पुरुष जननेंद्रिय (आकार – विपर्यास आणि भय)

Sex Education : Male External Genital Organs Size Misconception And Fear

[Image Source: Link]

आकार –

पुरुषाला इतर कशाचीही भीती वाटत नसते, परंतु तो स्वतःच्या लिंगाच्या आकाराच्या संदर्भात फार काळजीत असतो असे दिसून आले आहे. प्रत्येक पुरुषाला स्वतःचे लिंग इतरांपेक्षा लहान आहे असेच वाटत असते. कोणालाही स्वतःचे लिंग मोठे वाटत नसते. प्रत्यक्षात लिंगाचा आकार हा शिथिलावस्थेते असताना मोजायचा नसतो. लिंग ताठरल्यानंतर विशिष्ट प्रकाराने त्याची लांबी मोजली कि 12 ते 16 सेंटीमीटर इतके असते. परंतु अगदी सहा सेंटीमीटर इतकी जरी लिंगाची लांबी ताठरल्यानंतर झाली असली तरी ते नैसर्गिक आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे असते. अनेकदा लिंगाची लांबी मोजताना पुरुष चुकतात किंवा गैरसमजुतीत अडकतात. जांघेतील केसांची वाढ जास्त होणे, जाडी वाढल्याने पोट खाली येणे अशा कारणांमुळे लिंग लहान असल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात ते लहान नसते. शिवाय लिंगाची लांबी ही अनुवंशिकतेवर ठरते किंवा ठरलेली असते. त्यात कोणतेही बदल करता येत नाहीत. ताठरल्यानंतर जर लिंगाची लांबी 1 ते 4 सेंटीमीटर इतकी असेल तर ते लहान लिंग म्हणावे लागेल. ही जन्मजात विकृती असते. त्यात बदल करता येत नाहीत. हस्तमैथुन, संभोग काहींमध्ये झोपेतील वीर्यपतन यांचे कितीही प्रमाण असो त्याने लिंग लहान किंवा मोठे होत नसते, हे लक्षात ठेवावे.

सर्वेक्षणातून असे लक्षात आले आहे कि अरब, अमेरिकन लोकांचे लिंग इतरांपेक्षा मोठे असते. जपानी लोकांचे लिंग उद्दीपित अवस्थेत इतरांपेक्षा लहान असते. हा फरक साधारणपणे दोन ते अडीच सेंटीमीटर इतका असतो असे सर्वेक्षण सांगते.

लिंग आणि जीभ हे मानवी शरीरातील दोन अवयव असे आहेत की ज्यांत हाड नाही. जर लिंगाची लांबी, आकार तेल, मलम यांनी बदलता येतो असं दररोज वृत्तपत्र आणि रेल्वेमधून बाहेर दिसणार्या जाहिरातींवरून गृहीत धरलं तर, तर या जाहिरातदार डॉक्टरांनी जीभ वाढवून दाखवावी. अर्थातच असे ते करून दाखवणार नाहीत आणि करूही शकणार नाहीत. कारण जीभ हा अवयव सर्वाना पाहता येतो. म्हणजे तो इझिली व्हिजिबल असतो. परंतु लिंगाचे तसे नाही. त्यामुळे लिंगाच्या आकाराच्या संदर्भात ‘गुण’ आला नाही तरी कोणी कुणाला सांगू शकत नाही. त्यामुळे या जाहिरातदार डॉक्टरांचे फावते, त्यांचा धंदासुद्धा जोरात चालतो. हाच प्रकार स्तनांच्या वृद्धीबाबतही खरा आहे. शरीराचा उघडा किंवा इझिली व्हिजिबल भाग किंवा अवयव वाढवून दाखवतो असा दावा ही ‘वैद्य’ लोकं करत नसतात. भोळसट किंवा अज्ञानी समाज अशा जाहिराती वाचून निव्वळ पैसा खर्च करत राहतो. शिवाय हे ‘अवघड जागेचं’ ऑपरेशन असल्याने कोणीही परिणामाबद्दल उघड वाच्यताही करीत नाही. लिंगाचा आकार वाढवण्यासाठी ‘खोबरेल’ तेलाचा उपाय करायला सांगणारे सुद्धा ‘वैद्य’ मी पाहिलेले आहेत.

स्त्री योनीमार्ग शिथिलावस्थेत आठ ते दहा सेंटीमीटर असतो. स्त्रीची कामवासना वाढल्यानंतर तो अजून तीन ते चार सेंटीमीटरने वाढतो. म्हणजे मोठे लिंग असलेल्या पुरुषाकडून वास्तविकतेमध्ये स्त्रीला त्रास होतो, आनंद मिळत नसतो. कामुक चित्रपटांमध्ये लिंग सरासरीपेक्षा मोठे असणार्या पुरुषांना उदा. आफिकन, अमेरिकन, युरोपियन इ. पुरुषांना चित्रपटात घेतात. असे चित्रपट पाहताना विशेषतः पुरुष प्रेक्षक साहजिकच तुलना करतो आणि घाबरतो. बाजारात मिळणारे काँडोम्स हे सरासरी लिंगाची लांबी लक्षात घेऊनच तयार केलेले असतात. जर ताठरलेल्या लिंगावर बाजारात मिळणारे काँडोम्स व्यवस्थित बसतात याचा अर्थ सोप्पा आहे, कि लिंगाचा आकार लहान नाही.

समस्या :

प्रयपिझम – पुरुषांना संभोगापूर्वी किंवा संभोगानंतर हा त्रास होऊ शकतो. यात शिश्नामध्ये चार ते सहा तासंपेक्षा जास्त काळ टिकून राहील अशी ताठरता येते. यामुळे काही केसेसमध्ये पुरुषांना वेदना जाणवतात. काही पुरुषांना शिश्नात वेदना जाणवत नाहीत. असे का घडते याची अनेक कारणे आहेत. मूत्रवाहक नलिकांमध्ये सूज येणे, इन्फेक्शन होणे, रक्ताचा कर्करोग, मसिकल सेलचा आजार असणे, ताठरता वाढण्यासाठी लिंगात इंजेक्शन टोचून घेणे. अशा इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे लिंगाला मोठी इजा होणे, शिवाय मानसिक रोगांवर कार्य करणारी काही अॅलोपॅथिक औषधांमुळे सुद्धा ‘प्रायपिझम’ ही समस्या उद्भवते. या आजाराचे निदान करण्यासाठी रक्तातील ‘वायूं’चे प्रमाण पाहावे लागते.

यावर उपचार करताना इपिनेकरिन, किनाईलेप्रिन यांचा वापर इंजेक्शनद्वारे लिंगामध्ये केला जातो. हा उपचार मात्र प्रशिक्षित मूत्ररोगतज्ज्ञ व सेक्सॉलॉजिस्ट करू शकतात. सर्व सेक्सॉलॉजिस्ट यावर उपचार करत नाहीत. खूप काळ ताठर लिंग तसेच राहिले तर ‘नपुंसकत्व’ येण्याची शक्यता वाढत असते. यावर वृत्तपत्रीय जाहिरातदार भोंदू डॉक्टर उपचार करत नाहीत हे लक्षात असू द्या!

Sex Education : Male External Genital Organs Size Misconception And Fear
[Image Source: Link]

शिश्नातील इजा – लिंगामध्ये तीन मऊ नळ्या असतात. त्यांना कॉर्पोरेल बॉडीज म्हणतात. त्यात रक्तवाहिन्या व चेतावाही संस्था (Nervous System) कार्यरत असतात. अपघात, मारामारी, शिश्नाला काठी, दगडाने अंतर्गत इजा झाली असल्यास लिंगातील नळ्यांभोवतीचे पातळ आवरण फाटले जाते. शस्त्रक्रिया लवकर आणि वेळेत केली नाही तर कायमस्वरूपी ‘नपुंसकत्व’ प्राप्त होते. काहीवेळा जोरात हस्तमैथुन करणे, संभोगात जबरदस्तीने गुदमैथुन करताना किंवा उद्दीपित लिंगावर स्त्री चुकीच्या पद्धतीने बसल्यास ताठरलेल्या लिंगातील नळ्या आतील बाजूस फुटतात व लिंग पंक्चर होते. यावर मायक्रोसर्जन व मूत्ररोगतज्ज्ञ उपचार करतात.

शिश्नाचा सोरायसिस – कातडीचा सोरायसिस हा आजार अनेकजण ऐकून आहेत. शरीरावरील इतर त्वचेला जसा होतो तसाच पुरुषाच्या लिंगावर देखील सोरायसिस होतो. त्वचेच्या खपल्या धरून त्याला खूप खाज सुटते, वेदना होतात. सतत खाजवल्यामुळे प्रथमदर्शनी बरे वाटते. अर्थातच अतिहस्तमैथुन किंवा अतिसंभोगामुळे हा आजार होत नाही. मानसिक त्रास वाढला की हा आजार बळावतो. मनोशारीरिक आजारात या शिश्नाच्या सोरायसिसचा अंतर्भाव होवू शकतो. गार किंवा गरम पाणी लावल्याचे चांगले वाटते. खाज सुटत असल्याने हस्तमैथुन किंवा संभोग करावासा वाटतो कारण घर्षणाने चांगले वाटत असते. यामागे ‘वासना’ खूप आहे म्हणून जास्त हस्तमैथुन, संभोग केला जातो असे वाटते, परंतु सोरायसिसच्या त्रासामुळे हे होत असते तरी हा आजार संसर्गजन्य नाही, पण अनुवांशिक असू शकतो. खाज कमी करण्यासाठी मलम, तेल (अर्थातच औषधी) वापरता येते. हे मलम, तेल लावल्यानंतर काँडोमचा वापर करून संभोग सुख घेता येवू शकते. काही पुरुष हा आजार लपवून ठेवतात आणि लग्न करतात. ह्या आजारावर अजूनतरी उपाय सापडलेला नाही. पण काळजी नसावी हा जीवघेणा नाही!

पेरोनिस डिसीज – पेरोनिस डिसीज म्हणेज लिंगातील वाकडेपणा. वृत्तपत्रातील लैंगिक समस्यांवरील जाहिरातींमध्ये ही समस्या अनेकदा अधोरेखित केलेली असते. परंतु ती निव्वळ बनवाबनवी आहे. इंड्यूरेटो पेनिस प्लास्टीका असे 1743 साली या आजाराला नाव देण्यात आले आहे. फ्रान्सचा राजा 15 वा लुईस हा या आजाराने पिडीत होता. त्या काळच्या शल्यविशारद, डॉक्टर मला पेरोनीफ याच्या नावावरून हे नाव पडले आहे. मपेरोनिसफ यामध्ये लिंग हळूहळू इतके वाकडे होते जाते कि योनीमार्गात प्रवेश होणे कठीण होते. लिंगाला गाठ तयार होते, ती गाठ ज्या बाजूला असते त्या बाजूला लिंग कलते. संभोग न करता आल्याने तो नपुंसकत्व, कमी वासना या समस्येला सामोरा जातो. लिंगाची सोनोग्राफी केल्यानंतर त्यातील कॅल्सीफिकेशन दिसून येते. तात्पुरता उपाय म्हणून व्हिटॅमिन ई वापरले जाते. यावर चांगला आणि अंतिम उपाय म्हणजे शस्त्रक्रिया होय. मायक्रोसर्जन व मूत्ररोगतज्ज्ञ हे यावर शास्त्रक्रिया करतात. पेरोनिस डिसीज केलेल्या शस्त्रक्रियेचे दोन परिमाण होऊ शकतात. एक : लिंगाचा आकार थोडा कमी होऊ शकतो, आणि दुसरा परिणाम म्हणजे ताठरतेला अडचण येऊ शकते.

मधुमेह, गुप्तरोग, लिंगाला झालेला आघात व त्यामुळे लिंगाला झालेली इजा, उच्च रक्तदाबावरील औषधाच्या साईडइफेक्टमुळे रक्त व किडनीतील काही आजार यामुळे लिंगाला वाकडेपणा येत असतो. अतिहस्तमैथुन किंवा अतिसंभोग, झोपेतील वीर्यपतन यामुळे लिंगाला वाकडेपणा येत नाही, हे लक्षात ठेवावे. लिंगाचा कर्करोग हा सुद्धा मोठा आजार आहे. पण तो खूप कमी आढळतो. त्याचे प्रमाण नगण्य म्हणावे असे आहे. पण काही पेशंटमध्ये लिंगाचा कर्करोग झाल्यास पूर्ण लिंग ऑपरेशन करून कापावे लागते. विवाहापूर्वी किंवा संभोगापूर्वी पुरुषाने जननेंद्रियाची तज्ञ डॉक्टरकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे, म्हणजे त्या त्या वेळी योग्य तो उपचार करता येतो.

या मासिकातून लैंगिक शिक्षण आणि लैंगिक प्रबोधन करणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी कोल्हापूरचे डॉक्टर राहुल पाटील यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांचा अल्प परिचय खालीलप्रमाणे :

डॉ. राहुल पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील पहिले विवाहपूर्व मार्गदर्शन, लैंगिक समस्या निवारण केंद्र डॉ. राहुल पाटील यांनी स्थापन केले आहे. ‘आधुनिक कामशास्त्र’ या विषयातले तज्ज्ञ म्हणून डॉक्टर ज्ञात आहेत. 2001 साली त्यांनी कोल्हापूर येथे ‘आकांक्षा कन्सल्टन्सी’ हे विवाहपूर्व मार्गदर्शन, लैंगिक समस्या निवारण केंद्र स्थापन केले आहे. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून ‘लैंगिक शिक्षण कशासाठी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान सुद्धा झाले आहे. 2001 ते 2009 या काळात तरुण भारत, पुढारी, रत्नागिरी टाईम्स, पोलीस टाईम्स या दैनिकांतून त्यांचे हजारो लेख प्रकाशित झाले आहेत.

आजपर्यंत त्यांची ‘कामजिज्ञासा, ऑल अबाऊट सेक्स, ऑल अबाऊट सेक्स पोझिशन्स, निरामय कामजिज्ञासा’ ही चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रातील खोट्या जाहिराती देणार्या दोन भोंदू डॉक्टरांना त्यांच्या मदतीने अटक झाली आहे.

संपर्क – drrahul2000@yahoo.com