21व्या शतकातल्या सांस्कृतिक रेनेसांचे वाहक ‘इंटरनेट मीम्स’

21 व्या शतकातल्या सांस्कृतिक रेनेसांचे वाहक ‘इंटरनेट मीम्स’

मागच्या महिन्यात मी माझ्या कामाच्या संबंधित एका काँफरन्समध्ये बोलायला बर्लिनला गेलो होतो. कॉन्फरन्सचा आवाका मोठा असल्याने संपूर्ण युरोपमधून लोक आलेले होते. माझ्या सेशनला थोडा वेळ असल्याने मी एका दुसर्‍या वक्त्याचे सेशन अटेंड करायचे ठरवले. अर्थात विषय सुद्धा ओळखीचा होता आणि वक्ता आमच्या क्षेत्रात नावाजलेला, त्यामुळे तो काय बोलणार याबद्दल उत्सुकता होतीच. साधारणपणे अशा काँफरन्ससना येणारे श्रोते देखील त्या क्षेत्रातले दिग्गज असतात आणि त्यांच्यासमोर काहीतरी नवीन सादर करणे आणि त्यांचे लक्ष तुमच्या बोलण्याकडे वळवून घेणे सोपे काम नसते. तुमचे प्रेझेन्टेशन थोडे जरी नीरस होत असेल तर श्रोते सरळ उठून जातात आणि आपण बोलत असताना श्रोते उठून जात आहेत हे बघून वक्त्याच्या आत्मविश्वासावर कमालीचा परिणाम होऊ शकतो. मी जाऊन बसलो तेव्हा हॉल जवळजवळ भरलेला होता, अर्थात दोनशे – अडीचशे लोक असतील. वक्त्याने त्याचं प्रेझेन्टेशन सुरू केलं आणि पहिल्याच स्लाईडवर सद्यकाळात अतिशय लोकप्रिय असलेलं एक मीम आलं. एक मुलगा त्याच्या प्रेयसी/बायको बरोबर रस्त्यावरून चालला आहे, आणि बाजूने जाणार्‍या एका सुंदर मुलीकडे वळून वळून बघतोय. आणि हे बघून त्या मुलाच्या प्रेयसीच्या (किंवा बायकोच्या, जी असेल ती) चेहर्‍यावर अतिशय वैतागलेले आणि रागावलेले भाव आहेत. फोटोतून सांगायचा मुद्दा एवढाच की माझ्याबरोबर असताना तू दुसर्‍या मुलीकडे कसं काय बघतोस म्हणून प्रेयसी चिडलेली आहे, आणि एक हक्काची प्रेमिका असतानाही मुलगा हातातलं सोडून पळत्याकडे धाव घेणार्‍यांपैकी आहे. आता या फोटोवर प्रियकर प्रेयसी आणि ती तिसरी मुलगी यांच्या चेहर्‍यावर वेगवेगळी वाक्य लिहून बरीच मीम्स गेल्या काही काळात तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रकारचे आमच्या क्षेत्राशी संबंधित एक मीम त्या वक्त्याने त्याच्या प्रेझेन्टेशनच्या सुरुवातीला वापरले होते. त्या सेशनला असलेले सगळेच श्रोते त्या क्षेत्राशी संबंधित असलेले होते आणि वेगवेगळ्या वयोगटातले असूनही जवळपास प्रत्येकजण त्या मीमशी परिचित होता त्यामुळे एका क्षणात लोकांना त्या मीमचा काँटेक्स लक्षात येऊन श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला आणि एकाएकी श्रोते पूर्ण लक्ष देऊन वक्त्याचे म्हणणे ऐकू लागले.

ऐकत असताना मी विचार करू लागलो – एका साध्या मीमने या वक्त्याने एका सेकंदात दोन अडीचशे लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. माझ्या एकाएकी लक्षात आलं की मीम्सचा वापर गेल्या काही काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एवढा की अतिशय फॉर्मल आणि कॉर्पोरेट काँफेरेन्ससमध्ये देखील वक्ते मीम्सचा वापर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी करू लागले आहेत, आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात मुख्यतः नव्या पिढीत मीम्स हे व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे साधन झालेले आहे.

या मीम्सची सुरुवात कुठून झाली? मीम हे नाव तरी कुठून आले?

जैविक उत्क्रांतिवाद ते पॉप कल्चर हा मीमचा गेल्या चाळीस वर्षातला प्रवास फार रोचक आणि मनोरंजक आहे. मीम हा शब्द सर्वात आधी परिभाषित केला ‘रिचर्ड डॉकिन्स’ या शास्त्रज्ञाने. अर्थात डॉकिन्सला अभिप्रेत असलेला मीम शब्दाचा अर्थ आजच्या प्रचलित अर्थापासून फार वेगळा होता.

1978 च्या सुमारास रिचर्ड डॉकिन्सचं पुस्तक प्रसिद्ध झालं, ‘सेल्फिश जीन’ नावाचं. रिचर्ड डॉकिन्स म्हणजे जगातला नावाजलेला उत्क्रांत जीवशास्त्रज्ञ (अर्थात इव्होल्यूशनरी बायोलॉजिस्ट). डॉकिन्स आपल्यापैकी बर्‍याच लोकांना त्याच्या नास्तिकवादाच्या व्हिडिओज् आणि व्याख्यानांमुळे माहित असेल. टिव्हीवर विविध धर्मांच्या अनुयायांशी आणि निर्मितीवादी विचारधारेच्या लोकांशी (अर्थात पृथ्वी आणि त्यावरची समस्त जीवसृष्टी देवाने निर्मित केलेली आहे आणि उत्क्रांतीवाद वास्तव नसून काल्पनिक आहे असे मानणारी लोक) वादविवाद करतानाचे त्याचे व्हिडिओेज् बरेच प्रसिद्ध आहेत. तर हा डॉकिन्स अतिशय नावाजलेला शास्त्रज्ञ, ध्यापक, लेखक आहे. त्याचे पुस्तक सेल्फिश जीन डार्विनच्या त्क्रांतीवादाच्या सिद्धांताचे जैवशास्त्रीय विश्लेषण करते. डॉकिन्सचे म्हणणे आहे की उत्क्रांतीवादात सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या जीन (gene). त्याचे कारण म्हणजे जीन हा प्राणीमात्रात असणारा असा घटक आहे जो स्वतःची अचूक प्रत (कॉपी) तयार करू शकतो. आणि अशी प्रत तयार करून एका प्राण्यातले शारीरिक आणि इतर स्वभावधर्म पुढच्या पिढी मध्ये पाठवता येतात. सामान्य भाषेत आपण याला अनुवांशिकता म्हणतो. जेव्हा वेळोवेळी (मी इथे वेळोवेळी म्हणत असलो तरी हे हजारो लाखो वर्षांमध्ये घडते) ह्या जीन्समध्ये कॉपी होत असताना उत्परिवर्तन अर्थात mutation होतं तेव्हा त्या जीन्स मधून उत्पन्न होणार्‍या स्वभावधर्मांमध्ये उत्क्रांती होऊन त्या प्राण्यात उत्क्रांती होते. सोप्या भाषेत हाच उत्क्रांतीवाद आहे.

डॉकिन्स याच्या पुढे जाऊन म्हणतो की उत्क्रांतीवादात हा स्वतःला अचूक कॉपी करणारा घटक सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. उद्या अवकाशात कुठल्या दुसर्‍या ग्रहावर जीवसृष्टी सापडली तरी त्या जीवसृष्टीचा पाया देखील उत्क्रांतीवाद असेल आणि हा उत्क्रांतीवाद जीन सदृश एखाद्या घटकावर आधारित असेल ज्यात स्वतःच्या अचूक प्रती बनवण्याचा गुणधर्म असेल.

आता हे वाचून कोणालाही प्रश्न पडेलत्त्की याचा आणि मीम्सचा काय संबंध? डॉकिन्स या जेनेटिक्सचे शास्त्र समजवण्यासाठी एखाद्या जीन सदृश उदाहरणाच्या शोधात होता. आणि ते उदाहरण शोधताना त्याने सांस्कृतिक उत्क्रांतीची मदत घेतली. ज्याप्रकारे प्राणिसृष्टीत उत्क्रांती होऊन विविध प्राणिजाती उदयाला येतात त्याच प्रमाणे मानवी समाजात संस्कृतीची देखील उत्क्रांती मानवी इतिहासाच्या आरंभापासून होत आलेली आहे. युवल नोआह हरारी ‘सेपियन्स’मध्ये म्हणतो की आजपासून साधारण सत्तर हजार वर्षांपूर्वी मानवी इतिहासात एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे मानवी मेंदूत झालेली संज्ञानात्मक क्रांती अर्थात कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन. या कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशनमुळेच मानवाच्या मेंदूची अतिशय कमीवेळात असाधारण प्रगती झाली आणि मानवी समाज आज ज्या स्थितीला आहे त्या स्थितीत पोहचला. या कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशनच्या मागे होते ते जेनेटिक म्युटेशन. या म्युटेशनमधून जसा मानवी मेंदू उत्क्रांत होत गेला तशी एक नवीन मानवी संस्कृती उदयाला येऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती देखील मानवाबरोबर उत्क्रांत होऊ लागली. भाषेची निर्मिती, चित्र, लेखन, कथा, कविता, गाणी, नृत्य, संगीत, आणि धर्म हे या सांस्कृतिक उत्क्रांतीचे विविध टप्पे आहेत. ज्याप्रकारे प्राणिजगतात उत्क्रांतीतील मत्त्त्त्वाचा घटक असतो ‘जीन’ त्याच प्रकारे या सांस्कृतिक उत्क्रांतीसाठी सुद्धा एक महत्त्वाचा घटक आवश्यक होता जो स्वतःची अचूक प्रतिकृती तयार करून संस्कृतीचा प्रचार प्रसार करेल आणि पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाईल. ह्या घटकाला परिभाषित करायला डॉकिन्सने ग्रीक शब्द ‘मीमाटिकचा’ आधार घेतला ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची हुबेहूब नक्कल करणे, आणि जन्म झाला मीम या शब्दाचा.

डॉकिन्सच्या मते मीम सांस्कृतिक उत्क्रांतीत तेच काम करतं जे जीन्स मानवी उत्क्रांतीत करतात. याचे विस्तृत विश्लेषण करताना डॉकिन्स गाणे गुणगुणण्याचे उदाहरण देतो. म्हणजे समजा तुम्ही रस्त्यावरून जाताय आणि एखादे सुरेल गाणे गुणगुणताय. तुमच्या बाजूने चालणार्‍याच्या कानावर ते गाणे गेले आणि त्या गाण्याची चाल पकड घेणारी असली तर थोड्यावेळाने तो माणूस त्याच्याही नकळत तीच चाल स्वतः गुणगुणू लागतो. आणि अशा प्रकारे मीम स्वतःची हुबेहूब प्रतिकृती तयार करून समाजात पुढे पसरवतात. मग कधीतरी एखादा ते गीत गुणगुणता त्यात कधी नकळत तर कधी मुद्दाम त्यात काहीसा बदल करतो, आणि त्यातून नवीन गाणं, नवीन संगीत, नवीन सांस्कृतिक घटक जन्माला येतो, आणि आपण आपल्याही नकळत एक सांस्कृतिक म्युटेशन घडवत असतो. हे म्युटेशन हळूहळू क्रिटिकल होत जातात आणि संस्कृतीच्या उत्क्रांतीचे दृश्य स्वरुप मानवासमोर येते. त्यातून भित्तीचित्र ते पुस्तकी भाषा असा प्रवास घडतो, कपडे येतात, फॅशन निर्मित होते, राजकीय आणि सामाजिक मतप्रवाह आकार घेतात, आणि या सगळ्याचा जो मूळ घटक असतो त्याला डॉकिन्स मीम म्हणतो.

डॉकिन्सने ‘सेल्फिश जीन’ हे पुस्तक लिहिले तेव्हा कॉम्प्युटर्स त्यांच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. इंटरनेट तर फक्त अमेरिकन आर्मीच्या लॅब्स मध्येच होते, आणि सोशल मीडिया म्हणजे काय याची कोणालाच कल्पना नव्हती. डॉकिन्सचे म्हणणे आहे ‘सेल्फिश जीन’ हे पुस्तक लिहिताना त्याच्या डोक्यात कुठेही मीम या संकल्पनेद्वारे समाजशास्त्रात एक नवीन शोध प्रवाह सुरु करण्याचा विचार नव्हता. तो तर फक्त जीन या संकल्पनेच्या सदृश एखादे उदाहरण शोधत होता. पण त्याच्या मीम या संकल्पनेचे समाजशास्त्रज्ञांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. हे करताना मात्र समाजशास्त्रज्ञांना माहित नव्हतं की येत्या काहीच वर्षात डॉकिन्सच्या मीम थियरीवर प्रयोग करायला संपूर्ण मानव समाजाला एक हक्काचे मैदान मिळणार आहे.

साधारण नव्वदीच्या दशकात जसे जसे इंटरनेट जास्त लोकप्रिय होऊ लागलं तसं तसं चॅट रूम्स आणि मेसेज बोर्ड्सची संख्या वाढू लागली. हे मेसेज बोर्ड्स आणि चॅट रूम्स म्हणजे फेसबुक आणि व्हॅट्सऍप सारख्या सोशल मीडियाचे पूर्वज. या मेसेज बोर्ड्स मध्ये लोक एकामेकांना मेसेजेस बरोबरच चित्र पाठवू लागली जी बघून तुम्हाला हसू येईल. या चित्रांचा कॉन्टेक्स्ट ग्लोबल असायचा. म्हणजे एखादा कुत्रा पुस्तक वाचायचा प्रयत्न करतोय, मांजरीने चष्मा लावलाय इत्यादी. ह्या चित्रांना एखादा विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ नसल्यामुळे अमेरिकन असो, भारतीय असो, का चायनीज माणूस असो प्रत्येकाला ते मीम लगेच कळायचं आणि मजेदार वाटायचं. इंटरनेटवरून हे बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे असल्यामुळे अतिशय कमी कालावधीत अशी चित्रांच्या कितीतरी कॉपीज जगभरातल्या हजारो लाखो कॉम्प्युटर्स वर पोहोचायच्या. यातून हळू हळू इंटरनेट मीम कल्चर आकाराला येऊ लागलं. या चित्रांना मीम म्हणायला सुरुवात कोणी केली हे जरी अस्पष्ट असलं तरी यामध्ये डॉकिन्स ने परिभाषित केलेल्या मीम्सचे गुण पुरेपूर आहेत. जसं जसं सोशल मीडियाचा वापर जगभरात वाढला तसं तसं मीम्स जास्त मेनस्ट्रीम होऊ लागले. आणि आजतर सोशल मीडियावर मिम्सचा सुळसुळाट आहे.

रिचर्ड डॉकिन्सच्या मीम थियरीचे जे काही टीकात्मक विश्लेषण झाले त्यातली एक मुख्य टीका होती ती म्हणजे मीम या घटकात फार तीव्र गतीने म्युटेशन होतं आणि त्यामुळे उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर मीम्स रूढार्थाने खरे उतरत नाहीत. याचे उदाहरण म्हणून इंटरनेट मीमचे उदाहरण दिले जाते. एखाद्या इंटरनेट मीमच्या लोकप्रिय असण्याचा काळ फार छोटा असतो. पेपे द फ्रॉग हा 2014 मध्ये सोशल मीडियावर सगळीकडे पसरलेला असला तरी आज कोणाच्या लक्षात देखील नाही. इंटरनेट मीम्समध्ये तीव्र गतीने होणारी उत्क्रांती ही त्यांना आजपर्यंतच्या मानवी इतिहासाच्या इतर मीम घटकांपासून वेगळी बनवते. इंटरनेट मीम्स ज्याप्रकारे आजपर्यंतच्या सांस्कृतिक रूढींना आव्हान देत आहेत ते विलक्षण आहे. याची दोन उदाहरणं मी या लेखात मांडतो.

पहिलं उदाहरण आहे – धर्मावर टीका करण्याचा राजरोस आणि सुरक्षित मार्ग! धर्म ही मानवी समाजातली अतिशय विलक्षण आणि भावनिक अशी संकल्पना आहे. कित्येक लोकांची स्वतःच्या कुटुंबाशी जेवढी भावनिक जवळीक नसते तेवढी धर्माशी असते. हे वेड इतक्या पुढे गेलेलं असतं की माणूस जीव द्यायला किंवा घ्यायलाही पुढे मागे बघत नाही. धर्मावर अधिक भाष्य करणे या लेखाचा मूळ उद्देश्य नाही, पण वर मांडलेल्या कारणामुळे धर्म हा नेहमीच चिकित्सा किंवा टीका करायला अतिशय कठीण विषय राहिलेला आहे. मीम्समुळे मात्र ही चिकित्सा एकाएकी अचानकच व्हायरल आणि मेनस्ट्रीम झालेली आहे. याची तीन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे इंटरनेट मीम्सची एकूणच असलेली व्हायरल प्रवृत्ती. एखादं व्याख्यान, पुस्तक किंवा अगदी व्हिडियो देखील जेवढ्या वेगाने पसरत नाहीत तेवढ्या वेगाने इंटरनेट मीम्स पोचतात. दुसरं म्हणजे, एखादी टीका गमतीत करतोय असं बघून समोरचा माणूस तुलनेने त्या टीकेबाबतीत सौम्य असण्याची शक्यता जास्त असते. भावना दुखावणे हा फॅक्टर जरी असला तरी अनेकदा माणसाचा कल गंमत म्हणून सोडून देण्याकडे देखील असतो. एखाद्या सिरीयस, बोचर्‍या, निर्दय टीकेला मात्र बरेचदा तेवढंच निर्दय उत्तर मिळतं.

तिसरं महत्त्वाचं कारण आहे – मीम्सचं निनावी असणं. एखादं पुस्तक त्या लेखकाचं असतं, सिनेमा दिग्दर्शकाचा, अभिनेत्याचा, अभिनेत्रीचा असतो, अगदी यूट्यूबच्या व्हिडियोवर देखील तो बनवणार्‍याची छाप असते. त्यामुळे एखाद्या पुस्तकामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या तर मी सलमान रश्दीसारख्या लेखकाची मानगूट पकडू शकतो, तस्लिमा नसरीनसारख्या लेखिकेला त्रास देऊ शकतो, किंवा एम. एफ. हुसेन सारख्या चित्रकाराला देशाबाहेर जाण्यास भाग पाडू शकतो. मीम्स मात्र अधिकांशतः निनावी असतात. त्यांचा मूळ निर्माता कोण आणि त्यांना पसरवण्यात कोणाकोणाचा हात लागला आहे हे कळणं अतिशय अवघड असतं, आणि म्हणूनच मीम्स एकाच वेळी सगळ्यांचेच असतात आणि त्याच वेळी कोणाचेही नसतात. हे निनावीपण मीम्स आणि ते बनवणार्‍यांना बोचर्‍या प्रतिकूल प्रतिक्रियेपासून दूर ठेवते. एखाद्या मीमने माझी भावना दुखावली तर मी नेमकी कोणाची गचांडी धरायची हे सांगणं अतिशय कठीण असतं आणि म्हणूनच गेल्या काही काळामध्ये धर्मावर बनणारे मीम्स अतिशय लोकप्रिय आहेत. विश्वास नसेल तर गूगलवर Religious Memes किंवा Christianity Memes टाईप करून बघा.

दुसरं उदाहरण आहे ते मीम्सच्या राजकीय वापराचं – काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाळेत शिकणार्‍या मुलांच्या पालकांबरोबर एक सभा होती. परीक्षेआधी मुलांच्या पालकांशी बोलणे असे काहीसे त्या सभेचे रूप होते. त्यात एका पालकाने मोदींना प्रश्न विचारला की माझा मुलगा अभ्यास करत नाही दिवसभर गेम खेळतो, तुम्ही त्याला काय सल्ला द्याल. मोदींनी जे उत्तर दिलं त्यातून जन्म झाला, गेल्या काही महिन्यातल्या सगळ्यात लोकप्रिय मीमचा – ‘ये पबजी वाला है क्या?’ PUBG हा टिनेजर्समध्ये अतिशय लोकप्रिय असलेला ऑनलाईन गेम आहे. मोदींनी हा गेम खेळण्याची शक्यता अर्थात अतिशय कमी आहे. हीच शक्यता जास्त आहे की मोदींच्या टीम मधल्या एखाद्याने मोदींना या गेमचा उल्लेख करायचा सल्ला दिला असेल आणि मोदींनी तो उल्लेख अतिशय अचूक टायमिंग साधून केला. याचे इंटरनेट मीम तयार होईल अशी मोदींना अपेक्षा असेल का? मला याची शक्यता कमी वाटते. पण कळत नकळत मोदींनी इंटरनेट मीमचा वापर तरुणांमध्ये स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि स्वतःचा कूलनेस कोशन्ट वाढवण्यासाठी पुरेपूर करून घेतला.

इंटरनेट मीमची ताकत बर्‍याच राजकीय पक्षांना देखील हळूहळू जाणवायला लागली आहे आणि हे पक्ष ट्वीटर इत्यादींच्या माध्यमातून एका अतिशय कंट्रोल्ड, नियंत्रित वातावरणात मीम्स पसरवण्याचा प्रयत्न करू लागलेली आहेत. पण हे कितपत यशस्वी होईल याबद्दल मी साशंक आहे, कारण मीम्स तुम्ही अशा नियंत्रितपणे पसरवू शकत नाही आणि एकदा का ते पसरू लागले की तुम्ही थांबवू देखील शकत नाही.

सांस्कृतिक उत्क्रांतीचे पुढचे पाऊल काय असेल, सोशल मीडिया आणि इंटरनेट मीम्सचा पुढचा टप्पा आपल्याला कुठे घेऊन जाईल हे या क्षणी सांगणे कठीण आहे. पण एक मात्र खरं, एकविसातल्या शतकातल्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनातल्या मुख्य घटकांपैकी एक इंटरनेट मीम्स असणार आहेत.