‘. . तर मंगल नाही कल्याण होईल!’

Mangal Pandey The Rising Movie

[Image Source: Link]

आपल्याला सर्वात जास्त प्रभावित करणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे सिनेमा. भारतीय समाज आणि सिनेमा या वेगळ्या न करता येणाऱ्या दोन गोष्टी. कधी इथे काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न ही होताना दिसतो, तर कधी तितकाच किंवा त्याहून अधिक तोचतोचपणा देखील दिसतो. वेगवेगळ्या विषयांवर खोऱ्याने आपल्याकडे ‘सिनेमे’येत असतात. तांत्रिक अडचणी, आर्थिक गणितं, विविधतापूर्ण ‘अतिसहिष्णु’ समाज यामुळे असेल पण ऐतिहासिक घटनांवर, प्रसंगांवर येणाऱ्या चित्रपटाचं प्रमाण आपल्याकडे तसं कमीच. इतिहासाबद्दल, ‘जुने जाऊद्या मरणालागुनी’ हे सामाजिक धोरण असलेल्या आपल्यासाठी ते साहजिकच आहे. ऐतिहासिक विषयावर आपल्याकडे काही सिनेमे झाले आहेत, परंतु ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे, बिन भेसळीचा, आधीच निष्कर्ष न काढता बनवलेला क्वचितच एखादा सिनेमा असेल. कलाकृती की व्यावसायिक गणितं, यातील हे द्वंद्व इथेच सोडून थोडं पुढं जाऊ आणि अशाच एका भरकटलेल्या ऐतिहासिक सिनेमा बद्दल बोलू.

‘मंगल पांडे: द रायझिंग’ हा सिनेमा कुणाला माहिती नसेल, अस तर होणार नाही. अनेकांनी तो पाहिला नसेल, पण त्या सिनेमाची चर्चा नक्की ऐकली असेल. असं म्हणायचं कारण म्हणजे त्या सिनेमाचं झालेलं ‘प्रमोशन’! आमीर खान, चार वर्षांनी पदार्पण करतोय, शिवाय लगान नंतर त्याच्याकडून वाढलेल्या अपेक्षा, १८५७ सारखा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, विदेशी कलाकार असा बराचसा माल-मसाला या चित्रपटाला चर्चेत ठेवायला पुरेसा होता. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला, विरोध झाला, अभिव्यक्त व्हायचं स्वातंत्र, त्याची गळचेपी अशा चर्चा झाल्या, कमाई पण समाधानकारक झाली, ऑस्करचं जागून, डोळे फाडून पाहिलेलं स्वप्न भंगलं. एक अध्याय संपला. पण इतिहासाकडे पाहायचा निर्भेळ दृष्टिकोन आपल्याकडे कधी येईल हा प्रश्न तसाच हवेत विरून गेला.

सुमार पटकथा, त्याहून वाईट संवाद अन जेमतेम अभिनय असा हा चित्रपट, अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीही दाखवता येतं या ठाम भूमिकेतून हा चित्रपट केलेला दिसून येतो. ‘मंगल’ च्या भूमिकेतला आमीर, पूर्णवेळ अवघडल्या सारखा वाटत राहतो. लगानमधील भुवन सारखा डोकावत राहतो. हिरोला हिरोईन हवी म्हणून ‘हिरा’ म्हणजेच राणी मुखर्जी, जी एका वेश्येच्या भूमिकेत आहे, कथेची गरज म्हणून घुसवलेलं पात्र आहे. असंच अजून एक पात्र, विल्यम गॉर्डन. सगळेच (गोरे) लोक वाईट नसतात, हे आपल्याला कळावे म्हणून! नाहीतर आपण आजच्या गोऱ्यांवर अन्याय केला म्हणजे? पुढच्या पिढ्यांच्या मनात द्वेष नको निर्माण व्हायला म्हणून यांचं प्रयोजन. १८५७ च्या लढ्यात हे गॉर्डन साहेब भारतीयांच्या खांद्याला खांदा लावून लढले, असं निवेदन ओम पुरी करतो. बॉलीवूडचे काही ठोकताळे ठरलेले आहेत, हा त्यातलाच एक. १८५७ चा उठाव, ज्या भागात झाला त्यात मुसलमानांचं प्रमाण अधिक, त्यात उठावात सहभागी मुख्यतः मुस्लिम जनता, या परिस्थितीवर चित्रपट बनवतानाही आपली चौकट मोडायला दिग्दर्शक तयार नाही, नेहमी प्रमाणे ४:१ या प्रमाणात मुस्लिम चेहरे दाखवले आहेत. चित्रपट कुठलाही असो, त्यात गाणी हवीतच, कथेला पूरक असतील तर ठीक आहे, पण एकवेळ बंड केल्यावर त्या दरम्यान होळी आली म्हणून १८५७ साली ‘मंगल-हिरा’ (राणी मुखर्जी) जी की वेश्या आहे, तिच्या सोबत रंग उधळत नाचतो (!) … होळीला नाचू नये, किंवा वेश्येसोबत नाचू नये, अशा मताचा मी नाही, पण १८५७ चा काळ, आपला प्रतिगामी समाज, त्यात युद्धाचा प्रसंग, अशावेळी आपण करतोय काय? चौकट मोडायची नाही म्हणजे नाही. सण टाळून कसं चालेल? होळीला रंग खेळलाच पाहिजे. कदाचित अशा बेसावध वृत्तीनेच पहिले स्वातंत्र्य समर अपयशी ठरले असं सुचवणं हा सुद्धा या गाण्याचा छुपा उद्देश असेल, कुणी सांगावं. कारण चित्रपट ऐतिहासिक असला तरी, दूरदृष्टीने बनवला आहे यात शंका नाही. उदाहरण हवंय ना? देतो.

Mangal Pandey The Rising Movie
[Image Source: Link]

नानासाहेबांचा खास दूत अजीमुल्लाखान, मराठा सरसेनापती तात्या टोपे आणि मंगल अँड कंपनी यांची एका ठिकाणी गुप्त भेट होते, हा प्रसंग खूप मजेशीर आहे, अजीमुल्ला म्हणतो ‘आपापली राज्य गेल्याने दिल्ली, अवध, झाशी अन् बरीच राज्ये नाराज आहेत, महाराज पेशवा नानासाहेबांनी त्यांना एकत्र कंपनी विरोधात लढायला तयार केलं आहे, तुम्ही पण आमच्या सोबत या युद्धात सहभागी व्हा, असा ‘न्योवता’ घेऊन आलोय!’ अचानक मंगल हसायला लागतो, सगळे आश्चर्यचकित, अन जे म्हणतो ते काळाच्याही पुढचं आहे … तो म्हणतो, ‘काय जेवण (दावत) आहे? हे सगळे राजे महाराजे पाहून झालेत, आपापसातली भांडण अन अय्याशी मध्ये, यांनी राज्य कंपनी सरकारला विकलीत. आमच्या समोर न लढता गडबडा लोळून शास्त्र टाकताना आम्ही पाहिलंय, हे लोक आहेतच कोण, काहीच नाहीत.’ नाजीमुल्ला म्हणतो, ‘मग तू? तू काय आहेस?’ मंगल म्हणतो, ‘आम्ही हिंदुस्थान आहोत, कंपनी सरकार आमच्या जीवावर राज्य करते. अन अशावेळी आम्हीच त्यांना हरवू शकतो, कारण, लोहा लोहेको कटता है” (पुढे सलीम जावेद यांनी शोले चित्रपटात हाच संवाद वापरला, पुन्हा दूरदृष्टी) यावर गंभीर होऊन तात्या टोपे म्हणतात, ‘मग राज्य कोण करणार?’ तडफेने, लोकशाहीचा आद्यप्रनेता मंगल पांडे उर्फ परफेक्शनिस्ट आमीर म्हणतो ‘लोक’, कारण इंग्लंड मध्ये पण राणीच्या नावाचं चलन आहे, पण राज्य लोकांचं आहे. तात्या म्हणतो, ‘अरे ही तर इंग्रजांची चाल, फोडा आणि झोडा, आपण एकत्र लढलं पाहिजे’, मंगल ऐकत नाही, तो म्हणतो, ‘हे बरंय, आम्ही लढायचं अन तुम्ही राज्य करायचं, इतके दिवस झालं ते झालं, आता ही लढाई आमची आहे, आमच्या आझादीची आहे. अजीमुल्लाखान म्हणतो, आपल्याला एक होणं ही काळाची गरज आहे, एका झेंड्याखाली एकत्र येणं ही इन्कलाब ची गरज आहे, आपल्याला एका निशानाची गरज आहे. पुन्हा मंगल(च) म्हणतो यासाठी दिल्लीचा लाल किल्ला हेच आपलं निशाण आहे. जर बादशहाच्या नेतृत्वाखाली एक होणार असाल तरच आपले रस्ते एक होऊ शकतात. गांजा ओढून संवाद म्हंटले आहेत की लिहिले आहेत यावर वाद व्हावा इतकी मोठी पलटी!

सर्वच आघाड्यांवर फसलेला हा चित्रपट, एका फसलेल्या उठावावरच आधारित होता, हा वरवर योगायोग वाटला तरी, इतिहास हा फक्त गौरवशालीच असतो, असा समज असलेल्या समाजाची ही शोकांतिक कहाणी आहे.

लेखक – विष्णू फुलेवार

संपर्क – v.flowersdayagain@gmail.com