मध्य लटपटीतली वेब सिरीज

मध्य लटपटीतली वेब सिरीज

वेब सिरीज प्रकार आता काही नवा राहीला नाही आपल्याला. यात इंग्लिश, हिंदी सोबतच मराठीमध्येही उत्तम निर्मिती होत आहे. अगदी एखादा 10-12 मिनिटांचा भाग ते थेट वर्षभर चालणार्‍या अनेक सिझन्स असलेल्या वेब सिरीजही बनत आहेत. यांचा दर्शक मुख्यत्वे 12 ते 30 वयोगटातला गृहीत धरुन त्यांना आवडेल/रुचेल/पटेल असाच मसुदा ठरत असावा. विषय हलका फुलका, गंभीर, सामाजिक, राजकीय किंवा रोमँटीक असला तरी तो आपल्याला इच्छित तरुण दर्शकांना आकर्षित करेल याच उद्देशाने मांडला जातो बरेचदा. तर मग तिशीच्या पुढच्या किंवा ढोबळ मानाने ‘mid age’ – मध्य वयीन लोकांचा यात कलाकार/व्यक्तिरेखा म्हणून, दर्शक म्हणून किंवा निर्माता/दिग्दर्शक/लेखक म्हणून कसा सहभाग असतो हे बघणं मला फार कुतूहलाचं वाटलं.

या सगळ्या उहापोहात इंग्लिश वेब सिरीजचे संदर्भ विचारत घेतले नाहीत. याचं मुख्य कारण त्यांच्या आणि आपणा भारतीयांच्या भौगोलिक, कौटुंबिक, सामाजिक अशा सगळ्याच बाबतीत असलेले फरक. यामुळे त्यांचे आणि आपले Middle age crisis ही निराळे. कदाचित त्यांचा आणि आपला टार्गेट ऑडियन्सही निराळा नि मध्यवयाची व्याख्याही निराळी. यात राजकीय सिरीज किंवा वर्तमानात घडत नसलेल्या सिरीजही विचारात घेतल्या नाहीत. इतक्या निवडक आणि त्रोटक सिरीज बघून त्यावर एकाच व्यक्तीच्या आकलनातून काही ठाम मत मांडणं तसं चुकीचंच. पण झालेलं आकलन नोंदवून न ठेवणंही बरोबर नाहीच. तर हा लेख त्रोटक किंवा पुर्‍या माहितीवर बेतलेला वाटला तर ती माझी आकलन व लेखन मर्यादा. पण अशीच काही निरीक्षणं तुम्ही नोंदवली असतील, त्यावरून काही मतं बनवली असतील तर चर्चा घडण्यासाठी एक खिडकी किलकिली होईल.

ज्या काही मराठी, हिंदी वेब सिरीज मी बघितल्या किंवा त्याबद्दल वाचलं त्यात एकुणात असं जाणवलं की मध्यवर्ती व्यक्तीरेखा ही एकतर टीनेजर असते किंवा नुकतेच कमवायला लागलेली मंडळी किंवा मध्यमवर्गीय जोडपी किंवा लग्नाच्या पहिल्या 5 वर्षांच्या टप्प्या मधली मंडळी. याहून वयाने मोठया व्यक्तीरेखा या मध्यवर्ती नाही आढळल्या. (अर्थात हाच निष्कर्ष कमी अधिक प्रमाणात, एकंदरीत सगळ्याच मनोरंजन माध्यमांना लागू होईल.) ज्या काही अशा मध्यवयीन व्यक्तिरेखा आहेत त्या आई-वडील, सासू-सासरे, शेजारी, ऑफिस मधला साहेब/साहेबिण या भूमिकेत दिसतात. यांचा सहभाग एखाद्या भागा पुरता किंवा अगदी पाहुणी व्यक्तिरेखा असा वाटला.

अर्थात याला ‘What the Folks’ सारख्या family series अपवाद. या सिरीजच्या पहिला सिझनमधे जावई, सासू, सासरे आणि मेव्हणी अशी नाती दिसतात. इतकच नाही तर ही गोष्ट घडतेही सासू-सासर्‍यांच्या शहरात आणि पर्यायाने घरात. ही सिरीज मला बरीचशी आजची वाटली. स्टार्टअप च्या धडपडीत नवरा, वयाने मोठी बायको, कूल मेव्हणी, जिजू-सालीची सहज केमीस्ट्री, सुरवातीला अवघडलेले पण नंतर जावयाशी मस्त रॅपो जुळलेले सासू सासरे आणि यांच्यात अधे मधे येणारी पण सतत video call ने connect असलेली बायको. सगळे episodes अर्थातच हलके फुलके तरी सलग बघावे वाटतील असेच आहेत.

अनिता आणि निखीलच्या लग्नाला जेमतेम वर्ष होतंय. निखील अनिता पेक्षा दोन वर्ष लहान आहे. अनिता एका मस्त कॉर्पोरेट कम्पनीत उत्तम जम बसवललेली तिशीतली तरुणी. घरी दोघा बहिणींतली मोठी. निखील उत्तम शिक्षण घेतलेला, मोठ मोठ्या नोकर्‍या मिळत असुनही स्वतःच्या मित्रा सोबत ‘स्टार्ट अप’च्या खटपटीत असलेला. हे दोघे दिल्लीत रहात आहेत. काही कामासाठी निखीलचं मुंबईत येणं होतं. मुंबईत निखीलची सासुरवाडी, शर्मा परिवार नामक मॅड हाऊस आपल्या जावयाच्या स्वागतासाठी सज्ज होतं! दीपिका अमीन आणि विपीन शर्मा या तशा ओळखीच्या चेहर्‍यांनी शर्मा दाम्पत्य अगदी मस्त रंगवलं आहे. काही दिवस रुळल्यावर एका प्रसंगा नंतर निखील uncle, aunty सोडून माँ-पापा म्हणायला सुरुवात करतो. या प्रसंगात काही भडक संगीत किंवा चटपटीत संवाद न ठेवता दोघेही जो सुखावल्याचा अभिनय करतात तो लाजवाब आहे. आपल्या आईवडिलांच्या अति प्रेमळ आग्रहापासून आपल्या जीजूची सुटका करणारी मेव्हणी, अक्षीता हे पात्र लक्षात राहतं. या सगळ्या अवघडलेपणात जरा गोष्टी सुरळीत होतात तोवर अनिता आपल्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी घरी येते. पार्टीमध्ये बरेच पुढच्या पिढीतले लोक दिसतात. शेरेबाजी करणारे, हक्क गाजवणारे, हवेसे-नकोसे, पुरता गोंधळ- गप्पा गडबड. पार्टी संपते, तशी अनिता पुन्हा दिल्लीला रवाना होते. निखीलशी फोनवर बोलताना तिला आपल्या वडिलांनी सगळ्यांदेखत जावयाचे अति कौतुक करणे, आईने निखीलचे वय जास्त सांगणे वगैरे तशा बारीक सारीक पण तिला खटकलेल्या गोष्टी उलगडतात. मग आईवडील आणि मुलीचे व्हिडियोेकॉल वर यथासांग भांडणही होते. समाजाला किंवा नातेवाईकांना घाबरून न वागण्याचे ज्ञानामृत पाजणे, यात जावयाने सासू सासर्‍यांची बाजू घेणे इत्यादी नेहमीच्या घटना घडतात. जावयाचा मानपान, बाडबिस्त ठेवण्यात आधी होणारी कसरत, मग काही नकोशा प्रसंगावरून जुळत गेलेली मनं, अवघडले पण कमी होऊन प्रेमळ दटावणी, जुने हिशोब चुकते करणं, मनातल्या डाचण्या स्वछ बोलून दाखवणं हा हॅपी एंडिंग वाला संपूर्ण ग्राफ उत्तम साधला आहे.

दुसरा सिझन घडतो अनिता-निखीलच्या नव्या घरी.आता निखील आणि अनिता मुंबईला शिफ्ट झाले आहेत. यात सुन-सासू-सासरे-नणंद ही नाती उलगडतानाच भाऊ-बहिण, जेष्ठ नागरिक नवरा बायको हे पदरही जोडले आहेत. तर निखीलचे आई वडील वंदू आणि किरन सोलंकी (आपली रेणुका शहाणे आणि शिशिर शर्मा) हे डेहराडूनवरून मुंबईला सुट्टीसाठी आले आहेत. तिथून कोणा काकांच्या ऐंशीव्या वाढदिवसासाठी सगळे कुटुंब अलिबागला जाणार असते. सुरवातीच्या काही भागात सासू सुने मधलं अवघडलेपण जात उत्तम संवाद साधला जातो. या स्थित्यंतरासाठी चक्क सासू पुढाकार घेते. रेणुका शहाणे आपली आधीच ओळखीची असल्याने उगाच अजून आवडायला लागते. पुढे निखीलच्या मोठ्या बहिणीच अचानक येणं. तिच्यात आणि तिच्या ‘ख्रिश्चन’ नवर्‍यात आलबेल नाही याची कुणकुण प्रत्येकाला लागणं, असे बारीक सारीक ट्विस्ट कथेत येत राहतात. पुढे अलिबागच्या कार्यक्रमात मात्र कानगोष्टी सारखी ही कुणकुण येवढ्याची येऽऽऽऽऽऽऽवढी होत जाते. सगळ्या ओळखी पाळखीच्या नातेवाईकांत ऐन केक कापायच्या वेळी ‘ध चा मा’ करून गौप्य स्फोट होतो. सोलंकी कुटूंब हा कार्यक्रम तसाच सोडून घरी परत येतं. भाऊ- बहीण, बाप-मुलगी संबंध ताणतातच नवरा-बायको ही वाद घालतात. पुन्हा हा गुंता सोडवायला ‘नायक- नायिकेला’ संधी न देता किरन सोलंकीला हा मान मिळतो. अगदी सहज अभिनयात सोपा धडा हा बाप पोरांना शिकवून जातो. नातं प्रेमाचं नसतच कायम. माणसं बदलत राहतात. प्रेम असो नसो, आदर हवा.

चकचकीत मांडणी, चटकदार संवाद, आपल्यातलेच वाटतील असे चेहरे या सगळ्यासाठी पूर्ण सिरीज लक्षात राहते. आता यातल्या मध्यवयीन व्यक्तिरेखांना उत्तम screen time मिळाला आहे. या लक्षातही राहतात. पण कुठेतरी आपण सतत तुलना करत राहतो की आपले आई बाप किंवा सासू सासरे असे वागले असते का किंवा उद्या आपण इतके ‘cool parents’ असू का?

मराठीमध्ये ही बर्‍याच वेब सिरीज तयार होत आहेत. माझ्या पाहण्यात आलेले भडिपाचे काही भाग किंवा Reverb कट्टाची Moving Out सिरीज यातही मध्यवयीन पात्र लक्षात राहतात. भाडीपाचे बबू, अनी, जुई जेवढे लक्षात राहतात त्याहूनही ‘शास्त्र असतं ते’ म्हणणारी आई म्हणजेच रेणुका दफ्तरदार जास्त लक्षात राहते. अगदी ‘आई next door वाटेल अशी सतत ओरडणारी आईमध्येच GoT बघणारी cool आई होते. मराठी पालक तसे एरवीच असहिष्णू असतात; तर या वेब जगतात त्यांना अति कूल, ओपन minded वगैरे दाखवण्यावरही कदाचीत लेखक-निर्मात्यांना आपल्या पालकांची भिती वाटत असावी. (हो माझी आई वाचणारच आहे हा लेख).

Moving out मध्ये रेवा-सत्याची गोष्ट आहे. रेवा उत्तम कॉर्पोरेट जॉब असलेली, स्वतंत्र विचाराची मुलगी. घरी लहान भाऊ, आई आणि बाबा असे चौकोनी सुखवस्तू कुटुंब. पण सततच्या ‘कांदे-पोहे’ कार्यक्रमाला रेवा कंटाळते. आईवडीलांसोबत न राहता त्याच शहरात एकटी रहायचा निर्णय घेते. यातले पालक लेकीचं एकटं राहणं आणि मग श्रर्ळींश-ळपमध्ये राहणं, त्यातनं पुन्हा ब्रेकअप होणं हे आधी वैतागत, चिडत मग स्विकारतात शेवटी. पण या भूमिकांना फारसा वाव मिळाला असं वाटत नाही. यातल्या दुसर्‍या सिझनमध्ये मात्र typical पालक category न बसणारं, धड तरुण उत्साह आणि मध्यवयीन स्थैर्य यांचा सुवर्णमध्य असेल असं भारी पात्र येतं. सत्या-रेवाचा ब्रेकअप झाला असतो. दोघेही पुन्हा आपापल्या वाटेनी गेले तरी घट्ट मित्र असतात. एकमेकांना नवा जोडीदार शोधण्यात सल्ला मसलत करत असतात. आणि मग सत्याच्या आयुष्यात देविकाची ‘एंट्री’ होते. देविकाला एक मुलगी असते, नवरा अपघातात दगावला असतो. अत्यंत ‘headstrong’, आकर्षक अशी मध्यवयीन उंबरठ्यावर असलेली उद्योजिका, आई आणि प्रेयसी ‘गिरीजा ओक’ हिने कमाल उभी केली आहे.

अशीच एक नातेवाईक नसलेली तरिही मध्यवयीन वयक्तिरेखा- वत्सला Adulting Season-2 या Dice Media च्या सिरीज मधे दिसली. यात रे(Ray) आणि निखत या दोन नुकतीच नौकरी लागलेल्या मैत्रिणी आणि Flatmates ची गोष्ट सांगितली आहे. एका मोठ्या कंपनीत ज्युनियर आरकिटेक्ट असलेल्या रेची बॉस -वत्सला. रे साठी आधी रोल मॉडेल असलेली वत्सला, मग रे ला अजिबात भाव न देणारी वत्सला, रे ने वैतागून सगळ्यां समोर उणे दुणे काढून सुद्धा न भांबावलेली वत्सला, रे च्या काही आऊट ऑफ बॉक्स कल्पना एकदाच्या पसंत पडल्यावर त्या क्लायंटला पटवून देणारी वत्सला, रे ला तिचं due क्रेडिट देणारी बॉस आणि रे सारखीच स्वतःही पॉटर हेड उर्फ हॅरी पॉटर भक्त वत्सला अशा एकाच व्यक्तिरेखेच्या वेग वेगळ्या शेड्स अगदी कमी स्क्रीनटाइममध्ये सारिका सिंगने रंगवल्या आहेत.

वर सविस्तर लिहिलेल्या वेब सिरीज सारख्याच Little things, Minus one, Tripling, वगैरे सिरीजमध्येही एखाद दुसर्‍या भागात ही मध्यमवयीन मंडळी आपल्या मध्यमवर्गीय समस्या बाजूला ठेऊन आपल्या young brigade चे आर्थिक, लैंगिक प्रश्न सोडवायला किंवा एखादा आत्मसाक्षात्काराचा क्षण निर्माण करायला येतात.

एकंदरीत आपल्या भारतीय आणि त्यातही मी पाहिलेल्या हिंदी-मराठी वेबसिरीजमध्ये लक्षात राहील अशी मध्यवयीन वयक्तिरेखा दिसली ती मध्यवर्ती भुमिकेतील व्यक्तिरेखेची कोणती ना कोणती नातेवाईक म्हणूनच. मुलींसोबत डिस्कोला जाऊन drinking company देणारी आई, स्वतःचं सेक्स लाईफ जावया सोबत शेअर करणारा सासरा, सुनेसोबत स्वतःच्या विहीणबाईं कडून व्हिडियो कॉलवर रेसिपी शिकून शिरा बनवणारा सासरा, सुनेला let it से शिकवणारी सासू, मेव्हणी सोबत सिगरेट पिणारा करणारा जीजा, कोणती शिवी भारी, कोणती नाहे याची चर्चा करणारं कुटूंब, हे आणि असे पालक आपल्या भोवती अपवादाने असतीलही पण सरसकट किंवा प्रातिनिधिक म्हणता येईल असे हे चित्र नक्कीच नाही. मग काय कारण असेल मध्यवयातले characters किंवा व्यक्तिरेखा, थोडक्यात मागची पिढी इतकी cool, acceptance असलेली चित्रीत करण्यामागे? उत्तर सोप्पं आहे. Its entertainment, but end of the day its Business. मागणी तसा पुरवठा! आपले आई बाप किंवा इतर मोठे लोक आपल्याला हवे तसे तयार करता आले असते तर?

पूर्वी नाही का पंचतंत्र, ईसापनिती किंवा अगदीच आपल्या रामायण, महाभारतातल्या गोष्टी लिहीताना एक प्रकारचे संस्कार रुजवले जायचे. कसे असा, कसे वागा, वाड-वडलांचा आदर करा, वगैरे वगैरे. गोष्टी आडून केलेलं social, emotional, moral conditioning च ते. मला उगाचच वाटतं की ते साहित्य लिहीणारे, त्याचा प्रसार-प्रचार करणारे हे अगदी ज्येष्ठ नागरिक नाही तरी किमान पस्तिशी-चाळिशी ओलांडलेले मध्यवयीन लोक असणार. सांगायचा मुद्दा एवढाच की, वर चर्चा केलेल्या वेब सिरीजेसचा अपेक्षित प्रेक्षक वर्ग हा जसा तरुण आहे तसेच आयेशा नायर, आनंद भारद्वाज, निरंजन परांडकर, सावनी वझे, वरुण नार्वेकर, मयुरेश जोशी, आकाश भोजवानी, ध्रुव सेहगल वगैरे लेखक सुद्धा तरुण मंडळीच आहेत. तर कदाचित आता आजचा ‘freshly brewed content’ हे एकप्रकारचं ‘modern conditioning’ असूच शकेल, उद्याच्या/ होऊ घातलेल्या मध्यवयीन नात्यांवर!

© प्राची रेगे

prachiarege@gmail.com