वित्ताचा कित्ता – भाग २

बँकिंग

बँक! अगदी इंदिरा गांधींनी केलेल्या राष्ट्रीयीकरणापासून ते मोदींनी केलेल्या निश्चलनीकरणापर्यंत हरेक कालखंडात लोकांच्या, मीडियाच्या आणि राजकारणाच्या गरमागरम चर्चेत अढळ स्थान असणारी संस्था म्हणजे बँक!! बँक आपल्या आयुष्याशी जोडली गेलेली सर्वात जवळची वित्तीय व्यवस्था आहे. प्रत्येक माणसाचे डिमॅट अकाउंट असेलच असे नाही पण सेव्हिंग्ज अकाउंट नक्की असते! म्युच्युअल फंडस् असतीलच असे नाही, एफडी मात्र हमखास असतात… पेस्लिप, चेकबुक, पासबुक, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड अशा स्वरूपात आपण बँकेशी कायम संपर्कात असतो. पण बँकेच्या ऐतिहासिक जडणघडणीविषयी, बँकिंगमधील घडलेल्या-घडत असलेल्या बदलांविषयी आणि या क्षेत्रातील cutting edge तंत्राविषयी फारशी माहिती आपल्या जनमानसात दिसत नाही… म्हणूनच पहिल्या भागात ठरल्याप्रमाणे – ‘वित्ताचा कित्ता’च्या या दुसर्‍या भागात आपण ‘बँक’ या व्यवस्थेविषयी गंमतगोष्टी बघत अघळपघळ गप्पा मारणार आहोत.

तांत्रिक बाबींमध्ये शिरण्याच्या आधी सर्वप्रथम बँक यांबद्दल आणि त्यांनी मानवी जीवनात घडवलेल्या बदलांबद्दल जाणून घेऊ. आज मुंबईमध्ये काम करणारा माणूस आपल्या कामाचा मोबदला – पुण्यामध्ये जाऊन एका मशीन मध्ये एक plastic card स्वाईप करून, एक गुप्त संकेतांक टाकून हातात मिळवू शकतो! बँक हे आज मानवी श्रमाचा मोबदला जगाच्या पाठीवर कुठेही पाठवणारे केंद्र बनले आहे. त्याचबरोबर बँकांमुळे संपत्ती सुरक्षित आणि जास्त उपयोगी बनली आहे. पूर्वीच्या काळी सोने-चांदीसारखे किंमती ऐवज घेऊन जाणे हे अत्यंत जोखमीचे काम होते. त्याचबरोबर पैसा नोटांच्या किंवा नाण्यांच्या स्वरूपात सांभाळणे हे सुद्धा धोक्याचे आणि कटकटीचे काम असल्याचे आज वाटू लागले आहे. आजच्या युगामध्ये बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञानाच्या एकत्रित उपयोगामुळे (म्हणजेच कोअर बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधांच्या उपयोगामुळे) मानवी मूल्य जास्त सुरक्षित आणि जास्त उपयोगी बनले आहे. यामुळे केवळ फायनान्स किंवा चलनपुरवठा यांच्या बाबतीतच सुधारणा झाली असे नसून, एकंदरच मानवी आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी बँकिंगमुळे मोलाची भर पडली आहे. Source – https://www.atmmarketplace.com/articles/the-mobile-ization-of-modern-banking/

बर्‍याचदा काही गोष्टी आपल्याला इतक्या सवयीच्या होतात की त्यांचे महत्त्व आपण गृहीत धरतो किंवा विसरून जातो. हे बँकांच्या बाबतीत झाले आहे. परंतु आपण ज्या व्यवस्थेत राहतो त्याचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक असल्याने आपण बँकांबद्दल जाणून घेणे संयुक्तिक ठरते. बँका पडून राहिलेला पैसा ज्यांना त्याची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. म्हणजेच ज्या लोकांकडे अधिकचा पैसा म्हणजेच बचत आहे, त्यांच्या बचतीवर त्यांना व्याज देऊन त्या पैशांच्या मदतीने बँका उद्योजक आणि तत्सम पैशांची गरज असलेल्या लोकांपर्यंत पैशाचा पुरवठा करतात. या दोन प्रकारच्या ग्राहकांमध्ये दुवा म्हणून काम करत असताना, ठेवीवर देत असलेल्या आणि कर्जावर घेत असलेल्या व्याजदरांमधील फरकावर बँका स्वतःचे अस्तित्व टिकून असतात! डिपॉझिट घेणे आणि कर्ज देणे हे जरी बँकांचे महत्त्वाचे आणि प्राथमिक कार्य असले तरी सध्याच्या युगातील बँका यांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाची कामेही करतात. उदाहरणार्थ- आज बँका करन्सी मॅनेजमेंट, पोर्टफोलियो मेनेजमेंट तसेच इतर वित्तीय सेवा पुरवताना दिसतात. त्याचबरोबर परकीय देशांशी व्यापार करताना बँकांचा सहभाग अनेक कारणांसाठी महत्त्वाचा असतो.

आता बँकिंगच्या इतिहासाकडे वळू. खर तर ‘पैसे व्याजी देणे’ हा धंदा बराच जुना आहे! सावकारी हा धंदा जगाच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये थोड्याबहुत फरकाने अस्तित्वात होता. परंतु बँकांना त्यांची खरी ओळख मिळवून देण्यात मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्याचा महत्त्वाचा वाटा आहे. मुळात बँक हे नावच इटालियन व्यापारी टेबलांवर म्हणजेच बेंचेसवर पैशाचे व्यवहार करायचे त्यावरूनच पडले आहे! इटालियन भाषेत ‘Banca’ या शब्दाचा अर्थ टेबल अथवा बेंच असा होतो. त्यावरूनच बँक हे नाव पडले असावे!

बँकांच्या जडणघडणीमध्ये अकाउंटिंग हे शास्त्र आणि पद्धती विकसित होण्याच्या प्रक्रियेला फार महत्त्व आहे. कारण बँकांमध्ये रेकॉर्ड कीपिंग या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे काम खुद्द पैशाची ने आण करून करायचे ते फक्त कागदांवर किंवा हल्लीच्या जमान्यात कॉम्प्युटरमधील रेकॉर्डमध्ये आवश्यक ते बदल करून करता येणे यात बँकांचे यश लपलेले आहे! समजा मला एका मित्राला शंभर रुपये द्यायचे असतील तर मी एक रुपयाची 100 नाणी किंवा शंभराची एक नोट घेऊन जाणे ही शारीरिक हालचाल बँकेमधील माझ्या अकाउंटमध्ये डेबिट टाकून माझ्या मित्राच्या अकाऊंटला 100 रुपये क्रेडिट केल्याच्या क्लेरिकल प्रक्रियेने वाचवता येते. यामुळे एकंदरच श्रममूल्य आणि संपत्तीचा समाजातील प्रवाह आणि अभिसरण जास्त कार्यक्षम प्रकारे आणि जास्त सुरक्षित प्रकारे व्हायला मदत होते. बँकेचे हे मानवी श्रम मोठ्या प्रमाणात वाचवणारे रेकॉर्ड किपींग हा बँकिंगचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे.

ठेवी-कर्ज यांच्या देवाणघेवाणी इतकेच आधुनिक जगामध्ये बँका पार पाडत असलेल्या रेकॉर्ड किपींगला मोलाचे महत्त्व आहे… नव्या पिढीचा आयकॉन असलेला Elon Musk म्हणतो की – Movement of molecules is expensive, but that of electrons is cheap. If one can optimize the movement of molecules by movement of electrons, they can be orders of magnitude better.

आर्थिक जगतात बँकांचे रेकॉर्ड किपींग आणि अकौंटिंग हे अशाच प्रकारचे Optimization करण्याचे काम बजावत असते!

आता बँकांच्या विविध प्रकारांबाबत बोलू, बँकांचे वर्गीकरण हे वर्गीकरणाच्या निकषांनुसार वेगवेगळे करता येते. मालकी हा निकष घेतला तर सरकारी मालकीच्या म्हणजेच पब्लिक बँका आणि खासगी मालकीच्या म्हणजेच प्रायव्हेट बँका असे वर्गीकरण दिसते. अर्थव्यवस्थेतील स्थान हा घटक विचारात घेतला तर बँकांचे सेंट्रल बँक आणि कमर्शियल बँक असे प्रकार पडतात. Central bank म्हणजे आपली ‘आरबीआय’ तर कमर्शियल बँक म्हणजे आपण रोजच्या व्यवहारात बघतो त्या सर्व पब्लिक आणि प्रायव्हेट बँका होय.

Central bank हे आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असे वित्तीय केंद्र मानले जाते Central bank चा उद्देश हा नफा कमवणे असा नसून – देशातील आर्थिक तसेच बँकिंग व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना सुरळीत चालण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे हा असतो! भारतामध्ये हे काम ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ करते तर अमेरिकेत हे काम ‘फेडरल रिझर्व्ह’ करते. आधुनिक अर्थव्यवस्थांमधील खासकरून लोकशाही, भांडवलशाही अशा अर्थव्यवस्थांमधील Central bank या स्वायत्त आणि शक्तिशाली प्रभावी अशा संस्था असतात. जिथे देशातील तज्ज्ञ मंडळी जमवून ती संस्था बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे व कमर्शियल बँकांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम करत असते. आधुनिक राज्य व्यवस्थेमध्ये बहुतांश चलन व्यवस्थापन हे या Central बँका बघत असतात.

बँकांची संघटनात्मक किंवा संस्थात्मक रचना लक्षात घेतली. बँकांचे कार्पोरेट आणि को-ऑपरेटिव्ह म्हणजेच सहकारी बँका असे दोन भाग पडतात. यातील सहकारी बँका या मुख्यत्त्वे लहान स्तरावर काम करत असल्या तरी काही सहकारी बँकांनी अत्यंत प्रभावीपणे स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवून आपली छाप पाडण्यात यशस्वी झालेल्या आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात! या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त काही विशिष्ट प्रकारही बँकिंग क्षेत्रांमध्ये उदयास आलेले दिसतात त्यामध्ये पेटीएम, एयरटेलसारख्या पेमेंट बँका, विशिष्ट जातीच्या पतपेढ्यांचे कम्युनिटी बँकिंग, शरियानुसार चालणारे इस्लामिक बँकिंग, इत्यादींचा समावेश होतो.

आता आपल्या रोजच्या आयुष्यात जिचा संपर्क येतो ती कमर्शियल बँक कोणत्या सेवा पुरवते तसेच कोणत्या भूमिका पार पाडते यांचा धावता आढावा घेऊ. कमर्शियल बँका प्राथमिक स्वरूपात ठेवी स्वीकारणे आणि कर्जे देणे हे काम करतात. पण त्याचबरोबर Secondary सर्विसेस म्हणून काही वित्तीय किंवा आर्थिक सेवासुद्धा पुरवतात. त्यामध्ये एजन्सी functions म्हणून पैशांची टान्सफर व्यवस्था सांभाळणे किंवा धनादेश वटवणे अशी कामे करतात. तर utility functions म्हणून बँका लॉकर सुविधा किंवा demand drafts वगैरे सेवा पुरवतात.

यामधील प्राथमिक सेवांमध्ये बँका व्याजदरातील फरकावर आपले उत्पन्न मिळवतात तर द्वितीयक सेवांमध्ये बँका कमिशन किंवा चार्जेस लावून आपले उत्पन्न वाढवत असतात. बँकांना कर्जाच्या बाबतीत कर्जदाराने परतफेड न करणे हा धोका स्वीकारावा लागतो! हा धोका NPA च्या रूपाने बँकांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये व्यक्त केला जातो. ‘नॉन परफॉर्मिंग असेट्स’ हा सध्या भारतीय बँकिंग क्षेत्रामधील अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे! विजय मल्ल्या तसेच अन्य उद्योगपतींना वाटलेल्या कर्जाच्याबाबतीत बँकांना बसलेला फटका सध्या बातम्यांमध्ये आणि चर्चांमध्ये गाजत असलेला बघायला मिळतो. सरकारला बँकांसाठी री-कॅपिटलाइझेशन पॅकेज घोषित करावे लागले इतका हा प्रश्न गंभीर बनलेला आहे. प्रत्येक धंद्यांमध्ये एक रिस्क फॅक्टर अस्तित्वात असतोच. बँकांच्या बाबतीत NPA हा तो रिस्क फॅक्टर आहे !

आता सेंट्रल बँकेकडे वळूयात. Central bank ही त्या देशामधील अत्यंत महत्त्वाची स्वायत्त संस्था असते जिच्या निर्णयांचा आणि कारवायांचा परिणाम सामाजिक जीवनावर थेट आणि विशेष प्रकारे जाणवत असतो. भारतामध्ये नुकत्याच झालेल्या नोटाबंदीमुळे या गोष्टीचे वेगळे उदाहरण द्यायची गरज आहे असे मला वाटत नाही!

Central bank ही मुख्यत्वे कमर्शियल बँकांसाठीचे नियम आणि कायद्याचे फ्रेमवर्क सांभाळत असते. सेंट्रल बँक ही बँकांची बँक मानली जाते त्याचबरोबर ती सरकारची बँक म्हणूनही काम पाहत असते. अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या व्याजदराचा प्रश्न central bank हाताळत असते महागाई किंवा चलन फुगवटा काबूत ठेवणे हे आजच्या central बँकांचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असते. त्यासाठी central बँका या Quantitative तसेच Qualitative अशा उपायांचा वापर करत असतात. त्यापैकी Quantitative Measures मध्ये लेंडिंग रेट, SLR, रेपो रेट तसेच रिव्हर्स रेपो रेट सारखे महत्त्वाचे दर नियंत्रित करून चलनपुरवठा आणि क्रेडिटनिर्मिती यांचे प्रमाण काबूत ठेवणे हे सेंट्रल बँकेचे मुख्य टार्गेट असते.

तर Qualitative Measures मध्ये सेंट्रल बँकेने बँकांना पाठवलेल्या मार्गदर्शनपर सूचना किंवा वेळोवेळी केलेल्या कारवायांचा समावेश होतो.

Source – http://www.yourarticlelibrary.com/banking/central-bank/top-5-functions-of-central-bank-of-india/30323

व्याजदर जर जास्त ठेवला तर विकासाला खीळ बसून आर्थिक प्रगती खुंटू शकते, तर तो आक्रमकपणे कमी केल्यास अचानक वापरातील वित्त पुरवठा वाढून अर्थव्यवस्थेमध्ये चलन जास्त होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे चलनफुगवटा किंवा महागाईचा प्रश्न गंभीर बनू शकतो. याच कारणांनी आरबीआय ही देशातील विविध आर्थिक इंडिकेटर्स (जसे की GDP Growth Rate, WPI, CPI) विचारात घेऊन दर तिमाहीला आपल्या व्याजदर विषयक धोरणाचा आढावा घेत असते.

चलन व्यवस्था सांभाळणे म्हणजेच नोटा छापणे बदलणे, रद्द करणे हे कामही सरकारसाठी आरबीआय करत असते. आरबीआयचा गव्हर्नर हा सरकारच्या वतीने किंवा राज्यव्यवस्थेच्या व्यक्तीने नागरिकांना अमुक रुपये देण्याची हमी देत सही करत असल्याने त्या कागदाच्या नोटेला चलन म्हणून मान्यता प्राप्त होते. या नोटा छापण्याची तांत्रिक बाजू सांभाळणे तसेच त्याची गुणवत्ता व सुरक्षितता सांभाळणे हे कामही आरबीआय करत असते.

नोटबंदीच्या काळामध्ये आरबीआयचे देशातील चलनावर असलेले नियंत्रण किती मोठ्या प्रमाणावर सामान्य जनांच्या जीवनावर परिणाम करू शकते याचा प्रत्यय आपल्याला आलाच आहे! सेंट्रल बँकेची स्वायत्तता ही देशाच्या आर्थिक स्थैर्याशी जोडली गेली असल्याने राजकीय लहरीपासून देशाच्या आर्थिक घडीला नख लागू नये म्हणून ती संस्था स्वायत्त ठेवणे हे देशहिताचे असते. रघुराम राजन आणि सध्याचे केंद्र सरकार यांच्यातील ‘टशन’मुळे काही महिन्यांपूर्वी हा विषय चांगलाच ऐरणीवर आला होता.

सेंट्रल बँकेसारखी महत्त्वाची वित्तीय व्यवस्था स्वायत्त, मेरिट-ड्रिव्हन का असावी हे सांगणारे एक ऐतिहासिक उदाहरण इथे देण्याचा मोह आवरत नाही… हा किस्सा आहे जॉन लॉ आणि त्याच्या ‘मिसिसिपी बबल’ नांवाच्या फसफसलेल्या फ्रेंच रेसिपीचा!! 1715 मध्ये चौदावा लुई येशूघरी गेला आणि पंधरावा लुई हा लहान असल्यामुळे राजगादीचा काळजीवाहू अधिकारी Regent बनला तो लॉचा मित्र असलेला Duke of Orleans. 1716 मध्ये फ्रेंच सरकारला जॉन लॉने एका नोटांची व्यवस्था सांभाळणार्‍या स्वतंत्र बँकेचा प्रस्ताव दिला. अर्थात ती बँक तो स्वतःच चालवणार होता. तत्कालीन फ्रान्ससाठी नवी असलेली – ‘फियाट’ करन्सी, कागदी नोटांच्या रूपाने जॉन लॉने सुरु केली! जॉन लॉ त्याच्या ‘The Banque Gµnµrale’ मार्फत फ्रान्सचा पैसा सांभाळू लागला!!

नंतर काहीच दिवसांत लॉच्या Compagnie व ‘Occident ला फ्रेंच सत्तेने फ्रान्सच्या कॅनडा आणि लुईसियाना मधील वसाहतींशी चालणार्‍या व्यापाराचे अधिकार बहाल केले! मिसिसिपी नदीकिनारी वसलेल्या या आर्थिकदृष्ट्या ‘दुभत्या’ प्रदेशात गुंतवणूक करणे हा त्याकाळचा ट्रेंड बनू लागला. लॉच्या हातात पैसे छापण्याचा अधिकार होता आणि मिसिसिपी कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी गर्दी जमत होती. मात्र लॉ इथेच थांबला नाही. त्याने फ्रेंच सरकारकडून नाणी पाडण्याचे आणि कर वसूल करण्याचेही काम आपल्या पदरात पाडून घेतले. फ्रेंच वसाहतींचा व्यापारसुद्धा आता जॉन लॉच्याच आता हाती गेला होता. आजच्या संदर्भात बघायचं तर जॉन लॉ तत्कालीन फ्रान्समध्ये एकाच वेळी – अरुण जेटली (वित्तमंत्री), सुरेश प्रभू (वाणिज्यमंत्री), उर्जित पटेल (आरबीआय) आणि मुकेश अंबानी यांच्या जागी बसला उरला होता!!!

आपल्या कंपनीचे शेअर्स वधारावेत, लोकांना ‘बूम पिरियड’चा फील यावा – म्हणून कागदी चलनाचा पुरवठा आपल्या बँकेमार्फत हवा तसा वाढवत नेऊन जॉन लॉने एक बबल फुगवला. मिसिसिपीच्या किनार्‍यांवरील बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या आशाअपेक्षांना सुरुंग लागताच हा बबल फुटायला वेळ लागला नाही! लोकांच्या झुंडी जॉन लॉच्या कागदी नोटांना सोन्या-चांदीच्या नाण्यांमध्ये बदलून घेण्यासाठी धावू लागल्या… मिसिसिपी कंपनीच्या शेअर्सना ग्रहण लागले… फ्रांसमध्ये financial chaos चा प्रसंग ओढवला होता !

<जॉन लॉच्या पाठी आता लोक हात धुवून पडले... जॉन लॉ फ्रांस सोडून पळाला! लोकांच्या आयुष्यांची पुंजी एका अतिमहत्त्वाकांक्षी वित्तीय जुगार्‍याच्या हातात देशाच्या सगळ्या आर्थिक नाड्या दिल्यामुळे धुळीस मिळाली होती... याचा परिणाम म्हणून फ्रान्समधील पुढच्या राजांना वित्तीय संकट असलेले राज्य चालवावे लागले... महागाई भडकली... सामाजिक घडी विस्कटली... धुमसणारा असंतोष पेटू लागला... आणि मग यातून भडका उडाला तो रक्तरंजित फ्रेंच राज्यक्रांतीचा!!/p>

(जॉन लॉच्या मिसिसिपी बबलबद्दल अत्यंत विस्तृत आणि माहितीपूर्ण लिखाण Niall Ferguson यांनी त्यांच्या Ascent of Money च्या Blowing Bubbles या प्रकरणात केलं आहे… जिज्ञासूंनी आणि फायनान्सच्या दर्दी अभ्यासूंनी हे वित्तपुराण चुकवू नये!)

वित्तीय व्यवस्था भ्रष्ट राजकीय नेत्यांनी बेजबाबदार-अतिमहत्त्वाकांक्षी माणसाकडे गहाण टाकल्या तर संपूर्ण सामाजिक व्यवस्थाच कशी धोक्यात येते याचे हे अद्वितीय उदाहरण आहे. जॉन लॉने अनेक नावीन्यपूर्ण वित्तीय संकल्पना वापरल्या. फियाट करन्सी, शेअर्समधील options-futures-splits वगैरे वर्तमानातील अधिकृत गोष्टी त्याकाळात जॉन लॉने थोड्या-बहुत फरकाने राबवल्या होत्या. तो काळाच्या पुढे बघणारा माणूस होता. पण फार दूरवर लक्ष ठेवताना कधीकधी पायाखालची निसरडी वाट माणूस विसरतो आणि मग कपाळमोक्ष दूर नसतो. जॉन लॉचा फसलेला जुगार फक्त त्याचा तोटा करून थांबला नाही. त्याने फ्रेंच जनतेच्या जमापुंजीला, समाजाच्या स्थैर्याला, व्यवस्थेच्या अस्तित्वाला नख लावलं!! अशा माणसांना, अशा बेजबाबदार प्रवृत्तीला देशाची तिजोरी सांभाळायला देणारे राज्यकर्ते यात तेवढेच दोषी ठरतात… आणि इतिहास शिक्षा द्यायला सहसा चुकत नसतो !!

यावरून आपल्याला बँकांच्या आणि खास करून रिझर्व्ह बँकेच्या समाजातील स्थानाबद्दल एक जबाबदार जाणीव निर्माण होते! वित्तीय संस्थांचे अस्तित्व आणि आरोग्य हे सामाजिक स्वास्थ्यासाठी किती गरजेचे असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे… त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा लहरीपायी – सत्तेच्या जोरावर- अशा संस्थांना नख लावणे सामाजिक प्रलय आणू शकते याचे भान नागरिक म्हणून आपल्याला व्हावे हीच या लेखनकार्याची फलश्रुती आहे!

‘वित्ताचा कित्ता’च्या पुढच्या भागात भेटू – ‘कंपनी’ नावाच्या जग बदलणार्‍या संकल्पनेची कथा ऐकायला… तोपर्यंत – सायोनारा…