जिम कॉर्बेट भ्रमंती : जंगलाची श्रीमंती

विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अनेक जंगलांची सफर केल्यानंतर कित्येक वर्षांनी जिम कॉर्बेट व्याघ्र अभयारण्याला सविस्तर भेट देण्याचा योग दोन आठवड्यांपूर्वी आला, तेही पुण्यापासून ड्राइव्ह करत! कॉर्बेट मधील दोन दिवस, तिथल्या गाईडने सांगितलेल्या काही चार ज्ञानाच्या गोष्टी, झाडे, पक्षी आणि प्राणी यांचे केलेले निरीक्षण; या सर्वांतून हाती लागलेल्या काही गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.


जिम कॉर्बेट मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत आणि या जंगलाचे अनेक खंड पाडण्यात आले आहेत. एकावेळी तुम्हाला एकच खंड बघता येतो. परंतु जंगल इतके विस्तृत आहे कि एक खंड देखील नीट बघण्यासाठी किमान चार ते पाच दिवस हाताशी हवेत. प्रत्यक्ष कॉर्बेटला पोहोचण्याच्या आधी रामनगर म्हणून एक बऱ्यापैकी मोठे गाव लागते. तेथे वनविभागाचे कार्यालय असून तेथून तुम्ही वनक्षेत्राच्या आतील विश्रामगृहे व सफारी साठी जिप्सी बुक करू शकता. हे सर्व बुकिंग ऑनलाईन देखील करता येतात आणि ते फार सोयीचे आहे. सरकारमान्य जिप्सी केवळ सात हजार रुपयांत साडेतीन तासाच्या चार सफारी करवून आणते.

ढिकाला वनक्षेत्रात जाण्यासाठी ढांगरी गेट मधून प्रवेश करावा लागतो. तेथे संपूर्ण वनक्षेत्राचा नकाशा लावण्यात आला आहे. येथेच उत्तम दर्जाचा सेंद्रिय तांदूळ, मध व अन्य स्थानिक उत्पादने देखील विक्रीस उपलब्ध आहेत.[/caption]

दिल्लीहुन रामनगरला जायला पाच तास लागतात आणि रामनगर जवळ येत जाते तसे निसर्गाचे रूप बदलत जाते. रामनगर हे चारी बाजूंनी जंगलाने वेढलेले परंतु त्यातल्यात्यात मोठे गाव आहे. कॉर्बेटच्या विविध खंडांपैकी ‘ढिकाला’ वनक्षेत्र फार प्रसिद्ध आहे. ढिकाला वनक्षेत्रात रामगंगा नदीचे विस्तृत खोरे त्याच बरोबर खूप मोठ्या सपाट गवताळ जमिनीचा समावेश होतो. गवताळ प्रदेश हरीण, सांबर आदी प्राण्यांच्या आवडीचे असल्यामुळे हे प्राणी ज्यांचे खाद्य आहे, त्या वाघांचे देखील अत्यंत आवडीचे क्षेत्र आहे. ढिकाला गेस्टहाऊस ग्रासलँडला लागून रामगंगा नदीच्या पात्रालगतच आहे. जंगलाच्या ऐन मध्यभागी दोन रात्री घालवणे फारच संस्मरणीय होते. ढिकाला विश्रामगृह जरी जंगलात असले तरी तेथे नाश्त्याची व जेवणाची उत्तम सोय आहे.

 
ढिकाला गेस्टहाऊस. जंगलाच्या हृदयात. संपूर्ण गेस्टहाऊसला सौरविद्युत ऊर्जेचे सुरक्षा कुंपण आहे जे वन्य प्राण्यांना हलकासा शॉक देऊन आत येण्यापासून प्रतिबंधित करते.

चार सफारींमध्ये आम्हाला खालील प्राणी आणि पक्षी दिसले: वाघ – ६, हत्ती – काही डझन, बार्किंग डियर -४, सांबर – काही डझन, स्पॉटेड डियर – शेकडो, रानडुकरे- काही डझन, मगरी, पक्ष्यांचे किमान २५ प्रकार ज्यात काही प्रकारचे गरुड, खलीज फिसंट, किंग फिशरचे प्रकार, पॅराडाईज फ्लायकॅचर, एशिअन फ्लायकॅचर, सुतार पक्षी, डॉलर बर्ड व अन्य अनेक पक्ष्यांचा समावेश होतो.

एका उंच झाडाच्या फांदीवर बसलेला सरपेंट ईगल.

जंगलात घालविलेल्या तीन दिवसांत अनुभवलेल्या अन शिकायला मिळालेल्या काही गोष्टी –
१. जंगलात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त वाघ याच विचारसरणीने सर्वाधिक लोक येतात. वाघ दिसणे हा जरी खूपच सुंदर अनुभव असला तरी वाघांव्यतिरिक्त देखील जंगलात पाहायला आणि अनुभवायला खूप काही आहे. उदाहरणार्थ, नदीकाठी पंधरा गाड्यांतील लोक टक लावून वाघाची वाट बघत असताना एक काळा-पांढरा किंगफिशर नदीत डुबक्या मारून मासे पकडत होता. काही एक-दोन हौशी आणि जिज्ञासू पर्यटक वगळता इतर कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही. हत्ती त्यांचे गवत खाण्याआधी कसे झटकून स्वच्छ करतात, पक्षी मासे दगडावर आपटून नंतर कसे खातात, इत्यादी अनेक गोष्टी वाघाइतक्याच सुंदर आणि संस्मरणीय आहेत परंतु दुर्दैवाने केवळ वाघाकडे नजर लावण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण जंगलाच्या सौंदर्याला मुकतो. वाघ दिसणे हा काही अंशी नशिबाचा देखील भाग आहे. या इतर गोष्टींचा जर आनंद घेता आला तर वाघ जरी दिसला नाही तरी वनभ्रमंतीतून अवर्णनीय आनंद मिळतो.

मास्यांवर यथेच्छ ताव मारणारा किंगफिशर हाच. डुबक्या मारून दमल्यावर नदीकाठच्या झाडावर तो बसला, पण क्षणभरच!

२. जंगल फिरायचे असल्यास शांतता पाळण्याची आणि स्तब्धपणे निरीक्षण करण्याची क्षमता हवी. जंगलाचा आवाका खूप मोठा असल्यामुळे आणि त्यात मोठ्या संख्येने वृक्ष आणि वेली असल्यामुळे ‘दिसण्या’पेक्षा ‘ऐकण्या’ने अधिक माहिती कळते. वाघ, हत्ती इत्यादी प्राणी जंगलात कुठे आहेत हे इतर पक्ष्यांनी व प्राण्यांनी दिलेल्या पुकाऱ्यांवरून चांगले समजते. त्यासाठी अनेक वेळा गाडीचे इंजिन बंद करून काही मिनीटे शांतपणे बसावे लागते. संपूर्ण अंगाला चिखलाचा लेप लावून शिकारीची वाट बघत दाब धरून दूर नदी पात्रातली मगर सूक्ष्म निरीक्षणाशिवाय दिसणे केवळ अशक्य. आपले मोबाईल फोन्स, टीव्ही यांनी आपली शांतपणे बसण्याची क्षमता जणू काही पूर्णपणे उद्धवस्त केली आहे. काहींना या शांततेचा त्रास होऊ शकतो परंतु दोन दिवसांतच या शांततेची आपल्याला सवय होऊ लागेल.
३. माणूस जिथे जाईल तेथे उपद्रव करतो. जंगलात सर्वत्र एक शिस्त पाहायला मिळते. सर्व प्राणी, पक्षी, वृक्ष एका शिस्तीत जगत असतात. काय खायचे, किती खायचे, केव्हा खायचे, या सर्वांमागे शिस्त असते. आपण जंगलात जाऊन आपल्या वागण्याने या शिस्तीला तडा पडता कामा नये. वाघ दिसण्यासाठी गाड्यांमध्ये रेस लागणे, गाड्या सरकावण्यावरून आरडा-ओरडा करणे, वाघिणीच्या पिलाला भेटण्याच्या रस्त्यावर २५ जिप्सी गाड्या उभ्या करणे अशा आपल्या बीभत्स वागण्याने आपण जंगलातील घट्ट परंतु अत्यंत नाजूक शिस्तीला तडे देत असतो आणि याचा प्राण्यांना त्रास होतो.

शिकारीच्या मागावर असलेला वाघ. गाईडच्या सांगण्यानुसार हा सुमारे दीड ते दोन वर्षांचा आहे.

४. जंगलात केवळ प्राणी आणि पक्षी बघण्यापेक्षा आणि त्यांचे केवळ फोटो काढण्यापेक्षा त्यांच्या वागण्याचे निरीक्षण केल्याने जंगलातील अनेक गमती-जमती कळू शकतात. उदाहरणार्थ, नदीच्या वाळलेल्या पात्राच्या एका बाजूने आम्ही जात असताना काही काळ आमच्या चालकाने गाडीचे इंजिन बंद केले. थोडी शांतता झाल्यावर दोनशे मीटर पुढून माकडांचा विशिष्ट पद्धतीने ओरडण्याचा आवाज आला. आम्ही गाडी सुरु करून त्या दिशेला गेलो. आम्हाला ते आवाज करणारे माकड एका झाडावर दिसले. गाईडने आम्हाला त्या माकडाचे निरीक्षण करण्यास सांगितले. त्यातून आम्हाला समजले कि माकड नदीच्या पात्रात एका दिशेने बघून आवाज करत होते. बाजूला खोऱ्यातच काही हत्ती आणि त्यांची तीन पिले गवत खात होते. पात्रात कुठेतरी एक वाघीण लपलेली होती. ज्या क्षणी ती वाघीण अजून जवळ आली, सर्व हत्तींनी कळपाची अशी रचना केली कि ती तीनही पिले कुठे गायब झालीत हे आम्हाला समजलेच नाही. वाघीण निघून जाताच माकडाचे ओरडणे थांबले; हत्तींचा कळप पांगला आणि तीन पिले अलगद त्यातून बाहेर आली.

वाघिणीची चाहूल लागताच सावध झालेला हत्तींचा कळप. यांच्या पायांमध्ये यांची तीन पिल्ले लपली आहेत!

सफारीच्या दुसऱ्यादिवशी एक शिकारी वाघीण नदीच्या पलीकडे काही लोकांना दिसली तर काही लोकांना तिचे एक पिल्लू नदीच्या दुसऱ्या बाजूस दिसले. संध्याकाळी वाघीण नक्कीच पिलाला भेटायला येणार आणि त्याला पाणी प्यायला नदीत घेऊन जाणार असा सर्वच गाईड्सचा अंदाज. त्यामुळे संध्याकाळी सुमारे पंचवीस गाड्या पिलाला घेरून उभ्या होत्या. अर्थातच माणसाच्या या घुसखोरीमुळे वाघीण घुसमटली होती. थोड्यावेळाने पिलाला तहान लागली आणि ते आईला हाक मारू लागले. पिलाची हाक ऐकताच दुसऱ्या क्षणी वाघीण एकमेकांना चिकटून उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या रांगेला छेदून पिलाकडे गेली. वाघीण दिसताच एक नव्हे, दोन, नव्हे, तर तिची तीन पिलं बाहेर आली. इतक्या सर्व गाड्या, त्यांच्या टपावर चढून, हातात अजस्त्र आकाराच्या लेन्सेस घेऊन आरडा-ओरडा करणारे फोटोग्राफर यांना कोणालाही काडीची भीक ना घालता प्रथम ती वाघीण गवतावर पिलांसोबत खेळली. मनसोक्त खेळून झाल्यावर एकेक पिलू तिच्या देखरेखीत पाणी प्यायला नदीकिनारी गेले.

वाघिणीची दोन पिले - पाणी पिताना. तिसरे पिलू त्यांच्यापासून काही अंतरावरच पाणी पीत होते.

केवळ वाघ पाहून आणि त्याचे फोटो काढून बलाढ्य वाघिणीचे पिलांवरचे तरल प्रेम आणि कोवळ्या पिलांची आईच्या सामर्थ्यावरील भक्कम निष्ठा आपल्याला कशी अनुभवता येणार?
प्राणी आणि पक्षी याव्यतिरिक्त देखील जंगलात पाहायला किती काही आहे! आकाशाला भिडणाऱ्या भक्कम वृक्षांना पोखरून टाकणाऱ्या पॅरासाईट वेली, केवळ दोन फूट रुंदीच्या ओढ्यामुळे भोवतालच्या विशाल क्षेत्राला लाभलेला थंडावा, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाआधी आकाशात उमटलेले अद्भुत रंग आणि रात्रीच्या गडद अंधारात एकमेकांशी झुंझलेल्या दोन अजस्त्र हत्तीचे चीत्कारणे! विविध झाडांचे आणि त्यांच्या मोहोरांचे येणारे कडू-मधुर वास; जंगल आपल्या सगळ्या ‘सेन्सेस’ला पुनर्जीवन देते. शुद्ध हवा, विविध प्रजातींनी परिपूर्ण जीवसृष्टी, निर्मळ पाणी हे आपले खरे वैभव कि डिझेलचा धूर ओकणाऱ्या गाड्या आणि ओंगळवाणे आवाज करणारे काँक्रीटचे मिक्सर्स हि आपली संपत्ती असा प्रश्न मनाला वारंवार पडतो.

 
अवकाशात रंग भरणे म्हणजे काय? सूर्योदयानंतर संपूर्ण 'स्पेस' रंगांनी भरून गेली होती.

पर्यटक वाघ दिसला म्हणून तृप्त होते परंतु प्राणी, त्यांच्या भावना, त्यांचा जीवनाचे निसर्गावरील अवलंबन आणि मनुष्याच्या वागण्याने निसर्गाला आणि अनुक्रमे वन्यजीवांना होणार त्रास कोणाला जाणवत असावा असे वाटले नाही. जंगलात जाताना पर्यटक म्हणून न जाता एक निरीक्षक म्हणून गेल्यास माणसाचे निश्चितच परिवर्तन होऊ शकते!

लेखक – मंदार कारंजकर

mandar@mandarkaranjkar.com