महात्मा फुले कृत शिवचरित्र : एक आकलन

Mahatma Fule's assessment of shivacharitra

महात्मा फुले यांनी एक शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला आहे, हे सर्वविदित आहे. तसेच त्यांच्या अन्य लेखनातही छत्रपती शिवाजी महाराजांचे संदर्भ येत राहतात. महात्मा फुले यांचे शिवचरित्रविषयक जे ‘आकलन’ होते त्याचे आकलन करून घेणे हे या लेखाचे उद्दिष्ट आहे.

महात्मा फुले यांनी मांडलेली तथ्ये बरोबर की चूक हे ,इथे ठरवावयाचे नाही. तसे करणे कदाचित अन्यायकारक ठरेल. त्याचे एक कारण असे की, ज्यास आपण रूढार्थाने इतिहासकार म्हणतो तसे म. फुले काही इतिहासकार नव्हते. ते होते समाजक्रांतिकारक. एका सामाजिक नेत्याने शिवचरित्रावर केलेले भाष्य या दॄष्टीनेच त्याकडे पहायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात या विषयाचे संशोधनही फार पुढे गेले नव्हते. संशोधक मंडळी त्यांच्या परीने साधने गोळा करीत होती. कित्येक महत्त्वाची साधने ही, म. फुले यांच्या मॄत्यूनंतर उजेडात आली. उदा : शिवभारत, जेधे शकावली इ.

कोणताही भाष्यकार हा त्या विशिष्ट काळाचा अपत्य असतो. कोणताही इतिहास अभ्यासक हा त्याच्या दॄष्टिकोणातून तथ्यांची मांडणी करत असतो. त्याने केलेली तथ्यांची निवड, मांडणी, रचना, जोडलेला कार्यकारणभाव, काढलेले निष्कर्ष, यातून त्याची विशिष्ट अशी दॄष्टी प्रकट होत असते. म्हणूनच कोणत्याही दोन इतिहासकारांची भाष्ये ही समसमान नसतात. त्याच्यावर अटळपणे त्या इतिहासकाराच्या दॄष्टीचा प्रभाव पडतो व त्यामुळे त्या त्या इतिहासकाराचा इतिहास काही प्रमाणात वेगळा असतो. जरी महात्मा फुले अॅकॅडमीक इतिहासकार नसले तरी त्यांची स्वत:ची अशी एक इतिहासदॄष्टी होती. त्यांच्या या लेखनामागे त्यांच्या कोणत्या प्रेरणा, विचार, भावना, हेतू अथवा राजकारणे होती व त्यातून त्यांची कुठली इतिहासदॄष्टी प्रकट होते याचाही शोध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

शिवचरित्राची रूपरेषा –

हा पोवाडाच असल्याने तो फार तपशीलवार असण्याची अपेक्षा करता येणार नाही. तरीही त्याने सुमारे ४० पाने व्यापली आहेत. शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा यात घेण्यात आला आहे. हा पोवाडा आठ भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात शिवरायांचा जन्म आणि बालपण येते. दुसऱ्या भागात जिजाईंनी केलेले संस्कार, आर्य (ब्राम्हण) व क्षत्रिय यांचा संघर्ष तसेच मुस्लिम राज्यकत्र्यांचे अत्याचार व शिवरायांचे प्रारंभिक काळातील पराक्रम येतो. त्यानंतर अफजलखान प्रकरण, सिद्दी जौहर, शाहिस्तेखान, दिलेरखान-जयसिंग स्वारी, आगऱ्याहून सुटका इ. तपशील सहाव्या भागापर्यंत पूर्ण होतात. त्यानंतर तानाजीचा पराक्रम, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, व्यंकोजीला उपदेश व शिवरायांचा मृत्यू इ. तपाशील येतात. त्यानंतर शिवरायांचे सविस्तर गुणवर्णन येते. या भागात शिवाजी राजांचे मूल्यमापन असल्याने या भागाला पोवाडयाचा गाभ्याचा भाग असे म्हणता येर्इल. सर्वात शेवटी एक अभंग त्यांनी रचला आहे. त्यात इंग्लडच्या राणीला त्यांनी शूद्रांना ब्राम्हणशाहीपासून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

सर्वसाधारणपणे कोणत्याही इतिहासासंबंधी दोन वेगवेगळ्या अभ्यासकांनी दिलेले तपशील फार वेगळे नसतात. पण तरीही प्रत्येक अभ्यासकाने लावलेला अन्वयार्थ मात्र काही प्रमाणात वेगळा असतो. याचे कारण म्हणजे त्या अभ्यासकाचा दॄष्टीकोन. तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर त्या अभ्यासकाने तथ्यांची ‘निवड’ कशा प्रकारे केली आहे, हे प्रथम समजून घ्यावे लागते. कोणती तथ्ये त्या अभ्यासकाला किती महत्त्वाची वाटली व कोणती तथ्ये त्यास दुर्लक्षणीय वाटली हे समजून घेणे; त्याची इतिहासदॄष्टी समजून घेण्याच्या दॄष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच इतिहासाच्या कित्येक जागा अशा असतात की तिथे अभ्यासकाला ‘भूमिका’ घ्यावी लागते. मुख्यत: अशा ठिकाणी त्या अभ्यासकाच्या दॄष्टीचा उलगडा होतो. इतिहासात जो वादग्रस्त भाग असतो, तो बहुतांस वेळा हाच असतो. इतिहासातल्या अशा जागा वैचारिक क्षेत्रातील रणक्षेत्रे बनतात. इतिहासदॄष्टी समजून घेताना अशा जागा नीट पहाव्या लागतात.

ब्राह्मण – ब्राह्मणेतर संबंध –

म. फुले यांच्या इतिहास आकलनानुसार आर्य (पक्षी: ब्राम्हण) हे इराणमधून आलेले होते. इथल्या स्थानिक क्षत्रियांना त्यांनी हरवले होते. पुढे त्यांना स्वत:चे दास बनवले होते. पोवाडयाच्या अगोदर असलेल्या प्रस्तावनेत तसेच अभंगातही हा संघर्ष त्यांनी चितारला आहे. (पहा म. फुले समग्र साहित्य पॄ. 40 ते 42) हा आर्य-अनार्य संघर्ष पोवाडयात नंतरही आला आहे. त्यांच्या मते परशुरामाने 21 वेळा अतिशय निर्घॄणपणे पॄथ्वी नि:क्षत्रिय केली. (नि:क्षत्रिय याचा अर्थ इथे तारतम्यानेच घ्यायचा आहे. कारण प्रत्यक्षात बरेचसे क्षत्रिय उरले व त्यांना शुद्रातिशूद्रांचे कनिष्ठ स्थान देऊन ठेवण्यात आले.) हा सर्व इतिहास त्यांनी जिजाईंन मुखातून वदवला आहे. अर्थात या सर्वांचे परिणाम काही चांगले झाले नाहीत. कारण यामुळे यवनांचे (पक्षी : मुस्लीम) फावले. व त्या मुस्लीम राज्यकर्त्यांनी सर्वांना त्रास देण्यास सुरूवात केली. पोवाडा समाप्त झाल्यानंतर म. फुल्यांनी शेवटी एक अभंग दिलेला आहे. त्यात सुद्धा जिकडे-तिकडे ब्राह्मणशाही कशी माजलेली आहे व तिचा त्रास शुद्रातिशूद्रांना कसा होतो आहे, हे म. फुले इंग्लंडच्या राणीला सांगतात. इंग्रजांची जरी सत्ता असली तरी ती त्यांच्या मते जागॄत नव्हती. म. फुले या सत्तेला डोळे उघडून पाहण्याची व या दुष्ट भटशाहीपासून सोडविण्याची विनंती करतात. (पॄ. 72). म. फुले यांचे एकूण इतिहासाचे आकलन असे होते की, ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष हा या भूमीतला अतिशय मूलगामी असा संघर्ष आहे. प्राचीन काळी आर्यांनी (ब्राह्मणांनी) हा देश जिंकला व इथल्या शुद्रातीशूद्रांवर दास्य लादले. ते अत्तापर्यंत तसेच आहे. तो प्राचीन काळाचा द्वेषच पुढे चालू राहिला. ब्राह्मणांनी आधी शस्त्राच्या बळावर तर नंतर लेखणीच्या बळावर शुद्रातिशूद्रांवर दास्य लादले.

दादोजी कोंडदेव-रामदास-तुकाराम-गागाभट्ट –

वरील व्यक्तींचा शिवाजी महाराजांशी नेमका काय संबंध होता, हा इतिहासात एक भलताच वादग्रस्त प्रश्न बनून राहिला आहे. हे वाद अद्यापही पूर्णपणे मिटलेले नाहीत. विशेषत: यातल्या पहिल्या तीन व्यक्ती या शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या किंवा नव्हत्या असे दोन्ही बाजूने हिरीहिरीने सांगितले जात असते. यातल्या एकेका व्यक्तीविषयी म. फुले यांनी काय भूमिका घेतली ती पाहू. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू असून त्यांनी बालपणी शिवरायांना शिक्षण दिले व त्याअर्थी ते शिवरायांचे गुरू आहेत, असे सांगितले जात असते. म. फुले यांना हे मान्य नाही. “मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा” असे ते म्हणतात. (पॄ. 48). शिवरायांच्या शिक्षणाचे श्रेय त्यांनी दादोजी कोंडदेवांना दिलेले नसले तरी जाणिवपूर्वक शिवाजी राजांना अज्ञानी (अविद्वान) ठेवण्याचे (अप)श्रेय मात्र त्यांनी दिले आहे. (पॄ. 556) पुढे 1886 साली मामा परमानंद यांना लिहिलेल्या पत्रातही त्यांनी आजकालचे ब्रााम्हण दादोजी कोंडदेवास फाजील महत्त्व देतात असे मत व्यक्त केले आहे. (पॄ.406). शिवरायांची गुरू मानली गेलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे समर्थ रामदास. फुले यांना रामदास हे शिवरायांचे गुरू होते, हे मान्य आहे. पण त्यावर त्यांचे म्हणणे असे की ‘लोकप्रीतीकरिता करी गुरू रामदासास’ (पॄ. 54). थोडक्यात म. फुल्यांच्या मते तो शिवरायांचा एक ‘पवित्रा’ आहे. फुले वाङ्मयात रामदासांविषयी बरेच उल्लेख येतात. त्याचा एकुण आशय असा की रामदास एक मतलबी व स्वजातीहिताार्थ काम करणारे संत होते| शिवाजी राजे आणि संत तुकाराम यांच्यातील स्नेह रामदास आणि गागाभट्ट यांनी जाणिवपूर्वक वाढू दिला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, “नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यांचातील शिवाजी राजास बोध करून त्याचे हातून भटब्राम्हणाच्या कॄत्रीमी धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यांस त्यांच्या पाशातून सोडवील, या भयास्तव भटब्रम्हणातील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगन्मताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व निस्पॄह तुकारामबुवांचा पुरता स्नेह वाढू दिला नाही.” (पॄ. 266). या उदाहरणावरून शिवाजी – रामदास – तुकाराम यांच्या आपसातील संबंधाविषयी त्यांची मते पुरेशी स्पष्ट होतात. असे दिसते की ब्राम्हण संतांकडे म. फुले संशयाने पाहतात. रामदास त्यास अपवाद नाहीत. गागाभटांविषयी पोवाडयात असे म्हटले आहे की,

काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा | केला खेळ गारूडयाचा ||

लुटारू शिवाजी लुटला धाक गॄहफौजेचा | खर्च नको दारू-गोळ्याचा ||

(पॄ. 67). थोडक्यात गागाभट्टांनीही शिवाजीराजांच्या धर्मभावनेचा गैरफायदा घेत स्वत:चा स्वार्थ साधला, असे म. फुल्यांचे मत आहे. एकुण शिवकालात शिवाजी राजांसी संबंध आलेले बहुतांश ब्राह्मण ‘मतलबी’ होते, अशी म. फुले यांची धारणा दिसते.

गोब्राह्मणप्रतिपालन –

शिवचरित्रातले हे अजुन एक वादग्रस्त प्रकरण. शिवाजी महाराज गोब्राह्मण-प्रतिपालक होते काय, याविषयी भाष्यकारांनी परस्परविरोधी मते दिली आहेत. म. फुले यांच्या पोवाडयातून या मुद्याविषयी त्यांची भूमिका नीट स्पष्ट होत नाही. पण पोवाडयाची पहिलीच ओळ अशी आहे,

“लंगोटयास देर्इ जानवी पोशिंदा कुणब्याचा|”

बहूदा याचा अर्थ असा दिसतो की शिवाजी नामक शेतकरी राजाने ब्राम्हणांची ‘जानवी’ राखली. म्हणजे ते गोब्राह्मण-प्रतिपालकच होते- फक्त फरक असा की एरवी ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ शब्दात गाय नि ब्राह्मण यांना एक पावित्र असते, ते म. फुल्यांना अभिप्रेत नाही. इथे शिवाजी राजा त्राता तर ब्राह्मण त्यांचे आश्रित मात्र आहेत. पुढे ‘गुलामगिरी’ या ग्रंथात “शिवाजीसारख्या धर्मभोळ्या, अज्ञानी, शूद्र राजाने आपला देश म्लेंच्छांपासून सोडवून गायीब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक हुलथापा देऊन त्यांस पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडितात….”(पॄ.159). नंतर ‘शेतकऱ्यांचा आसूड’ मध्ये एक उल्लेख येतो की, “……अशा बुद्धिमान मानवजातीपैक शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जरजर करून गायीब्राम्हणांसह त्यांच्या मतलबी धर्माचा प्रतिपाळ केला.”( पॄ. 316) एकुण असे दिसते की या मुद्द्यावर फुले यांची भूमिका काहीशी अस्थिर आहे. म. फुले शिवाजी राजांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ मानतात. मात्र या मुद्यास फाजील महत्त्व देण्यास त्यांचा विरोध आहे. मामा परमानंदास लिहिलेल्या पत्रात अशा आशयाचा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. (पॄ. 406)

King Shivaji

हिंदु-मुस्लीम प्रश्न –

शिवकाळात हिंदू-मुस्लिम प्रश्नाचे स्परूप काय होते, हा अजून एक वादग्रस्त विषय. म. फुले यांनी याबाबतीत आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. मुस्लिम राज्यकत्र्यांनी भारतावर आक्रमण करून हिंदूंवर अत्याचार केले, असा त्यांचा निष्कर्ष आहे. पोवाडयातल्या पुढील काही ओळी पहा

काबुला सोडी | नदांत उडी||

ठेवितो दाडी || हिंदूस पीडी ||

बामना बोडी | इंद्रिये तोडी ||

पिंडीस फोडी | देउळ पाडी ||

चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||

गोमांसी गोडी | डुकरा सोडी ||

खंडयास ताडी | जेजुरी गडी ||

भुग्यास सोडी | खोडीस मोडी ||

मूर्तीस काढी | काबुला धाडी ||

झाडीस तोडी | लुटली खेडी ||

गडांस वेढी | लावली शिडी ||

हिंदुस झोडी | धर्मास खोडी ||

राज्यास बेडी | कातडी काढी ||

गर्दना मोडी | कैलासा धाडी ||

देऊळे फोडी | बांधीतो माडी ||

उडवी घोडी | कपाळ आढी ||

मिजास बडी | ताजीम खडी ||

बुरखा सोडी | पत्नीस पीडी ||

गायनी गोडी | थैलीते सोडी ||

माताबोध मनी ठसता राग आला यवनांचा ||

बेत मग केला लढण्याचा || (पॄ.47-48)

एकूण सारांश असा की मुस्लिम राज्यकत्र्यांच्या अत्याचारांमुळे शिवाजीराजांना मुस्लिम सत्तेविरोधी लढावे लागले. म. फुले यांच्या मते हा हिंदू-मुस्लीम संघर्ष असा आहे. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्यावर फुले म्हणतात, “झेंडा रोवला हिंदूचा” म्हणजे शिवरायांचे राज्य फुल्यांना हिंदुराज्य वाटते, असे दिसते.

इस्लामविषयक भूमिका –

फुले यांनी लिहलेल्या पोवाडयात तरी त्यांची इस्लाम धर्माविषयक भूमिका नीट स्पष्ट होत नाही. मात्र मुस्लीम आक्रमकांनी जे अत्याचार केले होते, ते मात्र त्यांच्या मते धार्मिक स्वरूपाचे होते. त्यात देवळे फोडणे, मुर्तीभंजन, गो-हत्या, चित्रे व लेण्यांचा विंध्वस इ. गोष्टी येतात. एकुण हिंदु धर्म नष्ट करणे, असा त्याचा आशय आहे. हे अशाप्रकारे हिंदूधर्म नष्ट करणे हे अर्थातच वाइट आहे असा पोवाडयातला अभिप्राय आहे. मात्र पुढे ही भूमिका काही प्रमाणात बदलली आहे. हिंदूधर्म हा त्यांना पहिल्यापासूनच अतिशय दोषयूक्त वाटत असला तरी पुढे तो त्यांना अगदीच असुधारणीय वाटू लागला होता. तुलनेने इस्लाम धर्म सार्वजनिक सत्यधर्माच्या जवळचा आणि उन्नत धर्म आहे असे त्यांचे मत बनले. याचे मुख्य कारण असे की इस्लामी धर्मग्रंथ ‘कुराण’ सर्वानाच वाचून पाहण्याची मुभा होती. तसेच मुस्लीमांमध्ये आपसात रोटी-बेटी व्यवहारालाही काहीच अडचण नव्हती व ते एकमेकांना भावंडाप्रमाणे मानतात, असे फुले यांचे मत बनले. (पॄ. ४७०) परिणामी मुस्लीम राज्यकर्त्यांच्या धार्मिक अत्याचारांविषयीसुद्धा त्यांचे मत बदलेले दिसते.

उदा.’शेतकऱ्यांचा आसूड’ मध्ये ते एका ठिकाणी म्हणतात की “……हजरत महंमद पैगंबरचे जहामर्द शिष्य, आर्य भटांचे कॄत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मुर्तीचा तलवारीच्या प्रहारांनी विध्वंस करून, शूद्र शेतकऱ्यांस आर्यांचे ब्रह्मकपटातून मुक्त करू लागल्यामुळे भट ब्राह्मणांतील मुकूंदराज व ज्ञांनोबांनी ……… डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ठ केली की, ते कुराणासहित मंहमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलट द्वेश करू लागले.” (पॄ. 266). 1869 साली लिहिलेल्या पोवाडयात त्यांना मुस्लीम राज्यकर्ते हे धार्मिक अत्याचारी वाटत होते; ते नंतरच्या काळात शूद्रांना भटांच्या कॄत्रीमी धर्मातून मुक्त करणारे वाटू लागले. एवढेच नाही तर या मुस्लीम राज्यकर्त्यांना र्इश्वरानेच त्यांना या कार्यासाठी पाठविले आहे, असेही त्यांचे मत बनले. ‘सार्वजनिक सत्य धर्म’ या पुस्तकात ते म्हणतात, “यास्तव सर्वन्यायी आपल्या सर्वांच्या निर्मिकाने शुद्रादि अतिशूद्रांबद्दल धूर्त आर्यभटांस प्रायश्चित्त देऊन त्यांस शुद्धीवर आणण्याकरीता पूर्वी मुसलमानांस व हल्ली ख्रिस्ती लोकांस आर्यांचे धनी केले आहेत,………” (पॄ. 491). आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, “कॄत्रीमी आर्य भूदेव नटांच्या आपमतलबी बनावट धर्माच्या पाशात सापडलेल्या बहुतेक अज्ञानी मूर्तीपूजकांचे कल्याण होण्यासाठी कित्येक धार्मिक जाहामर्द मुस्लमानांनी आपल्या हातावर शिरे घेऊन तलवारींच्या जोराने त्यांनी आपल्या सारख्या त्यांच्या सुन्ता करून त्यांस “बिसमिल्ला हिर रहिमान निर्रहिम” असा महापवित्र कलमा पढवितात व त्यांस आपल्या सर्वांच्या सरळ सत्यमार्गावर नेतात.”(पॄ. 470). त्यामुळे मूर्तीभंजन व जबरी धर्मातरे यांच्याकडे फुले आर्यांच्या मतलबी धर्मातून मुक्तता या दॄष्टीने पाहू लागले. परिणामी शिवकाळातील हिंदू – मुस्लिम संघर्षाचे विषयी त्यांचे आकलन बदलून गेले. ते म्हणतात, “…… रामदास वगैरे ब्रह्मवॄंदातील महाधूर्त साधूंनी दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशुन्य शिवाजी सारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले.”(पॄ. 471). म्हणजे त्यांच्या उत्तरकालीन मतांतही त्यावेळचा संघर्ष हा धार्मिक संघर्ष होता, हे मत वस्तूस्थिती म्हणून कायम आहे. मात्र हा मुस्लिमविरोधी संघर्ष करण्यात शिवाजी राजांची फसवणुक झाली आहे, असे त्यांना वाटते. त्याचे (अप)श्रेय ते रामदास वगैरे साधूंना देतात.

स्त्री-विषयक भूमिका :

शिवाजी महाराजांचे स्त्री दाक्षिण्य इतिहासात प्रसिद्ध आहे. युद्धात सापडलेल्या स्त्रियांना सन्मानपूर्वक शिवराय कसे परत पाठवत, हे फुले यांनी सांगितले आहे. आपल्या उच्च नैतिक वर्तनातून शिवरायांनी औरंगजेबाला लाजविले असे ते म्हणतात. (पॄ. 65). म. फुले यांचे स्त्रीविषयक विचार नि कार्य हे प्रसिद्धच आहेत. याचे पडसाद या पोवाडयातही उमटले आहेत. नाटकशाळा, बहुपत्नीत्व व त्यातून निर्माण होणारा सवतीमत्सर या काही फुले यांना पटणाऱ्या गोष्टी नव्हत्या. त्यांनी या सर्वांवर जिजाउंच्या माध्यमातून टीका केलेली आढळते. (पॄ. 59). पोवाडयात एके ठिकाणी शिवाजी राजे एका संकटाच्या वेळी पत्नी सर्इबार्इंचा सल्ला घेतात, असे दाखविले आहे. व तो सल्ला शिवाजी राजे मानतात, असेही लिहिले आहे. (पॄ. 50). यातून शिवरायांची स्त्रियांविषयीची उदार भूमिका प्रकट होते असे फुले यांना वाटते.

व्यक्तीगत गुणविषेश व जिवितकार्याचे स्वरूप –

पोवाडयाच्या शेवटच्या भागात फुले यांनी शिवरायांचे गुण सविस्तर वर्णन केले आहेत. त्यांच्या मते शिवराय हे एक ऊन, वारा, पावसाची तमा न करणारे योद्धे होते की ज्यांनी यवनांना जेरीस आणले. संपत्तीचा त्यांना मोह नव्हता. योग्य ती वाटणी ते शिपायांना देत. त्यांचे सावधपण, कष्टाळूपणा, साधेपणा, युक्तीशीलता, विचारीपणा, रयतेला जीव लावणे, मधूर भाषण करणे. इ. गुण फुले यांनी सांगितले आहेत. (पॄ. 70 – 71). त्यांनी व्यंकोजीला लिहिलेल्या पत्रात ढोंग धतुऱ्याचा त्याग करून प्रजापालन करण्याचा उपदेश शिवराय करतात, असे फुले दाखवून देतात. (पॄ. 69). शत्रूच्या कैद केलेल्या सैनिकांच्याही जखमा बऱ्या व्हाव्या म्हणून प्रयत्न करणारे ते दिलदार राजे होते. म्हणूनच शत्रूसैनिकही नंतर शिवरायांच्या पक्षात येत असे फुले म्हणतात. (पॄ. 65). त्यांच्या स्त्रिविषयक उदार भूमिकेविषयी वर लिहिलेच आहे. जिवितकार्याविषयी सांगावयाचे तर शिवाजी हा एक महान शूद्र योद्धा असून तो देशासाठी लढतो, असे फुले यांना वाटते. पोवाडयाच्या आधी लिहलेल्या अभंगात ते तसा उल्लेख करतात. (पॄ. 40). देशावर आलेल्या मुस्लीम राज्याकार्त्यांच्या संकटातून शिवराय हिंदूंना मुक्त करतात, असे त्यांचे मत आहे. ‘जिजी बार्इचा बाळ, काळ झाला यवनांचा’ असे ते पोवाडयात म्हणतात. (पॄ. 71). तर अशा प्रकारे रयतेला मुस्लिम अत्याचारातून सोडविणे व रयतेसाठी अपार कष्ट करून रयतेला सुखी करणे हे महाराजांचे जिवितकार्य आहे, असे फुले यांना वाटते. त्यापैकी हा संघर्ष हिंदु – मुस्लीम असा होता हे त्यांचे मत वस्तुस्थिती म्हणून कायम राहिलेले दिसते. मात्र मुस्लीम आक्रमणाचे हेतू व परिणामांविषयी त्यांचे मत नंतर बदललेले दिसते. त्याविषयी वर लिहलेलेच आहे. हा धार्मिक संघर्ष घडण्यात शिवाजीराजे फसवले गेले, असे नंतरच्या काळात त्यांचे मत बनलेले दिसते. मात्र शिवाजी महाराजांनी प्रजापालनात बजावलेली महत्त्वाची भूमिका व त्यांचे इतर गुण याविषयी त्यांची भूमिका स्थिर राहिलेली दिसते. त्यामुळेच त्यांच्या वाङ्मयात नंतरच्या काळातही शिवरायांचे आदरपूर्वक उल्लेख आलेले दिसतात.

पूर्वप्रसिद्धी – नवभारत

संदर्भ – फडके य.दि. (संपादक, महात्मा फुले समग्र वाड्:मय,महाराष्ट्र साहित्य संस्कॄती मंडळ, मुंबर्इ, आवॄत्ती 5 वी, 1991)

लेखिका – प्रा. शिल्पा शेटे.

श्री पद्ममणि जैन महाविद्यालय पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे.

संपर्क – shilpadrujan@rediffmail.com