समग्रताशास्त्र : शास्त्रांची वैशिष्ट्ये व परस्परसंबंध दाखवणारा एकात्मिक नकाशा

समग्रताशास्त्र

लेखक - राजीव साने

समग्रतेने विचार केला पाहिजे असे जवळ जवळ सारेच उपदेशक सांगतात. पण म्हणजे नेमके काय करायचे व कसे करायचे हे कोणीच सांगत नाही. मानवी जीवनाचे सर्व आयाम व त्यांच्यातील परस्परसंबंध आरेखित करता येतील असे प्रारूप बनविण्याचा हा एक प्रयत्न. प्रारूप विकसित करत नेत असताना त्याचे साररूप डोळ्यापुढे रहावे यासाठी पुढील कोष्टक सुरुवातीलाच देत आहे. परंतु त्याचा अर्थ लागत जाणे हे निबंधाच्या ओघात होत जाणार आहे. निष्कर्ष सुरुवातीला देण्याने आपण कशाकडे जात आहोत याची काहीशी कल्पना मिळते व ती क्रमाक्रमाने भरीव होत जाते.

शास्त्र म्हणजे विज्ञान नव्हे. विज्ञान हे शास्त्रांपैकी एक विशिष्ट उदाहरण आहे. याचे भान कित्येकदा सुटताना दिसते. शास्त्र या शब्दाला शिस्तबद्ध मांडणी असा व्यापक अर्थ आहे.

मी ‘सामान्य नियमांची मांडणी’ म्हणजे शास्त्र असा अर्थ घेऊन हा लेख लिहित आहे. निसर्गनियम हे ‘काय झाले असता काय होईल?’ हे सांगणारे असतात. म्हणजे त्यांत ‘वुड’असतो पण ‘शुड’ नसतो. बरीच शास्त्रे ही काय केले पाहिजे? हे सांगणारी म्हणजेच विध्यर्थक असतात. संगीतशास्त्र हे कोणते नियम ‘पाळा’ हे सांगते. अशा शास्त्रांना विधीनियम सांगणारे शास्त्र म्हटले पाहिजे. तथ्ये आणि मूल्ये यात मूलभूत फरक असतो. तसेच कारणमीमांसा आणि प्रयोजनमीमांसा यातही मुलभूत फरक असतो. कशामुळे घडले आणि कशासाठी केले पाहिजे असा हा फरक असतो. कितीही ‘मुळे’ शोधले व जोडले तरी त्यातून एकही ‘साठी’ पैदा होत नाही, असे माझे मत आहे.

ज्ञान हा फारच व्यापक शब्द आहे. दुसरे असे की ज्ञान म्हटले की फक्त ओळखणे म्हणजे कॉग्नीटिव्ह अंग अधोरेखित होते. मानवी जीवनाला यत्न-भोग-बोध ह्या तीनही धारा एकत्र गुंफलेल्या असणे हे अटळ स्वरूप असते. फक्त बोधात्मक तेच ज्ञान असे मानण्यामुळे शिकणे ही व्यापक प्रक्रिया संकुचित केली जाते. भोगाबाबत रुची आणि यत्नाबाबत क्षमता या गोष्टी देखील आपण शिकत असतो. अर्थातच शास्त्रे ही फक्त बोधात्मक असून कशी चालतील?

अगदी आपले सध्याचे आवडते विज्ञान जरी घेतले तरी, त्याचे शरीर तथ्ये आणि कारणमीमांसेत मर्यादित झालेले असते पण त्याचा आत्मा परिदर्श अर्थात पॅराडाइम हा असतो. पॅराडाइम हा नेहमी नॉर्मेटिव्ह म्हणजे ब्रीदात्मक असतो. ‘असे असलेच पाहिजे’ अशा आज्ञा त्यात असतात. जे सिद्ध करायचे, ते गृहीत धरता कामा नये, हे तर्कशास्त्रातले वाक्यसुध्दा ब्रीदात्मकच आहे. १. ज्यावरून सिद्ध करायचे त्याचे अस्तित्व स्वतंत्र कसोटीने सिद्ध केले पाहिजे. २. कोणालाही कुठेही केव्हाही तेच उत्तर मिळाले पाहिजे अशी वाक्ये ही विज्ञानाच्या पॅराडाइममधली वाक्ये असतात, आहे खुद्द विज्ञानातली नव्हेत. तसेच कार्ल पॉपरचा नियम पहा. विधान खोडून कधी निघेल याची कसोटी दिल्याशिवाय विधान करता कामा नये आणि सिद्ध या शब्दाचा अर्थ ‘यद्यपि खोडून न निघालेले’ इतकाच घेतला पाहिजे. हे सरळ सरळ ब्रीदात्मक आहे.

संकेताने चिन्हे ठरवून घेणे ही क्रिया भौतिक नसून सामाजिक आहे. अर्थातच भाषाशास्त्र हे सामाजिक शास्त्र ठरते. संबंधिताना मान्य असणे ही मनातली गोष्ट असली तरी ती आंतरमानसिक असते. सामाजिक तथ्ये ही भौतिक नसून आंतरमानसिक असतात. म्हणजेच, भौतिक कळले की सगळेच कळले, असे होऊच शकत नाही.

प्रमाणांची औचित्ये (हा परिच्छेद शिस्त म्हणून मला आवश्यक असला तरी वाचकांनी तो स्किप करून पुढे जायला हरकत नाही. नंतर परत येऊन वाचता येईल.)

प्रमाण म्हणजे एखादे ज्ञान यथार्थ आहे की नाही हे ठरविण्याचा मार्ग होय. प्रत्यक्ष, निगमन, अनुमान, उपमान, शब्द (विश्वासार्ह व्यक्तीचा), अर्थापत्ती, अनुपलब्धी, अंतःसाक्ष्यता अशी अनेक प्रमाणे असतात. कोणतेच प्रमाण सुटेपणाने पुरेसे नसते. स्वतंत्र प्रमाणांनी तोच निष्कर्ष निघणे हे ‘प्रमाण’ म्हणजे वैध किंवा व्हॅलिड असते. विज्ञानातही प्रत्यक्ष आणि अनुमान यांचा संपात (एकाच जागी पडणे) झाल्याशिवाय विधान मान्य करता येत नाही.

जशी चूक, ज्ञान या शब्दाने शास्त्रांना सीमित करण्याने होते, तशीच चूक प्रमाण-ज्ञान म्हणजेच ज्ञान, या समजुतीने आणखीच तीव्रतेने होते. परिपूर्ण ज्ञान ही अपेक्षाच चुकीची आहे.

‘यथार्थ’ म्हणजे काय? हा प्रश्नही दुर्लक्षित राहिला आहे. कॉरस्पाँडन्स थिअरी ऑफ ट्रुथ म्हणजे ज्ञान हे ज्ञेयविषयाशी पूर्ण जुळले पाहिजे, असे मानणे. ज्ञेयविषय हा ‘प्राणी’ही दृदैवाने एक ‘ज्ञान’च असतो ही खरी पंचईत आहे. कॉरस्पाँडिंग टू व्हॉट? हल्ली कोहेरन्स थिअरी ऑफ ट्रुथ मानली जाते. ज्या थिअरीत जास्तीतजास्त व वैविध्यपूर्ण केसेस (उदाहरणे) बसतात ती ट्रू आणि आपले उदाहरणही बसले म्हणून ते ट्रू! असो.

यथार्थ या शब्दात दडलेल्या घटकांची एक साखळी माझ्या ध्यानात आली आहे. ती अशी, यथा ज्ञानार्थ (ज्ञानाचे प्रयोजन) असे ज्ञान-गुण, यथा ज्ञान-गुण आवश्यक ठरेल ती ज्ञानरीती, आणि यथा ज्ञानरीती तथा ज्ञानप्रस्ताव आला, की तो ज्ञान मानावा. समजा मला एक उशी अडजस्ट होत नाहीये. ती कशी ठेवलेली बरी हे माझे मला कळले तर पुरेसे आहे! दरवेळी सार्विकता हा गुणसुध्दा लागत नाही. अचूकता किती आवश्यक आहे हे त्या त्या अप्लिकेशननुसार ठरते. आपण ज्याला एक्झॅक्ट-सायन्स म्हणतो तेही अप्रॉक्झिमेटच (लीस्ट काऊंट=अल्पतम मोजमाप) असते. खात्रीलायकपणा हा गुण आवश्यक आहे पण किती खात्रीलायकपणा? जर समस्येची लक्षणीयता तीव्र असेल तर कमी खात्रीलायक ज्ञानही उपयोगात आणावे लागते. अंतिम प्रमाण हे ‘ट्रायल अँड एरर’ हेच असते, जे प्राणी असतानासुध्दा आपण वापरत होतो आणि आजही त्याच्यापासून सुटका नाही. तरी बरे! सध्या आपण चुकू शकणार्‍या आणि दुरुस्त करता येऊ शकणार्‍या ज्ञानाला ज्ञान मानतो. एकेकाळी जेव्हा अंतिम-सत्याचा (म्हणजे काय?) शोध चालू होता तेव्हा अ-दुरुस्तणीयता (इनकॉरीजिबलिटी) हा आवश्यक ज्ञानगुण होता. संशयवादाचा उगम त्यातूनच झाला. असो. जी अनेक प्रकारची शास्त्रे लागतात त्यांना मुळात शास्त्र म्हणून जागा मिळावी यासाठी ‘प्रमाणज्ञाना’ चा हट्ट कसा व्यर्थ आहे, हे मी दाखवून दिले. याचा अर्थ आपण, स्वैर-सापेक्षतावाद/उच्छेदवाद (पोस्ट मॉडर्निझम या नावाने पसरत असलेल्या वैचारिक वृती) यांना बळी पडायचे, असा नाही. खुद्द कार्ल पॉपरनेच, चुकू शकण्याच्या सिद्धांताचा दुरुपयोग होत आहे हे लक्षात आल्यानंतर, नवी प्रस्तावना जोडून स्पष्ट केले की, दुरुस्त्यांचा प्रवास अधिकाधिक बरोब्बरकडे चालू असतो. कुठेही जा! असा नसतो. म्हणजेच शास्त्रकारितेच्या काही सुनिश्चित (पण एकच एक नव्हे) अशा पद्धती (मेथड्स) असतात. म्हणूनच आपण काही पद्धतीप्रकार निश्चित करणार आहोत

वास्तवांचे प्रकार :

आपल्या जीवनात विषयीत्व (सब्जेक्टहुड), विषयत्व (ऑब्जेक्टहुड), निर्वाळा (जजमेंट), उभयदिशांनी परिवर्तन म्हणजे विषयीकडून विषयात परिवर्तन(यत्न) व तसेच विषयाकडून विषयीत परिवर्तन(भोग) आणि मुख्य म्हणजे विषयी हा स्वतःलाही विषय बनवू शकणे (सेल्फ-रिफ्लेक्शन); या पाचही गोष्टी अनिवार्य आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची वासलात लावायला (तिला एलिमिनेट करायला) बघणे हे व्यर्थच नव्हे तर घातकही आहे. एकांगीपणा नको! ही एक दार्शनिक भूमिका आहे व त्यात मी एकटा नाही एवढेच इथे सांगून ठेवतो. (हाबेरमास, पॉल रिकोयुर इत्यादी)

वास्तव म्हणजे जे आपल्या व्यक्तिगत व तात्कालिक लहरीनुसार बदलत नाही ते. म्हणजेच वास्तवाला स्वतःची अशी एक दृढता (फर्मनेस) असते. फँटसी करता येते पण तिच्यात सुध्दा आपल्या सृजनशीलतेवर वास्तवांच्या मर्यादा येतात!

यत्नेंद्रिय-प्रत्यक्ष (मोटर फीडबॅक) या वेदनक्षमतेमुळे बल (फोर्स) ही गोष्ट आपल्याला थेट समजलेली असते. स्पर्श हा सुध्दा ‘टँजिबल’ नामक कोटी निर्माण करतो. काळ आणि अवकाश या चौकटीत द्रव्य आणि ऊर्जा या स्वरूपात जे असते ते भौतिक वास्तव. लेटेस्ट अंदाजानुसार फील्ड आणि डिस्टर्बन्स यातही ते घटविता येते, असे म्हणतात. शुभेच्छा देण्याने मानसिक प्रोत्साहन मिळत असले तरी विश-पॉवर अशी काही नसते आणि काहीतरी यत्न केल्याशिवाय भौतिक-वास्तवात बदल करता येत नाही. तसे बदल करून, कृत्रिम वस्तू (आर्टिफॅक्ट्स) बनवून, मानवाने नैसर्गिक आणि अभियंत्रित असे उभयस्वरूप भौतिक-वास्तवाला दिलेले आहे.

मानवी जाणीवेला सर्वसमाईक असा एक आयामिक घाट आहे. जे नुसत्या संवेदनांत घटविता येणार नाहीत पण अमूर्ताचाच थेट प्रत्यय येऊन कोणालाही आढळतील असे हे आयाम (कॅटेगरीज) असतात. (कृतज्ञता-इमॅन्युएल कान्ट) काल-अवकाश हा त्यापैकी फक्त एक झाला. गोष्टींचे (आयटेम्सचे) प्रकार पडतात व गोष्टी प्रकारांत मोडतात हे न मानता विचारच करता येणार नाही. व्याप्य-व्यापक किंवा विशेष-सामान्य असा संबंध मानणे हाही एक आयामच आहे. असे सार्विक आयाम हे आयाम म्हणून सिद्ध करणे हे तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. आयामांचे अस्तित्व मानणे म्हणजे पारलौकिक अस्तित्वे मानणे नव्हे.

याखेरीज मानवने शुध्द-चिंत्य-विषय (फॉर्मल ऑब्जेक्ट्स) सुध्दा निर्माण केलेले आहेत. बिंदू, क्षण, संख्या, अनंत, ज्या अर्थी, त्या अर्थी, वरून सिद्ध (इम्पलाईज), बरोबर(इक्वल टू), मध्ये मोडते (बिलाँग्ज टू) अशा अनेक गोष्टी म्हटले तर मानव-रचित असतात पण त्या स्वयंसिद्धही निघतात! कारण त्या आयामांवर आधारित असतात. शुध्द-चिंत्य-विषयांना स्वतःचे असे नियम असतात. हे आपण ठरवले म्हणून अस्तित्वात येत नाहीत. ‘देअरफोर इट फॉलोज दॅट’ या प्रकारच्या वैचारिक हालचाली आयामांच्या स्वरूपामुळे नियत असतात. म्हणूनच आयामिक वास्तव नावाचे एक वास्तवच मान्य केले पाहिजे. हेही ‘लहरीनुसार न बदलता येणारे’, या अर्थाने वास्तवच असते. घटितांवर अवलंबून नसणारे ज्ञान (आ-प्रायारी नॉलेज) हे या आयामिक वास्तवाचे ज्ञान असते.

मानीव गोष्टी वास्तव असतात की नसतात? कोणी एकट्याने मानल्या यावरून त्या काही वास्तव ठरत नाहीत. परंतु, सर्वांनी मानल्यामुळे ज्यात बदल करणे अवघड असते असेही एक वास्तव असते. संकेत ठरवून चिन्हव्यवस्था निर्माण करणे हे अगदी उघड उदाहरण आहे. एकमेकांशी कळत नकळत व्यक्त-अव्यक्त असे अनेक करारही केले जात असतात. ते मोडता येतात पण मोडल्यामुळे कलह निर्माण होतात व मोडल्याबद्दल दंडात्मक कारवाई सुध्दा होऊ शकते. कोणतेही सामाजिक आयोजन (अरेंजमेंट) पूर्णपणे भौतिक जगात दाखवता येणार नाही. क्यू म्हणजे फिजिकल रांग नसून, आधी मागणी करणार्‍याला आधी मिळावे, हा नियम मान्य असणे व मुख्यतः पाळावासा वाटणे, होय. या प्रकाराला आंतरमानसिक (इंटरसब्जेक्टिव्ह) असा शब्द आहे. हेच सामाजिक वास्तव होय.

एकेका व्यक्तीबाबतही मन पूर्णतः ताब्यात असणे हे कोणालाच जमत नाही. या मर्यादा सुध्दा दृढ असल्याने एक ‘मानसिक- वास्तव’ही मानावे लागते. यालाच पिंडधर्म असेही म्हणतात.

अशा तर्‍हेने आयामिक वास्तव, भौतिक वास्तव, सामाजिक वास्तव आणि मानसिक वास्तव अशी चार प्रकारची वास्तवे आपल्याला मान्य करावी लागतात. यात अंतिमतः कोणते खरे? हा प्रश्न आपण मुद्दाम वर्ज्य करीत आहोत, कारण आपल्याला विश्वाचे रहस्य (मुळात विश्व म्हटले की त्याला काहीतरी रहस्य असायलाच हवे का?) किंवा अंतिम सत्य (कशाच्या अंतिम?), यात रस नसून मानवाला जीवनदृष्टी मिळवून देईल अशाच तत्त्वज्ञानात रस आहे. याला प्रॅग्मॅटिझम व अँथ्रोपोसेंट्रिझम असे म्हटले तरी चालेल.

शास्त्रांच्या उद्दिष्टांनुसार ठरणारे पद्धतिप्रकार

शास्त्र करताना कोणत्या स्वरूपाचे नियम शोधायचे वा बनवायचे आहेत? तसेच, जे वास्तव लक्ष्य असेल, त्याच्या कोणत्या अंगाची मीमांसा करायची आहे? शोधाची दृष्टी कोणती आहे? या प्रश्नांची उत्तरे दिली की शास्त्रकारितेचे मूलभूत पद्धतिप्रकार सापडतात.

‘गती’ म्हणजे, काय होईल? होते? आहे? याचे अंदाज. इथे गतीमध्येच स्थितीही समाविष्ट आहे. (काय गत झाली आहे पहा!) भौतिक-विज्ञान हे भौतिक वास्तवातील तथ्ये जमवते. भौतिक वास्तवाचे गतिनियम शोधते. आणि भौतिक घटितांची कारण-मीमांसा करते.

गतिनियमांशी कार्य-कारण-भाव निबध्द असतो. गतिनियम वा कार्यकारणभाव सापडल्याने काय घडेल याचे (अधिकाधिक अचूक) अंदाज म्हणजेच प्राक्कथने(प्रेडिक्शन्स) करता येतात. एका घटिताला कारणीभूत ठरणारी घटिते, जर घडवून आणण्याजोगी असतील, तर कार्य-रूप घटितेही घडवून आणता येतात.

पण काय घडवून आणायचे? हे मात्र भौतिक विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. त्यात काय घडवून आणणे उचित? हा प्रश्न येतो. प्रयोजनमीमांसा करावी लागते. म्हणजेच मूल्यांचा प्रश्न येतो. काय उचित? याबाबत जे काही भलेबुरे संकेत ठरलेले असतात मग ते मोडण्या/पाळण्यासंबंधी कायदेशीर तरतूदी असतील वा नसतील, त्यांना आपण विधिनियम(नॉर्म्स) म्हणणार आहोत. गतिचर्चेपेक्षा, विधिचर्चा(नॉर्मेटिव्ह डिस्कोर्स) मूलतः वेगळी असते. विधी या संज्ञेत आपण ‘विधी’, निषेध आणि मुभा, म्हणजे काय केलेच पाहिजे? टाळलेच पाहिजे? किंवा टाळले नाही तरी/केले तरी चालेल? या तीनही गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. प्रयोजनमीमांसा, मूल्ये आणि विधिनियम हे एकमेकांशी निबध्द असतात.

अशा तर्‍हेने विविध वास्तवांबाबत शास्त्रकारितेच्या पद्धतींचे प्रकार कोणते? याची पहिली दोन उत्तरे आपण मिळवली आहेत.

पद्धतिप्रकार 1 = गतिनियम + कारणमीमांसा + तथ्यदृष्टी,

पद्धतिप्रकार 2 = विधिनियम + प्रयोजनमीमांसा + मूल्यदृष्टी

मानवी आचरण(आतून) व वर्तन(बाहेरून) हे माणूस काय काय मान्यता घेऊन जगतो आहे, यावरही अवलंबून असते. मान्यतांवर विश्वास असतो. मान्यता म्हणजे असे ‘मत’ की ज्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काही उपदेश(प्रिस्क्रिप्शन) सूचित होत असतो. मीम्स हा शब्द मान्यतांसाठी अलिकडेच वापरात आला आहे. कोणत्या मान्यतांमुळे कोणत्या प्रकारच्या कृतींना प्रेरणा मिळेल? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

गतिनियमांच्या आधारे काय घडवणीय आहे हे कळते. विधिनियमांनुसार काय आचरणीय आहे हे ठरते. असे असले तरी मान्यतांमुळे काय स्फुरेल हे गति/विधि-नियमांनी ठरत नाही. मान्यता-आचरण संबंधात जी नियमितता आढळेल तिच्यातल्या नियमांना मी ‘स्फूर्तिनियम’ असे नाव देत आहे. एखाद्या मान्यतेमध्ये अनुस्यूत असलेले तथ्य-दावे, खरे/खोटे वा अज्ञात असू शकतात. तसेच एखाद्या मान्यतेमध्ये अनुस्यूत असलेले मूल्य-दावे हिताचे/ अहिताचे किंवा अनिर्णीत किंवा उदासीन असू शकतात.(आणि यावर वाद असू शकतात!) मान्यतेची तथ्यातथ्यता किंवा योग्यायोग्यता समजणे ही गोष्ट आचरणात बदल घडवू शकते, पण शकेलच असे नाही.

कारण मान्यता मानसिकदृष्ट्या आकर्षक असेल तर तिच्यातली तथ्यातथ्यता/योग्यायोग्यता दुर्लक्षित करता येते किंवा आवडत्या मान्यतेला तथ्यपूर्ण आणि मूल्यवान सिद्ध करण्याचा तार्किक/अतार्किक प्रयत्न होऊ शकतो. म्हणूनच स्फूर्तीनियमांचे आकलन करून घेणे, हे स्वतंत्रपणे महत्त्वाचे आहे.

या तिसर्‍या पद्धतिप्रकारात स्फूर्तिनियम + मान्यतामीमांसा + काव्यात्मदृष्टी हे घटक असतात.

काव्यात्मता म्हणजे माणूस त्याचे भावजीवन जगत असताना, तथ्ये व मूल्ये यांना ओलांडूनही जे सिंथेसिस करत जातो ते होय. खरे/खोटे, भले/बुरे कसेही असो, प्रेरणा म्हणून काव्यात्मता महत्त्वाचीच असते. ज्याला लक्षणार्थाने घेणे म्हणतात ते यात येते. इतकेच नव्हे तर जे लक्षणार्थानेच घेतले पाहिजे ते वाच्यार्थाने घेणे हा घोटाळाही ‘काव्यात्मदृष्टी’मध्ये समाविष्ट आहे. माणसाची इरशनॅलिटी सुध्दा रॅशनली समजावून घेण्याची गरज आहे. वादात मान्यतांचे खंडन केल्याने फारसे परिवर्तन होत नाही. उपचारांची थेरप्युटिक गरज ओळखता आली पाहिजे. तसेच तर्कबाह्य काव्यात्मता ही नेहमीच विघातक नसते, कित्येकदा विधायकही असते.

चौथा पद्धतिप्रकार परिप्रेक्ष्यदृष्टीने शास्त्रकारिता करणे हा आहे. गतकालीन व आगतकालीन मानवी जीवनाचे चित्र आपण कसे? व त्यात कुठे उभे राहून बघतो? या गोष्टीला परिप्रेक्ष्य म्हटले आहे. इतिहास हा विषय भूतकाळातील सेलिब्रिटी-व्यक्तींच्या कहाण्या अशा थाटात शिकवला जातो ही दुर्दैवी गोष्ट आहे. मानवी जीवनाचे काल-परिप्रेक्ष्य निर्माण करणे हे इतिहासाचे स्वरूप असायला हवे. असे करताना पुढील मुद्दे नेहमीच ध्यानात ठेवावे लागतात.

परिप्रेक्ष्यदृष्टीमधील सामान्य तत्त्वे :

१. काही प्रक्रिया अपूर्वावर्तनीय (इर्रिव्हर्सिबल) असतात. (खरेतर त्यामुळेच काळ अस्तित्वात येतो.)

२. अपूर्वावर्तनीय प्रकियांमध्ये स्वयंवर्धी भरण (क्युम्यूलेटिव्ह अग्रिगेशन) होत जाते.

३. या वर्धिष्णुतेची एकूण दिशा साध्या घटकांपासून संश्लिष्ट(सिंथेटिक) व व्यामिक्ष्र (कॉम्प्लेक्स) संघातांकडे अशी असते.

४. विघटनकारी प्रक्रियाही असतात परंतु मानवी जगात तरी वट्टात विघटनापेक्षा संघटन जास्त असते. म्हणून या पद्धतीला विकसनमीमांसा असे नाव देत आहे.

५. संघातांचे सातत्य राखणार्‍या प्रक्रिया आणि त्यांत नूतनता आणणार्‍या प्रक्रिया अशा दोन्ही कार्यरत असतात.

६. मात्रात्मक बदल हे एका मात्रेनंतर गुणात्मक बदलात परिवर्तित होतात.

७. स्वतंत्र प्रक्रिया यदृच्छया एकत्र येण्याने वा तुटण्याने नूतनेच्या संधी उत्पन्न होतात. या संधी यदृच्छया वा सृजनशीलतेतून घडतात. ही मोक्याची वळणे (टर्निंग पॉइंट्स) असतात.

८. नियतता आणि यदृच्छा हे दोन्ही मान्य करून व निर्णयांनी फरक पडतो हे मान्य करून ‘संधिवैशिष्ट्ये’ शोधणे हे परिप्रेक्ष्यदृष्टीत येते. यदृच्छा घेतल्यामुळे ‘नियम’ हा शब्द टाळला आहे.

९. नूतनतेची बीजे रुजण्यासाठी बाकीची परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ती टिकून रहावी लागतात अन्यथा वाया जातात.

१०. असे योगायोग कोणते घडतील याचे प्राक्कथन करता येत नसले तरी ते कसकसे घडले वा घडले असतील, ह्याची पूर्वलक्ष्यी कथाच रचावी लागते.

११. ही कथा नव्याने उपलब्ध होत जाणार्‍या भूतकाळविषयक पुराव्यांनी दुरुस्त करीत रहावे लागते.

12. भविष्यकालीन कथाही अदमासे रचल्या जात असतात. कोणत्या भविष्यकालीन कथेच्या संदर्भात आपण भूतकाळाकडे बघतो आहोत तिच्यानुसार भूतकाळाचा ‘अर्थ’ बदलत असतो.

म्हणून चौथ्या शोधप्रकारांचे कळीचे शब्द विकसनमीमांसा, संधीवैशिष्ट्ये, आणि परिप्रेक्ष्यदृष्टी हे आहेत.

आता पर्यंत आपण चार पद्धतिप्रकारांचे कळीचे शब्द पुढीलप्रमाणे शोधले

१. कारणमीमांसा – गतिनियम – तथ्यदृष्टी २. प्रयोजनमीमांसा – विधिनियम – मूल्यदृष्टी ३. मान्यतामीमांसा – स्फूर्तिनियम – काव्यात्मदृष्टी ४. विकसनमीमांसा – संधीवैशिष्ट्ये – परिप्रेक्ष्यदृष्टी

नियमप्रकार व वास्तवप्रकार यांचे संयोग

कोणत्या प्रकारच्या वास्तवाचे आकलन कोणत्या प्रकारच्या नियमांनी करून घ्यायचे आहे? याचे उत्तर म्हणजे शास्त्रांचे वर्गीकरण करण्याची गुरुकिल्ली असते. तीन शोधप्रकार आणि चार वास्तवे यांच्या संयोगाने १२ खणांचे कोष्टक (मॅट्रिक्स) निर्माण होते. या चौकोनांमध्ये किंवा ‘खणां’मध्ये येणार्‍या शास्त्रांचे अधिक चांगले व अधिक काटेकोर नामकरण करता येईल. पण कल्पना यावी म्हणून मी विविध शास्त्रांची प्रचलित नावे एकेका खणासाठी निवडलेली आहेत. तसेच चौथ्या स्तंभासाठी नवी नावेही शोधली आहेत. ही सर्व नावे सर्वार्थाने फिट्ट बसतील असे नाही पण त्या त्या शास्त्राचा सारबिंदू पकडला जाईल असे मला वाटते.

कोष्टकातील शास्त्र-संज्ञांचे खुलासे

१.१) तर्कगणित :

तर्कशास्त्र आणि गणितशास्त्र हे आशयनिरपेक्ष असते. त्यातील अस्तित्वे भौतिक नसतात. भौतिक जगात पाच पेरू किंवा पाच चिक्कू आढळतील पण खुद्द ‘पाच’ भौतिक जगात नसतो. तर्क व गणितात ज्या निरनिराळ्या क्रिया केल्या जातात त्यांची उत्तरे काय यावीत हे आपण ठरवीत नसतो. दिलेल्या गृहीतावर दिलेल्या क्रिया केल्यास काय घडेल हे ‘ठरत’ असते. आपण ठरवीत नसतो. या अर्थाने तर्क/गणित मधील नियम हे गतिनियम असतात व ते आपण शोधून काढतो, बनवीत नाही. तर्क/गणित यांचे उपयोजन केले की ते शुध्द रहात नाही व विज्ञानात किंवा संबंधित शास्त्रात पडू लागते.

१.२) भाषाशास्त्र :

प्रत्यक्ष वापरातील भाषांचा अभ्यास वेगळा आणि भाषाशास्त्र वेगळे. भाषेला आशय असतो व जीवनातील संदर्भ असतात. पण कोणतीही भाषा ही भाषा ठरण्यासाठी कोणत्या सार्वत्रिक अटी पूर्ण व्हाव्याच लागतात? हे शोधणे म्हणजे विशुध्द भाषाशास्त्र किंवा चिन्हव्यवस्थाशास्त्र असते. आशयनिरपेक्षतेमुळे भाषाशास्त्र आयामिक ठरते. पण त्यातील व्याकरण (सिन्टॅक्स) आणि शब्द-‘भावार्थ’(मीनिंग्ज) संबंध (सीमँटिक्स) हे ‘राखले पाहिजेत’ असे बजावणारे विधिनियमच असतात. म्हणून भाषाशास्त्राला ‘आयामिक आणि विधिनियम’ ही जुळणी लागू पडते. वापरातील भाषा ही गोष्ट संस्कृती व आदान-प्रदान या खणांमध्ये पडेल. साहित्याचे आकारिक अंग कला मध्ये व आशयाचे अंग आशयानुसार योग्य त्या विभागात पडेल. तर्क गणिता साठी औपचारिक भाषा बनवाव्या लागतात.

१.३) कला/क्रीडा :

कलेची कलात्मकता ही आशयनिरपेक्ष असते. सौंदर्य ही गोष्ट न-नैतिक असते. क्रीडा ही एका अर्थी निरर्थक व मानीव असते. काव्यात्मता ही गोष्ट भाषेचे नियम मोडणारी असते. कला क्रीडा काव्य या गोष्टींमध्ये काहीना काही मानावे लागते ते खरे किंवा योग्य असेल असे नाही पण रसनिष्पत्ती होते. आस्वाद प्रक्रिया आणि निर्मिती प्रक्रिया या दोन्ही स्फुरणदायी असतात. कोणत्या मान्यतेमुळे कोणते स्फुरण मिळते? याचे उत्तर असण्याने या गोष्टी काव्यात्मदृष्टी/स्फूर्तिनियम/ मान्यतामीमांसा ह्या कक्षेत पडतात आणि आशयनिरपेक्षतेमुळे त्या आकारिक वास्तवात मोडतात. अपवाद म्हणजे साहित्य, चित्र, नाट्य. यांत आशयही येतो. तो आशय ज्या शास्त्रप्रांतातला असेल त्याप्रमाणे आशयाची समीक्षा त्या त्या शास्त्रात करावी लागते. कलात्मकतेची समीक्षा कला-प्रांतातच रहाते.

१.४) उपपत्ती :

परिप्रेक्ष्यदृष्टीचे वर्णन करताना आपण जी बारा सामान्य तत्त्वे पाहिली ती आयामिक आहेत म्हणूनच परिप्रेक्ष्यदृष्टी आणि आयामिक वास्तव यांच्या संयोगाला उपपत्ती असेच नाव दिले आहे.

२.१) विज्ञान :

विज्ञान काय असते? यावर वेगळे लिहिण्याची गरज नाही. तथ्यदृष्टी / कारणमीमांसा/गतिनियम आणि भौतिक वास्तव, ही जुळणी उघड आहे. काहीजण असे मानतात की वास्तव फक्त भौतिकच असते, नियम फक्त गतिनियमच असतात आणि दृष्टी ही फक्त तथ्यदृष्टीच असते! व म्हणून इतर प्रांत हे विज्ञानात ‘घटविता’ येतात. असे घटविणे हे जीवनदृष्टी मिळण्यासाठी निरुपयोगी असते. (इतराना वस्तू म्हणून वापरण्यासाठी उपयोगी असते.) जीव, जनुक, उत्क्रांती व मेंदुघटिते हे विज्ञानात प्रविष्ट झालेले नवे प्रांत आहेत. ते जरी जीवनाशी जवळून संबंधित असले तरी ती विज्ञाने असतात, खुद्द जीवन नव्हे. दुसर्‍याच्या जाणिवेने आपल्या शरीराच्या आत पहाणे आणि आपण आपल्या जाणीवेच्या आतून पहाणे ह्या वेगळ्या गोष्टी असतात.

२.२) तंत्र :

विज्ञान जरी मूल्यरहित असले तरी तंत्र हे मूल्यसहितच असते. त्यात मानवी प्रयोजन असते व प्रयोजन उचित की अनुचित हा प्रश्न येतो. तंत्राचे काही परिणाम नंतर लक्षात आले तरी ते मानवी जीवनावर होणारे परिणाम असल्यामुळे तेही योग्य अयोग्य ठरतात. काही विधिनियम थेटपणे तंत्रात असतात. तसेच विधीविधान व मूल्यप्रणाली या प्रांतांतही तंत्रावर लागू करण्याचे विधिनियम असतातच. पण कृत्रिम-भौतिक हे वास्तवही भौतिकमध्येच येत असल्याने तंत्र हे कोष्टकातल्या स्थानी चपखल बसते. वैद्यक आणि शस्त्रविद्या ही तंत्रेच आहेत. नोंद, संपर्क व माहितीप्रक्रिया ही तंत्राची प्रगत अंगे आहेत. जनुकीय अभियांत्रिकी सुध्दा यातच मोडते.

२.३) यातू :

मानवेतर निसर्गाला मानवी मनासारखेच मन असते अशी मान्यता बराच काळ होती.(आजही सर्वमानसवाद पॅनसायकीझम सर्वथा त्याज्य ठरलेला नाही पण एक वाद इझम आहे.) नैसर्गिक शक्तीना देवता मानणे त्यांना खुश करण्यासाठी काही ‘हवि’ देऊ करणे, स्तुती करणे, याचना करणे असे प्रकार मनुष्य सर्रास करीत असे. यज्ञ हे उत्तम उदाहरण आहे. आजसुध्दा ज्यांना आपण अंधश्रद्धा म्हणतो त्या यातू (जादू!) याच स्वरूपाच्या आहेत. यातूमधल्या मान्यता तथ्यपूर्ण आहेत की नाहीत? म्हणजेच यातू हे तंत्र तर नव्हे? हा प्रश्न महत्त्वाचा नसून यातूक्रियांचे मानवावर दुष्परिणाम होतात की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दुष्ट-श्रद्धा त्याज्यच आहेत. आन्हिकांची मानसिक गरज असते व त्यामुळे स्फूर्ती मिळत असते. म्हणून काव्यात्मदृष्टी/मान्यतामीमांसा/स्फूर्तिनियम आणि भौतिक-वास्तव ही जुळणी यातूला लागू पडते.

२.४) उत्क्रांती + कृत्रिमवस्तू :

भौतिक वास्तवाला नैसर्गिक इतिहास आहे. बिग बँग, ग्रहमाला, जीवोत्पत्ती, विश्वाची प्रसरणशीलता, ऊर्जेचा ओजक्षय, जीवांमध्ये अधिकाधिक अंतर्व्यूहित संघात बनत जाण्याची प्रक्रिया अर्थात उत्क्रांती! सध्याच्या म्हणजे सेपियन मानवाची निर्मिती उत्क्रांतीतूनच झाली. मानवाच्या आगमनापासून भौतिक वास्तवाचा कृत्रिम इतिहास सुरू झाला. तंत्रांचे नूतनोद्भव, ती पसरणे आणि ती व्यवहार्य रहाणे न रहाणे या प्रक्रियेच्या भौतिक अंगाला आपण कृत्रिमवस्तू (आर्टिफॅक्ट्स) म्हणत आहोत. कृत्रिमवस्तूंच्या विकासाची कहाणी येथे अभिप्रेत आहे. प्रगतीचे भौतिक अंग हे आहे. तंत्र या खणाशी थेट संबंधित आहे.

३.१) समाज + अर्थ + राज्य (विज्ञान) :

एकमेकाकडून काय अपेक्षित धरायचे याचे विधिनियमच बनत जात असले, तरी हे विधिनियम आत्मसात झालेले लोक कसे वागतील याविषयी भाकिते करता येतात. सामाजिक वास्तवाचे गतिनियम शोधता येतात. उत्पादन-विनिमय संबंध वस्तूदृष्टीने पहाता अर्थशास्त्र निर्माण होते. युध्दे, तह, सत्तासंबंध आणि विधिविधान यागोष्टींचे गतिनियम वा कार्यकारणभाव पहाणे म्हणजे राज्यशास्त्र असते. कुटुंब व सभ्यतेतील संस्थात्मक रचनांचा अभ्यास समाजशास्त्रात होतो. समाज-अर्थ-राज्य ही शास्त्रे या ठिकाणी (ह्या खणात) निरीक्षणे भाकिते कारणे हस्तक्षेप व नियंत्रण यासाठी अभ्यासली जात असल्याने धुरीणांनी मानवी संबंधांचे इंजिनिअरिंग कसे करायचे? यासाठी सामाजिक वास्तवाचा वस्तुदृष्ट अभ्यास येथे अभिप्रेत आहे.

मागणी पुरवठ्यामुळे किंमत ‘ठरते’ (ठराव करून नव्हे. सरकारने सक्तीची करून नव्हे. ती वेगळी),हे अर्थशात्रातले वाक्य आहे. व्यवसायात कुटुंबातले घटक लागेनासे झाले की एकत्र कुटुंब नष्ट होते, हे समाजशास्त्रातले वाक्य आहे. अध्यक्षीय पद्धतीत दोनच पक्ष प्रभावी होतात हे राज्यशास्त्रात पडते.

३.२) विधिविधान + मूल्यप्रमाली :

या उलट, किंमत रास्त कोणती? एकत्र कुटुंब चांगले की विभक्त कुटुंब? अध्यक्षीय पद्धत चांगली की संसदीय? हे प्रश्न मूल्यात्मक आहेत त्यामुळे आपल्या कोष्ट्कानुसार विधिविधान व मूल्यप्रणाली मध्ये पडतील. सामाजिक वास्तव कसे असायला हवे? याचे एक उत्तर कायद्यामध्ये असते. पण कायदे बदलण्यासाठी द्यावयाच्या समर्थनातही असे उत्तर असते. धोरणात्मक निर्णयांच्या समर्थनात (किंवा धिक्कारात) असे उत्तर असते. कायदे हे उघडच विधिनियम असतात. पण समाज-परिवर्तन कोणते व कसे केले पाहिजे याचेही विधीनियम राजकीय मूल्यप्रणालीत असतात. स्वातंत्र्यवाद, समतावाद, सर्वोदयवाद, अंत्योदयवाद, दुःखनिरासवाद, सुखवर्धनवाद, सहभागवाद, अवैरवाद, अहिंसावाद, विवेकवाद, तपासणीयतावाद तसेच या वादांच्या उलटे वाद हुकुमशाही वंशवाद जमातवाद इत्यादी वाद, म्हणजे मूल्यप्रणाल्या होत. आम्ही साधन-शुचिता मानतो किंवा मानत नाही अशाही प्रकारे त्या व्यक्त होतात.

३.३) धर्म + संस्कृती :

कोणत्या प्रकारच्या मान्यतांमुळे कोणत्या प्रकारच्या समाजव्यवस्थेला स्फुरण मिळेल? हा प्रश्न आहे. या मान्यता पारलौकिकच असतील असे नाही. मार्क्सवादात पारलौकिक काही नाही पण तो धर्मच आहे. अन्यायग्रस्तांचे राज्य आले की न्याय मिळणारच, ही मान्यता रुजवायची आणि मग खरी करून दाखवायची, असा तो प्रकल्प आहे. पारलौकिक मान्यताही अनेक प्रकारच्या असतात. आपल्या सर्वांना एकच एक आत्मा आहे म्हणून आत्मौपम्य बुद्धीने एकमेकाशी वागलो तर सुराज्य येईल. ही एक मान्यता असू शकते. राजा ईश्वराचा प्रतिनिधी आहे म्हणून राजनिष्ठा ही उपासनाच होय अशीही मान्यता असू शकते. सात्विक, राजसी आणि तामसी प्रकृती असतात म्हणून ब्राह्मण क्षत्रिय-वैश्य आणि शूद्र असणारच अशीही मान्यता असू शकते. समाजपुरुषाला एक मन असते व त्याची इच्छा कळू शकते अशीही मान्यता असू शकते. पाप-पुण्य, शिक्षा-बक्षीस, स्वर्ग-नरक, पूर्वकर्माने भाग्य ठरणे या सगळ्या मान्यता लोकांना प्रेरित करत असतात. हे प्रकरण म्हणजे धर्म होय. प्रत्येकाने निक्षून स्वार्थ साधावा म्हणजे आपोआप सर्वार्थ साध्य होईल हा सुध्दा धर्म आहे! असे लक्षात घेतले की धर्म हवा की धर्म नको हा प्रश्न विचारायचा? की कोणत्या प्रकारचा धर्म हवा हा प्रश्न विचारायचा? याचे उत्तर मिळेल. ‘मान्यतांमुळे प्रेरणा’ हे संस्कृतीचे स्वरूप असते व धर्म हे संस्कृतीच्या पोटात असतात.

३.४) सत्ता + आदानप्रदान :

आदानप्रदाने (ट्रँझॅक्शन्स) तीन प्रकारची असतात. वस्तू व सेवा यांची आदानप्रदाने, घात-प्रतिघात यांची आदानप्रदाने आणि विचार-भावना यांची आदानप्रदाने (संज्ञापन). उत्पादन, युध्द आणि संवाद-विसंवाद. यापैकी युध्द हे हारजीत होऊन व तह होऊन संपते. पण संपताना ते बलसंबंध मागे सोडते. त्याचवेळी विधायक आदानप्रदान करण्यासाठी सहकार्याची आणि शिस्तीचे आवश्यकता असते. बलांची जी उतरंड बनली असेल ती सहकार्य व शिस्त या कामी वापरता येते. यातून बलाला वैधता प्राप्त होते. वैध बल म्हणजे सत्ता. अधिकार आणि उत्तरदायित्वे एकेका भूमिकेत तोललेली असतील, अशा भूमिका मिळून संघटन बनते. संघटन हे जरी अनेक व्यक्तींचे असले तरी ते जणूकाही एक व्यक्ती म्हणून इतर जणूकाही व्यक्तींशी आदानप्रदान चालू ठेवते. हे सारे प्रकरण कसकसे बदलत गेले याची कथा म्हणजे या खणातील अभ्यासविषय होय. हे सामाजिक वास्तव आहे हे उघड आहे. तसेच ही कथा परिप्रेक्ष्यदृष्टीने विकसनमीमांसा करत व संधिवैशिष्ट्ये टिपत रचावी लागते म्हणून हा खण तिला बहाल केलेला आहे.

४.१) मानस :

येथे एक स्पष्ट फरक केला पाहिजे आतून जगणार्‍याला थेट जाणवणारे त्याचे मन हे आत्मविद्येत येईल. या खणातील मानसशास्त्रात बाहेरून पहाणार्‍या निरीक्षकाने वर्तनाचे गतिनियम शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. मूळ वर्तनवादी मानसशास्त्रात मन ही एक ब्लॅक-बॉक्स मानून तिच्या कडे येणारी चेतके (स्टिम्यूलाय) आणि तिला धारण करणार्‍या निरीक्षित व्यक्तीने दिलेले वर्तनात्मक प्रतिसाद (रिस्पॉन्सेस) यात समकक्षतेचे (कोरिलेशन) संबंध शोधले जात. जैव-रासायनिक शोधांनंतर संवेदनेंद्रिये मज्जातंतू, मेंदूतील रासायनिक आणि विद्युत-संदेश प्रक्रिया, या स्वरूपात ब्लॅक-बॉक्स उघडली गेली. पण बाहेरून पहाणारी तृतीयपुरुषी दृष्टी तशीच राहिली. समकक्ष मेंदूघटिते (न्यूरल कोरिलेट्स) साखळीत प्रविष्ट झाली. पण आतून येणारा साक्षात अनुभव मानसशास्त्राच्या बाहेरच राहिला. म्हणूनच हे शास्त्र मानसिक वास्तवाविषयीचे बाहेरून पाहिलेले गतिनियम एवढेच राहिले. म्हणूनच या वस्तूवादी अर्थाने येणारे मानसशास्त्र ह्या खणात बसते. आतून जगणार्‍याच्या साक्षात अनुभवांवर आधारित मानसशास्त्राचे जे प्रयत्न झाले त्यांना हुस्सेर्लप्रणित भावविश्ववाद आणि एक्झिस्टेन्शियल सायकोलॉजी म्हटले गेले. परंतु अन्तःसाक्ष्य पण सार्विक असे शास्त्र ज्याला आपण अध्यात्म म्हणतो त्यातच विकसित झाले. अर्थात पारलौकिक गृहितकांमुळे ते गूढवादी राहिले. परंतु पारलौकिक व गूढ नाही अशी आत्मविद्या असू शकते व ती आपण ४.३ व्या खणात पहाणार आहोत.

४.२) नीतीशास्त्र (स्त्रे) :

आपल्याला इच्छास्वातंत्र्य किंवा संकल्पस्वातंत्र्य आहे. आपण आपले मानसिक वास्तव चालवू शकतो व काही प्रमाणात बदलूही शकतो या गृहितकावर कोणतेही नीतिशास्त्र उभे असते. हे अर्थातच मूल्यात्मक ब्रीदात्मक व विध्यर्थक असते. माझे उत्स्फूर्त वा सहेतुक स्वयंनिर्धाराने केले जाणारे आचरण कसे आहे? हा प्रश्न, ते कसे असायला हवे? या प्रश्नाच्या संदर्भातच उपस्थित होतो. मानसिक वास्तवाला हाकणारे वाकवणारे व घडवणारे स्वतःसाठीच स्वीकारलेले विधिनियम कोणते? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नीतिशास्त्र होय. आता हे विधिनियम बनविताना विधीविधान-मूल्यप्रणाली या (क्र. ३.2) खणाशी संबंध येतो. जे मी माझ्यासाठी मानेन तेच सर्वासाठी मानेन व उलटपक्षी जे सर्वासाठी मानेन तेच माझ्यासाठी मानेन, हे तत्त्व कोणत्याही नीतिशास्त्रात असतेच. पण सर्वासाठी काय योग्य मानायचे हे राजकीय मूल्यप्रणालीवर अवलंबून असण्याने नीतिशास्त्रे अनेक बनतात. त्यांच्यातील विवाद जे असतील ते असतील, परंतु त्यांचा शास्त्रप्रांत मानसिक स्तवासाठीचे विधिनियम हाच रहातो. (सामाजिक वास्तवासाठीचे विधिनियम हे विधीविधान+मूल्यप्रणाली या प्रांतातच राहतात.) बहुविध नीतीशास्त्रांत संघर्ष येतो व तो सोडवावा लागतो हाच तर स्वातंत्र्य कशासाठी? या नावाचा महाप्रश्न आहे. मनुष्याला सर्वमान्य-सर्वहित नावाची आदर्श गोष्ट गवसेल असे नाही पण दिशादर्शक ध्रुव म्हणून सर्वमान्य-सर्वहित ही परिकल्पना (आयडिया ऑफ रीझन) सतत आपल्या समोर असेल.

४.३) आत्मविद्या :

नीतीमध्ये, मी कसा आहे? आणि मी कसा असलो पाहिजे? या दोहोत ताण रहातो. हा ताण कितपत सोसवेल हे पुन्हा आपापल्या मानसिक वास्तवावर अवलंबून असते. कोणत्या मान्यता बाळगण्याने हा ताण कमीत कमी रहाणारे आचरण करायला स्फूर्ती मिळेल? व या मान्यता सामाजिक वास्तव घडविण्यात स्फूर्ती देणार्‍या (धर्म हा खण) असतील की नसतील? याची निरनिराळी उत्तरे म्हणजे निरनिराळी अध्यात्मे होत. त्यापैकी काही पारलौकिक असतील व काही इहलौकिक असतील. जसा धर्म इहलौकिक बनेल तसे अध्यात्मही इहलौकिक बनेल. अनेक मूल्यप्रणाली, अनेक धर्म किंवा अनेक नीती यापैकी आपण कोणत्या निवडायच्या हा स्वतंत्र प्रश्न आहे. पण कोणत्याही निवडल्या तरी वस्तुनिष्ठ-मानसशास्त्रीय मर्यादा लक्षात घेऊन, कमीत कमी ताणानिशी जगण्याची कला म्हणजे आत्मविद्या होय.

४.४) ज्ञापना - जागृती :

आपल्या यत्न भोग बोध मय जीवनात शिकणे ही अखंड प्रक्रिया आहे. एकेका व्यक्तीला जागृतीत काय काय जाणवत जाईल ही एक वेगळी कथा आहे. अशा अगणित कथा घडल्या आहेत व चालू आहेत. मानवीज्ञान हे जगता येते तसेच प्रथमतः स्मृतीत आणि नंतर शरीरबाह्य माध्यमात चिन्हे कोरून साठविता सुध्दा येते. किंबहुना म्हणूनच ज्ञान ही एक वर्धिष्णू प्रक्रिया बनते. ज्ञानाचे प्रचिती-अंग जागृतीत असून साठवण्याचे अंग, म्हणजेच ज्ञापना अर्थात माहिती होय. माहिती ही स्वतःच व्यूहबध्द तर असतेच पण ती स्वतःच स्वतःवर क्रियाही करू शकते, हे आजच्या तांत्रिक उपलब्धीमुळे शक्य आहे. पण ज्ञापना ही निर्जीव व सुखदुःखरहित असते. तिचे भांडवल न वापरता जगाचा बोध करून घेणे शक्य नसते. पण बोध जर जागृतीत जगला गेला नाही तर तो व्यर्थही असतो. ज्ञापना आणि जागृती यांचे अखंड द्वंद्व चालू आहे. या द्वंद्वाची कहाणी सांगणे आणि सांगितलेल्याचा (किंवा लिहिलेल्याचा) अर्थ लावणे यातही द्वंद्व चालू असते. अर्थ लावताना, लावणार्‍यामुळे कहाणी काहीशी बदलते व तेही समजून घ्यावे लागते. ह्या क्रियेला हेर्मेन्यूटिक्स, अर्थनिर्णयन असा शब्द आहे. संशय आणि विश्वास या दोन्ही वृतींनिशी ते चालू असते. प्रमाण-ज्ञानशास्त्र करण्यापेक्षा प्रमाण-आस्था ठेवून केलेले हेर्मेन्यूटिक्स आज मानले जाते. रॅशनलिटी ही एकट्या व्यक्तीची तर लागतेच पण संवादाची रशॅनलिटी राखणे हेच एक फार महत्त्वाचे नीतितत्त्वही आहे!

या सोळा खणांमध्ये परस्परसंबंध काय आहेत? हा प्रश्न या निबंधात घेतलेला नाही. कोणते खण एकमेकांवर लागू करता येतात वा येत नाहीत हे पहातच सर्वशास्त्रसमग्रता हे आपले ध्येय साधत जायचे आहे. त्यासाठी एकसंध प्रारूप उभे करण्याचा हा एक प्रयत्न आहे.