वित्ताचा कित्ता – भाग १

Financial Literacy

वित्त ! म्हणजे आपल्या मराठीत – फायनान्स. सोप्या भाषेत पैसा आणि त्याच्याशी संबंधित सगळा जुगाड… मानवाला उत्क्रांतीच्या प्रवासात गवसलेल्या सर्वात मूल्यवान संकल्पनेचं हे नांव…मानवी इतिहासातील प्रत्येक घटनेमागे बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेली अशी एक बाजू असते. ती म्हणजे पैशाच्या खेळाची ! आपल्याला लढली गेलेली युद्ध तेवढी ठळकपणे इतिहास म्हणून शिकवली जातात. पण त्या युद्धांना ‘फायनान्स’ करणारे चेहरे आणि घटक बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. खरंतर ही बाजू हा युद्धे, तह इत्यादींमधील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक घटक आहे. वित्ताच्या बाबतीत प्रगत असलेल्या मानवसमूहांनी जगावर राज्य केलं आहे. मानवी संबंधात पैसा-वित्त-फायनान्स या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजवत आल्या आहेत ! यांच्याशिवायही कदाचित युद्ध लढली गेली असती, पण ती जंगलात आणि दगड-हाडे घेऊन…

वित्ताचा आधार नसता तर मानव आजही आदिम अवस्थेत – कंदमुळे खोदत, ससे मारत बसला असता ! आगीमुळे माणूस सुरक्षित बनला, पण नाण्यांमुळे तो सुखी बनला हे विसरता कामा नये… तरीही जवळपास सगळ्या अध्यात्म विचारांनी पैशाला निष्कारण व्हिलन बनवून ठेवले आहे. कीर्तनकार बुवा पैसा म्हणजे सैतानाचा दूत वगैरे बाता मारतात… पण स्वतः मात्र सैतानाचा असला तरी द्या तो इकडे म्हणून आपली बिदागी चेपत असतात ! अन्य धर्म, अध्यात्म विचार यांचीही हीच गत आहे. यामुळे, आणि विशेषतः भारतात, अनेक सामान्य जणांच्या डोक्यात पैशाविषयी द्विधा मनस्थिती असते. ती म्हणजे कमवावा तर लागतो पण अध्यात्म तर वाईट म्हणून पण सांगते. मग लोक ‘पैसा काही बरोबर नेता येतो का’ वगैरे म्हणून वेळ मारून नेतात ! गंमत अशी की ‘पैशाने पारलौकिक लाभ होतो का’ हा प्रश्न म्हणजे चमच्याने केस विंचरता येतील का असला काहीतरी भंपक प्रश्न आहे. पैसा ‘बरोबर नेण्यासाठी’ नाहीच आहे ! तो इथली आयुष्यं अधिक सुकर, सुखी आणि सार्थक बनवण्यासाठी आहे.

पैशाची व्यवस्था आहे म्हणून एक डॉक्टर डॉक्टरी करून फीच्या पैशातून दूध घेऊ शकतो आणि अंडी सुद्धा ! पैसा नसता तर (एकतर तो डॉक्टर झाला तो विषय वेगळा !) त्याच माणसाला कोंबड्या पाळाव्या आणि गायी हाकाव्या लागल्या असत्या. अन्यथा बार्टर म्हणजे वस्तुविनिमय करून एक शेर दुधाला नक्की किती अंडी मिळावीत यासाठी कोंबडी पाळणाऱ्या माणसाशी दिवसभर भांडावे लागले असते ! पैसा म्हणजे फक्त विनिमयाचे साधन नाही. पैसा नसता त्यापेक्षा तो असल्यामुळे मानवी-सामाजिक संबंध आणि एकंदरच ‘सुख’ हे कैक पटींनी जास्त आहे… आत्ताच्या उदाहरणात पैसा आहे म्हणून त्या डॉक्टरला मिळणारी खाद्य-Nutrition value आणि तो देत असलेली वैद्यकीय सेवा या दोन्हींच्या उपयुक्तता आणि उपलब्धता (आणि अप्रत्यक्ष रित्या दर्जा सुद्धा!) पैशामुळे वाढतात. त्यामुळे ‘पैसा हे सर्व दुःखांचे मूळ’ वगैरे म्हणणाऱ्या बुवा लोकांना एकदा सामुहिकरित्या जंगल ट्रीपवर पाठवावे ! आणि म्हणावे करा काय करायची ती अध्यात्मिक प्रगती !! हे म्हणजे सरळ सरळ पैशाच्या महत्त्वावर अन्याय करण्यासारखं आहे आणि त्याहून जास्त दुटप्पी आहे. पैशामुळेच शक्य झालेल्या मंदिरात, पैसे देऊन बसवलेल्या माईकसमोर उभं राहून आमचे पैसे घेऊनच आलेले बुवा ‘पैसा म्हणजे नाश’ वगैरे ज्ञान पाजळून टाळ्या घेतात !!! त्यामुळे असल्या लोकांवर भरवसा ठेवून उगाच तरी पैशाबद्दल मनात अढी ठेवू नका ! आणि परत कोणी ‘पैसा म्हणजे नाश’ म्हणाला तर त्याला ‘तुझा सगळा नाश माझ्याकडे सोपव पाहू’ अशी अध्यात्मिक बलिदानाची profitable ऑफर देऊन बघा !!

पण अध्यात्माने कितीही नाकारले तरी या जगावरचा, त्याच्या इतिहासावरचा पैशाचा-वित्ताचा प्रभाव लपत नाही ! जगातल्या युद्धांमागे, तहांमागे, राज्यांमागे, त्यांच्या पतनामागे बरेच दुर्लक्षित वित्तीय धागेदोरे मिळतात ! financial ताकद हातात असलेले लोक कसा आंतरराष्ट्रीय प्रभाव पाडतात – त्याचे सर्वात चपखल उदाहरण म्हणजे – Nathan Rothschild ! हा माणूस जितका श्रीमंत होता त्याहून जास्त द्वेषाचा धनी होता/आहे… लोकांना श्रीमंत माणसांभोवती conspiracy थेअरी विणायला, सांगायला आवडते. Rothschild बद्दलच्या Conspiracy Theories नुसत्या explain करायच्या म्हटल्या तरी जाडजूड ग्रंथ भरेल. मात्र तज्ज्ञस्वीकृत, मुख्य प्रवाहातील मतानुसार – याने नेपोलियनला हरवण्यात ब्रिटिश आणि दोस्तांना मदत केली. इतकी की – तत्कालीन ब्रिटिश Prime Minister, Lord Liverpool यांनी त्यांचा Foreign Secretary, Lord Castlereagh याला म्हटले होते की -“हा माणूस नसता तर आपण काय केलं असतं !”… (संदर्भ- The Assent of Money, Page No. 83) असं का म्हटलं याला तितकंच महत्त्वाचं कारणही आहे! त्या काळात आजच्या डॉलर, युरो सारखी हमखास acceptability असणारी जागतिक चलनव्यवस्था नव्हती. अशावेळी बॉण्ड्स आणि सोन्याची आंतरराष्ट्रीय उलाढाल करणारे private bankers राष्ट्रांना बाहेरच्या देशातील सैनिकी खर्च भागवण्यासाठी मदत करायचे (अर्थातच कमिशन घेऊन !)…

Nathan Rothschild

Rothschild ने आपले आणि आपल्या कुटुंबाचे युरोपीय वित्तव्यवस्थेतील जाळे वापरून, नेपोलिअन विरुद्ध ब्रिटिश आणि दोस्त राष्ट्रांच्या कारवाया स्पॉन्सर केल्या! या सगळ्या Napoleonic युद्धाच्या घडामोडीवर Rothschild चे खबरे (Couriers) इतके चोख लक्ष ठेवून होते की, Waterloo ची लढाई जिंकल्याचे Rothschild ला आधी कळले, ब्रिटिश सत्तेला त्याच्या ४८ तास नंतर कळले !! पण खरी गंमत पुढे आहे. ही लढाई जिंकल्यामुळे, सैनिकी कारवाया थांबून rothschild च्या हातातील प्रचंड सोन्याची किंमत कमी होणार होती. त्यामुळे आपणच फायनान्स केलेली लढाई जिंकल्यानंतरही rothschild ने दिवाळी साजरी करावी, अशी परिस्थिती अजिबात नव्हती ! पण लढाई तर संपली होती. आता हातातील सोन्याची किंमत कमी होताना बघणेच Rothschild च्या हातात होते. पण Rothschild ला लढाई जिंकली आहे हे माहित होतं ! या माहितीच्या आधारे त्याने एक खतरनाक जोखीम उठवायचं ठरवलं. त्याने हातातलं सोनं वापरून ब्रिटिश सरकारचे बॉण्ड्स खरेदी केले. युद्धातील विजयामुळे ब्रिटिश सरकारचे कर्ज सैनिकी खर्च आता थांबणार होता. सरकारी Borrowings कमी होणार होती. परिणामतः सरकारी रोख्यांची value वाढणार होती. Rothschild चा अंदाज बरोबर ठरला. जवळ जवळ वर्षभर योग्य वेळी खरेदी करत करत, (याच धंद्यात असलेल्या भावांचे बॉण्ड्स विकण्याचे सल्ले न ऐकता!) Nathan Rothschild आपल्या speculation वर ठाम राहिला. आणि नोव्हेंबर १८१७ मध्ये योग्य वेळ येताच त्याने ते बॉण्ड्स विकून ४०% नफा कमवला !(संदर्भ :The Assent of Money, Page No. 85) त्या जगप्रसिद्ध लढाईत नेपोलियन बोनापार्ट हरला, पण हा फायनान्सचा नेपोलियन, Nathan Rothschild आपल्या वित्तीय हिकमतीमुळे अविस्मरणीय विजयाचा आणि अफाट संपत्तीचा धनी झाला… Nathan च्या या कामगिरीनंतर Rothschild घराणे म्हणजे जगाच्या पॉवर-सेंटर्स पैकी एक बनले.

Rothschild हे घराणे ज्यू आहे… त्यांनी ज्यू लोकांसाठी आपला पैसे, ताकद वापरल्याचे अनेक प्रसंग आहेत. इथे ज्यू असण्याचा आणि Rothschild च्या मॉडर्न फायनान्सवर असलेल्या अधिराज्याचा एक धार्मिक-ऐतिहासिक-सामाजिक सहसंबंध आहे. ज्यूंना आपापसांत व्याज घेणे निषिद्ध होते. त्याबद्दलही त्यांच्यात वेगवेगळे प्रवाह होते. त्यात करून, ख्रिश्चन लोकांना व्याजी धंदा करणे निषिद्ध होते, पण ज्यूंकडून कर्ज घेण्यात त्यांना काहीच धार्मिक अडथळा नव्हता. ज्यूंच्या धार्मिक तरतुदींमुळे अब्राहमीक धर्मांमध्ये फायनान्ससाठी सर्वात जास्त खुली सूट ही ज्यूंनाच होती! त्यात भर पडली ती ख्रिश्चन युरोपातील अँटी-सेमेटिक कायद्याची! या कायद्यानुसार ज्यूंना मालमत्तेचा हक्क नाकारलेला होता. त्यांना मालमत्ता बाळगणे कायद्याने अशक्य होते. त्यामुळे सगळ्यात liquid asset असलेल्या पैशाचा धंदा करणे ज्यूंना क्रमप्राप्त होते ! कालांतराने, ख्रिशनांना लागणारा कर्जपुरवठा ज्यू करू लागले, आणि ही एक प्रकारे दोघांच्या सोयीची व्यवस्था बनली. याचा परिणाम म्हणून ज्यूंचा Modern Finance च्या विकासात सिंहाचा वाटा आहे. ज्यूंना वाळीत टाकून Ghetto मध्ये राहायला ‘मजबूर’ करणाऱ्या युरोपवर नंतर Rothschild ने राज्य केले ! थोडक्यात jewish – “घेट्टोनेचि रचिला पाया, Rothschild झालासे कळस” !!

Rothschild च्या Case Study ला समजून घेतल्यानंतर आजच्या काळातील, आपल्या वापरातील पैशाकडे बघा. खरंतर आज पैसा हा लाईफ टूल म्हणून इतका सवयीचा झालाय (जशी की आग, किंवा चमचा किंवा टूथब्रश !) की त्याही किंमत लक्षात घ्यायचीही गरज बहुतांश मंडळींना वाटत नाही. एखादी गोष्ट अंगवळणी पडली की तिचं महत्त्व थोड्या काळानंतर वेगळं दिसेनासं होतं. परंतु जर world order नांवाची आपण ज्यात जगतो अशी व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर अशा मूलभूत संकल्पना आणि साधनांबद्दल ‘कन्सेप्ट्स क्लिअर’ असणे गरजेचे असते. या लेखमालेचा उद्देश हाच आहे. या लेखमालेच्या चर्चा परिघात पैशाचे सर्व प्रकार येतात. वित्तीय क्रांती घडवणाऱ्या नवनवीन संकल्पना (उदा. Share Options किंवा Off Balancesheet Financing) , जग बदलणारी finacial instruments, जगाच्या इतिहासाची वित्तीय बाजू, आपल्या रोजच्या जीवनाशी या सगळ्याचा असलेला सहसंबंध आणि relevance हे या लेखमालेचे मुख्य मुद्दे राहणार आहेत. वित्त क्षेत्रात झालेली उत्क्रांती, लागलेले शोध हेही वैज्ञानिकच असतात हे बऱ्याचदा लक्षात घेतले जात नाही.

मुळात financial invention असं काही असतं यांच्यावरच लोकांचा विश्वास बसणे कठीण आहे आपल्याकडे !! Derivative नावाची ‘आयडिया’ ही खरंतर Finance क्षेत्रातील रॉकेट सायन्सच्या बरोबरीची आहे. पण सामान्य लोकांना हवेत उडणाऱ्या रॉकेटचं जसं वैज्ञानिक आकर्षण वाटतं तसं Derivative चं वाटत नाही. खरंतर जगभरात Financial Literacy च्या नांवाने बोंब आहे. भारतात तर त्याहून जास्त बोंबाबोंब आहे !! त्यामुळे या विषयावर सामन्यातील सामान्य वाचकाला ‘वाचनीय’ वाटावं असं साहित्य मुळात तयारच कमी होतं… जे असतं ते अशा भाषेत असतं की विचारू नका ! विशेषतः मराठीत काही अपवाद सोडले तर या विषयावर लिहिणारे विद्वान हे जणू शब्द जितके कठीण, तितकी विद्वत्ता जास्त असा काहीतरी ग्रह करून लिहीत असतात ! Niall Ferguson यांचे Accent of Money नांवाचे भन्नाट पुस्तक हा या लेखमालेचा आदर्श, प्रेरणा आणि अर्थातच मुख्य संदर्भ आहे. ते पुस्तक म्हणजे हा विषय किती रंजकपणे सांगितला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ आहे ! (पण ही लेखमाला म्हणजे त्या पुस्तकाचा सरळसोट अनुवाद वगैरे नाही! नाहीतर हल्ली वाङ्मय चौर्य वाढलेले असल्यामुळे प्रेरणा घेतली म्हणजे अनुवादच असेल अशी इरसाल शंका एखादा मुरलेला वाचक काढू शकतो !!)

आपल्याकडे या विषयावर वर उल्लेखल्या प्रमाणे बरेचसे साहित्य हे बोजड भाषेतच असताना, English पारिभाषिक संज्ञांना ‘मराठीत नको, पण भाषांतर आवर’ अशा थाटात बोजड मराठी प्रतिशब्द योजून उरलासुरला वाचकवर्गही निराश करण्याकडे अशा विद्वानांचा कल असतो. त्यामुळे या लेखमालेत आपण वित्ताचा कित्ता जास्तीत जास्त हसतखेळत, इकडे तिकडे नजर मारत गिरवणार आहोत. जिथे आवश्यक तिथे इंग्लिश शब्दच वापरणार आहे ! याचा अर्थ मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी मराठीत पारिभाषिक संज्ञा बनवणे चूक आहे असं नाही. पण तो या लेखमालेचा उद्देशच नाही…बहुतांश वेळा बोजड वाटणारा, सामान्यांना दुष्कर वगैरे वाटणारा परंतु आपल्या नकळत असला तरी जगण्याच्या अगदी जवळ असलेला हा विषय – या लेखमालेत जास्तीत जास्त सोपा करून सांगण्याचा प्रयत्न असेल. यामुळे तज्ज्ञ मंडळींना यात अति-सहजता (Over -Simplification) चा दोष दिसू शकतो. मात्र ते मान्य करूनच ही लेखमाला सुरु करत आहे… तरीही अशा तज्ज्ञ मंडळींच्या सूचना/corrections यांचे लेखक आगाऊ (म्हणजे advance मध्ये, लेखकाचा स्वभावगुण नाहीये हा !!) स्वागत करत आहे.

हा प्रास्ताविक लेख या लेखमालेची तोंडओळख करून द्यायला, पैशाचे ऐतिहासिक महत्त्व Rothschild च्या Case Study द्वारे दाखवून द्यायला आणि निवडलेल्या विषयाचा scope स्पष्ट करायला पुरेसा असावा… (नसला, काही शंका राहिल्या तर खाली लेखकाचा मेल आयडी दिला आहेच!) या पुढे financial history तील, वित्तीय उत्क्रांतीतील टप्पे जसे की – चलन, बँक, पत/credit, शेअर बाजार, कंपनी म्हणजे काय, derivative ची भन्नाट आयडिया, मॉडर्न फायनान्स मधील नवनवीन संकल्पना आणि financial instruments यांची अघळपघळ आणि जास्तीत जास्त रंजक चर्चा प्रत्येक लेखात आपण करणार आहोत…. त्यामुळे हे नमनाला घडाभर तेल ओतून झाल्यानंतर – आत्तापूरती रजा घेतो. पुढच्या लेखात – ‘बँक’ या सध्या चर्चेत असलेल्या (कारण – निश्चलनीकरण !) financial institution ची ऐतिहासिक चित्तरकथा – आपल्याला सांगणार आहे ! तोपर्यंत सायोनारा….

Contact – makaranddesai27@yahoo.in

लेखात उल्लेख झालेले ‘The Ascent of Money: A Financial History of the World’ हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून विकत घेऊ शकता!!