अफगाणिस्तान – युद्धाच्या छायेतील क्रिकेट

India vs. Afghanistan - Historical First Test

अफगाणिस्तान क्रिकेटचा जनक – ताज मलिक

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील कचा-कारा कॅम्प मध्ये जेमतेम विशीच्या आत-बाहेर असलेला ‘ताज’ मनाशी एक स्वप्न बाळगू लागला. तुम्हाला वाटेल स्वप्न पाहणं हे चुकीचं आहे का? पाहतात ना लोक! सोव्हिएत युनियन सोबत सुरू झालेलं अफगाणिस्तानचं युद्ध आणि त्यामुळे विस्थापित झालेले लोक यांच्या कथा जगाने चहाच्या घोटाबरोबर वाचल्या, काहींना तो चहाचा घोट कडवट ही लागला असेल..हाच बाकी जगाच्या जीवनमानात झालेला बदल! परंतू, स्थानिक लोकांचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं. युद्धाच्या पहिल्या झळा ज्यांना बसल्या व जे विस्थापित झाले त्यांच्यात ‘ताज’ च कुटुंबही होतं. पुढे त्याचे कुटुंब रेफ्युजी कॅम्पमध्ये कधी दाखल झाले – कळायला मार्ग नाही – पण इथेच ताज आपल्या भावंडांसह मोठा झाला. तो काळ होता पाकिस्तानने १९९२ चा विश्वचषक जिंकल्याचा. ‘ताज’ ने लोकांना नाचताना पाहिलं, आनंदी होताना पाहिलं, रस्त्यावर उतरून जल्लोष करताना पाहिलं, असा उत्साह त्याने आधी कधीच पाहिला नव्हता. हे सर्व घडत होत ‘क्रिकेट’मुळे – त्याच्या मनात विचार आला- आपल्याही देशाची क्रिकेट टीम असती तर? आणि इथेच ‘ताज’ने स्वप्न पाहिलं अफगाणिस्तानची क्रिकेट टीम असावी. आपल्या तीन भावंडांसह ताज ने इथे क्रिकेट खेळणं सुरू केलं. १९९२ च्या विश्वचषक विजयानंतर पाकिस्तानात सगळीकडे क्रिकेट पाहायला मिळायचं. रस्त्यावर, पार्कमध्ये, अंगणात, मैदानांवर कुठेही. असं सार्वत्रिक क्रिकेट आपल्याला नवं नाही. लहानपणी शिक्षक आमच्या अभ्यासावर चिडले की “उद्यापासून तो तीन लाकडं अन अकरा माकडं हा खेळ बंद करा” असा दम द्यायचे. ब्रिटिश आपल्या इथे आले आणि खूप काही घेऊन आणि बरंच काही देऊन गेले..त्यातला एक म्हणजे आपला लाडका खेळ क्रिकेट. पण अफगाणिस्तानात ते अशी काही परंपरा मागे ठेवून गेले नाहीत. अशा या अफगाणिस्तानात ताज क्रिकेटचा राष्ट्रीय संघ बांधायला निघाला होता. सर्वात पहिला भिडू त्याला मिळाला तो करीम सादिक. पूढे हा करीम अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा सलामीचा फलंदाज झाला. तोही याच कचा-कारा मध्येच राहत होता. तो तिथल्या एका माचिस कारखान्यात रात्रपाळीवर काम करायचा आणि दिवसा क्रिकेट खेळायचा. क्रिकेटबद्दल या दर्जाचं प्रेम पाहता त्याचं भविष्य उज्वल होतं असं आज कोणीही म्हणेल परंतु करीम सादीकची परिस्थिती सगळं सांगून जाते. तो म्हणतो, “आमच्याकडे धड खायला देखील काही नव्हतं, उलट कुटुंबाकडून एक दबाव असायचा कारण मी तोपर्यंत विशेष काही कमवत नव्हतो.”

Taj Malik - Man Behind Afghanistan's Cricket
ताज मलिक
Afghanistan Cricket Among Turmoil
अफगाणिस्तान - युद्धाच्या छायेतील क्रिकेट

ताज आता आजूबाजूच्या रेफ्युजी कॅम्पमधून फिरायचा. अधिक चांगले खेळाडू मिळतात का? ते पाहायचा, काही अफगाण खेळाडू स्थानिक पाकिस्तानी क्लब कडून खेळायचे त्यांना आपल्या सोबत जोडण्याच्या कामात ताज लागला. यात बऱ्याचदा यश येई, पुष्कळदा निराशाच हाती येई. तीनेक वर्षांच्या परिश्रमांनंतर शेवटी अफगाणिस्तान ऑलम्पिक समितीच्या मदतीने अफगाणिस्तान क्रिकेट फेडरेशन ची स्थापना झाली. साल होते १९९५! याच काळात तालिबानने अफगाणिस्तानात आपली मुळे घट्ट केली होती. त्यांनी खेळांवर बंदी घातली. आपला जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील खेळाच्या रूपाने येणारे काही आनंदाचे क्षण तेही हिरावले गेले. तालिबान्यांचा मुख्य विरोध होता तो फुटबॉलया खेळाला, त्या साठी घालाव्या लागणाऱ्या पोशाखाला, तो इस्लामबाह्य ठरवण्यात आला. पोशाखाच्या नियमात क्रिकेट तसा वादग्रस्त कधी ठरला नसेल. पांढऱ्या पूर्ण अंग झाकणाऱ्या कपड्यांमुळे तालिबान्यांनी सुरवातीच्या काळात या खेळावर विशेष राग धरला नाही. त्यामुळे क्रिकेटचे सामने भरतं असत. आपल्याकडे कुस्त्यांचे फड रंगतात तसे लोक आजूबाजूंच्या गावातून सामने पहायला येत. दोन गावांमध्ये सामने रंगत. बऱ्याच लोकांसाठी हा त्यांच्या आयुष्यातील स्वमर्जीने केलेला पहिलाच प्रवास असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधीकधी तालिबानी नेत्यांच्या हस्तेच सामन्यांचे आयोजन नाहीतर किमान बक्षीस वितरण होऊ लागले. ताज आणि इतर लोकांचे एक मंडळ सरकार दरबारी मदतीसाठी गेले. आर्थिक मदत आणि राष्ट्रीय दर्जा यासाठी सरकारकडे मदत मागण्यात आली. परंतु क्रिकेट या विदेशी खेळाला मदत देण्यास सरकारने नकार दिला. मग हे खेळाडू लोकांकडून पैसे जमवण्याच्या खटपटीत लागले. एखाद्या गोष्टीचे वेड लागल्यानंतर त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी ठेवणारे हे लोक होते. क्रिकेटवेड्या पाकिस्तानशी लागून असणाऱ्या पख्तुन या सीमाभागात हा खेळ सुरू झाला असल्याने जास्तीतजास्त खेळाडू याच भागातून असायचे. हे चित्रही लवकरच बदलले. हळूहळू हजारा, उझबेक, आणि ताजिक हे लोकही या खेळाकडे वळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून यांना आर्थिक मदत व आवश्यक सामग्री मिळाली. या सगळ्या गोष्टींचा सर्वात महत्वाचा परिणाम असा झाला की, अंतर्गत यादवीने बेहाल झालेल्या या देशाला तेथील सर्व प्रांतांना, वांशिक गटांच्या लोकांना, समुदायांना एकत्र आणण्याचं काम या संघाने केलं. या पूर्वीपर्यंत ते कुणी पश्तु, उझबेक, ताजिक किंवा हजारा इत्यादी लोक होते पण आता ते अफगाणिस्तानी म्हणून जगासमोर येणार होते. मिसरूड फुटायच्या वयात ताज मलिक (मलूक) ने पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण झालं होत. आज ताजला अफगाणिस्तान क्रिकेटचा जनक म्हणतात ते याच मुळे. आता अफगाणिस्तान जगाशी भिडायला एक होणार होता.

(क्रमशः)

लेखक – विष्णू फुलेवार