‘अक्षर मैफल’ – कार्ल मार्क्स विशेषांक – A warrior, an outlaw, a rebel! (part 5)

अक्षर मैफल - कार्ल मार्क्स विशेषांक

या लेखाच्या आधीचा लेख या लिंकवर वाचता येईल –

http://aksharmaifal.com/http-aksharmaifal-com-200th-birth-anniversary-of-karl-marx-part-4/

मार्क्सचं खाजगी आयुष्य हे एक थरारून टाकणारं नाट्य आहे. अखेरपर्यंत त्याचं ना हक्काचं घर होतं ना हुकमी पैसे मिळण्याची काही सोय. त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी कित्येक दिवस अक्षरशः उपाशीपोटी आणि फार तर पाव व उकडलेला बटाटा एवढ्यावरच काढले. भांडीकुंडी आणि घरातलं इतर समान गहाण टाकून त्यांना पैसे उभारावे लागत. घरात पुरेसं पौष्टिक खाण्यासाठी नाही म्हणून मार्क्सची जेमतेम एक वर्षाची असणारी फ्रान्झिका नावाची मुलगी आजारी पडली आणि औषधपाण्याला देखील पैसे नसल्यामुळे त्या बिचार्‍या जीवाने प्राण सोडला. मार्क्सच्या आयुष्यातल्या अनेक चकव्यांपैकी हा एक निस्तब्ध करणारा चकवा आहे. मानवी जीवनाची प्रेरणा ही अर्थकारणात, पैशात आहे हे मांडणारा हा तत्वज्ञ स्वतःच्या घरासाठी मात्र पैसे उभे करू शकत नव्हता. मार्क्सच्या मनातली क्रांतीची ज्वालाच अशी तीव्र होती की त्याच्यामते स्वतःला इतर कोणत्याही कामात गुंतवणे हे क्रांतीकार्यासाठी हानिकारक ठरू शकेल. पुढे एकदा तो त्याच्या जावयाला म्हणाला देखील की, क्रांतीकार्यासाठी मी माझ्याकडे होतं नव्हतं त्या सार्‍याचा त्याग केला आणि तसं केल्याचा मला जराही पश्चात्ताप नाही. किंबहुना पुन्हा जगायची संधी मिळाली तर मी तेच करेन, मात्र त्यावेळी मी लग्न करणार नाही… आणि आयुष्याभरच त्याला मी आणि माझं कुटुंब एवढाच विचार करणार्‍या माणसांबद्दल संताप होता. अशी ‘व्यवहारी’ माणसं त्याला सल्ले देऊ लागली की मग तो भयंकर चिडे.

तथाकथिक व्यवहारी माणसांना अन् त्यांच्या शहाणपणाला मी केवळ हसतो! कोणाला जर मानवतेच्या यातानांकडे पाठ फिरवून स्वत:ची कातडी वाचवून जगायचं असेल, तर त्यांनी असं डुकरासारखं जरूर जगावं.

आणि इथेच मार्क्स आणि इतर तत्वचिंतक यांतला मुख्य फरक दडला आहे. मार्क्सचे विचार कोणाला पटतील कोणाला पटणार नाहीत, मात्र तरीही त्याच्या जीवनाचं संचित काय? मार्क्स ने जी राजकीय व्यवस्था मांडली तिच्या मर्यादा आज जगासमोर आल्या. मधल्या काळात आता मार्क्स संपला अशी वावटळ एखील उडाली. मात्र त्याने मार्क्स संपण्यापेक्षा त्याच्या मांडणीवर पुनर्विचार होऊ लागल्याचं आपण पाहतो. कम्युनिझम फसले मात्र मार्क्स ने मांडलेलं शोषणमुक्त समाजाचं स्वप्न विरणं शक्य नाही. मार्क्सच्या पूर्वीही हे स्वप्न अनेकांनी पाहिलं, दाखवलं’ त्याच्या नंतरही हे पाहणारे झाले, होत आहेत. मात्र मार्क्सच्या मांडणीतली धग अद्याप पर्यंत कोणापाशीही आलेली नाही. राज्यकर्ते एक बदलून दुसरे येतात, एक राज्यसंस्था बदलते आणि त्याजागी दुसरी येते, मात्र शोषणाच्या पायावर उभी असणारी व्यवस्था तशीच टिकून राहते आणि त्या व्यवस्थेच्या मुळाशी घाव घालण्याचे काम मार्क्सने आयुष्यभर केले. चार भिंतीत बसून जग पास-नापास करण्याची कारागिरी मार्क्सला देखील साधली असती मात्र जीवनाच्या कठोर वास्तावाचा झालेला स्पर्श हे त्याच्या मांडणीच खरं श्रेयस आहे. मार्क्सच्याच शब्दांत सांगायचं तर,

काही जगे (समाज व्यवस्था) मी कायमसाठी उध्वस्त करून टाकेन कारण (त्याशिवाय मला नवीन जग निर्माण करताच येणार नाही. कारण माझ्या या जगाला माझ्या हाका ऐकूच जात नाहीत)

त्यानंतर मला विजयी वीराप्रमाणे चालता येईल. त्या उध्वस्त जगामधून परमेश्वरासारखा

माझा प्रत्येक शब्द म्हणजे आग आहे

आणि कृती आहे. माझी छाती निर्मात्याच्या छातीच्या बरोबरीची आहे.

एका उत्तुंग जागी माझे सिंहासन उभारीन, तिथलं वातावरण थंड आणि थरकाप उडवणारं असेल.

त्या सिंहासनाचा आधार असेल अतर्क्य भीतीचा आणि सेनापती असेल क्रूर वेदनेचा.

वयाच्या विसाव्या वर्षापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत त्याने केवळ एकच ध्यास राखला तो होता हे जग शोषणमुक्त कसं करता येईल? त्यासाठी लागणारी क्रांती कशी करता येईल? त्याच्या हयातीत घडलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या आंदोलनामध्ये, उठवांमध्ये तो सतत क्रांतीच्या शक्यता शोधत राहायचा. त्या काळात युरोप खंडात जिथे-जिथे असं काही घडत होतं त्या प्रत्येक ठिकाणी मार्क्स सहभागी होता आणि कुठेच या आंदोलनांनी क्रांतीचं स्वरूप धारण केलं नाही आणि तरीही तो आपल्या विश्वासावर ठाम राहिला. एवढ्या सार्‍या भ्रमनिरासानंतर देखील त्याने स्वतःतली क्रांतीज्योत कशी पेटत ठेवली? मार्क्स च्या जीवनातलं हे एक मोठं कोडं आहे. सडलेल्या व्यवस्थांवर उभं असलेलं हे जग कोलमडून पडल्याशिवाय मानवतेला भवितव्य नाही आणि गत्यंतरही नाही हे त्याला ठाऊक होतं. आणि असे हे एकमेकांवर पोसले जाणारे वर्ग आणि माणसं आपले हितसंबंध टिकवण्यासाठी या व्यवस्था टिकवण्याच्या आणि झालंच तर वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात असतात. सबब हे जग आपणहून कोलमडून पडण्याची वाट पहात बसण्यापेक्षा क्रांतीच्या मार्गाने आपण त्याला कड्यावरून ढकलून दिलं पाहिजे आणि ते ढकलून देण्याचा मार्ग आपल्याला मार्क्सने दिला. पुन्हा तरुणपणात मार्क्सने एका कवितेत त्याला नक्की काय म्हणायचं हे अत्यंत स्पष्टपणे आणि तीव्रतेनं आलं आहे,

मी मानवजातीला असे प्रचंड भायानक शाप देईन!

कसली आली आहे अनादी अनंतता. (eternity)

ही आहे न संपणारी वेदना.

आपण असतो त्या चक्रातली बाहुली,

यांत्रिक आणि आंधळी

काळ आणि अवकाश time and space)

यांच्या वेळापत्रकात अडकवलेली.

सर्वनाश करून घेणे हाच असतो आपल्या अस्तित्वाचा हेतू.

तरीही उरते मोडून टाकण्यासारखे बरेच काही.

हे सारे उध्वस्त करणारे मला काही सापडले तर

मी त्यात उडी घेईन आणि आसपासचे जग जे,

मी आणि खोल-खोल अतर्क्यता (abyss)

यांच्यामध्ये तडमडत असते

त्याचे मी माझ्या शिव्याशापानी तुकडे तुकडे करून टाकीन.

मी घेईन कवेत कठोर दारूण वास्तव

त्या वास्तवाच्या मिठीत (हे सध्याचे) जग

मूकपणाने मरून जाईल.

आणि उरेल एक निव्वळ निरर्थकता हे जग नष्ट झाल्यानंतर,

त्याचे अस्तित्व संपल्यानंतर! मग सुरु होईल खरे जगणे.

ज्यावेळी त्याला जाणवलं की युरोपातील क्रांतीची लाट आता ओसरायला लागली आहे, त्याक्षणी त्याने स्वतःला इतिहास, राज्याशास्त्र, अर्थशास्त्र यांच्या अभ्यासात गाढून घेतलं जेणेकरून भविष्यातील क्रांतींसाठी पोषक मांडणी आपल्याला करता येईल. या दृष्टीने पहाता कम्युनिस्ट मेनीफेस्टो ते दास कॅपीटल हा त्याचा प्रवास ही अखंड क्रांती उपासना आहे. क्रांती साठी स्वतःला गाढून घेणारी मार्क्ससारखी माणसं हेच मार्क्सवादाच सर्वात मोठं संचित आहे. मार्क्स, मार्क्सवाद आणि कम्युनिझम हे काही केवळ बुद्धीला अपील करणारं, आव्हान देणारं, झालंच तर आपल्या अस्वस्थतांची उत्तरं देणारं दर्शन नाही. हे सर्व त्यामध्ये असलं तरी देखील लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हे सर्व साधन आहे, हे जग अधिक सुंदर करण्याच्या साध्या साठीचं आणि हेच विसरलं गेल्याने,

त्याच्याच तत्वांना हाती घेऊन चालणारं

बौद्धिक हस्तमैथुन, हे केवळ

समाधानाचा भास निर्माण करू शकते,

त्यातून निर्मिती होऊ शकत नाही,

मात्र विकृती निर्माण होतात.

रूढार्थाने अपयशी स्वरूपाचं आयुष्य मार्क्स जगला. आपण हाती घेतलेल्या कामाचं आणि मांडलेल्या विचारांचं वास्तव कसं असेल हे पाहणं त्याच्याच्याने झालं नाही. तरीही शेवटपर्यंत तो त्याच्या स्वप्नावर ठाम होता. दास कॅपीटल चं लेखन झाल्यावर मार्क्सने जवळपास काहीच लिहिलं नाही. बहुदा आपलं जीवित कार्य आता पूर्ण झालं ही भावना त्याला त्यातून मिळाली असेल. जेनीच्या जाण्याने मार्क्स एकटेपणाच्या निर्वात पोकळीत अडकल्या सारखा झाला. नाही म्हणायला आपल्या विचारांचा रशिया मध्ये झपाट्याने प्रसार होत आहे हे त्याच्या कानावर येऊन पडत होता. मात्र हे सारं कुठवर जाईल याची कसलीच आखणी करणे त्याला शक्य होत नव्हते. 1883 मध्ये मार्क्सची मोठी मुलगी, जेनी मरण पावली आणि आता मार्क्सने उरलेले दिवस मोजायला सुरुवात केली. जानेवारीत जेनी (मुलगी) गेली आणि 17 मार्च 1883 ला मार्क्स मरण पावला. भाविष्यात जग ज्याला डोक्यावर घेऊन नाचणार होते त्या मार्क्सच्या अंत्ययात्रेला 11 माणसं उपस्थित होती. मृत्यूपश्चात मार्क्सने स्वप्नांशिवाय इतर काहीच मागे ठेवले नव्हते. त्याच्याच एक संपादकीयाचा शेवट मात्र भविष्याला साद घालत होता,

Farewell, brothers, but it shall not be forever,

Our spirit they could not dismay.

With clashing of arms and as mighty as ever,

I shall be returning one day.

With a word, with a sword by Danube and Rhine,

A true ally in all times of trouble,

I shall be to these throne-smashing people of mine,

A warrior, an outlaw, a rebel !