किरण खलप – क्लोरोफिल गवसलेला माणूस

किरण खलप

साधारणपणे चार वर्षांपूर्वीची घटना. त्यावेळी मी फोर्ब्स मार्शल या पुण्यातील नामांकित कंपनीत ‘ऑनलाईन मार्केटिंग आणि कम्युनिकेशन’ या विभागात कार्यरत होतो. कंपनीत काम करताना अनेक कॉन्फरन्सेसना जायचा योग्य यायचा. अशाच अनेक कॉन्फरन्समधील एक म्हणजे सी.आय.आय. या संस्थेद्वारा दर वर्षी आयोजित केली जाणारी सी.आय.आय. मार्केटिंग कॉन्फरन्स. वर्षातून होणार्‍या सर्वच ‘इव्हेंट्स’मधील त्यातल्या त्यात सर्वात सुनियोजित आणि उपयुक्त माहिती पुरविणारी ही कॉन्फरन्स. मी पदभार नुकताच स्वीकारला असल्यामुळे मला प्रथमच इतक्या मोठ्या कॉन्फरन्सला जायची संधी मिळणार होती.

कार्यक्रमाच्या दिवशी मी आणि माझे कंपनीतील काही सहकर्मचारी असा चार लोकांचा जथ्था सन अँड सॅण्ड हॉटेलला वेळेत पोहोचला. दिवसभरात अनेक मोठ्या-मोठ्या मार्केटिंग कंपन्यांचे सीइओ, संस्थापक, इत्यादींनी त्यांचे विचार मांडले. त्यातले जवळपास सर्वांचेच विचार फारच पुस्तकी आणि प्रत्यक्ष कामात उपयोग नसलेले होते. माझा बर्‍यापैकी भ्रमनिरासच झाला होता. अशा एकंदरीत ‘झोपाळलेल्या’ अवस्थेत आम्ही सर्व असताना ‘क्लोरोफिल ब्रँड अँड कम्युनिकेशन कन्सल्टन्सी’चे संस्थापक, किरण खलप यांच्या सत्रास सुरुवात झाली आणि काही क्षणातच सर्वांच्या डोळ्यांवरचा झोपेचा अंमल पुरता पसार झाला. ‘किरण खलप’ म्हणजे चाळिशीतला, जाड भिंगाचा चष्मा घातलेला माणूस. टक्कल इतके गुळगुळीत की मंचावरील दिव्यांच्या प्रकाशात ते अक्षरशः चमकत होते. परंतु त्यांच्या डोक्याच्या आतील चमक त्याहूनही अधिक सरस होती. कम्युनिकेशन आणि ऍडव्हर्टीझिंग या क्षेत्रांतील अधिकाधिक लोक हे ‘आम्हाला सर्व कळतं’ या मनोवृत्तीचे परंतु प्रत्यक्षात अतिशय उथळ असावेत असे मत आधीच्या वक्त्यांंच्या सत्रांतून काहीसे बनत आले होते. किरण खलप हा प्रकार फारच निराळा होता. अत्यंत साफ आणि सोप्या शब्दांत आणि वाक्यांत एक नेमकेपणा आणि वागण्यात आणि बोलण्यात एक स्थैर्य. या माणसाबद्दल अजून माहिती गोळा करायला हवी, हे मी तिथे बसल्या बसल्याच माझ्या डायरीत नोंदवून ठेवले.

क्लोरोफिल चे मुंबई येथील कार्यालय

ज्या व्यक्ती काहीशा वेगळ्या वाटतात, त्यांच्या विषयी ऑनलाईन सर्च करून अधिक माहिती मिळवण्याचा चाळाच मला त्याकाळी लागला होता. कंपनीत दुसर्‍या दिवशी लॅपटॉप उघडल्या उघडल्या मी किरण खलप या व्यक्तीविषयी मिळेल न मिळेल ती सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. क्लोरोफिल या त्यांच्या कंपनीची वेबसाईट, त्यांची स्वतःची वेबसाईट, अनेक नामाकिंत वृत्तपत्र व नियतकालिकांमध्ये आलेले त्यांचे लेख वाचून त्यांच्याबद्दल एकंदरीतच कुतूहल निर्माण झालं. त्यांची वेबसाईट चाळत असताना अचानक वाचनात आलं की किरण खलप तरुण असताना जे कृष्णमूर्तींच्या विचारांनी प्रभावित झाले होते व त्यांच्या बनारस येथील शाळेत काही वर्षे त्यांनी शिकवले देखील होते. किरणच्या भाषेतील नेमकेपणा, स्वच्छ व स्पष्ट नजर आणि विचारांतील ‘क्लॅरिटी’ यामागील रहस्यच जणू मला उलगडले.

त्याकाळी मी देखील हात धुवून कृष्णमूर्तींच्या (त्यांच्या पुस्तकांच्या!) मागे लागलो होतो, परंतु फार काहीसा बोध होत नव्हता. कृष्णमूर्तींच्या विचारांशी नीट ओळख करून देईल अशी कोणी व्यक्ती सापडेल का? हा विचार गेले कित्येक दिवस माझ्या मनात येत होता. माझी इच्छा पूर्ण झाली असावी असं मनोमन वाटून गेलं. किरणच्या संकेतस्थळावर त्यांचा ईमेल आयडी होता. मी ताबडतोब त्यांना ईमेल पाठवला की त्यांना भेटायची इच्छा आहे. क्लोरोफिलच्या कामाचा एकंदरीत व्याप बघता किरण वेळ काढू शकतील की नाही या बाबत मी साशंक होतो. परंतु, काही तासांतच किरणकडून प्रत्युत्तर आले.

मी त्यांना भेटण्यासाठी जितका उत्सुक होतो, तितकेच ते देखील असावेत असं त्यांचे उत्तर वाचून वाटलं. अतिशय आनंदाने त्यांनी भेटायची वेळ दिली आणि ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी मी आणि माझी पत्नी दाक्षायणी आम्ही दोघे मुंबईला त्यांच्या भेटीला पोहोचलो. आम्ही मुंबईत शिरतानाच किरणचा मेसेज आला – त्यांची आधीची मिटिंग लांबल्यामुळे त्यांना दहा मिनिटे उशीर होणार होता. दिलेली वेळ काहीही पूर्वसूचना न देता अर्ध्या-एक तासाने पुढे ढकलणार्‍या अनेक संगीतकारांना, उद्योजकांना व इतर क्षेत्रांतल्या दिग्गजांना आम्ही मुलाखती घेण्याच्या निमित्ताने भेटलो होतो. दहा मिनिटे उशीर होणार आहे हे तासभर आधी मेसेज करून सांगणारे किरण खलप निश्चितच या सर्वांपेक्षा फार वेगळे होते. ठरलेल्या वेळी मी आणि दाक्षायणी दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर येतील ‘ट्युलिप्स’ कॅफेत पोहोचलो आणि आमच्याच मागे दहा मिनिटात किरण देखील आले. नजरेत तेच स्थैर्य होतं. वर्तमानावर घट्ट पकड असलेल्या माणसाची ती नजर होती. लोकांचे डोळे त्यांच्या स्वभावांबद्दल किती काही सांगून जातात. काहींच्या डोळ्यात भूतकाळाबद्दल पश्चात्ताप दिसतो तर काहींच्या डोळ्यांत भविष्याची काळजी. किरणचे डोळे होते बोलके; परंतु वर्तनामनावर खिळलेले. शरिर कसलेलं; त्यावर एक ग्राम देखील जास्तीचे ‘फॅट’ नाही. त्यांच्या वयाबाबत मी बांधलेला अंदाज तर सपशेल फसला होता. मी ज्या माणसाला चाळीशीचा समजत होतो, तो माणूस अठ्ठावन्न वर्षांचा होता!

किरणचा आयुष्यातील आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या अठराव्या वर्षी कृष्णमूर्तींचे एक पुस्तक वाचताना त्यांना आंतरिक स्वातंत्र्याची एक झलक मिळाली. शिक्षण आटोपल्यावर करिअरच्यामागे धावायचे सोडून कृष्णाजींवरील या कृतज्ञतेपोटी
किरण बनारस येथे रवाना झाले. तेथील कृष्णमूर्तींच्या निवासी शाळेत मुलांना शिकवायला. त्यानंतर चार वर्षे ते या शाळेत शिकवत होते. या चार वर्षांत शाळेला व कृष्णाजींना भेटण्यासाठी आलेल्या जगभरातील अनेक तत्वज्ञ व विचारवंतांना
जवळून पाहायची संधी त्यांना मिळाली. याच दरम्यान आई आणि वडील दोघांचेही शारीरिक स्वास्थ्य फारसे चांगले नसल्यामुळे किरण मुंबईला परत आले. राजघाट (बनारस) ला असतानाच ‘सेलेब्रिटी’ या शोभा डे यांनी संपादित केलेल्या नियतकालिकासाठी त्यांनी लेखन केले. या अनुभवानंतर ते ‘लिंटास’ या त्या काळातील अत्यंत नावाजलेल्या ऍड एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून रुजू झाले. कॉपीरायटिंग हे अतिशय किचकट काम. कमीतकमी शब्दांत लाखो हृदयांना कसं जिंकता येईल हा त्या मागचा हेतू. भारतातील व जगभरातील अनेक मातब्बर व नावाजलेल्या ‘ब्रॅण्ड्स’साठी कॉपीरायटिंग करण्याची संधी किरण यांना मिळाली. त्यांच्या कामाचा दर्जा हा इतका सरस होता की काही वर्षांतच ते लिंटास येथे क्रिएटिव्ह डिरेक्टर झाले. हे पद भूषवणारे ते वयाने सर्वात लहान कर्मचारी होते. 1991 साली ते क्लॅरिओं ऍडव्हर्टायझिंग येथे क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून रुजू झाले व केवळ सहा वर्षांत, 1997 साली सीइओ व सीओओ ही दोन सर्वोच्च पदे एकाच वेळी भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.

1999 साली त्यांनी ‘क्लोरोफिल’ ही ब्रँड कम्युनिकेशन एजन्सी सुरु केली. या सेवा पुरविणारी क्लोरोफिल ही भारतातील सर्वप्रथम एजन्सी होती. स्थापनेपासून आजपर्यंत क्लोरोफिलने विविध क्षेत्रांतील नावाजलेल्या 200 हून अधिक कंपन्यांना सेवा पुरविली आहे.

याव्यतिरिक्त किरण यांनी दोन कादंबर्‍या लिहिल्या आहेत. अत्यंत मानाची समजली जाणारी एशिअन एज इंडो-युके लघुकथा लेखन स्पर्धा त्यांनी 1995 साली जिंकली. ते एक सच्चे निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या मौलिक सल्ल्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या व संस्था त्यांना वारंवार बोलवीत असतात. रॉक क्लाइम्बिंग हा त्यांचा छंद. किरण यांचे व्यावहारिक यश, त्यांच्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले अव्वल स्थान, त्यांना मिळालेले अनेक मान-सन्मान हे सर्व त्यांच्या उमद्या स्वभावापुढे फार तोकडे आहेत. आपल्या सभोवतालची बहुतांश माणसं ही ‘मी’पणातुन व त्या ‘मी’च्या भावनेने उद्युक्त केलेल्या भीती व असुरक्षिततेतून वागत व जगत असतात. किरण यांच्या वागण्यात त्या ‘मी’पणा चा लवलेश देखील जाणवत नाही. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कृतीत प्रेम आणि संतुलन जाणवते.

ऍडव्हर्टायझिंग हे खरे तर काम करण्यास अतिशय कठीण क्षेत्र. क्षणाक्षणाला नवनिर्मितीची मागणी करणारे हे क्षेत्र. किरण यांना नवनिर्मितीचा जणू मंत्रच गवसला आहे. To create is to unite असं ते नेहमी सांगतात. थोडक्यात, नवनिर्मिती ही योग्य त्या गोष्टींची एकमेकांशी जोडणी करून होते.

प्रत्यक्षात कधी कृष्णमूर्ती व त्यांच्या विचारांबद्दल किरणशी बोलायचा योग नाही आला. परंतु किरण यांचे आयुष्य आणि ते जगण्याची शैली न्याहाळूनच अनेक शंका विरल्या व अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्यांची गिर्यारोहणाची थोडी फार आवड आम्हालादेखील लागली आहे. गेल्या वर्षी त्यांच्यासोबत कात्रज ते सिंहगड हा पल्ला रात्रीतून सर करायचा योग आला. वाट दाखविण्यासाठी आलेला त्यांचा एक मित्र स्वतःच वाट विसरला. आम्ही रात्रभर अनेक टेकड्या पालथ्या घातल्या परंतु वाट काही सापडली नाही. किरणच्या पाठीवर एक वजनी ट्रेकिंग बॅग होती. सर्वजण थोडे वैतागाले होते. दहा-बारा जणांचा आमचा ‘ग्रुप’ होता. किरण मात्र नेहमी प्रमाणे शांत. त्यांनी सर्वांना एका वर्तुळात बसायला सांगून मला आणि दाक्षायणीला एखादे भजन गाणार का असे विचारले. किर्र अंधारात आम्ही गोरखनाथांचं ‘गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं जी’ हे भजन गायलो. जोरात घोंघावत येणारा वारा हाच आमचा तानपुरा! दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर परत भ्रमंती सुरु. पहाट होईपर्यंत अनेकांचा संयम संपला होता. काही लोकांची चिडचिड सुरु झाली; काही आमच्यासारखे तरुण पुरते ढेपाळून गेले होते. आम्हा सगळ्यांचेच पाय सटकत होते, वेडे-वाकडे पडत होते. मी आणि दाक्षायणी आम्ही दोघेही क्षणभर थांबलो. दोघेही कंटाळलो होतो. सर्वांच्या पार पुढे, डोक्यावर टोपी आणि पाठीवर बॅग घेऊन अजिबात न डळमळता, लयबद्धपणे आगेकूच करणार्‍या, धुक्यात धूसर होणार्‍या किरणकडे क्षणभर पाहून एकमेकांकडे बघून हसलो आणि जोमाने पुढे निघालो.

ब्लॅक रिव्हर रन - किरणचे तिसरे पुस्तक. एक कादंबरी जी समर्थ रामदासांच्या विचारांना आचरणात आणत मुंबईच्या वास्तवाला तोंड देणाऱ्या एका टॅक्सी चालकाची कथा आपल्यापुढे मांडते.

झाडाच्या पानांतील क्लोरोफिल हा एक चमत्कारच आहे; सूर्याची किरणांतील ऊर्जा बंदिस्त करून जीवन जागविण्याचं काम क्लोरोफिल करते. किरण खलप देखील आयुष्यातील चैतन्य आणि सृजन बंदिस्त करून ते इतरांना मुक्तपणे वाटत असतात; मानवी आयुष्य समृद्ध करणारं क्लोरोफिल त्यांना गवसलं असावं.

लेखक – मंदार कारंजकर

mandar@mandarkaranjkar.com