समलैंगिकता आणि वेब सिरीज

LGBTQ and Web series

1996 साली आलेला फायर चित्रपट असो वा 2004 साली आलेला गर्लफ्रेंड चित्रपट, हे दोन्ही चित्रपट फारसे कोणाला आठवत नसतील. चित्रपटांची कथा एका ‘सनसनाटी’ म्हणावं अशा विषयावर आधारित होती. तो विषय म्हणजे, ‘लेस्बियन रिलेशनशिप’. जिथे आजच्या 2019 सालीही अशा प्रकारच्या नात्यांची चेष्टा केली जाते, तिथे 2004 साली असा चित्रपट काढणं हेच मुळात धाडसाचं काम होतं. फायर चित्रपटाने काही प्रमाणात या नात्याची पॉझिटिव्ह बाजू दाखवायचा प्रयत्न केला पण त्यावर टिकाच जास्त झाली. गर्लफ्रेंड या चित्रपटामध्ये या नात्याला ‘निगेटिव्ह’ शेडमध्येच प्रेसेंट केलं गेलं. त्यानंतर 2008 साली आलेल्या दोस्ताना या चित्रपटातही ’गे रिलेशनशिप’ वर भाष्य केले. अर्थात त्याची कहाणी वेगळी होती.

LGBT म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्सयूअल, ट्रान्सजेंडर. काही व्यक्ती या सुरुवातीपासूनच गे किंवा लेस्बिअन असतात. तर, काही परिस्थितीमुळे परंतु स्वखुशीने लेस्बिअन/गे होतात. हा दुसरा प्रकार मानसशास्त्राशी निगडित आहे.

LGBT कम्युनिटीच्या हक्कांसाठी 1992 साली सुरू झालेल्या चळवळीला अखेर सप्टेंबर 2018 मध्ये यश आले. सर्वोच्च न्यायालयाने आयपीसी मधील कलम 377 मधील LGBT संदर्भातील तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली आणि या समाजातील लोकांना दिलासा मिळाला. अर्थात न्यायलायच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

1992 सालापासून सुरू असलेल्या या लढ्यामध्ये या कम्युनिटीच्या बाजूने ना बॉलिवूड उभं राहिलं, ना मीडिया. पण एका माध्यमाने मात्र या लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांना सपोर्ट केला, ते माध्यम म्हणजे, ‘वेबसिरीज’!

‘वेबसिरीज’ हा प्रकार तसा अगदीच नवीन नाही. परंतु गेल्या तीन चार वर्षात या प्रकाराची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, नामांकित टीव्ही चॅनेल्सना याची तगडी टक्कर निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी हॉट स्टारवर आलेल्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीज मधला प्रिया बापटच्या ‘लेस्बियन’ बोल्ड सिनची खूप चर्चा झाली. पण हा सिन म्हणजे त्या वेबसिरीजचा एक भाग होता. पण काही वेबसिरीज मात्र फक्त लेस्बियन किंवा गे रिलेशनशिपवरच आधारित होत्या. यापैकी काही वेबसिरिजनी LGBTQ कम्युनिटी म्हणजे भीतीदायक, किळसवाणी अशा अनेक गैरसमजांना दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्या काही प्रमाणात यशस्वीही झाल्या. चांगलं कथानक, पात्रांची सुयोग्य निवड आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे या वेबसिरीज लोकप्रिय झाल्या आहेत. परंतु त्यांची ही लोकप्रियता केवळ वेबसिरीज बघणार्‍या क्लासपुरतीच मर्यादित राहिली. चला तर मग अशाच काही वेबसिरीजवर बोलू काही.

द अदर लव्ह स्टोरी :

सहसा वेबसिरीज म्हटलं की बोल्ड सीन्स असं एक समीकरणच तयार झालं आहे. त्यात LGBTQ वर आधारित वेबसिरीज म्हणजे नक्कीच बोल्ड सीन्सची मांदियाळी. परंतु द अदर लव्ह स्टोरी ही वेबसिरीज मात्र याला अपवाद आहे. तशा बर्‍याच वेबसिरीज ‘अपवाद’ या कॅटेगरीमध्ये आहेत. पण नेहमी चर्चा होते ती बोल्ड वेबसिरीजचीच! असो.

तुम्हाला हलके फुलके रोमँटिक चित्रपट आवडत असतील आणि तुम्ही शाहरुखच्या टिपिकल प्रेमकहाण्या बघण्यासाठी दोन चारशे रुपये मोजत असाल, तर ‘द अदर लव्ह स्टोरी’ ही वेबसिरीज तुम्हाला नक्की आवडेल.

‘द अदर लव्ह स्टोरी’ ही भारतातील पहिली लेस्बिअन वेबसिरीज आहे. ऑगस्ट 2016 मध्ये ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. या वेबसिरीजची कथा म्हणजे अगदी साधी सरळ तरल प्रेमकहाणी. फक्त ही प्रेमकहाणी दोन मुलींची प्रेमकहाणी आहे. त्यामुळे वेबसिरीजला नावही अगदी समर्पक दिले आहे, ‘द अदर लव्ह स्टोरी.’

बँगलोरमध्ये राहणार्‍या दोन मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली आधी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतात. नंतर दोघी एकमेकींच्या प्रेमात पडतात. पण हे प्रेम म्हणजे समाज नियमांच्या विरुद्ध असणारी गोष्ट. साहजिकच त्याला विरोध होतो. जसा टिपिकल बॉलिवूड चित्रपटांमध्ये होते अगदी तसाच! अशी अगदी सरळमार्गी प्रेमकहाणी.

यामध्ये दाखविण्यात आलेली कथा ही 1998 सालात घडणारी कथा आहे. त्या काळातल्या रहाणीमानापासून कपड्यांपर्यत सगळ्या गोष्टी विचारपूर्वक दाखविण्यात आल्या आहेत. ही वेबसिरीज एकूण 12 भागांची आहे. प्रत्येक भागाची सुरुवात वर्तमानकाळाने दाखवून पुढे संपूर्ण भाग फ्लॅशबॅक आहे. तरीही कुठलाही भाग आपला ट्रक सोडत नाही.

आद्या आणि आचल ही या वेबसिरीजमधली दोन मुख्य पात्र. आद्या अगदी साधी सरळ एकत्र कुटुंबातली निरागस मुलगी. थोडी लाजाळू, थोडी निराशावादी. तर आचल छोट्या कुटुंबातली बोल्ड मुलगी. दोघींची ओळख, मैत्री आणि नंतर प्रेम या सगळ्या गोष्टी अगदी सहज सुंदर घडून आल्या आहेत. कुठेही ओढूनताणून यांचं लेस्बिअन नातं दाखवायचा प्रयत्न करण्यात आलेला नाही.

आचलचं आद्याला ‘हम आपले हैं कौन विचारणं’, गच्चीवरचा सिन, कोर्‍या वहिवर मधल्याच एका पानाच्या शेवटी लिहिलेलं ‘आय लव्ह यु आद्या’, दोघींच्या प्रत्येक भेटीच्या वेळचा निरोपाचा क्षण, हे सगळे प्रसंग ‘हम आपके हैं कौन’च्या प्रेम-निशा किंवा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या राज-सिमरनच्या रोमँटिक सीन्सइतकेच रोमँटिक वाटतात. गरज आहे ती फक्त वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आणि अशा प्रकारच्या नात्यांना मनापासून स्वीकारण्याची. सगळ्यात सुंदर जमून आले आहेत ते लँडलाईन फोन कॉल्स. आद्या जेव्हा आचलकडे फोन नंबर मागते तेव्हा, एक क्षण वाटतं ती आद्याचा मोबाईल हातात घेऊन नंबर टाइप करून देईल पण ती आपला लँडलाईन नंबर सांगते. आणि या वेबसिरीजमधला काळ हा एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचा काळ असल्याने तेव्हा स्मार्टफोनचं अस्तित्वच नसल्याची जाणीव होते. दोघींचे लँडलाईन फोनवरील बोलणे अनेकांना ‘नॉस्टॅल्जिक’ करणारं आहे. आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पिढीला लँडलाईन फोन कॉल्समधला रोमँटिझम, त्यातला गोडवा समजणार नाही.

आद्याच्या घरी जेव्हा त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल कळतं तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसतो. सहाजिकच आहे. अगदी आजच्या 2019 मध्येही आपल्या मुलीची अशी रिलेशनशिप कुठले पालक हसत हसत स्वीकारतील? त्यांनतर मात्र नेहमीचीच लव्ह स्टोरी. आद्याला अमेरिकेला तिच्या मावशीकडे पाठवायचं ठरतं. त्यासाठी आद्या मुंबईला जायला निघते. आद्या मुंबईला जायला निघते याच सीनपासून वेबसिरीज सुरू होते. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला आद्याची मानसिक स्थिती, तिची आचलला भेटण्यासाठीची मानसिक घालमेल दाखविण्यात आली आहे. त्यांनतर आचलच्या डायरीचं पान आणि नंतर फ्लॅशबॅक दाखविण्यात आला आहे. या वेबसिरीजमध्ये काय चूक, काय बरोबर, संस्कृती वगैरे कुठल्याही मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं नाही. प्रेम ही एक भावना आहे. जसं त्याला वय, जात, धर्म, इत्यादी गोष्टींचं बंधन नसतं, तसंच लिंगाचं म्हणजेच जेंडरचं बंधनही असू नये. थोडक्यात, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं अगदी सेम असतं, एवढंच यातून सांगितलं आहे. आणि यामुळेच ही वेबसिरीज थेट मनाला भिडते. ही वेबसिरीज प्रदर्शित झाली साधारणतः त्याच सुमारास लेस्बियन असल्यामुळे झेलाव्या लागलेल्या हेटाळणीला कंटाळून दोन मुलींनी आत्महत्या केल्याची बातमी वाचनात आली होती. कुटुंब, समाजव्यवस्था आणि कायदा या सार्‍यामुळे त्यांना त्यांचं नातं पूर्णत्वाला नेता आलं नाही. त्यामधली एक मुलगी वाचली परंतु, दुसरीचा मात्र दुःखद अंत झाला. त्या मुलींनी कोणाचं काय बिघडवलं होतं? त्या त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगत होत्या. त्यांना एवढाही अधिकार नाही का? सप्टेंबर 2018 पूर्वी अशा प्रकारचे नातेसंबंध आयपीसीच्या कलम 377 नुसार गुन्हा ठरत असत. त्यामुळे अशा नात्यांना समाजमान्यता तर दूरच पण कायद्यानेही मान्यता नव्हती. त्यामुळे अशी नाती उघडपणे मान्य करण्याची हिम्मत करणारे फार कमी होते.

याच कलमावर भाष्य करणारी आणि LGBTQ नातेसंबंधांवर आधारित अजून एक वेबसिरीज भरपूर लोकप्रिय झाली ती म्हणजे, ‘ऑल अबाउट सेक्शन 377’. ऑल अबाउट सेक्शन 377 ही वेबसिरीज ‘द अदर लव्ह स्टोरी’पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ‘द अदर लव्ह स्टोरी’ हलकीफुलकी लेस्बिअन लव्हस्टोरी आहे, तर ऑल अबाउट सेक्शन 377 LGBTQ च्या जवळपास सर्व मुद्द्यांना स्पर्श करते. काहीशी विनोदी पण अशा नातेसंबंधांचा गंभीरपणे विचार करायला लावणारी ही वेबसिरीज 2017 साली युट्यूब वर प्रदर्शित झाली. या वेबसिरीजचे सर्व भाग युट्यूब वर उपलब्ध आहेत. ही वेबसिरीज एवढी लोकप्रिय झाली की या वेबसिरीजचा पुढील भाग ‘स्टील अबाउट सेक्शन 377’ प्रदर्शित झाला आणि तो ही तितकाच लोकप्रिय झाला.

‘मायसेल्फ सुरेश!’ या ऑडिशन सीनपासून सुरू झालेली वेबसाईट अगदी शेवटपर्यंत विनोद टिकवून ठेवते. वेबसिरीजमधले अगदी मोजके गंभीर प्रसंग वगळता संपूर्ण वेबसिरीज विनोदी पद्धतीने सादर करण्यात आली आहे.

हरियाणातून मॉडेल बनण्याचं स्वप्न उरी बाळगून आलेला सुरेश प्रसिद्ध फोटोग्राफर असणार्‍या त्याच्या मावस भावाच्या म्हणजेच रोहित मेहराच्या घरी राहणार असतो. पण तिथे जायच्या अगोदरच त्याला कळतं की रोहित गे आहे. तरीही तो रोहितच्या घरी जातो. तिथे गेल्यावर रोहितचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ, रोहितच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्या घरातला नोकर छोटू अशी वेगवेगळी माणसं त्याच्या आयुष्यात येतात. सुरेशला रहाण्यासाठी जी खोली दिली जाते ती संपूर्ण गुलाबी रंगाची खोली असते. जिथे पूर्वी एक गे राहत असतो. सुरेश मात्र लवकरात लवकर घरातून निघून जाण्याचा विचार करू लागतो. रोहितच्या टीममधली लेस्बियन सुरभी, गे मेकअपमन आणि त्याचा बॉयफ्रेंड अशा व्यक्ती सुरेशच्या आयुष्यात येतात. याच दरम्यान अजून एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात येत, ती म्हणजे फिजा. एकीकडे सुरेश आपल्यासाठी दुसरी जागा शोधत असतो तर, दुसरीकडे हळूहळू तो या वातावरणात रुळायला लागलेला असतो. तो फिझाच्या प्रेमात पडतो. फिझा ‘स्ट्रेट’ असते, तरीही तिच्यावर मनापासून प्रेम करणारी सुरभी, रोहीत आणि सिध्दार्थचं नातं या सगळ्या गोष्टी तो मनापासून स्वीकारतो. त्यांच्याबरोबर रहाणंही आवडायला लागतो. रोहित एक माणूस म्हणून खूप चांगला असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतःला जसा आहे तसं स्वीकारलेलं असतं. सिध्दार्थचं रोहितवर अगदी मनापासून प्रेम असतं. रोहित मात्र कधी सिध्दार्थच्या आधीच्या गर्लफ्रेंडमुळे तर कधी त्याच्या अवतीभवती वावरणार्‍या मुलींमुळे ‘इनसिक्युअर’ होत असतो. सुरेश रोहित आणि त्याच्या भावना, सिद्धार्थ, सुरभी, छोटू आणि एकूणच या सगळ्यांना हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या नात्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागतो.

रोहित आणि आणि सिद्धार्थचे हळवे प्रसंग, रोहितच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या बहिणीने दिलेलं सरपराईज, तिची आणि सुरेशची LGBTQ कम्युनिटी, त्यांना असणारा समाज आणि कायद्याचा विरोध यावर झालेली चर्चा हे प्रसंग बघताना कुठेही बोअर होत नाहीत. या सगळ्यात फिझा आणि सुरेशची प्रेमकहाणीचा एक हळवा कोपराही दाखवला आहे. फिझा सुरेशवर प्रेम करत असूनही निव्वळ धार्मिक विरोधाच्या भीतीने त्याला नकार देते. प्रेमाला जात, धर्म, लिंग या सार्‍याची बंधनं नसतात. पण दुर्दैवाने नात्यांना मात्र हे सर्व नियम लागू होतात. LGBTQव्यक्तीही माणसंच असतात आणि त्या ही या समाजाचा एक भाग आहेत. त्यांनाही भावना असतात आणि त्या नैसर्गिक असतात. त्यांच्याशी वागताना माणूस म्हणूनच वागलं पाहिजे. या नात्यांना कायद्याने मान्यता मिळाली पाहिजे. असा संदेश या वेबसिरीजमधून देण्यात आला आहे.

स्टील अबाउट सेक्शन 377 :

ही वेबसिरीज ऑल अबाउट सेक्शन 377 पुढचा भाग आहे. पण ही मात्र टिपिकल बॉलिवूड मुव्हीजप्रमाणे काहीशी स्टीरीओ टाइप झाली आहे. खरंतर ऑल अबाउट सेक्शन 377 इतकी प्रभावी झाली आहे की दुसरा भाग बघताना प्रेक्षकांच्या अपेक्षा एका उंचीवर पोचलेल्या असतात. त्या अपेक्षांना म्हणावं तेवढा न्याय ही वेबसिरीज देऊ शकत नाही. बाकी मनोरंजनाच्या दृष्टीने विचार करता ही वेबसिरीज कुठेही कमी पडत नाही, हे मात्र नक्की. यामध्ये रोहित सिद्धार्थच्या प्रेमकहाणीसोबतच तृतीयपंथी समाजाच्या आयुष्यावर, त्यांच्या समस्यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ही या वेबसिरीजची सर्वात मोठी जमेची बाजू. यामध्ये तृतीयपंथीना मिळणारी अपमानास्पद वागणूक, त्यांच्यातील सुप्त कलागुण त्यांचा होणारा अनादर, कुटूंबियांकडून अगदी सख्ख्या आई वाडीलांकडूनही होणारी अवहेलना या सार्‍या गोष्टी बघून मन हेलावून जातं.

या वेबसिरीजचा शेवट मात्र अगदी पटण्यासारखा. सिद्धार्थच्या आईचं मनोगत हे दोन्ही बाजुंनी विचार करायला लावणारं आहे. जर तुम्ही ऑल अबाउट सेक्शन 377 बघितली असेल, तर त्याचा दुसरा पार्ट स्टील अबाउट सेक्शन 377 मात्र आवर्जुन बघा. फक्त तो बघताना कोणत्याही उच्च अपेक्षा न ठेवता निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने बघितलात तर तुमची निराशा होणार नाही.

ही माणसं त्यांच आयुष्य जगत असतात. त्यांना निसर्गानेच असं घडवलं आहे, यामध्ये त्यांचा काय दोष? तसंच लेस्बियन किंवा गे समूहाबद्दल बोलता येईल. जो मुद्दा निव्वळ त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे, त्यावर इतरांनी चर्चा करण्याचं कारणच काय? जोपर्यंत या व्यक्ती कोणाला त्रास देत नाहीत, तोपर्यंत या व्यक्तींवर टिका करण्याचा अधिकार कोणालाही नाही. या LGBTQ व्यक्तीही शेवटी माणसंच आहेत आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचा, समाजामध्ये मानाने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मग त्यांच्याबाबतीत दुजाभाव कशासाठी? असे अनेक प्रश्न या तिन्ही वेबसिरीज बघताना सतत मनात येत असतात.

या विषयावर आधारित अशा अनेक वेबसिरीज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. काही बोल्ड आहेत तर, काही वैचारिक. पण त्यातल्या मोजक्याच मनाला भिडणार्‍या आणि आवर्जून बघाव्या अशा आहेत. जाता जाता शेवटी कलम 377 आणि सुप्रिम कोर्टाचा निर्णय यावर एक प्रकाशझोत- काय होती आयपीसी कलम 377 ची तरतूद :

Section 377 of the IPC, 1862 Unnatural offences: Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

This involves sexual acts between consenting adults (both homosexual and heterosexual adults), even within the privacy of their rooms.

यामधील voluntarily, carnal आणि against the order of nature हे शब्द महत्त्वाचे आहेत कारण हे शब्द संदिग्ध आहेत. अनेकांनी LGBTQ हे अनैसर्गिक मानलं आहे. पण मुळात जी भावना नैसर्गिक आहे ती अनैसर्गिक कशी असू शकेल? दुसरं म्हणजे यातील voluntarily हा शब्द. voluntarily म्हणजे ऐच्छिक, म्हणजेच इथे दोघांचीही संमती हा अर्थ अभिप्रेत आहे.

का हटवली कलम 377 मधील LGBTQ संबंधित तरतूद?

भारताच्या संविधानानुसार Right to Privacy हा मूलभूत अधिकार आहे. दोन सज्ञान व्यक्तींनी कोणावर प्रेम करावं, कोणाशी लग्न करावं, कोणासोबत राहावं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यामुळे आयपीसीच्या कलम 377 LGBTQ संबधीत तरतूद Right to privacy च्या विरोधात आहे. या मुद्द्यावर विचार करुन सुप्रिम कोर्टाने कलम 377 मधील तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली.

मुळात आयपीसी हा 150 वर्षांहूनही जुना ब्रिटिशकालीन अ‍ॅक्ट आहे. भारताचं संविधान त्यानंतर अस्तित्वात आलं. त्यामुळे संविधानातील तरतुदींच्या विरोधात जाणारं कुठलंही कलम अथवा तरतूद रद्द करणे आवश्यक आहे. याच मुद्द्याच्या जोरावर LGBTQ नातेसंबंधाना मान्यता देण्यात आली. कारण संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. देशातील सर्व कायदे संविधानातील तततूदींचा विचार करुनच तयार केले जातात.

LGBTQ व्यक्ती कोणाच्या अध्यातमध्यात नसूनही समाज त्यांना सहजी स्विकारत नाही. का? ती सुद्धा माणसं आहेत. त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. थोडा विचार केला तर प्रत्येकालाच हे जाणवेल. संस्कृती, समाज या गोष्टींच्या नावाखाली माणुसकीलाही तिलांजली द्यायची का? आणि संस्कृतीबद्दलच बोलायचं तर आपली संस्कृती नेहमीच ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्व अंगिकारायला शिकवते. माणूस काय प्राण्यांवरही दया करा असेच सांगते. LGBTQ नातेसबंधांना पाठिंबा द्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यांना विरोध करणं किंवा त्यांची हेटाळणी करणं चूक आहे, हे मात्र नक्की.

© मानसी जोशी

manasi.joshi28@gmail.com