संवेदनांच्या अत्तराचा गंध पसरवणारा कवी – अटल बिहारी वाजपेयी

#दिवाळी_अंक_२०१८

राजकारणाच्या कोलाहलात जेव्हा संवेदनांना पंख फुटतात, तेव्हा जागं होतं कविमन… भवतालातल्या घटितांनी अस्वस्थ झालेलं, राष्ट्रप्रेमानं उचंबळून आलेलं; कधी एकाकीपणानं उदास झालेलं, तर कधी जीवनाचा रसास्वाद घेताना झंकारलेलं… ‘क्या खोया क्या पाया जग में’ या शब्दांत आयुष्यातल्या कठोर सत्याचा आलेख मांडणारं; तर कधी मृत्यूनं दरवाजा ठोठावल्याचं लक्षात येताच ‘मौत से ठन गई’ म्हणणारं! कधी संसदेतल्या राजकीय वादळांना काव्यरसानं शांत करणारं, तर कधी काव्यभाले सोडत सत्ताधार्‍यांना गारद करणारं… जीवनाची व्यामिश्रता काव्यरूपात मांडणारं हे कविमन नावाप्रमाणेच जितकं ‘अटल’ होतं, तितकंच ते तरल, संवेदनशील, भावुक आणि मृदू-मुलायम होतं म्हणूनच ‘राजकीय पटावरचं सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व’ हे एकच बिरुद वाजपेयींना साजेसं नाही, कारण आपल्या शब्दांच्या कुंचल्यांनी त्यांनी रंगवलेलं चित्र ‘अमर आग’ बनून तमाम भारतीयांच्या हृदयात धगधगतं आहे… संवेदनांच्या अत्तरांचा गंध केवळ हिंदी साहित्य विश्वात नव्हे, तर अखिल भारतीय जनमानसात पसरवणार्‍या अटलजींना हृदयापासून सलाम आहे.

मानवी जीवन कधीच सरलरेषीय नसतं… त्यात खाचा असतात, खळगे असतात… काही वाटा मऊ-मुलायम असतात, तर काही काटेरी! खडकाळ मार्गावरून चालताना कधी दमसास कमी पडतो, कधी पाय रक्ताळतात; पण तरीही चालावं लागतंच. अटलजींचा जीवनमार्गही असाच… अनेक चढ-उतारांनी भरलेला… जन्म एका शाळामास्तरांच्या पोटी झालेला असल्यानं एका साचेबद्ध मध्यमवर्गीय वातावरणात त्यांचं बालपण गेलं. वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते होते. हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व! वडिलांकडूनच लहानग्या अटलने वक्तृत्वाचे धडे घेतले. आवाजातले चढ-उतार, क्षणभरासाठीचा विराम आणि नेमक्या जागी वापरायचे चपखल शब्द या सर्व खुब्या त्यांनी आत्मसात केल्या. शब्दांची चपखल योजना करून एखादा वाक्प्रचार जनमानसात प्रचलित करण्याचं कसब अटलजी वडिलांकडूनच शिकले. अटलजींना अभिजात वाङ्मय आणि काव्य यांची लहानपणापासूनच आवड होती. मुळातच तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट कधीच घ्यावे लागले नाहीत. अटलजींचे आजोबा तर साधं संभाषणसुद्धा श्लोकांच्या माध्यमातून करायचे. आजोबा आणि वडील यांच्याकडून लाभलेला हा काव्यवारसा अटलजींच्या मन-मस्तिकाचं पोषण करत होता. अटलजींनी बडनगरमध्येही काही वर्षं शालेय शिक्षण घेतलं होतं. इथं त्यांची ओळख कवी प्रदीप ऊर्फ रामचंद्र नारायण द्विवेदी यांच्याशी झाली. ओळख मैत्रीत बदलली आणि दोन कविहृदयांमध्ये देवाण-घेवाणीच्या मैफली सजल्या. कवी प्रदीप यांची सर्वांत मुख्य ओळख म्हणजे 1962च्या भारत-चीन युद्धात हौतात्म्य पावलेल्या शहिदांसाठी त्यांनी रचलेलं ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत! कवी प्रदीप यांच्यासह अन्य कविमनाच्या लेखकांशी, सर्जनाचे पंख फुटलेल्यांशी अटलजींच्या ओळखी वाढल्या. अटलजींच्या काव्यविषयक जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या याच काळात… शालेय जीवनात अटलजींनी भारावलेल्या मनोदशेत लिहिलेलं एक गीत संघाच्या शाखांमध्ये आजही गायलं जातं –

हिन्दू तनमन, हिन्दू जीवन।

रग रग हिन्दू मेरा परिचय॥

या कवितेत त्यांच्यातला ध्येयानं पेटून उठलेला एक हिंदू-युवक दिसतो. भारताच्या विशाल हिंदू-परंपरेचा पाईक असणार्‍या अटलजींच्या शब्दांना संस्कृतीप्रेमाची अन् देशाभिमानाची असलेली तीव्रता या काव्याच्या प्रत्येक शब्दात प्रखरतेनं जाणवते.

‘मैं वीरपुत्र मेरी जननी के जगती में जौहर अपार –

अकबर के पुत्रों से पूछो क्या याद उन्हें मीना बझार

क्या याद उन्हे चित्तोड दुर्ग में जलनेवाली आग प्रखर

जब हाय सहस्रो माताए तिल तिल कर जलकर हो गई अमर

वह बुझनेवाली आग नही रग रग में उसे समाए हॅूं

यदि कभी अचानक फूट पडे विप्लव लेकर तो क्या विस्मय

हिन्दूू तन मन हिन्दू जीवन रग रग हिन्दू मेरा परिचय।

हिंदूप्रेमानं आणि ध्येयवादानं प्रेरित झालेला किशोर अटल हिंदी साहित्यिकांच्या गळ्यातला ताईत शोभून दिसावा, याचं रहस्य अटलजींच्या शब्दयोजनेत दडलंय. त्यांच्या काव्यात गेयता तर होतीच; पण सखोल अभ्यासाचे, व्यासंगाचे स्पर्शही काव्याला झाल्याचं जाणवतं म्हणूनच या शब्दांनी वाचकांच्या हृदयाला स्पर्श केला, मनं चेतवली, श्रोत्यांच्या नेत्रकडा पाणावल्या आणि आबालवृद्धांच्या तनामनात देशप्रेमाची नखशिखांत लाट उसळवली.

अटलजींचं हिंदूप्रेम जसं काव्यातून अभिव्यक्त झालं, तसंच त्यांचं ‘हिंदी’प्रेमही शब्दरूप घेऊ लागलं. संसदेतल्या चर्चा बहुतेकदा इंग्लिश भाषेतच व्हायच्या; पण या परंपरेला छेद देत वाजपेयीजींनी अत्यंत अभिजात आणि अस्खलित हिंदीत आपल्या अभ्यासपूर्ण विचारांचा जागर मांडला. त्यांच्या स्पष्ट, निश्चयी, ठाम आणि शुद्ध हिंदी भाषणांनी संसदेचा अवकाश तरंगित झाला. इतका की, विरोधी नेतेही वाजपेयीजी उभे राहताच कान टवकारून ऐकण्यासाठी सज्ज व्हायचे. वाजपेयींनी हिंदी भाषेत बोलावं, काव्याचे कारंजे आणि हास्याचे फवारे उडवावेत, अत्यंत चतुराईनं विरोधकांना नामोहरम करावं हा नित्यपाठच असायचा. मोरारजी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात एकाच वेळी एक दक्ष, धोरणी राजनीतिज्ञ होता आणि अत्यंत धकाधकीच्या, असुरक्षिततेच्या वातावरणातही त्यांच्यातला हिंदीप्रेमी साहित्यिक जागृत होता. ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत सर्वांत प्रथम हिंदीतून भाषण करणारा नेता,’ ही वाजपेयींची ओळख आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची मान उंचावणारीच आहे.

“गूँजी हिन्दी विश्व में

स्वप्न हुआ साकार

राष्ट्र-संघ के मंच से

हिन्दी का जयकार

हिन्द हिन्दी में बोला

देख स्वभाषा प्रेम

विश्व अचरज से डोला

कह कैदी कविराय

मैम की माया टूटी

भारत माता धन्य

स्नेह की सरिता फूटी”

अमेरिकेकडून परतल्यावर वाजपेयींनी या कवितेद्वारे आपल्या भावनांना सर्जनवाट करून दिली. डाळिंब टच्च पिकावं आणि ते उकलून त्यातले लाल-टपोरे दाणे बाहेर पडावेत, तसा अटलजींचा प्रत्येक शब्द हृदयातून बाहेर पडत होता… त्या प्रत्येक शब्दात रसरसलेलं चैतन्य आहे… हेच चैतन्य त्यांच्या ‘मेरी इक्यावन कविताएँ’ या काव्यसंग्रहात जाणवतं. एका पानावर मानवी जीवनाची व्यामिश्रता जाणवते, तर दुसरं पान वीररसानं ओथंबलेलं आणि म्हणून काळजाला भिडणारं वाटतं. ‘आओ फिर से दिया जलाएँ’मधून आशावादाचा प्राण भारतीयांच्या मनात फुंकणारा कवी-नेता भेटतो, तर ‘कदम मिलाकर चलना होगा’ या कवितेत त्यांच्यातली तळमळ, संघटनेची कळकळ स्पष्ट दिसते. ‘सपना टूट गया’ या कवितेत ते म्हणतात,

दीप बुझाया रची दिवाली

लेकिन कटी न अमावस काली

व्यर्थ हुआ आव्हान

स्वर्ण सवेरा रूठ गया

सपना टूट गया।

आयुष्यात खळखळणार्‍या नद्या आहेत, तशा कोरड्याठाक बंजार भूमीही, इथं बहरलेला श्रावण आहे तसा रखरखणारा वैशाखही… जीवनाच्या या विसंगतींवर अटलजींचं काव्य मार्मिकपणे बोट ठेवतं.

‘मुझे किसी से नहीं शिकायत

यद्यपि छला गया पग पग में’

या कवितेत विराण संध्यासमयी एकाकीपणाचं गीत गाणारा कवी भेटतो. हा कवी प्रत्येकाच्या आतल्या अनामिक पोकळीला व्यापत जातो… ‘अपने ही मन से कुछ बोले’ या त्यांच्या शब्दांतून एकाकीपणाची खोली आणि रुंदी जाणवते. अरुण कोलटकरांच्या ‘आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण’ या शब्दांतली मर्मभेदकता वाजपेयीजींच्या ‘अपने ही मन से कुछ बोले’ या कवितेत भरून राहिली आहे. ‘न दैन्यं न पलायनम्’ या काव्यसंग्रहात ते लिहितात –

बचपन-यौवन और बुढापा,

कुछ दशकों में खत्म कहानी ।

फिर-फिर जीना, फिर-फिर मरना,

यह मजबूरी या मनमानी?

अनादि कालापासून मानवाला पडलेलं ‘अस्तित्व’ नावाचं कोडं वाजपेयीजींच्या काव्यातून उलगडल्यासारखं वाटतानाच पुन्हा त्याच गुंत्यात अडकल्यासारखं वाटतं. वाजपेयींच्या सर्व कवितांचा, लेखांचा, भाषणांचा उल्लेख करणं जागेअभावी मुळीच शक्य नाही; पण एवढं नक्की, जसा भारतीय राजकारणाला वाजपेयींच्या निमित्तानं ‘सर्वसमावेशक’ चेहरा मिळाला, तसा हिंदी साहित्य जगताला त्यांच्या रूपानं सर्वसमावेशकतेचं तत्त्वज्ञान ओघवत्या शब्दगंगेच्या रूपात मांडणारा कवी लाभला.

वाजपेयींच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात जाणवणारे तत्कालिक संदर्भ आणि त्यांचं प्रसंगावधान! 2 फेब्रुवारी, 1977 रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना एक जबरदस्त राजकीय धक्का बसला. त्यांच्या सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आणि अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करणारे नेते बाबू जगजीवन राम यांनी राजीनामा दिला आणि इंदिराजींविषयी रोष व्यक्त करत काँग्रेसच्या नेत्या हेमवती नंदन बहुगुणा आणि ओडिशाच्या नंदिनी सतपथी यांच्याशी हातमिळवणी करत ‘काँग्रेस फॉर डेमोक्रेसी’ नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारी 1977 रोजी भोपाळमधल्या एका सभेत वाजपेयीजींनी जी कविता ऐकवली, ती त्यांच्या प्रसंगावधानाचं द्योतक आहे –

बाद मुद्दत के मिले दिवाने

कहने सुनने को हैं बहुत अफ़साने।

ज़रा खुली हवा सें साँस तो लेने दो,

कब तलक ये आज़ादी रहेगी कौन जाने।

आयुष्यात होणारे आघातही वाजपेयींच्या काव्य प्रतिभेला निखारत होते. वाजपेयींचे साहाय्यक शिवकुमार म्हणतात की, वाजपेयींना समजून घ्यायचं असेल, तर त्यांची कविता समजून-उमजून घेतली पाहिजे. वाजपेयीजी त्यांच्या वाढदिवसाला निश्चितपणे एक तरी कविता लिहायचे; पण पंतप्रधानपदाचा शिरपेच स्वीकारला आणि कवितेचा तुरा मात्र हरवला, तरीही जेव्हा राजकीय उलथापालथींनी, राजकारणातल्या शह-काटशहांनी जेव्हा त्यांचं मन व्यथित व्हायचं, तेव्हा त्यांची लेखणी झरझर झरायची. 1988 साली अमेरिकेत असताना त्यांचे मित्र डॉ. मोदी यांनी अटलजींना काही वैद्यकीय तपासण्या करून घेण्याची विनंती केली. त्या तपासण्यांचे अहवाल गंभीर होते. जणू अटलजींना मृत्यूनं दरवाजा ठोठावल्याचं ऐकू येऊ लागलं आणि कविमन गाऊ लागलं –

मौत से ठन गयी।

जूझने का मेरा कोई इरादा न था,

मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था।

रास्ता रोक कर वो खड़ी हो गयी,

यों लगा ज़िन्दगी बड़ी हो गयी।

तू दबे पाँव, चोरी छिपे से न आ,

सामने वार कर, फिर मुझे आजमा।

मौत से बेख़बर, ज़िन्दगी का सफ़र,

शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।

पार पाने का कायम मगर हौसला,

देख तूफां का तेवर त्योंरी तन गयी,

मौत से ठन गयी।

वाजपेयीजींवर दीनदयाल उपाध्याय यांचा प्रचंड प्रभाव होता. उपाध्यायांप्रमाणेच वाजपेयीजी पहिल्यापासूनच एक फर्डे वक्ते आणि प्रभावी कवी होते; पण बोलताना तोलूनमापून बोलणार्‍या अटलजींच्या काव्यात मात्र त्यांचा राकट, जहाल आणि प्रसंगी कट्टर स्वभावही दिसतो. ते लिहितात –

न दैन्यं न पलायनम्

हमें ध्येय के लिए,

जीने, जूझने और

आवश्यकता पड़ने पर

मरने के संकल्प को दोहराना है।

आग्नेय परीक्षा की

इस घड़ी में

आइए, अर्जुन की तरह

उद्घोष करें

न दैन्यं न पलायनम्॥

अटलजींच्या कवितांवर आणि एकंदरच लेखनावर हरिवंश राय बच्चन, शिवमंगल सिंह सुमन, सूर्यकांत त्रिपाठी निराला, फौज अहमद अशा महारथींचाही प्रभाव होता. ‘सुमन’ यांना तर अटलजी गुरू मानायचे. ‘मेरी इक्यावन कविताएँ’च्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी काढलेले प्रशंसोद्गार वाजपेयीजींच्या काव्य प्रतिभेला साजेसे वाटतात. मा. राव म्हणतात, “संसद में वे हमें बहुत जली-कटी सुनाते हैं। मगर उनका सौहार्द्र छुपाए नहीं छिपता। उनका भाषण रौद्र होते हुए भी शान्त रस का आभास कराता है क्योंकि उनके दिल में कठोरता नहीं है।”

‘मेरी इक्यावन कविताएँ’, ‘क्या खोया क्या पाया’, ‘चुनी हुई कविताएँ’, ‘कुछ लेख कुछ भाषण’, ‘विचार-बिन्दु’, ‘शक्ति से शान्ति’, ‘नयी चुनौती नया अवसर’, ‘संकल्पकाल’, ‘न दैन्यं न पलायनम्’ हे सर्व काव्य-लेखसंग्रह म्हणजे अटलजींनी आपल्यासमोर ठेवलेला गुलदस्ता आहे; पण हा गुलदस्ता सुपूर्त करताना त्यांचं हिंदीप्रेम उफाळून येत असलं, तरी त्याचं अवडंबर त्यांनी कधीच माजवलं नाही. प्रांतिक-भाषिक भिंती उभ्या करणं त्यांना मुळीच मान्य नव्हतं. उलट सर्व भाषांचा विकास झाला पाहिजे आणि साहित्याची सर्व भाषांत, प्रांतांत, संस्कृतींमध्ये देवाण-घेवाण झाली पाहिजे, असा वाजपेयीजींचा आग्रह होता. संघाच्या ‘अखंड भारत’ या संकल्पनेला भलेही त्यांचा उघड विरोध नसला तरी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर त्यांचा भर होता आणि यासाठीचं उत्तम माध्यम ‘अनुवाद’ असू शकतं, असंही त्यांना वाटायचं. 1998 साली दिल्लीत गालिब यांच्या रचनांवर आधारित एका सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान वाजपेयी उपस्थित होते. त्यांनी अनुवादासारख्या सशक्त माध्यमाचा अक्षरक्षः उद्घोष करत म्हटलं, “ग़ालिब ने जो कुछ लिखा है उसका और भाषाओं में अनुवाद किया जाये। लेकिन मैं केवल हिन्दी की बात नहीं कर रहा। उर्दू भारतीय भाषा है। उर्दू हमारी राष्ट्रीय भाषाओं में है। उर्दू के रास्ते में कुछ रुकावटें ज़रूर हैं लेकिन ये रुकावटें एक दिन दूर होंगी और हिन्दुस्तान की ज़िन्दगी में उर्दू को अपना स्थान मिलेगा।”

हिंदी भाषिकांनी जर उर्दूचा अभ्यास केला, तर हिंदी भाषा आधीपेक्षा समृद्ध, सशक्त आणि अर्थपूर्ण होईल, असं ते म्हणाले.

पूर्ण वेळ सक्रिय राजकारण आणि साहित्यातला आविष्कार या परस्पर टोकाच्या भूमिकांमध्ये अटलजी समरसून जगले. ते जितके मुत्सद्दी आणि चतुर राजनीतिज्ञ होते, तितकेच एक प्रांजळ कवी होते म्हणूनच ‘मी अविवाहित आहे; पण ब्रह्मचारी नाही’ असं प्रामाणिकपणे जगजाहीर करणार्‍या या कवीला कबिराच्या ‘चदरिया’त बदल करत लिहावंसं वाटलं –

कबीरा की चदरिया

नयी गाँठ लगती

मन मे लगी जो गाँठ मुश्किल से खुलती,

दागदार जिन्दगी न घाटों पर धुलती,

जैसी की तैसी नहीं,

जैसी है वैसी ही सही,

कबीरा की चदरिया बडे भागे मिलती।

नयी गाँठ लगती।

‘जैसी है वैसी ही सही’ या त्यांच्या शब्दांत जीवनाप्रति आणि स्वत:च्या अस्सल स्वभावाप्रति कमालीचा स्वीकारभाव आहे. भरभरून जगणार्‍या आणि तितकंच समरसून लिहिणार्‍या या कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याला श्रद्धांजली अर्पिताना त्यांचीच शब्दसुमनांजली वाहाविशी वाटते –

टूटे हुए तारों से, फूटे वासन्ती स्वर,

पत्थर की छाती में उग आया नव अंकुर,

झरे सब पीले पात, कोयल की कुहुक रात,

प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ।

गीत नया गाता हूँ… गीत नया गाता हूँ।

लेखक - चेतन कोळी

(लेखक मंजुल पब्लिशिंग हाउसच्या मराठी विभागाचे मुख्य संपादक असून, त्यांनी ‘वाजपेयींचे अज्ञात पैलू’ या ग्रंथाचे संपादन केले आहे.)