दगड – विज्ञान कथा

Astronauts In Space

[Image Source: Link]

“ते आपल्याएवढे प्रगत असतील असं मला नाही वाटत”, डॉ.स्वामिनाथन म्हणाले. “मलाही तसच वाटतंय”, टोनीने नेहमीप्रमाणे डॉक्टरांच्या नंतर आपलं मत पुढे केलं. “त्यांचं मागासलेपण त्यांनी पाठवलेल्या माहितीवरूनच लक्षात येतं. आता हेच बघ, आपल्याला दुसऱ्या एका जीवसृष्टीकडून संदेश आला आहे तर त्याबद्दल कोणताही विचार न करता, त्यांनी आवश्यक तेवढीच माहिती न पाठवता सगळा इतिहास भूगोलाच पाठवलाय; त्यामुळे एका अर्थाने आपलं काम सोपं झालंय”, डॉ.स्वामिनाथन.

“त्यांच्या ग्रहाचं हवामान जवळपास आपल्यासारखाच आहे. फक्त त्यांचा श्वासोच्छवासाचा मार्ग कोणता आहे किंवा त्यासाठी ते कोणता वायू वापरतात ही माहिती आपल्याला मिळालेली नाही, पण सध्या आपल्याला त्याची गरज नाही”, टोनी.

“पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला त्यांच्या ग्रहावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे” शेजारीच बसलेली अंतराळविरांगना वैदेही म्हणाली.

“हे एवढं सोपं असेल असं मला नाही वाटत. जास्त माहिती पाठवून, आपल्याला त्यांच्या ग्रहावर बोलवून आपली दिशाभूल करण्याचा कट असू शकतो” ऑफिसमध्ये प्रवेश करताच अंतराळवीर विनीत म्हणाला.

“तुझी शंका रास्त आहे. माझा निर्णय झाला आहे. विनीत आणि वैदेही त्यांच्या ग्रहावर जातील. त्यांच्यासाठी आपण आपलं विशेष शस्त्रांनी सुसज्ज असं यान वापरणार आहोत. आमच्या स्वागताची तयारी सुरु करा असा संदेश लगेचच मी पाठवतो आणि आपण आपली तयारी सुरु करू”, डॉ.

*****

“अजून तरी Q783 वर पोहोचायला आपल्याला आठ दिवस लागतील. इथे अंतराळात दिवस काय आणि रात्र काय, आपल्या मानण्यावर आहे. तरी या आठ दिवसात करण्यासारखं बरंच आहे आपल्याकडे”, विनीत म्हणाला.

“तसं नाही म्हणजे, पुढचं नियोजन, वाचन, चर्चा आणि बरंच काही”, विनितने स्पष्ट केलं. “तुला काय वाटतं ते त्या ग्रहावरचे जीव कसे असतील?”

“कदाचित, आपल्यासारखे किंवा तीन डोळे, चार हात असलेले, उंच उड्या मारणारे किंवा उंदीराएवढे लहान असतील”, वैदेहीने हसत हसत आपले अंदाज मांडले.

“बास बास किती बोलशील!!!”, असं म्हणत विनीत हसला.

“त्यांना दोन तोंडे असली तर”, वैदेहीने आपली विनोदबुद्धी चालवली.

“असले विनोद करण्यापेक्षा आपण त्यांनी पाठवलेल्या माहितीचा अभ्यास करू”, विनीत क्षणात गंभीर झाला.

“वा!!!”, वैदेही हसली.

*****

यान Q783 वर उतरल्यावर विनीतने आपली उथळ निरीक्षणे पृथ्वीवर पाठवली.पण समोर स्वागताला त्यांच्या ग्रहावरचं कोणीच नव्हतं. दोघे पाहणी करण्यासाठी त्या ग्रहावर उतरले.

“आश्चर्य आहे, येथे कोणीच नाही”, वैदेही.

“कोणीतरी असलं पाहिजे, चल आपण थोडा वेळ यानात वाट बघू”, विनीत म्हणाला.

पृथ्वीवरील वेळेप्रमाणे ४ तास झाले तरी कोणी आले नाही.

“चार तास झाले, आपण येणार आहोत हे माहीत असताना कोणी आले नाही, याला काय अर्थ आहे?”, वैदेही चिडक्या स्वरात म्हणाली.

“आपण उतरुया, काही दिसतंय का बघूया, काही असेल तर ते उचलून निरीक्षणासाठी पृथ्वीवर घेऊन जाऊ”, विनीत शांतपणे म्हणाला.

विनीत आणि वैदेही Q783 वर उतरले, बरेच निरीक्षण केले तरी त्यांना समोर फक्त मोकळे मैदान दिसले.

“हे काय? इथे फक्त मोकळं मैदान आहे. हे इथे चारपाच दगड आहेत.”, वैदेही.

“उचल ते सगळे, कोणी येईल असं वाटत नाही. आपण निघतोय असा संदेश मी पृथ्वीवर पाठवतो, चल…

हाती काही न लागल्यामुळे दोघे तसेच परतले…

*****

“डॉक्टर हा निव्वळ मूर्खपणा होता. आपल्याला बोलावले पण त्यांचा काहीच प्रतिसाद नाही. एवढं लांब जाऊन हाती काय तर हे दगड!!!”, पहिल्यांदाच अशा मोठ्या स्वरात बोलताना विनीतला सगळे बघत होते.

“माझ्या मते आपण त्यांना पुन्हा एक संदेश पाठवू”, डॉ.स्वामिनाथन.

“छान! मी म्हणते आपण मैत्रीचा हात पुढे करून काय उपयोग, त्यांनी हात पुढे करणे तर सोडाच हात दाखवण्याचेही कष्ट घेतले नाहीत”, वैदेही नेहमीपेक्षा चढ्या स्वरात म्हणाली.

“माझंही तेच मत आहे, आपण संपर्क तोडूया”, टोनीने तोंड उघडलं.

“मग या दगडांच काय करायचं?”, विनीतने प्रश्न केला.

एक प्रयोगशाळेत पाठव आणि बाकी ऑफिस बाहेरच्या सफरचंदाच्या झाडाखाली ठेव, कोणाला संशय येणार नाही, त्यामुळे ते सुरक्षितही राहतील”, डॉ.म्हणाले.

*****

काही दिवसांनी डॉ.स्वमिनाथांचा फोन खणाणला…

“हेलो डॉक्टर मी टोनी बोलतोय”

“बोल”

“आपल्या ऑफिसच्या एका कर्मचाऱ्याला दवाखान्यात दाखल केलय”

“मग?”

“तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलं आहे”

“पोहोचतो थोड्या वेळात”

*****

“त्याचा अंत खरच खूप वाईट झाला. पण त्याला झालं काय?”, डॉ.स्वामिनाथन.

त्याने आज सकाळी एक सफरचंद खाल्लं आणि काही वेळातच त्याचा चेहरा सुजला, पुर्ण लाल झाला, संपूर्ण शरीर थंड पडलं” त्याचा तो लालबुंद चेहरा पाहून मला घाम फुटला होता. नंतर त्याची प्रकृती फारच बिघडली आणि मग…”, टोनी बोलायचा थांबला.

“ते सफरचंद कोठून आणलं असेल रे त्याने?” डॉ.

“आणतोय कुठला, ऑफिसबाहेरच्या झाडाचं फळ तोडलं होतं”, टोनी.

“ऑफिसबाहेरचं झाड!!! चल लवकर. अरे मागच्या महिन्यात आपण त्याच झाडाची फळे खाल्ली होती. नंतर आपण Q783 वरचे दगड त्या झाडाखाली टाकले होते, कदाचित तो त्याचाच परिणाम तर नाही?”

दोघे तडक तेथे गेले…

“सर, हे बघा, ही सफरचंदे पांढरी पडली आहेत. ही लगेच दुसऱ्या ठिकाणी ठेवतो. प्रयोगशाळेत पाठवलेल्या त्या दगडाचं काय झालं ?”, टोनी म्हणाला.

“त्याची निरीक्षणे आली होती पण ती बघायला मला वेळ नाही मिळाला”, डॉ.

“ते यापूर्वीच बघायला हवं होतं”

“माझ्याकडे त्याचा मेसेज आहे हा बघ”

“सर पण यामध्ये दिलंय कि त्यांना त्या दगडामध्ये काही हालचाली जाणवल्या आणि त्यातून काही लहरी बाहेर पडत होत्या”

“एवढच?”

“हो”

“हे आपल्याला काहीही करून नष्ट केले पाहिजेत”

“नको, आपण हे परत त्यांच्या ग्रहावर पाठवू, मी आपल्या स्वयंचलित यानातून हे लवकरच तेथे पाठवतो”, डॉ.स्वामिनाथन.

*****

“टोनी, विनीत आणि वैदेही, मी आज तुम्हाला एकत्र बोलावलं आहे कारण Q783 वरून एक अतिमहत्वाचा संदेश आला आहे”, डॉ.म्हणाले.

“कसला?”, विनीत म्हणाला.

“सांगतो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी काही जीव आपल्या स्वागतासाठी पाठवले होते…”

“शक्यच नाही”, इति वैदेही.

“ऐकून घे. तुम्ही तेथून जे दगड आणलेत ते दगड नव्हते तर ते तेथील सजीव होते.”, डॉ.स्वामिनाथननी सांगितलं.

“काय??????”, बाकीचे तिघे ओरडले.

“हो. त्यांना हे माहित नव्हतं की आपण बोलू शकतो. ते जीव लहरीमार्फात संवाद साधतात. संदेशही त्याचप्रकारे पाठवतात. त्यांनी तुम्हा दोघांसोबत त्याच प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण न तुम्ही त्यांना समजू शकलात ना ते तुम्हाला, आणि तुम्ही त्यांना दगड समजून इथे घेऊन आलात. दर काही तासांनी हे जीव एक विशिष्ट असं पारदर्शक द्रव बाहेर टाकतात. माझ्यामते त्याचमुळे सफरचंदाच्या झाडावर त्याचे असे परिणाम झाले असतील.”

ठराविक कालावधी नंतर हे कोठेही विखुरलेले असले तरी स्वतः पासून नवीन जीव तयार करतात. त्या नवीन जीवांचा आकार सुरुवातीला अमिबा एवढं असतो आणि पुढे तो वाढत जाऊन आपण ज्या आकाराचे जीव पहिले तेवढ्या आकाराचे होतात. विनीत आणि वैदेहीने आणलेले जीव मी पुन्हा त्यांच्या ग्रहावर पाठवले आहेत. आता त्यालाही तीन महिने झाले आहेत. त्यांचा ग्रह जरी आपल्यासारखाच असला तरी तेथील जीवांपासून आपल्याला धोका आहे, आहे म्हणजे होता. आपण आता त्यांच्याशी संपर्क आणि संबंध दोन्ही तोडले आहेत. आपल्याला आता धोका नाही”, डॉ.स्वामिनाथननी स्पष्ट केले.

“धोका आहेsss”, वैदेही प्रचंड घाबरलेल्या आवस्थेत ओरडली.

“काय ???”, आता इतर तिघे ओरडले.

“त्या ग्रहावरून आणलेले सगळेच दगड म्हणजे ते जीव मी तुम्हाला दिले नव्हते. तीन जीव मी माझ्याकडेच ठेवले होते. एक मौल्यवान अशी गोष्ट म्हणून मी ते दगड समजून माझ्या स्वतःच्या प्रशस्त अश्या फळबागेत तिन्ही जीव वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीखाली पुरले. चार महिन्यात त्यांनी कितीतरी द्रव बाहेर टाकले असेल, जमिनीच्या खाली ते पसरले असेल, त्यांनी अनेक जीव निर्माण केले असतील आणि तेही पुढे….”, वैदेही तेथेच शुध्द हरपून पडली. तीचा चेहरा सुजला होता, लालबुंद झाला होता आणि शरीर थंड पडलं होतं…..

*****

लेखक – पुष्कराज घाटगे

संपर्क – psghatge1999@gmail.com