशी चळवळ. या काळात स्वदेशीची चळवळ सुरू झाली, परकीय मालावर बंदी घालावी अशी मोहीम सुरू झाली. आणि यात स्वदेशीचे पुरस्कर्ते आपल्या लेखण्या सज्ज करुन लिहीते झाले. तसाच हा स्वदेशीचा मंत्र इतिहासाचार्यांनी सिद्ध केला… त्याचे ऋषी होते, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, तो मंत्र असा – ‘स्वदेशी मंत्र – आपला न्याय आपला आपण करुन घेणे, हे स्वदेशीचे बीज आहे. व्यापाराच्या उन्नत्यर्थ देशातील सर्व धर्मांच्या, भाषांच्या, वंशांच्या व पेशाच्या कायमच्या रहिवाशांनी एकजुटीने झटले पाहिजे, हे ह्या मंत्राचे कीलक आहे. सुयंत्र संधिकरण ह्या मंत्राची शक्ती होय. जुलूम परिहारार्थ, स्वदेश या त्र्यक्षरी मंत्राचा सततोच्चार करणे हा जप समजला आहे. ह्या मंत्राचा व्यापारस्वातंत्र्य हा छंद आहे. देशभक्ती ही मंत्रदेवता समजतात आणि शिवाजी हा ह्या मंत्राचा ऋषी कल्पितात. ह्या मंत्रात प्रतिनिधिसत्ताक सुंदर राज्यपद्धतीचे ध्यान करावयाचे असते. आणि बहिष्कारयोगाने समाधी लावावयाची असते. असा हा त्र्यक्षरी मंत्र आहे.’

आत्ताच्या पिढीला स्वदेशी, परदेशीची ही साधारण 100 वर्षापूर्वीची कळकळ लक्षातही येणार नाही कदाचित. आणि स्पष्टभाषेत सांगायचं तर बहिस्थ वातावरण बदलल्यानंतर ह्याचा विशेष संदर्भही नाही. पण यात एक गोष्ट लक्षात येते की शिवाजी राजाला इतिहासाचार्यांनी स्वदेशी ह्या त्र्यक्षरी मंत्राचा ऋषी केला आहे. यातच शिवाजी महाराजांचे महत्व कळते, पण त्याचा वापर इतिहासाचार्यांनी देशभक्तीसाठी करताना इतिहास हा देशासाठीच असतो हे दाखवून दिलंय. लोकांना प्रेरणा देऊन उच्चप्रतिच्या देशभक्तीसाठी उद्युक्त करणे हा मुख्य हेतू आहे. थोडक्यात मराठा इतिहासाची मांडणी आणि त्याचा राष्ट्राकडे पाहायचा दृष्टिकोन हा असा आहे. मात्र या दृष्टिकोनाला अभ्यासाचा पाया आहे.

इतिहास लेखन कसे करावे, का करावे, इतिहास लेखनाच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या? वगैरे अनेक निकषातून हे निष्कर्ष काढले गेलेले आहेत. त्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. थोडक्यात स्वातंत्र्यापूर्वी इतिहासाचा अभ्यास राष्ट्राच्या गतकालीन स्वरूपाविषयी माहिती मिळवण्यासाठी केला गेला. यात कुठेही काहीही अपारदर्शक राहिलेले नाही. जे वाद, निकष आहेत हे डोळ्यासमोर स्वच्छ आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे चित्र मात्र झपाट्याने बदलत गेलं. उत्तरेतून मोठा प्रवाह इतिहास लिखाणासाठी पुढे सरसावला. तो मनाशी काही हेतू घेऊन आला. मुघल इतिहास लिखाणाला एक वेगळं वलय प्राप्त झालं. मग जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो किंवा अलिगढ मुस्लीम विद्यापीठ असो. यात मुघल इतिहास हाच भारताचा इतिहास हे ठासवून सांगण्यात आलं. अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहीले गेले. शेकडो झह.व. मुघल इतिहासात केल्या गेल्या. यात गैर काही नव्हतं. परंतु यात छुपा हेतू होता आणि तो म्हणजे मुघलांचं उदात्तीकरण. मुघलांमुळे देश राहीला इथपासून ते ब्रिटीशांनी सत्ता ही मराठ्यांकडून न घेता ती मुघलांकडून घेतली इथपर्यंत. थोडक्यात मराठा इतिहास हा जाणीवपूर्वक डावलला गेला. मुघल इतिहासकारांनी इतिहासातून धर्म सोयीस्कर वगळला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्थानिक नेतृत्व करणारा राजा इथंपर्यंत दावे केले गेले. तर स्वत:ला मार्कसिस्ट म्हणवत हवा तसा इतिहास लिहिण्याची सोय निर्माण झाली. जिझीयामुळे कर-प्रणाली बरोबर खेड्यातली अर्थव्यवस्था कशी सुरळीत झाली, यावरही चर्चा केली गेली. जुन्या कागदात ‘देल्ही’ आहे म्हणून मी दिल्ली म्हणणार नाही तर देल्हीच म्हणणार हा हट्ट दिसू लागला! मराठी कागदपत्रांचा म्हणजे मोडीचा गंधही नसणारी ही मंडळी मराठा इतिहासावर भाष्य करु लागली. याचे सहज सुचलेले एक उदाहरण देतो. पानिपतनंतर मराठे संपले असा एक सूर दिसतो. परंतु अनेक अभ्यासू लोकं सुद्धा असा निष्कर्ष काढतात तेव्हा याचं आश्चर्य वाटत. कारण 14 जानेवारी 1761 ला झालेलं पानिपतचं युद्ध मराठे हरले. त्यात प्रचंड वित्तहानी, प्राणहानी झाली. मराठ्यांचा तो मोठा पराभव होता असे अनेक जण हिरीरीने सांगतात. वस्तुत: या युद्धामुळे मराठ्यांच्या राज्यात कोणतेही सामाजिक, आर्थिक, धार्मिक फरक पडले नाहीत. उलट अब्दालीने मराठ्यांचा दिल्ली राखायचा अधिकार कायम ठेवला. नजिब खानाचे महत्व वाढले हाच काय तो मोठा राजकीय परिणाम. पुढे मराठ्यांनी दिल्ली पुन्हा जिंकून घेतली. पानिपतची ही इतिश्री. परंतु जेव्हा 1818 ला आपण येतो, इंग्रजांनी राज्य ताब्यात घेतानाची परिस्थिती पाहतो तेव्हा पानिपतच्या युद्धाची तुलना करता तितकी वित्तहानी, प्राणहानी झालेली दिसत नाही, पण सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल मात्र झाले. मराठ्यांचे अस्तित्व ब्रिटिशांमुळे संपले. मग मला सांगा कोणते युद्ध जास्त भयंकर होते? हे मान्य केल्यास ब्रिटिशांची चतुरनीती लक्षात येईल. ब्रिटिश मागे जातात तेव्हा मात्र ती यशस्वी माघार असते आणि आणि दुसरे बाजिराव मात्र पळपुटे असतात, मराठे हे कायमच लुटेरे असतात!! आज इतिहासाकडे बघताना निव्वळ हा दृष्टीकोन महत्वाचा नाही का? हा विषय असा घेतला जाऊ शकतो परंतु प्रस्तुत प्रसंगी ही संकल्पना ही प्रतिक्रियात्मक नसून, ती पुढे जाणारी आहे. कोणत्याही समाजाला प्रगती प्राप्तीसाठी नीतिमत्ता, संपन्नता, बुद्धिमत्ता याची गरज असते आणि या गरजेच्या पूर्तीसाठी समाजात सूत्रबद्ध यंत्रणा आणि चार हात करण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. हा जुनाच नियम नव्याने बघण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. इथे कोणाचाही द्वेष अपेक्षित नाही परंतु संदर्भासहित विचार करण्याची गरज मात्र जरूर आहे. ज्या भारतीय हिस्ट्री काँग्रेसची स्थापनेसाठी या मातीतल्या महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी पुढाकार घेतला, त्या मातीतले इतिहासकार आज हिस्ट्री काँग्रेसला पोरके झाले.

मराठ्यांचा इतिहास हा स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास आहे. नागरीकीकरणाचा इतिहास आहे. ही वस्तुस्थिती असतानाही मराठी इतिहास मात्र जगभर पोहोचलाच नाही. जगभरात कशाला मुघल इतिहासकारांसमोरही टिकला नाही. ही वस्तुस्थिती मान्य करायला मनाला फार त्रास होतो! याची कारणमीमांसा वर केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासाचा वापर फक्त हिंदुत्वासाठी केला जातो, मुळात महाराष्ट्रधर्माचं काम हे धर्मस्थापनाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रधर्म हा अगदी हिंदूधर्मापेक्षा श्रेष्ठ ठरतो कारण यात नेतृत्व स्वीकारण्याची अट असते. त्यामुळे महाराष्ट्रधर्म बाजूला ठेवून केवळ हिंदुत्वाचे गोडवे गाणे योग्य नाही. झोपलेल्या हिंदूंना जागं करायला महाराष्ट्रधर्म उपकारक ठरतो. यामुळे मराठा इतिहास हा फक्त आणि फक्त धर्माचा इतिहास नाही. मुघल इतिहास हा राजकारणाचा आणि धर्माचा इतिहास आहे. मुघल राज्य हे लष्करी राज्य होतं. ही ठळक वैशिष्ट्ये असतानाही मुघल राज्य कसे श्रेष्ठ याबाबत अनेकदा लिहीलं गेलं. पाश्चात्य देशात इतिहास म्हणजे राजकारण अशी आचरट कल्पना होती. तसच मुघल इतिहास हा ‘धर्म आणि राजकारण’ याभोवती फिरतो आहे.

मराठी इतिहासाचे तसे नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाची अनेक उदाहरणे देता येतील. मराठी राज्य मुलकी राज्यही होतं, बहिस्थपणे सैनिक वापरुन अंतस्थपणे रयतेची काळजी घेणे हा उद्योग मराठी
माणसाने 1657 पासुन ते 1796 पर्यंत अहोरात्र चालवला आहे. हे असतानाही मराठी इतिहासास ‘धार्मिक इतिहास’ हा शिक्का मारुन घेण्यास आपली सुरू असलेली धडपड म्हणजे स्वत:च्या चितेची लाकडे स्वत:चं रचण्याचे काम आहे. मुघल इतिहासकारांनी मात्र त्यांच्या धार्मिक इतिहासातला ‘धर्म’ बाजूला ठेवून बाकीचा इतिहास जगासामोर मांडला. मुघल इतिहासकारांची ही चलाखी उत्तमरीतीने चालली असून, मुघलांचे राज्य म्हणजे काही तरी एक श्रेष्ठ राज्य होते अशी भावना या देशातल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठात रुढ आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

दुर्दैवाने याच वेळी मराठा इतिहास हा जातीयतेत अडकला. छत्रपतींचा इतिहास हा 18 व्या शतकातल्या इतिहासापेक्षा वेगळा नव्हे, नव्हे तर तो आमचा इतिहास नव्हे किंवा आम्हांला कमीपणा देणारा इतिहास अशी भूमिका पुढे आली. आम्हांवर शिवाजी कसे श्रेष्ठ आहेत, हे इथल्याच लोकांना सांगायची वेळ, यावी हे दुर्दैव. हल्ली राजकारणासाठी इतिहासाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याने समाजाची दिशाभूल तर होतेच आहे, परंतु आपला वारसा सुद्धा त्याने नष्ट करण्याचे काम सुरु आहे. बरे ह्यात अतिशय स्वार्थी, ढोंगी लोकं ह्या उद्योगास लागली असून यामुळे मराठी इतिहासकारांची ताकद ह्या नको त्या गोष्टींना तोंड देण्यात फुकट जात आहे. ही ताकद उत्तरेत किंवा जागतिक दर्जावर इतिहास सिद्ध करायला वापरायला हवी. ह्या सांप्रत स्थितीमुळे दुसरा तोटा असा झाला आहे की,

इतिहासात भावनेला स्थान निर्माण झालं आहे, त्यामुळे वरच्या स्वार्थी, ढोंगी लोकांच्या क्रियेला, प्रतिक्रिया द्यायला धन्यता मानतानाच, प्रतिक्रिया देणार्यांचीही अवस्था तशीच होऊ लागली आहे. त्यामुळे शिवाजीस अरे-तुरे असे संबोधले की त्याचा अपमान होतो अशा भावना निर्माण होऊ लागल्या आहेत.

औरंगजेबास अरे-तुरे परंतु शिवाजीस अहो जाहो, असा विचित्रपणा इथे दिसतो. त्याचा परिणाम असा आहे की, मुघल इतिहासकार म्हणतात,
मराठ्यांचा इतिहास पक्षपाती आहे, हा चुकीचा प्रचार आपणच सिद्ध करत आहोत. ज्यांना इतिहासातला ‘इ’ सुद्धा माहीत नाही अशी लोकं इतिहासतज्ज्ञ म्हणवून घेऊ लागली. आजकाल तर मुघल इतिहासकारांचं काम आपणचं पूर्ण
करतोय, असो! यातून जोवर बाहेर पडणार नाही तोवर हे असेच चालू राहणार, कदाचित अजून 50 वर्षांनी देशातल्या इतिहासातलं मराठ्यांचं अस्तित्व संपलही असेल. मुघल इतिहासकार यशस्वी का झाले? एक : इंग्रजीतून लिहीतात, दोन : त्यांना कायम राजाश्रय मिळत गेला, तीन : ते कायम एकत्र आहेत, चार : ते प्रचंड अभ्यास करतात (आणि मग खोटं बोलतात!) अभ्यास करुन खोटं बोलणं आणि अभ्यास न करता खोटं बोलणं यात खूप फरक आहे. मराठा इतिहासात असं दिसत नाही कारण मराठा इतिहासकारांना मोडी बरोबर फारसीचेही उत्तम ज्ञान होते म्हणा अथवा आहे. मराठी इतिहासात तळागाळातली कागदपत्र छापली गेली आहेत. मराठी इतिहासात कागदपत्रांच्या परिक्षणावर खूप साहित्य लिहिले गेले आहे. तर इतिहासातल्या शंका स्थानांवरही बरंच लिहीलं गेलं आहे. तर साधन चिकित्सेचा पायाही घातला गेला आहे. हे इतकं असतानाही आपण आज महाराष्ट्राच्या बाहेर इतिहास नेऊ शकतं नाही. समोर खूप खूप मोठी आव्हानं आहेत पण ती जोवर पार करतं नाही तोवर यश नाही.

यासाठी Maratha School Of Thought अशी एक परंपरा तयार होत नाही तोवर काही खरे नाही. म्हणून यासाठी त्याची गरज आहे. Maratha School of Thought म्हणजे काही वेगळे नाही, तर ‘राष्ट्रासाठी इतिहास’ असा मानणारा एक विचार आहे. राष्ट्र म्हणजे परमार्थ आणि राष्ट्राचे हित हे पारमार्थिक जीवन हे सूत्र असलेला विचार आहे. स्वातंत्र्यानंतर आज देशासाठी जगायची उर्मी बाळगत देशविचार करणारी ही एक वृत्ती आहे. उत्तम नागरिक बनून देशकर्तव्य करणारी ही एक विचारशक्ती आहे. अगदी थोडक्यात आधुनिक भारतातला हा ‘महाराष्ट्रधर्म’ आहे. प्रसंगी मराठा म्हणजे कोठे जातीयवाचक किंवा वंशवाचक शब्द नसून, मराठी लोकांचे राज्य किंवा हिंदवी स्वराज्यात सहभागी झालेल्या लोकांचे राज्य असा आहे.

कदाचित आज हसतीलही लोकं पण उद्या यश नक्की मिळेल. आज काही चांगल पेरलं, तर उद्या कधीतरी नक्की चांगलंच उगवेल.

कारण आम्ही गनिम लोक तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत.

संपर्क – rajukarlekar@gmail.com

या लेखाचे लेखक शिवराम सिताराम कार्लेकर यांचे ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून विकत घेऊ शकता!!