मालगुडीतील दिवसांची गोष्ट – मालगुडी डेज

मालगुडीतील दिवसांची गोष्ट - मालगुडी डेज

तशी ही गोष्ट फार जुनी आहे. पण छोट्या पडद्यावर आली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था नुकतीच कुठे मुक्त होऊ लागली होती. अजून छोट्या पडद्याला ‘एकता कपुरा’ गणंगांचे ग्रहण लागायचे होते. त्यामुळे कलेचे मूल्य जाणणारे, तिची कदर करणारे अजून पटलावरून गायब व्हायचे बाकी होते. अशा काळात ती गोष्ट आली आणि भारतीय टेलिव्हीजनची आख्यायिका बनून गेली. एकीकडे समांतर सिनेमा आपली ओळख बनवत होता. तर नुकताच मध्यम वर्गीय कुटुंबात नव्याने दाखल झालेला, विकासाचं नवं परिमाण बनू पाहणारा टेलिव्हिजन भारतात वेगाने रुजत होता. दूरदर्शनची स्वतःची वेगळी ओळख होती असा तो काळ. खरं म्हणजे दूरदर्शनला अन्य कोणत्याही चॅनेलची स्पर्धा नसतानाही त्या काळात अतिशय दर्जेदार कलाकृतींची निर्मिती झाली. उत्तरोत्तर चॅनेलची स्पर्धा वाढत गेली आणि दूरदर्शनची दुर्दशा होत गेली. किंवा जाणीवपूर्वक करण्यात आली. तर आम्ही ज्या काळाबद्दल बोलतोय तो काळ आहे साधारण 80 च्या दशकाचा. खासकरून राजीव गांधी काळात भारतीय टेलिव्हिजनने उत्तुंग झेप घेतली. आणि काळाच्या पटलावर आपली कायमस्वरूपी छाप पडेल अशा अनेक कलाकृती त्या काळात आल्या. बुनियाद, वागले कि दुनिया, फौजी, सर्कस, भारत एक खोज, बी. आर. चोप्राचं महाभारत, नुक्कड, हम लोग या आणि अशा अनेक सुंदर कलाकृतींनी भारतीय टेलिव्हिजन चा अवकाश व्यापला होता.

या काळात कायमस्वरूपी लक्षात राहील अशी आणखी एक गोष्ट छोट्या पडद्यावर अवतरली. ‘मालगुडी डेज’. तशी ती ज्या काळात सर्वप्रथम लिहली गेली तो काळ 1930-40 चा स्वातंत्र्यपूर्व काळ. त्यानंतरही कालानुरूप मालगुडीची गोष्ट घडत राहिली आजूबाजूच्या बदलत्या अवकाशाला सामोरी जात. 80, 90च्या दशकात जन्मलेल्या आम्हा लोकांना शक्तिमान जितकं आठवत राहतं तितकाच मालगुडी मधला ‘स्वामी’ सुद्धा आपलासा वाटत राहतो. मालगुडी सुरू होतानाची ती सुरुवातीची धून अजून सुद्धा कानावर पडली की, ते म्हणतात ना ’नॉस्टॅल्जिक’ व्हायला होतं. लहान असताना मालगुडी तसं फार समजलं नाही, पण मोठे होत गेलो आणि ‘मालगुडी’च्या असण्याचं महत्त्व उत्तरोत्तर वाढत राहिलं. वय वाढत गेलं तसं मालगुडी जास्तच आवडत गेलं आणि उलगडत सुद्धा.

आर. के. नारायण यांचं महत्त्वाचं काम स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या साधारण दोन दशकातलं. स्वामी अँड फ्रेंड्स (1935), दि बॅचलर ऑफ आर्टस् (1937), दि डार्क रूम (1938), दि इंग्लिश टीचर(1945), मि. संपथ : दि प्रिंटर ऑफ मालगुडी (1949), दि फायनान्सियल एक्स्पर्ट (1952), वेटिंग फॉर दि महात्मा (1955), मॅन ईटर ऑफ मालगुडी (1961), व्हेंडर ऑफ स्वीट्स (1967) इत्यादी इत्यादी. या सर्व कामावर आधारित मालिका म्हणजे मालगुडी डेज.

सर्व सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्याचं भावविश्व टिपण्याचा प्रयत्न नारायण यांनी केला. हे सर्व छोट्या पडद्यावर उभं करणं सोपं नव्हतं. शंकर नाग नावाच्या कन्नड दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य लीलया पेललं. या मालिकेतील बरेच कलाकार (जवळपास सर्वच) कन्नड आहेत. असं असूनही शंकर नागने ही मालिका पडद्यावर आणताना ती हिंदीतून आणि इंग्लिश मधून आणली. बहुधा कन्नड गुणांना त्याला मोठे व्यासपीठ मिळवून द्यावयाचे असावे. या मालिकेचे सर्वात मोठे यश काय असेल तर प्रत्येक सर्व सामान्य माणसाला ती त्याची स्वतःची गोष्ट वाटत आली. बर्‍याचदा या मालिकेचं वर्णन करताना ‘Piece of genuine India’ असं म्हटलं गेलं. मालगुडी डेजने सर्व सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलं कारण अतिशय साधी दिसणारी पात्रे आणि घटना ज्यांनी सर्वसामान्यांना जोडून ठेवलं. आजही जी धून ऐकल्यावर इतिहासात रममाण व्हायला होतं, तिची निर्मिती केली एल विद्यानाथन यांनी. मालगुडीच्या चित्रकथा खुद्द आर. के. लक्ष्मण म्हणजेच आर. के. नारायण यांच्या भावाने रेखाटल्या.

जाता जाता एक गोष्ट येथे नमूद करायला हवी चक्क मालगुडी डेजसुद्धा सेन्सॉर बोर्डाच्या तावडीतून सुटलेले नाही. मिठाईवाला या भागातील काही संवादांवर तत्कालीन बोर्डाने आक्षेप नोंदविले होते. मालिकेचा ब्रिटिश इंडियन सेट, काल्पनिक गाव हे सर्वच उभं करणं जिकीरीचं काम होतं. नारायण यांना अनेकदा विचारलं गेलं की मालगुडी नेमकं कुठं आहे? त्यावर त्यांनीच एकदा सांगून ठेवलं की दक्षिण भारतातलं कोणतंही एक गाव डोळ्यासमोर आणा ते म्हणजे मालगुडी. खरं म्हणजे नारायण यांच्या आयुष्याचा बराचसा काळ म्हैसूरच्या आसपास व्यतीत झाला. मालगुडीबद्दलची वर्णने त्याच भागाशी साधर्म्य दाखवतात. 1940 सलातलं म्हैसूर आणि 1987 सालातील म्हैसूरमध्ये बरीच तफावत झाली होती. त्यामुळे शंकर नाग यांच्या पुढील मोठं आव्हान होतं, तसं गाव उभं करणं. अखेर गावातून जाणारा एकच रस्ता, बाजूला वाहणारी शांत नदी असणारं पश्चिम घाटातलं टुमदार ‘अगुंबे’ सापडलं. अगुंबेला मालगुडीमध्ये रूपांतरित करण्याचं श्रेय जातं ते कला दिग्दर्शक ‘जॉन देवराज’ याला. त्याने मालगुडी उभं करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याने बैलगाड्या, पुतळे, दुकानं, बस स्टॅन्ड, शाळा, असं सर्वच उभं केलं. शंकर नागने हे गाव उभं करताना बारीक सारीक बाबींचा देखील खूप विचार केला होता. त्यामुळे ते केवळ अगुंबे न राहता मालगुडी म्हणून डोळ्यासमोर उभं राहतं. प्रत्यक्ष शूटिंगच्या काळात तर 100 हुन अधिक लोकांची टीम अगुंबे गावात राहत होती. जवळपास प्रत्येक घरात एक माणूस राहत होता. आजही तीन दशकांनी अगुंबेची मालगुडीशी असलेली ओळख पुसलेली नाही. नुकतेच अगुंबे गावाजवळील रेल्वे स्टेशनचे नामकरण मालगुडी असे करण्यात आले. यावरून आपणाला समजून येईल की ह्या मालिकेने तत्कालीन समाजमानसावर काय प्रचंड प्रभाव निर्माण केला असेल.

‘मालगुडी’ अस्सल भारतीय म्हणता येईल अशा राष्ट्रवादाचं प्रतिनिधित्व करतं. स्वदेशाबद्दलच्या लेखकाच्या भावना जागोजागी व्यक्त झाल्याचं आपणाला दिसून येईल. ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ मध्ये पहिल्याच भागात स्वामीचे शिक्षकांनी हिंदू संस्कृती विषयी अनुद्गार काढलेले कुचेष्टा केलीली स्वामीला आणि त्याच्या वकील वडिलांनाही रुचत नाही. त्या विषयीचा त्यांचा राग ते शाळेतील हेडमास्तरांना पत्र लिहून व्यक्त करतानाचे एक दृश्य आहे. स्वामीच्या वडिलांची भूमिका नुकतेच आपल्यातून गेलेले ‘गिरीश कर्नाड’ यांनी केली आहे. शिस्तप्रिय, कुटुंब वत्सल वकील पित्याची भूमिका गिरीश कर्नाड यांनी अविस्मरणीय केली. मालगुडी रंगवताना नारायण यांनी तत्कालीन समाजाच्या भवतालच्या परिस्थितीबद्दलच्या जाणिवा जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं आपणाला दिसून येईल.

मालगुडी हे संपूर्णपणे लेखकाच्या म्हणजेच नारायण यांच्या दृष्टीकोनातून आकाराला आलेली कलाकृती आहे. भारतातील कोणतेही निमशहरी गाव डोळ्यासमोर आणा. मालगुडीचा पाया तो आहे. कोणत्याही निमशहरी गावावर होत असणारा राजकीय, औद्योगिक कारणांमुळे होत असणारा बरावाईट परिणाम मालगुडीवर सुद्धा होतो आहेच. याशिवाय मालगुडीमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा मालगुडीवर असलेला प्रभाव. माली नावाचे एक पात्र आपणाला ‘मिठाईवाला’ या भागात भेटते. (‘माली’ची भूमिका खुद्द शंकर नाग यानेच केली आहे.) माली काही वर्षे पश्चिमेत स्थायिक झाल्यानंतर पुन्हा मालगुडीत परततो तर त्याच्यात आमूलाग्र बदल झाल्याचे आपणाला दिसते. पाश्चिमात्य मालीने आता इथली संस्कृती रीतिरिवाज टाकून दिलेत. एवढंच नाही तर हा माली मोठमोठाल्या औद्योगिकीकरणाबद्दल बोलतोय, गोमांस हे येथील भुकेवरील (अन्न टंचाईवरील) इलाज असल्याचं तो आवर्जून सांगतांना आपणाला दिसतोय. मालगुडी जसं जसं पुढे जात राहतंय तस तसं मालगुडी सुद्धा खेड्यापासून शहरापर्यंत (निमशहर) बदलताना आपणाला दिसतं. इतकंच काय आजूबाजूची खेडी सुद्धा विकासाच्या रेट्यात बदलताना दिसत राहतात. त्याप्रमाणे लोकसुद्धा बदलत राहतात. त्यांच्या विचारांची, वागण्या बोलण्याची ही सतत संथ पध्दतीने होत राहणारी उत्क्रांतीच जणू!

म्हणूनच ‘स्वामी अँड फ्रेंड्स’मधील मालगुडी आणि ‘मिठाईवाला’ मधील मालगुडी हे एक नाही. मिठाईवालामध्ये आता ते निम्न औद्योगिक शहर बनलंय. आता गावात बँक आलीये, मिशनरी शाळा, कॉलेज, रेस्टॉरंट, विमा कंपनी, चित्रपट गृहे, दवाखाने असं काय काय येत रहातं. बदलत जाणारं आणि ‘विकसित’ होत जाणारं मालगुडी पाहणं मला उद्बोधक वाटत राहतं. नारायण ह्यांनी हे बदल फारच सूक्ष्मपणे टिपले आहेत. स्वातंत्र्यामुळे खरोखरच झालेला उपयोग मालगुडीने फार चटकन आत्मसात केलाय. आणि तो होत राहिलेला बदल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात नारायण आणि शंकर नाग असे दोन्हीही कमालीचे यशस्वी ठरले आहेत.

गाव मोठं होत गेलंय म्हणजेच गावाचं राजकारणही मोठं होत चाललंय. गावात नगरपालिका आहे. भारतातील सर्वच नगरपालिकेत जे चालतं त्याला मालगुडी तरी कसा काय अपवाद असेल. मालगुडीत रंगवलेली तत्कालीन निवडणूकित आजही सुमारे 30 वर्षांनंतरही तसूभरही बदल झालेला नाही. अर्थात असा काही बदल होईल अशी आशा बाळगणं हेच हास्यास्पद वाटेल कदाचित.

नारायण यांचा भर मुख्यत्वे मालगुडीतील पर्यायाने भारतातील सामाजिक-राजकीय आणि आर्थिक-सांस्कृतिक बदलांमुळे सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात काय काय बदल होत गेले, यावर असल्याचं आपणाला दिसून येईल. पण असं असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट इथे मला नमूद करायला आवडेल की, जितकं मालगुडी भौतिक अर्थाने बदलत गेलंय तितकेच लोक सुद्धा आपली अस्सल म्हणवली जाणारी संस्कृती, रीतिरिवाज देखील टिकवताना दिसत आहेत. हे भारताच्या पातळीवर लक्षात घेतल्यास अधिक सुस्पष्ट होईल. शतकानुशतके इथे अनेक आक्रमणे झालीत. शकांपासून ते ब्रिटिशांपर्यंत अनेक धर्माचे, पंथाचे लोक ह्या भूमीने आपल्यात सामावून घेतले. ते देखील इतके समरस झालेत जणू काही हे मूळचे इथलेच! मालगुडी सुद्धा तसेच आहे. मालगुडीमध्ये नेहमीच नारायण यांनी पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केल्याचं आपणाला दिसून येईल. भारतीय मूल्य इथे जपली गेली आहेत. मालगुडीत कोणत्याच श्रद्धेला अंधतेने स्वीकारलेले नाही. मात्र त्याबरोबरीने इथे मानवतावादाला आणि वास्तविकतेला सुद्धा तेवढंच स्थान आहे.

भारत नावाच्या विशाल भूप्रदेशाचे, संस्कृतीचे ‘मालगुडी’ हे एक छोटे आणि मूर्तिमंत प्रारूपच आहे. भारतात घडणार्‍या- बिघडणार्‍या, असलेल्या-नसलेल्या, भाव-भावना मालगुडीच्या रुपात आपणा समोर उभ्या राहतात. मालगुडीची गोष्ट केवळ मालगुडीची न राहता ती भारताची कधी होते आपणाला कळतही नाही. पर्यायाने ती गोष्ट आपली झालेली असते म्हणून ती अधिक जवळची वाटत राहते. मालगुडीतील प्रश्न हे भारताचे प्रश्न झालेले असतात. त्यांची उत्तरे ही इथल्या कोणत्याही गावातील/शहरातील प्रश्नांवरची उत्तरे असतात. आज सुमारे 35 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी मालगुडीतील मजा कमी होत नाही. तिचं महत्त्व जराही कमी होत नाही. किंबहुना ते दिवसेंदिवस वाढतच राहील. मालगुडीचं यश हे आहे.

मालिकेचे सर्व भाग youtube वर उपलब्ध आहेत.

© पूर्वल पाटील

poorwal.patil@gmail.com