श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र – Hindu Philosophy Of Life, Ethics and Religion

लोकमान्य टिळक - गीतारहस्य

२०१४ हे साल टिळक मंडालेहून सुटून आल्याचे शताब्दी वर्ष होतं. ८ जून १९१४ रोजी त्यांची मंडालेहून सुटका झाली. आणि २०१९ हे वर्ष टिळक गेले त्याचं १०० शंभरावं वर्ष आहे. १४-१५ जून १९१४ रोजी त्यांनी भारताचा किनारा गाठला. म्हणजे ‘गीतारहस्य’ या ग्रंथालाही या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली.

टिळकांबद्दल, त्यांच्या राजकीय सामाजिक भूमिकांबद्दल खूप बोललं गेलं आहे. अनेकांनी त्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून झालं आहे.ते ज्याचं त्याचं स्वातंत्र्य. पण गीतारहस्याच्या वाटेला फार कोणी जात नाहीत, कारण ते वाचावं लागतं. ते समजून घ्यावं लागतं. आणि मग मत व्यक्त करावं लागतं. यातलं काहीही सोप्पं नाही. पण मी तो प्रयत्न खूप लहान असताना केला होता. आणि मीगीतारहस्याची ओळख करून देणारा लेख लिहिण्याचं धाडस केलं होतं. तोच हा लेख.

असे म्हटले जाते की १८९२ साली टिळक मुंबईहून पुण्याला येत असताना रेल्वेच्या त्याच डब्यात विवेकानंद सुद्धा होते. मुंबई- पुणे प्रवासादरम्यान ज्या अनेक विषयांवर दोघांध्ये चर्चा झाली त्यामध्ये भगवद्गीतेवरही चर्चा झाली. शेवटी समरांगाणामध्ये गीता सांगितली गेली. या मुद्द्यावर दोघांचेही एक समान मत होते ते म्हणजे, ‘सगळे सैन्य युद्धासाठी उभे असताना, सभेत उभे राहून भाषण करावे तसे भगवंतानी भाषण केले नसेल. श्रीकृष्ण नावाचा कोणीतरी एक विचारवंत झाला, त्याच्या प्रतिभेतून स्फुरणार्‍या विचारांचे संकलन व्यासांसारख्या महाऋषींनी केले आणि संदर्भांचे एक कोंदण त्याला दिले गेले. प्रत्यक्षात युद्ध आणि भगवद्गीतेचे उच्चारण स्वतंत्रपणे झाले असेल. गीतेचा बाकीचा तपशील गौण लेखून त्याचे पुन्हा विवरण केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशाच्या उभारणीसाठी, आधुनिक पायाच्या बांधणीसाठी गीता लोकांना समजावून दिली पाहिजे.’ त्यावर दोघांनीही एकमेकांना वेळ मिळाल्यावर ह्या विषयावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्‍वासन दिले. तो वेळ विवेकानंदांना मिळालाच नाही पण लोकमान्यांना मात्र मंडालेत मिळाला.

गीतारहस्याची एकूण रचना पाहताना असे लक्षात येते की जितका महत्त्वाचा ग्रंथ आहे तितकीच तो ग्रंथ लिहिण्यामागची प्रेरणा महत्त्वाची आहे. शतकानुशतके भारतीय समाज ‘कर्मसंन्यास’ या तत्त्वाच्या प्रभावाखाली होता. याचे कारण आदि शंकराचार्य यांचे ‘शांकरभाष्य’, जे गीतेवरचे उपलब्ध पहिले भाष्य किंवा टीका आहे, आणि त्यात शंकराचार्यांनी गीतेचा मूळ गाभा ‘अद्वैत वेदांता’चा असल्याचा सिद्धांत मांडला होता. ते भाष्य भारतीय समाजमानसात श्रेष्ठ ठरले. यानंतर रामानुजाचार्य यांनी गीतेवर टीकाग्रंथ लिहिला. त्यात गीतेचा मूळ गाभा ‘द्वै’ती असल्याचा दावा त्यांनी केला. नंतर मध्वाचार्य यांनी तो गाभा विशिष्टाद्वैताचा’असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वरांनी गीता मराठीमध्ये आणली. पण गीतेध्ये मुख्य विवेचन ‘नारायणी धर्माचे’ असल्याचे त्यांनी सांगितले. याच मालिकेत अनेक महात्म्यांनी गीतेवर टीकाग्रंथ लिहिले. त्यामध्ये विनोबा आहेत, गांधीजी आहेत, योगी अरविंद आहेत. याच मालिकेत लोकमान्यही येतात. जसा ज्ञानेश्वरांचा ‘नारायणी धर्म’, गांधीजींचा ‘अनासक्ती योग’, त्याच मालिकेत लोकमान्यांचे ‘कर्मयोगशास्त्र’.

या सर्वांमध्ये कर्मयोगशास्त्राचे म्हणून एक वेगळ स्थान आहे ते अशासाठी की या ग्रंथाचे लिखाण करताना कमान्यांसमोर दोन प्रकारचे वाचक आहेत. एक सनातनी ब्राम्हण वर्ग ज्यांचा ‘प्रस्थानत्रायीं’चा उत्तम अभ्यास होता. ज्यांच्यासाठी गीता रोजच्या पठणातील गोष्ट आहे. दुसरी पाश्‍चात्त्यविद्याविभूषित नवीन पिढी, ज्यांनी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास केला होता. त्यांनी आधुनिक नीतिशास्त्र अभ्यासले आहे आणि म्हणून या ग्रंथाचे नाव Hindu Philosophy Of Life, Ethics and Religion असं आहे. जी आधुनिक पिढी पाश्‍चात्त्यविद्याविभूषित म्हणून या देशात आली, ती असेही शिकून आली की भारताकडे ‘नीतिशास्त्र’ नाही. भारताकडे फक्त वैराग्य, संन्यासी वृत्ती एवढंच आहे, त्यांच्यासाठी गीतारहस्य म्हणजे एथिक्सचा भारतीय धडा आहे, कारण यामध्ये पाश्‍चात्त्य समाजशास्त्र आणि समाजविज्ञान यांची उदाहरणं दिलेली आहेत. गीतेचे बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्‍लोक, मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्त्य विद्वानांच्या मतांची तुलना अशी या ग्रंथाची रचना आहे.

मोक्ष ही कमालीची व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे तिला समाजनिष्ठ करण्याचे काम भागवतधर्माने केले, परंतु टिळकांच्या मते भागवतधर्मसुद्धा पुढे निवृत्तीमार्गी म्हणजे व्यक्तीनिष्ठ झाला. राष्ट्रनिर्मितीसाठी सर्व समाज ज्याप्रमाणे एकरूप झाला पाहिजे, त्याप्रमाणे तो कर्मप्रवण झाला पाहिजे, अशी टिळकांची भूमिका आहे. गीतेतला मूळ भागवतधर्म हाच तो कर्मयोग, असे टिळकांचे म्हणणे होते. भागवतपुराणाचा भागवतधर्मही गीतेहून निराळा आहे. तो निवृत्तिमार्गी आहे. आपण जी भक्ती चळवळ म्हणतो त्या भक्त चळवळीने तो भागवतपुराणातील निवृत्तिमार्गी भागवतधर्माचा प्रसार केला. त्यामुळे फक्त पारलौकिक बाबींमध्ये समानता आली. राजकीय क्षेत्रात समाज एकरूप होऊ शकला नाही. यासाठी जे राष्ट्र पारतंत्र्यात आहे त्याच्या अभ्युदयासाठी म्हणून मूळ भारतीय असलेले एक नीतिशास्त्र, आधुनिक विज्ञानावर आधारलेले, गीतेतल्या मूळ भागवत धर्मावर आधारलेलं विश्‍लेषण टिळकांना सादर करायचे होते. ते गीतारहस्याच्यारूपाने आपल्यासमोर आहे.

To be or not to be हा प्रश्‍न जसा हॅम्लेटला पडला तसाच प्रश्‍न भारतीय युद्धाच्या प्रारंभी अर्जुनाला पडलेला आहे, जसा अर्जुनावर प्रसंग आला तसे सामान्य माणसाच्याही आयुष्यात रोजच्या जीवनात असे प्रसंग येत असतात आणि अर्जुनासारखेच आपणही सर्व सोडून द्यायची भाषा करतो. पण ज्यांना समाजात राहूनही आपली कर्तव्ये धर्माने आणि नीतीने बजावायची आहेत त्यांना कर्मजिज्ञासा असणे स्वाभाविक आहे. खरंच संसार इतका अवघड आहे का? माणसाला नेमके काय हवेय? आयुष्य संगीतमय एखाद्या मैफिलीसारखे करता येणार नाही का? व.पु.काळे यांनी कर्मजिज्ञासेवर फार सुंदर भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘आपल्यापूर्वीही जग होते आपल्यानंतरही असणार आहे. अवाढव्य रंगमंचावर आपली एण्ट्री मध्ये केव्हातरी होते आणि एक्झिटसुद्धा अशीच अचानक. किती काळ आपल्याला आपली भूमिका बजावायची आहे ते माहीत नाही. धडधाकट भूमिका मिळणार का जन्मांधळेपणाची, अपंगत्वाची की शाप बुद्धीचे वरदान लाभलेली? सगळेच अज्ञात. तरी माणसाचा गर्व, दंभ लालसा किती सांगावी? श्रीकृष्णांनी आपल्याला बासरीसहित पाठवले. त्यातून आपल्याला संगीत निर्माण करता येत नाही तर त्यातून षड्रिरपू प्रकट होतात. संगीत का निर्माण करू शकत नाही याचे उत्तर गीता कायम देत राहील.’ कोणते कर्म योग्य, कोणते अयोग्य. कोणते नैतिक, कोणते अनैतिक, या संभ्राचे नाव आहे कर्मजिज्ञासा. आणि हेच गीतेचे महात्म्य आहे की नुसत्या मोक्षशास्त्राचा हा ग्रंथ नसून वेदांतातील गहन तत्त्वज्ञानाच्या आधारे कार्याकार्यव्यवस्थित म्हणजे कर्मजिज्ञासेचे उत्तर देणारा गीतेइतका प्रभावी ग्रंथ संस्कृत किंवा अन्य वा़ङ्मयात नाही. कर्मजिज्ञासा या विषयावरचे विवेचन ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात आहे.

लोकमान्य टिळक - गीतारहस्य
लोकमान्य टिळक - गीतारहस्य

पुढचे प्रकरण थेट ‘कर्मयोगशास्त्र’ याचेच विवेचन आहे. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय जर शास्त्राचा अभ्यास केला तर कोणीच त्या क्षेत्रातला अधिकारी पुरूष होऊ शकत नाही. ती जिज्ञासा उत्पन्न करण्याचं काम पहिल्या प्रकरणात आणि दुसर्‍यामध्ये मूळ शास्त्र. कर्मयोगाचे. एकच कर्म करण्याचे जे अनेक योग, साधने किंवा मार्ग असतात त्यापैकी पराकाष्ठेचा चांगला व शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरता येईल का नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते, ते का निर्माण होतात? आपण जो मार्ग चांगला समजतो तो का चांगला किंवा जो मार्ग वाईट मानला गेला तो का वाईट? कर्माचा चांगलेवाईटपणा कशाच्या आधारे ठरवतात? सर्व कर्माचे मूळ काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ज्या शास्त्राच्या आधारे काढली जातात त्यास ‘कर्मयोगशास्त्र’ किंवा गीतेतल्या संक्षिप्त रूपाप्रमाणे नुसते ‘योगशास्त्र’ म्हटले जाते. संत तुकाराम आणि सगळ्याच संतांपासून आईनस्टाईनपर्यंत सर्वांनीच या सृष्टीचे वर्णन ‘नामरूपांचे’ असे केले आहे. त्यामुळे कर्मयोगशास्त्राच्या अभ्यासाचे आधुनिक परिभाषेनुसार तीन प्रकारे अध्ययन करता येते. एक आधिभौतिक, दोन आधिदैविक आणि तीन आध्यात्मिक. यानुसार तीनही परिभाषांधून टिळकांनी कर्मयोगशास्त्राची चर्चा केलेली आहे. याच प्रकरणात पुढे इतिहासातील आणि विशेषतः समकालीन भारतामध्ये जी सर्वात चुकीची समजली गलेली कल्पना ‘धर्म’ याचे विवरण आहे. तो धर्म फक्त रिलीजन या अर्थाने धर्म नव्हे तर कर्तव्य किंवा दिलेलं किंवा जाणीवपूर्वक निवडलेलं काम होय. जगावर निरपेक्ष प्रे करणे हा संतांचा, आईचा धर्म आहे. डंख मारणे हा सापाचा धर्म आहे. या अर्थाने टिळकांनी धर्म या संकल्पनेचे विश्‍लेषण केलेले आहे. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करण्याचे तीन मार्ग त्या तीनही मार्गांची सविस्तरपणे चर्चा तीन स्वतंत्र प्रकरणांध्ये केलेली आहे. पुढची अनुक्रमे तीन प्रकरणे अशी आहेत. आधिभौतिक सुखवाद, आधिदैविक आणि सुखदुःखविवेक आणि अधात्म्य.

भारतीय शास्त्रकारांनी सर्व शास्त्रांचा अध्ययनासाठी श्रेष्ठ मार्ग अध्यात्म असल्याचे म्हटले आहे, परंतु आधुनिक काळी त्याची पुनर्मांडणी करण्यासाठी वरील दोन्हीही परिभाषांधून टिळकांनी कर्मयोगशास्त्राचे विश्‍लेषण केलेले आहे. त्यातील पहिला आहे आधिभौतिक सुखवाद. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्यफळ पाहून नीतीचा, अनीतीचा निर्णय करणार्‍या गटास टिळक आधिभौतिक सुखवाद म्हणतात. बाह्य फळावर मोहित होऊन कामाचा विचार करणे अनीतीचे मानण्याचे काही कारण नाही असे टिळक म्हणतात. मिल्ल, स्पेन्सर, कान्ट वगैरे लोकांचे सर्व ग्रंथ वाचनीय आणि विचारप्रवर्तक आहेत याबद्दल कोणताही संशय असण्याचे कारण नाही. असे असूनसुद्धा पाश्‍चिमात्य विचाराचे भारतीय विचारांशी असलेले मतभेद मुख्य धागा घेऊन या प्रकरणातील एकूण चर्चा आहे. ही चर्चा म्हणजे मला वाटते की नीतिशास्त्राचा भारतीय धडा आहे. ही चर्चा चात्वाकापासून हॉब्ज आणि हेल्वेशियस यांच्यापर्यंत जाऊन पोचते.

ज्या एका सूत्राने म्हणा किंवा तत्त्वाने विचार करण्याची दिशाच बदलली, ते तत्त्व म्हणजे Greatest good Of Greatest number, म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ सुख किंवा हित. परंतु सुख आणि हित या दोन शब्दांच्या अर्थांध्ये बराच भेद आहे. पुष्कळांचे पुष्कळ सुख आहे असे गृहित धरून चालले तरीसुद्धा कार्यनिर्णयाच्या कामी बर्‍याच अडचणी निर्माण होतात. उदा. पांडवांच्या सात, तर कौरवांच्या अकरा अक्षौहिणी, म्हणून पांडवांचा पराजय झाला असता तर या अकरा अक्षौहिणी सैन्याचे सुख झाले असते. परंतु या युक्तीवादाने पांडवांच्या पक्षावर अन्याय होता असे म्हणता येईल काय? लाखो दुर्जनांना सुख होईल त्यापेक्षा एकाचे का होईना, पण सज्जनाला ज्यामुळे संतोष होईल तेच खरे कर्म होय असे व्यवहारात सर्व लोक समजतात. असे केले म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ बाह्य सुख असे नीतिमत्तेचे परीक्षेचे साधन होते. येशू किंवा सॉक्रेटिस हे दोघेही परिणामकारक असा उपदेश लोकांना करत होते. परंतु त्यांच्या देशबांधवांनी त्यांना समाजाचे शत्रू म्हणून मृत्यूची शिक्षा दिली. पुष्कळांचे पुष्कळ सुख हे तत्त्व जरी मान्य केले तरी कशात लोकांचे सुख आहे हे ठरवणार कोण? केवळ संख्या हे नीती-अनीती ठरवण्याचे साधन होता कामा नये. पुष्कळांचे पुष्कळ सुख कशात आहे हे ठरवण्याचे कोणतेही बाह्य साधन उपलब्ध नाही. यापेक्षा अधिक निश्‍चित व निर्दोष तत्त्व शोधून काढले पाहिजे, असे टिळकांचे म्हणणे आहे. भगवद्गीतेच्या आरंभी ‘कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ’ असा अभिप्राय आलेला आहे. ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ या आधिभौतिक पंथात माणसाच्या बुद्धीचा काहीच विचार होत नाही, हा सर्वात मोठा दोष या पंथाचा आहे असे टिळक म्हणतात. या प्रकारची चर्चा पाश्‍चिमात्त्य मतांचा आधार घेऊन आणि आदर करून झाल्यावर, पण भारतीय विचार ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ या कल्पनेच्या पुढे किती सखोल विचार करतो याचे विश्‍लेषण या प्रकरणात केलेले आहे. महाभारतात धर्म, अर्थ, काम, मोक्ष इ. पुरुषार्थ प्राप्त करून देणार्‍या सर्व धर्माचे विवेचन केल्यावर अखेर व्यासांनी लिहिले आहे की,‘सुखदुःख अनित्य, पण धर्म नित्य आहेत; म्हणून सुखेच्छेने, भयाने, लोभाने किंवा प्राण जावयाचा असला तरी धर्म कधीही सोडू नये.’ अनित्य सुखदुःखाचा विचार करीत न बसता, नित्य जीवाची धर्माशीच जोड घालून दिली पाहिजे असा व्यासांचा उपदेश आहे.

लोकमान्य टिळक - गीतारहस्य
लोकमान्य टिळक - गीतारहस्य

विवेकाशिवाय आनंद Pleasure without Conscience हे गांधीजींच्या ७ सामाजिक पातकांपैकी एक पातक आहे. माणूस हा आनंद, सुख, समाधान यांसाठी जगत असतो असे म्हणतात. ते सुख किंवा समाधान दुसर्‍याला दुःख देऊन आपण मिळवत नाही ना? आपल्या सुखासाठी आपण दुसर्‍याचे शोषण करत नाही ना? याचे साधेसोपे नाव आहे ‘सुखदुःखविवेक पूर्ण एक प्रकरण टिळकांनी यासाठी खर्च केले आहे. मुळात हा ग्रंथ गीतेवरचा भाष्यग्रंथ असल्यामुळे आध्यात्मिक, पारलौकिक बाबींचा विचार मुख्यत्वे केलेला आहे. आत्मिक सुख, अद्वैताचा साक्षात्कार हेच सुखाचे मापदंड असू शकतात, असा एकूण सूर आहे. गौतम बुद्धांच्या सिद्धांताप्रमाणे आयुष्य दुःखमय आहे, तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, तृष्णेवर विजय म्हणजे दुःखांवर विजय आणि तृष्णेवर विजय कसा मिळवायचा तर अष्टांग मार्गाने. हा सिद्धांत फक्त पारलौकिक किंवा आत्मिक सुखासाठीच आहे असे नव्हे तर व्यावहारिक पातळीवर सुखप्राप्तीसाठी सुद्धा हाच मार्ग आदर्श आहे असे टिळकांचे म्हणणे आहे.

एकेक विषय लोकमान्य आपल्यासमोर मोठ्या कुशलतेने उलगडून दाखवतात. संख्याशास्त्र, विश्‍वाचा उदय आणि अस्त, कापिलसांख्यशास्त्र, क्षराक्षरविचार (म्हणजे शरीर आणि शरीराचा मालक म्हणजे अधिष्ठाता), अध्यात्म, आत्मस्वातंत्र्य, संन्यास आणि कर्मयोग इत्यादी आणि अशा अनेक विषयांवर टिळकांनी विस्तृत विवेचन केले आहे. याच्या लेखनासाठी टिळकांनी गीतेवरील उपलब्ध सर्व भाष्यग्रंथ, टीकाग्रंथ आणि संस्कृत साहित्य तर वाचलेच पण बौद्ध धर्मग्रंथ जे मूलतः पाली भाषेतून आहेत, त्यासाठी टिळक पाली शिकले. जर्मन ग्रंथ वाचण्यासाठी जर्मन शिकले, फ्रेंच शिकले. टिळकांनी मंडालेध्ये जर्मन, फ्रेंच, पाली, इंग्लिश इत्यादी भाषांधले साडेतीनशेपेक्षाही जास्त ग्रंथ मागवून घेतले होते. या ग्रंथाच्या लेखनासाठी टिळक वयाच्या पन्नाशीनंतर तीन सर्वस्वी नवीन भाषा शिकले. भगवद्गीता ही एवढीच एकमेव गीता नसून किमान ३० वेगवेगळ्या गीता आहेत, त्या सर्व त्यांनी वाचल्या होत्या. ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला ‘हिंदू धर्मग्रंथाची सामान्य माहिती’ या नावाच एक प्रकरण आहे. त्यामध्ये वेद (४), संहिता (४), ब्राम्हणे (६), उपनिषदे (२७), स्मृती (३), सूत्रे (१७), कारिका (१), व्याकरण (१), इतिहास (२), पुराणे (१८), गीता (२५), पाली ग्रंथ (२१) इत्यादी संस्कृत ग्रंथ त्यानी वाचले आहेत त्यांची सूची दिलेली आहे. मंडालेमध्ये लिहिलेलं गीतारहस्याचं हस्तलिखित ब्रिटीशांकडून हरवल्यानंतर भारतात आल्यानंतर संपूर्ण गीतारहस्य टिळकांनी पुन्हा लिहून काढले हते. याचा अर्थ संपूर्ण ग्रंथाची रचना त्यांच्या डोक्यात तयार होती. गीतारहस्याचा जन्म हीच एक थरारक गोष्ट आहे आणि तो थरार ग्रंथ वाचताना जाणवतो.