शिव दी किताब – शिवकुमार बटालवी

शिव कुमार

#दिवाळी_अंक_२०१८

माए नी माए मेरे गीतां दे नैणां विच, बिरहों दी रड़क पवे

अद्धी अद्धी रातीं उट्ठ रोन मोए मित्तरां नूं, माए सानूं नींद ना पवे

(आई गं, डोळ्यात कुसळ गेल्यावर जसं दुःख होतं तसं दुःख माझ्या कवितेला या ताटातूटीमुळे होतंय, मित्रांच्या आठवणीने अर्ध्या रात्रीतून उठून रडताना माझी झोप कुठे पळून जाते माझं मलाच कळत नाहीये.)

चार एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मला जर्मनीमध्ये येऊन काही काळ लोटला होता. जर्मनीमध्ये आल्या नंतरच्या पहिल्या धक्क्यांंपैकी एक म्हणजे पाकिस्तानी लोकांशी ओळखी होणं, एवढेच नाही तर त्यातले एक दोन चांगले मित्र होणं हे टप्पे पूर्ण झाले होते. त्यातल्याच एका मित्राबरोबर एकदा अभ्यास करत बसलेलो असताना त्यानी लावलेल्या प्लेलीस्टमध्ये नुसरतच्या आर्त स्वरात या वरच्या ओळी वाजू लागल्या आणि माझं अभ्यासातून लक्षच उडालं. नुसरत नुकताच लाडका झाला होता. त्याच्या कव्वाल्या रात्ररात्रभर होस्टेलमध्ये वाजत असायच्या. अभ्यास करताना रात्रभर कॉफी, मित्राच्या सिगरेटसचा धूर आणि नुसरतच्या काळीज फाडणार्‍या कव्वाल्या याची सवय झाली होती. पण या ओळी त्याच्या बाकी कव्वाल्यांपेक्षा फारच शांत, वेगळ्या आणि आतपर्यंत आघात करणार्‍या होत्या. पंजाबी भाषेशी तोपर्यंत काहीच संबंध नव्हता त्यामुळे त्या ओळींचा अर्थ लागणं शक्य नव्हतंच पण तरी आतवर कुठेतरी काहीतरी हललं हे नक्की. ती नुसती नुसरतच्या आवाजाची जादू नव्हती हे ही जाणवलं म्हणून मग मित्राला विचारलं या गाण्याचा लेखक कोण आहे रे? तर तो दोन मिनिट आश्चर्यानं माझ्याकडं बघत बसला आणि मग म्हणाला तुम्हा भारतीयांनाच तुमच्या कलाकारांची कदर नाही राव! बटालवी माहित नाहीये याची लाज वाटली पाहिजे तुला. मित्र लाहोरचा असल्यानं पंजाबी साहित्याशी त्याची जवळची ओळख होती. बटालवी तर तोे कोळून प्यायला होता. अर्थात हे सगळं त्यानं नंतर सांगितलं तेव्हा कळलं. बटालवी पण त्यानंच नंतर समजावून सांगितला.

१.

बटालवी. शिव कुमार बटालवी. 23 जुलै 1936 ला जन्मलेला शिव 6 मे 1973 ला वयाच्या फक्त 36 व्या वर्षी वारला. मी आज 27 वर्षांचा आहे आणि अजून स्वतःच्या पायांवर नीट उभं राहणं मला जमलेलं नाही. बटालवी माझ्यापेक्षा फक्त 9 वर्ष मोठा असताना गेला. पण जायच्या आधी त्याने काय काय केलं? सर्वात लहान वयात (वय वर्षे 31) या माणसाने भारताचा साहित्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार साहित्य अकादमी पटकावण्याचा विक्रम केला, पंजाबी किस्सा हा नवीन साहित्य प्रकार जन्माला घातला, पंजाबी कवितेत नवीन प्राण फुंकला, हृदय पिळवटून टाकणारं काव्य लिहिलं, पंजाबच्या गावागावांमध्ये आपल्या लोकगीतांनी मानाचं स्थान पटकावलं, भारतीय साहित्य क्षेत्रात अजरामर साहित्यकृती निर्मिल्या, एवढ्या की आजही बॉलीवूड मध्ये बटालवीच्या कविता वापरल्या जातात. बटालवीनं लिही लिही लिहिलं, त्याच्या प्रत्येक कवितेवर लोकांनी आपला प्राण ओवाळून टाकला, बटालवीनं लिहावं आणि ती कविता पंजाबच्या गावांमध्ये फक्त माउथ पब्लिसिटीनं पसरावी हे सामान्य झालं. असामान्य प्रतिभावानांना अल्प-आयुष्याचा शाप असतो म्हणतात. बटालवी तो नियम अपवादानं ही सिध्द करायला थांबला नाही. वयाच्या 36 व्या वर्षी बटालवी आपल्या अजरामर पण कितीही असल्या तरी कमीच वाटणार्‍या कलाकृती देऊन जग सोडून निघून गेला. आपल्या कवितेत एका जागी बटालवी म्हणतो –

एक उडारी ऐसी मारी,

ओ मुड वतनी ना आया,

माये मै एक शिकरा यार बनाया.

बटालवी वाचताना मला कित्येकदा याच जाणीवेनं घेरलेलं असतं. शिव तुला अजून लिहायचं होतं, खूप लिहायचं होतं, उन्मत्त लिहायचं होतं. इतक्या लवकर ती झेप घ्यायची गरज नव्हती रे.

२.

शिव कुमार बटालवीला कवितेचं खूळ कुठून लागलं याची तशी काही फारशी माहिती उपलब्ध नाही. खरंतर शिव बटालवीबद्दल जे काही वाचायला मिळतं त्यात आख्यायिका आणि वस्तुस्थितीत फरक करता येत नाही. पण साहित्य अकादमीनं बटालवीवर काढलेलं पुस्तक तसंच ओम प्रकाश शर्मांचं त्याच्यावरचं इंग्रजी पुस्तक बटालवीबद्दलची बरीच माहिती देतात. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये तहसीलदार असलेल्या माणसाचा हा मुलगा लहानपणी कधी साप पकडणार्‍या लोकांमध्ये तर कधी भटकंती करत गावात आलेल्या साधू संन्याशांमध्ये जाऊन बसायचा. तिथूनच त्याला पुढे रामायणाचं वेड लागलं. हेच भटके विमुक्त, साधू, संन्याशी बटालवीच्या कवितेत जागोजागी डोकावतात. याशिवाय दोन गोष्टी ज्या बटालवीच्या कवितेमध्ये सारख्या डोकावतात त्या म्हणजे आई, आणि पाळलेली घार. विचित्र आहे ना? मराठीत विचार करू लागलो किंवा इंग्रजीमध्ये या कवितांचा अनुवाद वाचू लागलो तर मलाही बटालवीच्या कवितेतल्या उपमा विचित्रच वाटतात. पण पंजाबीत वाचताना, ऐकताना त्या तितक्याच नैसर्गिक, तितक्याच आतून आल्यासारख्या वाटतात. हीच बटालवीची त्याच्या भाषेशी असलेली बांधिलकी आहे.

बटालवी एकूणच फार चंचल, फार अस्वस्थ होतं असं त्याचं आयुष्य बघून जाणवतं. या स्वप्नाळू मुलाचं भावविश्व काय असेल हा विचार राहून राहून मनात येतो. इम्तियाझ अलीचा तमाशा सिनेमा बघत असताना रणबीर कपूरच्या लहान अवतारात मला राहून राहून शिव बटालवीचा भास होत होता. योगायोगानं इम्तियाझच्या आवडत्या कवींपैकी एक शिव कुमार बटालवी आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये अनेकदा बटालवीच्या कवितांच्या ओळी या ना त्या रूपानं येत असतात. काय माहित, बहुदा इम्तियाज अलीच्या मनात सुद्धा तमाशा लिहिताना कुठेतरी शिव बटालवी जागा धरून बसलेला असेल.

बटालवी 11 वर्षांचा असताना भारताची फाळणी झाली आणि त्याचं सगळं भावविश्व घुसळून निघालं. त्या काळातल्या हजारो लाखो लोकांना ज्या प्रकारे फाळणीच्या झळा पोहोचल्या त्यात शिवचं कुटुंब पण एक होतं. तोपर्यंत सियालकोटमध्ये राहणारं याचं कुटुंब एका रात्रीतून घरदार सोडून भारतात आपलं अस्तित्व शोधत आलं आणि पंजाबात गुरुदासपुरातल्या बाटला या गावी स्थायिक झालं. आणि इथून ते 1960 पर्यंत शिवबद्दल आपल्याला काहीही माहिती मिळत नाही. त्याच्या शिक्षणावरून एवढंच लक्षात येतं की शिक्षणाच्या बाबतीत पण तो तेवढाच गोंधळलेला होता जेवढा बाकीच्या बाबतीत. त्यानं आधी पंजाब विश्वविद्यालयात बी. एसस्सीला प्रवेश घेतला, आणि पहिल्याच वर्षात तो कोर्स सोडूनही दिला. मग त्यानं कलाशाखेत प्रवेश घेतला. घरच्यांना वाटलं हे त्याच्या एकूण स्वभावाला साजेसं आहे तर तो इथे तरी रमेल. पण इथंही त्याचं काहीतरी बिनसलं आणि त्यानं दुसर्‍याच वर्षी आर्टस्ला रामराम ठोकला. तिथून शिव हिमाचल प्रदेशच्या एका डिप्लोमा कॉलेजमध्ये इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला आणि मला असं वाटतं इथे त्या स्वप्नाळू मुलाच्या आयुष्यात जो प्रेमभंग आला तो त्याच्या कवितांमधून त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरला. आता या पुढे मी जे लिहीणार आहे ते पंजाब, पाकिस्तानात लोककथांसारखं चर्चिलं जातं आणि त्याचा पुरावा शोधण्याचा, त्याच्या सत्यासत्यतेची खात्री करून घेण्याच्या मागे शहाण्यांनी पडू नये असंच माझं मत आहे. शिव लोककविता लिहिता लिहिता त्याचंच आयुष्य एक काव्य बनून गेलं असं मला वाटतं. इंजिनियरिंग करत असताना शिव हिमाचलमध्ये एका मेळ्यात मैना नावाच्या एका मुलीला भेटला आणि भेटताच तिच्या प्रेमात पडला, असं शिव बटालवीला ओळखणारे लोक म्हणतात. तिच्या प्रेमात हा इतका वेडा झाला की तहान, भूक, अभ्यास सोडून हा दिवस रात्र तिला शोधण्याच्या मागे फिरत होता. काही दिवसांनी जेव्हा त्याला तिच्या गावाचा पत्ता मिळाला तेव्हा हा तिला शोधत शोधत त्या गावात पोहोचला. तिथे त्याला कळलं की कुठल्याशा आजारानं त्या मुलीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. लोककथांवर विश्वास ठेवायचा म्हणलं तर शिव या नंतर खचला. त्यानं इंजिनियरिंग सोडलं. एकूणच शिक्षणाला राम राम ठोकला. आत्तापर्यंत त्याचे वडील अमृतसरजवळ काडियां या गावी बदली होऊन गेले होते. शिव घरी परतला आणि त्याने स्वतःला घरात कोंडून घेतलं.

आणि इथून एका नवीन शिवचा जन्म झाला. शिव बटालवीनं या काळात एकाहून एक दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कविता लिहील्या. त्याचा पहिला कविता संग्रह ‘पीरां दा परगा’ अर्थात दुःखांची ओढणी, सन 1960 मध्ये प्रकाशित झाला आणि एका रात्रीत पंजाबनं शिव कुमार बटालवीला डोक्यावर घेतलं. पंजाबच्या प्रथितयश कवींना कळेना की हा कोण मुलगा आहे, ज्याच्यापायी पंजाबला इतकं वेड लागलं आहे. यापैकी काही कवींनी बटालवीला आपल्या पंखांखाली घेतलं आणि इथून सुरु झाला शिव कुमार बटालवीच्या साहित्याचा सुवर्णकाळ.

३.

अमृता प्रीतम ही पंजाबीतली अतिशय मोठी कवियत्री. अमृता प्रीतम बटालवी पेक्षा 15-20 वर्षांनी मोठी होती. बटालवीचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तोपर्यंत अमृता प्रीतम हे नाव फक्त पंजाबतच नाही तर संपूर्ण भारतीय साहित्य क्षेत्रात सर्वांच्या ओळखीचं झालं होतं. 1956 मध्ये तिला भारताची पहिली साहित्य अकादमी विजेता कवियत्री असण्याचा मान सुद्धा मिळाला होता. या अमृतानं जेव्हा शिवचा पहिला कविता संग्रह वाचला तेव्हा तिनं त्याला एका वाक्याचं पत्र लिहिलं, ‘शिव वीरां, तेरा दर्द सलामत रहे.’ ते पाच शब्द शिव बटालवीला जन्मभर पुरले. शिव, बिरहा दा सुलतान, अर्थात विरहाचा राजा म्हणून नावलौकिकास आला.

पंजाबात शिव बाटालवीबद्दल लोकप्रिय प्रवाद असा आहे की शिव बटालवी जन्मभर खर्‍या प्रेमाच्या शोधात फिरत राहिला आणि ते प्रेम न मिळताच मरून गेला. शिवनं मात्र या गोष्टीला नेहमीच नाकारलं. BBC ने 1976 मध्ये शिव कुमार बाटालवीचा घेतलेला एक फार दुर्मिळ इंटरव्यू आहे. त्यात मुलाखतकार शिवला विचारतो, तर मग काय प्रेम मिळालं नाही म्हणून एवढा विरह तुमच्या कवितेत दिसतो का? आणि शिव झटक्यात त्याला फटकारून लावतो आणि म्हणतो मला इतकं प्रेम मिळालं आहे की प्रेमाच्या विरहात मी कविता करतो असं म्हणणं हे त्या मिळालेल्या प्रेमाचा अपमान करणं आहे. त्या मुलाखतीत शिव म्हणतो की काही लोकांचा भ्रम असतो की कवितेला जन्म घ्यायला विरह, प्रेमभंग, दुरावा, दुःख वगैरे गोष्टींची गरज असते. खरंतर यातलं काहीही खरं नाही. कवितेचा जन्म व्हायला ती कविता आणि तुमची प्रतिभाच पुरेशी असते. त्यावर मुलाखतकार विचारतोे की पण मग जी त्या प्रेमिकेची प्रतिमा आम्हाला तुमच्या प्रत्येक कवितेत दिसते ती प्रतिमा खर्‍या आयुष्यात कोणी घेतली? शिव अगदी मनापासून सांगतो की ती प्रतिमा कधी संपूर्ण रूपात समोर आलीच नाही. कोणाच्या हातात ती प्रेमिकेची प्रतिमा दिसली, कोणाच्या कानांमध्ये, कोणाच्या हास्यामध्ये, तर कोणाच्या बोलण्यामध्ये. पण ती प्रतिमा पूर्णत्वास समोर आलीच नाही. आणि शिव गाऊ लागतो

कि पुच्छदे हो हाल फकीरां दा,

सडा नदियां बिछडे नीरां दा,

सडा हंज दी जुनें आयांदा,

सडा दिल जलेया दिलगिरां दा.

कि पुच्छदे हो हाल फकीरां दा

इह जाण देया, कुछ शौक जहे,

रंगा दा ही ना तसवीरां हैं,

जद हट्ट गये अस्सी इश्के दी,

मुल कर बैठे तस्वीरां दा!

कि पुच्छदे हो हाल फकीरां दा

आमच्यासारख्या फकिरांबद्दल कशाला विचारता, आम्ही तर नदीतून वेगळ्या झालेल्या पाण्यासारखे आहोत अशा अश्रुंसारखे, जे एखाद्या प्रेमात जळालेल्या माणसाच्या डोळ्यातून निघतात, आमच्यासारख्या फकिरांबद्दल तुम्ही का विचारपूस करता

माझ्या फकीरीत मला वाटायचं की एखाद्या चित्राची किंमत त्याच्या रंगांच्या किमतीपेक्षा काय अशी फार असते,

पण ज्या दिवशी मी त्या चित्राच्या प्रेमात पडलो त्या क्षणी मी त्या चित्राची खरी किंमत चुकवली. या अशा फकीराबद्दल विचारपूस करून तुला काय मिळेल.

आणि त्या क्षणी मग तुम्हाला पंजाबी समजत असो वा नसो, तुमच्या डोळ्यात त्या आर्त आवाजानं अश्रू उभे राहतात.

बाटालवीनं त्याच्या प्रत्येक कवितेतून लाखो लोकांच्या डोळ्यात हे अश्रू उभे केले आहेत.

अर्थात शिव स्वतः काहीही म्हणो त्याच्या चाहत्यांसाठी तो नेहमीच प्रेमानं अव्हेरलेला हिरो होता. त्याला त्याचं खरं प्रेम कधीच मिळालं नाही. मग ती हिमाचलच्या जत्रेतली मैना असो की गुरुबक्ष सिंह प्रीतलारी या पंजाबीतल्या प्रथितयश लेखकाची मुलगी. अर्थात शिवने पण तिच्यासाठीचं आपलं प्रेम कधी लपवलं नाही. ती प्रेमकथा का पूर्णत्वास नाही गेली याची काहीच माहिती नाही. पण हे मात्र खरं की तोपर्यंत शिवला दारूचं जबरदस्त व्यसन लागलेलं होतं. गुरुबक्ष सिंह यांनी आपल्या मुलीचं लग्न अमेरिकेतल्या मुलाशी लावून दिलं आणि इथे शिवला त्याच्या ‘लूणा’या दीर्घकाव्यासाठी वयाच्या केवळ तीसाव्या वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणारा शिव बटालवी हा सर्वात तरुण साहित्यिक होता. तोपर्यंत शिवला पंजाबन डोक्यावर घेतलं होतं. त्याची लोकप्रियता पाकिस्तानातल्या पंजाबी भाषिक लोकसंख्येत पण वेगानं पसरत होती. काही लोकांच्या मते शिव तेव्हा एखाद्या सिनेमा स्टार एवढा लोकप्रिय झालेला होता.

गुरुबक्षच्या मुलीला अमेरिकेत मुलगा झाला आणि इथे शिवची अजून एक अजरामर कलाकृती जगासमोर आली.

माये मैं एक शिक्रा यार बनाया,

चुडी कुंदा खांदा नाही वो,

दे मैं असे दिल दा मांस खवाया,

एक उडारी ऐसी मारी,

फिर मुड वतनी ना आया,

माये मैं एक शिक्रा यार बनाया

अर्थ – आई, एका चिमणीशी माझी मित्र झाली, आई, मी तिची खूप काळजी घेतली, जेव्हा ती काही खात नव्हती तेव्हा, मी तिला माझ्या हृदयाचं मांस खाऊ घातलं. एकदिवस तिनं अशी भरारी घेतली, कि ती वळून परत आपल्या देशात नाही आली. आई, एका चिमणीशी माझी मित्र झाली,

आणि लोकांमध्ये असं पसरलं की शिवनं ही कविता तिच्यासाठी लिहिलेली आहे. शिवनं कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरीही लोकांच्या मनात हे घर करून बसलं. शिवची लोकप्रियता इतकी होती की तिच्या घरी शेकडोंच्या संख्येनी बायकांची, शिवच्या वाचकांची तिला शिव्याशाप घालणारी पत्रं जाऊ लागली. आणि हे कितीतरी वर्ष सुरु राहिलं.

तिला दुसरा मुलगा झाला तेव्हा पत्रकारांनी आणि चाहत्यांनी शिवला प्रश्न विचारून भंजाळून सोडलं की आता शिव बटालवी परत तिच्यावर दुसरी कविता लिहिणार आहे का? हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की वैतागून जात शिव एका पत्रकारावर उसळला आणि म्हणाला दर वेळेस तिनं मुलं जन्माला घातली तर त्यांच्यावर कविता लिहायचा मी काय ठेका घेतलाय का? आणि शेवटी काही काळासाठी शिव बाटालवीच्या वैयक्तिक आयुष्यावर पडदा पडला.

इथपर्यंत शिवची दारू त्याच्या वाचकवर्गात लोकप्रिय झाली होती आणि पेपर्समध्ये त्याच्या व्यसनाधीनतेचे किस्से गाजायला लागले होते. दारूचं व्यसन हे शिव बाटालवीच्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट काळाचें आमंत्रण होतं. एक उगवता तारा, ज्यानं संपूर्ण पंजाबला वेड लावून सोडलं होतं, वयाच्या 39 व्या वर्षी व्यसनापायी गेला. शिवच्या शेवटच्या काळात त्याला फार वाईट परिस्थितीतून जावं लागलं. बँकेतली नोकरी सुटली. शिव कर्जबाजारी झाला. त्याला नैराश्याचे झटके यायचे. त्यात तो अजूनच स्वतःला व्यसनात बुडवून घ्यायचा. शिवची कविता थांबली. भारतातला कीट्स म्हणून ज्याला गौरवण्यात येत होतं तो शिव बटालवी, स्वतःच्या कोषातून बाहेर येईनासा झाला.

1972 मध्ये त्याच्या काही चाहत्यांनी त्याला इंग्लंडला यायचं निमंत्रण दिलं. तोपर्यंत इंग्लंड, अमेरिकेतल्या पंजाबी लोकांमध्ये सुद्धा शिव बटालवी अतिशय लोकप्रिय झाला होता. शिव काहीकाळ सुखावला. इंग्लडच्या हवापालटानं त्याच्या तब्येतीवर देखील परिणाम जाणवू लागला. BBC ला त्यांनी याच काळात इंटरव्यू दिला. त्यात शिव बराच फ्रेश आणि मोकळा वाटतो. पण भारतात परतताच त्याची तब्येत परत खालावू लागली.

शिव म्हणायचा आयुष्य हे स्लो पॉइजन (हळू हळू चढणारं विष) आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण हळू हळू दिवसागणिक मरतोय. शिवला असं मरण पसंत नव्हतं. त्यानं ती भरारी घेतली आणि शिव 1973 मध्ये या जगातून निघून गेला.

शिवच्या कवितांच्या काही ओळी ‘लव्ह आजकल’ नावाच्या चित्रपटातल्या एका गाण्यात घेतलेल्या आहेत.

आज दिन चढेया तेरे रंग वर्गा,

तेरी चुम्मण पिछली संग वर्गा,

है किरणां दे विच नशा जेहा,

किसी चिंबे सांप दे डंग वर्गा

अर्थ – आज दिवस उगवलाय तो अगदी तुझ्या रंगासारखा, मी तुला जवळ घेतो तेव्हा लाजून जी तुझ्या गालांवर लाली येते अगदी त्या रंगाचा, या सूर्याच्या किरणांमध्ये सुद्धा असा नशा आहे, जसा एका सर्पाच्या दंशात असतो शिव बाटालवीच्या कविता वाचताना मलाही चिंबे सांप दे डंग वर्गा नशा झाल्याचा भास होतो

पंजाबच्या पॉप कल्चरमध्ये शिव अगदी आतपर्यंत शिरलेला आहे. लेखन कसं हवं, तर ‘शिवच्या पुस्तकासारखं’ अशी तिथे पॉप कल्चरमधली म्हण आहे. शिव-दी-किताब म्हणण्यामागं हे कारण आहे.

लेखक - इंद्रनील पोळ