लिव्ह इन रिलशनशिप आणि वेब सिरीज

live in relationships

रेवा – अशी दोन जण एकमेकांच्या फार जवळ आली ना की एका पॉइंटनंतर फार असह्य होतात गोष्टी

सुफी – फार विचार करून निर्णय घेतला आहे तुम्ही दोघांनी, हे म्हणजे असं झालं, ‘की वो अफसाना जिसे अंजाम देना ना हो मुमकिन उसे इक खुबसुरत मोड देके छोडना अच्छा।’

दृश्य आहे ‘मुव्हिंग आऊट’ या वेब सिरीजमधील, जिथे रेवा आपल्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअपबद्दल सुफिला म्हणजेच तिच्या मित्राला सांगते आहे. रेवा आणि सत्या लिव्हइनमध्ये राहायचे, आता दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत, मैत्री अजूनही टिकून आहे पण दोघांनाही आयुष्याच्या नवीन वाटा, नवीन जोडीदार सापडले आहेत तरीही मनात कुठेतरी एकमेकांना दिलेली जागा रिती होत नाहीये किंवा ती करता येत नाहीये आणि अशा द्विधा मनःस्थितीत असणारे हे दोघे. एकदा अशाच एका निवांत क्षणी सत्या रेवाला म्हणतो,

“रेवा अजूनही कधी कधी वाटतं मी तुझ्या प्रेमात आहे.” आणि मग बॅकग्राऊंडला पुढच्या सुंदर ओळी

“फिर आप से आप की बात करना ये

आलम मुनासिब ना हो॥”

अजून एक दृश्य आहे पर्मनंट रूममेट्स या वेबसिरीज मधील, इथे तानिया आणि मिकेश पूर्वी लिव्हइनमध्ये राहायचे, लग्नाच्या निर्णयाप्रत येता येता ते त्यांच्या नात्यातला बराच रस्ता चालून आले आणि आता घडतोय पुढचा संवाद (!!??)

मिकेश – शादी ही फ्युचर होता है क्या? शादी एक दिन का अफेअर होता है जिसमे random मेहमान चिकन रोटी दबाने चले आते हैं, शादी के आगे पीछे का सोचना नही हैं क्या?

तानिया – ऐसा तुम कह रहे हो, जैसे शादी सिर्फ मेरा अजेंडा था, you think we split because you said no to marraige? छे we are poles apart. I function on logic, you function on emotions

इथे तानिया आणि मिकेश यांचं एकमेकांवर प्रेम आहे पण टोकाचे विरूद्ध स्वभाव त्यांच्या नात्यातील अडथळा ठरत आहेत. तानिया आणि मिकेशप्रमाणेच काव्या आणि ध्रुव लिव्हइनमध्ये राहतात, त्यांनी घरच्यांपासून आपल नात लपवलं नाहीये, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, दोघांचा स्वभाव प्रचंड वेगवेगळा आहे, दोघांचीही काम करण्याची क्षेत्र वेगवेगळी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद मिळवण्यावर विश्वास असलेलं हे कपल एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. पण विचारात असलेल्या तफावतीमुळे, आयुष्यात असणार्‍या वेगवेगळ्या ध्येयांमुळे दोघांमध्येही खटके उडू लागतात, सतत एकमेकांविषयी असणारा रिअलिटी चेक मिळू लागतो पण दोघेही नाते टिकवण्यापेक्षा नाते मोडू नये (होय दोहोंमध्ये फरक आहे) यासाठी जास्त प्रयत्न करतात.

वरच्या सगळ्या लिव्हइन नात्यांमध्ये काय जाणवतं? एकमेकांबद्दल असणारं प्रेम, जिव्हाळा त्यासोबतच मोफत गाजवता येणारा हक्क, एकमेकांबद्दल वाटणारी असुरक्षितता आणि एकूणच नात्याचा पाया कसा असेल त्यावर नात टिकून राहण्याची किंवा न राहण्याची क्षमता. आज आपण लिव्हइनबद्दल इथे बोलणार/वाचणार/चर्चा करणार आहोत, या नात्याचा उहापोह आपण वेब सिरिजेसच्या माध्यमातून करणार आहोत. लिव्हइन ही संकल्पना अजिबातच नवीन राहिली नाही आता खरं तर. या दशकात लिव्हइनमध्ये राहणारं जोडपं ही अतिशय नेहमीची बाब आहे, यावर लिहिणं, बोलणं हे देखील नेहमीचं आहे. फरक पडलाय तो बदलत जाणार्‍या नात्यांच्या स्वरूपामध्ये, अशा जोडप्याच्या बदलत जाणार्‍या मानसिकतेमध्ये. साधारण काही वर्षांपूर्वी देखील अनेक जोडपी लग्नाशिवाय (इथे हा शब्द उपहास म्हणून नव्हे तर केवळ एक विशेषण म्हणून वापरला गेला आहे) लिव्हइनमध्ये म्हणजेच एकत्र राहायची पण आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलायला घाबरायची. कारण भारतात पूर्वीपासूनच लग्नसंस्थेला महत्त्व आहे, जे महत्त्व बर्‍याचदा अकारण, अवास्तव देखील वाटू शकतं. मग अलिकडे म्हणजेच गेल्या 8-10 वर्षांपासून मात्र लिव्ह इन भारतात बर्‍यापैकी स्वीकारलं गेलं. लिव्हइनमध्ये राहतात हे ऐकल्यावर ऐकणार्‍याच्या चेहर्‍यावर येणारा अचंबित भाव हळूहळू ओसरू लागला. असं असलं तरीही या नात्याला कित्येक घरात अजूनही अधिकृतरित्या, मनापासून स्वीकारलं जात नाही.

प्रत्येक नात्यात चांगल्या वाईट बाजू असतात तशाच त्या लिव्ह इन च्या नात्याला ही आहेत, या नात्यात जसं प्रेम आहे तसाच आपसूक येणारा हक्कही आहे. असा हक्क असला तरी तो हक्क हक्काने गाजवता येत नाही कारण परत व्यक्तीस्वातंत्र्य, नात्यातली स्पेस असे मुद्दे समोर येतात. हक्क कसा गाजवता येत नाही याचं एक उत्तम उदाहरण देता येईल ते म्हणजे ‘मेन एक्सपी’ यांनी यू ट्यूबवर मध्यंतरी वेबसिरीज सुरू केली होती ज्यात ‘कोकोज कस्टडी’ नावाचा एक भाग होता. या कहाणीतले दोघेही लिव्हइनमध्ये रहात आहेत पण सततच्या होणार्‍या वाद आणि भांडणामुळे दोघेही ब्रेकअप करण्याचा आणि राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतात. सामान हलवत असताना मांजर कोण घेऊन जाणार या विषयावरून त्यांच्यामध्ये संवाद होतो, दोघांनाही ती मांजर प्रिय असते मग विषय वाढतो आणि आपल नात फिस्कटायला नक्की कोण जबाबदार, कोणाच्या काय चुका झाल्या यावर चर्चा होते आणि मग नायिका म्हणते,

“इतना हक जताती तो तुम बोलते की बिवी हो क्या मेरी?”

म्हणजे लग्नाच्या नात्यात किंवा नवरा बायकोच्या नात्यात मानला जाणारा, गाजवला जाणारा हक्क हा अधिकृत मानला जातो किंवा त्यात कोणाला काही गैर वाटत नाही, पण हीच गोष्ट लिव्हइनच्या बाबतीत मात्र घडत नाही. हल्ली बर्‍याच जणांचा विशेषतः तरुणाईचा लग्न संस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. ओपन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना अस्तित्वात येते आहे. म्हणजे लोकं लग्नाशिवाय लिव्हइनमध्ये राहतात हेदेखील मागे पडत चालल आहे, ओपन रिलेशनशिप या संकल्पनेत लोकं लिव्हइनमध्ये राहतात आणि दोघंही अनेक जोडीदार असण्यावर विश्वास ठेवतात. बर्‍याचदा एकमेकांना विश्वासात घेऊन हे केलं जात किंवा कधी कधी विश्वासात न घेता देखील हे करतात. अर्थात या नात्याला विश्वासाचा पाया आहे असा दावा कोणी करूच शकत नाही पण लग्नाच्या नात्यात येणार्‍या जबाबदार्‍या, कमिटमेंटस टाळणं हा मुख्य हेतू असतो शिवाय एकाशी एकरूप होणे, प्रामाणिक राहणे या संकल्पनेवर ओपन रिलेशनशिपमध्ये राहणारे विश्वास ठेवत नाहीत. लग्न केलेली जोडपीदेखील कामाच्या व्यस्ततेमुळे, एकमेकांसाठी न मिळणार्‍या वेळेमुळे ओपन रिलेशनशिपला प्राधान्य देतात. खर तर असं रिलेशनशिप ही कल्पना खूपच नवीन आहे अशातला भाग नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल पण आपल्याकडे हे पुरातन काळी पण चालायचं. त्यावर आधारित शिल्प कलाकृती पण आहेत, ज्यावर संशोधक, इतिहासकार अभ्यास करत असतात. अलिकडेच यावर आधारित वेब सिरीज पाहण्यात आली नाव आहे ‘रेडी टु मिंगल’ ज्यात नायक नायिका लिव्हइनमध्ये राहतात, दोघे मिळून एक व्यवसाय सुरू करतात व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा एकमेकांबद्दल असणार्‍या असुरक्षित भावनेमुळे दोघांचेही इतर जोडीदारासोबत संबंध प्रस्थापित होतात पण अस असताना दोघंही एकमेकांना विसरू शकत नाहीत, नंतर त्यांना आपण दोघे कसे मेड फॉर इच ऑदर आहोत हे समजतं तो भाग निराळा पण इथे लिव्हइन आणि ओपन रिलेशनशिप या दोहोंमध्ये असणारे फायदे, प्रश्न, तोटे हे छान पद्धतीने अधोरेखित केले गेले आहेत.

इथे ‘मुव्हींग आऊट’ मधली रेवा असू दे किंवा रूममेटसमधली तानिया असू दे दोघींनाही आपापल्या जोडीदाराबद्दल इन्सेक्युरिटी कॉम्प्लेक्स आहे, म्हणून दूर जाताना/दूर गेल्यावर या दोन्ही नायिकांना तितकाच त्रास होतो. ‘लिट्ल थिंग्ज’मधला ध्रुव नात्यात स्पेस देताना आपण काव्यापासून दूर तर जाणार नाही ना या विचाराने मनातून घाबरतो तर ‘मुव्हींग आऊट’मधला सत्या दूर जाऊनही मनातून फक्त आणि फक्त रेवाचा विचार करत बसतो. ‘रूममेट्स’मधल्या मिकेशला लिट्ल थिंग्ज मधली काव्या जास्त भावली असती कदाचित कारण कितीही वाद झाले तरी नात तोडण्याप्रत ते जात नाहीत याउलट ‘मुव्हिग आऊट’मधल्या सत्याला काव्याच वागणं, विचार करणं झेपलं नसत त्यांचं नातं अजून अवाक्यापलीकडे गेलं असत. वरच्या सगळ्या वेबसिरिजेस मधल्या जोड्या विरूद्ध स्वभाव असण्याने एकमेकांना compliment करतात. लिव्ह इन आणि वैवाहिक नात्यातले प्रश्न, अडचणी काही प्रमाणात सारख्या असल्या तरी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग हे वेगवेगळ असत. आता जमाना वेबसिरिजेसचा आहे, या वेबसिरिजेस समाजमनाचा आरसा असतात, जिथून समाजाचे जवळून दर्शन घडते म्हणूनच इथे आपण वेब सिरिजच्या नजरेतून लिव्हइनचे हे नातं उलगडतो आहोत.

लिव्हइन या नात्याच आवरण,मूळ संकल्पना तशीच राहिली असली तरी त्या नात्यात असणार्‍या दोन माणसांच्या विचारसरणीत बदल होत आहेत. कसे तर पूर्वीदेखील लिव्हइनमध्ये राहायचं ठरवल तर शक्य ते सर्व शेअरिंग बेसिसवर असायचं पण आता भावनिक शेअरिंग किंवा जोडीदाराजवळ मनाने व्यक्त होण हे घडेलच असं नाही कारण त्यासाठी जोडीदारासोबत जे इक्वेशन असावं लागतं ते असेलच असं नाही, अशा शेअरिंगसाठी मित्र मैत्रीण असे पर्याय उपलब्ध असतात. सोशल मीडिया, अनेक गेट टूगेदर अ‍ॅपस, डेटिंग अ‍ॅपस यामुळे माणसांच्या बाबतीत (होय माणसांच्या बाबतीतच) अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. बेस्ट फ्रेंड, घनिष्ठ, जिवलग मैत्री किंवा सोलमेट हे असं सगळ कॉम्बिनेशन जोडीदारात शोधण्याचे दिवस गेले किंवा आता तशी मानसिकताही राहिली नाही. पूर्वी आणि आताच्या लिव्ह इनमध्ये एक मुख्य फरक म्हणजे या नात्यातल्या स्त्रियाही आर्थिकरित्या, भावनिकरित्या पूर्णपणे स्वतंत्र आहेत, थोडक्यात कशाच्याच अगदी कशाच्याच बाबतीत त्या जोडीदारावर अवलंबून नाहीत. अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे हल्ली या नात्याविषयी लपवाछपवी हा प्रकार खूप कमी झाला आहे. पण पूर्वीपासून आत्तापर्यंतच्या लिव्हइन नात्यांमध्ये काही गोष्टी मात्र तशाच आहेत जस की लग्नामुळे आपसूक येणार्‍या जबाबदार्‍यांना घाबरणं, पटलं पुढे तर लग्न करू नाहीतर वेगळे होऊ असा या नात्याचा पाया असणं. अशा नात्यामुळे एकमेकांविषयी असुरक्षितता वाटणं, मी कधीही मुव्ह ऑन होऊ शकते/शकतो ही भावना बळावणं आणि याचमुळे नात्यात एक प्रकारची दरी निर्माण होणं. चर्चा वेबसिरिजेसच्या अनुषंगाने चालला आहे म्हणून अशा वेबसिरीजेसमधील काही उदाहरणं (वरच्या मुद्द्यांना धरून) देता येतील. ‘लिट्ल थिंग्ज’मधल्या काव्या आणि ध्रुवला लग्न करायचंच नाही असं नाही पण सध्या त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत ज्यामुळे लग्न हे प्राधान्यक्रमाच्या शेवटी येतं, रोजच्या घडामोडीत, रोजच्या जगण्यात जेव्हा त्यांच्या भूतकाळातल्या रिलेशनशिपसचा विषय निघतो तेव्हा ते कधी हसण्यावारी नेतात तर कधी कधी एकमेकांबद्दल त्यांना असुरक्षिततादेखील वाटू लागते. एकदा काव्याची आई ध्रुवला तुम्ही दोघे सिरीयस आहात ना एकमेकांच्या बाबतीत? असं विचारते तेव्हा अचानक झालेल्या प्रश्नाच्या हल्ल्याने थोडासा गडबडलेला ध्रुव पटकन ‘हो’ असं उत्तर देऊन नंतर विचार करत बसतो.

अशीच काहीशी गोष्ट moving out मधल्या रेवा आणि सत्याची. दोघेही ठरवून वेगळे झाले पण अजूनही एकमेकांवर नजर ठेवणं सुरू आहे. एकमेकांच्या सध्याच्या जोडीदारांचा सोशल मीडियाच्या मदतीने मागोवा घेण सुरू आहे. ‘रेडी टू मिंगल’मधील नायक नायिकेचे थोडे वेगळे आहे, त्या दोघांनाही माहित आहे सध्या आपले बाहेर संबंध आहेत पण दोघेही एकमेकांपासून ते लपवत आहेत आणि सर्वात वाईट म्हणजे दोघांनाही एकमेकांचा पाठिंबा आहे. पण ह्या हाइड आणि सिक खेळात नात्यांची गुंतागुंत अधिक वाढत जाते.थोडक्यात लग्नाच्या नात्यात जितकी क्लिष्टता असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्तच लिव्ह इनच्या नात्यात दिसून येते.

अशीच काहीशी गोष्ट moving out मधल्या रेवा आणि सत्याची. दोघेही ठरवून वेगळे झाले पण अजूनही एकमेकांवर नजर ठेवणं सुरू आहे. एकमेकांच्या सध्याच्या जोडीदारांचा सोशल मीडियाच्या मदतीने मागोवा घेण सुरू आहे. ‘रेडी टू मिंगल’मधील नायक नायिकेचे थोडे वेगळे आहे, त्या दोघांनाही माहित आहे सध्या आपले बाहेर संबंध आहेत पण दोघेही एकमेकांपासून ते लपवत आहेत आणि सर्वात वाईट म्हणजे दोघांनाही एकमेकांचा पाठिंबा आहे. पण ह्या हाइड आणि सिक खेळात नात्यांची गुंतागुंत अधिक वाढत जाते.थोडक्यात लग्नाच्या नात्यात जितकी क्लिष्टता असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्तच लिव्ह इनच्या नात्यात दिसून येते. कोणत्याही नात्याच यशापयश हे भावनिकरित्या गुंतण आणि जोडीदार त्यासाठी आपल्यावर अवलंबून असण यावर आधारलेले आहे. हे वाक्य खरं तर नात्यागणिक खूप बदलत. गौरी देशपांडे एके ठिकाणी लिहितात की, ‘एखादं मुल आईवर जेवढं कमी अवलंबून तितकं तिचं आईपण यशस्वी,’ पण हेच वाक्य नवरा बायको किंवा लिव्हइनमध्ये राहणार्‍या एखाद्या जोडप्याच्या बाबतीत लागू होत नाही. या नात्यात केवळ गुंतवणूक असून चालत नाही तर ती जोडीदाराची गरज बनावी लागते तर दुसर्‍या जोडीदारावर असणार प्रेम टिकून राहत. गणिती पद्धतीने किंवा अशा प्रकारची नात्याची उकल फारच व्यावहारिक वाटेल खरी पण नात्यातली स्पेस आणि व्यक्तीस्वातंत्र्य यातला तोल सांभाळता सांभाळता प्रेमाचा balance जाण्याची शक्यता खूप दाट असते अशा वेळी पूर्वापार चालत आलेले, proven असे हे ठोकताळे उपयोगी पडू शकतात. लिव्हइन नात्यात इतर प्रत्येक नात्याप्रमाणे चांगल्या वाईट या दोन्हीही बाजू आहेत. आधी चांगल्या बाजू पाहूयात. भावनिक स्वातंत्र्य वाढीस लागणे, प्रत्येक प्रश्नाकडे, गोष्टीकडे पहायला एक ग्लोबल दृष्टिकोन मिळणे अशा प्रकारचे फायदे लिव्हइनमध्ये मिळतात. शिवाय घर दोघांचे त्यामुळे इथे घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दोघांची आहे ही भावना वाढीस लागते, हीच भावना प्रत्येक लग्नाच्या नात्यात दिसतेच/निभावली जातेच असे नाही तोटे म्हणाल तर मनात नात्याबद्दल, जोडीदाराबद्दल असुरक्षितता असेल तर या पायभरणीवर उभ केलं जाणार कोणतंही नात फार काळ टिकत नाही/टिकू शकत नाही. समजा पुढे पटलं नाही आणि वेगळ होण्याचा निर्णय घेतला गेला तर झालेल्या भावनिक नुकसानाची भरपाई कशी होणार?आणि समजा मुव्ह ऑन झालो तरी पुढच्या नात्याला ती व्यक्ती नीट न्याय देऊ शकेल का हा प्रश्न उरतोच. दोन व्यक्ती (विशेषतः प्रियकर प्रेयसी) एकत्र राहणार त्यात त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे अशा वेळी त्यांच्यात शारीरिक संबंध येणार अशा वेळी संबंधित मुलगी गरोदर असेल पण नात्यात काही अडथळे आले आणि दुर्दैवाने दोघे वेगळे झाले तर या जगात येऊ पाहणार्‍या त्या मुलाची जबाबदारी कोणी घ्यायची? हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो, अशा वेळी अजूनही मुलीला दोष देण्याचे कर्तव्य हा समाज पार पाडतो. आता ‘परमनेंट रूममेट्स’मध्येच पहा, तानिया आणि मिकेश यांच्या शारीरिक संबंधातून तानिया गरोदर होते. अर्थात इथे दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या लिव्हइनबद्दल माहिती असल्याने त्यांना हे समजल्यावर खूप मोठा धक्का बसत नाहीच पण तरीही पारंपरिक वातावरणात वाढलेल्या कोणालाही याचा जितका नैतिक, मानसिक धक्का बसेल तितका धक्का दोघांच्याही पालकांना बसतो. मग हा विषय फार न ताणता येतो लग्नाचा विषय. केवळ मी गरोदर आहे म्हणून मिकेश लग्नाला तयार होतोय हे तानियाला पटत नाहीये तर लग्न केलं म्हणजेच आपल नात टिकेल या घरच्यांच्या विचारात तानिया भरडली जाऊन लग्नासाठी तयार होतेय, हे मिकेशला पटत नाहीये. यात दोन्ही घरच्याचे स्वभाव टोकाचे त्यामुळे एकूण परिस्थितीमध्ये नवनवीन अडचणींची भर पडते.

आता एकूणच लिव्ह इन किंवा लग्नाआधीचे शारीरिक संबंध यावरून थोडंसं, तर नॅशनल जॉग्रफिक या चॅनलवर टॅबू नावाचा लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित केला जातो. निषिद्ध अशा सर्व प्रकारच्या विषयांवर या कार्यक्रमात भाष्य केले जाते तर या कार्यक्रमात भारतातल्या उत्तर पूर्व राज्यात असणार्‍या एका प्रथेबद्दल माहिती दिली गेली होती. या प्रथेनुसार लग्नाआधी संबंधित मुला मुलीला एकमेकांचा स्वभाव कळावा याकरिता ते दोघेही गावाबाहेर एका झोपडीवजा घरात ठराविक दिवस एकत्र (this is sort of live in relationship) राहतात. हे घर मुलीच्या वडिलांनी किंवा भावाने स्वतः तयार केलेले असते. या एकत्र राहण्याच्या काळात त्या मुला मुलीत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून मुलगी गरोदर राहिली तरी हे नात लग्नाच्या निष्कर्षाप्रत पोचावच अशी अपेक्षा नसते. अशा वेळी ते मुलं पुढे जाऊन वाढवायचं की पाडून टाकायचं हा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सर्वस्वी त्या मुलीचे असतात. समजा त्या मुलीने यापैकी काहीही एक निर्णय घेतला तरी समाज तिला जज करत नाही, तिच्याकडे वाईट नजरेने पाहत नाही किंवा त्या मुलीला/मुलाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करत नाही. समजा असं काही घडलं नाही पण मुलीला मुलगा आवडला नाही/काही कारणामुळे पटला नाही किंवा मुलाला मुलगी पटली नाही तर या दोघांना मूव्ह ऑन होण्याची मुभा असते. हे सगळ भारतात घडू शकतं यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय, हो ना?

एका सर्व्हेनुसार भारतात 27 ते 40 या वयोगटातील 40 टक्के पुरुष व महिला लिव्हइनमध्ये राहतात किंवा लिव्ह इनला त्यांचा दुजोरा असतो. 2005 पासून तरुण वयोगटातीलच नव्हे तर 50 पेक्षा जास्त वय असणारे पुरुष महिला देखील लिव्हइनला दुजोरा देऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात पालकांनी (विशेषतः उच्च मध्यवर्गीय समाज) आपल्या पाल्यांच्या लिव्ह इन नात्याला सहकार्य करणं ही नेहमीची बाब बनली आहे. हा आकडा पुढे वाढतच जाण्याची शक्यता आहे. लिव्हइनमधली किती नाती लग्नापर्यंत जातात असा प्रश्न पडला असेल तर 30 ते 40 टक्के नाती लग्नाच्या निष्कर्षाप्रत पोचतात, लग्न करतात, संसाराची वाट पकडतात. समजा लिव्हइनचे नाते टिकले नाही, वाटा वेगवेगळ्या झाल्या तर पुढे अशा मुला-मुलींची लग्न होतात का? असा प्रश्न असेल तर उत्तर ‘हो’ आहे. लिव्ह इन हा मुद्दा लग्नाच्या बाबतीत (मग ते वेगवेगळ्या लोकांशी का असेना) अडथळा ठरत नाही असे निरीक्षण आहे. या दिलेल्या आकडेवारीत महिलांपेक्षा पुरुषांचा लिव्हइन नात्याला पाठिंबा जास्त आहे असं पाहण्यात आलं आहे.

लिव्हइन चांगले की वाईट किंवा याच्या वाट्याला जावे की न जावे यावर उहापोह करायचा या लेखाचा हेतू नाही किंवा लिव्ह इनला दुजोरा देऊन न देऊन लग्न संस्थेला कमी लेखणे/पाठराखण करणे हाही या लेखाचा हेतू नाही. लिव्ह इन बाबतीत असणारी सद्य परिस्थिती इथे नमूद करणे आणि वेब सिरीजेसमध्ये दाखवल जाणारं हे नात या अनुषंगाने या नात्याचा आढावा घेणे हा या लेखाचा मुख्य हेतू आहे. बाकी कोणत्या नात्याची सुरुवात करायची, शेवट करायचा, किती गुंतायचं, किती अवलंबून राहायचं या आणि अशा अनेक मुद्द्यांवर निर्णय घ्यायला प्रत्येकजण आयुष्याच्या त्या त्या टप्प्यांवर सुजाण आहेच.

© भाग्यश्री बिडकर

bhagyashreebhosekar@gmail.com