औरंगजेबाला सन्मार्गाची वाट दाखवणारे ‘निपट निरंजन’

निपट निरंजन

#दिवाळी_अंक_२०१८

औरंगाबादच्या एका रस्त्यात साडेतीनशे वर्षांपूर्वी एका साधूनं लोकांमध्ये भक्ती वाढावी म्हणून देवाची मूर्ती आणून ठेवली. मंदिर बांधलं. पण फक्त हिंदूच दर्शनासाठी येऊ लागले. अविंध येईनासे झाले. म्हणून मूर्ती उचलून त्यांनी मंदिराची केली मशीद. पण पुन्हा अडचण झाली. त्यात मुसलमानांची रीघ लागली, पण हिंदू ढुंकूनही पाहिनासे झाले. दोन्हीकडचे लोक एकत्र आणायला काय कावे, या विचारात असलेल्या या साधूनं मशीद तोडली आणि त्या जागी संडास बांधला. पाहतो तो काय, या सार्वजनिक शौचकूपात मात्र कसलाही भेद न करता हिंदू आणि मुसलमान दोघेही आपापली गरज पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. पण धर्मावरचा हा आघात समजून गावचा पठाण हाकिम संतापला. मशिद तोडून संडास बांधणार्‍या या साधूला बोलावणं धाडलं. साधू काय म्हणाला, याचं वर्णन शिरगावच्या भीमस्वामींनी आपल्या भक्त लीलामृत ग्रंथात केलं आहे ते असं,

देव केला तेथे न येती यवन। मशिदींत जाण हिन्दू न ये॥

मग शोचे कूप केला तेथे येती। भेदातीत होती नर्क द्वारा॥

आम्हीं काय यासी करावा उपाय। नर्क जातां प्रिय जनांलागी॥

भलता शक्कलबाज होता हा साधू. त्याची कीर्ती नाथ पंथ आणि दत्त संप्रदायात देशभर पसरली होती. आपल्या फकिरीचा त्याला अभिमान होता. फकिरीपुढे बादशाही फिकी मानणार्‍या या साधूनं खुद्द बादशाहे हिंदोस्तां समशेरबहादूर आलमगीर औरंगजेबालाही खडे बोल सुनावायला मागेपुढे पाहिलं नाही. इतकंच नव्हे, तर सच्च्या मुसलमानाची कर्तव्यं आणि बादशहाची विपरीत वागणूकही आपल्या कवनांमधून थेट ऐकवली. पण फकिरावर बादशहाही फिदा झालाच; शिवाय स्वतः या बाबाच्या सान्निध्यात डेरा टाकून राहिला.

सुनो सुलतान जहाँ, कौन है मुसलमान,

खुदा की न पहचान, खुदा जिक्र छेडा है।

कलमा पढे भराभर, मलमा तो भरा अंदर,

सौ सौ चूहे खाय के, बोका हज को दौडा है।

करे नमाज रोजा, न रूह का रकान खोजा,

जकात का लिये बोजा, जग से बखेडा है।

कहे ‘निपट निरंजन’, सुनो आलमगीर,

नाचना तो आवे नहीं, कहे आंगन टेढा है॥

खरा मुसलमान कोण, याची खुद्द आलमगिराला बतावणी करणारा हा कोण माणूस होऊन गेला बुवा? ‘रूह का रकान’ शोधून ‘खुदा की पहचान’ करण्याऐवजी सुलतान त्याचं कसं अवडंबर माजवतोय, हे सांगणारा हा काफ़िरांचा संत कोण लागून गेला? बादशहाच्या जकात जिझियावर कवितेतून कोरडे ओढणार्‍या या संत कवीची ही मजाल? हे सगळे प्रश्न या आणि अशा अनेक रचना वाचताना पडू शकतात. आलम दुनियेला गिरफ्त करण्याची ताकद बाळगण्याचा दावा करणार्‍या आलमगिराला ‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं म्हणून खिजवणारा हा साधू म्हणजे काय चीज होती, ते आपल्याला नक्कीच माहीत नसणार, याची खात्री आहे.

महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या नाथ सिद्धांच्या परंपरेत औरंगाबादचे हे संत कवी निपट निरंजन. चर्पटनाथांना ते आपला गुरू म्हणतात. इ. स. 1623 ते इ. स. 1698 असं 75 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या संताच्या साहित्यातून त्यांचा महाराष्ट्राच्या संत आणि सूफी परंपरेशी असलेला घनिष्ठ संबंध दिसून येतो. नाथ संप्रदायातील सिद्धांच्या परंपरेचं चिंतन त्यात आढळतं. पण याहून वेगळं आणि विशेष म्हणजे, निपट निरंजन हे मुघल बादशहा औरंगजेबाचे समकालीन होते. त्यांचा औरंगजेबाशी संवादही झाला होता. त्या संवादाचा काव्यरुप वृत्तांत, अनेक आख्यायिका इथं प्रचलित आहेत. बाबांच्या चमत्काराच्या कथाही लोक सांगतात. त्या सगळ्याची सत्यासत्यता तपासणे, हा काही इथं हेतू नाही. पण त्या रंजक कथा आणि नाथ पंथातील अनेक पोथ्यांमधून समोर आलेली त्यांची काव्ये यांच्याशी आपला परिचय तत्कालीन धार्मिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासाची ओळख होण्यास महत्वाचा ठरतो.

निपट भये प्रकास

इसवी सनाच्या 1883 सालात लिहिल्या गेलेल्या ‘शिवसिंह सरोज’ या ग्रंथात त्या काळातील तब्बल पाच हजार भारतीय हिंदी साहित्यिकांच्या चरित्रांचं संकलन आहे. त्यावर डॉ. किशोरीलाल गुप्त यांनी 1967 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘सरोज सर्वेक्षण’ ग्रंथात निपट निरंजन यांच्यासंबंधीचा परिच्छेद उद्धृत केला आहे.

संवत सोला सौ असी, था अगहन का मास।

बुन्देलखण्ड द्विज गौड में, निपट भये प्रकास॥

त्यांच्या काव्यातील काही दोहे त्यांची पूर्वपीठिका सांगतात. हे निपट निरंजन बाबा मूळचे बुंदेलखंडचे. चंदेरी गावातील जिझौतिया गौड ब्राह्मण कुळात इ. स. 1623 मध्ये (संवत 1680) त्यांचा जन्म झाला. बालपणातच वडिलांचं निधन झालं. पालनपोषण आईनंच केलं. वयाच्या 40 व्या वर्षी ते आईसह बुर्‍हाणपूरला आले. तिथं दहा वर्षे काढली. 1673 मध्ये बाबा औरंगाबादला आले. सुरवातीला औरंगपुरा भागात संत एकनाथांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या वाड्याजवळ ते राहत. तारकसीचा (जरीकाम) व्यवसाय करीत. खाम नदीच्या पलीकडे बादशहाच्या बायकोच्या मकबर्‍याजवळ ओरछाच्या राजा पहाडसिंग यांनी शाहजहानच्या काळात पहाडसिंगपुरा वसवला होता. पुढे याच भागात ते झोपडी बांधून राहायला आले. 1677 मध्ये आईनं मरताना मुलाला उपदेश केला, “हा देह नश्वर आहे. जीवन क्षणभंगुर आहे. आपल्याला मानव शरीर का प्राप्त झाले ते जाणून घे. त्यानुसार आपलं कर्तव्य ठरव.”

आईचा मृत्यू झाला आणि या माणसाला वैराग्य आलं. तेव्हा ते 54 वर्षांचे होते. काय झालं असेल ते असो; आईच्या अंत्यसंस्काराला ना कुणाची मदत मिळाली, ना कुणी सोबतीला आलं. या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. ते अतिशय निराश, हताश, उदास झाले. त्यांनी कारखाना मोडला. झोपडी तोडली. त्याच लाकडांची चिता रचली आणि हनुमान टेकडीजवळ आईवर अंत्यसंस्कार केले. आईच्या चितेची राख अंगाला फासून दृढ संकल्प केला, की आईच्या उपदेशाचं तंतोतंत पालन करीन आणि मग सुरू झाला गुरूचा शोध!

देवगिरी गुरू पायो

झोपडीच्याच लाकडांची चिता करून आईचं दहन केलं होतं. मग ते लेणीच्या पायथ्याशी वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसू लागले. निराहार ध्यान सुरू झालं. कडक तपश्चर्या आरंभिली. तीन वर्षांनी एके दिवशी दत्तात्रय अवधूत प्रकट झाले. त्यांनी हातातला शंख या नव्या साधूच्या हातावर ठेवून आदेश दिला, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवगिरीवर संतसमागम होतो तेथे जा.’ वर्ष होतं 1678.

देवगिरी किल्ल्यावर संत एकनाथांचे गुरू किल्लेदार जनार्दन स्वामी (चाळीसगावचे देशपांडे) यांनी सुरू केलेल्या या संतसंमेलनाचा उल्लेख अनेक मध्ययुगीन संतांच्या साहित्यात आला आहे. पुढे स्वतः संत एकनाथ, मुलतानहून येऊन दौलताबादेत मठ करून राहिलेले योगानंद मानपुरी, दासोपंत, दूलनदास, रज्जब, बुल्लेशाह, दरिया साहब, यारी साहब, मलूकदास, गुलाल साहब, जगजीवन आणि शेवटी शुकमुनी शिष्य चरणदास यांनी हा सत्संग पुढे चालू ठेवला. सूफी संतांचं दख्खनेतलं प्रमुख केंद्र खुलताबाद हे राजधानी दौलताबादच्या नजीक असल्यामुळे सूफींचा प्रभाव मोठा होता. त्यामुळे त्यांच्यातले शाहनूर मियाँ हमदानी, मोमीन आरिफ, लंगोट बिन अन्सारी हेही या संत समागमात सामील झाल्याचे उल्लेख आढळतात.

देवगिरि गुरू पायो, संतन जमाव जहाँ।

महान प्रसाद पाया, जग से निराला है॥

गोम, बिच्छू, सांप, गिरगुट, खेकडा मिलाय।

कढाई में ले पकाय, घुंमाईं गुरू प्याला है॥

संतन मे बारी बारी, सबको चढी खुमारी।

भय भूल को निवारी, चरपट मौला है॥

‘निपट’ के पट खुले, निपट लियो है सब।

गुरुकृपा भईं, तीनों लोक उजाला है॥

बाबा देवगिरीला आले. तेथे शूलिभंजनच्या डोंगरावर नाथपंथी संतांचा मेळा जमलेला होता. गोरक्षनाथांचे शिष्य चर्पटनाथ तिथं होते. गुरुपौर्णिमेनिमित्त एका कढईत प्रसाद शिजवणं सुरू होतं. प्रसाद कशाचा? गोम, विंचू, साप, सरडे, खेकडे, पाली गोळा करून कढईत टाकल्या जात होत्या. चर्पटनाथांनी ‘शाबरी कवच’ म्हटलं. शिजवलेल्या या प्रसादावर जलसिंचन केलं आणि संतांची पंगत बसली. प्रसाद वाटला जात होता. पण हा असला विषारी प्रसाद खायचा तरी कसा? बाबांच्या मनात संशय आला. त्यांनी प्रसाद खाल्ला नाही. सगळे साधू प्रसादभक्षण करून हात धुते झाले. महायोगी चर्पटनाथांनी निपटबाबांचं मन जाणलं. ‘तेरे हिस्से का जो बचा है, उसे निपट ले!” गुरू आदेश झाला. बाबांनी कढईच्या तळाशी उरलंसुरलं निपटून खाल्लं आणि भावसमाधीत लीन झाले. चर्पटनाथांच्या ‘निपट ले’ या आज्ञेचं या शिष्यानं पालन केलं आणि बाबांचं नाव ‘निपट महाराज’ पडलं. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव काय, हे कुठेही सापडत नाही. (नाथ संप्रदायाचा इतिहास पाहता, चर्पटनाथ आणि निपटबाबा यांच्या कालखंडात बराच फरक आहे. पण इथं जागोजाग चर्पटनाथ हेच गुरू असल्याचे उल्लेख आढळतात.)

पुढं चार वर्षं, म्हणजे 1682 पर्यंत चर्पटनाथांनी पहाडसिंग-पुर्‍यातल्या मठात निपट महाराजांना हठयोग, राजयोग, कुंडलिनी योग, लय योग, षडचक्रभेदन योग, खेचरी कायाकल्प, किभियागिरी, शाबरी विद्या शिकवल्या. एकांतात कठोर योगाभ्यास झाला. कुंडलिनी जागी झाली. बाबा सिद्ध पुरुष झाले. भक्तांचे, साधूंचे जत्थे येऊ लागले.

हाथी चढके आयो, दिल्ली को राजा॥

शहाजहान बादशहाला नजरकैदेत टाकून औरंगजेब दिल्लीच्या तख्तावर बसला. त्यानंतर 23 वर्षांनी तो दिल्ली सोडून मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी दख्खनेत आला. दख्खनेत औरंगाबाद हे मुघलांचं जुनं ठाणं असल्यामुळे शहाजहानच्या काळापासून उत्तरेतल्या विविध संस्थानांच्या सैन्याच्या छावण्या इथं होत्या. त्याही केवळ तात्पुरत्या लष्करी नव्हे, तर अगदी स्थायी नागरी वस्तीच्या. यातल्या काहींनी तर स्वतःच्या छावणीला भक्कम स्वतंत्र तटबंदी वगैरे बांधली होती. 1682 मध्ये औरंगजेबानं इथं तळ ठोकला. तत्पूर्वी त्याचा सरदार खानजहाँ बहादूर खान कोकलताश यानं शहराभोवती सहा मैल लांबीची तटबंदी बांधून काढली होती. त्याच्या उत्तरेला दिल्ली दरवाजानजीक बादशहाला राहण्यासाठी किले ‘अर्क’ बांधण्यात आला. काळ तसा धामधुमीचा होता. पण खुलताबाद, दौलताबाद आणि औरंगाबाद भागातल्या सूफी संत आणि सिद्ध पुरुषांच्या बादशहा खास भेटी घेत असे.

पहाडसिंगपुर्‍यात राहणार्‍या निपट बाबांची महती त्याच्या कानावर गेली. स्वतःही जिंदा ‘पीर’ अशी ख्याती असलेल्या बादशहानं या साधूची परीक्षा घ्यायचं ठरवलं. याची एक दंतकथा इथं प्रचलित आहे. बादशहानं वजीराला नजराणा देऊन पाठवलं. पण खोडसाळपणे तबकात रुमालाखाली मांसाचा तुकडा ठेवलेला होता. हे जाणलेल्या महाराजांनी रुमाल हटवायला सांगितलं, तर त्यात गुलाबाची फुलं निघाली. निपट बाबांनी नजराण्याचा जवाब म्हणून एक कवन लिहून धाडलं.

निपट निरंजन की बानी
निपट निरंजन की बानी

खोजा नहीं आपा तूने, भेजा तैने ऐसा तोहफा,

क्या अजाब क्या सवाब, पीता जो शराब है॥

आपको जो सोक्त करे, गैर को लज्जत भरे,

जिन्दगी शबाब में, मजा ले कबाब है॥

साकीए को सर मिले, बहरे बहदत हो ले,

दीन दुनिया से मिले, फूल ये गुलाब है॥

कै ‘निपट निरंजन’, सुनो आलमगीर,

होश औ हवाश तबा, तोहफे का जवाब है॥

वजीरानं घडलेली हकीकत बादशहाला सांगितली. तेही काय समजायचं ते समजला. हत्तीवर अंबारीत बसून भेटायला निघाला. चमत्कार दाखवल्याशिवाय औरंगजेब नमस्कार करणार नाही, हे साधू जाणून होते. पहाडसिंगपुर्‍यात पोहोचताच पाहतात तो काय, हा साधू एका भिंतीवर बसून बादशहाला सामोरा येत आहे. (डिट्टो ज्ञानेश्वरांची कथा!) औरंगजेब हत्तीवरून पायउतार झाला. दोघांची भेट झाली. चर्चा सुरू असतानाच नमाजची वेळ झाली. महाराजांची परवानगी घेत बादशहा बाजूला जाऊन नमाज पढून आला. तो परतल्यावर महाराजांनी केलेला सवाल उपलब्ध आहे.

नमाज पढी जाने, ख़ुदा रियाज बड़ी जाने,

सिजदा करी जाने, वजू कलमा पढी जाने है॥

रमजान रोजा जाने, मोहरम ताज्या जाने,

नजरे नियाज जाने, इबादत जाने है॥

कुराण आयत जाने, इल्म शरीयत जाने,

मक्का और मदिना जाने, जियारत जाने है॥

कै ‘निपट निरंजन’, सुनो आलमगीर,

दिल दरगा के बीच, पीर नही जाने है॥

हा उपदेश ऐकून बादशहा खजील झाला. म्हणाला, ‘ऐसा जलाली फकीर देखने में नहीं आया है।” बादशहानं या मठातच काही दिवस डेरा टाकला. महाराजांनी आणखीही काही चमत्कार दाखवले. बादशहा आणि निपटबाबांची चर्चा आणि चमत्कारांच्या कथा निपट महाराजांचा शिष्य निरंजननाथाने कवितारूपात लिहून काढल्या. या छंदोबद्ध रचना व्रज भाषेत आहेत. काही कवनांमध्ये खडी बोली आणि फारसी शब्दांचे प्रभुत्व आहे. यात बरीच पदे प्रक्षिप्त असण्याची शक्यता आहे. त्यातलेच काही वेचे…

ईसा गये सूली पर, मूसा गये तूर पर,

जिनकी न पहुंच हुवी, चौथे आसमान तक।

नमरूद शद्दाद फिरोन हमान सब,

खुदाई का दावा कर, गए नहीं द्वार तक॥

दारा और सिकंदर, पता नहीं जमीन पर,

अगबर बाबर हुमायूँ जहांगीर तक।

कै ‘निपट निरंजन’, कहाँ तू आलमगीर,

गिरगुट की दौड तो सिर्फ एक बाड तक॥

हिन्दू को काफीर कहे, कबर को पीर कहे,

नर आलमगीर कहे, किताब सम्राट का।

जो दम गाफील होय, सो दम काफीर होय,

सुन मुन-बुक मूंन, सो ही जान गाठ का॥

कल्ब को रोशन कर, मुर्शद के मकतब,

उमर गमाया सब, तैने अपने साठ का।

कै निपट निरंजन, सुनो आलमगीर,

धोबी का कुत्ता रहा, घर का न घाट का॥

ईसा मूसा महंमद इबराहीम दाऊद,

चारों पैगंबरों का मिला पैगाम क्या?

उस्मान फारुक अकबर अली खलिफा

जंगे खिलाफतका हुआ कर्बला हंगामा क्या?

जी साकूल अक्कलकूल, तबीयत जारे कूल,

खाक सारी आदम का आखरी अंजाम क्या?

कै निपट निरंजन’, सुनो आलमगीर,

मू तू कबला अंता मू तू उस्का मुकाम क्या?

शहंशाह बने हो तो आह सुनो दीनन की,

बानी मरदानी बचन जावे खाली है।

दया के सागर आता, धरम के बने दाता,

प्रजा के पालक पिता, दुखियों के वाली है॥

दरिद्र भिखारी व्यभिचारी अनाचारी चोरी,

इनसाफ करने में समतोल ख्याली है।

कै निपट निरंजन’, सुनो आलमगीर,

ये गुन राजा में न हो, लुच्चा वो मवाली है॥

चारों दिशा मारमार किया तैने कत्ले आम,

तेग बहादुर की शीस कटवाई है।

गुरू गोविन्द सिंह के, बच्चे थे मासूम दोऊ,

उनको दीवार में नाहक चुनाई है॥

इतनों की बद दुवा फकीरों की दुवा मांग,

फकर की राह धर, फकीर आजमाई है।

कै निपट निरंजन’, सुनो आलमगीर,

सव्वा मन जनेऊं जला, खाना तब खाई है॥

: निरंजन-वजीर संवाद

निपट बाबांच्या सान्निध्यात बादशहा प्रसन्न झाला. त्यांचा संवाद सुरू असताना इकडे ‘मठासाठी इनामी जमीन मागा, बादशहा लगेच देतील’, असे वजीराने निरंजनला सुचवून पाहिले. निरंजन आणि वजीर यांच्यातील संवादाचे 21 दोहे मिळाले आहेत. गुरूचा फकिरीचा अभिमान शिष्य निरंजनमध्येही किती भिनला होता, ते या दोह्यांतून समजते. त्याची झलक पहा…

वजीर :

आलमगीर ने दे दिए, बहुतों को जहागीर।

मनसब लिख देंगे अभी, अरज करे है वजीर॥

निरंजन :

आलमगीर क्या देत है, आलम को जहागीर।

चर्पट का पंजा यहां, दूजा देख फकीर॥

वजीर :

कहना था सो कह दिया, शाह का फरमान।

कुटी पर गंगा बही, कर लेना था स्नान॥

निरंजन :

बादशाही छोड दे, फकीरों का सुन ग्यान।

निपट सब ही निपट के, करे जगत कल्याण॥

निरंजन नाथांमुळेच निपटबाबांचे साहित्य पुढे लोकांपर्यंत पोहोचले. निपट बाबांच्या नावासोबतच निरंजनचे नाव जोडले गेले. ‘निपट निरंजन’ हेच एक नाव प्रचलित झाले. निरंजननंतर चरणदास या आश्रमात राहत असल्याचे उल्लेख आढळतात. या चरणदासांची समाधी जवळच हनुमान टेकडीच्या पायथ्याशी चरणदास हनुमान मंदिरासमोर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी निपट महाराजांची समाधी आहे. मार्गशीर्ष वद्य एकादशीला निपट महाराजांनी समाधी घेतली. ओरछाच्या राजाने समाधीस्थळी मंदिर उभारण्यासाठी जागा इनाम दिली. त्या दिवशी दरवर्षी आश्रमात जत्रा भरते. रेवड्या, बोरांचा प्रसाद वाटला जातो. पतंगबाजी, कुस्त्यांची दंगल, हेल्यांचा सगर होतो. याशिवाय भजन, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रमही होतात.

देशभरातून सापडली कवने निपट-आलमगीर संवादाची 114 कवने, आलमगीराप्रती उद्गारांचे एक कवन, एक पद आणि दोन दोहे मिळाले आहेत. त्याखेरीज नसीहतनामाचे 22 छंद, 40 दोह्यांची फकीर चालिसा, उर्दू बाराखडीच्या आद्याक्षरांना गुंफून रचलेला तीस दोह्यांचा अलीफनामा आणि उपदेशपर आध्यात्मिक बानीची 138 कवने, 50 दोहे, 19 सवाया आणि 15 भजने मिळाली आहेत. शहरातील मेळ्यांमधले गवई बल्लू पांडे, छन्नू पांडे आणि दुर्गा पांडे यांच्याकडे निपटबाबांची कवने मौखिक परंपरेने आली होती. राजाबाजारमध्ये राहणार्‍या निजामकाळात व्यंकटेश स्वामी सद्गुरे यांनी या दोहे आणि कवनांचे संकलन केले. बुर्‍हाणपूरहून काही हस्तलिखिते मिळाली. भीमस्वामींचे भक्त लीलामृत, कवि नारायण यांचे श्री गुरु लीलामृत (मध्व मुनीश्वर चरित्राचे हस्तलिखित), औरंगजेबाचे समकालीन कवि कालीदास त्रिवेदी यांच्या ‘कालिदास हजारा’त निपट महाराजांच्या लीला वाचायला मिळतात. ग्रियर्सन, आचार्य भिकारीदास यांनीही निपट निरंजन यांचा उल्लेख केला आहे. हैदराबादच्या आर्टस् ऍण्ड सायन्स कॉलेजचे सफीउद्दीन सिद्दिकी यांनी 1955 मध्ये दिल्लीच्या ‘आईना’ या उर्दू साप्ताहिकात ‘औरंगजेब से गुस्ताखी करनेवाले संत कवि, हिन्ही और उर्दू के मुइतर का शायर’ या शीर्षकाखाली सविस्तर लेख लिहिला होता. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातले प्रोफेसर डॉ. भालचंद्रराव तेलंग आणि राजमल बोरा यांनी संशोधन करून चरित्र आणि कवनांचे संकलन 1952 मध्ये प्रसिद्ध केले. पुढे आणखी कवने मिळाल्यानंतर राजमल बोरा यांनी 1992 मध्ये ‘निपट निरंजन की बानी’ हा ग्रंथ सिद्ध केला. तोही आता दुर्मिळ झाला आहे. मुघल काळात औरंगाबादेत निपट निरंजन यांच्याबरोबरच शेंदुरवाद्याचे मध्व मुनीश्वर, मानपुरी, अनंतनाथ, कृष्णदास आणि विनायकानंद सरस्वती या संतांच्या रचना मिळतात. बहुतांश काव्य हे भक्तिसंप्रदायाला वाहिलेले आणि दृष्टांतरूप असले, तरी त्यात आढळणार्‍या समकालीन उल्लेखांचे ऐतिहासिक संदर्भमहत्त्व नाकारता येत नाही.

लेखक - संकेत कुलकर्णी