‘अक्षर मैफल’ – कार्ल मार्क्स विशेषांक – A warrior, an outlaw, a rebel! (part 4)

अक्षर मैफल - कार्ल मार्क्स विशेषांक

या लेखाच्या आधीचा लेख या लिंकवर वाचता येईल –

http://aksharmaifal.com/200th-birth-anniversary-of-karl-marx-part-3/

मार्क्स आणि जेनी.

कम्युनिस्ट मेनीफेस्टोतील मार्क्सचा सहलेखक, आयुष्यभर त्याला आर्थिक मदत करणारा, त्याचा वैचारिक सहकारी अशा अनेक कारणस्तव एंजेल्स इतिहासाला माहित झाला. मात्र मार्क्ससोबत अखंड दारिद्य्रात कसलीही अपेक्षा न ठेवता 4 दशके संसार करणारी त्याची पत्नी जेनी मात्र तुलनेने इतिहासात उपेक्षित राहिली. मार्क्स आणि जेनी यांचं नातं हा मार्क्सच्या जीवनातला मजबूत धागा आणि एक चकवा देखील. कुटुंब हा बुर्ज्वा जीवनपद्धतीचाच एक अविष्कार आहे आणि ते मानवी जीवनातील विसंगती टिकवून ठेवण्यासाठी असणारं, व्यवस्थेतलं एक हत्यार आहे. त्यामुळे मार्क्सने कम्युनिस्ट मेनीफेस्टो मध्ये आणि इतरही कुटुंबव्यवस्थेवर जोरदार प्रहार केले आहेत. मात्र स्वतःचं कुटुंब जपण्याचे अपार कष्ट त्याने आयुष्यभर घेतले. यात जेनीवरच्या त्याच्या प्रेमाचा मोठा वाटा राहिला आहे. अन्नान्न दशा असणार्‍या अत्यंत हलाखीच्या वेळी देखील कोणत्याही स्वरुपाची कुरकुर न नकरता जेनीने आयुष्यभर मार्क्सची साथ दिली. ती त्याची बायको, खाजगी सचिव, लेखनिक तसेच मार्क्सच्या सर्वच लिखाणाची पहिली वाचक आणि टीकाकार देखील होती.

मार्क्स आणि जेनीचं प्रेम हे त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनचं. मार्क्सच्या वडलांच्या घराशेजारीच जेनी तिच्या कुटुंबियांसोबत राहायची. तिचे वडील, बारन ल्युडविग व्होन वेस्टफालन हे गव्हर्न्मेंट कौन्सिल होते. अत्यंत कलासक्त आणि अभिरुची संपन्न अशा जेनीच्या वडिलांचा मार्क्सवर लहानपनासापूनच जीव जडला होता. ल्युडविग मुळेच मार्क्सला होमर, गटे, शेक्सपियर इत्यादींच्या काव्याची साहित्याची गोडी लागली. ल्युडविगकडूनच त्याने पहिल्यांदा सेंट सिमन्स ची ‘सोशालीस्टिक स्टेट’ ही संकल्पना ऐकली आणि त्याच्यावर खूप प्रभावही पडला. बारन ल्युडविग व्होन वेस्टफालन यांकडून मार्क्सला भरपूर सारे अनौपचारिक शिक्षण मिळाले. 1841 मध्ये त्याने डॉक्टरेट पूर्ण केल्यावर, त्यासाठी लिहिलेला प्रबंध बारन ल्युडविग व्होन वेस्टफालन यांना अर्पण केला होता. याच माणसाकडून मार्क्सला श्रेष्ठ मूल्यांवर आधारित जगत आयुष्यात काही तरी करून दाखवले पाहिजे, ही प्रेरणा देखील मिळाली आणि तिथेच अशा आयुष्यात न कण्हता वा न थकता साथ देणारी जोडीदार देखील मिळाली.

पुढे विद्यापीठीय शिक्षणासाठी मार्क्स बाउन येथे गेल्यावर कित्येक काळ तो जेनीला कविता करून पाठवायचा. यात प्रेमकविता होत्या, तत्वचिंतनपर कविता होत्या, निसर्ग काव्य होतं. मधला काही काळ मार्क्सच्या मनात आपण देखील होमर किंवा गटेसारखं महाकाव्य लिहावं, अशी देखील इच्छा निर्माण झाली होती. या काळात त्याने लिहिलेल्या कविता जेनीने आयुष्यभर जपून ठेवल्या होत्या मात्र मार्क्सने कधीही आपणहून त्याचा विषय काढला नाही किंवा जेनीला देखील त्यावर काही करू दिलं नाही. यथावककाश मार्क्सच विद्यापीठीय शिक्षण पूर्ण झालं. मध्यंतरी तो एका वृत्तपत्राचा संपादक म्हणू बर्‍यापैकी नावाजला गेला. आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

यावेळीपर्यंत बारन ल्युडविग व्होन वेस्टफालन यांचा मृत्यु झाला होता. जेनीचा मोठा भाऊ फर्डिनांड (जो प्रशियन सरकारचा गृहमंत्री होता) हा कुटुंबप्रमुख बनला. जेनी म्हणजे गर्भश्रीमंत, खानदानी कुटुंबातली मुलगी, तर मार्क्स म्हणजे अक्षरशः कफल्लक आणि प्रशियन सरकारचा टोकाचा टीकाकार आणि विरोधक. तरीही बारानसाहेबांचे त्याच्यावर प्रेम असल्याने घरच्यांनी हा आज न उद्या सुधारेलच, असा विचार करून लग्नाला विरोध केला नाही. त्यावेळी त्यांना काय ठाऊक की, लग्नात मार्क्सला भेट दिलेल्या चांदीचा सेट आणि इतर गोष्टी गहाण टाकूनच मार्क्सचा आयुष्यभराचा संसार चालणार आहे ते.

1844 पर्यंतच्या मार्क्सच्या आयुष्याला निदान थोडंतरी स्थैर्य होतं. तो जर्मनीतच राहायचा. बर्‍यापैकी खपणारं एक वृत्तपत्र चालवायचा. मात्र यानंतर पुढची निदान 15 वर्षे त्याच्या जीवनाला कसलंच स्थैर्य मिळणार नव्हतं. अशातच जेनी दर दोन वर्षांकाठी बाळंत रहायची त्यामुळे घरात खाणारी तोंडे वाढतायत, मात्र त्यांना पुरेसं अन्न वस्त्र मिळेल इतका पैसा काही घरी येत नसल्याने जेनीची प्रचंड ओढाताण होई. जेनीला या सार्‍याची प्रचंड काळजी असे पण मार्क्स या बाबतीत फारच बेफिकीर होता. मार्क्सला त्याच्या लेखनातून मिळणार्‍या पैशातून त्यांची जेमतेम हातातोंडाची गाठ पडायची. एंजेल्स थोडे पैसे पाठवायचा पण त्याचा उपयोग बरेचदा गहाण पडलेल्या वस्तू सोडवून आणण्यासाठी व्हायचा. अनेकदा तर 24 तासांच्या आत देशाबाहेर पडण्याचे आदेश मार्क्सला विविध सरकारांकडून मिळायचे तेव्हा, असतील नसतील त्या ‘मौल्यवान’ वस्तू विकून गहाण पडलेल्या वस्तू सोडवून आणाव्या लागत आणि अर्थातच हे सारं जेनीला करावे लागे. अगदी अखेर पर्यंत मार्क्सच्या घरावर देणेकरी सतत खेपा घालत राहत. मार्क्स सतत ग्रंथालयात. तेव्हा त्यांना तोंड द्यायचं काम जेनी आणि मार्क्सच्या छोट्या मुलांचे. घरातल्या मुलांचे होणारे हाल जेनीला बघावायचे नाहीत. मात्र तिने कधीही मार्क्सकडे ना कसले हट्ट धरले, ना कसले भांडण काढले. त्याच्या क्रांतीउपासनेत कसलाही व्यत्यय येता कामा नये याची सतत काळजी तिने घेतली.

अशातच मार्क्सच्या घरात आयुष्यभर बिनपगारी आणि इतर कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणार्‍या हेलन डीमथ या तरुण नोकराणीला मार्क्स पासून दिवस गेले. हा काळ कौटुंबिक कारणास्तव फारच अवघड होता. जेनी प्रचंड उद्विग्न झाली. मार्क्सला प्रचंड अपराधी वाटत होतं, जेनीला तोंड दाखवायची शरम वाटे. जेनी दु:खाने, दारिद्य्राने बधीर झाली होती. भांडायचे त्राण देखीळ तिच्यात नव्हते. आणि अशातच मार्क्सचा लहान मुलगा ग्युडो आजारी पडला. घरी ही अशी परिस्थिती. पैसा नाही तर औषधपाणी कसं करायचं आणि कोण करणार. अशातच ग्युडोचा मृत्यु झाला (1850). यावेळेला जेनी पुन्हा गरोदर होतीच……

मात्र अशाही परीस्थित जेनीनेच मार्क्सला सांभाळून घेतलं. आता जेनी आपल्याशी घटस्फोट घेईल आणि आपल्याला सोडून जाईल याची मार्क्सला सतत भीती वाटायची. मात्र जेनीला मार्क्सला आपली गरज आहे याचं भान असल्याने मोठ्या मनाने सारं सहन केलं, पचवलं आणि याचं कसलंही उट्टं तिने काढले नाही. मार्क्सला देखील जेनीच्या त्यागाची जाण होती. त्याचं तिच्यावर प्रचंड प्रेम होतं. शेवट पर्यंत आपलं कुटुंब विस्कळीत होऊ नये यासठी वाट्टेल ते प्रयत्न मार्क्सने केले. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेल्यावर मार्क्सने जेनीला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो, जगात पुष्कळ स्त्रिया आहेत, त्यातल्या काही सुंदरही आहेत, परंतु ज्या चेहर्‍याकडे पाहून माझ्या आयुष्यातील अत्यंत प्रभावी आणि मधुर स्मृती जागृत होऊ शकतील असा सौंदर्यसंपन्न चेहरा तुझ्याशिवाय अन्यत्र कोठेही मला दिसत नाही.

मार्क्सला कौटुंबिक जीवनात रस होता. व्यवहाराच्या पलीकडचा आनंद यात सामावलेला होता. त्याचा मुलांवर फार जीव. पुढे 1855 मध्ये एडगर या त्याच्या आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्यावर कित्येक काळ मार्क्स त्या धक्क्यातून सावरला नव्हता. त्याला आपल्या मुलांना नवीन वस्तू आणून द्यायला आयुष्यात कधीच जमलं नाही. मात्र रोज त्यांच्या सहवासात तो वेळ घालावी, त्यांना गोष्टी सांगायचा. राविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी त्यांना डोंगरावर, बागेत फिरायला घेऊन जाई. तिथे गटे, शेक्सपिअर, डान्टे, रोबेर्ट बर्न्स यांच्या अनेक कविता त्यांना म्हणून दाखवी आणि त्यांच्या कडून पाठ करवून घेई.

मार्क्सला साहित्याची प्रचंड आवड होती. कित्येक उतारे त्याला तोंडपाठ असत. अलेक्झांडर ड्युमास, वाल्टर स्कॉट, बाल्झाक हे त्याचे लाडके कादंबरीकार. म्युलर आणि फिशर चे सौंदर्यशास्त्र अभ्यासायला त्याला आवडायचे. कलेच्या क्षेत्रातही वर्गनिष्ठा राहते काय? याचा शोध तो यातून घेत राही. मानवी जीवनाच्या रुंदावणार्‍या कक्षांची त्याला जाण असली पाहिजे. मार्क्स ज्याला सुपरस्ट्रक्चर म्हणतो, त्याची मांडणी आणि उभारणी कशा रुपात होते याचा शोध घेण्याची प्रेरणा यात होतीच. मात्र मानवी जीवनाचा आनंद देखील यात त्याला सापडायचा आणि हीच बाब भविष्यातील मार्क्सवादी विसरल्यामुळे हे दर्शन अधिक संकुचित होत गेलं असावं. अमुक हा मध्यमवर्गाचा अविष्कार आहे, तमुक ही उच्च वर्गीयांची कला आहे असं तथापि ते वाईट. खरं तर इथवरची मीमांसा आपण समजू शकतो मात्र, जेव्हा ‘ते’ अमुक वर्गाच आहे; सबब त्याचा आस्वादच घ्यायला नको अशी भावना प्रसारित व्हायला लागते तिथपासून विचारधारा मागे पडायला सुरुवात होत असते. समाजवादी व्यवस्थाना मागे टाकून भांडवली व्यवस्था पुढे जाण्याचं एक मुख्य कारण हेच आहे की जेव्हा डावी माणसं उजव्या गोष्टी टाकावू. सबब त्यातलं आपल्या कामाचं काहीच नाही असं म्हणत असताना, उजव्या व्यवस्थांनी डाव्यांची आपल्याला डोकेदुखी होऊ शकतील अशी मूल्य अलगदपणे आपल्या व्यवस्थांमध्ये सामाईत करून घेतली. मात्र मार्क्सचं असं नव्हतं. आज मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्यावर मार्क्सचा प्रभाव पडला नाही याचं देखील एक कारण म्हणजे मार्क्स टीकाकार असला तरी पर्यायी आणि विरोधी व्यवस्थांमधले विकासस्तर आणि बदल त्याला ठाऊक होते आणि पूर्वग्रह न राखता त्यांच परिशीलन करण्याची मोकळी दृष्टी त्याकडे होती.

मार्क्स आणि जेनी यांनी प्रचंड कष्ट आणि हालअपेष्टा सोसल्या. तरीही एकमेकांवरचं त्यांचं प्रेम सतत वृद्धिंगतच होत राहिलं. दास कॅपीटलचं लिखाण पूर्ण झाल्यावर आयुष्यातील शेवटची दहा वर्षे मार्क्सने काहीच लिहिलं नाही. तोपर्यंत त्याचं कुटुंब भाड्याच्याच पण एका प्रशस्त घरात राहायला गेलं होतं. तुलनेनं आता सुखाचे दिवस येऊ पहात होते. मार्क्सला पुस्तकातून थोडं मानधन मिळत होतं शिवाय एंजेल्सची मदत होतीच. अशातच जेनी प्रचंड आजारी पडली. मार्क्सला कळून चुकली की हे शेवटचं आजारपण. त्याने जेनीची सुश्रुषा केली, तो तिला पुस्तके वाचून दाखवायचा. मार्क्सला जेनीचे होणारे हाल पाहवत नसत. पण दुसरं करणार तरी की काय? अशातच 1881 मध्ये एका इंग्रजी मासिकात Leaders of Modern Thought या लेखमालेत मार्क्स वर एक दीर्घ लेख लिहून आला. मार्क्सने आनंदाने तो लेख जेनीला वाचून दाखवला. मार्क्सला मिळालेली जागतिक मान्यता मृत्युशय्येवर असणार्‍या जेनीला कृतार्थतेची भावना देऊन गेली आणि पुढल्या काही दिवसातच तिने प्राण सोडला. या नंतर पूर्वीचा मार्क्स कधीच पुन्हा हिरीरीने उभा राहिला नाही.

Creativity requires the courage to let go of the certainties.

– Eric Fromm

या लेखमाळेतील शेवटचा लेख या लिंकवर वाचता येईल –

http://aksharmaifal.com/http-aksharmaifal-com-200th-birth-anniversary-of-karl-marx-part-5/